
– अनंत नारायण संझगिरी
🙏🏻*मनोगत*🙏🏻
मित्रहो ……
जसं मला जुन्या मराठी गाण्यांचं प्रेम आहे, तसंच एक खास स्थान हिंदी चित्रपटसृष्टीच्या जुन्या गाण्यांनाही माझ्या मनात आहे.
विशेषतः ५०, ६० आणि ७० च्या दशकातील ही गाणी केवळ ऐकण्यापुरती मर्यादित नाहीत; त्यांच्यामागे भावना, आठवणी, आणि एक अदृश्य गोष्ट दडलेली असते. याच प्रेरणेतून WhatsApp वर मी रचलेल्या काही कल्पित कथा आणि त्याला अनुसरून ही गाणी सादर केली, आणि तुमच्याकडून मला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
आता, हाच सर्जनशील प्रवास एकत्र वाचता आणि ऐकता यावा म्हणून मी यासाठी वेबसाइटवर एक नवीन विभाग तयार केला आहे.
तुमचे प्रेम, मार्गदर्शन, आणि प्रतिक्रिया मला नवे विचार आणि सर्जनशीलता देतात. काही त्रुटी असतील, तर नव्या प्रयोगाचा भाग समजून क्षमा करावी.
आज माझी ‘आठवणींच्या पलीकडले’ ही कथा क्रमांक ५, कथानायिका ‘सुचित्रा’ आणि त्याला साजेशी काही निवडक (मुकेशची गैर फिल्मी हिंदी व्हिडिओ गीते) पाठवित आहे. आपण गाण्यांवर क्लिक करून फक्त गाणी ऐकू शकता किंवा क्रमशः कथा वाचताना ती गाणी त्या त्या भागाला कितपत साजेशी आहेत ते ही अनुभवू शकता……..
***********************
…………(०१)
समोर दिसणाऱ्या त्या रंगीन क्षितिजावर ह्या अथांग सागराला आता तो निरोप देत होता.
एका अपरिचित,असीम आणि अनोखी विश्वाच्या अनामिक आकर्षणाने ह्या सागरी वाळूत आठवणींच्या ओघात मी हा वाळूचा किल्ला बांधला खरा पण आता क्षितिजाच्या पलीकडे झेपावणारा तेजोहिंन आणि काहीसा पिवळसर नारिंगी दिसणारा तो सूर्य पाहत मग्न असताना,त्या ओहोटीच्या परतीच्या लाटेने तो ढासळत चाललेला पाहून माझं मन चलबिचल होऊन विषण्ण झालं.
संपूर्ण दिवस भरतीच्या लाटांवर तळपणारा हा तेजोमय ‘आदित्य’ त्या सागराच्या मोहमायेतून, क्षितीजाच्या बंधनातून मोकळा होऊ पाहत होता.
माझ्याही आयुष्याचं आता काही फारसं निराळं नाही. माझही एकेकाळचं ते तेजोमय रूप काळाच्या ओघात उतरंडीला लागून आता गलितगात्र होण्याच्या मागावर आहे.सुखासीन दिवसांनाही आता ओहटीचं रूप आलं आहे.नेत्र पैलतीरी लागले आहेत. ‘फीजिकल’ कडून ‘ऍस्ट्रल’ चा, ‘स्थूला’ कडून ‘सूक्ष्मा’चा प्रवास सुरु झाल्याची जाण मनाला होत आहे…
इतकी वर्षं हृदयाच्या एका बंद दालनात लपवून ठेवलेले ‘सुचित्रा’ ते रूप, हल्ली, पुन्हा पुन्हा उगाच आपल्या अस्तिवाची प्रकर्षाने मला जाण करून देत आहे.
वास्तविक तिच्या अगोदर माझं लग्न झालेलं होतं… पण तरीही आणि तिच्या लग्नानंतरही तिची आठवण आली नाही असा एकही दिवस कधी गेला नाही हेही खरं. वास्तविक तिच्या लग्नानंतर ती आता दुसऱ्याची झाली आहे ह्या भावनेने मी तिला त्यानंतर कधीही भेटलो नाही हेही तितकंच सत्य आहे.माझं स्वतःचं सगळं सुरळीत असताना आणि तिचंही कदाचित तसंच सगळं सुरळीत चालू असेल ह्या गोड कल्पनेने, तिला भेटून उगाच तिच्या संसारात ढवळा ढवळ करून तिच्या सुखी संसारात माझ्या मुळे बाधा येऊ नये ह्या सारासार विचारांनीच मी मनात असूनही, तिला प्रत्यक्ष भेटण्याचे टाळत आलो. आणि ती सुखात राहावी, निदान सुखात असावी या साठी त्या कर्त्याकरवित्याकडे बऱ्याच वेळा हातही जोडले. नाहीतरी त्या शिवाय माझ्या मनाला दुसरा पर्यायही नव्हताच म्हणा…
ती साधारण कुठे राहते हे कानावर येऊन सुद्धा मी तिला भेटलो नाही. प्रत्यक्षात माझ्या पत्नीशी, माझ्या ‘सुलभा’ शी मी कधीही शारीरिक प्रतारणा केली नसली तरी कधी कधी राहून राहून मनाला ही टोचणी लागतेच की ‘सुचित्रा’ ची आठवण सदैव जागृत राहिली आणि मी ती मनोमन जोपासली, ही माझ्या ‘पत्नी’बरोबर माझी मानसिक प्रतारणा ठरेल काय?…
आजही दोघांच्या रूपाच्या आठवणींच्या दोन ज्योती हृदयाच्या दोन्ही कप्प्यात एक ‘नीला’ बनून आणि एक ‘रोहिणी’ बनून त्याच उपयुक्त भावनेने तेवत राहून माझ्या आता ह्या अंधारलेल्या मनाला प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊ घालीत आहेत……..
…………(०२)
विचारांच्या गर्तेत सूर्यदेवांचा रथ क्षितिजापलीकडील विश्वात कधी विलीन झाला मला कळलेच नाही. आठवणींच्या ओघात माझ्या पाया जवळ बांधलेला वाळूचा किल्ला परतीच्या लाटांनी कधीच जमीनदोस्त होऊन वाहून गेला होता.
आता ओहोटीच्या लाटांच्या वेगालाही निसर्गाने वेसण घातली असावी. किनाऱ्यापासून बऱ्याच आत समुद्राच्या गाजेचा नाद माझ्या कानात घुमत होता. दूरवर एक शिडाची नाव ‘एकाकी’ हलकीशी डोलत होती. एखाद्या निरागस लहानग्याने चित्रित करावा असा देखावा मी बराच वेळ न्याहाळीत होतो. मनःपटलावर त्याचे तरंग उठत होते….
लहानपणापासून मला असलेली चित्रकलेची आवड आणि त्यातील नैपुण्य पुढे मला ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ लाही उपयोगी पडलं…
आतापर्यंत चोहीकडे वसुंधरेने काळपट रंगाची शाल अंथरल्याची मला जाणीव झाली. क्षितिजाच्या वर त्या सुर्यदेवाचा जणू पाठलाग करीत असावी अशी शुक्राची चांदणी आपली निळसर झाक फेकत, त्याच्या बरोबर विलीन व्हायला उत्सुक दिसत होती. ओघात मला सुचित्राची प्रकर्षाने आठवण आली.
