
– अनंत नारायण संझगिरी
🙏🏻*मनोगत*🙏🏻
मित्रहो ……
ह्यापूर्वी कथा क्रमांक (१) मधे, “आठवणीतील मुकेशची गाणी” हे सदर पाठवून त्यात कथानायक “यश” च्या त्या त्या वेळच्या मनःस्तिथीत, त्याला आठवलेली आणि त्याच्या नायिकेला आवडणारा गायक “मुकेश”ची काही ‘सोलो गाणी’ पाठविली होती.
कथा क्रमांक (२) मधे, त्याची ‘नायिका’ त्या वेळी, ज्या ज्या मनःस्तिथीत होती, त्यावेळी तिला आठवलेली, “तिच्या आठवणीतील गाणी” ह्या सदरात ‘हिंदी मिक्स गाणी’ कथा रुपात पाठविली होती.
आता कथा क्रमांक (३)…
ह्या सदरात “आमच्या आठवणीतील गाणी“ पुन्हा एकदा नवीन कथेतून पाठवीत आहे. ह्यावेळी ही सर्व गाणी ‘मराठी चित्रपटातील गीते तसेच काही भावगीते’ देखील आहेत. आपण ती ‘संग्रही’ ठेऊन ऐकल्यास जास्त आनंद मिळेल अशी आशा वाटते. ह्या माझ्या प्रयत्नात बऱ्याच त्रुटी असू शकतील. आपण त्या मला पाठविल्यास मी आपला आभारी असेन.
***********************
…………(०१)
‘विशुकाका’ वाट बघत असतील ह्या विचारानी मी गाडीचा स्पीड वाढवला. खरंतर सात वाजेपर्यंत मी पोहोचीन असं त्यांना म्हटलं होतं. मलाही तसंच वाटलं होतं. आज सात वाजून दहा मिनिटांनी सूर्यास्त होईल, तो घरातूनच पहावा ह्या हिशोबाने तसे ठरवून निघायचे होते. पण निघायलाच उशीर झाला. आयुष्यात आतापर्यंत कोणालाही दिलेला शब्द, आणि वेळ शक्यतो पाळायचा मी कसोशीने प्रयत्न करीत आलोय. आत्ता बराच पुढे आलो असलो, तरी इथेच सात वाजून गेले आणि अजून तास भराचा तरी प्रवास बाकी आहे. आणि त्यात ही पुढची नागमोडी वळणे आणि मनात उठणारे वेडेवाकडे तरंग.
आपण ठरवतो तसं प्रत्येक वेळी घडलंच पाहिजे असा माझ्या मनाचा माझ्या उमेदीच्या काळात असलेला अट्टाहास काळाच्या ओघात आताशा जवळ जवळ नाहीसा होत चालला होता. आता ते शक्यच नाही म्हणा,तरी काहीही करून “ती” मला दिसेल, भेटेल ह्या एकाच आशेवर मनाचा तसा कौल घेऊन, पोट तिडकेने, गेले आठ महिन्यात जे शक्यच वाटत नव्हतं, ते घडणार आहे, ह्या प्रबळ आशेने आणि जीवाचा अट्टाहास करीत, आणि “ह्या गावात मी पुन्हा पाऊल टाकणार नाही” ह्या माझ्या निर्णयाला बगल देऊन, ‘मरणाच्या ओढीने’ पुन्हा विशुकाकांना भेटायला म्हणून गावी निघालोय…..
बऱ्याच गोष्टी ‘आपल्या’ हातात असतात पण काही गोष्टींवर, घटनांवर आपला अधिकार चालत नाही आणि मग जे घडेल, जसं घडेल ते आपल्याला मान्य केल्याशिवाय गत्यंतरच राहत नाही. तसं पाहता त्या विधात्याने ‘कर्माच्या गतीची’ बेडी माणसाच्या हाती दिली खरं, पण त्याच्या ‘भाग्याची वेसण’ नियतीच्या नाकी राखून त्याचे आयुष्य बहुदा कठपुतलीच्या बाहुल्यां प्रमाणे, तो मजेत आपल्या स्वतःच्या तालावर ‘आम्हा माणसाच्या जीवनाचा खेळ करीत’ स्वतःच्याच खेळीने आम्हाला नाचवीत असावा……..
…………(०२)
आमचे घर येण्याआधी तिच्या घराजवळ नेहमी प्रमाणेच मी ‘डबल हॉर्न’ दिला… पण व्यर्थ.
गेटपाशी विशुकाका वाटच पाहत होते. तसा दीड तास लेटच मी पोहोचलो होतो. पोर्च च्या बाजूला गॅरेज ला गाडी लावली. बिचारे वाट पाहून कंटाळले असावेत. पण चेहेऱ्यावर बिलकुल नाराजी दिसली नाही. पण टाइमाचा पक्का असलेला मी आज असा लेट झालेला पाहून ते काळजी करीत होते हे त्यांच्या बोलण्यातून जाणवले.
जेवण आटपे पर्यंत दहा वाजले. उद्या अमावास्या, आजची चतुर्दशी त्यामुळे चौदा पावणे साढे दहाची पूर्ण भरती. त्यामुळे बंगल्याच्या पश्चिमे कडील मागील बाजूस, वाडीच्या खाली बांधा पर्यंत समुद्राचे पाणी येऊन फेंसिंगवॉलशी शिवाशिवीचा खेळ खेळत होते. घरा मागे असलेल्या नारळाच्या आणि पोफळीच्या झाडाच्या झावळ्या समुद्राकडून जोरदार येणाऱ्या वाऱ्या मुळे एकमेकांना आलिंगन देत होत्या.उंबरठ्यावर उभ्यानेच समोरील अथांग सागरावरील दूरवर मावळतीला आलेला, एरव्ही स्फटिका प्रमाणे पण काहीसा पिवळसर भासणारा ‘गुरू’ आता तांबूस झालरीत त्याच्या वरती थोड्याच अंतरावर असणाऱ्या त्या लालसर ‘मंगळालाही’ काहीसा खुणावत क्षितिज्यावरून दिसेनासा होईपर्यंत पाहण्यात अकरा कधी वाजले ते कळलेच नाही. ह्या अश्या ग्रह ताऱ्यांच्या लपंडावाचे मला लहानपणापासूनच वेड आहे. ‘गुरू मंगळ युती’ माझ्या आयुष्यात मला फारशी काही लाभलेली नाही. काकांनी नेहमी प्रमाणेच माझी रॉकिंग चेअर उतरणी वरील गार्डन मध्ये झोपाळ्याच्या बाजूला लॉन वर ‘सी फेसिंग’ लावली. रात्रीच्या वेळी समुद्राची गाज ऐकत, त्या अथांग सागराला आणि त्याच्यावरच्या त्या चांदण्यांच्या रुपेरी चादरी ला न्याहाळत जुन्या गाण्यांच्या कॅसेट ऐकण्यात एक वेगळीच धुंदी मी अनुभवत आलो आहे.जुन्या चित्रपटातील मधुर गाणी, भावगीतं, कधी कधी शास्त्रीय गीतं ऐकण्यात मी तासंतास घालविले आहेत.
बऱ्याच महिन्यांनी आज माझे इथे येणे झाले होते. काकांनाही बरं वाटलं होतं. बंगल्याची आणि वाडीची देखभाल त्यांच्याशी माझं रक्ताचं नात नसूनही, ते माझे सख्खे काका असल्यागत करीत होते.
मला जेवणानंतर काहीतरी गोड खायला हवंच असतं, म्हणून माझ्या आवडीचा खरवस तोही हळदीच्या पानात आणि गुळाचा, त्यांनी आज मुद्धाम केला होता. खाऊन झाल्यावर मी लॉन वर येऊन चेअर वर विसावलो. जवळच्या रातराणीचा घमघमाट नाकाच्या शेंड्याला स्पर्शून मोहरुन गेला.
आता ओहटीला सुरवात झाल्याने वारा मंदावला होता. समुद्राच्या परतीच्या वाटेने निघालेल्या ओहोटीच्या लाटा माझ्या माथ्याशी मात्र गतःकालाच्या आठवणींच्या रूपात थडकत होत्या, आयुष्याला लागलेल्या ओहोटीच्या जलाशयात मन हिंदकळत होते. आणि आधाराला ‘तिच्या’ आठवणींचा ओंडका भिजलेल्या डोळ्यासमोर जवळच तरंगताना दिसला……..
…………(०३)
रॉकिंग चेअरला मागे हात लावून ती थांबविली गेली तसा मी तंद्रीतून जागा झालो. मी बराच वेळ झोपायला आलो नाही आणि रात्रीचा दीड वाजायला आलेला पाहून विशुकाका स्वतः मला बोलवायला आले होते.खरतरं समोर अथांग सागर आणि वर निरभ्र आकाशाचे अस्तर ह्यांच्या अशा बेमीसाल सानिध्यात शांत पडून राहायला मला नेहमीच आवडत आले आहे. पण काकांचा आग्रह त्यामुळे नाईलाजास्तव उठून घरात झोपायला यावे लागले. काकांनी आवरा आवर केली आणि ते सुध्दा बाजूच्या ‘आउट हाऊस’ मध्ये झोपायला गेले. मी बिछान्यावर आडवा झालो.
काकांसाठी तसं पाहता घरातील ईशान्य बाजूच्या खोलीत ‘जनरल बेड’ मध्ये त्यांची सोय केलेली आहे. ती खोली त्यांनाच म्हणून दिलेली आहे. संबंध दिवस ते तिथेच वावरतात पण गेले सहा महिने मी इथे आलो नाही तरी सुध्दा रात्री मात्र त्यांच्या ‘ह्या खोलीत’ ते न झोपता बाहेरच्या नैऋत्ये कडच्या ‘आऊट हाऊस’ मध्येच झोपतात. रात्री त्यांच्या खोलीत हल्ली त्यांना झोप लागत नाही असे त्यांचे म्हणणे होते. कारण काहीही असो मला ते पटण्यासारखे नव्हते.हे सगळे आपल्या मनाचेच खेळ असतात. आता मनातले विचार काढून टाकून मी शांत पणे झोपायचा प्रयत्न करू लागलो. पण डोळ्याला डोळा लागायला तयार नव्हता.मुंबईला असताना सुध्दा रात्री कधी कधी झोप येत नसे, पण आज मात्र मनावर उगाच दडपण जाणवायला लागलं.
“शालन” च्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला…..
तिला जाऊन जवळ जवळ आठ महिने होत आले, पण असा एकही दिवस त्या नंतर गेला नाही की मला तिची आठवण आली नाही. तिचा तो सततचा हसरा चेहेरा आणि गालावर पडणारी खळी. ते बोलके निळसर घारे डोळे सतत माझा पाठ पुरवठा करीत आले आहेत. ती असताना सुध्दा तिच्या वाचून कधी चैन पडले नाही आणि आता तर ते शक्यच नाही. तेव्हाही आणि आजही ती सतत माझ्या बरोबर असावी असं जर मला वाटतं आलंय तर त्यात गैर ते काय? पण नियतीलाच ते मान्य नसावे. सुदैवाने ती माझ्या जीवनात आली तेव्हा माझ्या सारखा भाग्यवान मीच असं मी समझायचो आणि ते खरंही होतं. त्यावेळी तिच्यावर जीव टाकणारे ह्या गावातही काही कमी नव्हते. पण सगळ्या गोष्टी माझ्याच मनासारख्या व्हाव्या हे वरच्याला मान्य नसावे. आयुष्यात नेहमीच वसंत ऋतू थोडाच असणार आहे. पानगळ ही होणारच.एकेकाळी आम्हा प्रेमिकांची जुळलेली मने, एकत्र गायिलेली प्रेमगीते, केलेले प्रणयाराधन. कालांतराने हा प्रेमाचा मोहोर विरहाच्या झोक्याने गळून पडला. प्रेमाच्या ह्या फुललेल्या फुलांचे कोमेजून, काळवंडून, गंधहीन निर्माल्य झाले. मनाच्या जुळलेल्या तारांनी सजलेली मैफल पुढे पुढे बेसूरी होऊन बरखास्त झाली. ईश्वराला आमचे आयुष्यभर एकत्र येणे तसे मान्यच नव्हते म्हणूनच आमची ताटातूट झाली. तिचा विचार पाठ सोडायला तयार नव्हता आणि डोळ्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.तिचा सहवास असता तर आज हे आयुष्य असे निरस झाले नसते……..
…………(०४)
शालन च्या आठवणी शिवाय मला काहीच सुचत नव्हते, तिच्या वीचारांनि असा पीछा पुरविला असतानाच घड्याळाच्या काट्याने सरसावत तीन ठोळे दिले, आणि पाठोपाठ धडाम करून मोठ्ठा आवाज झाला आणि मी दचकलो. अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. हा आवाज नक्की आमच्याच वाडीतील घराच्या उजवीकडील ईशान्य कोपऱ्याकडील काकांच्या रूम च्या बाजूला असलेल्या विहीरी कडून आल्याचे माझ्या लक्षात येताच माझ्या छातीत धस्स झाले. ह्या अश्या भयाण आणि शांत रात्रीच्या वेळेस विहिरीत कोणीतरी उडी टाकावी असा आलेला आवाज शालन च्या आठवणींनी जीवाचे पाणी पाणी करून गेला. त्यात त्या कुत्र्याचे ते केविलवाणे रडणे. मला निधड्या छातीचा समजणारे माझे सखे सोयरे आत्ताची माझी अवस्था बघून माझ्यावर हसले असते. डोळ्यात अश्रू आणि भीती ह्यांची एकाच वेळी झालेली युती माझ्या काळजाचा ठोका चुकूवून गेली….
तिच्याच विचारात रात्र उलटून पहाट होता होता माझा डोळा लागला……….
सकाळी उठायला बराच उशीर झाला.काकांनी मला डिस्टर्ब न करताच वाडीतील साफसफाईचे, शिपण्याचे वैगेरे कामे उरकून घेतली होती. मी झोपलेला पाहून त्यांनी चहा सुध्दा घेतला नसावा. तसं पाहता आउटहाऊस मध्ये छोटी कीचन ची सोयही आहे पण मी इथे असतांना ते कधी एकट्याने चहा प्यायचे नाहीत.
आम्ही चहा घेत ओसरीवरच्या झोपाळ्यावर असतांना रात्रीचा मला आलेला अनुभव त्यांना सांगावा का? ह्या विचारात असताना त्यांनीच मला झोप व्यवस्थित लागली नसावी हे ताडले आणि “झोप न लागण्याचे काही विशेष कारण आहे का?” असे विचारलेही. रात्रीचा अनुभव ही प्रत्यक्ष घटना की मला झालेला भास आणि माझ्या मनाचाच खेळ? ह्या विचारांनी मी उत्तर टाळले. पण त्या विचारांनी पुन्हा अंगावर काटा उभा राहिला. मनाला उगाचच तिची उणीव भासली….
आज काकांनी जेवणाचा मस्त बेत आखला होता. बऱ्याच महिन्यांनी मी येतोय म्हटल्यावर अगोदरच त्यांनी माझ्या आवडीचे भाजाणीचे वड्याचे पीठ आणून ठेवले होते आणि आज, बाजूच्या नितीन ला अगोदरच सांगितल्या मुळे त्यांनी सकाळीच फ्रेश मटण सुध्दा आणून दिले होते.
रात्रीची उरलेली झोप मी दुपारी भरून काढली.
नैऋत्येकडील माझ्या मास्टरबेड मधील खिडकीतून मावळतीच्या सूर्याचे दर्शनही उत्तम होत असते.पण काल चुकलेला संध्याकाळचा सूर्यास्त आज मी मागील गार्डनमधील झोपाळ्यावर बसून पहायचे ठरविलें.
झोपाळ्यावर बसलो मात्र, आईची जबरदस्त आठवण आली आणि शालन घरी आली की आई मुद्धाम तिला आवडणारं माणिक ताईंचं ते गाणं माझ्यासाठी म्हणून गायला सांगायची. आज मात्र मी एकटाच, दोघींच्या आठवणी दोन्ही मुठीत साठवून त्या हिंदोळ्याच्या दोन्ही कड्यांना घट्ट पकडून गतकालच्या मायेचा उबदार स्पर्श पुन्हा अनुभवायला आतुर होऊन झुलू पाहत होतो……..
…………(०५)
आठवणींच्या हिंदोळ्यावर प्रत्येक झोक्या सरशी माझे मन त्या अवकाशाला माथे टेकवून परत खाली येताना त्या अथांग सागराला पदस्पर्श करता येतो का ते आजमावत होते आणि मनात परमेश्वराच्या अदभूत लिलेच्या महिमेचे तरंग उठत होते.
दूरवर दिसणाऱ्या बोटींच्या मध्ये पिवळसर नारिंगी रंगातील मोठ्ठाला भासणारा तो सूर्य मला लहानमुलांनी शालेय चित्रकलेत काढलेल्या देखाव्याची आठवण करून देत होता.
काय पण ह्या ‘विधात्याची लीला’ पहा, रोज ह्या सूर्याने उगवायचे आणि ठराविक वेळेला मावळायचे, उगवता उगवता सुखदुःखाच्या नाण्यांची ‘आपल्यावर’ खैरात करायची, कधी सुखाचं नाणं हाती लागून तो दिवस आपण मजेत घालवायचा, तर कधी दुःखाचं नाणं हाती लागल्याने एखादा दिवस कष्टात. ह्या सागराला सुध्दा त्याने कामाला लावलं आहे.सहा तास किनाऱ्यापर्यंत फेरफटका मारून तेथिल वाळूच्या साम्राज्याला भोज्या करून, तसेच परत फिरून पळत पळत सहा तास मागे जात हा पाठशिवणीचा खेळ निरंतर चालू ठेवायचा…… ताऱ्यांची, नक्षत्रांचीही तीच गत, फिरतायत आपले मजेत गोल गोल एकमेकांचा हात हातात घेऊन ‘रिंगा रिंगा रोजेस’ म्हणत. चंद्रही असाच ह्या धरतीच्या प्रेमात बुडून तिच्या आलिंगनासाठी तिच्या भोवती घुटमळतोय आणि ती मात्र स्वतःमध्ये मग्न गोल गोल गिरक्या घेत त्या सूर्याच्या प्रेमात,त्याच्या नादात फिरते आहे त्याच्या भोवती अगतिक होऊन, अगदी अनादी काळा पासून. कोणा कोणाला म्हणून ‘त्या विधात्याने’ सोडले नाही. नियतीनेही आपल्याला कर्माच्या आणि भाग्याच्या गणितात असेच ‘जन्म मृत्यूच्या’ फेऱ्यात जन्मोजन्मी ‘मोहाच्या’ आकर्षण शक्तीच्या जोरावर फिरवीत ठेवले आहे.हा मोहच आपल्याला त्या अगाध, असीम, अनंता पासून दूर ठेवीत आला आहे.
समुद्रावरून उडत येणाऱ्या टिटवीच्या केविलवाण्या ओरडण्याच्या आवाजाने मी विचारातून बाहेर आलो.
सूर्यास्त होऊन निशेने अवकाशावरील लालिमेची रंगीत शाल बदलून तिच्या पसंतीची काळपट चादर लपेटायला सुरवात केली होती.
अश्या ‘तिन्ही सांजेच्या’ कातर वेळेला ‘सटविचा’ फेरा असतो. ‘बाहेरची बाधा’ होण्याची शक्यता असते असे म्हणतात.अश्यावेळी बाहेर समुद्रावर न राहता घरात येऊन देवापुढे शुभंकरोती म्हणण्याची आईची शिस्त ‘लहानपणी’ मी पाळायचो. माझ्या वयाचे मित्र अश्या संध्यासमयी काळोख पडल्यावर समुद्रावर यायला घाबरायचे पण काळोखाची मला कधीच भीती वाटली नाही. आता काकांनाही मी असा इथे येऊन ‘एकटा’ बसतो हे आवडत नाही. पण आजही तिन्ही सांजेला समुद्राकाठी बसायला मला मात्र आवडते. ह्याचे मुख्य कारण शालन बरोबर किनाऱ्या वरील ह्या केतकीच्या वना समोर ‘ह्या’ आमच्या नेहमीच्या थोड्या उंचावरील खडकावर आम्ही पाण्यात पाय सोडून बसलेले असताना, आमच्या आवडीचे ते लतादीदींचे गाणे माझ्या आग्रहाखातर, आपल्या गोड आवाजात ती गायची…..
आजही त्या गाण्याचे अवीट सूर माझ्या कानात रुंजी घालतायत..
शालन शेवटी शेवटी माझ्या सारखीच अशी ‘एकटी’ होती. मी तिला भेटावं,तिच्याशी बोलावं तिला जवळ करावं, पुन्हा तिच्या आयुष्यात बहर यावा ह्या आशेवर आणि शेवटी अश्या विचारांनी थकलेली, जीवाला कंटाळलेली ती बिचारी माझ्या साठी आपल्या जीवाचं रान करून सगळ्यावर पाणी फिरवून निघून गेली……..
…………(०६)
आज अमावास्या,काळोखी रात्र त्यामुळे विधात्याने अवकाशाच्या पटावर रेखांकित केलेली ताऱ्यांची रांगोळी आता आकार घेऊ लागल्याचे स्पष्ट दिसत होते.वर डोक्यावर साधारण शुभ्र मोतीया कलरचा ‘गुरू’ ग्रह सुध्दा दिसत होता. आणि त्याच्या वर जवळच तांबूस वर्णीय ‘मंगळ’ ही आपली उपस्थिती जाणवू लागला होता. मला ह्या गुरू ग्रहाबद्धल विशेष प्रेम आहे.
काकांनी जेवणासाठी साद घातली तसा विचारांचा गुंता तसाच बाजूला सारून मी घरात आलो. दुपारचे जेवण खूपच हेवी झाल्याने मी फक्त दोन वेलची केळी आणि कपभर दूधच घेणार होतो.त्यांना तसे सांगितले सुध्दा होते.
“काका आटोपल्यावर तुम्ही निवांत झोपा,माझी काळजी करू नका” असे सांगून मी व्हरांड्याला फेरी मारून बगिच्यात झोपाळ्यावर येऊन बसलो. थोड्या वेळांनी काकांनी सर्व आटपून मागच्या दरवाज्याला बाहेरून कडी घालून ते सुद्धा गप्पा मारायला आले. येतांना नंदादीपात पुरेसे तेल घालायला ते विसरले नसावे. हा नंदादीप सदैव तेवत ठेवायची माझी आज्ञा ते जपत असत.गावातल्या आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारून ते झोपायला निघाले तेव्हा मलाही “लवकर झोप,कालचे जागरण झाले आहे” हे सांगून ते निघाले…
‘विश्वास’ आणि ‘अनंत’ ह्या दोघा कामेरकर बंधूंचा आणि आमचा पहिल्यापासूनचा घरोबा.तसे ते सुखवस्तू आहेत. विशुकाका हे वयाने अंतुकाकांपेक्षा आणि माझ्या वाडीलांपेक्षा आठ ते दहा वर्षांनी मोठे आहेत. आणि अविवाहित असून आमच्या कडेच पहिल्यापासून कामाला आहेत.त्यांना बहीण नसल्याने माझ्या आईलाच ते बहीण मानायचे. शालन त्यांची एकुलती एक पुतणी, अंतुकाकांपेक्षा त्यांचाच तिच्यावर जीव होता.
शालन होतीच तशी लाखात एक, स्वभावाने आणि दिसायलाही फारच उत्तम, कोणीही जीव लावावा अशी. उगीच नाही मला ती आवडायची. आणि परमेश्वराच्या कृपेने मी सुद्धा तिला तितकाच आवडायचो.
तिची प्रकर्षाने आठवण झाली आणि बाजूच्या आंब्याच्या झाडावर फड फड झाल्याने मी उठून झाडाजवळ जाऊन पाहिले. बॅटरीच्या झोतात पटकन दोन डोळे चमकताना दिसले आणि मी चक्रावलो. कधी नाही ते एक ‘घुबड’ कुठूनसे येऊन बसले होते. एरव्ही अपशकुन वैगेरे काही न मानणारा मी आज मात्र मनातून थोडा चरकलोच . ‘बसेना का ते तिथे’ असा विचार करून येऊन चेअर वर बसलो. रॉकिंग करताना माझ्या लक्षात आले ‘झोपाळा तसा अजूनही कोणी बसल्यावर हलवतात तसाच हलत होता’. मी चरकलो,मी मगाशीच उठून आंब्याकडे गेलो असताना,तो अजूनही तसाच कसा हलतोय? मी उठून तो थांबविला आणि त्यावर बसून हलकेसे झोके घेऊ लागलो….
माणसाचे मन कसं विचित्र असतं पहा, एकदा त्याने शंका घेतली किव्वा घाबरलं की पुढे त्याची शृंखला तयार होऊन त्याची सारासार विचार करण्याची वाट वाकडी करत जातं.घुबडाचा विचार मनातून जात नव्हता कित्येक वर्षे ह्या आमच्या वाडीत सर्व प्रकारचे पक्षी ह्या वेग वेगळ्या झाडांवर बघितले पण ह्याला आजच पहात होतो.
टेप रेकॉर्डर पुन्हा चालू करून गाणी ऐकत असतांना अचानक ‘माझी रॉकिंग चेअर सुद्धा हलू लागली’. आता मात्र काळजाचे ठोके चुकल्या सारखी जाणीव झाली. काहीतरी नक्कीच निराळे घडत असावे. चेअर वर नक्की कोणीतरी असल्या शिवाय ती अशी हलणेच शक्य नाही……. “कोण आहे ?’’ मी जिवाच्या आकांताने ओरडलो. आणि ‘चेअर स्तब्द झाली’. मनाचा हिय्या करून मि झोपळ्यावरून उठून चेअर वर बसलो…….एक निरव शांतता आसमंतात पसरली. आणि समुद्राच्या भरतीच्या लाटेचा फ़ेन्सिंग वॉल वर जोरदार तडाखा बसून फेसाळलेले पाणी चौफेर उडाले.समुद्राला कितीही उधाण असले तरी पाणी किनाऱ्यावर पसरून आमच्या प्लॉट च्या बांधाला फक्त हळुवार शिवते पण अशी लाट आज प्रथमच बघितली.आज अमावास्येची बाराची भरती.आजची अमावास्या काही निराळीच भासली. ‘टेप रेकॉर्डरही कसा, कोणी आणि कधी बंद केला’ कळलेच नाही. आता परत झोपाळ्याला हळुवार गती मिळाली तसा न राहवून मी उठून झोपाळ्यावर झेपावलो आणि जोरात ओरडलो….. “शालन…. शालन”….. एक जीवघेणी शांतता आणि हलकेच एक थंड वाऱ्याची झुळूक सर्वांगावर पसरून सारे शरीर रोमांचित झाले. झोपाळ्यावर समोर प्रत्यक्ष ‘शालन’ तिच्या त्या आवडत्या ‘मोतीया कलर च्या सिल्क साडीत आणि केसात मदनबाणाची वेणी’ घातलेली पाहिली……. तेच हसरे रूप,तोच नेहमीचा बंद गळ्याचा लांब हाताचा ब्लाउज, आता पसरलेल्या दोन्ही हातानी मला झोपाळ्यावर यावं असं नजरेने खुणावत होती. तेच मोहून टाकणारे स्मित, तीच बोलकी पण आता केविलवाणी वाटणारी नजर आणि सर्वस्व ओवाळून टाकावे असे डोळे…. ‘टेपरेकॉर्डर अचानक वाजू लागला….त्या निळसर घाऱ्या डोळ्यात मी सर्वस्वी सामावून गेलो’……..
…………(०७)
काकांनी माझ्या दंडाला धरून जोरात मागे खेचल्याने मुठीत पकडलेल्या झोपाळ्याच्या पितळेच्या कडीला घट्ट पकडलेल्या माझ्या हाताने झोपाळ्याला जोराचा हिसका बसून तो हिंदकळला.
खळखळाट होऊन मी तंद्रीतून बाहेर आलो.
काकांनी बाजूच्या टीपॉय वर असलेल्या जग मधील पाण्याचा शिडकाव माझ्या चेहेऱ्यावर केला. काय झालंय हे फारसं मला कळत नव्हतं पण काहीतरी विचित्र आज नक्कीच घडलं असावं.
आम्ही घरात माझ्या बेड मध्ये आलो आणि मी लगेच बेडवर आडवा झालो.काका बाहेरचे आवरून आले. आज त्यांनीच माझ्या बेड मध्ये “बाजूला अंथरुण घालून झोपू का” विचारल्याने मलाही जरा बरं वाटलं.फारसं काही न बोलता ते झोपी गेले.
मला इतकंच लक्षात आलं की आपल्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तर मृत्यूनंतरही जीवन असू शकेल…….. आत्ता मला जाणवलेले शालन चे अस्तित्व हा भास असूच शकत नाही. चक्क माझ्या ह्या डोळ्यांनी मी तिला पाहिल्याचे मला अस्पष्ट का होईना आता स्मरत होते. स्पर्श झाला नव्हता पण तिची नजर खरीच होती. ती माझ्याबरोबर असतांनाचे स्मित आणि आजचे स्मित ह्यात बिलकुल फरक नव्हता. तिच्या केविलवाण्या नजरेतून मी तिला हवा आहे ह्याची स्पष्ट जाणिव मला झाली होती……..
आता ती सुध्दा मला हवीहवीशी वाटू लागली आणि आमची भेट ह्या जन्मी तरी अशक्य आहे ह्या जाणिवेने मन पार निराश झाले. आता आमची भेट,….. आमचे मिलन झालंच,….. तर ते माझ्या मृत्यूं नंतरच पुढील जन्मी होण्याची शक्यता लक्षात आली. गेल्या आठ महिन्यात तिला भेटावं, तिच्याशी बोलावं, तिचा सहवास लाभावा असं वाटत असलं तरी हल्ली आणि आत्ताच तिच्या अस्तित्वाची दखल माझं मन का घेतंय हे माझं मलाच कळेनासं झालं. ती असताना अस वाटत असायचे ह्यात काही विशेष नव्हतं ते नैसर्गिक होते.पण आता ती ह्या जगात नसताना इतक्या प्रकर्षाने तिचा दुरावा मला जाणवावा?
विचारानी आणि तिच्या विरहाने माझं डोकं सुन्न होतंय, अंग जड होतंय असं मला वाटू लागले. घसा कोरडा पडतोय असं वाटून मी बाजूच्या ग्लास मधील पाण्याचे दोन घोटही घेतले. तिच्या वाचून काहीच सुचेनासे झाले. तिच्या शिवाय सर्व काही व्यर्थ वाटू लागलें.तिच्या सानिध्यात घालवलेले दिवस डोळ्यापुढे येत होते. तिचा गोड आवाज कानात घुमत होता. मी रागावलो, माझं काही बिनसलं तर माझा राग काढण्यासाठी ती करीत असलेला जीवाचा आटापिटा, मला आवडणारी गाणी म्हणून मला रिझवणारी माझी शालन माझ्या डोळ्यांपुढून हलतच नव्हती. आत्ता पुन्हा ती परत दिसेल का? मला भेटेल का? असे अनेक प्रश्न मला सतावीत होते. माझी ही व्यथा मी कोणाला सांगणार, कोण समजून घेईल माझं मन, जी समजू शकली असती तीच माझी प्रिया आज माझ्यासोबत नाही. ह्या जगातही नाही. तिच्याशिवाय आता जगण्यात तरी काय अर्थ त्यापेक्षा मृत्यू आला तर निदान तिची भेट तरी होईल……
माझं अंग कण्हत होतं, डोकं चढलं होतं. अंगात ताप तर नसेल ना? शरीर जड जड होत गेले, डोळे जड झाले. पापण्या उघडत नव्हत्या नजरे पुढे फक्त शालन आणि शालनच……..
…………(०८)
डोळे उघडवत नव्हते. बाहेर चा प्रकाश सहन होत नव्हता.लक्षात आले की काका जवळच बसून “आता बरं वाटतंय का?” असं विचारीत असावे.माझ्या कपाळावर कोलंन वॉटर ची घडी ठेवली असल्याचे मला जाणवले. म्हणजे ताप जास्त असावा. मिटल्या डोळ्यांनीच त्यांना किती वाजले ते विचारल्यावर “दुपारचे चार” वाजल्याचे त्यांनी सांगितले. पुढे असही कळलं की रात्री पासूनच माझ्या अंगात ताप होता. मी उठायचा प्रयत्न केला. पण अंगात त्राण नव्हते. काकांनी उठू दिले नाही. आणि मी स्वस्थ पडून राहावे असे सांगितल्या प्रमाणे मी शांत पडून राहिलो.
आता काहीसं बरं वाटत होतं. मी उठून बसलो.आता रात्रीचे आठ वाजले होते. काकांनी पेज दिली. काल रात्री पासून पोटात तसे काही गेले नव्हते.पेज घेतल्यावर अंगात थोडी शक्ती आली.एकाएकी असा इतका ताप कसा आला ह्याचं मला नवल वाटत होतं. काकांच म्हणणं की मी काल तिन्ही सांजेला आणि मुख्यत्वेकरून रात्री बाहेर असं एकट्याने राहायला नको होतं.
काहीही असुदे आता खूपच बरं वाटत होतं. पण पुन्हा बाहेर पडावे असं मात्र वाटलं नाही.
मी रूममध्येच खुर्ची घेऊन बसायचे म्हणून खिडकी पूर्ण उघडली तसा भरतीच्या वार्याची झोत आणि शालन ची आठवण एकाच वेळी डोक्यात भिनली आणि शिरशिरी येऊन अंग पुन्हा शहारले. समोर तोच मावळतीच्या ‘गुरू’ च्या मागावर असलेला ‘तामसी मंगळ’ आपले अमंगल दर्शन देत होता.
ह्या गुरू ग्रहाचे मला फार आकर्षण आणि आवड आहे. ‘गुरू एक जगी त्राता’ म्हणतात ते खोटं नाही. जन्म पत्रिकेत सुद्धा गुरू उच्चीचा असणे महत्त्वाचे ठरते.
ऍस्ट्रॉलॉजि, न्यूमेरॉलॉजि आणि पामेस्ट्री ह्या तिन्ही विषयाची मला आवड आणि त्यात गती सुध्दा आहे. माझ्या “सुधीर” ह्या नावाच्या इंग्रजी स्पेलिंग प्रमाणे, आकडेशास्त्राच्या इंग्रजी अल्फाबेट्स ना असलेल्या ‘वॅल्यू’ भरल्या असता टोटल ‘एकवीस’ येते. आणि त्याची बेरीज केली असता ‘तीन’ येते. हा आकडा गुरुच्या अधिपत्याखाली येतो.त्यामुळे माझा ‘नेमनंबर’ तीन आहे. तसेच माझा जन्म ही ‘तीन डिसेंबरचा’ म्हणजे इथेही ‘तीन’ ह्या ‘बर्थनंबर’ वर गुरू ग्रहाचे वर्चस्व आणि त्याच्यामुळे त्याच्या गुणधर्मांचा माझ्यावर असलेला प्रभाव ह्यमुळेच बहुदा गुरू हा ग्रह मला सर्व ग्रहात आवडत असावा.
तसे पाहता आपल्या आयुष्यात सुद्धा नीतीची मूल्य जपण्यासाठी ‘गुरू’ च्या संस्कारांची गरज प्रथम आई, वडील आणि प्रार्थमिक शिक्षकांच्या रूपात आपल्याला लागतेच. परमेश्वराच्या आणि गुरूच्या तुलनेत सुद्धा गुरूलाच अधिष्ठान देण्यात येते. परमेश्वरा पर्यंत पोहोचायला सुध्दा गुरूचा आशिर्वाद आणि सानिध्य महत्वाचे ठरते. अध्यात्माच्या मार्गाला लागायचे असेल तर कोणीतरी गुरू भेटणे गरजेचे ठरते. खरी विद्या, खरे ज्ञान आणि आत्म्याची अनुभूती गुरू शिवाय अशक्यच म्हणायची.आणि ते जर मिळवायचे असेल तर आपल्यालाही जसे
‘आरूणि’ची ‘सांदिपनी’ ऋषींवरील आणि ‘अर्जुनाची’ ‘द्रोणाचार्यां’ वरील निष्ठा आणि अजोड प्रेम होते तसे अंगीकारावे लागेल.गुरु शिष्याची महती ‘समजली’, तरी आजतागायत मला मात्र ती ‘उमगली’ नाही.कदाचित माझ्या जन्म पत्रिकेतील मंगळ आणि शनी ग्रहाची असलेली वक्र दृष्टी ह्याला कारणीभूत ठरली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काकांनी जवळ येऊन माझ्या कपाळाला देवाचा अंगारा लावला आणि मला देवाच्या खोलीत घेऊन गेले. मला माझ्या आई आणि बाबांची प्रकर्षाने आठवण येऊन त्यांची उणीव भासली.देव्हाऱ्यातील तेवणाऱ्या नंदादीपाच्या मंद प्रकाशात गणेशाची आणि आमच्या कुलदेवतेचि मूर्ती सजीव झाल्याचा मला भास झाला आणि मी नतमस्तक झालो……..
…………(०९)
मला बरं वाटतंय म्हटल्यावर काकांना मी “आज तुम्ही तुमच्या खोलीत झोपलात तरी चालेल” असे म्हटले खरे पण ते ‘आऊट हाऊस’ मध्येच झोपायला गेले.असे काय आहे की ‘जनरल बेड’ मध्ये त्यांना हल्ली झोप लागत नाही म्हणून ते आऊट हाऊस मध्ये जाऊन झोपतात. म्हणून मी आज स्वतः ‘ह्या’ खोलीत झोपायचं ठरविलं. वास्तविक ही खोली उत्तरेच्या बाजूला, ईशान्येकडील देवघराला जोडूनच आहे. आईबाबा असताना सुद्धा रात्री नामस्मरण करून झाले की ते दोघे ह्या खोलीतच झोपायचे. ह्या खोलीला लागून वायव्ये कडच्या मागच्या बाजूला जनरल वॉशरूम आहे. एरव्ही सबंध दिवस काका इथेच ह्या बेड मध्ये वावरतात. पण रात्री म्हणे त्यांना इथे झोप लागत नाही. नवलच म्हणायचं……
आमचे हे घर आणि ही वाडी गावाच्या ह्या टोकावर समुद्र किनारीच आहे. ह्या बेड मधून खिडकीत उभे राहिल्यास उत्तरेकडील किनारा, गावातील लोकांच्या वाड्या, केतकीचे वन आणि दूरवरचे गावाचे ‘खुले स्मशानही’ स्पष्ट दिसते. मी आणि शालन ज्या खडकावर नेहमी बसायचो तो किनाऱ्या लगतचा केतकीच्या वना समोरचा विशिष्ट आकाराचा मोठ्ठाला खडक, ज्या खडकावर बसून काढलेला माझ्या आई आणि वडिलांचा एक जुना फोटोही माझ्या संग्रही मी जपून ठेवला आहे.तो खडकही इथून दिसतो. बाहेर खिडकी पासून थोड्या अंतरावर आमची विहीर आहे. समुद्रकिनारी असून सुध्दा ह्या विहिरीचे पाणी एकदम शुद्ध आणि खूप गोड आहे. घराच्या मागच्या भागात असलेल्या आंबा, फणस, नारळी पोफळीच्या बागेला ह्याच विहिरीवर बसवलेल्या पंपाने पाटातून पाणी देण्याची सोय केलेली आहे. देवघराच्या खिडकीतूनही पूर्वेकडील समोरच्या गावाच्या रस्त्यावरून आणि मेन गेट मधून येणाऱ्या जाणाऱ्यावर नजर ठेवता येते. मी स्वतः आर्किटेक्ट,आणि माझा वास्तु शास्त्राचा तसा अभ्यास असल्यामुळे, शास्त्राच्या धर्तीवर हे घर मी नंतर पुन्हा बांधून काढले होते. शालन ला मनोमनी हवे असलेले, तिचे स्वप्नातील घर, माझ्या आई कडे ज्या घराचा ती आवर्जून उल्लेख करायची ‘ते माझे घर’ असे ती म्हणायची आणि ज्यात भावी संसाराची स्वप्ने तिने रेखाटली आणि मी त्याच्या पूर्ती साठी सर्वस्व पणाला लावून बांधलेले ‘हे माझे घर’. पण त्यात दुर्दैवाने पुढे आईवडिलांचे सुख तर नियतींनी माझ्या पासून हिरावून घेतलेच आणि बरोबर ‘ती’ ही माझ्या आयुष्यातून निघून गेली……..
…………(१०)
मला तसे बरे वाटत होते. काकांनी जाताना मला कपभर गरम दूध दिले आणि ते झोपायला गेले. नुकतेच अकरा चे ठोळे पडले होते. मला झोप येत नव्हती म्हणून बेड मधील खुर्चीवर बसून खिडकीतून जवळचा दिसणारा किनारा आणि त्याच्या वर दिसणारे नभांगण बघत शांत बसलो होतो. ह्या खिडकीतूनच वर दूरवर ‘ध्रुवाचा’ अढळ तारा मी बऱ्याच वेळा पाहिला आहे. उत्तर रात्री सप्तर्षी दर्शनही घेतले आहे ह्या सात ताऱ्यांच्या विशिष्ट आकृतीला गावचे जेष्ठ नागरिक,जुने जाणते लोक ‘बाजेचा खाटला’ म्हणतात आणि ह्या सात ताऱ्यांच्या ठराविक ठेवणी वरून रात्रीचे बरोब्बर किती वाजले असतील ते सुध्दा ओळखतात.
खोलीत बसलो खरा, पण मगाशी देवघरात गेल्यापासून आई बाबांची सारखी आठवण येत होती.आणि एकटे पणा जाणवत होता.आठवणींच्या विचारात असताना एकदम बाराचे ठोळे पडले आणि थोडा दचकलोच.भूत प्रेत कशालाही, कधीही न घाबरणारा मी आणि लोकांच्या भाषेतला ‘डेअर डेविल’. हल्ली मात्र उगाचच असा थोडा दचकायला का लागलोय ते कळत नाही.
विहिरी कडे नजर गेली आणि कोणीतरी खिडकी समोरून विहिरीच्या बांधाकडल्या बाजू कडून मागे बाजूच्या जांभळाच्या झाडाजवळ गेल्याचा भास झाला.पटकन मागचे दार उघडून कोण गेले ते पाहण्यासाठी उठलो पण कंबरेत उसण भरली. अंगात तेव्हडे त्राणही नव्हते आणि “रात्री एकटा बाहेर जाऊ नकोस” अशी ताकीद सुध्दा काकांनी दिल्यामुळे मी पुन्हा खुर्चीत बसून बाहेर नजर ठेवून बसलो.
परत तीच आकृती मला विहिरीजवळ येतांना दिसली.कालच अमावास्या होऊन गेल्यामुळे बाहेर तसा काळोखच होता आणि नेहमी पोर्च चे संध्याकाळपासून चालु असलेले लाईटही बंद कसे पडले ते कळलं नाही. आणि अचानक पोर्च चे लाईट पुन्हा लागले आणि मी नखशिखान्त शहारलो. विहिरीच्या बांधावर एक भली मोठी सावली दिसे दिसे पर्यंत नाहीशी झाली. मी डोळ्यात प्राण ओतून एकटक विहिरीकडे बघत असताना पुनः सगळीकडे अंधार होऊन त्या पडछायेने विहिरीच्या बांधावरून धपकन ह्या खिडकीच्या खालीच उडी मारली आणि मी एकदम दचकून मागे सरलो तशी तिने पुन्हा मागील बाजूस त्याच जांभळाच्या झाडाकडे धाव घेतली. माझ्या सर्वांगाला थरथरणी लागली होती.हा नक्कीच ‘अमानवी’ प्रकार होता.चांदण्यांनी भरलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर विहिरीला फेऱ्या मारण्याचा हा छाया,पडछायेचा खेळ मी डोळे फाडून फाडून बघत होतो जांभळाच्या झाडाची आता पिंपळाच्या पानांची व्हावी तशी खूप मोठी सळसळ फक्त थोडा वेळ ऐकू आली आणि मग सर्वकडे स्मशान शांतता पसरली. बराच वेळ मी सुन्न पणे बसून होतो. सर्वांगाला घाम फुटला होता.घड्याळाने सुध्दा बहुदा धडकी भरलेल्या काट्याने थरथरत ‘एक’ ठोळा दिला. आता जास्त वेळ इथे थांबण्यात अर्थ नाही म्हणून मी माझ्याच बेडरूम मध्ये जाऊन बिछान्यावर पहुडलो……..
…………(११)
माझ्या रूममध्ये येऊन सुद्धा आई बाबांच्या आणि शालन च्या आठवणींनी झोप लागत नाही म्हटल्यावर मी देवघरात गेलो. पुन्हा देवाला पाया पडून आलो येतांना आईबाबांच्या फोटोला डोके टेकून पाया पडलो तेव्हा कुठे मन शांत झालं आणि नंतर गाढ झोप लागली.
सकाळी मी एकदम फ्रेश होतो. रात्री जणू काहीच घडलं नव्हतं.मला खडखडीत बरं वाटल्याचं माझ्या चेहेऱ्यावर बघून काकांनाही बरं वाटलं. मी सुध्दा रात्रीच्या प्रसंगा बाबत मौन पाळलं.
मला आलेला सावल्यांचा हा अनुभव, घडलेला सर्व विचित्र प्रकार डोक्यातून जात नव्हता. ती पडछाया शालन सारखी मला भासली होती. परवा रात्री मला दिसलेले ते घुबड बॅटरी च्या झोतात आंब्यावरून ह्याच जांभळाच्या झाडावर गेले होते.ती छाया सुद्धा त्याच झाडा कडे जाऊन परत विहिरीकडे येऊन परत तिथेच धावत गेलेली मी पाहिली होती. काय संबंध असावा ह्या झाडाचा आणि विहिरीचा. आमच्या वाडीतील ह्या झाडाची मोठी आणि टपोरी जांभळे गावातील सर्व लोकांना आणि विशेषतः शालन ला सुद्धा खूप आवडायची….
जांभळाच्या झाडाखाली अर्धवट पिकलेल्या जांभळाचा पडलेला खच पाहून काकांचे सुद्धा डोके फिरले. वादळात सुद्धा कधी अशी आणि इतकी, ती सुद्धा अर्धवट पिकी आणि कच्ची जांभळे पडल्याचे उभ्या आयुष्यात त्यांनी कधी पाहिले नव्हते. रात्रीच्या त्या सळसळींनी आता पुन्हा माझ्या अंगावर काटा उभा राहिला.माझ्या मनावर आणि ह्या वाडीवर एका विचित्र आणि अमानवी घटनांचा पगडा बसत चालल्याचे मला जाणवायला लागले.काका कामाला निघून गेले. त्या झाडाखाली उभ्याउभ्या मी विचारात गढलो…..
आपले आयुष्य ज्या प्रकारे घडते,आयुष्यात कधी सुखाची तर कधी दुःखाची भरती येते,आणि कधी प्रेमाच्या सागराचा किंवा विरहाच्या अग्नीचा किनारा गाठते, ह्या मागे सुध्दा विधात्याची काही योजना असावी. आपल्याला लाभलेले आई वडील, आपली भावंडे, सगे सोयरे, मित्रमंडळी ह्या सर्वांचे आपल्याशी गतजन्मीचे काही प्रेम संबंध, ऋणानुबंध असल्याशिवाय त्या व्यक्ती,पुन्हा ह्या जन्मात आपल्या सहवासात, ‘ह्या’ ना ‘त्या’ कारणाने येणे शक्यच नाही. गेल्या जन्मातील वा जन्मांतरीतील राहिलेले प्रेमाचे ऋण फेडण्यासाठी पुन्हा आपण एकत्र येत असणार ह्यावर माझा विश्वास बसला आहे. ह्या जगात इतकी माणसे असतांना काही ठराविक माणसांबद्धलच आपल्याला प्रेम किंवा सहानुभूती का असावी, काही माणसे का कुणास ठाऊक आपल्याला आवडतात, काहींना आपण आवडतो हे असे का? काहीतरी प्रेमाची देवाणघेवाण कुठल्या तरी जन्मात अर्धवट राहिल्या मुळेच कदाचित आपण ते प्रेम, तो सहवास पुन्हा मिळावा आणि पूर्णत्वाला जावा, म्हणूनच विधात्याने तो हिशोब करूनच आपले संबंध निर्माण केले असावेत….
त्या आम्रवृक्षाच्या, ज्यावर ते घुबड बसले होते,आणि उडत जाऊन जांभळाच्या झाडावर बसले होते. त्यांच्या नीरिक्षणात आता मी दंग होतो. कालच्या त्या सळसळीत बहुदा ह्या दोन्ही झाडांच्या फांद्या लवल्या असाव्या असा मी निष्कर्ष काढला, कारण नुसत्या घुबडाच्या बसण्याने फांद्या तुटल्याचे ऐकिवात नाही. ह्या झाडांच्या खाली मी थबकून उभा होतो. भर बाराच्या भरतीला उगाच शालन माझ्या समोर डोळ्यात प्राण आणून ह्या झाडाला रेलून माझी वाट बघतेय अशी जाणीव झाली……
मागे एकदा आमच्या घरात, मी विहिरीतून काढून दिलेले पाणी भरतांना, तिला बादलीतले पाणी उडवून मी संपूर्ण भिजवून काढलेले तिचे ते झाडाला टेकून पदराचे पाणी पिळून काढतांनाचे ओलेती रूप माझ्या डोळ्यापुढे आले. मी तिला छेडतांना त्यावेळी तिने म्हटलेले गीत आठवून आज तिच्या आठवणीत, आणि आता तिच्या विरहात माझ्याही ओठावर आले……..
…………(१२)
आपल्याला कोणाबद्धलही जेव्हा जिव्हाळा, प्रेम वाटते ही बहुदा दोन आत्म्यांची एकरूप होण्याची, त्या प्रेमपूर्तीची प्रक्रिया असावी.
आज आई, बाबा, शालन नाहीत तरी मला त्यांचा सहवास अजून मिळावा असं सारखं का वाटतं. माणसे राहत नाहीत, पण फुललेले फुल कोमेजून गेले तरी त्याचा सुवासिक गंध ते मागे सोडून जाते तशीच ही प्रेमाची माणसे त्यांच्या अस्तित्वानंतरही तो प्रेमगंध, स्मृतिगंध मागे आपल्या साठी सोडून जातात, ह्या सुखद आठवणींच्या खजिन्यावरच तर पोसले जाऊन आपण आपल्या पुढील आयुष्याची वाटचाल करीत असतो….
आत्मा अमर असावा आणि आत्म्याला, आत्म्याची जाण असावी, आणि तशी अनुभूती येत असल्यामुळेच तो हे शरीर, ही काया बदलून त्या प्रेमाच्या पूर्ती साठीच पुन्हा ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात आपल्याला ठराविक व्यक्तींच्या सहवासात आणून प्रेमपूर्ती करीत असावा.
हे प्रेम, एकमेकांबद्धल वाटणारी ओढ मनावर इतका ठसा ठेऊन जाते की आपले जीवन त्यांच्या स्मृतीनेच सुख दुःखाची छाया बरोबर घेऊन आपण व्यतीत करीत असतो.कोवळ्या मनावर झालेले प्रेमाचे संस्कार चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढत जाऊन सुखाच्या पौर्णिमेच्या प्रकाशात न्हाऊ घालतात. प्रेमाच्या कळीचे सहवासाच्या वेलीवर फुलात रूपांतर होऊन त्याचा सुगंध आपल्या जीवनावर शिंपडून हा स्मृतिगंध सतत आपल्या बरोबर राहतो. आणि आपल्याबरोबरच जीवनाच्या मातीत मिसळून विलीन होत असावा. त्याचे मनावर झालेले बरे वाईट संस्कार घेऊनच हे सूक्ष्म मन बहुदा पुढील जन्माकडे वाटचाल करीत असावे. आजही आजोबा, आजीने, आई वडिलांनी प्रेमाने केलेले आपले लाड त्यांचा तो मायेचा स्पर्श आणि प्रेम आपल्या मनोमंदिरात आपण कायम जपलेले असते आणि त्यांच्या आठवणी हृदयात कायम तेवत राहतात. पुढे आयुष्यात निर्माण होणाऱ्या प्रेमसंबंधाची सरगम आपल्या ओठावर एका मधुर गीताच्या रूपात आपण गुणगुणत राहतो.आपले संबंध, ही नातीगोती आणि सर्व जग हे प्रेमाच्या आधारावरच टिकून आहे, ही आपुलकी हे प्रेम हेच जीवनाचे मर्म आहे, आणि तेच सत्य आहे. जिथे प्रेम संपते तिथे संघर्ष आलाच.
शालनला जे प्रेम माझ्याकडून अपेक्षित होते आणि पूर्णत्वाला गेले नाही.तिच्या त्या राहिलेल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठीच तिचा आत्मा भटकत असेल का? माझा शोध घेत असेल का ?
मनात हे असे विचार सारखे येऊन जीव बेचैन झाला. खरोखरीच तिला प्रेमपूर्ती हवी असेल तर मी आता तिच्यासाठी काय करू शकतो? किंवा ती कोणत्या मार्गाने ते साध्य करेल? मनातील अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आता माझी मलाच द्यायला हवीत.माझ्या मनाची ही व्यथा आता शालन शिवाय कोण जाणू शकेल. तिच्या शिवाय कोण समजू शकेल ?
शालन च्या आठवणीत मन रमू लागलं तशी शालनच डोळ्यासमोर दिसून मला खुणावू लागली……..
…………(१३)
काल रात्री पासून सबंध दिवस शालनच्याच आठवणीत आणि सतत डोळ्यापुढे दिसणाऱ्या तिच्या केविलवाण्या नजरेत दिसलेल्या व्यथेने मला बेचैन करीत होता. काकांनी केलेल्या जेवणात, खाण्यात कशातच माझे मन लागत नव्हते. शेवटी मला राहवेनाच म्हणून मी तिच्या आठवणीत समुद्रावरील आमच्या नेहमीच्या त्या खडकाकडे आकर्षिला जातोय ह्याची जाणीव होऊन किनाऱ्याकडे निघालो. काकांनी साद घातली पण “काही काळजी करू नका मी लगेच येतो” असे सांगून निघालो.आमची वाडी गावाच्या टोकालाच असल्यामुळे पश्चिमेला समोर मुंबई आणि कुलाब्याचे दीपगृह सुध्दा स्पष्ट दिसते. समोरचे हे अंतर फक्त दहा ते बारा नॉटिकल माइल्स इतकेच असावे. हा सर्व किनारा अतिशय रम्य आहे. गावातील प्रतिष्टित लोकांच्या आंब्याच्या वाड्या ह्या किनाऱ्यालगतच आहेत. त्यापुढे असणारे हे केवड्याचे भरगच्च वन त्यामागे असणारी सुरु ची, नारळाची उंचच उंच झाडे ह्या मुळे ह्या किनाऱ्यावर नुसते फिरायला सुद्धा बरे वाटते. ह्या किनाऱ्यावर ह्या आमच्या नेहमीच्या खडकावर बसून मावळतीच्या सूर्याचे दर्शन आणि त्यावेळेचे नयनरम्य आकाश आम्ही अनेकवेळा अनुभवले आहे.
शालनच्या आठवणीत किनाऱ्यावर उतरलो आणि लहानपणी आम्ही सर्व मुलं ह्या रेतीत किल्ले बांधायचो त्याची प्रकर्षाने आठवण झाली. आम्ही खेळत असलेले खेळ, ह्या किनाऱ्यावरील निरनिराळ्या आकाराचे लहान मोठे, रंगी बेरंगी शिंपले, मोठे शंख, आणि कवड्या वेचण्याची त्यावेळी आमच्यात असलेली स्पर्धा. आणि ते वेचून मग एकमेकांकडे ते अदलाबदल करून संग्रही जमा करून ठेवीत असू. स्वतःकडे जमवलेले हे निवडक शंख, शिंपले शालन फक्त मलाच देत असे. त्यावेळची परकर पोलक्यात वावरणारी ती हसतमुख गोड शालन माझ्या आईला सुध्दा खूप आवडत असे. लहानपणापासून तिलाही सर्व माझ्या नावाने चिडवित असत. ह्या आमच्यातील असलेल्या मैत्रीच्या कळीचे, पुढें प्रेमाच्या फुलात रूपांतर कधी झाले कळलेच नाही….
मी खडकावर येऊन बसलो. ओहोटी संपून समुद्राला भरती आणि मनात आठवणींना उधाण आले. जस जसा सूर्यास्त होऊ लागला तस तसं मन तिच्या विरहात व्याकुळ व्हायला लागलं. दूर क्षितिज्यावर मावळणारा सूर्य आणि मनोसाम्राज्यावर होणारा तिच्या मुखचंद्राचा उदय मला एका निराळ्याच विश्वात घेऊन निघाला. भरतीच्या लाटांबरोबर येणारा गार वारा शालन चा पदर हवेत उडवून माझ्या खांद्यावर विसावत होता. नेहमी प्रमाणे माझ्या डावीकडे बसलेली शालन माझ्या डाव्या हाताला स्पर्श करून मला काही सांगत्येय असा क्षणभर भास झाला. पण बाजूला कोणीच नव्हते. तो थंडगार स्पर्श मला नक्कीच जाणवला होता. वाऱ्याची पुन्हा एक झुळूक माझे अंग शहारून गेली.समोर पसरत चाललेला अंधार, वरून परत घराकडे परतणाऱ्या पक्षांची किलबिल मध्येच समुद्रावरून उडत डोक्यावरून ‘टीव्ह टिव्ह ‘ करत जाणारी टिटवी. का कुणास ठाऊक पण मला हे असे संध्यासमयीचे वातावरण आवडत आले आहे. आई असतांना अश्या तिन्ही सांजेला घरात असलंच पाहिजे असा तिचा आग्रह असायचा. आईच्या आठवणींनी मला भरून आलं.आज आई असती तर माझं जीवनच बदलून गेलं असतं….
लहानपणीच्या आठवणीत आणि आईच्या मायेत अडकलेले मन बाहेर येईपर्यंत वर आकाशात चंद्राची कोर आणि त्याच्या वरून माझ्याकडे झेपावणारी शालन दिसू लागली आणि मगाचचाच तो थंडगार स्पर्श माझ्या सर्वांगात भिनला. आत्ताही तिच्या त्या निळसर घाऱ्या डोळ्यात मला माझीच प्रतिमा स्पष्ट दिसत होती. नजरेनं ती मला तिच्याबरोबर चलण्याची खुण करत असावी. मी चपापलो मी तिच्या बरोबर यावं असंच ती खुणावत असावी. मी अजाणता माझा डावा हात पुढे करून माझी संमत्ती दाखवताच ती दिसेनाशी झाली.बराच अंधार पडला होता. कुलाब्याच्या दिपग्रहाचा झोत मधे मधे अंगावर पडत होता. मुंबईच्या किनाऱ्यावरचे लाईट ही लागू लागले होते. काकांना मी लगेच येतो म्हणालो होतो. मी उठणार इतक्यात माझ्या डाव्या बाजूला बसून तिचे ते आवडते गाणं गुणगुणल्याचा स्पष्ट आवाज माझ्या कानात पडला आणि मी फक्त तिचा तो गोड चेहेरा न्याहाळतच देहभान विसरलो……..
…………(१४)
शालन माझीच वाट पाहतेय, माझ्या आजूबाजूला सारखी वावरतेय, माझ्यासाठी, माझ्या भेटीसाठी तिचा आत्मा तळमळतोय हे मी आता अनुभवत होतो. मी तिचा झाल्याशिवाय तिला शांतता लाभणार नाही ह्याची मला प्रकर्षाने जाणीव होतेय.तिला भेटावं, तिच्या राहिलेल्या आशा आकांक्षा पूर्ण कराव्या ह्यासाठी आता काहीही करण्याची माझ्या मनाची तयारी होऊ पाहत होती.तिच्या हाताचा तो थंडगार स्पर्श मला सहन होत नव्हता. एकेकाळचा तिच्या हाताचा तो उबदार स्पर्श, तिच्या नजरेतील माझ्या प्रेमाची झाक,ती ओढ मला पुनः हवी हवीशी वाटू लागली. तिच्या त्या कुरळ्या लांबसर केसात आजही मदनबाणाच्या फुलांची वेणी तशीच होती. त्या फुलांच्या मोहक वासाने हुरळून मी तिला जवळ करण्यासाठी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि बाजूला कोणीच नसल्याचे माझ्या लक्षात येऊन मी दचकलो. मला आलेला तो फुलांचा गंध, तिचा तो चेहरा, ते ऐकलेले गीत, तो हाताचा थंडगार स्पर्श, सर्व सर्व काही आभास असावा. पण हे कसे शक्य आहे. जे मी अनुभवलं ते सगळं खोटं कसं काय असू शकतं…..
आता शालन समोर उभी होती, आणि मला काही सांगायचा प्रयत्न करीत होती. माझ्या बाजूला आता मात्र तिचा तो आवडता ‘शिवा’ दयेच्या नजरेने माझ्या कडे बघत असल्याचे जाणवले. ह्या जगात आपल्यावर निर्व्याज, निस्पृह, आणि निरागस माया करणाऱ्या ह्या मुक्या प्राण्यांबद्धल मला सतत आदर वाटत आला आहे. हे असं जनावर बरोबर असेल तर कुठल्याही वाईट शक्तीवर मात करायची प्रेरणा आपल्या अंगी बळावते…..
समोर लांबवर दिसणाऱ्या मुंबईच्या दिव्यांची प्रखरता आता वाढलेली माझ्या लक्षात आली. पायाजवळच्या पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब चमकत होते. गार वाऱ्याची झुळूक अंगावरून गेली. मनगटावरील घड्याळात नुकतेच आठ वाजून गेले होते. आता किनाऱ्यावर दूरपर्यंत आजूबाजूला सर्व कडे काळोख पसरला होता. सभोवतालच्या शांततेत भरतीच्या लाटांचा खडकावर होणारा आघात तेव्हढा, खूपच तीव्रतेने कानावर आदळत होता. शालनचे कानात घुमणारे लाघवी बोल तसेंच सोबतीला घेऊन जड अंतकरणाने मी उठून घराकडे पावलं वळवली. बराच वेळ एकाच जागी बसल्याने असेल कदाचित,उठताना ढोपरात कळ आली आणि कंबरही दुखत असल्याचे जाणवले, सर्व शरीरचं जड झाल्या सारखे वाटून ठणकत होते. अंग गरम झाल्यासारखेही जाणवले. पुन्हा बहुदा ताप आला असावा. जवळच्या भाटावरुन वर चढत घराकडे येताना आमच्या पोर्चचे लाईट लागलेले आणि गेटवर काका माझी वाट पाहत असल्याचे दिसले.
सध्या तसं निर्भीड आयुष्य जगणाऱ्या मला, आता ह्या संध्यासमयी आपण किती एकटे आहोत ह्याचा विचार मनाला शिवला.
आज माझ्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, सर्व सुखसोयींनी युक्त बंगला, गाडी सर्व काही आहे. मुंबईत सुद्धा मस्त ब्लॉक आहे.स्वतःच ऑफिसही आहे.पण हे सर्व सुख उपभोगायला माझ्या रक्ताचं अस जवळपास कोणीच नाही ह्याची खंत मनात आहे.नशिबाने मला उत्तम शिक्षण मिळालं, माझी आर्किटेक्ट ची फर्म सुद्धा व्यवस्थित चालू आहे. पण ‘रिलेशनशिपचं’ लक मात्र माझ्या नशिबात नाही. त्यातल्या त्यात रक्ताच्या नात्याचे नसूनही, आमच्या जातीचे नसूनही, वडीलकीच्या नात्याने माझी काळजी घेणाऱ्या विशुकाकांचा भक्कम आधार मात्र परमेश्वराने माझ्यासाठी ठेवलाय.शालन विशुकाकांची मुलगी असती तर माझं सर्व आयुष्यच बदलून गेलं असतं. तिच्या त्या नजरेच्या मदन बाणांचा आणि तिच्या प्रीतीच्या मोहक सहवासाचा सुगंध आयुष्यभर माझ्या मनी दरवळला असता…..
मागे,शालन तशीच त्या खडकावर आणि पुढे समोर गेटवर काका माझ्या काळजीत बहुदा बराच वेळ वाट पाहत उभे असावेत. समुद्राच्या गाजे बरोबरच कानात दूरवरून आलेल्या शालनच्या गिताचे अस्पष्ट सुर कानात रुंजी घालत असतानाच गेट वरील विशुकाकांबरोबर मी घरात आलो……..
…………(१५)
घरी आलो हात पाय धुवून देवघरात गेलो.मंद तेवणाऱ्या त्या निरांजनाच्या ज्योतित आईची प्रतिमा साकार झाली. आईच्या जबरदस्त आठवणींनी मन भरून आलं. सूर्यास्त होताक्षणीच घरात येऊन हातपाय धुवून देवघरात देवाकडे शुभंकरोती म्हणून नंतर तिने पाढे म्हणायला सांगितलं असतं. आज आजी नाही, आईबाबा नाहीत, माझं आपलं असं कोणी नाही.पाठीवरून मायेचा हात फिरवणारे, माझ्या दुःखात सामील होणारे कोणीही नाहीत. निदान शालन माझी सहचारिणी झाली असती तर……
माझं अंग आता बरंच गरम झालं होतं.जेवायची इच्छाच नव्हती.पण काकांच्या आग्रहास्तव एक केळ खाऊन थोडं दूध घेऊन बिछान्यावर आडवा झालो.
काकांच्या नेहमीच्याच म्हणण्याप्रमाणे,मी संध्याकाळी असा समुद्रावर जायला नको होतं. पण शालन दिसेल, भेटेल, ह्या आशेनेच आणि तिच्या ओढीनेच बहुदा मी भरकटलो असेन.
पलंगावर पडल्या पडल्याचं माझ्या जड झालेल्या डोळ्यापुढे आई,आणि शालन दिसू लागली. आणि त्यांच्या आठवणीत मन रमून गेलं. समोरच्या भिंतीवर लावलेल्या साईबाबांच्या तसबिरी कडे पाहून,मागे आईबरोबर शिर्डीला बाबांच्या देवळात गेलो होतो त्याची प्रखरतेने आठवण झाली. आजही तेथेच जावं असं वाटून मी इथेच, छातीवर हात घेऊन तसेच जोडले…..
आता आई आणि शालन दोघीही माझ्या दोन डोळ्यात सामावल्या होत्या.एकात आईच्या प्रेमाची आंस, आणि दुसऱ्या डोळ्यात पाणावलेल्या नजरेने माझ्याकडे मिलनाच्या ओढीने एकटक बघणारी शालन.आणि मनोगाभाऱ्यात शिर्डीचे बाबांचे मंदिर. आता आठवणींच्या पायऱ्या उतरत त्या दोघीही, तश्याच माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात एक एक पाऊल टाकीत उतरत असल्याचे मला जाणवले.डोकं जड जड होत गेलं. अंगातला ताप वाढला असावा. काका कपाळावर बहुधा मायेची थंड घडी ठेऊन माझा ताप उतरत असावे. मी परमेश्वराची आराधना करू लागलो.पण डोळ्यांपुढून शालन हलत नव्हती तिच्या जीवनाचा संपूर्ण चित्रपटच जणू माझ्या जडावलेल्या पापण्यात सामावून पुढे पुढे सरकत होता. कानात शालन सर्व काही मला सांगत होती आणि मी माझं अस्तित्वच विसरलो……..
…………(१६)
माझा एस.एस.सी. चा रिझल्ट लागला, मी चांगल्या तऱ्हेने ‘डीस्टिंगशन’ मध्ये पास होऊन शाळेतूनही पहिली आली होती. घरातूनच नव्हे तर अख्या गावातून माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. बाबांनी मुद्धाम अलिबाग वरून चांगले पेढे आणून वाटले. माझी खास मैत्रीण ‘किशोरी’ सुध्दा पास झाली होती पण तिला पाहिजे तेव्हडे मार्क्स मिळाले नव्हते,त्यामुळे मी सुध्दा थोडी नाराज झाले.
पेढे देऊन आशिर्वाद घेण्यासाठी मी माईंच्या घरी आले. नेहमी प्रमाणेच माईंना सुध्दा माझ्या येण्याने बरे वाटले होते. अगोदरच त्यांनी माझे बक्षिसाचे पाकीट तयार ठेवले होते ते मला दिले. मी उत्तम तऱ्हेने पास होणार ह्याची त्यांना पूर्ण कल्पना होतीच आणि माझ्या ह्या पास होण्यात ह्या “कामत” फॅमिलीचा सुध्दा सिंहाचा वाटा होताच. माझ्या ‘स्पेशल ट्युशन’ ची सोय त्यांनीच केली होती. मला लागणारी खास पुस्तके, आणि बाकीच्या लागणाऱ्या सर्व वस्तूंचा खर्च सुध्दा त्यांनी केला होता.माझ्या ह्या विजयाचे त्यांनी पोट भरून कौतुक केले. आणि पुढे असेच शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देत, मदत करायचे आश्वासनही दिले. माईंना, दादांना साष्टांग नमस्कार करून मी घरी आले.
पुढचे शिक्षण घेऊन कमीत कमी ग्रॅज्युएट तरी होणं माझ्या दृष्टीने महत्वाचं होतं. सुधीर इतकी मी हुशार नसले तरी त्याच्या बरोबरीत येण्यासाठी मला मन लावून अभ्यास करणे महत्वाचे होते. तसा तो इंग्रजी मिडीयम मध्ये असूनही त्यावेळी शाळेतून ‘एस.एस.सी’ लाच नव्हे तर पुढे ‘इंटर’ लाही अलिबाग तालुक्यातून पहिला आला होता. आम्ही जातीने आणि पैश्या आडक्याने कामत घराण्यापेक्षा कमी असलो, तरी अभ्यासात तरी सुधीर ची उंची गाठण्याचा माझा मानस होता.माझ्या रिझल्ट वर मला हार्दिक अभिनंदन केल्याची चिट्ठी सुधीर ने मुंबईवरून पाठविली होती.
‘जे.जे. स्कुल ऑफ आर्ट’ मधील त्याच्या परीक्षेत तो व्यस्त असल्यामुळे गावी येऊ शकला नव्हता. त्याने प्रत्यक्ष येऊन माझे अभिनंदन करावं अशी माझी मनापासून इच्छा होती. मी एस.एस.सी. ला चांगल्या गुणांनी पास झाल्यावर “मी प्रत्यक्ष भेटायला येऊन तुझे अभिनंदन करिन”असे वचनही मला त्याने गेल्या वर्षी पुढील शिक्षणासाठी मुंबईला जाताना दिले सुध्दा होते. त्याआशेवरच मी जोरात अभ्यासही केला होता. लहानपणा पासूनच मी त्याला माझा एक ‘खास’ मित्रच नाही तर ‘भविष्याचा जोडीदार’ म्हणूनही वरले होते,त्याने प्रत्यक्ष येऊन अभिनंदन करण्याच्या दिलेल्या वचन पूर्तीची ह्या तीन महिन्यांच्या सुटीत मी गोड स्वप्नेही पाहिली होती. मला त्याच्या बद्धल नकळत वाटणारा जिव्हाळा, प्रेम आणि ओढ एकदा त्याला सांगावि, ही सुप्त मनीची इच्छाही होती. माई, दादा, विशुकाका ह्यांनी खूप अभिनंदन केले खरं, पण सुधीर ची प्रत्यक्ष भेट न झाल्याने माझ्या आनंदावर तसे पाणीच पडले……..
…………(१७)
पुढे सुधीर अभ्यासात गढून गेला आणि आता हे वर्ष अत्यंत महत्वाचे म्हणून मी सुध्दा ‘इंटरच्या’ अभ्यासात लक्ष घातले. पण हे वर्षच बहुदा खराब असावे.आता पर्यंत पसरलेल्या फुलांच्या वाटेवर नियतींनी काटे सुध्दा पसरल्याची टोच मनाला रक्तरंजित करून गेली.
माझी जिवाभावाची मैत्रीण ‘किशोरी’ मला सोडून गेली.ती कधीही आपल्या जिवाचं बरवाईट करेल,ह्याची चुणचुण मला गेल्यावर्षीच लागली होती.आम्ही गेल्या वर्षी फर्स्ट इयर ला असतानाच गावातील सरपंचाच्या मुलाबरोबर तिचे प्रेम जमले,मी कितीही विरोध दर्शविला तरी तिने त्याचा नाद सोडला नाही,आणि त्याची परिणीती त्याने तिला फसविण्यात झाली.आपली अब्रू वाचावी म्हणून भीतीपोटी तिने गावा जवळच्या नदीत उडी टाकून आपले जीवन संपविण्यात केली.
ह्या दुःखातून मी सावरेपर्यंत, पुढे माझ्या आईनेही बिछाना धरला आणि त्यातून ती बाहेरच आली नाही. नियतींनी पुन्हा एकदा प्राजक्ताच्या नाजूक फुलांना अग्निकुंडात आहुती दिली….
हे वर्षच नासले,कीशोरीच्या आणि आईच्या विरहात अभ्यासात मनचं लागेना.त्यातून आई गेल्यावर सुधीर आमच्या घरी सांतवनाला येऊन गेल्यानंतर, तो सारखा माझ्या जवळ असावा अशी मनाची धारणा होत गेली.आता पर्यंत मी त्याला माझा एक जवळचा मित्र मानीत होते.पण मनात कुठेतरी लहानपणा पासून त्याची ओढ होतीच. तो अत्यंत गुणी आणि आज्ञाधारक तसेच अभ्यासातही खूप हुशार असल्याने मला त्याच्याबद्धल आदरयुक्त प्रेमही होते…….
गेल्या सुट्टीत किशोरीच्या प्रेमसंदर्भात नदी किनारी आमच्या गप्पा व्हायच्या,तेव्हा पासून आपले सुद्धा असेच सुधीर बरोबर प्रेम व्हावे असे त्यावेळी वाटायचे, ‘त्या’ विचाराला त्याच्या ‘ह्या’ भेटीनंतर मनाने खतपाणी द्यायला सुरुवात केली.आता आई नाही आणि किशोरीही नाही त्यामुळे आपलं असं जवळचं कोणी तरी असावं, असं सारखं वाटू लागलं आणि पुस्तक उघडले की पाना पानावर तोच दिसून,मला त्याची आठवण सतावू लागायची .
मनाला आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही ते आवरत नव्हते…..
पण पुढे पुढे मात्र बुद्धीने,ह्या वाढत्या जलाशयाच्या ओढीला बांध घातला. किशोरीच्या प्रेमप्रकरणाचे झालेले अत्यंत निराशेचे आणि खेदजनक उदाहरण डोळ्यापुढे आले की माझी द्विधावस्था व्हायची.मी मनाला खूपच समजावत असे.
माझीही अवस्था किशोरी सारखी होईल का?ह्या मनीच्या कांचन मृगाचे हरण होऊन वनवास भोगायला लागेल का? ह्या विचारांनी मनात कुठेतरी घर करायला सुरुवात केली आणि सुधीर आणि त्याच्या घरची सर्व माणसे अत्यंत चांगली असूनही मनात नको नको ते विचार येऊन मी धास्तावले आणि माझे मन मी त्याच्या पासून दूरच राहावे असे काहीसे संकेत देऊ लागले……..
…………(१८)
मन आणि बुद्धी एका तराजूत आणि सुधीर बद्धल वाटणारे ‘आकर्षण’दुसऱ्या तराजूत तोलतांना,हे दुसरे पारडेच जड होत चाललेय हा त्या वाढत्या तारुण्यातील ‘उन्माद’ आहे ह्याची मला जाण होती,त्याचा सहवास हवा हवासा वाटत होतां.त्यांच्या घरी गेले की माईंकडून,त्यांच्या बोलण्यातून त्याला दुजोरा मिळत होता.”चांगली शिक आणि सुधीर ला साथ दे” ह्या त्यांच्या बोलण्यातून मनाला खतपाणी मिळून मन बहरत होतं.कळीचे पुन्हा फुलात रूपांतर होतेय असं वाटत असतानाच ‘किशोरीच्या’ आठवणीत मनाचा विरस होऊन ते कोमजायचे.त्यात इंटर सायन्स चे वर्ष अत्यंत महत्वाचे होते मेडिकल ला ऍडमिशन मिळाल्यास आयुष्याचं सोनं होणार होतं.आई नसल्यामुळे घरची कामे,दुकानाचे काम,तिचा आणि किशोरीचा दुरावा,एकटे पणाची जाच,आणि त्यात बाबांचा चिडखोर पणा,त्यामुळे अभ्यासात मनच लागेना, ह्याचा नकोतो परिणाम होऊन मला मेडिकलला ऍडमिशन ला आवश्यक ते मार्क्स न मिळाल्यामुळे, ‘बी.एस्सी.’ करणे भाग पडले.
आईच्या,आणि किशोरीच्या जाण्याचा माझ्यावर झालेला परिणाम हेच माझ्या अपयशाचे कारण असावे असं माई आणि सुधीरलाही वाटलं.
माझ्या बी.एस्सी.च्या ह्या दोन वर्षाच्या कॉलेज मधील जीवनात, मी ज्युनिअर ला असतांना किशोरीच्या जीवनाची विल्हेवाट लावणाऱ्या ह्या सरपंचाच्या ