०४ अतृप्ता

– अनंत नारायण संझगिरी

🙏🏻*मनोगत*🙏🏻

मित्रहो ……

संगीत आणि आठवणी यांचं एक अतूट नातं असतं. काही गाणी केवळ ऐकण्यासाठी नसतात, तर ती आपल्याला भूतकाळातील एका सुंदर प्रवासाला घेऊन जातात. ‘अतृप्ता’ (Atrupta) म्हणजे अशीच एक न संपणारी ओढ, एक अपूर्ण राहिलेली पण मनात घर करून राहिलेली भावना. जेव्हा आपण जुन्या आठवणींचा आणि सुरावटींचा विचार करतो, तेव्हा मनाच्या कोपऱ्यात दडलेले अनेक कप्पे आपोआप उघडले जातात.

या सदरात आपण याच भावनांचा आणि संगीताच्या जादूचा एक भावपूर्ण प्रवास अनुभवणार आहोत. “अतृप्ता” पुन्हा एकदा एका गुढ आणि भय कथेच्या माध्यमातून हा प्रवास आपल्यासमोर सादर करत आहे. ह्यावेळी ही सर्व गाणी ‘हिंदी चित्रपटातील गीते’ आहेत. आपण ती आवर्जून ऐकावीत आणि त्याचा आनंद घ्यावा अशी आशा वाटते. ह्या माझ्या प्रयत्नात बऱ्याच त्रुटी असू शकतील, त्या आपण मला नक्की कळवाव्यात; मी आपला आभारी असेन……..

***********************

…………(०१)

वास्तविक, आजही पाच दहा जणांना आपण सहज पुरे पडू शकतो ह्याची मेजरना पुरेपूर कल्पना होती. आपल्या मनगटातील जोर, आपण आजपर्यंत गाजवलेले शौर्य हे सर्व साथीला असूनही, आता आपल्या सभोवती एक अनामिक, अनाकलनीय शक्ती वावरत असल्याचा भास होऊन ते नखशिखांत शहारले. संध्या समयीचे हे वातावरण गूढ होत आहे, एक अमोघ शक्ती एक अज्ञात प्रवाहच जणू आपल्या बाजूने वाहत असल्याची त्यांना जाणीव होत होती. मनगटावरील घड्याळात सात वाजायला आले होते. कोणत्याही शारीरिक व्याधींनी ह्या वयातही स्पर्श न केलेले शरीर एकाएकी जड होत असल्याची शंका, त्यात कपाळावर जमा झालेले धर्मबिंदू, जणू काही आपला शक्तिपात होत असल्याची जाणीव, आणि बाजूचा वाढता अंधार. मेजर भय्यासाहेबांना का कोणास ठाऊक पण आयुष्यात प्रथमच आपण घाबरलोय ह्या जाणिवेने हादरून टाकले.

“उमेशला घेऊन लगेच येते, तोवर लॉन वर बसा” असे सांगून गेलेली सविता अर्धा तास झाला तरी अजून कशी आली नाही? हा विचार त्यांच्या मनात यायला आणि बाजूच्या झाडावरून ‘धप्पदिशी’ कोणीतरी उडी मारायला एकच गाठ पडली आणि बाजूला कोणीच नाही हे लक्षात येताच त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले.

“सविता” म्हणून ते किंचाळलेच पण आपण मोठ्याने ओरडून मारलेली हाक तोंडातून बाहेर फुटलीच नाही की काय असं वाटत असतांना एकाएकी ‘बंगलीत’ कोणीतरी दिवा लावलेला दिसला. ‘अरे सविता तर गार्डन मध्ये काम करीत असलेल्या उमेश ला बोलवायला गेली होती’. मग लाईट कोणी लावला. इझी चेअर वरून कसेबसे उठत “कोण आहे रे तिकडे?” म्हणून ते ओरडले, आणि कॉरिडॉर कडे आले. पण बंगलीतले लाईट पुन्हा गेले. आत कोणीच नाही, आणि तेथील भीषण शांतता पाहून, रामरक्षा म्हणत पायऱ्या उतरून तेथून निघून जाण्याशिवाय त्यांना पर्याय उरला नाही. रस्त्यावरून मागे वळून पाहताना घरात दिव्यांची होणारी उघडझाप पाहून काहीतरी विचित्र प्रकार घडत असल्याची खात्री होऊन ते तेथून निघून थेट आपल्या घरी गेले.

एव्हढी ‘टुमदार बंगली’ आणि त्यापुढचे विशाल लॉन एका भल्या मोठ्या काळ्या सावलीत दिसेनासे झाले. ‘उमेशला’ घेऊन आलेली ‘सविता’ भैय्यासाहेब तेथे नाहीत हे पाहून चक्रावून गेली. कदाचित बंगलीत असावेत असे एक क्षण तिला वाटले. “पप्पा निदान पोर्च चे लाईट तरी लावायचे” म्हणत ती कॉरिडॉर मध्ये आली, “पप्पा पप्पा” म्हणून तिने हाक मारली पण संपूर्ण अंधार आणि आत कोणीच नाही हे पाहून तिला अचंबा वाटला. दिवे लावणार इतक्यात एक हलकीशी झुळूक तिच्या अंगावरून गेली, अंगावर सर्रकन काटा उभा राहिला, एक प्रकारचा कुबट दर्प तिच्या नाकाला झोंबला, तिने धीर करून लाईट लावले. पोर्चमध्ये उमेश तसाच थिजल्या सारखा उभा होता. दोघांनीही एकदम “कोण आहे तिथे?” म्हणून विचारले. दोघांनाही तिथून कोणीतरी गेल्याचा भास झाला होता. आणि सगळे लाईट एकाएकी विझले. दाट अंधार पसरला, उमेशने सविता जवळ पुढे येई पर्यंत अचानक लाईट पुन्हा लागले. सविताच्या खांद्यावर हात ठेवीत आणि आत्ता काहीच घडले नाही असे दाखवत म्हणाला. “अगं, भय्यासाहेब आलेत असं सांगून तू मला घेऊन आलीस, पण त्यांचा तर इथं पत्ताच नाही, गेले की काय?” सविता नुसतीच त्याच्या चेहऱ्याकडे बघत राहिली. आपण घाबरलो नाही, काही घडलेच नाही, हे मात्र त्याचा चेहेरा लपवू शकला नाही. तिला आधार देत ते दोघे हॉल मध्ये शिरले. आणि तेथील लाईट आपोआपच लागले. एक ‘अनोखा गंध’ जो मगाशी सविताने गार्डन मध्ये अनुभवला होता, नेमका तोच आणि एक हलकीशी झुळूक हॉल मधून कॉरिडॉर कडे गेल्याची जाणीव सविताला होऊन ती नखशिखांत शहारली……..

 

…………(०२)

ह्या प्रशस्त बंगलीत त्या दोघांचच वास्तव्य होतं. मध्येच कधीतरी जवळच राहणारे सविताचे वडील ‘मेजर भय्यासाहेब’ आणि तिची आई ‘वहिनीसाहेब’ चार आठ दिवस येऊन राहायचे, त्यांचा सहवास मिळायचा हाच काय तो चेंज. उमेश एक हुशार, उमदा सिव्हील इंजिनीअर.

एका ओळखीच्या पार्टीत ‘श्री’ मार्फत झालेली भय्यासाहेब, आणि सविताची ओळख उमेशला आयुष्याचा पार्टनर देऊन गेली. उमेश देखणा, त्या मानाने सविता उणी पडायची. सुस्वभावी, आणि चांगली क्वालिफाइड असूनही, अबोल असल्याने सविता एकटेपणाचे आयुष्य जगायची. पहिल्यापासून कोणातही न मिसळणारी सविता लग्नानंतर उमेशच्या सहवासात पार बदलून गेली. तिचं एकाकीपण हळू हळू नाहीसं झालं. उमेशच्या प्रेमळ सहवासात ती एखाद्या निर्मळ झऱ्यासारखी खळखळून वाहू लागली. आयुष्यात प्रथमच जीवनाची गोडी, आयुष्याचं असीम, अनोखी संगीत उमेशच्या गोड सहवासात तिला प्रेमाने न्हाऊ घालून त्यांच्या संसारी जीवनाची बाग फुलवीत होते.

त्या दोघांच्या लग्नाला जवळ जवळ चार वर्षे होत आली, आणि सविता कड़े गोड़ बातमी होती त्यामुळे ते दोघेही खुशीत असतानाच अचानक एके दिवशी त्या ‘स. ट. वि.’ ने घाव घातला. छोटं बाळ घरी येणार ह्या आनंदावर पाणी ओतून वर सविताला कॅन्सर असावा आणि तिला अपत्य होऊन चालणार नाही, हे उमेशला डॉक्टरांनी सांगितल्या मुळे, ‘स. ट. वि.’ चे फावले. पुढे आपल्याला मूल होणार नाही ह्या जाणिवेन दिवसेंदिवस सविताचे मन आणि शरीर पोखरत होते. ती खंगत चालली होती. त्याचबरोबर आपल्याला आता अपत्य होणार नाही, आणि सविताही थोड्याच महिन्याची सोबतीण आहे हे उमेशला कळल्यामुळे त्याने आयुष्याची रंगवलेली स्वप्ने धुळीला मिळाली. आयुष्यातील चार्मही निघून गेल्यासारखा झाला. आपण पोरके होणार, ह्या कल्पनेने त्याला ग्रासून टाकले. वैवाहिक जीवनातला तिचा सहवास दिवसेंदिवस कमी कमी होऊ लागला. एव्हढा तरणाताठा उमेश वेली सारखा सुकू लागला. आपण एकटे पडणार, पोरके होणार, आता जीवनात पालवी फुलवणारं कोणीतरी असावं. आयुष्यात आपलं असं कोणीतरी असावं असं आजकाल त्याला वाटू लागलं होतं. आज बिछान्यावर पडल्या पडल्या हाच विचार तो करीत होता…

संध्याकाळच्या त्या प्रकारानंतर त्याचे आज जेवणातही लक्ष नव्हते. आणि आता झोपहि येत नव्हती. बाजूला झोपलेल्या सविताकडे त्याने एकवार पाहिले, तीला गाढ झोप लागली होती. तो मात्र एकटे पणाच्या आगीत होरपळत होता. हिच्या नंतर आयुष्य कसे काढायचे ह्या विचारात बराच वेळ त्याला झोप लागली नाही.

एकाएकी नाईट लॅम्प ऑफ झाला. इलेक्ट्रिसिटी गेली असेल असे त्याला प्रथम वाटले पण पंखा मात्र चालूच होता. कदाचित बल्ब गेला असेल असे वाटेपर्यंत लाईट लागला. आणि पुन्हा गेला. असे वारंवार होऊ लागले. एक हलकीशी झुळूक आणि संध्याकाळी गार्डन मध्ये गुंगी आणणारा तोच गंध त्याला स्पर्शून गेला. आणि त्याच वेळी मेन गेट जवळ कोणीतरी आल्याचा आवाज आला, तसा तो बेडवरून उठला आणि कॉरिडॉर मध्ये आला.

पूर्ण चंद्राच्या त्या शीतल प्रकाशात एक ‘लावण्यवती’ मेन गेट कडून गार्डन कडे जातांना त्याला दिसली. तिच्या चालण्यातली लकब, ते लोभस सौन्दर्य ह्यावर पाहता क्षणीच उमेश लुब्ध झाला. ती लॉन वरून गार्डन कडे पाठमोरी जातांना तिने मागे वळून मानेला झटका देत नजरेतील विलक्षण ओढीने एक ‘कटाक्ष’ उमेश कडे टाकला आणि उमेश तिला न्याहाळत मंत्रमुग्ध होऊन जागच्या जागी खिळला. वास्तविक इतक्या रात्री, एका सुंदर स्त्रीने, ते सुद्धा एकटेच, ह्या बंगलीकडे यावे ह्याचे त्याला काहीच नवल वाटले नाही. तिच्या नजरेतील जादूनेच त्याला भ्रमात टाकले होते. तो तिच्या पाठोपाठ लॉन पर्यंत आला, ती तशीच गार्डन मध्ये पाठमोरी उभी होती.

संध्याकाळी गार्डन मध्ये रोपटी लावत असतांना असंच कोणीतरी आपल्या बाजूने गेलं होतं, ‘तो भास नव्हताच तर’ असं मनाशी म्हणत तो तिच्या पर्यंत पोहोचला. त्या दोघांच्या मध्ये काही पावलांचच अंतर होतं, आपण मागे मागे येतोय, ह्याचं हिला काहीच कसं वाटत नाही म्हणे पर्यंत तिने मागे वळून त्याला एकटक पाहिले, तिच्या नजरेतील जरबीने तो संपूर्ण शहारला, तिची नजर जणूकाही तो तिचा ‘गुन्हेगार’ असल्याचे उमेशला सांगत असावी असे क्षणभर त्याला वाटले आणि तो गोंधळला.

पुढच्याच क्षणी तिच्या त्या नजरेत विलक्षण बदल होऊन त्यात ‘जन्मोजन्मीची ओळख आणि एक अनामिक ओढ’ तिच्या नजरेत त्याला जाणवली.

उमेश मोहरून गेला. असं अप्रतिम लावण्य त्याला चंद्राच्या प्रकाशात एखाद्या शिल्पा प्रमाणे भासलं. तिच्या मुग्ध रूपातील तो गोडवा त्याला हवा हवासा वाटू लागला. मंत्रमुग्ध होऊन तो एकटक तिच्याकडे प्रेमाने पहात असतानाच चंद्र ढगाआढ गेला. एक अंधारमय, सुन्न आणि रातराणीचा धुंद सुगंध दरवळलेलं वातावरण तयार झालं. असा किती वेळ गेला कुणास ठाऊक. पाठीला झालेल्या हलक्याशा स्पर्शाने आणि सविताच्या हाकेने तो भानावर आला……..

 

…………(०३)

सविता बरोबर तो परत बेडरूम मध्ये आला खरं, पण मन अजूनही तिच्याच मागे भरकटलं होतं, तेथेच रेंगाळलं होतं. आता सविता कडे लक्ष गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की सविता घामाने ओथंबलेली आहे, त्याने विचारपूस करताच म्हणाली “अहो मला कसली तरी भीती वाटून मी जागी झाले, मला भीतीदायक स्वप्न पडलं, तुम्हाला कोणीतरी माझ्यापासून हिरावून नेत आहे. घाबरून जागी झाले तर बाजूला तुम्ही नाही, बऱ्याच हाका मारल्या, अश्या रात्री तुम्ही बागेत कसे आणि कोणासाठी गेलात, संध्याकाळी सुद्धा असेच निघून गेला होतात. उमेश मी आता अशी एकटीच राहणार काहो?” रडत रडत थरथरत तिने विचारलं.

उमेशला काहीच कळत नव्हतं, बहुदा वाईट, भीतीदायक स्वप्न पडल्यामुळे ती इतकी हळवी झाल्याचं सांगून त्याने तिची कशीतरी समजूत काढली. तिला जवळ घेत, ते दोघे पुन्हा बिछान्यावर पहुडले… सविताच्या जवळ असूनही उमेशच्या मनात आणि डोळ्यापुढे मात्र तीच दिसत होती. स्त्रीचं इतकं लोभस इतकं मोहक रूप, ते लावण्य… ह्या आधी हिला कुठे पाहिलंय का? की आत्ता सुद्धा भास झाला होता, असे विचार सारखे मनात येत होते. तिने एकाच दृष्टीक्षेपात त्याच्या हृदयाच्या तारा झंकारल्या होत्या. आणि काळोखात ती कधी, कुठे, आणि कशी दृष्टीआड झाली ह्याच विचारात तो होता. आता खिडकीतून डोकावणारा पौर्णिमेचा चंद्र आणि बाहेरचा चंद्राचा प्रकाश त्याच्या डोळ्यांना खुपत होता. त्याने पडदा ओढून घेतला, पण तीचं रूप डोळ्यांपुढून हटत नव्हतं. तिच्या विचारात रात्र सरून गेली, पहाटे पहाटे त्याला झोप लागली.

नेहमीच्या पेक्षा उठायला उशीर झाला होता. ती हातात चहाचा कप घेऊन हसत उभी होती त्याचा डोळ्यावर विश्वासच बसला नाही.

“अहो चहा घेताय ना?” सविताच्या आवाजाने डोळे चोळत, उठुन त्याने सविताच्या हातातुन चहाचा कप घेऊन ‘बेड टी’ संपवून तो उठला. काल रात्रीचा प्रसंग सविताला सांगावा का? अगोदरच अलीकडे ती हळवी, आणि घाबरल्या सारखी झाली आहे, डॉक्टरांनीही तिला जपायला सांगितलं आहे. त्यात एका सुंदर स्त्री बद्धल आपल्याला वाटलेलं आकर्षण, ओढ ह्या बद्धल हिला सांगितलं तर हिला ते झेपेल का? जाऊं दे, न सांगितलेलंच बरं असा विचार करून तो नेहमी प्रमाणे ऑफिस ला जायला निघाला, सविता आईकडे जायचं म्हणून आवरत होती.

आफिसला निघालेला उमेश जाताना पुनः गार्डन मध्ये गेला. इथेच तर ती दिसली होती. तीचं रूप आठवून तो मोहरला. अशी सालस, सुंदर स्त्री आपल्या आयुष्यात यावी. तिचा तो सुडौल बांधा, ते कुरळे काळेभोर लांब केस, तिची ती जीव ओवाळून टाकावी अशी विलक्षण तेज नजर, त्या नजरेतील आपल्यासाठीची ओढ, अशी स्त्री आयुष्यात आली तर सविता नंतरचे आपले जीवन एकदम सुखी होईल. तिने आपल्या प्रेमाला प्रतिसाद द्यावा असे राहून राहून त्याला वाटत होते. पुन्हा आज संध्याकाळी, निदान रात्री तरी ती भेटेल का? माझ्या प्रेमाला प्रतीसाद देईल का ह्या विचारातच तो ऑफिस ला कधी पोहोचला त्याचे त्यालाच कळले नाही……..

 

…………(०४)

आज सबंध दिवस ऑफिस मध्ये उमेश तिच्याच विचारात गर्क होता. ती दिसावी, भेटावी, तिच्याशी बोलावं असं सारखं त्याला वाटत होतं. संध्याकाळी ऑफिस मधून परतताना वाटेवर जोगळेकरांच्या वाड्याजवळ उमेश आश्चर्यचकित होऊन थबकला. काही वर्षे बंद असलेला हा वाडा सध्या गजबजलेला असतो हे त्याला ठाऊक होते. पण ‘हिला’ ह्या आधी मात्र आपण येथें कधीच पाहिले नव्हते. ती पाठमोरीच उभी होती. पाठीवर सोडलेले ते लांब काळेभोर कुरळे केस, तोच सुडोल बांधा. उमेशने तिला पटकन ओळखलं. कोण बरं असावी ही ह्यांची? बहुधा पाहुणी आली असावी. पण मग रात्री एकटीच कशी काय आली ति आमच्या बंगलीवर?… थोडा वेळ ह्या विचारात तो मुद्धाम तेथेच थांबला. आणि बहुधा परमेश्वराच्या कृपेनेच असावे, तिने वळून त्याच्या कडे पाहून, त्याला प्रेमभऱ्या नजरेने गालातल्या गालात मिश्किल हसत, नजरेला नजर देत मान खाली घालुन, पसंतीची पावती दिली. आज तिच्या नजरेत तीने आपण उमेशचीच झाल्याची त्याला जाणीव करून दिली. आज ती विशेष खुश दिसत होती, तिचा नूरच काही वेगळा वाटला. ह्या तिच्या गोड स्मितहास्यावर उमेश संपूर्ण फिदा झाला. पुढे होऊन तिच्याशी बोलावं असं वाटत असतांनाच ती वाड्याच्या मागच्या बाजूला निघून गेली. जाताना मागे वळून बघितल्याने, आपण आता तिला जिंकल्याची मनाशी खात्री बाळगत तिच्या नादात तो मेनगेट पर्यंत पोहोचला.

भैय्यासाहेब, वहिनी, आणि सविता तेथेच लॉन वर चहा पाणी घेत होते. उमेशला पहाताच भैय्यासाहेबांनी उठून उमेशलाही चहा घेण्याचा आग्रह केला. इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या. थोड्या वेळाने सविता जेवणाच्या तयारीला म्हणून उठली.

वहिनी साहेबही तिच्या बरोबर आत गेलेल्या पाहाताच, भैय्या साहेबांनी काल संध्याकाळच्या विषयाला हात घातला. त्यांना आलेला अनुभव, झालेला भास, वाटलेली भीती त्यांनी उमेशला बोलून दाखविली.

त्याच बरोबर काल संध्याकाळी आपण कॉरिडॉर कडे घाबरलो होतो. सविताही रात्री हादरली होती. आपल्याला झालेला भास… एक क्षण उमेश चरकला. पण असं असेल तर आत्ता जोगळेकरांच्या विहिरी जवळ पेरूच्या झाडाखाली ती प्रत्यक्ष दिसली होती… हे शक्यच नाही. ह्या दोन गोष्टींची तशी सांगड घालूच शकत नाही. “भैय्यासाहेब तुम्हाला उगाचच भास झाला असेल, कदाचित ब्लड प्रेशर असेल, डॉक्टर ना दाखवून चेक करून घेतलेलं बरं” असं म्हणून त्यांनी त्यांची समजूत काढली. पण वॉश घेत असताना पुन्हा त्याच विचारांनी डोक्यात थैमान घातलं. एकीकडे ह्या सर्वांना आलेले अनुभव आणि आपण ‘तीचं प्रत्यक्ष अनुभवलेले अस्तित्व.’ जर ह्या कोणालाही तिच्या अस्तित्वा चा मागमूसही नाही, कोणी तिला पाहिलही नाही, म्हणजे भैय्या साहेबांना भास झाला असावा, सविता घाबरली ती तिला भीतीदायक स्वप्न पडल्यामुळे, पण आपण काल रात्री आणि आजही आत्ताच तिला प्रत्यक्ष पाहिलं आहे. काल चंद्र ढगा आड गेला नसता, सविता आली नसती तर कदाचित आपण तिला स्पर्शही केला असता. काल काळोख झाला नसता तर ती जातानाही दिसली असती. आज तिच्याशी बोलायला हवं होतं. आपलं मन उगाचच भरकटतय असच उमेशला वाटलं, ह्या गोष्टींची आपण उगाच का सांगड घालतोय असं वाटून त्यांनी तो विचारच सोडून दिला.

आज तिने दिलेला प्रतिसाद बघता ती नक्कीच भेटायला येईल. आज तिने यावं आणि प्रेमाची कबुली द्यावी असच त्याचं मन सुचवीत होतं.

उमेश च्या हृदयात तिच्या प्रेमाचे तरंग उठत होते. तिच्या प्रेमासाठी तो व्याकुळ झाला होता. आज जेवणाचा बेत उत्तम असूनही त्याचे जेवणात लक्ष नव्हते. जेवणानंतर भैय्यासाहेब आणि वहिनींना त्यांच्या ‘बॅरॅक्स’ वर सोडून सविता आणि उमेश परत आले……..

 

…………(०५)

पप्पा आणि आईला त्यांच्या घरी सोडून येतांना वाटेवर उमेश गप्पच होता. रस्त्यात सविताने त्याचा हात हातात घेण्याच्या प्रयत्नाकडे सुद्धा त्याने दुर्लक्ष केले. रस्त्यावर त्याचे लक्ष सविताच्या बोलण्याकडे नव्हतंच, तसेच आज तिने खूप छान जेवण करूनही तो विशेष जेवला नव्हता ह्याचं सविताला वाईट वाटलं होतं. आज आई येऊन गेल्यामुळे सविता खूष होती तिची बडबड चालू होती पण उमेशचं तिच्याकडे लक्ष नाही हे पाहून ती खजील झाली. उमेश च्या मनात फक्त ‘ती कोण आहे? आज रात्री भेटेल का? बोलेल का?’ हेच विचार येत होते. आपल्या बोलण्याकडे त्याचं लक्ष नाही हे पाहून तिने त्याला छेडलं, “उमेश तुमचं माझ्या बोलण्याकडे, तसचं आज जेवणातही लक्ष नव्हतं” त्यावर त्याने फक्त हुंकार दिला. ऑफिस मधील एका नवीन कॉन्ट्रॅक्ट बद्धल आपण विचार करीत होतो असं सांगून तिचं समाधान करायचा त्याने निष्फळ प्रयत्न केला, पण तिचं समाधान झालं नव्हतं, त्याच्या मनात दुसरंच काहीतरी आहे, पण तो आपल्याला सांगत नाही ह्याचच तिला जास्त वाईट वाटलं.

बिछान्यावर तिने त्याला पुन्हा छेडलं तसं पुन्हा त्याने… “ऑफिसचं प्रपोजल ऍक्सेप्ट करायचं की नाही ह्याचा विचार चालू आहे” असं सांगून तिला उडवून लावलं, सविताला त्याच्या हया उडवा उडवीच्या उत्तराने त्याचं नक्कीच काही तरी बिनसलं आहे, ह्याची जाणीव झाली. आज आई पप्पांमुळे विशेष खुशीत असूनही उमेशच्या तर्हेवाईक वागण्याने त्यावर पाणी फिरतंय हे बघून, मन खट्टू झालेलं असूनही तिने त्याला बरं वाटावं म्हणून आपणहून पुढाकार घेऊन त्याला जवळ केलं, प्रेमाने त्याच्या डोक्यात हात फिरवला पण उमेश च्या डोक्यात ‘तिचेच’ खूळ होते, तीचाच विचार त्याचा पिच्छा पुरवीत होता. सविताचा प्रेमळ स्पर्श ही त्याला नकोसा होता. आता त्याला ‘तिच्याशिवाय’ कोणाचीही कदर नव्हती. बस ‘ती’ आणि ‘तीच’ त्याला हवी होती. सविताचा हात त्याने बाजूला केला, आणि कुशी वळून झोपण्याचा प्रयत्न केला. सविताच्या मनाला ते फार लागलं. तिने त्याचं मन वळवण्याचा बराच प्रयत्नही केला. “माझं काही चुकलं का?, असं कोणतं कारण तुमच्या मनात आहे ज्या मुळे तुम्ही असे बेचैन आहात” वैगेरे परोपरीने तिने विचारले, पण तिच्या प्रेमाला तो कसलेच प्रत्यत्तर देत नाही हे पाहून तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. उमेशला कसलीच, कोणाचीही कदर न वाटण्या इतपत तो आता ‘तिच्या’ विचारात मग्न झाला होता. सविताने सर्व प्रयत्न करूनही उमेशवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. बाळाची चाहूल लागली तेव्हा खुष असणारा उमेश, आताशा तिच्यापासून दूर चालला होता ह्याची खंत तिला होतीच त्यात हल्ली हा आपल्या प्रेमाला, सहवासालाही दाद देत नाही. आपल्या प्रकृतीची तो आता काळजी करीत नाही, विचारपूस करत नाही, हाक मारून जवळ बोलावले तरी लक्षच देत नाही ह्या कारणास्तव ती खचतच चालली होती…

उमेशचं दुसऱ्या दिवशी सुद्धा ऑफिस मध्ये कामात लक्ष नव्हतं. संध्याकाळी येतांना सकाळप्रमाणेच त्याने जोगळेकरांच्या वाड्यावर नजर टाकली पण ती कुठेच दिसली नाही, तो हिरमुसला, बेचैन झाला. “गेली की काय?” दिसली असती तर तेवढच समाधान मिळालं असत. आहेच ती तशी गोड, ह्या विचारात तो घरी आला. सविता बहुधा आई कडे गेली असावी. त्याने वॉश घेतला आणि तिच्याच विचारात लॉनवर रिलॅक्स झाला. संध्याकाळच्या ह्या अश्या कातर वेळी त्याला एकटेपणा जाणवला. गार्डन च्या बाजूने वाऱ्याची एक हलकीशी झुळूक आणि त्यात फुलांचा गोड सुगंध आला तसा तो मोहरून गेला. आता ती इथे असती तर…

विचार मनात यायला आणि रातराणीच्या पाठी ती दिसायला एकच गाठ पडली… म्हणतात ना ‘थिंक ऑफ डेव्हिल अँड’…

तोच गोड चेहेरा, तेच निरागस व्यक्तिमत्व, तेच बोलके डोळे. तिची एक नजरच तिच्या वरून आपलं आयुष्य ओवाळून टाकायला पुरेसे आहे असं उमेशला वाटलं. तो तिच्याकडे पाहतच राहिला. त्या गालातल्या गालात हसण्याच्या, आणि ओठ दातात धरल्याने गालावर पडलेल्या खळीने तो स्वतःला हरवून बसला.

आता ती नजरेतून खुणावत त्याला बोलावत असावी असं वाटून, आपल्या मनासारखचं होतंय हे पाहून तो ‘इझीचेअर’ वरून उठायला आणि गेट मधून ‘सविताने’ त्याला हाक मारायला एकच गाठ पडली आणि तो भानावर आला. गेट कडे जात जाता त्याने मागे वळून तिच्या कडे पाहिले, ती नाराज दिसली, उमेशने एक हलकेच स्मित करून ‘लगेच येतो’ असेच जणू आश्वासन तिला नजरेतून दिले…

सविताच्या हातून त्या जड पिशव्या घेतल्या आणि ते दोघे बंगलीत शिरले……..

 

…………(०६)

सविताचा मूड-ऑफ झाला होता. थकवाही होता. आपण आलो तेव्हा उमेश चे आपल्या कडे लक्षच नव्हते. ह्याचे तिला वाईट वाटले होते. सारखा हा कसल्यातरी विचारात असतो. आपल्याकडे, बोलण्याकडे त्याचे लक्षच नसते, आपल्या चांगल्या संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली असावी असे विचार सविताच्या मनात येत होते. उमेश दुसऱ्या कोणा स्त्रीमध्ये तर गुंतला नसावा ना? तसे नसते तर आपल्याकडे त्याचे इतके दुर्लक्ष का होत आहे वैगेरे विचारानी तिला पछाडले होते. हल्ली दिवस रात्र त्याच्याच विचारात ती असायची. शांत झोपही लागत नसे. आपलं मन सदैव त्याच्याच विचारात असतांना त्याचे आपल्याकडे इतके दुर्लक्ष का? पप्पा, आईच्या देखील ते लक्षात आले, पण तिच्याकडे ह्याचे उत्तर नव्हते. आत्ताही तो कसल्यातरी गहन विचारात असल्याचे पाहून ती त्याच्या नजरेत पाहू लागली. उमेश च्या ते लक्षात आले. त्याने तिचा हात हातात घेतला.

त्याच्या मनात आले, काय कमी आहे आपल्या सवितात? रूप आहे, स्वभावही चांगला आहे. मग उगाच दुसऱ्या स्त्रीची इतकी अभिलाषा का? त्याने ‘तीचा’ विचार बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. पण समोर सविता असूनही पुन्हा तो ‘तिच्याच’ विचारात दंग झाला. आपल्याला तिच्या बद्धल इतकी ओढ का वाटावी?… हो पण ती आहेच इतकी सुंदर, विशेषतः तिचे ते सुंदर बोलके डोळे तीच्या रूपातील ती अनोखी अदा, ती चालण्यातली ऐट, तिचं ते एकंदरीतले खानदानी रूप, ते लावण्य, कोणीही तिच्यावर फिदा होईल, असे असूनही ती आपल्याकडे आकर्षित आहे ह्याचच उमेश ला अप्रूप वाटत होतं.

आत्ताही उमेश आपल्याकडे पाहतोय पण त्याच्या मनात मात्र निराळेच विचार चालू आहेत. हे सविताच्या लक्षात आलं, त्याच्या नजरेतल्या एकंदर भावा वरून मनात तो दुसऱ्या कोणाचे तरी चिंतन करीत आहे ह्याची जाणीव होऊन सविता नाराज झाली. असं काय आहे त्याच्या मनात? कोणाचा इतका हा विचार करतोय, माझ्याकडे न सांगण्यासारखं, माझ्या पासून लपवून ठेवण्यासारखं इतकं काय आहे ह्याचा मनात असे विचार तिच्या मनात येत होते, दोघेही फक्त एकमेकांकडे पाहत होते. अचानक… आपण ‘तिला’ थांबवून, लगेच येतो, असे नजरेतून तिला सांगितल्याचे उमेशला आठवले. ती वाट बघत असेल हे लक्षात येऊन तो सविताला म्हणाला, “मी आज थकलोय, लवकर स्वैपाक कर, जेवून लवकर झोपिन म्हणतोय.” आपल्याशी बोलायचा उमेश चा मूड दिसत नाही हे पाहुन नाराजीने सविता किचन मध्ये गेली, आणि उमेशने पुन्हा परत कॉरिडॉर मधे येत गार्डन कडे डोकावले…

बाहेर अंधारात तसं नीट काही दिसत नव्हतं, त्याने पोर्चचे लाईट लावले. ती कुठेच दिसत नव्हती. तो गार्डनमधे आला, तोच रातराणीचा सुगंध पण ती नव्हती, तो हिरमुसला. तसाच नाराजीत मागे फिरला. पण मागून कोणीतरी येतय असे त्याला वाटले, आणि तो थबकला, मागे तीच होती. तो चक्रावला. आता तर इथे नव्हती, अशी अचानक कशी काय? तो आश्चर्याने पाहातच राहिला. ती तशीच उभी होती. तिच्या चेहेर्यावरची नाराजी बघून तोच पुढे झाला. हलकेसे स्मित करीत त्याने विचारलं, “कोण तुम्ही?” आता तीने चेहेऱ्यावरचे भाव बदलत हलकेच त्याला स्मित दिले. तो म्हणाला “नाव काय?” ती पुन्हा गालातल्या गालात हसली. तिचे डोळेच बोलत होते. आपल्या बद्धल हिला खूप काही वाटतंय हे तो तिच्या डोळ्यात पाहत होता. काय करावं त्याला कळत नव्हतं, तो पुढे झाला तशी ती मागे सरकली. तो पुन्हा म्हणाला “तुम्ही नाव नाही सांगितलंत” तेव्हा ती हसली आणि खाली मान घालून म्हणाली… “उमा” उमेशच्या मनात झटकन आलं, काय योगायोग आहे ‘मी उमेश’ आणि ही ‘उमा’ नावही हिच्या सारखच गोड आहे. म्हणाला “माझं नाव उमेश, पण तुम्ही कोणाकडे आल्या आहात,” तसं ति म्हणाली “तुमच्या कडेच.” “तसं नव्हे इकडे कुठे आणि कोणाकडे आला आहात, कुठे राहता?”…

“अस्स होय, ती हसली, मी इथे थोड्याच दिवसांकरिता आले आहे” उमेश तिच्या डोळ्यात खोलवर पाहत होता. म्हणाला “एक सांगू, तुम्ही रागावणार तर नाहीना?” तिने स्मित करीत, त्याची नजर चुकवीत, आपल्या पायाच्या अंगठ्या कडे पाहत मानेनेच नकार दिला. “तुम्ही मला खूपच आवडलात” उमेशच्या ह्या वाक्यावर ती अशी काही लाजली की उमेशला तिच्या त्या लाजण्यात, तिच्या त्या अदे मध्ये एक खानदानी पणाची झलक दिसली. खाली पाहत ती म्हणाली “प्लीज तुम्ही मला ‘अहो’ नका म्हणू, मला आपलीच समजा, फक्त “उमा” म्हणा” उमेशला थोडा धीटपणा आला, तिचा हात आत्ता हातात घ्यावा असं खूप वाटलं. पण आत्ताच नको. तिला काय वाटेल… म्हणाला “तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच” तिने लटक्या रागात पाहिलं, तसं तो म्हणाला “उमा, तुला पाहता क्षणीच मला तुझ्याशी बोलावं, तुला सारखं पाहत राहावं असं वाटलं, का कुणास ठाऊक तुझ्या बद्धल एक अनिवार ओढही वाटते”. उमाच्या नजरेतली ओढ आणि ते विलक्षण भाव पाहून, तिचे आणि आपले जन्म जन्मांतरीचं नातं असावं असं त्याच्या मनात आलं. आणि तो तसं म्हणताच तिने लगेच म्हटलं. “पण तुम्ही मला झिडकारणार तर नाही ना? तुम्ही सुद्धा हे नाटक तर करीत नाही ना? मला फसवणार तर नाही ना?”

“उमा खरंच सांगतो, उलट तू मला इतक्या लवकर आपलं मानशील असं वाटलं नव्हतं, तुझ्या शिवाय मी जगूच शकत नाही” उमेश ने असं म्हणताच ती मोठ्याने चमत्कारिक हसली. उमेशला कससच झालं. “आता मी निघते” असं म्हणाली.

आपण हिला आपल्या मनाला जे वाटतंय ते खरं खरं सांगून सुद्धा, आपण नाटक करतोय, हिला आपण फसवणार, असं हिला का वाटतंय, आत्ता ही अशी चमत्कारिक का हसली, ह्या विचारात तो गोंधळला. आपल्याला गरगरतय असे वाटून त्याने तिचा आधार घेण्यासाठी हात पुढे केला, पण ती तिथून केव्हा निघून गेली त्याला कळलंच नाही……..

 

…………(०७)

त्याने आधारासाठी हात पुढे केला पण ती निघून गेली आहे असं त्याला वाटलं होतं. पण पुन्हा पुढ्यात ती दिसल्यावर तो आश्चर्य चकित झाला तसं ती म्हणाली “मी निघते म्हणाली खरं, पण तुम्हाला सोडून मला जावसचं वाटत नाही”. त्यावर उमेश म्हणाला “तू दिसल्या पासून मी सुद्धा माझा राहिलो नाही, दिवस रात्र तुझाच विचार मनात  येतो. तू मला हवी आहेस, सारखे तुझ्याच सहवासात असावे असे मलाही वाटतंय. आपल्या दोघनाही अकमेकांबद्धल प्रेम वाटतंय. तुझ्यासाठी काय वाट्टेल ते करायची माझी तयारी आहे” त्यावर ती खद खदा हसू लागली. उमेश क्षणभर पाहातच राहिला. तिच्या नजरेत ती आपली क्रूर थट्टा करतेय असा भास त्याला झाला. न राहवून तो म्हणाला “उमा माझ्यावर असा अविश्वास का? तुला ही सगळी थट्टा वाटते का? त्यावर गहिवरलेल्या स्वरात ती म्हणाली “उमेश तसं नाही, पण पुरुष प्रेमाचं नाटक करतात. प्रेमाची गोड गोड वचनं देऊन स्वप्न दाखवून फसवतात. स्त्रियांच्या प्रेमाची, त्यांच्या भावनांची त्यांना कदर नसते. कोण कधी फसवेल आणि विश्वासघात करेल काही सांगता येत नाही.” तिच्या गालावरून आता अश्रू ओघळत होते……. .

ह्या आधी हिला कोणी फसवले असेल का? की, ती आपल्यावर उगाचच अविश्वास दाखवीत आहे? मग डोळ्यात अश्रू का? त्याला तिच्या डोळ्यात अश्रू पाहवेना तसा तो पुढे झाला, तिने त्याला हाताने आणि नजरेतून त्याने पुढे न येण्याचे सुचविले. उमेश म्हणाला “तू घाबरतेस का? मी तुला कधीही अंतर देणार नाही. मला फक्त तूच हवी आहेस”. तिने स्वतःच  गालावरच्या अश्रूंना आपल्या हातरुमालाच्या घडीने पुसले. आता तिच्या नजरेत त्याला विश्वासाची झलक दिसली. स्मित हास्य कारित “आता मात्र मला निघायलाच हवं” म्हणाली. तीने आपल्या डोळ्यासमोरुन कधीच निघून जाऊ नये असे त्याला वाटत होते. पुन्हा भेटशील ना? तिने गालात मिश्किल हसतच, नजरेतुन त्याला होकार दिला. उध्या नक्की भेट, म्हणे पर्यंत ती नाजूक पाऊले टाकीत मेन गेट पर्यंत पोहोचली. सविताच्या स्पर्शानेच तो तिच्यावरील खिळलेल्या नजरेतून बाहेर पडला

आपल्याला गरगरतय, चक्कर येत आहे हे लक्षात येताच त्याने सविताचा आधार घेत घेत बेडरूम मधे येऊन अंग झोकून दिले. त्याच्या डोळ्यासमोर अजून तीच होती. पण सविता मात्र फार घाबरून गेली होती. गेली वीस मिनिटे ती फक्त त्याचं निरीक्षण करीत होती. गार्डन मधे एकटाच तो स्वतःशी काहीतरी बोलत होता, हातवारे करीत होता हे तिने कॉरिडॉर मधून पाहिले होते. त्याला काहीतरी बाधा झाली असावी, तो अजूनही शुन्यातच बघत होता. ती पार हादरून गेली. अश्यावेळी पप्पा जवळ असायला हवे होते असं तिला वाटलं. उमेश धडधाकट असतांना त्याला एकाएकी अशी चक्कर कशी आली? सविताच्या मनात शंकेचे काहूर उठले. दोन दिवसांपूर्वी असेच तिन्ही सांजेला आपणही कोणाचा तरी भास होऊन घाबरलो होतो. आता ह्याच वेळी उमेशचीही ही बिकट अवस्था बघून तिच्या अंगावर काटा उभा राहिला. पण तिने धीर केला.

आता त्याचा डोळा लागला होता. जेवणाचे टेबल लावेपर्यंत उमेश उठून बसला. तोंडावर पाणी मारल्यावर, आता त्याला फ्रेश वाटत होते. जेवणानंतर तिने जणू काही काहीच घडले नाही असे दाखवून उध्या सकाळी काय ते पाहू, आता त्याला काहीच विचारू नये असे ठरवून बिछान्यावर त्याला जवळ घेतले.

बिछान्यावर सविता जवळ असूनही त्याचं मन मात्र ‘तिच्याच’ विचारात गुंग होत. अशी सहचारिणी आयुष्यात असावी असं त्याला प्रकर्षाने वाटत होतं. तिची त्याच्या प्रेमाने भारावलेली  ती नजर, त्याच्या बद्धल तिला वाटत असलेली ओढ, ‘प्रथम दर्शनी प्रेमाचीच’ पोचपावती त्याला तिच्या कडून मिळाली होती. दोघांच्याही मनात आपण एक दुसऱ्यांचे झालेले आहोत ह्याची उमेशला खात्री झाली होती. दोघांचीही मन जुळली होती, ‘लव्ह ऍट साईट’ च्या कल्पनेने उमेश मोहरून गेला. तिच्याशिवाय आता त्याला दुसरं काही नकोच होत. तिच्या प्रत्येक पावलावर पाऊल टाकायची त्याच्या मनाची तयारी  झाली होती. तिची सुद्धा तीच अवस्था आहे, हे तिच्या नजरेत त्याने पाहिलं होतं. आपल्या दोघांचेही स्वप्न आता एकच आहे. ह्याची त्याला जाणीव झाली. आता कोणाचीही आणि कशाचीही पर्वा करायची त्याला गरज नव्हती. आता त्याला तिच्या मिलनाची आस लागली होती. आत्ता तिला पुन्हा लगेच भेटावं असं त्याला झालं होतं. सविताने झोपेत हात त्याच्या गळ्यात टाकले. उध्या ती भेटेलचं, ह्या गोड कल्पनेत आणि तिच्याच विचारात तोही झोपी गेला……..

 

…………(०८)

रात्री तिच्या सुखद आठवणीत झोपी गेलेला उमेश रात्रभर तिच्या सुरेल सहवासाच्या स्वप्नात रंगून गेला होता. तिच्या त्या गोड़ स्वप्नातुन जागे व्हायची त्याची इच्छाच नव्हती. आणि सकाळी उमेशला उठवतच नव्हतं.

तिच्या विचारातचं आणि भेटितचं आजचा दिवस मजेत, छान जावा ही त्याची इच्छा होती. आज आपण कामावर जात नाही हे त्याने सविताला सांगितलं, त्याने आज कामावर जाऊच नये असं तिलाही वाटलं कारण कालचा प्रकार तिच्या लक्षात होताच. नंतर सावकाश त्याला त्या संबंधी विचारू असे तिने मनाशी ठरवून, दुपारी जेवण झाल्यावर तो फ्रेश आहे असं पाहून त्याला त्या बद्धल विचारताच, “काल संध्याकाळी थोडं गरगरल्या सारखं झालं” एव्हढच तो म्हणाला. आपण शून्यात पाहून बडबडतो, उगाच हातवारे वैगेरे करतो. ह्याला त्याने स्पष्ट नकार दिला. तिचा काहितरी गैरसमज झाला असावा, असं काहीच घडलं नसल्याचं त्याने पुन्हा पुन्हा तिला सांगितलं. पण असं तिने का विचारलं हा प्रश्न मात्र त्याला भेडसावत होता आणि काल रात्रि बघितलेली सुंदर स्वप्ने आता सविताच्या ह्या असल्या शंकानी फ़ोल ठरली होती. ह्या उलट, उमेश काल संध्याकाळी जे काही वागला त्याचं त्यालाच काही कळलं नव्हतं असा त्याचा अर्थ आहे ह्या गोष्टीचं सविताला मात्र आश्चर्य वाटत होते. पण पुन्हा खोदून खोदून काही विचारल्यास त्याच्या मनावर विपरीत परिणाम होईल असे वाटून तिने तो विषय तेथेच थांबविला.

संध्याकाळी ते दोघे पप्पांकडे गेले, तेथेच जेऊन घरी येतांना वाटेवर उमेशला अंग गरम झाल्या सारखं वाटलं. आपल्याला ताप येतोय असं त्याला  जाणवलं. घरी येताच आपल्या घरात कोणीतरी येऊन गेल्याचं सविताच्या लगेच लक्षात आलं.

वास्तविक, घर बंद असताना, बाहेरून कुलूप असतांना देखील, बेड वरची चादर व्यवस्थित कोणी घातली? घरातल्या सर्व वस्तू कोणीतरी व्यवस्थित लावल्या होत्या.

फुलदाणीतली फुले ताजी आणि सुगंधित होती. ती चकित झाली, पण हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे, ह्या विचारानी ती सुन्न झाली. आणि उमेशच्या हे सर्व लक्षात कसे येत नाही, हा बदल त्याला जाणवत कसा नाही ह्याचच तिला नवल वाटलं. घरातले पैसे, दागिने सर्व काही व्यवस्थित होतं, बाहेरून आलो तेव्हा घराला कुलुपही होतं, म्हणजे ही चोरीही नाही. हा घरातला अचानक झालेला बदल, म्हणजे इथे कोणाचा तरी अदृश्य वावर आहे, आणि ही भुताटकीच आहे हे लक्षात येऊन ती घाबरली, सर्वांगावर एकदम काटा उभा राहिला. पण हा बदल उमेशच्या लक्षातच येत नाही, म्हणजे ह्याचा अर्थ उमेशलाच कोणीतरी झपाटले असावे हे तिच्या लक्षात आले. उमेशच्या अंगाला तिने हात लावताच ती दचकली. उमेशचं अंग बरंच तापलं होत. तापाने तो फणफणत होता. त्याला तसं तिने सांगताच, “हो अंग जरा गरम झाल्यासारखं वाटतंय” एव्हढच तो म्हणाला ह्याचा अर्थ, त्याला एव्हढा ताप आलाय, हे सुद्धा कळत नाही, हे पाहून ती चक्राऊन गेली. तिने ‘थर्मोमीटर’ ने चेक केले. उमेश ला दोन ताप होता. तो थोडा ग्लानीतच होता. पप्पांकडे हा व्यवस्थित होता. असं एकाएकी काय झालं,

वाटेवरच तर ह्याला कोणी काही केलं नसेल? ह्याला झपाटले नसेल. अश्या बऱ्याच प्रश्नांचं काहूर तिच्या मनात उठलं.

ती नुसतीच त्याच्या जवळ पहुडली होती. मनात एका अनामिक भीतीने तिला झोपच येत नव्हती. अचानक एकाएकी ती घाबरून उठली. बाजूला उमेश नव्हता. “उमेश, उमेश” ती किंचाळलीच. तिच्या सर्वांगाला घाम फुटला, ती भीतीने थरथरत होती.

इतक्यात उमेश तिथे आला. त्याने परत तिला बिछान्यावर झोपवलं.

आपण आता कश्यानेतरी घाबरल्याचं, तिने त्याला सांगितलं. आपण बाथरूमला जाऊन येईस्तोवर हीला इतकं घाबरायला काय झालं. इथे असं घाबरण्यासारखं आहे काय? तो तिला धीर देत म्हणाला “सविता घाबरण्याचे असं काहीच कारण नाही. मी आहेना तुझ्या बरोबर.”

तिलाही धीर आला. थोड्या वेळाने तिला झोप लागली. रात्रीचा एक वाजायला आला होता. त्याला मात्र झोप येत नव्हती, ह्या घरात असं घाबरण्यासारखं काय आहे, हल्ली ती अशी घाबरते का? ह्या विचारात तो ह्या कुशिवरून त्या कुशीवर वळला, आणि सविता पुन्हा एकदा दचकून उठली. त्याने तिला धीर देत, तिच्या पाठीवर थोपटत पुन्हा शांत केले. सविता ला भीति वाटू नये म्हणून बेडलॅम्प असूनही त्याने ‘ट्यूब लाईट’ सुद्धा लावून ठेवली. ती आता गाढ झोपली होती. तो मात्र जागाच होता…

फुलदाणीतल्या फुलांच्या सुगंधाबरोबरच खिड़कितुंन आलेल्या हलक्याशा झुळकेसरशी रातराणीच्या मादक सुगंधाने अंगात ताप असूनही तिच्या आठवणिनी त्याला बहरुन टाकले. आज वास्तविक ति भेटणार म्हणाली होती. तिच्या सहवासासाठी तो व्याकुळ झाला होता. आता डोळ्यापुढे तीच दिसत होती. पण प्रत्यक्ष भेटीसाठी त्याचा जीव आतुर झाला होता……..

 

 …………(०९)

ज्या अर्थी रातराणीचा इतका मादक सुगंघ दरवळतोय त्या अर्थी ती इथेच कुठेतरी जवळपास असावी हे त्याच्या लक्षात आलं. तो बिछान्यावरून उठायला आणि एकाएकी सर्व लाईट्स जायला एकच गाठ पडली. मेन गेटचा मगाशी झालेला आवाज त्याने ऐकला होता.

पण चंद्राच्या प्रकाशात तिथे ती नाही हे पाहून तो चक्रावला, त्याने “उमा, उमा” म्हणून तिला साद घातली, ती आहे नक्की, पण नेमकी कुठे असेल म्हणत बगिच्यातील नेहमीच्या पेरूच्या झाडाखाली ती मुसमुसत रडत असल्याचे त्याला दिसले आणि तो तिच्या जवळ गेला. तीच्या डोळ्यांत त्याला नाराजी दिसली. डोळ्यात थकवा जाणवत होता. “उमा, माझी वाट बघत होतीस ना?” त्याने विचारले. तिने काहीच उत्तर दिले नाही. तो पुढे झाला, तशी ती मागे सरकली. “रागावलीस?” तिच्या नजरेत पाणी बघून तो नरमला. अश्रु पूसण्या साठी तिच्या हातातून पडलेला रुमाल उचलण्यासाठी तो पुढे झाला, तसं तिने मागे सरकत स्वतःच तो उचलून डोळ्याला लावीत म्हटले “तुम्ही मला संध्याकाळी भेटणार असे वाटले होते, पण तुम्ही आला नाहीत. मी मगा पासून तुमची वाट पाहत अशीच उभी आहे”. त्यांनी तिची मनापासून माफी मागितली. तिच्या नजरेत पुन्हा प्रेमाची तीच ओढ त्याला दिसली. तो पुढे झाला, पुन्हा ती मागे सरली. ती आपला स्पर्श टाळतेय हे लक्षात येऊन त्याने तिला तसे विचारताच ती म्हणाली, “उमेश, मी तुमचीच आहे, आपण लग्न करू, मी माझं सर्वस्व तुम्हाला अर्पण करिन. पण तुम्ही माझ्याशी नक्की लग्न कराल ना?” उमेशने तात्काळ होकार दिला, पण तरीही ती त्याला स्पर्श करू देईना. तो चक्रावला अजूनही तिचा आपल्यावर विश्वास का बसत नाही? तो तिच्याकडे पाहत राहिला.

चंद्राच्या प्रकाशात तिचा मोहक चेहेरा, ते पाणीदार डोळे, कुरळे केस, एखाद्या अप्सरेलाही तिचा हेवा वाटावा असं तीच देखणं रूप, तिथेच ते दोघे प्रेमाने एकमेकांकडे पाहत उभी होते. तिच्या सौंदर्याची ‘मोहिनी’ त्याच्यावर हुकूमत गाजवत होती. “उमा, आपण लवकरच लग्न करू” ती विचित्र हसली. तिची नजर आता त्याला जाळत होती. अशी विखारी नजर पाहून तो चपापला, पुन्हा म्हणाला “उमा खरच आपण लवकर लग्न करू, तुझा विश्वास नाही का?” त्यावर “अजून माझं शिक्षण पुरे व्हायचं आहे, मगच आपण लग्न करू”, म्हणाली. त्यालाही ते पटलं. तो तिच्यासाठी आता जगाच्या अंतापर्यंत सुद्धा थांबायला तयार झाला होता. प्रेमाची गोड गोड वचनं तो तिला देत होता. तिच्यासाठी सर्व काही करायला, जीवही द्यायला तो तयार झाला होता. पण तिने त्याच्या तोंडाजवळ झटकन हात नेला, आणि उमेश मोठ्याने किंचाळला. “उमा, उमा” ती निघून जात होती, जाताना म्हणाली, “मला फसवू मात्र नका, मी तुमची वाट पाहीन, पुन्हा पुन्हा भेटेन” “उमा मी पण तुझी वाट पाहीन” त्याने हात हातात घेतला, स्पर्श उबदार होता. मगाचचा तिचा तो हात? तो भानावर आला. सविताच्या डोळ्यात मात्र पाणी होतं. तिचं अंग थरथरत होतं…

गेले कित्येक दिवस उमेश गार्डन मधे एकटाच फिरत असतो, हातवारे करीत असतो, शून्यात बघून बोलत असतो, ‘उमा, उमा’, असं म्हणत असतो. ह्या सर्वाचा सविताच्या मनावर बराच परिणाम झाला होता. त्या दोघांनाही आपल्या घरी येऊन राहण्याची भय्यासाहेब आणि वहिनींनी  कळकळीची विनंती केली, पण उमेश मात्र काही केल्या आपल्याला काही बाहेरची बाधा वैगेरे झाली आहे ही गोष्टी मान्य करायला तयारच होत नव्हता, त्याच्या खालावत चाललेल्या प्रकृतीच्या चिंतेने सविताला ग्रासलं, तीसुद्धा खचत चालल्याचे पाहून भैय्यासाहेबच वहिनींना घेऊन बंगलीत राहायला आले……..

 

…………(१०)

घरात आता सर्व जण असूनही उमेशच्या वागण्यात फरक नव्हता. संध्याकाळी रात्री बेरात्री असाच तो तिला भेटत होता, तिच्या सहवासासाठी, स्पर्शा साठी तिला अनेक प्रलोभने देत होता, आपले प्रेम किती खरे आहे हे तिला पटवून देत होता. तिच्यासाठी आता त्याला आपल्या प्राणाची पण पर्वा नव्हती. . . .

उमेशचे हे तर्हेवाईक वागणे आता भैय्यासाहेबांच्या सुद्धा लक्षात आले होते. तो वारंवार गार्डन मध्ये कोणाची तरी वाट पाहत असल्यासारखा एकटाच फिरतो. हातवारे करीत असतो. शून्यात बघून बोलत असतो. अस्पष्ट कुजबुजतो आणि त्याला तसे सांगीतल्यावरही तो तेमान्य करायला तयार नसतो. ही सर्व लक्षणे त्याला एखाद्या चेटकीणिनी झपाटल्याचीच आहेत ह्याची खात्री झाली होती. एक दोन वेळा रात्री वहिनीसाहेबही झोपेतून अचानक जाग्या होऊन घरात कोणा अदृश्य शक्तीचा वावर असल्याच्या शंकेने गोंधळून घाबरल्याही होत्या. आताशा घरातील सर्व जण घाबरले होते. ही जागाच, ही संपूर्ण बंगली आणि त्या भोवतालचा परिसर झपाटलेला आहे. ह्याची सर्वांना खात्री पटली होती. पण त्या मोहमायेने उमेशवर केलेल्या जादूपोटी फक्त त्यालाच हे लक्षात येत नव्हते. मधे मधे  तो ठीक असला की फक्त आपल्याला थोडे गरगरते आणि आपली प्रकृती खालावत चालली आहे हे समजत होते. सर्व घरावर आणि सविताच्या संसाराला एका काळ्या दाट छायेने घेरले होते, पण नेमका हा प्रकार काय आहे, आणि उमेशवरच ह्याचा असा विचित्र परिणाम का होतोय, आणि का व्हावा, हे लक्षात येत नव्हते.

ह्या उलट सर्वांना उगाचच भास होतायत, उगाच सगळे घाबरतायत, भिण्याचं तसं काही कारण नाही, आणि तसं काही असेल तर आपल्याला त्याचा प्रत्यय का येत नाही असंच उमेशचं म्हणणं होतं. . . .

ह्या सगळ्या प्रकरणात एक गोष्ट चांगली घडली ती म्हणजे, डॉक्टरांनी  सविताला कॅन्सर असल्याची घेतलेली शंका आणि त्यांचे ते विधान पुढील चेकअप मध्ये तसे काही नसल्याचे सिद्ध झाल्यामुळे, सर्वानाच एक नवीन उत्साह आला होता. त्याच बरोबर ह्या नव्या भीतीच्या सावटा खाली ते सर्व वावरत होते. त्यांच्या कडे इतक्या वर्षा पासून काम करणारा ‘भिकू’ माळी सुद्धा संध्याकाळ नंतर गार्डन मद्ये फिरकायला धजावत नसे. संध्याकाळ नंतर घरा बाहेर पडण्याची कोणात हिम्मत होत नव्हती. गेल्या आठवड्यात पेरू, आणि चिंचेच्या झाडा मध्ये सुवासिक वासाची रोपटी कोणीतरी लावल्याचे पाहून, भिकू माळ्याची पण भीतीने गाळण उडाली होती. इतकी वर्षे गार्डन मध्ये बिनधास्त वावरणाऱ्या भिकू माळ्याला आता तिथे फिरकण्यास मज्जाव झाला होता.

दिवाळीच्या खरेदीसाठी सर्वजण बाहेर गेले होते. घरी आले तेव्हा सर्व चकित झाले. लॉनवर टीपॉय आणि चेअर्स ची कोणीतरी विशेष मांडणी केली होती. घरातील सर्व सामानही व्यवस्थित लावलं होतं. बेडरूम तर नीटनेटकी केली होती. ह्या सर्वांपेक्षा महत्वाचं म्हणजे सवितांनी दिवाळीसाठी खास बनवून घेतलेले, ‘खड्याचे मंगळसूत्र’ मात्र कपाटातून गायब झाले होते. ‘आपल्या सौभाग्याचे लेणे असलेले मंगळसूत्रच’ नाहीसे झालेले पाहून सविताच्या मनात पाल चुकचुकली. मंगळसूत्र नाहीसं झाल्यामुळे तिला खूपच वाईट वाटलं. ती ढसढसा रडू लागली. तेव्हा पुन्हा एकदा भैय्यासाहेबांनी उमेशला ही बंगली सोडून त्यांच्या ‘बॅरॅक्स’ मध्ये राहायला यायची विनंती केली. “हवं तर तुम्ही सर्व इथून चालते व्हा, इथे घाबरण्यासारखं काहीच नाही, आणि ज्या दिवशी मला भीती वाटेल, त्या दिवशी मीच हे घर सोडेन.”  ह्या शब्दात त्यांनी भय्यासाहेबांना सुनावलं. ते इतके दुखावले गेले की आता ह्या पुढे काय होईल ते सर्व भोगायचं ठरवून त्यांनी उमेशला काही बोलायचचं सोडून दिलं. उमेश च्या ह्या अश्या वागण्याने सविता खचत चालली होती,

संसाराचे विविध पैलू ती पाहत होती. सुखी संसार असा विस्कटलेला पाहून, उमेशच्या तर्हेवाईक वागण्याने सविताला वेड लागायची पाळी आली होती. पुढे काय वाढून ठेवलंय आणि सविताचं आयुष्य कसं जायचं ह्या विवंचनेत हा मिलीटरीचा खंदा वीर सुद्धा खचत चालला होता……..

 

…………(११)

आज ९ डिसेंबर, भैय्यासाहेबांचा वाढदिवस. गेली कित्येक वर्षे ज्या ज्या वेळी हा दिवस उजाडायचा त्या त्या वेळी मला त्यांची आठवण यायची आणि मी त्यांना  शुभेच्छा द्यायचो. पण ह्यावेळी मात्र माझ्या नशीबाने त्यांना पर्सनली भेटून ‘बेस्ट विशेस’ देण्याचा योग आला होता. भैय्यासाहेबांचा आणि आमचा कित्येक वर्षाचा घरोबा. लहानपणी लखनौला असतांना ‘मेजर भोसले’ म्हणजे एक बडं प्रस्थ होतं. लहानपणी आम्ही त्यांना ‘अंकल’ आणि वहिनींना मिलीटरीच्या लोकांप्रमाणेच ‘वहिनीसाब’ अशी हाक मारीत असू. लहानपणी माझ्या प्रत्येक वाढदिवसाला त्यांनी मला कोणती ना कोणती तरी वस्तू भेट म्हणून दिली आहे, आणि  आता मोठेपणी सुद्धा आजतागायत त्यांनी प्रत्येक वाढदिवसाला मला विश केले आहे. हा माणूस जेव्हढा कडक शिस्तीचा तेवढाच प्रेमळ. मला ते आपला मुलगा मानून माझ्यावर अतोनात प्रेम करीत. आपल्याला मुलगा नाही ह्याचं दुःख त्यांना माझ्यामुळे कधीच वाटलं नव्हतं. अंकल ना मिलिटरी मध्ये मिळालेली शोर्य पदके माझ्या वाढदिवसाला माझ्या छातीवर लावून काढलेले फोटो बघितल्यावर आपण सुद्धा मिलीटरीत नाव काढायला हवं होतं असं आजही वाटतं. भय्यासाहेबांच्या मानाने स्वभावाने वहिनीसाब  अगदी शांत, गरीब, आणि मनमिळाऊ. कित्येक वर्षे उपास तापास केल्यानंतर ‘सविताचा’ जन्म झाला. तोपर्यंत नानांची बदली झाल्यामुळे आम्ही ‘लखनौ’ सोडलं होतं…

आता माझी अपॉइंटमेंट नासिक च्या ‘एन. एम.’ मधे ‘हेड ऑफ धी डीपार्टमेन्ट इंग्लिश’ म्हणून झाली, आणि भैय्यासाहेब इथेच असल्यामुळे त्यांना ‘सरप्राइझं विझिट’ देऊन विश करावे ह्या उद्धेशाने गेले आठवडाभर इच्छा असूनही मी मुद्धाम त्यांना भेटायला गेलो नाही. मनावर कंट्रोल करून त्यांना वाढदिवसाला चकीत करायचं ठरवलं, आणि म्हणूनच ते उठायच्या आत त्यांच्या घरी गेलो. पण सध्या ते सविता कडेच राहायला आहेत हे कळल्यावर तिकडे पोहोचे पर्यंत नऊ वाजून गेले होते, मला पाहताच त्यांना आश्चर्याचा गोड धक्काच बसून त्यांनी मला कडकडून मिठी मारली, आणि लहानपणी मला करायचे तसाच ‘सॅल्युट’ ठोकून आनंदाने स्वागत केले. मी एव्हढ्या सकाळीच कसा आलो ह्या पेक्षा “मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ धी डे” वर  ते चकितच झाले. म्हणाले “श्री, माझा वाढदिवस आता माझ्याच लक्षात राहत नाही, पण तुझ्या मेमरीचं मात्र मला कौतुक वाटतं, दरवर्षी तू न चुकता मला विश् करतोस धन्य आहे तुझी” मला खूप वर्षांनी प्रत्यक्ष भेटल्यामुळे ते विषेश उत्साहित दिसले. त्यांचा तो उत्साह, आणि माझ्याबद्धल वाटणारी आपुलकी पाहून मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. वास्तविक ते माझ्या काकांचे जिगरी दोस्त, आणि आमचे शेजारी, पण इतक्या वर्षानंतरही त्यांचा माझ्यावर जीव होता. जवळ जवळ चार वर्षानंतर, हो खरंच सविताच्या लग्नानंतर ‘प्रत्यक्ष’ असे आजच भेटत होतो. मी ‘हेड ऑफ धी डिपार्टमेंट’ झाल्याचं त्यांना सांगितलं तसं त्यांनी माझी पाठ थोपटली. आणि जवळ घेऊन मिठी मारली, तशी मला एकदम ‘नानांची’ आठवण झाली. म्हणाले “श्री तू आलास, आता माझ्या सर्व विवंचना दूर होतील.” मला पटकन काही कळलं नाही. माझ्यावर स्वतःच्या मुलाप्रमाणे ते प्रेम करीत आले होते. आपल्या ओळखीने लखनौ च्या प्रसिद्ध ‘अंजुमन ई इस्लाम’ ह्या प्रसिद्ध ‘मुस्लिम’ संस्थेच्या इंग्लिश शाळेत त्यांनीच मला दाखल केलं होतं. मी आल्याने वहिनीसाब ही खूप आनंदित झाल्या, सावितानेही निदान आज तरी मी इथेच राहावं असा खूप आग्रह केला. मला दुपारच्या सेशन पर्यंत गेलं नाही, तरी चालण्या सारखं होतं, म्हणून त्यांच्या ह्या आग्रहास्तव जेवणापर्यंत थांबायचं ठरवलं. उमेश महत्वाचे काम असल्यामुळे आज नेहमीपेक्षा लवकरच बाहेर पडल्याचे समजले.

त्यामुळे त्याची भेट झाली नाही. वास्तविक आता पर्यंत भय्यासाहेब आजोबा व्हायला हवे होते, पण सविताकडे पाहून एकंदरीत तसं काही दिसत नव्हतं.

थोड्याच वेळात ह्या सर्वांच्या वागण्यात मला एकप्रकारची उदासीनता जाणंवली. त्यात मगाशी मला मिठी मारताना ते जे काही बोलले होते, त्यामुळे ते सर्व जण कुठल्या तरी संकटात आहेत आणि त्यांना माझ्यासारख्या कोणाची तरी खरोखरच मदत हवी आहे, असं माझं मन मला सांगत होते. मी त्यांना छेडताच, सविताच म्हणाली. “भैय्या, छोड दो, किसीं और दिन बात करेंगे”… सविताच्या पाणावलेल्या डोळ्यांत आत्ता मला निरागस “सलमा ” ची झाक दिसली…

ज्या ज्या वेळी  कोणी संकटात असेल तेव्हा   “बस, सिर्फ, खुदाको याद करो, अल्लामियाँ दुआँ कबुल करेंगे” हे ‘सलमाचे’ लहानपणीचे बोल आठवले. आणि सलमा  नेहमीची प्रार्थना म्हणतेय असा भास झाला.

सवितांनी विषयाला कलाटणी दिली. आणि ती अश्रू लपवित किचन मध्ये गेली……..

 

…………(१२)

भैय्यासाहेबांबरोबर लखनौ च्या लहान पणीच्या गोष्टीना पुन्हा उजाळा मिळाला. लखनौ माझा ‘वीक पॉईंट’. माझे बरेच दोस्त मुस्लिम होते. त्यांची मोठी मोठी नक्षीदार घरं अजूनही मला आठवतात. लखनवी कुर्ता, त्यावरील नक्षी आणि त्यांचे चुडीदार, पज्यामा, सलवार त्यांची ती जाळीदार गोल टोपी, त्यांचा तो रुबाब आणि विशेष म्हणजे ते उर्दू मधील ‘अदबीने’ बोलणे, एकूण सर्वच खानदानी थाट आणि रुबाबदार वागणं. ‘प्रेम करावं तर उर्दूतूनच’. त्यातील गोडवा, अदब काही वेगळीच आहे. माझा लहानपणिचा जिगरी दोस्त ‘सलीम’ माझ्या नानांना “चाचाजान” आणि त्याची धाकटी बहीण माझ्या वर्गात होती ती मला “भाईजान” म्हणायची, तेव्हा आम्हा दोघांनाही  खरोखरीच आमच्यात ‘जान’ आल्यासारखं वाटायचं. त्याने ‘चाचाजान’ म्हटलं की नाना प्रेमाने सलीमचे गालगुच्चे घ्यायचे. ती नक्षीदार सलवार आणि कमीज मधील मला, “अलीफ… बेपेसे” म्हणत उर्दू शिकवणारी गोड़ गोरिपान, ‘शर्मिली सलमा’ आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यांच्या बरोबर खेळलेले खेळ, संगतीने केलेला अभ्यास, आणि मौजमज्या, अश्या कित्येक जुन्या गोष्टींना भैय्यासाहेबांच्या भेटीमुळे उजाळा मिळून मला खूप बरं वाटलं.

नोकरीच्या निमित्ताने मी मुद्धाम माझ्या माणसांपासून दूर गेलो होतो. वास्तविक पुण्याच्या ‘एस. पी.’ मधे मला ‘स्टँडिंग इन्व्हीटेशन’ होतं, पण मी ते मुद्धामच टाळलं.

नानांना, आणि आईला माझे हे दूर राहणं, एकट्याने जगणं फार टोचायचं, त्यांना त्याचं  दुःख व्हायचं, पण त्याला माझा नाईलाज होता. ‘एकटा जीव सदाशिव’ पण बरेच वेळा आपलं असं कोणी भेटलं की मग मी हळवा होऊन खूप बोलायचो. तसा माझ्या वागण्यात फार बदल झालाय, असे लोक म्हणायचे, पण त्याला काळही तितकाच जबाबदार होता.

आज अंकल भेटले खूप बरं वाटलं, पण एक गोष्ट मला राहून राहून खटकली, बोलतांना ते सर्व  मधे मधे  सिरीयस व्हायचे. त्यांना सारखं मला काही सांगायचं होतं, पण ते टाळतायत असं मला जाणवलं. मधेच मी म्हणालो देखील, “अंकल, तुमचा मूड ठीक नाही का?” त्यावर ते सुन्नपणे हसले. मी म्हटलं “मला, न सांगण्यासारखं असं काही आहे का?” “श्री, तसं नाही काही, आपण नंतर कधीतरी बोलू, तुला कधी वेळ आहे… उध्या, परवा राहायलाच ये, मग आपण निवांत बोलू” असे ते म्हणाले आणि मी थोडा गोंधळलो, असं काय असेल जे ते आत्ता मला सांगत नाहीत, पण जाऊं दे, आज त्यांचा वाढदिवस आहे, मुद्धाम नको. पुढे पाहू, असा विचार करून मीच विषय बदलला. सवितांनी आज मस्त गोड जेवण केलं होतं. जेवणानंतर, मी दोन दिवसांनी, शनिवारी येतो म्हणून त्यांची रजा घेतली…

घरातून बाहेर पडताना ह्या घरातील माणसांचा उत्साह तसा राहिला नसल्याचे जाणवले. एकेकाळचा त्यांचा रुबाब ती ऐट काळाच्या ओघात बदलली होती. प्रत्येकाच्या आयुष्यात सगळे दिवस सारखेच राहत नाहीत. सुखदुःखाचा लपंडाव चालूच राहतो. ह्याची पुनः एकदा प्रचिती आली. काय सांगायचं असेल, असं कोणतं दडपण त्यांच्या  मनावर आहे, असा विचार करीत गेटमधून बाहेर पडताना एक क्षण मी तेथेच थबकलो, का कोणास ठाऊक पण मला माझ्या ‘कॉलेज’ च्या दिवसांची प्रकर्षाने आठवण आली.

आता ‘जुनीअर्स’ ला ‘एमिली ब्रॉंते’ ची ‘वूदरिंग हाईट्स’ शिकवताना त्यांच्या ‘गेट पाशी’ जे विचित्र ‘सेन्सेशन’ झाले होते, तेच मी आत्ता अनुभवत होतो. आणि मन बेचैन झालं. क्लास ला तशीच अर्धी सुट्टी देऊन मी घरी आलो. पण ‘अनइझीनेस’ वाढला होता. मी स्वभावतःच तसा ‘इंपेशंट’ आहे, असं काय सांगायचं असेल भय्यासाहेबांना? आणि मला निघताना मेन गेट जवळ झालेले ते ‘विचित्र सेन्सेशन’, ह्यांचा काही संबंध असेल का? दोन दिवस असेच गेले. शिकवण्यात माझं लक्ष लागत नव्हतं. एखाद्या गोष्टीचा शहानिशा होईपर्यंत मी असा ‘अनइझिच’ असतो. आजची ‘एक्स्ट्रा लेकचर्स’ कॅन्सल करून मी भय्यासाहेबांना भेटायला गेलो……..

 

…………(१३)

दुपारी चार च्या दरम्यान मी त्यांच्याकडे पोहोचलो.

अंकल झोपले होते. मुद्धाम त्यांना उठवू नकोस असं मी सविताला सांगितलं. म्हणालो आज इथेच आहे, नंतर भेट होईलच. वहिनीसाब त्यांच्या घरी काही आणण्यासाठी गेल्या होत्या. उमेश अजून आला नव्हता. गेल्यावेळी भेट झाली नव्हती, त्यामुळे तो ही भेटायला उत्सुक असल्याचे सविता म्हणाली. सविताशी गप्पा मारीत बसलो, तिने चहा दिला. नवीन कॉलेजच्या, इकडच्या लोकांच्या, माझ्या राहाण्याच्या सोयी बद्धल वैगेरे चर्चा झाली. पाच च्या दरम्यान भैय्यासाहेब उठले. लॉनवर त्यांच्याबरोबर पुन्हा चहाचा आग्रह झाला. भैयासाहेबना चहा म्हणजे अमृत, येता  जाता कधीही हा माणूस कसा काय चहा पिऊ शकतो असं वाटायचं. मला चहाचं तसं वेड नाही, पण आग्रहास्तव त्यांच्याबरोबर म्हणून अर्धा कप घेतला. भैय्यासाहेबांनी उमेशच्या ‘विचित्र’ वागण्या बद्धल, त्याला झालेल्या भूतबाधे बद्धल, भैय्यासाहेबांपासून भिकू माळ्या पर्यंत सर्व जण तेथे राहायला कसे घाबरतात वैगेरे सांगितलं. उमेशला बाहेरची बाधा झाली आहे, भुताटकी आहे, इथपर्यंत ठीक होतं. पण एका मोहमायेने झपाटले आहे. आणि मधे मधे तो “उमा, उमा” अश्या हाका मारतो असं कळल्यावर ‘माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली’…

ही  “स. ट. वि.” तर नव्हे?  वास्तविक ‘उमा ‘ हे माझ्या अत्यंत आवडीचे नाव, पण आता ते माझ्या डोळ्यापुढे सुद्धा नकोस झालं आहे.

काय गम्मत असते पहा, काही काही नावं, काही काही व्यक्ती, आपल्याला का आवडतात हे सांगणं कठीण आहे. काही व्यक्ती प्रथम दर्शनीच आपल्याला आवडतात, तर काहींनी आपलं काहीही घोडं न मारता सुद्धा आपल्याला उगाचच आवडत नाहीत. ‘उमा’ एकेकाळी माझं अत्यंत आवडीचं नांव होतं. मला उगाचच “स. ट. वि.” ची आठवण झाली…

एकंदरीत एका अनामिक भीतीने ह्या घराला ग्रासलं होतं. सविता आणि उमेशच्या सुखी संसारावर  काळी छाया पडली होती.

सविताच्या मनावर दिवसेंदिवस होणारा आघात, उमेशच्या प्रकृतीवर झालेला विपरीत परिणाम, खंगत चाललेले भैय्यासाहेब आणि वहिनी, मला “विनय, विनिताची” आणि “विजय उषा” ची आठवण झाली आणि अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. ही “स. ट. वि.” च असावी असा मनात दाट संशय आला. माझी निस्तब्धता भैय्यासाहेबांच्या लक्षात आली. मी काहीच बोलू शकत नव्हतो. मला अत्यंत वाईट वाटलं. ह्या प्रकाराचा शहानिशा करायलाच हवा…

इतक्यात उमेश आला. पाठोपाठ वहिनीसाब पण आल्या. मी त्याला ओळखू शकलो नाही इतका त्याच्या प्रकृतीत बदल झाला होता. आल्या आल्याचं वॉश वैगेरे न घेता तो आमच्या बरोबरच बसला. त्याच्या नवीन ऑफिस बद्धल आणि माझ्या कॉलेज  बद्धल वैगेरे गोष्टी झाल्या. मी येथे का आलोय, आणि माझं भैय्यासाहेबांबरोबर झालेलं बोलणं वैगेरे कशाचाही मी  त्याला मागमूसही लागू दिला नाही. भैय्या साहेब आणि उमेश साठी चहा, आणि माझ्यासाठी सरबत घेऊन सविता आली. त्या दोघांची जोडी अशीच जन्मभर राहायला हवी, आणि संसार सुखी व्हावा, असं मला मनापासून वाटलं. मी तसा अपसेट असूनही कोणाला तसं वाटू दिलं नाही. उमेश कामावरून येऊन सुद्धा फ्रेश वाटत होता. आमच्या गप्पा छान रंगल्या. राहण्याचा आग्रह होताच, हे माहीत असूनही, भैय्यासाहेब काहीतरी महत्वाचं बोलणार ह्या विचारातच, मी माझे राहण्याचे कपडे आणायला विसरलो होतो. उमेशचा स्पेअर लेंगा, सदराच वापरायचं ठरलं, पण इथे नक्की काय घडतंय, हे कळे पर्यंत मनालाही स्वस्थता मिळाली नसती, त्यापेक्षा भले उमेशच्या कपड्यात ‘अनइझी’ वाटलं तरी आज इथेच राहिलेलं बरं म्हणून मी ते मान्य केलं. नाहीतरी घरी माझी वाट बघणारं आहेच कोण म्हणा. असा विचार मनात यायला आणि आज इथे नक्कीच काहीतरी घडेल असं वाटायला एकच गाठ पडली.

“संध्याकाळ झाली आहे. आपण आता आत मधे बसूनच गप्पा मारू” म्हणत भैय्यासाहेब उठले. पण इथे असं घाबरण्या सारखं खरोखरीच काही असेल का असा मनात विचार करित त्यांच्या पाठोपाठ मी सुद्धा हॉल मधे येऊन बसलो……..

 

…………(१४)

जेवणानंतरही आमच्या गप्पा चालूच होत्या. सविता बरीच धीट झाली होती. वहिनीसाबही खुष होत्या. शेवटी साढे अकरा च्या सुमारास उमेश, सविता आणि वहिनीसाब सर्व झोपायला गेले. मी आणि भैय्यासाहेब बिछान्यावर पडल्या पडल्याच गप्पा मारीत होतो. शेवटी त्यांचाही डोळा लागला. मी मात्र जागाच होतो, मला झोपच येत नव्हती, रात्र खायला उठली होती. डोक्यात विचारांचं काहूर उठलं होतं. उगाच का कुणास ठाऊक पण हृदयात आत आत एक आर्त हाक ऐकू येत होती. किती वेळ गेला कुणास ठाकुक, उमेशच्या रुम मधून कोणीतरी बाहेर आल्या सारख वाटलं, कदाचित  बाथरूम ला वैगेरे कोणी जात असतील असं वाटलं, पण बाहेरच्या दरवाज्याची कडी वाजली, मी उठून बाहेर आलो, पाहतो तर उमेश दरवाज्याची कडी काढून कॉरिडॉर कडे गेला होता. मी गुपचूप पाहत होतो. म्हणजे आज रात्री इथे काहीतरी खास घडणार हे नक्की होतं. तसाच तो लॉनवरून पुढे गार्डन कडे, एखादी व्यक्ती झोपेत सुन्नपणे चालत जाते तसा पुढे जाऊन कोणाशीतरी बोलत होता. मला पुढचं दिसेना, म्हणून मी पोर्च कडून पुढे आलो आणि ‘व्हॉट अ सरप्राईस’, माझा  डाऊट, माझा कयास शंभर टक्के खरा ठरला. ‘नो वन एल्स, इट हॅज टू बी, अँड शूअर्ली वॉज… “स. ट. वि.”

मला संध्याकाळ पासून शंका होतीच, आणि तशी व्हायब्रेशनस् उगाचच झाली नव्हती. ह्याचा अर्थ ह्यावेळी हा जीवघेणा खेळ ती ‘उमेश’ शी खेळतेय…

मला कसतरीच झालं. आता उमेश चा ‘विनय’ होणार, की ‘विजय’ सारखा हा पण आयुष्यभर बिछान्यावर लोळत पडणार?…

माझ्या डोक्यात झिणझिण्या आल्या. ‘नो, नो… इट्स अनफेअर’ निदान ह्यावेळी तरी मी हे चालू देणार नाही. “ऍट एनी कॉस्ट आय विल हॅव टू डिफेन्ड उमेश” त्याला वाचवायलाच हवं. . .

त्यांच्यात एव्हढं काय चाललंय मला कळेना, उमेश आणि ती रातराणीच्या मागे गेलेली मी पाहिलं. उमेश पूर्ण तिच्या आहारी जात चाललाय हे पाहून, मला राहवेना. वाटलं आत्ता मोठ्याने ओरडावं, उमेशला वेळेवरच भानावर आणावं. त्याला स्पष्टपणे जाणीव करून द्यावी.

पण एकीकडे “स. ट. वि.” होती. मला तसं करूनही चालणार नव्हतं. त्यात त्या बिचारीचा तरी काय दोष म्हणा. तिच्या ह्या अश्या अवस्थेला, तिच्या ह्या वागण्याला ‘मी सुद्धा जबाबदार होतोच की.’ पण हा असा जीवघेणा खेळ ती माझ्याशी का खेळत नाही? मात्र माझ्या डोळ्यादेखत ती माझ्या ओळखीच्या तरुणांवर सूड उगवीत असते. ह्या आधी ‘विनय’ च्या बाबतीत मी पूर्ण हरलो होतो. आणि ‘विजय’ ला सोडवेपर्यंत उशीर झाला होता. आणि आता ‘उमेश’ तिच्या जाळ्यात सापडला होता…

“नो… नो… स. ट. वि.” “यु कान्ट डु धिस टू ‘उमेश’. धिस टाइम यु वोन्ट बी सकसेसफुल,… येस, आय ऍकसेप्ट इट ऍज अ चायलेंज,… अँड अ बेट”…

बराच वेळ गेला, मला राहवेना, काय होईलते जाईल, म्हणत मी गार्डन मधे आलो आणि उमेश ला जोरात हाक मारली. उमेशने मागे वळून बघितलं. तिच्या तावडीतून तिच्या मोहातून त्याला सोडवत, बाजूला केला. तिच्या चेहेऱ्यावर संपूर्ण नाराजी मी पाहिली. डोळ्यातुन ती  आग ओतत होती. आता पुन्हा ‘मी’ तिचा गुन्हेगार ठरलो होतो. पण माझा नाईलाजच होता. मी तरी काय करुं मला हे कुठेतरी थांबवायलाच हवं होतं, उमेश, सविता साठी, आणि…  ‘तिच्या साठी सुद्धा’…

ती तडक निघून जाऊ लागली. “उमा, थांब” माझ्या एका हाकेवर ती जागच्या  जागी दिगमूढ होऊन उभी राहिली. ती थांबणारच, ती  तशी जाऊच शकत नव्हती. तिचं प्रेमचं तसं होतं…

“मी लगेच परत येतो, तू इथेच थांब.” मी म्हणालो, आणि उमेशला घरात आणून झोपवला, तो ग्लानीतच होता. मी तडक बाहेर पडलो. ती वाट पाहत होती…  मी माफी मागितली…

पण काही केल्या ती माफ करेना. पण मला खूप वाईट वाटलेलं बघून तिने माफ केले. मी परोप्रकारे तिचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, तिला रिक्वेस्ट केल्या. उमेशला सोड म्हणून कळकळीची विनंती केली. पण तिचं आपलं एकच पालुपद. गेल्या दोन वेळी तिने घातलेली तीची ‘तीच एक अट’. . . . .

“श्री”… “तू लग्न कर”……

 

…………(१५)

मी लग्न करावं, अशी ही तिची अट तिने ह्या आधी दोन वेळा सुद्धा घातली होती. पण मी लग्न का करू? कसं करू? मी हिचा एव्हढा अपराधी असतांना मी लग्न करेनच कसा.

आयुष्यभर कोणाशीही लग्न न करण्याचं मी मनाशी ठरवलं होतं. मी तिला बरंच समजावलं.

निघतांना फक्त ती हेच म्हणाली “श्री, तू लग्न कर, मी उमेशला सोडिन, मी मुक्त होईन “मला कळत नव्हतं की मी कोणाशी लग्न करून ही कशी मुक्त होणार. खरंतर मी हिचा घोर अपराधी, आजही जळतोय तिच्या विरहात, आजही ती जखम हृदयात बाळगून फिरतोय त्या ‘अश्वत्थामा’ सारखा, आणि ही मला माझ्या देखत,…  हा जीवघेणा खेळ खेळत, हुलकावण्या देत होती. माझ्यावर असा विचीत्र सूड उगवीत होती. पुन्हा निघतांना म्हणाली “ह्या उपर फक्त तुझ्या लग्नाची बातमी देण्यासाठीच मला थांबवं, नाहीतर माझ्या मार्गात येऊ नकोस, परिणाम अत्यंत वाईट होईल”…

हिच धमकी तिने मागेही दोनदा दिली होती. म्हणजे उमेश तिच्या तावडीतून नक्कीच सुटणार नव्हता. का करते ही असा माझा छळ? माझी तयारी असतांना माझ्याशी मात्र ती वाईट वागत नाही. पण माझ्या संबंधातील समस्त तरुण पुरुष्यांशी मात्र हिचं वैर. स्वतःही “अतृप्त” आणि मलाही असं लटकत ठेवलंय. मी धड जगुही शकत नाही, आणि मरूही शकत नाही अशी अवस्था तिने करून ठेवली आहे.

मला धमकी देऊन ती निघूनही गेली. बराच वेळ मी रातराणीकडे उभा होतो.

निदान ह्यावेळी तरी तसं घडायला नको. मी तिला तिची ही जीवघेणी इच्छा पुरी करायला देणार नाही.

“स. ट. वि.” ह्या खेपेला माझा जीव गेला तरी चालेल पण मी तुला यशस्वी होऊ देणार नाही.

“येस आय ह्याव ऍक्सेपटेड इट… ॲज अ बेट”.

त्या नंतर आठ दहा दिवस मी अपसेट होतो. काय करावं काहीच कळत नव्हतं. पुन्हा भैय्यासाहेबांना भेटलो तेव्हा त्यांनी इथे बरेच वेळा निरनिराळे भास झाल्याचं सांगितलं. किचन मधे भांडी वाजल्याचे, बेडरूम मधे गुणगुणल्याचे आणि त्यात भर म्हणजे उमेश पाहिल्यापेक्षाही एकदम वेड्यासारखे वागतोय असं सांगितलं. सविताशी त्याने एकदम अबोला धरल्याचं, आणि प्रत्येक गोष्टीत त्याने तिला झिडकारायला सुरवात केल्याचं सांगितलं. ह्याचा अर्थ त्या “स. ट. वि.”ने आपल्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करायला सुरुवात केल्याचं माझ्या ध्यानात आलं. ती आता कुठल्याही परिस्थितीत त्याला सोडणार नव्हती. मला तिचे हे ‘प्लॅन्स’ अगोदरच्या दोन केसेस वरून माहीत झाले होते. अगोदर ‘विनय’ मग ‘विजय’, आणि आता ‘उमेश’… इन, मीन आणि…

नाही असं होता कामा नये. मी कधीही हरू शकत नाही. कधी हरणारही नाही… ऍट एनी कॉस्ट”…

मी उमेशला कॉन्फिडन्स मधे घ्यायचं ठरवलं. भैय्यासाहेब आणि वहिनींना माझा प्लॅन सांगितला. सविताला काही सांगण्याच्या मनःस्थितीत ती नव्हती. मी माझी फियाट काढली. उमेशच्या ऑफिस मधे गेलो. मी त्याला भेटताच त्यालाही बरं वाटलं. मी त्याला “आपण कुठेतरी बाहेर जाऊ. मला तुझाशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे” असं सांगितलं. आता अशी घाई केल्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. तिचे प्लॅन्स मी ओळखून होतो……..

 

…………(१६)

मी उमेशला तीने त्याला झपाटल्याचा प्रसंग सांगितला. त्याला झालेली बाधा, तिची मोहिनी, ते मायावी मायाजाळ, त्यात तो कसा गुरफटला गेलाय ह्याची कल्पना दिली, तरी तो ऐकायला तयार होईना.

शेवटी ‘उमा’ म्हणजे दुसरी-तिसरी कोणीही नसून “स. ट. वि” आहे हे त्याला सांगितलं. तरी त्याचा विश्वास बसेना.

भूत, भुताटकी, बाहेरची बाधा वैगेरे असं काही नसतं. आपला त्यावर विश्वास नाही. आपल्याला कसलीही बाधा झालेली नाही, हेच तो मला समजावत होता. शेवटी मी त्याला “खूप आठव, तुला काहीच कसं आठवत नाही, आठव. . कधीतरी संध्यासमयी, एखाद्या कातरवेळी तू कदाचित घाबरला असशील, त्याशिवाय तू असा झपाटला गेला नसतास.” असे सांगताच… “एका संध्याकाळी नाकात कसलातरी दर्प जाऊन, कोणाचा तरी भास झाल्याचा आणि अंगावर काटा येऊन मी घाबरल्याचे  मला अस्पष्ट आठवत आहे.” अशी त्याने कबुली दिली…

त्यानंतर आजपर्यंत तो कसा वागत आहे, अजाणतेपणी त्याच्या कडून कसं, आणि काय घडतंय हे मी त्याला सविस्तर सांगितलं. त्यावर तो म्हणाला, ह्या गोष्टी घरातले सुद्धा सर्वजण सांगतात, पण मला असे काही वाटत नाही. तेव्हा मला “स. ट. वि.” च्या विरुद्ध माझे मन खंबीर करून उभे राहण्याशिवाय गत्यंतरच नव्हते…

मी त्याला माझे आणि तिचे नातं आहे असं सांगताच तो चाटच पडला. “उमा” हे माझं अत्यंत आवडतं नाव, आणि ह्याच नावाने ती कशी वावरते हे ही सांगितले. तरी सुद्धा त्याने “उमा” कोण? असा प्रश्न मला विचारला. म्हणजे “स. ट. वि” ची मेथड शंभर टक्के यशस्वी झाली होती. बाकी सर्वांना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायची, त्यांना घाबरवायचं, आणि आपल्या भक्ष्याला, हव्या असलेल्या व्यक्तीला मात्र आपल्या रूपाने, वागण्याने, मोहिनी घालून टाकायचं. आणि एकदा का तो तिच्याशी बोलायला लागला, त्यात गुरफटला की त्याला चकव्यात पुढे काहीच कळेनासं व्हायचं. हाच ‘चकवा’ ह्या आधी दोघांच्या नाशाला, त्यांच्या संसाराला उर्ध्वस्त करायला कारणीभूत ठरला होता. मी त्याला हे सर्व सांगताच “कोणीही व्यक्ती मृत्यूनंतरच्या योनीत असं कसं वागेल?… आणि का वागेल?… असं कसं शक्य आहे? “अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. आणि शेवटी, …. .

“हे खरं कशावरून?… तुमचा आणि तिचा खरोखरीच काही संबंध होता का? की तुम्ही हे सर्व मला बनवून सांगता आहात?” असे विचारून, माझ्यावर अविश्वास दाखवीत तो उठून जाऊ लागला…

माझ्यापुढे आता काहीच पर्याय नव्हता. त्याला माझा भूतकाळ, जो आता पर्यंत मी माझ्या मनात जपला होता. ज्या भूतकाळाने मला आयुष्यातून उठविले. ज्या भूतकाळाच्या सावलीत मी आयुष्यभर अपराधी मनाने जगतोय. त्या दिवसांची खरंतर मला आता आठवणही नको आहे, पण त्या आठवणींची, आणि त्या भूतकाळाची, सर्व माहिती त्याला सांगून त्याची समजूत काढणे गरजेचे होते. सविताच्या संसारासाठी, भैय्यासाहेबांच्या आणि वहिनींच्या उपकाराची फेड करण्यासाठी. आणि एका उमद्या तरुणाला उदंड आयुष्य लाभावे ह्या सद्भावनेने माझ्या डोळ्यापुढे माझे कॉलेजचे दिवस एका मागून एक चित्रासारखे सरकत होते.

मी शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिलो. तो उठला होता. पण त्याच्या पावलांत ठामपणा नव्हता. दाराकडे जाणारा प्रत्येक टप्पा जणू माझ्या शब्दांच्या वजनाखाली अडखळत होता. “थांब…” माझा आवाज नकळत बाहेर पडला. तो वळला नाही. पण थांबला. मी खुर्चीत मागे टेकलो. मनात दाटून आलेल्या आठवणींनी श्वास जड झाला होता. इतके दिवस मी ज्याला खोल पुरून ठेवले होते, ते सगळं आता वर येत होतं. “तुला जर खरंच सत्य जाणून घ्यायचं असेल…” मी थांबलो. एक दीर्घ उसासा घेतला. “…तर तुला माझा भूतकाळ ऐकावाच लागेल.” तो हळूच वळला. त्याच्या डोळ्यांत अजूनही अविश्वास होता. पण कुतूहलही तितकंच होतं. मी सुरुवात केली. “कॉलेजमधे मी वेगळाच होतो. अभ्यासात, मित्रांत, जगण्यात… सगळं ठीक होतं. पण मग ती भेटली.”

शब्द जड होते. प्रत्येक वाक्य जणू माझ्या आतल्या जखमेवरून ओढून काढलं जात होतं. “उमा… नाही… तिचं खरं नाव सरीता होतं.” त्याच्या चेहऱ्यावर हलका धक्का उमटला. पण तो अजूनही स्थिर उभा होता. “ती साधी नव्हती,” मी पुढे म्हणालो. “ती अशी होती… जणू ती एखाद्या दुसऱ्याच जगातून आली आहे. तिचं हसणं, तिचं बोलणं… सगळंच वेगळं.” मी थांबलो.

त्या क्षणी मला पहिल्यांदाच जाणवलं की मी फक्त सांगत नाहीये… मी पुन्हा जगतोय. “आणि मग ती घटना घडली…” माझा आवाज किंचित थरथरला. रात्रीचा तो प्रसंग… तो वास… ती संध्याकाळ… आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पडलेली ती काळी सावली. मी उमेशकडे पाहिलं. “तुला जे ‘चकवा’ वाटतो ना… तो फक्त बाहेरचा नव्हता. तो आतमध्येही तयार झाला होता. माझ्या मनात.” तो काहीच बोलला नाही. पण त्याचे हात हलकेसे थरथरले.

मी पुढे म्हणालो: “मीच चूक केली होती… कारण मी त्या गोष्टीला फक्त बाहेरचं मानलं. पण काही गोष्टी बाहेर नसतात… त्या आपल्यातच रुजतात.” खोलीत शांतता पसरली.

बाहेर पावसाच्या हलक्या थेंबांचा आवाज येत होता. आणि त्या शांततेत माझा भूतकाळ पहिल्यांदाच पूर्णपणे उघडा पडत होता. मी डोळे मिटले. आणि पुढचा शब्द न बोलता फक्त एवढंच पुटपुटलो: “आता तुला सगळं ऐकावंच लागेल… सुरुवातीपासून.”…….

 

…………(१७)

५ जानेवारी १९६२ आज ‘कॉलेज डे’. लास्ट इयरचा मी मेरिट स्टुडंट आणि ‘सिंगिंग कॉम्पिटिशन’ चा विनर, त्या शिवाय बरीच प्राईझेस माझ्या नावावर होती. म्हणून आजच्या ‘प्राईझं डिस्ट्रीबुशन’ चा हिरो होतो. आणि त्या बद्धल रवी, पक्या, आणि परेरा ह्या सर्वांनी अगोदरच माझ्या कडून पार्टी उकळली होती. माझा अहंकार वारंवार जोपासायला काळा बरोबर माझ्या ‘फ्रेंड सर्कल’चाही हातभार लागला होता. सर्व गोष्टींमधे पुढे पुढे करायची आणि प्रौढी मिरवण्याची माझी सवयच होती.

टाळ्यांच्या कडकडाटात मी ‘रेगे’ सरांकडून एका पाठोपाठ एक ‘प्राईझेस’ घेत होतो. कुठेतरी आपण ह्या सर्वांपासून निराळे आहोत असं वाटत होतं. हा मान, सन्मान असाच आयुष्यभर होत राहावा, लोकांनी असंच कौतुक करावं असं वाटत होतं.

समारंभ संपला तसं पुन्हा एकदा माझ्या मित्रांना माझ्याकडून कॉफ़ी हवी झाली. बऱ्याच जणांनी मला ‘कॉंग्रेचुलेशन्स’ दिली.

आमच्या वर्गातील बऱ्याच मुली त्यात सामील होत्या.

तसा मुलींशी माझा संबंध फार कमी, कश्याला उगाच आपल्या अभ्यासावर इफेक्ट करून घ्यायचा. पण मुलींचा घोळका गेला आणि पक्या म्हणाला “श्री, तु स्कॉलर आहेस, स्मार्टही आहेस, पण एक गोष्ट मात्र तुला कधीच जमली नाही” त्यावर सर्व जण हसले. मला ते जरा खटकलचं.

“पक्या, अशी कोणती गोष्ट आहे?, जी मला जमली नाही म्हणतोस” मी लगेच विचारलं……

“श्री, चल तू… “स. ट. वि” ला पटवून दाखव.” तो म्हणाला आणि बाकी सगळ्यानी “हो, हो श्री, चल तू पटवून दाखव तर तू खरा” अशी पक्याची बाजू घेऊन री ओढली…

“अरे पोरीबाळींना पटवणं तसं काही कठीण नाही रे. पण मी कधी ट्रायच केला नाही. असल्या फंदात पडलोच नाही” मी म्हणालो. “तुझं, बरोबर आहे रे श्री, पण ती सर्वांना पुरून ऊरलीय” रवी म्हणाला. तसं मला राहवेना म्हणून मी विचारलं “कोण ती? कोणा बद्धल बोलताय.” तसा म्हणाला “अरे ती रे… ती, रोल नंबर 21. सर्व सरांची लाडकी आणि हुकुमाची बदाम राणी, ती रे… “एस. टी. विजयकर”…

म्हणजे हिलाच हे सर्व शॉर्ट मधे… “स. ट. वि.” म्हणून चिडवत होते. मला ते आवडलं नव्हतं, म्हणालो, “हां, हां, म्हणजे ती “मधुबाला?”… ती ‘अनारकली’ होय… अरे, ती तर एकदम ‘सोबर’ आहे रे.”… आत्ता माझ्या लक्षात आलं, मला “विश्” करणाऱ्या त्या सर्व मुलींच्या घोळक्यात ती सुद्धा होती, आणि विश् करताना तिने आपला हात माझ्या हातात न देता फक्त हात जोडून नमस्कार करूनच, स्माईल देत ‘कॉंग्रेट्स’ म्हणाली होती. म्हणूनच ह्या सर्वांना आता चेव चढला होता. “श्री, तू का नाही आपलं नशीब आजमावत” आमच्यातिल हुशार, तसा सभ्य, आणि अगदी कमी बोलणारा ‘अतुल वागळे’ मला म्हणाला… “कां काय झालं तुम्ही सर्वांनी आपापल्या परीने ट्राय केलेला दिसतोय”…

इतक्यात नितीननी मला खुणावलं… मी विचारलं “काय रे परेरा, तू सुद्धा?”

पक्या म्हणाला “अरे हा एव्हढा स्पोर्टसमन आणि हिरो, पण तिच्या पहिल्याच पंच मद्धे,  ‘नॉकआउट’ झाला तेव्हा पासून असा नर्व्हसच आहे. सिनियरच्या बऱ्याच जणांना तिने हां हां म्हणता फुटवलं, चक्क खडे चारले”… मि वळून ‘परेरा’कड़े बघितलं, त्याने मान वळवली…

मी ह्यांना माझे मित्र मानत असलो, ह्या ग्रुप मधे असलो, तरीही मुलींची टिंगल टवाळी करणे, त्यांची भंकस करणे, त्यांना चिड़विणे, त्यांच्या मागे, मागे लागणे असला टारगट पणा मला बिलकुल आवडत नसायचा…

“तिने बऱ्याच जणांना धूळ चारली असली, कोणाला पटत नसली तरी ‘श्री’ तुला ती नक्कीच रिस्पॉन्स देईल” इकडे पक्या आता मला चढवत होता.

तसा मुलींमद्धे मला फारसा इंटरेस्ट नव्हता पण मी म्हणालो, “पक्या ती सुंदर आहे, सालस आहे आणि तशी ती ‘सोबरही’ आहे. सेमिस्टर ला गोची झालीय, उगाच माझा क्लास जायचा, जाऊं दे, भलतीच भानगड नको” ह्यावर सगळे दात काढून खो खो हसले, माझ्या मनाला ते झोंबलं. परेरा म्हणाला “श्री, ‘तुला’ पण जमत नसेल तर जाऊं दे. पण कारणं सांगू नको. नाहीतरी बरेच जण अर्जुन बनण्याच्या प्रयत्नात दुर्योधन झाले आहेत. त्यात तुझी आणखीन भर नको” मी पेटलो, म्हटलं “बस बस परेरा, ह्या भानगडी तुम्ही तुमच्या कडेच ठेवा” पक्या लगेच म्हणाला. “बस काय ‘श्री’ म्हणजे खेळायच्या आधीच हरलास काय?… काय रे, असंच समजायचं ना रे?”

सगळे आपल्या नजरेने गिधाडा सारखे माझ्या मनाचे लचके तोडतायत असे क्षणभर मला वाटलं, आणि माझं टाळकच सटकलं, मन हार मानायला तयार नव्हतं……..

 

…………(१८)

माझं डोकचं फिरलं होतं.

परेराच्या म्हणण्याप्रमाणे “मला जमत नसेल तर” आणि पक्या च्या म्हणण्यानुसार “मी हा खेळ खेळायच्या आधीच हरलो”

कसं शक्य आहे ते???…

मी एखादी गोष्ट करायची म्हटली तर त्यात मला न जमण्यासारखं असं काय आहे? “नथिंग इज इंपॉस्सीबल, इन माय डिक्शनरी”… मी हरणार हे शक्यच नाही. आजपर्यंत सिंगिंग, स्टडीज, स्पोर्ट्स, हायकिंग पासून सगळ्यात मी वरताण होतो. तेव्हा तसं हरणं वैगेरे मला माहीतच नव्हतं, म्हणून वैतागून मी म्हटलं, “पक्या, तू मला चढवू नकोस, ठरवलं तर मी काहीही करू शकतो” त्यावर तो पटकन म्हणाला “इतकंच असेल तर ‘बेट’ घे… मग बघू” त्यावर सगळे म्हणाले “बेट,… बेट घे ‘श्री'”…

“बेट”,… माझा विकपॉइंट, बेट मिन्स बेट, ‘ऍट एनी कॉस्ट मी जिंकणारच. आतापर्यंत “बेट” म्हटलं की मी माझं सर्वस्व त्यात ओतत आलोय.

“ह्या, संक्रांतीला मी  ‘तिला’  तुम्हा सर्वांना तिळगुळ द्यायला लावीन. तिने तिळगुळ वाटले नाहीत, तर मी नावाचा “श्री”च नाही”…

“म्हणजे, तिने आम्हाला तिळगूळ वाटले नाहीत, तर तु “श्री” चा “श्रीमती” होऊन, हातात बांगडया भरून मुलींना हळदीकुंकू देणार होय ना?”

मला परेराचं हे बोलणं जिव्हारी लागलं. “ऍट एनी कॉस्ट मी तिला पटवीनचं, पण मग परेरा तू आणि पक्या दोघांनीही हातात बांगड्या भरायच्या… ठरलं?…”

“हो, हो, ठरलं” सगळ्यांनी जल्लोष केला…

काही करून तिला पटवायचचं… हो, हो, काय वाट्टेल ते झालं तरी…

माझं कॉफ़ी आणि पॅटीस मधे लक्षच नव्हतं. तिच्याच विचारात मी प्राइझेस घेऊन घरी आलो. नाना, आई प्रशांत नी माझं कौतुक केलं. ताई कुठे बाहेर गेली होती. संध्याकाळी माझी दृष्ट वैगेरे काढण्याचा कार्यक्रम झाला. बिछान्यावर पडलो खरा पण तिच्याच विचारानी ग्रासलो होतो. आपण बेट घेतली खरं, पण तिच्या सारखी इतकी सालस,  आणि सोबर मुलगी पटेल काय?  मला रिस्पॉन्स देईल? भल्या भल्यांना म्हणे तिने खडे चारले, त्यांना फुटवलं, त्यांची फिरकी घेतली… फक्त आठच दिवस आहेत. आता सगळे माझीच फिरकी घेतील काय? ती माझा ‘कटी पतंग’ करेल काय? मला जमलं नाही, तर आयुष्याचा पचका होईल. विचारांनी डोक्यात काहूर उठलं…

कसा करायचा ऍप्रोच, कॉलेज मद्धे सगळ्यांचाच माझ्यावर डोळा असणार, तिने रिस्पॉन्स दिला नाही तर…, मला भीती वाटली. पचका होऊन तोंड दाखवायला जागा राहणार नाही. मला झोपच येत नव्हती. एखादी गोष्ट मनासारखी होत नाही तो पर्यंत मी ‘अनइझी’ असतो. मनाला चैन नव्हतं, तिच्याच विचारानी झपाटलो होतो. पहाटे पहाटे डोळा लागला. स्वप्नात “आयेगा… आयेगा,… आयेगा आने वाला… आयेगा” म्हणत, हातात मेणबत्ती घेऊन बागेत हिंडताना दिसली. तिच्यात आणि ‘मधुबालात’ बरंच साम्य होतं. तोच मोहक चेहेरा, निरागस बोलके डोळे, काळेभोर केस, तीच अदा, सर्व काही आपण जवळून प्रत्यक्ष पाहत आहोत असच वाटत होतं. काय गम्मत आहे पहा. एकदोनदा रिसेस मधे कॉलेजच्या कॅन्टीन मधे ‘लेडीज रूमच्या’ पुढून जातांना ती मला क्रॉस झाली, तेव्हाची तिची नजर आणि आज स्वप्नामधे माझ्याकडे बघतानाची तिची ती नजर मला एकदम सेमच वाटली.

काल कॉलेज डे मुळे आज सुट्टी होती. आणखीन एक दिवस मला कमी मिळणार होता. सबंध दिवस माझं कशातच लक्ष नव्हतं. मी नीट जेवलो सुद्धा नाही असं आई म्हणाली, आता ‘माझा’ विचार करून चालणारच नव्हतं. डोळ्यापुढे ‘तीच’ दिसत होती, मनात तीच, आणि डोक्यात तिचेच विचार, माझं सर्वस्व मी विसरून गेलो होतो. तिला शेवटचं कालच तर पाहिलं होतं, पण माझं अस्तित्व विसरून आणि तीला न पाहून खूप दिवस झाल्यासारखं मला वाटत होतं. ती इतकी सुंदर, सालस असतांना ही आमची चांडाळ चौकडी तिला “स. ट. वि” म्हणून हाक मारतात, चिडवतात, ह्याचा राग आला.

वास्तविक “सटवाई देवी” च्या नावाचा “स. ट. वि.” हा अपभ्रंश वाईट अर्थाने केला जातो. हे माझ्या मनाला लागलं. सर्व मुली थोड्याच सर्वांना पटतात. प्रत्येक पुरूषाच्या नशिबात जी स्त्री असेल तीच त्याला मिळणार. तसं पाहता आपलं आयुष्य आपणच घडवीत असतो. पण असं म्हणतात. बाळाच्या लहानपणी पाचवीला, सष्टीला “सटवी” ची पूजा करतात, ती येऊन बाळाचं भविष्य ललाटावर लिहून जाते. ह्या ‘सटवाई देवीची’ पूजा केल्याने ती आशिर्वाद देऊन बाळाचं चांगलं विधिलिखित लिहिते. आता माझ्या भविष्यात ‘ह्या’…  “स. ट. वि” ने काय, काय लिहून ठेवलंय, तीच जाणे……..

 

…………(१९)

तिच्याच विचारात आज जागा झालो. कालच्या सुट्टीनंतर आज तिला गाठणं जरुरीचं होतं. आमचं ‘एस्. पी.’ कॉलेज आमच्या घरापासून तसं लांबच. सायकल वरून कॉलेजला जावं लागायचं, तिच्या विचारात आज मी पिरियड्सच्या वह्या पुस्तकही फारशी बरोबर घेतली नाहीत. तीला कशी, कुठे आणि केव्हा गाठायचं, ती मला भेटेल का, माझ्याशी बोलेल का? तिच्याच विचारात होतो आणि काय आश्चर्य?  ती दिसली म्हणतात ना “अ विल विल फाइंड अ वे” हो खरोखरीच ती होती. पाठमोरी, तोच लांब कुरळे केसांचा मानेवरचा शेपटा, बांधेसूद शरीर, नीटनेटकी, आणि डोक्यात कवठी चाफ्याचं फुल बारीक पानासकट तिने आज माळलं होतं. हीच वेळ मी ‘एनक्याश’ करायला हवी, ‘ऐसा मोका फिर कहाँ मिलेगा’ असं मनात म्हणत, मी सायकलचा स्पीड कमी केला. तिच्या बाजूने सायकल नेताना छाती धडधडत होती, हँडल कंट्रोल होत नव्हतं. थांबू, की नको… मनात आलं, जाऊं दे, पुढे कधी तरी पाहू…

हो पण आता सहाच दिवस उरले होते, चौदाला संक्रांत होती. मी मनात देवाचं नांव घेतलं. काय वाट्टेल ते होऊं दे, पण ‘पचका’ होता कामा नये. पण पचका झालाच तर निदान इथे कोणीही नाही, पुढे दोघी जणी चालत होत्या, पण बहुदा इंटरच्या असाव्यात. मी मनाला आणि सायकलला एकदमच ब्रेक लावला. सायकल स्टँड केली. तो पर्यंत ती माझ्या बाजूने पुढे गेली, क्षणभर काळजाचं पाणी पाणी झालं. पण मी धीर केला. “मिस. विजयकर” तोंडातून शब्द बहुदा फुटलाच नसावा. मी परत म्हणालो, “एक्सक्यूज मी, मिस विजयकर.” तशी ती थांबली. मला वाटलं नव्हतं ती थांबेल, पण थांबली. मनाला एकदम बरं वाटलं. माझा धीटपणा वाढला. मी सायकल बरोबर चालत तिच्या पर्यंत पोहोचलो. ती निघाली. म्हटलं. “तुमच्या बरोबर थोडं बोलायचं होतं” गालातल्या गालात स्मित करीत म्हणाली “बोला” तिच्या त्या गालावरच्या खळीत माझं मन अडकलं, मी ब्लॅंक झालो… च्यायला वाट लागली. आता काय बोलायचं? “मला ‘कंपोझिशनची’ वही मिळेल? मी कुलकर्णींच्या पिरियड ला नव्हतो.” ती म्हणाली. “पण आज पिरियड आहेच कुठे?” तिच्या नजरेतून तिने मला पकडलं गेल्याचं माझ्या लक्षात आलं… बोंबला आता… मी म्हणालो, “होय, ते ही खरंच, पण उध्या आणलीत तरी चालेल, मी उध्या येतांना भेटीनच, थँक्स, बरं मी निघतो” असं कसतरी म्हणालो आणि सायकल वर कसाबसा चढलो आणि जोरात सटकलो. जाताना मागे वळून पाहिलं तिच्या उजव्या भुवयीने वर जात मला उध्या भेटण्याचे प्रॉमिस दिल्याची हृदयाला पावती मिळली.

आयुष्यात प्रथमच एका सुंदर मुलीबरोबर एका ‘मानिनी’ बरोबर बोललो होतो, जिला सर्व “स. ट. वि.” म्हणून उगाच चिडवतात, वास्तविक ती इतकी सालस, सुंदर, आणि नम्र वाटली आणि मनात बसली की एकीकडे मी तिला ‘पटवायची बेट’ घेतली खरं, पण मी तिच्या प्रेमात पागल होईन अशी धास्ती वाटून, मीच तिचा आशिक झाल्याची माझ्या मनात शंका आली. आता वाटतंय मी उगाचच बेट घेतली आणि अश्या शालीन, सुशील मुलीच्या मनाशी प्रेमाचं खोटं खोटं नाटक करून खेळणार आहे, मला ह्याचं क्षणभर वाईटही वाटलं. पण ‘बेट मिन्स बेट’ आता काही झालं तरी मला जिंकायलाच हवं होतं.

आज तिच्या बरोबर बोलताना माझी अवस्था बिकट झाली होती. गल्लीतल्या टेनिस बॉल ने खेळणाऱ्या पोराला जर वेस्ट इंडिजच्या ‘वेलस्ली हॉल’ ला फेस करायला सांगितलं तर त्याची काय दशा होईल, नेमका त्याच अवस्थेमधून मी मगाशी गेलो होतो. ती मात्र माझ्याशी धीटपणे बोलली. कदाचित तिचे मन साफ असेल म्हणूनही असेल, पण माझ्याशी दोन शब्द चांगलीच बोलली. हो आणि उध्यासुध्दा भेटणारच आहे. आपली युक्ती कशी मस्त आहे, ह्यावर मी खुश होतो.

कोलेजच्या कॉरिडॉर मधे आमचं टोळकं उभं होतं. पिरियड्स बंक करणे, पोरींच्या टवाळक्या करणे, म्याटिनी शो बघणे हा धंदा. कधी कधी ‘थ्रिल’ म्हणून मी सुद्धा त्यात सामील व्हायचो, हो कुठल्याही गोष्टीची सवय नसली तरी तोंडओळख तरी हवी, आपण कुठे आणि कशातही कमी पडता कामा नये ही गुर्मी होती.

माझा अजून काहीच ‘प्रोग्रेस’ नाही असं त्यांना सांगताच, त्यांच्या चेहेऱ्यावर  स्मित झळकलं.

“म्हणजे, अजूनही बघ बाबा, उगाच बांगड्या भरलेल्या आम्हाला पाहावणार नाहीत” कुत्सित हसत पक्या म्हणाला. मी नुकत्याच फुटलेल्या मिशीत नुसता हसलो. म्हटलं “कासाराकडे, माप घ्यायला कधी जायचं?” सगळे हसले. वास्तविक आता मीच त्यांची मापं काढत आहे. ह्याची कोणाला कल्पनाच नव्हती.

इतक्यात ती गेट कडे येतांना दिसली म्हणून त्या घोळक्यातून मी पद्धतशीर सटकलो. उगाच तिला माझ्या बद्धल काही वेडेवाकडे वाटायला नको, संशय यायला नको……..

 

…………(२०)

आम्ही वर्गात आलो. पहिल्या पिरियडभर सर काय शिकवतायत तिकडे माझं लक्षच नव्हतं. डोळ्यापुढे तिचं ते गोड रूपच येत होतं. स्वप्नात दिसली तशीच, आणि तितकीच ती सुंदर आहे, सालस आहे ह्याची पहिल्या भेटीतच माझी खात्री झाली. माझं लक्ष पुन्हा पुन्हा तिसऱ्या बेंचवर जात होतं. एक दोन वेळा ती सुद्धा एका डोळ्याने माझ्या कडे पाहतेय हे पाहून मी सुखावलो.

सर्व दिवस हा असाच गेला. दुपारी कॅन्टीन मधे कॉफी पिताना मुलींच्या घोळक्यातून ती माझ्या वर नजर ठेवून असल्याचे मी सुद्धा एका डोळ्याने जाणले. “आग दोनो तरफ है” हिला पटवणं फारसं कठीण नसावं, हो पण वेळ अत्यंत कमी होता…

दुसऱ्या दिवशी मी मुद्धाम टाइम ‘ऍडजस्ट’ केला. ज्या वाटेवरून ती यायची तेथील एका हॉटेल मद्धे चहा घेत बसलो. ती तेथून जाताच पुन्हा सायकलवर टांग मारली. काय काय आणि कसं बोलायचं ह्याची अगोदरच रिहर्सल केली होती. आज मी बिनधास्त बोलू शकेन असा कॉन्फिडन्स आला होता, बघू कसं जमते ते म्हणत मी तिच्या जवळ गेलो. “हाय…, हॅलो, व्हेरी गुड मॉर्निंग” तिनेही लाजतचं मला विश् केलं. आणि काहीही न बोलता फक्त वही पुढे केली. आता पुढे काय?… काय बोलायचं,… मी म्हटलं “थँक्स, पण मी तुम्हाला उगाचच त्रास देतोय.” ती खाली पाहत म्हणाली “त्यात त्रास  कसला, तुम्ही स्कॉलर आहात, मलाही तुमचा उपयोग होईल”.

“ओह नो! उगाच चढवू नका. मी कसला स्कॉलर?” मी हसत म्हणालो. त्यावर ती माझ्याकडे मिश्किल नजरेने पाहत म्हणाली “दोन दिवसांपूर्वीच तर लास्ट इयरचं प्राईझ  घेतलंत, ते काय कॉपी करून?” तिने विकेट काढली होती. आता पुढे काय? काय बोलायचं? मी म्हणालो “ते ठीक आहे हो. पण मी थोडाच तुमच्यासारखा”… मी अडखळलो. “बोला पुढे बोला”… आता भुवया आणि नजरही बोलत होती. म्हटलं, “तुमच्यासारखा थोडाच  सिंसीअर आहे. मला तुमची ही ‘सिंसियारीटि’ खूप आवडते”…

“म्हणजे आता तुम्ही मला हर्भऱ्याच्या झाडावर चढवताय?” तिने गालातल्या गालात हसत ‘बाउन्सर’ टाकला. मी म्हणालो, “तसं नाही. मला ‘सिंसीअर’ लोकं फार आवडतात. आणि…”

“अस्सं” तिने पुन्हा भुवई उंचावली. “आणि काय, काय आवडतं”… आता चक्क गुगली  टाकला होता… ब्याकफूट ला खेळून चालणार नव्हतं मी म्हणालो “तसं नाही, तुम्ही सिंसीअर आहात म्हणून आवडतातच, आणि तश्या बऱ्याच गोष्टी आहेत. पुढे नक्की सांगेन, पण ‘प्लिज’,… आत्ता वेळ नाही…” समोर कॉलेजचे गेट पाहून मी ‘काँशस’ झालो होतो.

सगळ्यांनी पाहिलं तर माझा ‘प्लान’ ढासळून टाकतील. फक्त म्हटलं,

“तुमचं नांव काय? ऐस. स्टँडस् फॉर व्हॉट?” ती उत्तरली “सरिता”… मी म्हणालो, “नाव सुंदर आहे… पण त्या पेक्षा… “त्या, पेक्षा काय?”…  “नावंही सुंदर आहे, बरं निघतो, पुनः भेटू” मी डोळ्याला डोळा भिडवला. ते टपोरे डोळे चकाकत होते. तिला बहुधा माझं बोलणं आवडलं होतं. वास्तविक तिचं हे नांव मला  बिलकुल आवडलं नव्हतं. “सरिता”? सरिता हे काय नांव झालं? खरतरं तिच्या मधे निर्मळ ‘झऱ्याची’ खळखळ आहे, एक अल्लडपणा, आणि निरागसता, आणि ती सालसही आहे. स्फटिकाहून स्वच्छ डोळे, त्यातला भाबडेपणा, हसण्या वागण्यातली अदब,… खरंतर ती काळ्या बुरख्यातच असायला हवी होती… लहानपणी ‘सलीम’ ची बहीण ‘सलमा’ अशीच सालस, निरागस होती, मनाला भावली होती. हिचं नाव “मासुमा” असायला हवं होतं. सरिता नाव मला न आवडून सुद्धा फक्त तिला बरं वाटावं म्हणून मी तसं बोललो होतो. मनात विचार आला आता तिला पटवायचंच आहे, म्हणून खोटं बोलतोय, खोटं वागतोय, आणखीन काय काय करणार?

वही घेण्यात माझा दुहेरी हेतू होता. एकतर भेटण्याची ‘कन्टीन्यूटी’ राहते, आणि त्यातून चिट्ठीही पास करता येईल. मनात पुन्हा विचार आला, अश्या भाबड्या मुलीला आपण फसविणे हे योग्य नाही, बाकीच्यांना हिने रिस्पॉन्स दिला नाही, म्हणून त्यांची हिच्यावर वाईट नजर, आणि नावाचा अपभ्रंश करून तिला चिडवितातही. पण मला ह्या दोन्ही भेटीत ती खानदानी आहे, सोबर आहे हे  जाणवून तिला आपण फसवू नये असं क्षणभर वाटलं खरं, पण माझा ‘अहंकार’ आडवा आला… “बेट”… त्या बेटचं काय? मी,… आणि… हरणार?……..

 

…………(२१)

माझ्या नजरेतून मी तिच्यावर भाळलोय, तिच्यासाठी पागल झालो आहे, असं वर्गात दाखवत होतो. तिलाही माझ्याबद्धल आपुलकी असावी असं तिच्या नजरेत दिसत होतं.

माझ्या ऍकटिंगपुढे ‘मेलडी किंग दिलीपकुमार’ फिका पडावा. मी तसा दिलीपकुमार चा फॅन, पण त्याच्या एक स्टेप पुढे मी ‘देवदास’ ची ऍकटिंग करीत होतो. रिसेस मधे कॉमन रूम कडे जातांना हळूच “थँक्स”, म्हणून नोटबुक परत केली. म्हटलं ” ह्यात माझ्याही “नोट्स” आहेत, जरूर बघा आवडतात का”…

मला खात्री होती, ती कॉमन रूम मधे माझी चिट्ठी वाचेलचं. तिचा रीस्पॉन्स काय असेल? रेगे सरांना ‘कम्पलेंट’ तर करणार नाही ना? मनात शंकांचं काहूर उठलं, तशी ती खानदानी आहे, बोलण्यातली आर्जव, चालणं सर्व खानदानी पणाची लक्षणे आहेत. म्हणून तर हे ‘डेअरिंग’ केलं. पाहू काय रिझल्ट लागतो ते. त्यानंतर दोन पिरियड्स मी वर्गात गेलोच नाही, लायब्ररीत उगाच टाईमपास केला. सातव्या पिरियड ला जावं, की न जावं ह्या विचारात वर्गात गेलो. लास्ट बेंच वरून तिच्या हालचाली न्याहाळायचं ठरवलं, तसं पाहता पुढच्या रो वरून तिला फेस करणे कठीणच झालं असतं. हळूच माझी नजर ‘थर्ड बेंच’ वर गेली. पण ती तेथे नव्हती. मला कळेना, ती वर्गात आली होती की, कम्पलेंट  वैगेरे करायला गेली? कारण तिच्या बाजूलाच बसणारी तिची खास मैत्रीण ‘नीलम’ पण वर्गात नव्हती. माझ्या मनात उलट सुलट विचार येत होते, आणि बेल झाली. शेवटचा पिरियड वर्गात बसावं की नाही ह्याचा विचार करीत असतानाच त्या दोघीजणी वर्गात शिरल्या. माझं लक्ष तिच्यावरच होतं, आत शिरताच तीचं लक्ष माझ्या नेहमीच्या सीट कडे जातानाचे माझ्या चाणाक्ष नजरेने टिपलं, आणि तिच्या चेहेऱ्यावरची नाराजी पाहून मी मनोमन सुखावलो. ती अपसेट होती. म्हणजे ह्याआधी मी वर्गात नव्हतो म्हणून हीच बाहेर पडली होती का? मला जरा बरं वाटलं. रिझल्ट फेवरेबल  लागणार ह्याची खात्री झाली. तिचंही वर्गात लक्ष नसावं, माझं सर्व लक्ष तिच्याकडेच होतं.

भिरभिरत्या नजरेने शेवटी तीचं लक्ष माझ्याकडे गेलंच, तिला बरं वाटलेलं माझ्या लक्षात आलं आणि मी मनात म्हटलं “बेटा, जिओ यार” म्हणजे माझ्या शब्दानीच जादू केली म्हणायची. शब्दात ‘यॉर्कर’ बॉल ची ताकद असावी, ती “क्लीन बोल्ड” झाली असणार…

‘लायब्ररीकडे’, कॉलेज सुटल्यावर आमच्यातले तसे कोणी फिरकत नाहीत, त्यामुळे तेथेच ‘भेटावे’ असं मी चिट्ठीत लिहिलं होतं. मी बाजूच्या खिडकीतून बाहेर पाहत होतो. कॉलेज सुटल्यामुळे सर्वजण घरी जाण्याच्या घाईत पटापट बाहेर पडत होते. पाच, दहा मिनिटात सर्व सामसूम झाले. ती बाहेर पडली नाही, ह्याचा अर्थ ती इथे येणारच याची खात्री पटली. ती येतांना दिसली. मी बेअरिंग आणलं. आणि “हॅलो म्हटलं” तिने नुसतं स्मित दिलं. गालाला ‘खळी’ पडली, रिस्पॉन्स बघून माझ्या मनाची ‘कळी’ खुलली. मी म्हणालो “तुम्ही एवढे आलात, आय अँम रिअली ओब्लाइज्ड. अँड थँकफूल टू यू”…

“तुम्ही लिहिलंय हे सर्व खरं आहे का?” तिच्या डोळ्यात एक अनामिक चमक आणि शंका ह्यांच मिश्रण होतं. मनाने केव्हढी भाबडी आणि निरागस आहे ही. त्या मानाने मी… वास्तविक खरं आणि खोटं ह्यात तशी “लाईन ऑफ डीमार्केशन” कमीच असते म्हणा. मी लगेच म्हणालो… “का? तुम्हाला खरं वाटत नाही का? खरंतर, लिहिलंय त्या पेक्षा किंबहुना कितीतरी पटीने मला वाटतंय, पण मी ‘एक्सप्रेस’ करू शकत नाही. मला लिहिणं जमतच नाही.” मी माझी सगळी ऍकटिंग पणाला लावली होती. ‘दिलीपसाहब’ झिंदाबाद. तिला हे सर्व खरं वाटत असावं. म्हणालो, “तुमच्याशी बोलावं, तुमच्या कडे सतत पहात राहावं, असंच रात्रंदिन वाटतं, आणि म्हणूनच वही मागितली. पण तुम्ही रागावला तर नाही ना?” तिने मानेनेच नाही म्हटलं. कितीतरी वेळ मी माझ्या नजरेतील प्रेमळ भावनेने तिच्या हृदयात डोकावण्याचा प्रयत्न करीत होतो. ती सुद्धा असंच काहीसं शोधत असावी. मी म्हणालो “संध्याकाळी  भेटालं का?” ती म्हणाली “आज शक्य नाही, आम्ही सर्व आज बाहेर जाणार आहोत” त्यावर चेहेऱ्यावर उदासीनता आणत मी लगेच म्हणालो “ठीक आहे, मग उध्या शेवटचे दोन पिरियड्स ऑफ आहेत, तेव्हा तरी याल का?”…

“पण, प्लिज तुम्ही मला अहो, जाहो, करू नका, फक्त ‘सरीता’चं, म्हणा”… ‘नजदिकीया और बढी’… “बरं, पण तू येशील न” तिने मानेने आणि नजरेतून आपली संमती दर्शवली.

आता माझ्या डोळ्यात ती शोधत होती फक्त ‘विश्वास’… पण माझं ‘बेअरिंग’ कायम होतं. मी म्हटलं, “एक सांगू, “यु आर सो क्युट”… “सरू”… तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही.” तिला काय वाटलं कोणास ठाऊक, तिने आपला हात माझ्या तोंडावर ठेवीत म्हटलं… “प्लिज… उध्या मी नक्की येईन… बास… आता तर झालं… पण भेटायचं कुठे?”

हो, ते मी सांगितलंच नव्हतं, म्हटलं “डेक्कन ला ‘कॉफ़ी हाऊस’ च्या समोर भेट, नक्की ये, मी वाट पाहिन” ती ‘प्रभातला’ राहायची. ते अंतर तसं लांब नाही, उगीच घरी जायला उशीर नको. निघतांना मी म्हणालो “नक्की ये, मी डायरेक्ट तिथेच भेटींन… दुरावल्याची भावना नजरेत ओतप्रत दाखवत म्हणालो, “सी यु बाय… गुड नाईट”. ती निघाली, पुढे जाऊन तिने मागे वळून पहिलं, मि तसाच ‘सर्वस्व’ निघुन गेल्याच्या अविर्भावात उभा पाहुन तिच्या डोळ्यात माझ्या बद्धलचा ‘विश्वास’ निर्माण करण्यात यशस्वी झाल्याची थाप, माझ्या पाठीवर मारण्यात गुंग झालो……..

 

…………(२२)

माझा ‘प्लॅन’ व्यवस्थित पास झाला होता. एका सुस्वभावी, निरागस मुलीला आपण फसवतोय अशी टोचणी मनाला होतीच, त्यात दुसऱ्यांसाठी खड्डा खणणारा मनुष्य अनावधानाने स्वतःच त्या खड्डयात पडून फसू शकतो ही जाणंही होती. पण मी शक्यतो काळजी घेत होतो. बुद्धिपुरस्कर एक एक स्टेप घेत होतो. मला डोळ्यापुढे फक्त ‘बेट’ च दिसत होती. ती जिंकायचीच, “हम भी कुछ कम नही” हे सर्वांना दाखवून द्यायचं होतं. आता फक्त तिने यावचं, तिला आयुष्यभराचा गुलामच करून टाकतो. माझं स्किल, माझं वक्तृत्व, माझी ऍकटिंग सर्व पणाला लावूनच मी स्टेप्स घेत होतो.

दुसऱ्या दिवशी कॉलेजमधे आम्ही एकमेकांकडे प्रेमभऱ्या नजरेने बघण्यातच गेला. ‘टाईम इज मनी’ कमी वेळात सर्व काही साधायचे होते. तिला माझ्या फ्रेंड्स मधे तीळगुळ वाटायला लावायचे होते. मला बाजी मारायची होती.

संध्याकाळी मी डेक्कन ला आलो. ‘इट्स ऑलवेज बेटर टू बी ऑन धी बॅटल फिल्ड बिफोर टाईम’, ती माझ्या नंतर पंधरा, वीस मिनिटांनी आली…

“आपल्याला कोणी पाहिल, उगाच तुला चिडवतील, ते मला आवडणार नाही, इथे उभं राहून बोलण्यापेक्षा आपण कॅफेत जाऊ” म्हणालो. तिलाही ते पटलं असावं. वास्तविक सर्वांनी पाहावं असंच तर मला वाटत होतं. पण आपण तिची किती काळजी  घेतोय, हे भासवणच महत्वाचं होतं. कॉफ़ी घेतांना मला ती किती आवडते, तिच्या बद्धल काय काय वाटतं, बरेच दिवस तिच्या भेटीसाठी किती बेचैन होतो. अभ्यासात सुध्दा कसं लक्ष लागत नाही, पुस्तक उघडलं की प्रत्येक पानावर तीच दिसून मन किती, आणि कसं बेचैन होतं, हे सर्व डोळ्यात प्राण आणून, आणि पाणावलेल्या डोळ्यांनी, तिच्या नजरेतून तिच्या हृदयाच्या गाभाऱ्यात शिरत तिला पटवीत होतो. ती बिचारी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती. ‘गारुड्याच्या’ पुंगीवर डोलत होती. एकटक मला पाहत होती. ‘आपल्या साठी कुणीतरी झुरतोय ही कल्पनाच मुलींना ह्या वयात सुखावते’, आपल्यावर कोणीतरी मरतोय ह्या कल्पनेने तिला गाफील करणे, आणि माझ्या जाळ्यात फसविणे हा माझा उद्धेश सफल होत होता. खरं काय आणि खोटं काय हे ओळखणं ह्या वयात, यौवनात किती कठीण असतं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण आता माझ्या समोरच होतं.

तिनेही आपल्या प्रेमाची कबुली दिली. मी एक हुशार, स्मार्ट आणि चांगला मुलगा आहे ह्याची तिला खात्री होती. माझ्या बद्धल आदर होता. आयुष्यात ‘असाच जोडीदार’म्हणे तिला हवा होता. प्रथम दर्शनी प्रेम “लव्ह ऍट फर्स्ट साईट”  वैगेरे म्हणतात ते हेच का? मी मनात हसत होतो. पण चेहेऱ्यावर “ये है जनम जनम के फेरे” चा आव आणीत होतो. वर वर ‘दिलीप कुमार’, आणि आत कुठेतरी ‘प्राण साहेबांची’ करामत चालली होती. नाना म्हणायचे ते अगदी बरोबर होतं, “हिरोज आर बॉंर्न, अँड व्हिलन्स आर फॉर्मड”. पण का कुणास ठाऊक मलाही ती खरोखरीच आवडू लागली होती. नशिबाने ‘सलमा’ नंतर ही ‘मासुमा’ आयुष्यात आली आणि मनाला भावली होती. ही आपल्याला कधीच रिस्पॉन्स देणार नाही. आपला पचका होईल ही मनाला वाटलेली धास्ती आता फोल ठरली होती.

मनात आलं, आपण कधी कधी, काही काही गोष्टींना उगाच घाबरतो, उगाच त्यांचा बाऊ करून, त्यांना फालतू इम्पोरटन्स देतो. बऱ्याच गोष्टी ‘स्ट्रॉंग डिटर्मिनेशन’नी होण्यासारख्या असतात. जीवनात आपल्याला समोरच्या बद्धल काय वाटतं, ह्याच्यापेक्षा समोरच्यालाच आपल्याबद्धल काय वाटतं ह्यालाच जास्त महत्व असतं. तसं नसतं तर भल्या, भल्यांना फुटवून लावणारी, त्यांच्या दृष्टीने असणारी ही “स. ट. वि.” मला अशी धार्जिणी झाली नसती. ‘कसायाने’ प्रेमाचे ढोंग ‘ इफेकटीव्ह ‘ केले होते. आणि उध्या कॉलेजला दांडी मारून रेसकोर्स परिसरात फिरायला जायच्या कबुलीवर मी तिचा माझ्या हातात घेतलेला हात हलकाच दाबला आणि आम्ही आयुष्यात एकमेकांना कधीही अंतर देणार नाही ह्या ‘शपथेवर’ एकमेकांचा निरोप घेतला. तिच्या चेहेऱ्यावर मीरेचे “मै तो प्रेमदिवानी” चे भाव स्पष्ट दिसत होते… मला आणखीन काय हवे होते……..

 

…………(२३)

दुसऱ्या दिवशी माझ्या प्लॅन ची शेवटची स्टेप घ्यायची असं मी ठरवलं. दिवस कमी उरले होते. रात्रभर तिला माझ्या प्लॅन मधे कसं फसवायचं, ह्याचाच विचार करीत होतो. खरंतर मला भावलेली ती एक सुंदर, निष्पाप, निरागस मुलगी होती. नशिबाने आणि सुदैवाने अशी मुलगी माझ्या आयुष्यात आली खरी, पण दुर्दैवाने ह्या ‘चांडाळ चौकडी’ च्या नादात आणि माझ्या अहंकारात मी सुध्दा फसलो गेलो होतो. कुठेतरी माझा ‘काँशन्स’ मला बाईट करीत होताच. अश्या निष्पाप मुलीला फसविण्यात असा काय मोठा पुरुषार्थ आहे? माझं जर खरोखरीच तिच्यावर प्रेम असतं, तर मी तिला चार चौघात, आणि ह्या ‘टवाळखोरांत’ असं थोडंच काही ‘अपमानास्पद’ करायला लावलं असतं का?

प्रेमाचं नाटक करून तिला जाळ्यात अडकवत असताना खरतर मीच तिच्या प्रेमात अडकलो होतो. माझं सुप्त मन बंड करीत होतं. मनात येणारे हे निगेटिव्ह विचार मला हैराण करून माझी झोप उडवून देत होते. प्लान फसला तर मी तिचा आयुष्यभराचा गुन्हेगार ठरून तीच्या नजरेतून कायमचा उठण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. त्याचबरोबर माझ्या कर्तृत्वावर  माझा विश्वास होता आणि नशीबाची पण साथ होती. आता तिला राजी करणे ‘इट वॉझंट अ व्हेरी डीफिकल्ट टास्क’ एकांतातिल एका हळव्या क्षणी, मी त्यात यशस्वी सुध्दा झालो. “आमच्याच ग्रुप मधे तिळगुळ वाटून आपण नवीन आयुष्याला सुरवात करू” अशी तिला गळ घातली. म्हटलं, “प्रेमाची गोड सुरवात करूया” बरेच आढेवेढे घेतल्यावर ती ‘मासोळी’ माझ्या गळाला लागली. आणि माझ्या अहंकाराला तिने खतपाणी घातलं. “नाऊ बाय हूक ऑर क्रूक, आय ऍम गोईंग टू विन… आय मस्ट विन… दॅट्स ऑल.”…

१४ ला रजा होती. १५ तारखेला वर्गात माझ्या सांगण्यावरून तिने खरोखरीच तिळगुळ वाटले. तिला ह्या ‘बेटची’ बिलकुल कल्पना नव्हती, आणि तसं तिच्या लक्षात येणं, किव्वा तिला कळल्यास माझ्या अंगाशी आलं असतं…

सगळ्यांना आश्चर्य वाटलं, कोणालाच मी आधी कल्पना दिली नव्हती. काय ते १५ लाच बघू, एव्हढंच म्हणालो होतो. सगळे चाट पडले. मी तिला भेटत होतो. ह्याचा कोणालाही थांगपत्ता लागू दिला नव्हता. मी स्थळही अशीच निवडली होती, की आम्हाला एकांत मिळेल, आणि मी ‘सक्सेसफुल’ होईन. सर्वांनी माझं अभिनंदन केलं. ‘पक्या’ हरला होता. पक्या कडून सर्वांनी पार्टी घेतली, आणि त्याने पिक्चरही दाखवावा, सगळा खर्च त्याचाच असं ठरलं. पण का कुणास ठाऊक माझ्या कर्तबगारीवर ‘परेरानी’ पाणी ओतलं. म्हणाला “श्री, ती तशी चांगली मुलगी आहे, तू स्कॉलर आहेस, आमच्या सारखा ‘भंकस’ मुलगा नाहीस, म्हणूनच तिने तुझे ऐकलं असावं, नाहीतर ती तशी पटणारी मुलगी नाही. खरा असशील तर रविवारी सुटीच्या दिवशी तिला पिक्चरला आणून दाखव’’…

मला हे मान्यच नव्हतं. झालं तेव्हढं पुरे होतं. पण ह्या आठ दिवसात ती माझ्यासाठी काहीही करेल इतका मला ‘कॉन्फिडन्स’ निर्माण झाला होता. मी म्हणालो, “बांगड्या तर तुम्हाला भरायच्याचं आहेत आता आणखीन तू काय, काय हरणार आहेस?” त्यावर सगळ्यांच्या पुढ्यात तो फुशारकीने म्हणाला “सगळ्यांच्या पिक्चरचा, आणि त्या दिवसाच्या पार्टीचा सगळा खर्च माझा. तू तिला आणुनच दाखव, तर तू खरा”…

“बघू तर खरं”…

आता पुन्हा एकदा माझा कस लागणार होता…

त्यानंतर इम्प्रेस गार्डन ला फिरायला गेलो होतो.

मि “उमाला” म्हणालो, हो मधे मी तिला म्हणालो होतो. “उमा, मी लग्न फक्त तुझ्याशिच करिन. मला “उमा” हे  नांव फार आवडतं, त्यावर तीनेच मला “ह्यापुढे, आपण दोघेच असतांना खुशाल मला “उमा” म्हणा, असे सांगितले होते. आणि “तू सुद्धा मला प्रेमाने “श्री”चं म्हणायचं” असं ठरलं होतं…

गार्डन मधे असतांना ह्या रविवारी आपण दोघांनीच पिक्चरला जाऊ असं सांगितलं. तिने चक्क ‘नाही’ म्हटलं. “मला ते शक्य होणार नाही” मी विचारलं “का?” म्हणाली… “मी, असं ठरवलं आहे की मी पिक्चरला वैगेरे येणार नाही, रविवारी तर मुळीच नाही, रविवारी मला असं घरातून… छे… मला ते शक्यच नाही” आता मी डोळ्यात पाणी आणलं, माझा एकदम ‘देवदास’ झाला. मी फक्त खाली मान घालून, पायाकडे बघत राहिलो. माझ्या डोळ्यात पाणी बघून म्हणाली “श्री, अस काय करतोस? मी काय करू? लग्नानंतर आपली एकमेकांना साथ आहेच की.” मी काहीच बोलत नव्हतो. तिनेच हात हातात घेतला…

‘पुरुषांच्या’ डोळ्यात पाणी बहुदा स्रियांना सहन होत नसावं. डोळ्यात पाहत म्हणाली “श्री, प्लिज नको, कोणी पाहिलं तर… घरच्यांना काय सांगू? आईला फसवंण मला बरं वाटत नाही. त्यांना तोंड दाखवायला मला शरम वाटेल.” मी आवाजातील कंप वाढवत आणि तिचा हात हातात घेत म्हणालो, “म्हणजे, माझ्यावर तुझा विश्वास नाही, हो ना?”…

“नाही रे तसं नाही, पण पुढे पाहू, एव्हढी घाई का?”…

पण माझ्या दृष्टीने हाच रविवार तर महत्वाचा होता. मनात आलं, ‘टाईम अँड टाइड वेट्स फॉर नो बडी’ नंतर उपयोग काय?…

“पुढे कधीही गेलो असतो ग, पण दिलीप, आणि मधुबाला चं कॉम्बिनेशन आहे. ‘मुघल ए आज़म’ सारखा पिक्चर नाही. वास्तविक हा पिक्चर ह्या आधीही मी पाहिला होता.”

“‘मधुबाला’ नसती तर मी इतका हट्ट धरला नसता आणि आता तू बरोबर नसशील, तर ह्यापुढे आयुष्यात मी कधीच कोणताही पिक्चर, आणि त्यात ‘मधुबाला’चा तर बघणारचं नाही.”

मी तिच्या आणि ‘मधुबाला’ च्या रूपात असलेल्या साम्याची, तिचातल्या त्या ‘अदे’ची ह्या अगोदरच तिला जाणीव करून दिली होती, त्यामुळे आता माझ्या ह्या वाक़्यामुळे… तिचातल्या मधुबालाने ‘अनारकलीची’ जागा घेऊन माझ्यात ‘सलीम’ शोधण्याचा प्रयत्न केला असावा. तिच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित पाहून, माझा बाण ‘टार्गेट’ ला लागला असावा ह्याची खात्री झाली. म्हणाली “श्री, तू एव्हढं म्हणतो आहेस, तर एका अटीवर मी येईन, आपण दोघे पिक्चरला जाणार, ही गोष्ट कुणालाही समजता कामा नये. फक्त तुझ्यासाठी मी माझा ‘पण’ मोडतेय, आणि तू मला कधीही अंतर देणार नाहीस, कधीही फसवणार नाहीस… दे प्रॉमिस…” मी सुद्धा शपथेवर तिचा हात हातात घेऊन लगेच ‘प्रॉमिस’ देउन मोकळा झालो……..

 

…………(२४)

माझ्या शपथेवर, मी माझ्या हाताने तिच्या हातावर दिलेल्या वचनावर ती खुष झाली. सगळं काही ठरलं. मी त्या दिवशीच तिच्या डोळ्यासमोर आमच्या सुखी संसाराची स्वप्न रेखाटली, ती आपलं ‘सर्वस्व’ मला अर्पण करायला ‘उत्सुक’ झाली होती. माझ्या मनात एक पुरुष, एका स्त्रीला कसं सहज गुंडाळू शकतो असं आलं. मी माझ्या अभिनयावर, वक्तृत्वावर, माझ्या खोट्या आश्वासनावर, खोट्या शपथेवर त्या गरीब गायीच्या मानेवर सुरा फिरवायला ‘उत्सुक’ होतो. स्त्री, पुरुषांच्या मानसिकतेतला हा भेद मला सर्वस्वी नवीन होता…

‘बट, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर’… तिच्या दृष्टीने ‘लव’ आणि माझ्या दृष्टीने ‘वॉर’ चं म्हणायचं. माझ्या सगळ्या ‘मूव्ह’ ह्या ‘वॉर’च्याच होत्या. माझ्या दृष्टीने ती माझी प्रतिस्पर्धीच होती. ती मात्र हे प्रेमाचं पुस्तक आवडीने, प्रकरणा पुढे, प्रकरण वाचीत चालली होती… आणि रविवार उजाडला…

“प्यार किया तो डरना क्या जब प्यार किया…” चालू होतं. आणि ति एका वेगळ्याच धुंदीत होती. माझ्या खांद्यावर रेलल्यामुळे, मी गालातच हसत होतो आणि जिंकल्या मुळे विजयाच्या नशेत असतांनाच ‘इंटरव्हल’ झालं…

मी खुशीत, बाहेर पडायला म्हणून उठायच्या आतच, आमची सगळी गँग च्या गँग आत बाल्कनीत आली. ती थोडी बावरली. वास्तविक कोणा एकाने वर बाल्कनीत येऊन ‘कन्फर्म’करायचं असं आमचं पहिल्या पासून ठरलं होतं. सगळी गँग पाहून मी हबकलो. एक, एक जण पुढे येत मला ‘कॉंग्रेचुलेशन्स’ देत होता, मी खूप खुणावलं पण तरीही कोणी ऐकेचनात. तिला मेल्याहून मेल्या सारखं झालं, आणि त्यावर कळस म्हणजे, परेरा तीला ऐकू जाईल एवढ्या मोठ्याने ओरडला. “श्री, ‘च्यायला’, मानलं तुला, शेवटी एकदा पटवलसच तू हिला, अगोदर तिळगुळ काय…, आता पिक्चर काय, मज्जाच आहे बुवा तुझी…, काही करून शेवटी बेट जिंकलासच बेटा”… मी खुणा करीत होतो, पण खुणा करूनही तो थांबतच नव्हता. मी सणकलो, उठून शेवटी पुढे होत, त्याच्या कानशिलात लगावण्या साठी मी त्याचा हात पकडला, इतक्यात ती जागची उठली. “श्री, आता शो करायची काहीच गरज नाही, सारं काही माझ्या लक्षात आलंय” इतकच म्हणाली, आणि झटकन दुसऱ्या बाजूने जाऊ लागली. मी तिचा हात पकडला म्हणालो “प्लिज ऎक, मी  सगळं सांगतो तुला. मला माफ कर, थांब.” तिने माझा हात झिडकारला, आणि तोंडावर रुमाल झाकून, स्फुंदत, स्फुंदत लगेच थिएटरच्या बाहेर पडली. आणि तिथेच उभ्या असलेल्या ऑटोत बसून निघून सुद्धा गेली. जाताना तिचा चेहरा साफ रडवेला होऊन फिक्कट पडला होता…

त्या मनस्वीचा घोर अपमान झाला होता.

माझ्यावरचा, आपल्या स्वतःच्या प्रेमावरचा, ‘प्रेम’ ह्या शब्दावरचा, शपथा, वचनं, सगळ्या सगळ्या वरचा विश्वास क्षणार्धात उडाल्याचं  मी तिच्या चेहऱ्यावर पाहिलं होतं. ती स्वाभिमानी मुलगी आज आयुष्यभराचं ‘फ्रस्ट्रेशन’ घेऊन पराजित होऊन निघून गेली होती. माझा  ‘षंढपणा’  मला जाणवला. तिच्या पेक्षा आपण कितीतरी पटीने थिटे आहोत असं मला जाणवलं. ह्या ‘चांडाळ चौकटीच्या’ नादाला लागून आपण एका मनस्वीचा घोर अपमान केल्याची टोचणी मनाला लागली. सर्वस्व अर्पण करायला तयार असलेली स्त्री, आणि तिच्या स्वाभिमानाची थट्टा करायला पुढे सरसावलेला पुरुष आज मी माझ्यात पाहिला. अहंकारापोटी तिच्याशी हा जीवघेणा खेळ मी खेळलो होतो… आज मीच माझ्या नजरेतून उतरलो. बेट घेण्याची कैफ, ती नशा, ती अहंकाराची धुंदी साफ उतरली होती…

‘बेट’ अंगाशी आली होती……..

 

…………(२५)

तिला मी थांबवू शकलो नाही. हरलेल्या मनस्थितीत तसाच परत थिएटर कडे परत आलो. मनात एक प्रकारची चीड निर्माण झाली होती. आमचा ग्रुपही माझ्या मागून बाहेर आला होता. एक क्षण हे सगळे माझा ‘तमाशा’ बघायला आल्यासारखे वाटलं. पुढ्यातच त्यांचा ‘म्होरक्या परेरा’ दिसला. माझी आणि पर्यायाने आमची अशी फजिती करण्यामागे पहिल्यापासून ह्याचाच हात होता. ‘साल्याला’ तिने फुटविले होते, म्हणूनच त्याने सगळ्यांना फूस लावली होती तर… मी त्याला झोड, झोड, झोडला. सर्वांनी मला शांत केलं. मी माझ्यावरच वैतागलो होतो. माझं शिक्षण, माझ्यावर झालेले आई, वडिलांचे संस्कार सर्व काही एका क्षणात मातीमोल झालं होतं. अहंकाराची नशा साफ उतरली होती.

मी घरी आलो. मला जेवण, खाणं काहीही नकोसं झालं होतं. कधी एकदा तिला भेटतो, आणि तिचे पाय धरतो असं झालं होतं. मला प्रायश्चित्त फक्त तीच देऊ शकत होती. तिला विनवून, तिला शांत केल्याशिवाय मला स्वस्थता लाभली नसती. ‘आय वॉज टोटली अपसेट.’ रात्रभर झोप नव्हती. सकाळी लवकर उठून कॉलेजला गेलो. तिची जाहीर माफी मागायची मी मनाशी ठरविलं होतं. कॉलेज शांत वाटलं. ती कुठेच दिसत नव्हती. स्मशान शांतता जीव खायला उठली. मी बेचैन झालो.

नीलम कडून तिचा ऍड्रेस मिळवला. ती ‘प्रभातला’  राहते एव्हढच माहीत होतं. ऍड्रेस वरून घर शोधून काढलं, डेअरिंग करून, भीतभितचं बेल वाजवली. घरी मोठी बहीण असावी. तिनेच दार उघडलं. मी ‘सरीताला’ भेटायला आल्याचं सांगितलं. सारितांने बिछाना धरला होता. काल दुपार पासून तिला ताप आल्याचं कळलं. एकाएकी तिला ताप आल्याने, आणि तो उतरत नसल्याने सर्वानाच चिंता लागली होती. आणि आश्चर्यही वाटत होतं. मी तिच्या जवळ बसलो. तशी तिने मान वळवली. मला खूप वाईट वाटलं. मी काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो. माझ्या अश्या अचानक येण्यांनी घरच्यांनाही बहुधा डाउट आला असावा. पण उमापुढे मला आता सर्वकाही क्षुल्लक वाटत होतं. ती काहीच बोलायला तयार नव्हती. तिच्या दोन्ही डोळ्यातून फक्त अश्रूंच्या धारा वहात होत्या. आता मी सुद्धा अश्रू लपवू शकत नव्हतो. तिच्या मनावर बराच परिणाम झालेला असावा. माझ्या कडे तोंड करून बघायला सुध्दा ती तयार नव्हती. तिचे ते घळघळणारे अश्रू पाहून मला तिथे बसवेना. मीच तिचा गुन्हेगार होतो.

“मला, माफ कर, मी उध्या परत येतो” असं काहीसं पुटपुटलो आणि निघालो.

तिच्यावर एव्हढा परिणाम होईल, भंकस अशी अंगाशी येईल असं स्वप्नात सुध्दा वाटलं नव्हतं. ही वेडी वैगेरे झाली तर?… गोळ्या खाऊन आत्महत्या केली तर? असे वेडेवाकडे, घाणेरडे विचार माझ्या मनात येत होते. कुठे प्रेमासाठी खुद्ध बापा बरोबर वैर करणारा, प्रेमींके साठी युध्द पुकारणारा ‘सलीम’ आणि कुठे, दुर्योधना पेक्षाही घोर अपमान करून, एका अबलेला तिच्या अश्या असाह्य अवस्थेला कारणीभूत ठरलेला “मी”… कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आई समान मानून, तिला मानाने परत पाठवून  स्त्रीचा आदर करणाऱ्या  महाराजांच्या नजरेतही आज मी करंटा ठरल्याची जाणीव होऊन, मीच माझ्या नजरेतून साफ उतरलो…

दुसऱ्या दिवशी हिम्मत करून पुन्हा घरी गेलो. ‘नीलम’ सुद्धा तिथे होती. मला पाहून तिने पुन्हा तोंड फिरवलं. शेवटी नीलंमनेच विचारलं “पण, तुम्ही असं का केलं?”… म्हणजे नीलम पर्यंत ही गोष्ट पोहोचली होती. मी पुन्हा तिची माफी मागितली. ती काहीच बोलत नव्हती. फक्त चेहेऱ्यावर ओघळत होते ‘अश्रू’. दोनच दिवसात तिची साफ दशा झाली होती. तिने काहीच खाल्ले नव्हते, झोपलीही नसावी. डोळ्यातली ती चमक कुठेच नव्हती. ते निस्तेज डोळे पाहिले आणि ‘मुघल ए आझम’ ची “हमे काश तुमसे मुहब्बत न होती” म्हणणारी हतब्बल झालेली ‘अनारकली’ ह्या, माझ्या “मधुबालेत” दिसली. मला काहीच सुचत नव्हतं. पुढे काय होणार? उगाचच एक दारुण भीती वाटत होती. काही वेडंवाकडं झालं तर्? पुढे आयुष्यभर भोगावं लागेल… ‘नीलम’ ला म्हटलं “तिची काळजी घे, माझं चुकलं, मीच गुन्हेगार आहे… पण मला माफ करा.” आणि तडक निघालो.

दोन्हीही भेटीत बोलणं सोडाच, पण तिने माझ्याकडे बघितलं देखील नाही. कशी समजूत घालू हिची? माझ्यापुढे गहन प्रश्न होता. दिवस रात्र तिच्याबद्धलच विचार होते. पुढे चार दिवसांनी ती कॉलेज ला आली तो पर्यंत हे सर्व प्रकरण सगळ्यांच्याच तोंडी झालं होतं. तिला पाहून मी चाट झालो. प्रकृती अशी बरी नसताना ही कॉलेजला आलीच कशी? मी  तिच्याकडे पाहतचं राहिलो. ती एका वेगळ्याच मूड मधे होती. रिसेस झाली तशी ती उठली आणि थेट माझ्याकडे आली. मला काही कळायच्या आत म्हणाली “माझ्या आयुष्याशी खेळलात, पण प्लीज, असा जीवघेणा खेळ परत आयुष्यात कुठल्याही मुलीशी कधी खेळू नका.”

“उमा थांब,” मी म्हणालो. पण मागे वळून न बघताच, ती तशीच तंद्रीत निघून गेली. नीलमही तिच्या मागेच होती. माझा तर मूड साफ़च गेला. ‘बेट’ अंगाशी येऊन जिव्हारी बोचत होती. पुढे आयुष्याची वाट लागण्याची ही नांदी होती. आणि आता तर हे कॉलेजही माझी दफनभूमीच झाली होती……..

 

…………(२६)

दुपारच्या लेक्चर्सना त्या दोघीही वर्गात नव्हत्या.

बहुधा नीलम तिला घरी सोडायला गेली असेल. खरंतर तिने आज कॉलेजला यायलाच नको होतं. वास्तविक काल पण तिचा ताप उतरला नव्हता हे मला नीलम कडून कळलं होतं. मग तरीही ती आज कॉलेजला का, आणि कश्यासाठी आली असं राहून राहून मला वाटत होतं. जाताना तिने मला विनंती केली खरी पण त्यात मला थोडी जरबही वाटली. ह्या पुढे मी कोणाही मुलीला फसवू नये, असं सांगतांना तिने वापरलेला ‘जीवघेणा खेळ’ हा शब्दप्रयोग माझं मन विचलित करून गेला होता. अनावधानाने तसं तिच्या बाबतीत माझ्या कडून खरोखरीच घडलं असेलही, पण तिने मला माफ करावं आणि सुधारायची संधी द्यावी अशी आता माझ्या मनाची माफक इच्छा होती. तिच्या मनाला  माझं वागणं फारच लागलं होतं, तिच्या डोळ्यातले प्राणच नाहीसे झाल्यासारखे दिसत होते, जे स्मित तिच्या चेहेऱ्यावर असायचे, तिची ती ‘अदा’ ज्यावर अक्ख कॉलेज ‘फिदा’ होतं ते सर्व आज नाहीसं झालेलं मला जाणवलं होतं. माझ्या मनाला हुरहूर लागली होती. सर्वत्र तीच, तिचे ते डोळेच दिसत होते. पण त्या बेंचवर ती आता नाही ह्या विचारांनी मी सुद्धा लेक्चर्स अटेंड न करिताच घरी आलो. रात्रभर झोप नव्हती. डोळ्यापुढे तीच सारखी उभी राहायची.

आत्ता जाऊन तिच्या पायावर डोकं ठेऊन तिची माफी मागावी असं सारखं वाटत होतं सकाळी लवकरच मी बिछाना सोडला. कॉलेजला जावं, की डायरेक्ट तिच्या घरी जावं. पण नकोच, घरी जाऊन परत त्या आगीत तेल ओतल्यासारखं होईल ह्या शंकेने, कसातरी कॉलेजला पोहोचलो. सार कसं शांत शांत वाटत होतं. ही शांतता मला भयाण अशी स्मशान शांतता वाटली. वादळापूर्वीची शांतता… “इज धिस काम बेफोर धी स्टॉर्म?” कॉरिडॉर मधे ‘नितीन’ एकटाच उभा होता. गेल्या गेल्याचं म्हणाला “श्री, एक बॅड न्युज आहे” मी चरकलो… “श्री, शी इज नो मोर”… “कोण???… काय झालं???”

तो गहिवरून येत म्हणाला,… “तिने आत्महत्या केली… रेल्वे लाईन जवळ”… माझ्या डोळ्यापुढे अंधारी आली. काय म्हणतोस काय… “खरं आहे हे… ओह नो!”…

असं व्हायला नको होतं… पण असं घडलं होतं. मी साफ खलास झालो. काळाने माझ्या अहंकारावर सणसणीत घाला घातला होता. काय करावं, काहीच सुचत नव्हतं.

सगळ्यांना आता ही गोष्ट कळणार. माझी बदनामी होणार, सर्व मलाच दोषी ठरवणार “ओह गॉड” पक्याबरोबर ती “बेट” घेतलीच नसती तर. मला गरगरायला लागलं.

तिच्या घरी जाण्याचे आता माझ्यात गट्सच नव्हते. पण शेवटचं तरी तिला भेटावं, तिच्या पायावर पडून जाहीर माफी मागावी म्हणून सर्वांबरोबर तिच्या घरी गेलो, पण तीचं शेवटचं दर्शनही झालं नाही. माझ्या मूळे त्या ‘निष्पाप’ जिवाने आपल्या आयुष्याचा असा दारुण शेवट करून घेतला होता. “येस, आय वॉज धी कॉज ऑफ इट, आय अँम धी कलप्रीट”…

त्या नंतर बरेच दिवस मी तापाने आजारी होतो. माझ्या मनावर आणि शरीरावर बराच परिणाम झाला होता. मी त्यानंतर त्या वर्गात पुन्हा गेलोच नाही. त्यावर्षी ड्रॉपच घ्यावा लागला. आणि कॉलेजही बदललं.

मी एका ‘मनस्वीचा’ घोर अपराधी ठरलो. जीने स्वतःच्या करिअर, कॅरेक्टर पायी सर्वांना अव्हेरलं होतं… आपल्या पहिल्याच उत्कट प्रेमाचं वैफल्य ती स्वाभिमानी, हळवी, खानदानी मुलगी पचवू शकली नाही. माझ्या खोट्या  शपथा, माझी खोटी वचनं, मी तिच्याशीच लग्न करेन, तिच्याशिवाय जगूच शकणार नाही, ह्या असल्या थापांना तिने मृत्यूला उराशी कवटाळून माझ्या आयुष्याला शह दिला होता. एका शालीन, सुसंस्कृत, निष्पाप  मुलीच्या प्रेमाची मी प्रतारणा करून तिचा घात केला होता. ‘देवदासची’ खोटी खोटी ऍकटिंग करता करता खरोखरीच आता माझा “देवदास”, झाला होता…

“एक छोटीसी भूल, और उसकी इतनी बड़ी सज़ा.”……..

 

…………(२७)

माझ्या जीवनाची झालेली वाताहात मी सहन करण्यापलीकडे मला गत्यंतरच नव्हतं. त्याला मीच जबाबदार होतो म्हणा. बाकी कोणाला दोष देण्यात, आणि कोणाची सहानभूती मिळवण्याची आशाच त्यावेळी उरली नव्हती, माझं सर्वस्व मी हरलो होतो. तिचा दोषी म्हणून मी जरी आता आयुष्यभर सर्व मुकाटपणे सहन करीत होतो, एकले पणाच्या आगीत जळत होतो तरी पण ती माझ्या सान्निध्यात असलेल्या, निर्दोष असलेल्या, आणि ऐन तारुण्यात सुखात संसार करीत असलेल्या निष्पाप सुखी जोडप्यांच्या संसाराची धूळधाण करीत त्यांचा बळी घेत होती, आणि पर्यायाने मला आणखीनच त्रास देत होती. तिचं हे मायावी सत्र मला कुठेतरी थांबवायला हवंच होतं.

मी उमेश बरोबर कित्येक दिवस होतो. हे असं त्याच्या बरोबर राहणं मला भागच होतं. मी त्याच्या बरोबर आहे तो पर्यंत ती त्याचं काहीही वाकडं करू शकत नव्हती, ह्याची मला खात्री होती. माझा तिच्यावर तसा ‘इम्पॅक्ट’ होता. पण मधे आठवडाभर ‘पेपर्स सेटिंग’ मधे मी बिझी होतो तेव्हा त्याचा ‘प्रकार’ बळावला.

आता ती त्याला सोडणार नाही, मोका मिळताच त्याचा घात करणार हे स्पष्टच होतं, आणि ती ते करेलच. ती वेळही जवळ येत चालली आहे अशी मला जाणीव झाली. माझ्या डोळ्यासमोर ‘विनयचा’ कल्याणला कड्यावरून कोसळून झालेला मृत्यू, नंतर ‘विनिताला’ लागलेलं वेड. बिछान्यावर आयुष्यभरासाठी खिळलेला ‘विजय”, आणि त्याला कंटाळून सोडून गेलेली ‘उषा’ डोळ्यासमोर होती. मला तिचं हे हुशार आणि शिकलेल्या सुस्वभावी तरुण पुरुषांना आपल्या मायावी मोहात गुरफटून त्यांचा घात करण्याचे ‘सत्र’ आणि ‘तंत्र’ ठाऊक झाले होते.

त्यांच्याशी प्रेमाचं नाटक करून, त्यांना मोहात अडकवून, आणि शेवटच्या क्षणा पर्यंत त्यांना आपल्या  शरीराला स्पर्श न करू देता त्यांचा बळी घ्यायचा. कुठेतरी मला हे थांबवायलाच हवं होतं.

आता उमेश शेवटच्या टप्प्यात शिरला होता. त्याला त्यातून मीच मुक्त करू शकलो असतो. पण मला हेच कळत नव्हतं की ती ‘माझ्या लग्नाच्या’ मागे का आहे? आणि मी लग्न करून हिला ह्या योनीतुन ‘मुक्ती’ कशी मिळणार?

मी आता कोणाशी लग्न करण्याचं माझं वयही राहिलं नव्हतं. उमेदीचं वय केव्हाच निघून गेलं होतं. आता आयुष्यात कोणाशीही लग्न न करण्याची मी शपथ घेतली होती. जरी मी “लग्न करिन तर तुझ्याशिचं” असं तेव्हा तिला खोटं खोटं वचन दिलं होतं तरी सुप्त मनात माझी फक्त तिच्याशीच लग्न करायची इच्छा होती हे तितकंच खरं. आणि म्हणूनच आई, नानांच्या  इच्छे विरुद्ध मी असा एकटा जगत आलो होतो आणि मुद्धाम त्यांच्या पासून दूर रहात होतो…

आजचं माझं हे जीवन म्हणजे ‘न घरका न घाटका’ अशी अवस्था झाली आहे. भाग्य पुढ्यात उमा सारखं सोन्याचं भरलेलं ताट वाढून उभं होतं, पण वाईट मित्रांच्या संगतीत आणि माझ्या कर्माने मी ते  झिडकारलं. आयुष्यात यशाचा किनारा समोर दिसत होता पण माझी नावचं अहंकाराच्या तडाख्यात सापडली आणि जीवनाचा चक्काचूर करून गेली. आज ती जाऊन वीस वर्षे झाली आहेत तरी एकले पणाच्या आगीत मी होरपळत आहे. जे जीवन तिच्या सान्निध्यात राहून उत्तम संसार करून घालविता आले असते ते मीच माझ्या पायावर ‘बेट’ च्या कुऱ्हाडीने  घाव घालून संपविले होते. पण आता प्राण पणाला लागले तरी चालतील पण निदान उमेश आणि सविताचा संसार वाचवून, भैय्यासाहेबांच्या उपकाराची परतफेड करण्याचा मी निर्णय मनाशी पक्का केला.

आज14 जानेवारी, “संक्रांत” म्हटलं की मला कससचं होतं. लहानपणी मला पतंगाचं खूप वेड होतं. पण नियतीने माझा “कटी पतंग” केला, आणि आता ‘पतंग’ म्हटलं की प्रेमात पागल होऊन त्या ‘दिपज्योती’ वर झेपावणारे बिचारे “क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा” म्हणत स्वतःची राख करून घेणारे ‘प्रेमीक’ डोळ्यापुढे येतात. आणि माझ्यातला थिटे पणा जाणवतो. आता माझं आयुष्य मात्र कापलेल्या पतंगा प्रमाणे, आणि मागे दोरी न उरल्यामुळे, काळाच्या झोक्यावर इकडून तिकडे एकटेच हेलकवात होतं. मला आता तिळगुळ डोळ्यापुढे नकोसे वाटतात. त्याचे काटे मनाला बोचतात. डोळ्यापुढे रंगीबेरंगी तीळगुळाचा एकच रंग असतो ‘लाल रक्ताचा’…

आज अमावास्या. आज काहीतरी घडेल असं उगाचच वाटत होतं. मन विषण्ण झालं होतं. आज काही झालं तरी उमेशला बाहेर पडू द्यायचं नाही, ह्याची सर्वांना ताकीद दिली. काही विपरीत होणार असलं की मला उगाच तशी ‘व्हायब्रेशन्स’ होतात……..

 

…………(२८)

संध्याकाळ झाली. गार्डन च्या दिशेने हलकासा गंध येत होता. संध्याकाळच्या ह्या अश्या कातरवेळेला येणारा हा असा गंध मारक ठरतो. हा गंधच मला तिच्या अस्तित्वाची, ती आजूबाजूलाच असल्याची जाणीव करून देत होता. आपल्या सावजाला ह्या गंधाने मोहित करून आपल्या जाळ्यात ओढायला ती आतुर होऊन त्याची वाट बघत असावी. काजळी वाढत होती. घरावरून टिटवी ओरडत गेली. ही टिटवी हृदयाला घरं पाडत होती, आणि अचानक उमेश एकदम किंचाळला. अचानक काय झालं ह्याला? तिची तहानभूक वाढली असावी, त्याला गिळंकृत करायला ती नक्कीच सरसावेल ह्यात शंकाच नव्हती. मी हबकलो, आणि पुढे झालो. भैय्यासाहेब होतेच. आम्ही त्याला घराबाहेर पडू नये म्हणून दरवाजाच बंद केला. सविता रडत होती. वहिनीसाब थरथरत होत्या.

“घाबरू नका, काहीही होणार नाही, मी आहे ना तुमच्या बरोबर” असे म्हणून सर्वांना समजावत होतो धीर देत होतो. उमेश ग्लानीत बडबडत होता. घराबाहेर पडायला धडपडत  होता. बाहेर एक काळी छाया फिरतेय असा मला भास झाला. एकदम खिडकीची काच खळकंन फुटून खाली पडून काचेचा चक्काचूर झाला. आणि सर्वांच्या तोंडचं पाणी पळालं. मी ह्या आधी तिला एव्हढं ‘अपसेट’ झालेलं पाहिलं नव्हतं. आज बहुधा ‘ही’ उमेशला घेऊनच जाईल. कायमचंच. असं मला  जाणवलं. मी धीर केला. ह्या सगळ्यांना आता फक्त मीच आधार होतो. मी मन घट्ट केलं. भैय्यासाहेबांना उमेशच्या जवळून न हटण्याची सक्त ताकीद देऊन दरवाजा उघडून बाहेर आलो…

माझ्या अंगावर काटा उभा राहिला होता. पण हीच वेळ होती. मी बाहेरून कडी घातली आणि लॉन कडे आलो. सर्वत्र अंधार होता. मावळतीच्या शुक्राचं चांदणं होतं. पण त्या अस्पष्ट प्रकाशात मला काहीच दिसत नव्हतं. कॉरिडॉर कडे परत आलो. पण लाईटआँन करूनही पोर्चचे लाईट लागत नव्हते. ही सगळी तिचीच करणी. म्हणजे हा सगळा तिचाच बंदोबस्त होता तर…आणि ती? ती कुठे आहे? मी स्वप्नात तर नाही ना? बागेकडे मला अंधुकसा प्रकाश दिसला.

पहिल्यांदा दिसली होती तितकीच सुंदर आणि मोहक मला ती मेणबत्तीच्या प्रकाशात दिसली. फक्त तोंडावरच उजेड होता. मला एक क्षण त्या निरागस, सालस चेहेऱ्यात ‘सलमाची’ पण झलक दिसली. आज सलमा तरी कुठे आहे म्हणा. उमाचे डोळे चकाकत होते. नजरेत तीच विलक्षण ओढ, वीस वर्षांपूर्वी स्वप्नात पाहिलेला तोच भाबडा चेहेरा, मोहित होऊन माझ्या तोंडून “उमा” हाक ऐकून, ती गालातल्या गालात तशीच हसली. म्हणाली…

“श्री, तू मला विसरलास, पण मी तुला कधीच विसरणार नाही” मला कळेचना ती असं काय म्हणतेय? वास्तविक ती गेल्यापासून माझ्या आयुष्यात असा एकही दिवस उजाडला नव्हता, की मी तिची आठवण काढली नाही. मग ही आता असं का म्हणतेय? “तुला, असं वाटतच कसं?” मी तिला प्रश्न केला. “मग, तू लग्न का करीत नाहीस?” तिने उलट प्रश्न केला. तिच्या शब्दात आता धार होती. नजरेत जरब. ती म्हणाली. “तू माझ्या मार्गात आता येऊ नकोस, लगेच लग्न कर, नाहीतर परिणाम अत्यंत वाईट होईल.” आणि जीवघेणी हसली. तिच्या नजरेतील भाव बदलले.

आता ती घात करणारच हे स्पष्ट दिसत होतं. मी चरकलो. मला एकदम भीती वाटू लागली. डोळ्यापुढे उमेश दिसू लागला. मी तिला विनंती केली. “उमा मला माफ कर, प्लिज उमेशला सोड.”

ती पुन्हा विचित्र पणे हसली. म्हणजे आता ती त्याला सोडणारच नव्हती.

मी लगेच म्हणालो, “उमेश ला लगेच सोड. मोकळा कर… मी लग्न करायला तयार आहे.” तिची कळी खुलली. नजरेत जणू मी ‘तिच्याशीच’ आणि आत्ताच लग्न करणार असल्यासारखी तिची तंद्री लागली. मागे मी तिला लग्नाचे खोटे वचन दिले होते. त्यावेळची तिची मानसिक आणि शारीरिक अवस्था अशीच फुलून आली होती. थोडा वेळ हा तिच्यातील भावनांचा बदल माझं मन हेलकावून गेला. तिच्या नजरेतुन उमेश दिसेनासा झाला आणि हया क्षणी जुन्या आठवणीत ती रमल्यामुळे बहुधा परत माझ्यासाठीचं ती वेडी झाली असावी असं वाटू लागलं. पण पुन्हा नजरेतील भाव बदलले आणि आता ‘अविश्वास’ दिसला. मी म्हणालो, “प्रॉमिस, मी लग्न करेनच”, तिच्या नजरेत पुन्हा बदल झाला. वीस वर्षांपूर्वीची उमाची तीच नजर पुन्हा देत म्हणाली.

“मला फसवणार तर नाहीस ना?” आणि आता नजरेतली भेदकता वाढवीत म्हणाली, “पण आता ह्या वेळी तू मला फसवूच शकणार नाहीस” आणि मोठ्यांदा हसली. आपण जिंकल्याचं समाधान, आणि हास्य तिच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. मी बघे बघे पर्यंत ती दिसेनाशी झाली. मी भानावर आलो. खरंतर घाबरलो सुद्धा होतो. मी थरथरत होतो. ही भीती उगाचच नव्हती. आज पहिल्यांदाच तिने मला ‘एकेरी शब्दात संबोधून धमकी दिली होती’. आता तिला फसवंण शक्यच नव्हतं. माझ्यापुढे आता एकच पर्याय होता… ‘लग्न करणे’… नाहीतर उमेशचा बळी……..

 

…………(२९)

‘उमेश’ चा जीव वाचावा, सविताचा संसार सुखाचा व्हावा आणि ‘उमाच्या’ मनाचे देखील समाधान व्हावे ह्या साठीच मी लग्न करायचे ठरविले खरे, आणि तिला “मी नक्कीच लग्न करेन” असे ‘पुन्हा एकदा’ ‘प्रॉमिसही’ देऊन बसलो खरा, पण माझं मन काही केल्या “उमा’ शिवाय माझ्या आयुष्यात दुसऱ्या कोणा स्त्रीचा आता विचारच करायला तयार नव्हते. तिला, तिच्या निरागस मनाला, निश्चयी प्रेमाला विसरणे मला शक्यच नव्हते.

भलेही त्यावेळी ‘बेट’ जिंकावी म्हणून थापा मारून तिला पटविले होते. पण कळत नकळत ती मनाला भावली होती… पण, कोवळ्या वयात “सलमा” जेव्हढी तिच्या सालस पणा मुळें मनाला भावली होती. आणि अशीच स्त्री मला माझ्या आयुष्यात हवी होती, पण दुर्दैवाने तिच्या अकस्मात मृत्यूमुळे ती दुरावली होती, तशीच “उमा” सुद्धा यौवनाच्या उंबरठ्यावर आयुष्यात आली आणि नंतर मनात घर करून गेली आणि तिला सुद्धा काळाने हिरावून घेतली… म्हणतात ना ‘हिस्टरी रिपीट्स’ आणि पुढे माझ्या कृतीचे प्रायश्चित्त म्हणून उमाच्या आठवणीतच जर माझे आतापर्यंतचे जीवन मी कवटाळले आहे, त्यातच सुख मानत आहे, तर ह्या वयात सर्वस्व हिरावलेले असताना उजाडलेला भूतकाळ, आणि मनाच्या जखमा विसरून, आता मी लग्न करून, उमाच्या अश्रूंवर  नवीन स्त्रीच्या सुखाची फुलं कशी काय फुलवणार आहे???… नविन संसारात पदार्पण करायला मन तयार होत नव्हतं. पण मागच्या दोन्ही प्रकरणात तिने दिलेली ताकीद, आणि त्या वेळची ‘मी लग्न करावं’ ही अट मी पाळली नव्हती. आणि त्यामुळे मला पण भोगायला लागलं होतं. पण आता तसं करून चालण्या सारखं नव्हतं. त्यावेळी खरंतर तिच्या सारख्याच दिसणाऱ्या, वागणाऱ्या एक दोन मुली माझ्या नजरेत भरल्या होत्या, पण मीच त्या वेळी टाळलं होतं. आणि ह्या वेळी अशी टाळाटाळ करणे म्हणजे उमेशला हातातून घालविण्यासारखे झाले असते…

मी विचार करत असताना राहून राहून मला आमच्या ‘कॅन्टीन’ मधे हल्लीच लागलेल्या त्या ‘बाईंची’ आठवण झाली. ही बाई माझ्याशी बोलताना मला बऱ्याच वेळा ‘उमाची’ आठवण यायची, का कोणास ठाऊक पण ही बाई कधी कधी, काहीही कारण नसताना आम्ही ज्या टेबल वर बसायचो त्याच्या आसपास घुटमळत असायची. माझ्याकडे टक लावून पहायची, बोलण्याचा प्रयत्न करायची. शेवटी मी आमचे कॉलेज चे कॅन्टीन मॅनेजर ‘प्रभूंना’ तिच्या संबंधी विचारलं तेव्हा ती गरीब घरची असून, निराधार असल्याचे कळले. मी विचार केला, नाना, आई, सर्वानाच मी अजूनही लग्न करावं असं वाटतं, तेव्हा ‘ह्या’ बाईंना लग्नासंबंधी ऍप्रोच करावा म्हणून प्रभूंना भेटलो. त्यांनी दोन दिवसांनी ‘त्या’ सुद्धा माझ्याशी लग्न करायला तयार असल्याचे सांगितले. प्रभू म्हणाले  “सर, वास्तविक ह्या आधी सुद्धा मी आपणाला सांगितलं होतं. त्या गरीब घराण्यातल्या आहेत, आणि शालीन तसेच सुस्वभावी आहेत, पुढे एकमेकांना आधार होईल, त्या तयार आहेत, तेव्हा लवकरच उरकून घ्यावं अशी माझी सुद्धा इच्छा आहे.”…

आम्ही रजिस्टर लग्न करायचं ठरविलं. नानांना, आईला तसं कळविले. ह्या संबंधात भैय्यासाहेब, आणि वहिनींचा विचार आधी घेतलाच होता.

माझ्या डोळ्यासमोर फक्त ‘उमाचं’ होती. जे पंधरा वर्ष आधी घडायला हवं होतं, ते आता ह्या वयात घडणार होतं. त्या बाईंची भेट घेतली, काय गम्मत असते पहा, जे जे म्हणून आयुष्यात नको असतं, नेमकं तेच पुन्हा आपल्या पदरी पडतं. काय योगायोग असतो, ह्या बाईंच नांव नेमकं “सरिताबाई” निघालं. “यु जस्ट कान्ट डु एनीथींग, यु हॅव टू ऍक्सेप्ट लाईफ ऍज इट इज.” त्यांचीही इच्छा रजिस्टर पद्धतीने लग्न करावं अशीच होती.

शेवटी एकदाचं लग्न झालं. भय्यासाहेब, वहिनीसाब, प्रभू आणि ‘प्रशांतही’ लग्नाला हजर होता. वैदिक पद्धतीने लग्न करून ‘रजिस्टर’ केलं…

भैय्यासाहेबांचा, सर्वांचा निरोप घेऊन माझ्या कारनेच नाना, आईंचा आशिर्वाद घ्यायला पुण्याला निघालो. भैय्यासाहेब भारावले होते. आणि त्यांच्या इतक्या वर्षाच्या स्नेहाचा, उमेश आणि सविताचा संसार सुखाचा व्हावा म्हणून मी उतराई होऊ पहात होतो.

लग्नात मी समाधानी नव्हतो. पण बाईंच्या चेहेऱ्यावर ‘विशेष समाधान’ होतं. त्यांचा चेहेरा खूपच प्रसन्न वाटत होता. त्यांच्या वयाच्या मानाने त्या आज बऱ्याच तरुण झाल्यासारख्या मला जाणवल्या. मी फक्त ‘तुझ्याशिच’ लग्न करेन म्हटल्यावर ‘उमाच्या’ चेहेऱ्यावर अशीच प्रसन्नता मी पाहिल्याचं मला  आठवलं. मला प्रकर्षाने आत्ता उमाचीच आठवण येत होती. बाईंच्या डोळ्यात मी माझी ‘उमाच’ पाहत होतो. तोच भाबडे पणा, तेच पाणीदार, बोलके डोळे… “कसला इतका विचार करताय “श्री.”…

मी उडालो… काल पर्यंत मला ”सर” म्हणून अदबीने हाक मारणारी ‘ही बाई’ लग्नानंतर लगेच “श्री” वर आली होती. हा अधिकार फक्त ‘उमलाच’ मी दिलेला होता. आज ‘ती’ वास्तविक माझ्या बरोबर असायला हवी होती. माझ्या डोळ्यात तिच्या आठवणींनी अश्रू जमा झालेले पाहून सरिताबाईंच्या डोळ्यातुनही अश्रुधारा सुरू झाल्या. मला उमाचे ते शेवटचे बिछान्यावरचे अश्रू आठवले. जीवनाचं गणित काही निराळंच असावं, इथे दोन अधिक दोन हात, चार हात होतीलच असं सांगता येत नाही. कदाचित परमेश्वर माझ्या आयुष्याचं गणित मांडताना मला ‘हातचा’ ध्यायला विसरला असावा. त्यामुळे माझ्या कर्माने भाग्याच्या उत्तरात घोडचूक केली. आणि जीवनात सुखाची, आनंदाची फुलबाग फुलायला हवी होती तेव्हाच माझी पतझड झाली. आणि एकटे पणाच्या वाळवंटात मला जगावं लागलं. नियतेने लग्नाच्या बोहल्यावर “उमा”च्या ऐवजी तिथे “सरिताबाईंना’ उभं केलं. राहून राहून उमाचं जीवन गीत ओठावर घोळू लागलं. माझ्या आयुष्याला असं काही निराळं वळण लागेल ह्याची मला पुसटशी जरी कल्पना असती तर… तर मी…

‘बेट’ घेतलीच नसती……..

 

…………(३०)

गत आयुष्याचा विचार केला तर माझ्या नशिबाचे मलाच हसू येते, ज्यावेळी जीवनाची गाडी रुळावर यायला हवी होती, त्या त्या वेळी तिने ट्रॅक बदलून मला नको तिथे पोहचवलं होतं, सलमा आयुष्यात येता येता नानांची  बदली झाली. आणि पुण्याला आलो. पुढे साथीत ती अचानक गेली. तिच्या विरहातून सावरता सावरता उमा आयुष्यात आली आणि मग उमाच्या बाबतीत माझ्या हातून नको ते घडलं. आणि जीवनात एकटे पणा आला. आता मनात नसतांना ह्या बाईंशी लग्न केलंय, नशिबात आता पुढे काय वाढून ठेवलंय ‘उमाच’ जाणे.

कारमध्ये पुढे आम्ही दोघे आणि तिच्या मागे प्रशांत असे आम्ही तिघेच होतो. माझ्या जवळ जवळ येण्याचा आणि माझ्या खांद्यावर विसावण्याचा बाईंचा प्रयत्न राहून राहून उमा बरोबरच्या कॉलेजमधील त्या दिवसांची मला प्रकर्षाने आठवण करून देत होता. बाईंच्या डोळ्यात ‘उमाचीच’ झलक आणि त्यात माझेच प्रतिबिंब माझे मन हेलकावीत होते. ड्राईविंग  करणं जड जात होतं…

आता प्रशांतच्या आणि माझ्या गप्पा चालल्या होत्या…

“इतक्या वर्षानंतर का होईना, पण आमच्या ‘श्री’ चं लग्न व्हायला तुम्हीच कारणीभूत झालात, वहिनी खरोखरीच तुम्हाला धन्यवाद” प्रशांत त्यांना म्हणाला. तश्या त्यावर त्यांनी माझ्या नजरेत खोलवर पाहून मला विचारलं, “एक विचारू, ‘श्री’ तुम्ही इतकी वर्षे लग्न का केलं नाहीत?’ त्यांचा हा पहिलाच प्रश्न माझ्या जिव्हारी बाणासारखा घुसला…

काय सांगणार? भूतकाळ मनाला हेलावून गेला. मला काहीच बोलवेना. म्हटलं “आत्ताच कारण हवं का?” त्या म्हणाल्या “तसं नव्हे, आत्ता सांगायचं नसेल, तर राहू द्या” मी म्हणालो,  “तो एक इतिहास आहे, पुन्हा कधीतरी सांगेन, पण हाच प्रश्न मी तुम्हाला सुद्धा विचारू इच्छितो. तुम्ही पण काय माझ्याकरिताच इतकी वर्षे थांबला होतात की काय?”

मी त्यांच्याकडे, त्यांच्या नजरेला नजर देत विचारलं, आणि माझ्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. उमाची प्रकर्षाने आठवण झाली. त्यांचे डोळे पाण्यांनी भरले होते. डोळ्यातून एकसारख्या धारा वाहत होत्या. मला बघावेना हे अश्रू पाण्याचे? की ह्या रक्ताच्या धारा…???

मला शुद्ध आली तेव्हा माझ्या लक्षात आलं, माझ्या कार ला ‘रेल्वे क्रॉसिंग’ वर ट्रेन ने उडवीलं होतं. प्रशांतला जबरदस्त मार लागला होता, तो बाजूलाच पडला होता. बेशुद्धच होता. बाई कुठेच दिसत नव्हत्या. सगळे लोक बाजूला जमा झाले होते.

माझ्या गाडीचा चुराडा झाला होता. त्याच्या बाजूलाच बाई विव्हळत पडल्या होत्या. मी धावत जाऊन पटकन त्यांना मांडीवर घेतलं आणि जोरात ओरडलो “धावा धावा पटकन पाणी आणा, डॉक्टर ना बोलवा.” बाईंच्या चेहऱ्यावर मात्र समाधान होतं, पण शरीर मात्र बर्फासारखं थंडगार होतं. मी शहारलो जणू ‘प्रेतच’ माझ्या मांडीवर होतं. त्या म्हणाल्या “श्री, उशिरा का होईना पण मी आता सुटले. आज मी संपूर्ण समाधानी आहे, तू मला मुक्ति दिलीस.” माझा असा एकेरी उल्लेख… “उमा…उमा” मी किंचाळलो. तिने माझ्या मांडीवर मान टाकली.

माझ्या डोक्यात लक्ख प्रकाश पडला, म्हणजे “स. ट. वि.” ने चं सरिता बाईंच्या रुपात माझ्याशी लग्न केलं होतं. मला तिचे ते शेवटचे शब्द आठवले, “श्री, तू लग्न कर, मी मुक्त होईन” म्हणजे मी दिलेल्या खोट्या शपथा, खोटी वचनं, थापा ह्या मूळे तिने केलेल्या आत्महत्येमुळे तिची माझ्या बरोबरोबर ‘लग्न’ करण्याची राहिलेली शेवटची इच्छा अश्या तऱ्हेने पूर्ण करून, तिने मलाही धडा शिकवला होता. मला आठवलं आजच २८ जानेवारी. आणि ह्याच ‘रेल्वे क्रॉसिंग’ वर तीने आपली मान देऊन, ती कायमची गेली होती. माझं लक्ष तिच्या गळ्याकडे गेलं. सविताचं गायब झालेलं ते ‘खड्याचे मंगळसूत्र’ तिच्या गळ्यात लटकत होतं. सविताचा  होणारा ‘संसाराचा’ आणि ‘सौभाग्या’ चा लॉस फक्त ‘मंगळसूत्रा’वरच भागला होता…

मी तिच्या उघड्या डोळ्यांकडे पाहिलं, अजूनही तिच्या नजरेत मला तिच्यात ‘प्राण’ शिल्लक असावा ह्याची जाणीव झाली. माझी “उमा” डोळ्यातील रक्ताच्या थेंबा थेम्बात दिसत होती. तीच केविलवाणी नजर  “हमे, काश तुमसे मुहब्बत ना होती” म्हणणारी. अनारकलीच्या वेषातील ‘मधुबाला माझी उमा’

अजूनही तिच्यातला ‘प्राण’ माझिच वाट पाहत असावा. उघड्या डोळ्यात आता मीच दिसत होतो. मि तिच्या उघड्या डोळ्यांवर ओठ टेकवीण्याचा प्रयत्न केला.  “उमा, उमा” मी मोठ्याने  हाक मारित होतो. माझे शब्द पुन्हा पुन्हा माझ्याच कानात घुमत होते, तिच्या पर्यन्त बहुदा पोहोचत नसावे. माझ्या सर्व शरीराला थरथरणी लागली होती. डोक्यात कळा मारित असाव्या. मी तिला कवेत घेण्याचा एक जोरदार प्रयत्न करीत असतानाच हॄदयातून अचानक एक  प्राणांतिक कळ… “उमा” म्हणत आसमंतात विरली……..

 

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी काही गाणी असतात, जी ऐकली की आपण भूतकाळात हरवून जातो. मग ते पावसाळ्यातील एखादे भावगीत असो, किंवा रात्रीच्या शांततेत ऐकलेले जुने गाणे; सूर तेच असतात पण भावना प्रत्येक वेळी नव्या वाटतात. ‘अतृप्ता’ ही केवळ एक भावना नसून आपल्या सर्वांच्या मनातील एक सुंदर कोपरा आहे.

तुमच्या आठवणीतील गाणे कोणते?
अशी कोणती सुरावट आहे जी तुम्हाला जुन्या दिवसांची आठवण करून देते? तुमच्या भावना आणि ते आवडते गाणे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. या संगीतमय प्रवासात सामील झाल्याबद्दल धन्यवाद

❣️”समाप्त”❣️

***********************

 
 
For more stories visit कथा आणि गाणी
 
 
 
To explore more songs Hindi Old Classics, visit https://www.youtube.com