शुक्राच्या वर गुरु ग्रहही आपल्या पिवळसर तांबूस पणाच्या झाकेत आपल्या अस्तित्वाची दखल देत होता. अशा ‘गुरू शुक्र’ ग्रहांच्या युतीने माझ्या आयुष्यात बऱ्याच वेळा मला भाग्याचे दिवस लाभले होते. पण आताशा मात्र गतःकालाच्या आठवणींनी वारंवार माझी पाठशिवण करायला सुरुवात केली होती…
‘इंटर सायन्स’ चे ते महत्वाचे वर्ष मात्र आयुष्यभर मला इंगळी प्रमाणे डसत राहिले, पीडित राहिले…
सेकंड इंनिंग ला डबल सॅनच्युरी मारली आणि नॉट आऊट राहिलो तरी फर्स्ट इंनिंगला झिरोत त्रिफळा उडाल्याने फॉलो ऑन घ्यायला लागल्याचे शल्य उरतेच की…
वास्तविक मी हुशार आणि मेरिटचा विद्यार्थी पण काळाच्या एका फटकाऱ्याने माझ्यातल्या अहंकाराला तोंडघाशी पाडून मला माती चारली.अहंकाराच्या नशेने धुळीला मिळल्यानंतरच माझे डोळे साफ उघडले…
‘सुचित्रानेही’ माझ्या ह्या अपयशात मोलाची भर घातली होती.आणि सर्वांचे हेच म्हणणे होते.पण त्यावेळी लोक काहीही म्हणत असले तरी माझं मन मात्र आजही ते मान्य करायला तयार नाही… ‘क्या यही प्यार है’…
सुचित्राची त्यावेळची ती मोहक मूर्ती आजही माझ्या डोळ्यापुढे,आणि हृदयात कायम कोरलेली राहणार आहे. असं म्हणतात की पहिल्या पावसा नंतरच्या मातीचा सुगंध आणि पहिल्या प्रेमाची सर काही आगळीच असते. “फर्स्ट लव्ह इज धी ओन्ली लव्ह, बाय धी सेकंड, धी हाययेस्ट सेन्स ऑफ लव्ह इज ऑलरेडी लॉस्ट”…
तिचे ते निळसर बोलके डोळे, धारदार नाक, काळ्याभोर कोरलेल्या भुवया, डौलदार बांधा, पाठीवर रुळणारा लांब आणि कुरळ्या केसांचा शेपटा, आणि सगळ्यात महत्त्वाचे ते डाळिंबाच्या दाण्यासारखे लालचुटुक आणि कोरीव ओठ, तिचे ते निर्मळ झऱ्यासारखे खळखळ हास्य आणि त्यात तिची ती कुणाशी बोलतांना खालील ओठ हलकेच दाताखाली धरण्याची आगळीच, जीवघेणी लकब आणि त्यामुळे गालाला पडणारी खळी एखाद्याला जर वेड लावून गेली तर त्यात नवल ते कोणते?… ह्या तिच्या आरस्पानी सौंदर्यावर माझ्या सारखा रसिक खुळा झाला आणि स्वतःचे अस्तित्व, जबाबदारी,ह्याची जाणीव न ठेवता सर्वस्व हरवून बसला…
काळालाही बहुधा हेच मान्य असावे……..
…………(०३)
‘इंटर सायन्स’ चे ते ६९-७० साल माझ्या आयुष्यातील एक ‘ब्लॅक माईलस्टोन’ ठरेल असे मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. खरंतर ६८-६९ ने मला भरभरून सर्वस्व अर्पण केलं होतं. गाण्याची, ड्रॉइंगची, स्पोर्ट्सची, क्रिकेट मधील आणि नाटकातील अभिनयाची सर्व पारितोषिके माझ्या पदरात टाकली होती. आणि फर्स्ट इयर सायन्सच्या मेरिटमध्ये देखील मीच टॉपला होतो. देखणा होतोच आणि त्यात ‘जोवीयल’ त्यामुळे ‘फ्रेंड सर्कल’ सोडाच पण टिचिंग स्टाफ मधेही लाडका होतो. माझ्या उपजतच्या ‘इगो’मधे नियतीनेही अशी यशाची भर घातली होती.
त्यावेळी आजूबाजूला ‘गोपींचा’ घोळका आणि मी ‘मुरलीधर’… त्यांचा ‘कन्हैय्या’. मग काय विचारता, कोणालाही जवळपास उभी न करणारी आखडू, उर्मठ आणि माझ्या फ्रेंड सर्कलमधे सर्वांना तुच्छ समजणारी आणि भयंकर ‘अँटिट्युड’ असलेली ‘कॉलेज क्वीन सुचित्रा’ मात्र ह्या गिरीधरावर लुब्ध झाली होती. तिला त्या वेळी, ‘मेरे तो गिरीधर गोपाल… दूसरों न कोई’… अशी प्रचीति माझ्या बाबतीत येऊन तिची दयनीय अवस्था झाली होती…
फर्स्ट ईयरला दिवाळीनंतरच्या आमच्या कॉलेज ट्रिपमधे आमची पहिली नजरानजर झाली. ‘वजरेश्वरी’ च्या त्या ‘ट्रीप’ मधे त्या निसर्ग रम्य परिसरात पक्षांच्या गळ्यातील गोड शिळीमधुन निघणाऱ्या तालावर, ‘किसी नर्गिसी नजर को दिल देंगे हम’… हे मी म्हटलेले मुकेश चे गीत तिच्या हृदयाला जाऊन भिडले आणि मग चालताना तिचे सर्व लक्ष माझ्यावरच केंद्रित असल्याने ती अङ्खळून तोंडावर पडणार इतक्यात मी ‘गारफील्ड सोबर्स’च्या चपळाईने पुढे झेप घेत तिला सावरले, पण पायाच्या अंगठ्याला लागलेल्या ठेंचनी तिचे नख उपटल्याने रक्तबंबाळ झालेल्या पायाच्या अंगठ्याने त्या अवस्थेत तिला धड चालता येत नव्हते अशावेळी माझ्या भरभक्कम हातावर तिने विसावलेले पाहून आणि तिच्या त्या निळसर डोळ्यात विसावून मी विहार करीत, ‘नजर, नजरसे हो रही है बात प्यारकी’, च्या तालावर रममाण होत ‘लव् ऍट फर्स्ट साईट’ ची अनुभूती घेत असलेला पाहून सर्वांच्या नजरा आता आम्हाला घायाळ करीत होत्या. मी पटकन खिशातून माझा हातरुमाल काढून त्या जखमेवर बांधला खरा, पण त्या नंतर भविष्यात ती मला आंगठा दाखवून, तिच्या दुराव्याची जखम हृदयी बाळगत आयुष्यभर त्या अश्वत्थामा सारखा मला ‘तोच रुमाल ‘माझ्या’ ‘हृदयाच्या जखमेवर’ घट्ट बांधून फिरावा लागणार होता, ह्याची पुसटशी कल्पना त्यावेळी मला आली नाही…
पुढचे महत्वाचे वर्ष वर्गात कोठारी, दंडवते, तेंडुलकर सर काय शिकवितायत ह्या कडे माझे लक्षच नसायचे, तिसऱ्या बेंच वरील त्या सुचित्राने, मला आपल्या मोहक चित्रात सामावून घेतले होते. आयुष्याचे सर्व सोनेरी क्षण आणि भावनांचे विविध रंग, मनाच्या कुंचल्याने तिचीच प्रतिमा आयुष्याच्या कॅनव्हासवर उतरविण्यात दंग होते. तिच्या त्या नजरेतील नशेत मी आखंड बुडून गेलो होतो.दिवस रात्र तिचाच विचार, तिचाच ध्यास आणि नजरेसमोरून तिची मूर्ती हटतच नव्हती. फिजीक्स, मॅथ्स मला नकोनकोसं झालं होतं. माझी संपूर्ण ‘केमिस्ट्री’ च बदलून गेली. सुचित्रा हेच आयुष्याचं ‘समीकरण’ सिद्ध झालं……. त्या एकवर्षात मी तिच्याबरोबर अनेक सुंदर सुंदर फिल्मी हिरोईन्सचे बरेच पिक्चर तिच्या नजरेत विसावत पाहिले. पुढे त्याचा नको तो परिमाण माझ्या अभ्यासावर झालाच.
तिने मला बऱ्याचवेळा शिक्षणातील माझ्या दुर्लक्षाबद्दल त्या वेळी जाणीव करून दिली होती पण मी तिच्या प्रेमात पागल होतो आणि माझं कोण काय बिघडविणार? ह्या नादात माझा अहंकारी स्वभाव सुद्धा आड आला. ६९-७० च्या ऍकेडेमिक इयर ने मला तिच्या मनोसागरात डुबवून मी इंटर सायन्स ला गटांगळ्या खात पार रसातळाला गेलो. ती पास झाली आणि मी नापास विद्यार्थ्यांच्या रांगेतच मागे पडलो…
पुढे पुढे ती माझ्या मनापासून, माझ्या सहवासापासून दूर दूर जाईल ह्याची मला पुसटशी जरी कल्पना असती तर….
आता ह्या जर, तर… आणि तिच्या असल्यानसल्याने काय फरक पडणार…
नियतीने आणि माझ्या डोक्यातील हवेने आणखीन एक ‘देवदास’ जन्माला घातला…
‘किसको खबर थी… किसको यकीन था… ऐसेभी दिन आयेंगे….. हाय!’……..
…………(०४)
इंटर सायन्सच्या त्या निकालाने, माझ्या आयुष्याचा निकालचं लागल्या सारखे झाले होते. आई बाबा सोडल्यास, चारचौघात, मित्रात, नातेवाईकांत, सगळ्यांत माझी छि:तू झाली. माझ्या ह्या नालस्तीला मीच संपूर्ण जबाबदार होतो. पण ह्या सगळ्यांत मला जास्त दुःख वाटत होते ते म्हणजे सुचित्रा दुरावत चालली होती. कधी कधी विचार केला की वाटतं, फक्त माझं अपयश हेच तिचं माझ्या पासून दूर दूर जाण्याचं कारण असावं? की सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची आणि कोणाचीही कदर न करण्याची तिची अंगीभूत सवय मला दूराव्याच्या वाळवंटात सोडून आली. एक गोष्ट नक्की, जो पर्यंत विजयाची माळ तुमच्या गळ्यात असते, तो पर्यंत लोकांची तुमच्याकडे बघण्याची दृष्टी, वागण्याची पद्धत आणि एकदा का तुम्ही हरलात,कफल्लक झालात, की त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ह्यात जमीन आस्मानाचा फरक पडतो.
‘अब तो, बदले बदले मेरे सरकार नजर आते है।‘ अशी माझी दुर्दशा झाली. कशातच मन लागत नव्हते. रात्र रात्र खायला उठायची…
तिला सारखं भेटाव असं माझ्या मनात यायचं, पण कोणत्या तोंडाने तिला भेटू, त्यात ती सुद्धा माझ्याकडे फिरकायची देखील नाही, मग जिथे जिथे आम्ही भेटत असू,त्या सर्व ठिकाणी मी एकटाच जाऊन तासनतास बसत असे. जुन्या सोनेरी आठवणी छळत होत्या. नाईलाजाने एकदा प्रत्यक्ष भेटून तिला खूप विनवणी केली. अशा अवस्थेत जगणं मला किती कठीण आहे हे तिला समजावण्याचा प्रयत्नही केला. पण “तुला समजावत होते, तू ऐकलं नाहीस, आता माझ्या अभ्यासात बाधा येईल” ह्या तिच्या विचारा अंती मीच तिला भेटायचे टाळू लागलो.
‘वो जो मिलते ते कभी हमसे दिवानोंकि तराह, आज युं मिलते है ,जैसे कभी पहेचान ना थी…‘ रेडिओ वर ही गाणी प्रियकराच्या विरहात स्त्री च्या तोंडून ऐकलेली, पण आज मात्र प्रत्यक्ष माझ्या ओठांवर उमटत होती. काल पर्यंत आपली वाटणारी ही माणसं, काळाच्या एका फटकाऱ्या निशी त्यांच्या मनापासून आपल्याला इतकी दूर कशी लोटू शकतात ह्याचच मला आश्चर्य वाटायचं…
मी तिच्यावर मनापासून प्रेम करीत होतो.तिच्यावर असा प्रसंग आला असता तर मी तिला असं वाऱ्यावर थोडंच सोडलं असतं? तिच्या त्या दीड वर्ष मनात कोरलेल्या प्रतिमेला कुठेही तडा न जाऊ देता. हृनमंदिरी तिची प्रतिमा, ते प्रेम जपत बऱ्याच विचारा अंती शेवटी हळू हळू तिच्या नादातून बाहेर पडायचं ठरवलं, गेलेली पत परत मिळवण्यासाठी असा निर्णय घेणं, काही तरी करणं भागच होत…
तिने बी.एस्सी. ला ऍडमिशन घेतली होती. मला आय.आय. टी. मधून इंजिनिरिंग करायचा पहिल्या पासून मानस होता. पण आता सेल्फ कॉन्फिडन्स कमी झाला होता. तरीही मी अभ्यासात मन लावायचा प्रयत्न करीत होतो. तिच्या त्या गोड आठवणी माझा पिच्छा सोडत नव्हत्या, पण ज्या काळाने मला दगा दिला त्यावर एक पुरुष म्हणून मात करण्याचा मी चंग बांधला. आई बाबांच्या, आणि साईबाबांच्या साक्षीने आणि श्रद्धेने मी दुसऱ्या वेळी अतिशय चांगल्या गुणांनी ‘मेरिट’ मध्ये यशस्वी झालो.
पण ह्या वेळी ती नशा, तो माज, ती मस्ती तो उत्साह माझ्यात नव्हता… ‘एनी वे आय वॉज अ रिपीटर’…
माझ्या एका जवळच्या मित्राकडून जेव्हा सुचित्राला माझ्या या उत्तुंग यशा बद्धल कळलं तेव्हा ती खुद्ध जातीने माझं अभिनंदन करायला घरी आली. ‘कालाय तसमैं नमः’…
‘सुबह का भुला अगर शाम को लौट आये, तो उसे भुला नही कहते।’…
यश मिळूनही त्याचा कैफ चढू द्यायचा नाही हे काळाने मला शिकवलं होतं.जे आज आहे, ते उद्या तसच असेल असं नाही. जे जे म्हणून आपल्याला मिळतं, आणि आपण केलेल्या कर्माचे फळ, यश, कीर्ती, प्रेम, पैसा हे सर्व काही त्या कर्त्याकरवीत्या च्या मर्जीवर अवलंबून आहे. ह्याची जाण आली होती. आपण फक्त चांगलं कर्म करायचं, ही आई बाबांची शिकवण मला पटली. आपण केलेल्या बऱ्या, वाईट कर्माची फळं ही आपल्याला भोगावीच लागतात, त्यातून कोणाचीही सुटका नाही… हेच खरं. आता ह्या पुढे मला पराभव स्वीकारावा लागणार नाही, विजयाचा कैफ चढणार नाही ह्याची मी काळजी घेणार होतो. झालं ते झालं, आपल्या शत्रूला देखील मोठ्या मनाने माफ करावं ह्या आईबाबांच्या शिकवणीला स्मरून… वारंवार आपल्या वागण्याचे, माझ्या पासून दूर राहण्याचे सुचित्राने केलेले समर्थन मी गोड मानून घेतले. पण काळजात कुठेतरी खोल जखमेवर धरलेली खपली केव्हा निघून ते पुन्हा रक्तबंबाळ होईल ह्याची खात्री नव्हती…
आताशा ती पुन्हा पुन्हा मला भेटायला येऊ लागली. जवळीक वाढवू लागली. तिची ती पहिली माझ्याजवळ असलेली ओढ,ते प्रेम आणि आता ती दाखवत असलेली जवळीक ह्यातले अंतर माझे अंतर्मन समझु शकत होते.
तिचा त्यावेळी असलेला तो ‘आर्ग्यूमेंटेटीव्ह’ नेचर, स्वतःचेच म्हणणे खरे करायची आणि त्यासाठी वाद घालायची तिची ती सवय,आजही मला जाणवत होती. हे सर्व मला त्यावेळीही खटकत असूनही, मनानी एकदा तिला ‘माझी’ म्हणून वरले होते,आणि ‘प्रेम आंधळे असते’ ह्या नात्यांनी तिच्यावर जीवापाड प्रेम केलं खरं, पण आता तिच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला होता. पण तरीही ती मला सतत दिसावी, भेटावी ही मनीची सुप्त इच्छा जागृत ठेऊन मोठ्या मनाने मी तिला आयुष्यभर ‘एक जवळची मैत्रीण’ मानण्याचे ठरविले. अजूनही तिच्यासाठी काहीही करायची ताकद आणि पुरुषार्थ माझ्या ठिकाणी शिल्लक होता…
पण तरीही……..
…………(०५)
इंटर तर चांगल्या मार्क्स नी पास झालो. पण इंजिनिअरिंग करण्याचा आता मानस नव्हता, मध्यंतरी ‘फाईन आर्टस्’ च्या दिलेल्या परीक्षा आणि ‘एंटरन्स एक्झांम’ देऊन ‘जे जे स्कूल ऑफ आर्टस्’ ला ऍडमिशन घेतली. नाहीतरी नियतीने भावनांची गाडी जीवनाच्या पटारी वरून केव्हाच उतरवून आता काळाने अपेक्षांचा ट्रॅक बदलून, नवीन स्टेशना कडे धाव घेण्यास उद्युक्त केले होते. कुठे इंजिनिअरिंग आणि कुठे आर्कीटेक्चर पण बाबांचे म्हणणे एकच, “जे काय करशील, ते मन लावून आवडीने कर त्यात सर्वस्व ओत. इमानदारीने जग .त्यातच तुझं कल्याण आहे”. आता पाठचा पुढचा फारसा विचार न करता मन लावून अभ्यास करीत होतो… माझ्या मनात सुचित्रा ला भेटावं असं फार वेळा यायचं पण मी ते टाळत होतो. पण काय गम्मत असते पहा, मी ज्या ज्या वेळी असं तीला भेटण्याचं मनात आणायचो, लगेच एखाद, दोन दिवसात तीच आपणहून मला भेटायला यायची. मला गम्मत ह्या गोष्टीची वाटते की माझ्या पडत्या काळात जेव्हा मला तिची खरी गरज होती, तिच्या साठी जीव व्याकुळ होत असायचा त्यावेळी तिने ढुंकून सुद्धा माझ्याकडे बघितलं नाही. आणि आता मी मार्गावर आहे जीवनात ग्रीन सिग्नल मिळालाय तर तिच्या नुसत्या आठवणीनी सुद्धा ती आपणहून माझ्याकडे चालत येते. ही जर ‘टेलिपथी’ असेल, तर ती त्या वेळी कुठे गेली होती.
‘ये टाइम टाइम की बात है जानी, टाइम टाइम की बात’…
हल्ली वारंवार ती मला भेटायचा प्रयत्न करीत होती. माझ्यातला फरक जाणून होती. मी पहिल्यासारखा तिच्याशी ‘प्रेमाने’ वागत नाही, तिच्या रूपावर भाळला जात नाही ह्याचं मनोमन तिला वाईट वाटायचं, तिच्या चेहेऱ्यावर, देहबोलीतून मला ते जाणवायचं ,पण माझा नाईलाज होता. निर्मळ,आणि शुद्ध मैत्री शिवाय आता मला तिच्याकडून कसलीच अपेक्षा नव्हती. पण आज ना उद्या मि परत तिला हवं तसं वागेंन, पुनः त्याच उत्कटतेने तिच्यावर प्रेम करेन ह्या गोड ‘गैरसमजा’ पोटी ती वारंवार येऊन भेटत होती. पण माझं मन मला सारखं खुणावित असायचं, आता माझं लक्ष फक्त ध्येय गाठण्याकडे होतं’… उत्तम तऱ्हेने पास होणं, आणि झालेल्या जखमेवरची खपली कोणालाही काढू न देणं’… जे मी नापास झाल्यावर वर्ष भर भोगलं, काळ त्याची परत फेड कधीच करू शकत नाही.
उभ्या आयुष्यात ती जखम तशीच घेऊन मला जगावं लागणार आहे…. शेवटी, तिला अपेक्षित असलेलं माझं प्रेम… आणि मला अपेक्षित असलेली तिची निर्मळ मैत्री तिला समजावून सांगितली. गैरसमाजा पोटी माझ्या कडून तिच्याबरोबर च्या अशा संयमित वागण्याने तिच्या स्त्रीत्वाचा उगाच अपमान व्हायला नको होता. तसंच मला तिची खरी गरज होती तेव्हा तिच्या दुराव्यात मी भोगलेल्या क्षणांची परतफेड आता तिच्याकडून होणारही नव्हती…
‘वक़्त ने किया, क्या हँसी सितम, तुम रहे ना तुम, हम रहे ना हम… वक़्त ने किया…’
शेवटी, उत्कटतेने मी तिचा हात माझ्या हातात घेतला…
पुन्हा तोच जुना हवा हवासा वाटणारा स्पर्श… ओघवत्या, खळखळ वाहणाऱ्या निर्मळ झऱ्या सारख्या हास्य वदनाने, उस्फुर्तपणे तिने तिचा तो कोमल हात माझ्या हातात दिला.नजरेला नजर भिडली. खोलवर ती माझ्या डोळ्यात ‘प्रियकर’ शोधत होती… आणि तिच्या त्या भरल्या डोळ्यात मी माझी जीवाभावाची ‘सखी… माझी मैत्रीण’……..
…………(०६)
जड अंतःकरणाने माझ्या पासून दूर जाणाऱ्या तिच्या त्या पाठमोऱ्या आकृती कडे मी बराच वेळ तसाच पाहत उभा राहिलो होतो.
एकेकाळी माझ्या बरोबर ‘सप्तपदी’ चालण्याची शपथ घेतलेली, त्यावेळी मी ‘माझी’ मानलेली आणि माझी ‘सहचारिणी’ होण्याची जीची स्वप्ने मी पहिली होती, ती आता चार पावलांवर उलट्या पावलाने परतीच्या वाटेवर होती. त्यावेळी तिच्यावर माझा जीव जडला होता. ज्या काळयाभोर लांबसडक कुरळ्या केसांवर मी प्रेम केलं,त्या लांबसडक केसांच्या त्या शेपट्याने आता माझ्या मानेला किंचित विळखा घातल्याच्या जाणिवेने, माझी तंद्री भंग पावली…
मगाशी तिचा हात हातात घेतल्यावर ज्या उत्कटतेने तिने माझ्या नजरेत डोकावले तेव्हा माझं मन क्षणभर द्रवलं, मनःपटलावर क्षणात जुन्या सोनेरी दिवसांची आठवण मनाला हेलकावून गेली.सर्व विसरून पुन्हा एकदा तिला आपण जवळ घ्यावं, त्याच जुन्या प्रेमापोटी परत मनाच्या कप्प्यात जवळ करावं असं क्षणभर वाटलं.पण माझ्या अंतर्मनाच्या तरलतेने तिला ‘पुन्हा प्रेयसीच्या’ रुपात न बघण्याच्या माझ्या ह्या निश्चया वर शिक्कामोर्तब केलं.
आपल्या जीवनात ‘नियती’ असे विचित्र खेळ का खेळते?… हे एक कोडंच आहे. पण बाबांच्या म्हणण्याप्रमाणे आपापल्या ‘कर्माच्या गतीने’ आपणच आपले ‘भोग’ आणि ‘उपभोग’ ठरवून जन्माला येत असतो. ‘मनात्वाची रे पूर्व संचित केले, तया सारीखे भोगणे प्राप्त झाले.’ असं जे रामदास स्वामी म्हणतात तेच खरं असावं.
तसच आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आणि आपला, आपल्या मागच्या काही जन्मातील ‘प्रेम संबंध’ असावा, कारण जगात इतकी लाखो माणसं असतांना, आपल्या ह्या जीवनात काही ठराविक लोकांशीच आपला संबंध का यावा?… काही लोक आपल्याला उगाचच आवडतात, तर काही लोकांनी आपलं काहीही घोडं न मारता देखील, आपल्याला ती आवडत नाहीत. काही माणसं आपल्याला सुख देतात, बहुधा गेल्या काही जन्मातील ते आपले ‘ऋणको’ असावेत आणि म्हणूनच ह्या जन्मात ते आपल्या ‘प्रेमाची परतफेड’ करीत असावे. ह्या उलट तर काही आपल्याला दुःखी करून सोडतात.कदाचित आपण त्यांचे ‘ऋणको’ असणार. आणि ते मागच्या जन्मातील आपले ‘धनको’ असावेत. तिच्या बद्धल च्या विचारांना पलटी देत मी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. सेमिस्टर उत्तम रीतीने क्लिअर झाल्या…
आताशा पुन्हां एकदा तिच्या आठवणींनी जोर धरला बाहेर पाऊस कोसळत होता. बाहेर सरींवर सरी, आणि इथे आठवणींच्या सरीने, मनाला ओलेचिंब करून सोडले होते…
बाहेर असा पाऊस पडायला लागला की का कुणास ठाऊक माझं मन द्रवतं, भावुक होतं. मन उचंबळून भावनांचा उद्रेक होतो… नको त्या आठवणी उगाच आपलं डोकं वर काढतात आणि…
‘जिन्हें हम भुलाना चाहे, वोह अक्सर याद आते है’…. अशा बिकट अवस्थेत नेऊन सोडतात.
बरेच महिन्यात तिची काही ख़बरबात कळली नव्हती. जेव्हा ती पुनः पुनः मला जुन्या आठवणी जागृत करून परत जुन्या प्रेमाचे संबंध पुनर्स्थापित करण्याची निष्फळ धडपड करीत होती, तेव्हा मलाच ते हास्यासस्पद वाटून, मीच कटाक्षाने तिला टाळले,तिला दूर केले आणि आम्ही दूरावलो, पण आता उगाचच ‘हे ऋतू’ आठवणींची बरसात करून माझं मन द्रववतायत. पुढे दिवाळीही येईल आणि त्यावेळी मी तिला दिलेल्या ‘भेटींची’ आठवण मला खुणावत राहील. माणसाच्या मनाचं असंच काहीसं विचित्र असतं, जो पर्यंत एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती आपल्या जवळ असते, तेव्हा तिची किंमत आपल्याला कळत नाही, पण जेव्हा आपण त्या गोष्टींना दुरावतो, मुकतो, तेव्हाच त्यांची उणीव भासून खरी किंमत कळते. हा ‘मौसम’ खूप छान आहे, माझा आवडता देखील आहे,पण जर ह्या आठवणी पुन्हा मला छळणार असतील तर त्याचा काय उपयोग, त्या पेक्षा ह्या बहरलेल्या ऋतूंनी तिच्याच जीवनाची कमळे फुलवावी.
तिला सौख्य लाभावे, मला ती बरेच दिवसात दीसली नाही, भेटली नाही, बहुधा आमचं प्रेमाचं नातं संपुष्टात आल्याच्या जाणिवेनी दुखावली जाऊन तिने असा दुरावा केला असावा. पण जिथे कुठे ती असेल तिथे ती सुखात आणि मजेत असावी हीच सदिच्छा……..
…………(०७)
‘आर्किटेक्ट’ ची परीक्षा उत्तम रीतीने ‘मेरिट’ मध्ये पास होऊन मी जे.जे. मधून बाहेर पडलो. मेरिटमध्ये येणे. टॉपला असणे हे आताशा माझ्या अंगवळणीच पडले होते. ‘इंटर’ च्या त्या ‘नामुष्कीच्या वर्षा’ नंतर ह्या पुढे यशाची आणि त्या योगे अहंकाराची हवा डोक्यात जाऊ न देण्याची मी आयुष्यभर खबरदारी घेत आलो आहे. त्यामुळे मेरिट डिग्री असूनही मी ‘लो प्रोफाइल’ ठेऊन चांगल्या फर्म मध्ये, एखाद्या नावाजलेल्या कॅन्सट्रकशन फर्म मध्ये जॉब हवा म्हणून प्रथम ‘मलिक’ कडे आणि नंतर ‘हफिज कॉन्ट्रॅक्टर’ कडे जॉईन झालो…
मन लावून, इमान इतबारे शिक्षणाचे नवीन नवीन धडे गिरवीत राहिलो. माझ्या कल्पना शक्तीने, मेहनतीने यशाची माळ सदैव माझ्या गळ्यात पडत राहिली…
आणि अचानक एके दिवशी मरिन ड्राइव्ह वर बॉस बरोबर ‘रेक्लमेशन’ ला बसलो असतांना, समोरून नेमकं नको त्या व्यक्तीच्या हातात हात घालून हसत खेळत माझ्या पुढ्यातून सुचित्राला जातांना पाहिलं. ती त्याच्या प्रेमात मश्गुल होती, पण त्याचं लक्ष सहज माझ्याकडे गेलं. आणि ह्या संधीचा फायदा घेत, मुद्धाम तिला तो माझ्या पुढ्यात घेऊन आला. कित्येक वर्षाची त्याची ‘ही इच्छा’ आज फळाला आली होती. ‘अजय’ फर्स्ट इयर पासून आमच्या ‘फ्रेंड सर्कल ‘ ला चिकटून असायचा, आम्ही त्याला टाळायचो, पण ‘चिकटू’ प्रवृत्तीचा हा पठ्ठया मुद्धाम आमच्या बरोबर राहाण्याचा प्रयत्न करायचा. पोरींना पटविण्यात तरबेज असलेला हा ‘व्यागाबॉण्ड’ त्यावेळी माझ्यावर जळायचा, माझ्या हुशारी वर आणि मुख्यत्वे करून सुचित्राने त्याला झिडकारले होते आणि ती माझ्या बरोबर होती, त्यामुळे तो त्यावेळी बराच खवळलाही होता…
“एक न एक दिवस मी हिला पटविनच” ही त्यावेळी त्याने जणू भीष्म प्रतिज्ञाच केली होती. सुचित्रालाही त्या वेळी ह्या गोष्टीची माहिती होती. त्यामुळेच आता, बहुधा त्या ‘यशाच्या नशेत’ जाणुन बुजून मला खिजवायला माझ्या समोर, माझ्या पुढ्यात तो तिला घेऊन आला होता. ज्याला झिडकारले होते, त्याच्याच बरोबर आणि त्याच्या हातातील आपला हात न सोडविताच, त्याच हास्य वदनाने, ती माझ्या पुढे आता उभी होती. ‘ज्याचा हात आयुष्यभर, ज्याची साथ आयुष्यभर अगदी सात जन्म सुद्धा सोडणार नव्हती’ खुद्द त्याच्या पुढे तेच ते जीवघेणे हास्य चेहेऱ्यावर ठेवून मला खिजवत उभी होती… ‘निर्लज्ज पणे’…
पण असं म्हणण्याचा आता मला तरी काय अधिकार म्हणा, काळाने मला फटकारलं, तिने साथ सोडली आणि खजील झालेल्या, दुखावलेल्या माझ्या मनानी जर आता तिची साथ सोडलीच असेल, तर आपल्या मनासारखे पुन्हा एकदाच का? हजारो वेळा वागण्याची तिला मुभा आहेचकी. तिचा तो अधिकार सुद्धा असू शकतो. पण सरते शेवटी मी आणि माझ्या मनाने तिला ‘माझी सखी माझी जवळची मैत्रीण’ मानल्यामूळे, आता छदमी हसणाऱ्या आणि मला वाकुली दाखवणाऱ्या ह्या नको त्या ‘राक्षसाच्या’ तावडीत तिने सापडायला नको होतं, असं माझं मन मला सांगत होत. कुठे तरी आक्रोश करीत होतं…
उदासीन होत मी आणि बॉस उठलो, जातांना तिला “टेक केअर, ऑल धी बेस्ट” असं मनापासून म्हटलं… वास्तविक अशा तऱ्हेने माझ्या पुढे नको त्या व्यक्ती बरोबर, नको त्या अवस्थेत येऊन माझ्या मनाला हादरा देऊन दुखावल्या बद्धल तिने निदान ‘सॉरी’ तरी म्हणायाला हवं होतं. अशी माझी माफक इच्छा होती…
‘वक़्त करता जो वफ़ा, आप हमारे होते, हम भी औरोंकी तरहा आप को प्यारे होते’……..
…………(०८)
मला राहून राहून एका गोष्टीचं वाईट वाटत होतं,ज्या ‘अजय’ बद्धल, ज्याच्या चारित्र्या बद्धल, बुद्धीच्या क्षमते बद्धल सुचित्रा ला पूर्ण कल्पना होती, आणि एके काळी ती माझ्याबरोबर असताना तो येता जाता तिची छेड काढायचा म्हणून त्याचा द्वेष करून त्याची अगदी पोलीस स्टेशन पर्यंत कम्प्लेंट करणारी ही मुलगी आज त्याच्याच नादात मला वाकुल्या दाखवत होती. मी तिच्या आयुष्यातून प्रियकर म्हणून बाजूला झाल्यावर ती त्याच्या नादात फसली गेली आहे का?… का आजही त्याला सुद्धा आपल्या तालावर आणि पर्यायाने, मलाही खिजवण्यासाठी सिद्ध झाली आहे का?… हे कळायला मार्ग नव्हता,पण काहीही असले तरी ह्या ना त्या मार्गाने आज अजय जिंकला असल्याचे मला मान्य करावेच लागेल.
स्त्रीचं मन ओळखणे खरोखरीच किती कठिण, किती अवघड आहे ह्याची मला जाणीव झाली. एकदा मी तिला माझी प्रेयसी न मानण्याचे ठरल्यावर ती कोणाबरोबर जाते, काय करते ह्याचे वास्तविक मला काय घेणे देणे? पण तरीही मी तिला माझी मैत्रीण समजतो, मानतो म्हटल्यावर, तीची काळजी वाटणं साहजिकच होतं. आज ती आणखीन कोणाबरोबर जरी मला दिसली असती तरी चाललं असतं, पण… जाऊंदे….
माझ्या ह्या क्षेत्रात माझं चांगलचं बस्तान बसलं होतं, नावाजलेल्या कन्स्ट्रक्शन कंपनी मधील एक नावाजलेला आर्किटेक्ट म्हणून माझी ख्याती होती. मला पैशाची काहीच कमी नव्हती, आता माझं लग्नाचं वय झालंय तेव्हा एखादी सुशिक्षित, शालीन, सुस्वभावी मुलगी पाहून माझं लग्न करण्याचा घरच्यांचा घाट होता. मलाही आताशा आपलं कोणीतरी असावं,आपलं मन जीच्याकडे उघडं करिता येईल, जी आपल्याला समजून घेईल अशा मैत्रिणी वजा बायकोची, एका सहचारिणीची गरज होतीच…
अशातच एके दिवशी सुचित्रा माझ्या ऑफिस मध्ये अजय ला घेऊन आली. ती आणि अजय लग्न करण्याचे फिक्स झाल्याचे सांगून, लवकरच होणाऱ्या त्यांच्या लग्नासाठी मी काही पैशाची मदत तिला करावी अशी तिची अपेक्षा दिसली. मध्यंतरी अजय बद्धल माझ्या जिवलग मित्र नितीन कडूनही माझ्या कानावर बरच काही आलं होतं. अशा व्यसनी आणि ज्याला नोकरीही नाही अशा अजय बरोबर ही लग्नाच्या बोहल्यावर चढायलां सज्ज झालेली पाहून मी मनोमन दुखावलो. लग्नाचे ‘आमिष’ दाखवून अजय तिला फसवतोय, लुबाडतोय ह्याची मला पूर्ण कल्पना होती. म्हणूनच पुढच्या आठवड्यात येऊन मला भेट, मी काही व्यवस्था करतो असे सुचित्रला सूचित करून त्यांना मार्गी लावले…
पुढे, मैत्रीच्या नात्याने कितीही समजावून सांगून सुध्दा ती आपल्या निर्णयावर ठाम होती…
‘जब गीदड़ की मौत आती है तो वह शहर की तरफ भागता है’…
माझ्या कडून तिला कमीत कमी पाच लाख रुपयाची तरी आवश्यकता आणि मदत हवी असल्याचे तिच्या कडून कळले, असे आणखीन किती लोकांकडून अजय च्या आग्रहाखातर तिने पैसे उकळले असतील देव जाणे. बऱ्याच विनंती नंतर हट्टाला पेटून तिने दोन लाखाची तरी मी मदत करावी अशी मला गळ घातली. मैत्री पोटी मी एरव्ही पाच लाख काय, दहा लाख सुध्दा तिला दिले असते पण अजय तिला फसवणारच असं माझं अंतर्मन मला ठाम पणे सांगत होेतं.पण ती हे मान्य करायला तयार नव्हती…
एकेकाळी माझी होऊन माझ्या बाहुपाशात सुःखाने विसावली जाऊ शकणारी ‘माझी सुचित्रा’, काळाच्या ओघात, स्वतःच्या स्वार्थी वागण्याने, स्वतःचीच आणि पर्यायाने माझीही फसवणूक करीत अजय सारख्याला जवळ करण्याचा मूर्खपणा करून, डोळ्यावर हट्टाची पट्टी बांधून दुर्दशेच्या बाहुपाशात झेपावयाला हातात अनिश्चीततेची वरमाला घेऊनआणि डोक्याला नामुष्कीच्या मुंडावळ्या बांधून सज्ज झाली होती…
अशा वेळी एक क्षण माझ्या मनाने आपला अहंकार विसरून, तिने मला दुराव्याच्या खाईत लोटलेले आणि एकांतवासात भोगलेले ते दिवस विसरून आणि जखमेवरची खपली काढून रक्तबंबाळ अंतकरणाने, तिला अजयच्या मार्गावरून दूर होण्यासाठी नकळत मी माझे दोन्ही हात पुढे केले, नजरेत तीच हवी हवीशी वाटणारी, सुचित्राची प्रतिमा जपत तिच्या नजरेत खोलवर पाहिले… पण तिची ती गुर्मी, तो ऍटीट्युड तसाच कायम ठेवत आणि नजर फिरवीत, फक्त माझ्या पैशाचीच मदत स्वीकारीत तिने पाठ फिरवली…
तिच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे रिक्त हस्ताने आणि हरलेल्या माझ्या मनाचे सांत्वन करण्या पलिकडे मला मार्गच दिसत नव्हता…
‘जाने कहाँ गए वोह दिन’……..
…………(०९)
महिन्याभरात आम्ही बहुधा ‘रजिस्टर’ पद्धतीने लग्न करणार आहोत. ह्या बोलीवर पैसे घेऊन ती निघून गेली. जातांना मी त्यांच्या लग्नात जातीने हजर राहावे असा तिचा आग्रह होता. लवकरच सर्व नक्की झाल्यावर ती त्याबद्धल मला कळविणार असल्याचं पण बोलून गेली खरं… पण पुढे काय घडू शकेल ह्या बद्धलचा माझा अंदाज पुढे तसाच शंभर टक्के खरा ठरला…
अजय तिला सोडून,तिच्या कडून जमा केलेल्या पैशावर दुबईला त्याच्या त्या चांडाळ चौकडीत सामील झाला असावा…
माझ्या नावात ‘विजय’ होता, पण सुचित्रा च्या बाबतीत नियतीने विजयाची माळ माझ्या गळ्यात न घालता,मला पराजय पत्करायाला लवला होता.आणि ‘अजय’ चे नाव सार्थकी लावले. सुचित्रा त्याला जिंकू शकली नाही तो ‘अ-जयचं’ राहिला आणि तिला पुरुषांवर कुरघोडी करण्याचा विजय प्राप्त न होता पराभव पत्करायला लागला…
आपण जसं वागतो, जे कर्म करतो त्याची फळं आज ना उद्या आपल्याला भोगावी लागत असतात, त्यातून कोणाचीही सुटका नसावी. मला तिची खरी गरज होती तेव्हा आपल्या सोयीनुसार तिने मला एकाकी सोडलं आणि आता अजयने तिला…
‘जैसेको तैसा मिला’…
आपण एकाध्याचं कितीही भलं करायचं ठरवलं,तरी ‘त्याच्या’ कर्मावर आपला अधिकार नसल्याने, त्याच्या कर्मा प्रमाणेच त्याला तशी गती प्राप्त होत असते. खराब वेळ आयुष्यात यायची असेल तर माणसाला तशीच बुध्दी सुद्धा होत असावी… तसं नसतं तर तिच्या पुढील आयुष्यात अजयमुळे दुःख पदरी पडू नये म्हणून प्रेमापोटी माझा निर्णय बदलून मी मदतीचा हात पुढे केला होताचकी…
पुढे माझ्या घरच्यांचा असलेला आग्रह आणि मला हवी असलेली शांत, सुशील, सुस्वभावी अशी सहचारिणी इतक्या लवकर माझ्या आयुष्यात येईल असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं…
एकीकडे सुचित्रा वर एकटे जगण्याची पाळी आली होती,त्याच वेळी माझं लग्न जुळून मला सहचारिणी मिळावी हा खेळ ‘नियतीने’ घडवून, बहुधा एकटे पणाची झळ काय असते ते तिला दाखवलं असावं. वेळे अभावी मी तिला माझ्या लग्नाचे ‘आग्रहाचे आमंत्रण’ नितीन तर्फे दिलं खरं… पण ती आली नाही. आणि आपण आजारी आहोत हा निरोप मात्र तिने मला धाडला. खरंच ती आजारी असेल असं वाटून मी आमच्या लग्नाच्या ‘दुसऱ्याच’ दिवशी तिच्या राहत्या घरी गेलो. ती आजारी नव्हती. पण अपराधीपणाची सल आणि त्यामुळे तिचं मन तिला खात असावं… नाहीतरी कोणत्या तोंडाने माझ्या लग्नाला ती आली असती म्हणा…
पुढे माझं लग्न झालेलं असूनही मी सुचित्रा ला एकटे पणा फार जाणवतोय हे तिच्याच कडून कळल्यामुळे मधे मधे मैत्रीच्या नात्याने तिला भेटायला जात असे.
सुलभाचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता… लग्नाआधी सुलभाला ‘कॉन्फिडन्स’ मध्ये घेऊन माझ्या आणि सुचित्रामधे असलेल्या मैत्री बद्धल, मी कल्पना दिली होती…
तरीसुद्धा आपण तिची मानसिक प्रतारणा तर करीत नाहीना असं माझ्या मनात येऊन त्यावेळी मला अपराधी असल्या सारखं वाटायचं…
लग्नानंतर थोड्याच वर्षात मला कळून चुकलं की जे काय म्हणून आपल्या आयुष्यात घडतं ते आपल्या चांगल्या साठीच घडत असावं. परमेश्वराची तशी योजनाच असावी. त्या वेळी आपल्याला ते ‘अघटीत’ वाटलं तरी पुढील आयुष्य सुखात जाण्या साठीच ईश्वराने ती योजना आखलेली असावी. त्या वेळी सुचित्रा दुरावली खरी पण परमेश्वराने माझ्यावर दया दाखवून, स्वभावाने अत्यंत शांत, सुशील, सोशिक, समजूतदार आणि सुस्वभावी अशी “सुलभा”… सुलभपणे माझ्या पदरात टाकली. आज सुलभा फारशी शिकलेली नसली तरीपण तिला जाण खूप चांगली आहे.
समजुतदारपणा, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची तिची कला, तिची नम्रता, वाखाणण्याजोगी आहे. आज वडिलकीच्या माणसांना जो मानसन्मान सुलभा देते, आणि माझ्या आई बाबांची काळजी घेते. तो मान, आणि त्यांची कदर, ‘सुचित्रा’ ने कितपत केली असती ह्याबद्दल मी आजही साशंक आहे…
त्यावेळी मी नापास व्हायला नको होत अस आजही मला वाटत असलं तरी ‘अपयश हीच यशाची पहिली पायरी’ ह्या नात्याने जे वैभव,जे सुख आणि जो मान आज मला समाजात आहे त्याबद्दल त्या कर्त्याकरवीत्याचा मी आभारी आणि दिलगीर आहेच. आता ‘सुलभा’ माझी सहचारिणी आहे आणि शिवाय मैत्रीण बनूनही आता हृदयाच्या दोन कप्प्यातील रिकामा राहिलेला एक कप्पा बनून माझ्या संपूर्ण आयुष्याची धडपड आणि धडधड एका तालात, एका सुरात ठेवत आणि माझ्या जीवनातील माझं जे काही चुकीचं, खराब आणि अशुद्ध वागणं आहे ते वाहून नेणारी माझ्या हृदयातील ‘नीलाच’ ठरली आहे……..
…………(१०)
आजतरी मला आठवणींच्या ह्या गुंत्यातून बाहेर पडणं कठिण होतं. कोळ्याच्या विणलेल्या जाळ्यात अडकलेल्या किटकाने, सुटकेसाठी जीवाचा आकांत करतांना, जसा तो त्यात आणखीनच गुंतत जातो, तसं माझं मन आठवणीच्या जाळ्यात गुरफटलं जात होतं. बाहेर अमावास्येचा आणि मनात आठवणींचा काळोख दाटून आला होता. ‘शूक्रा’ पाठोपाठ ‘गुरू’ ग्रह सुद्धा क्षितिजाच्या पलिकडे केव्हाच निघून गेला होता. मी समुद्रावरून परतून, आता आमच्या ‘जुहूच्या’ ह्या बंगल्याच्या कॉरिडॉरमधे येऊन इझीचेअर वर लवंडलो खरा, पण बसतांना मागील भिंतीवरील कॅलेंडरच्या आजच्या ‘२३ मे, शनिवार’. ह्या तारखेने मन अधिकच गढूळ झालं, डोळ्यापुढे अंधारी दाटून आली……ह्याच तारखेने ह्या आधी दोन वेळा माझा घात केला होता… ह्याच तारखेचा हा वार ‘शनिवार’ माझा घातवार ठरला आहे. ‘पहिल्यांदा… दिनांक २३ मे १९७०, ‘इंटरसायन्सने’ आयुष्याला कलाटणी दिली. त्यानंतर, २३ मे २०१५ ला शनिवारी ‘सुलभा’ गेली. आणि पुन्हा आजही ‘शनिवार’ आहे. दिनांक २३ मे २०२०’…
मन हलकं करण्यासाठी मी टेप रेकॉर्डर वर मुकेशची कॅसेट लावली… ‘कही दूर जब दिन ढल जाये…’ चे सुर कानात घुमत होते… ‘कोई सपनोंके दीप जलाऐ…’ ही आशाही आताशा मंदावली होती.
किनाऱ्यापासून ते लांब क्षितिजावर नजर जाईल तितके डोळ्यात टीपायचा प्रयत्न करीत होतो. आई ची मायाळू नजर, बाबांच्या नजरेतली जरब, सुलभाच्या नजरेतली ओढ, मला भेटायला उत्सुक असलेल्या मंगेश आणि दुर्गेशच्या त्यांच्या लहानपणींच्या आपले दोन्ही हात पसरून माझ्याकडे झेपावणाऱ्या बालमूर्ती. सर्व काही त्या काळोखाच्या पार्श्वभूमीवर मला स्पष्ट दिसत होते. लहानपणा पासून ते आजवर घडलेल्या सर्व घटनांचा चलत चित्रपट नजरेसमोर झळाळत होता. आज ‘अमावास्या’ त्यामुळे वर काळोख्या अवकाशात विधात्याने काढलेली रांगोळी मनाला लुभावत होती. त्या रांगोळीत माझ्या मनाला लुभावणाऱ्या माझ्या ‘सहचारिणीचे’ ते दिवाळीतील नऊ वारी साडीतील, नाकी नथ घालून, चांदीच्या तबकामधील निरांजनाच्या प्रकाशातील गोड, लोभस, मोहक रुप मला ओवाळायला अधीर झाल्याचे पाहून क्षणभर मनाला हेलावून गेलं. सौभाग्याचं लेण घेऊन आता माझी आतुरतेने वाट पाहताना तिला पाहून माझ्या नयनांच्या दोन निरांजनातील मोत्यांमध्ये ‘सुलभा’ ची हसतमुख मूर्ती मला खुणावत होती…
दिवाळीच्या दिवसातच नव्हे, तर प्रत्येक सणासुदीला दरवाज्याबाहेर ती प्रत्येक वेळी नवीन नवीन डिझाईन्स ची अतिशय सुंदर, रेखीव रांगोळी काढायची. आणि त्यावरील कलाबुतीत ती माझच नाव कोरायचा प्रयत्न करायची… आज देखील माझंच नाव तिच्या ओठावर असावं…
मी कामात सदैव मग्न असायचो,कामानिमित्त बऱ्याच वेळा मुंबईबाहेर आणि परदेशात देखील जावं लागायचं,पण मुलांचा अभ्यास घेणं, त्यांना शाळेला आणि पुढे कॉलेज जीवनात लागणारी सर्व मदत,त्यांचा अभ्यास, त्यांचं संगोपन,आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी तिने आपल्याच शिरावर घेतली होती. अगदी त्यांची लग्नही सुरळीत पार पाडून परदेशी त्यांचे संसारही थाटात मांडून दिले. वडीलकीच्या नात्याने मी सर्व घर चालवीत होतो, पण खरंतर, तिच त्यांची आई आणि वडील देखील होती. संसारात मी त्यांना काहीही कमी पडू दिलं नाही असं म्हणण्यापेक्षा, आई बाबांच्या आशीर्वादाने, आणि परमेश्वराच्या कृपेने, माझ्या लग्नानंतर ‘सुलभाचा’ पायगुणच माझ्या उत्कर्षाला आणि भरभराटीला ‘जोडीला ‘ होता अस आईचं म्हणणं होतं…
घरची लक्ष्मी सुखी असेल तर ‘श्रीलक्ष्मी’ सुध्दा तिच्याबरोबर घरात नांदते, हे आईचे म्हणणे आयुष्यभर खरे ठरले… आणि पटले सुद्धा…
आता, सध्या मुले स्टेट्सला मला प्रेमाने बोलावीत असताना सुद्धा तिकडे जाण्यापेक्षा, त्यांच्या आईने उभारलेल्या आणि ज्यात माझे आई बाबा सुखात नांदले त्या ‘आनंदी’ वास्तू मधून बाहेर पडायला माझं मन मात्र तयार होत नाही.
‘जिना यहाँ, मरना यहाँ, इसके सीवा जाना कहां’ …
“थोड्या वेळाने घेतलंत तरी चालेल, पण झोपायच्या आधी फ्रिज मध्ये ठेवलेलं दूध न विसरता घ्या” असं आग्रहाने सांगून ‘लिलू मावशी’ आपल्या रूम मध्ये झोपायला गेल्या…
गेली कित्येक वर्षे त्यांनी आमचे घर सांभाळले असले तरी… ह्या घडीला मात्र मी ‘एकटाच’ ह्या बंगल्यात गतःकालाच्या आठवणीत रमलोय…
मुकेशच्या दर्दभरी सुरावटिनवर मन झुलतय. समोर आकाशात सुलभाच्या रांगोळीला ओलांडून एक टिटवी आपल्याच नादात उडत जातांना दिसली… आणि समोर सुचित्राची तीच मनाला खुलवणारी, घायाळ करणारी, जीवघेणी नजर चौफेर माझ्या मनाचा वेध घेऊ लागली.
हृदयात हलकीशी कळ उठली आणि समुद्राकडून त्या घोंघावत्या वाऱ्याबरोबर ‘सुचित्रा’ माझ्याकडे धाव्वत येत असलेली पाहून मी उठण्याचा निष्फळ प्रयत्न केला. मला आवडणाऱ्या आणि माझ्या लग्नाचे ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून मी स्वतः तीला दिलेल्या ‘मोतिया कलर’ ची साडी तिने परिधान केली होती. “एकदा तरी ही साडी नेसून माझ्या घरी ये” ह्या माझ्या विनंतीला आज तिने मान दिला होता…
आज कित्येक वर्षानंतर का होईना माझ्या जवळ येत तिने स्वतःहून माझा हात हातात घेत ‘अस्पष्ट’ पणें मला “सॉरी” म्हटलं आणि तिला माफ करायच्या प्रयत्नात उठत असतानाच, मी तसाच इझीचेअर खाली कोसळलो……..
❣️”समाप्त”❣️
***********************
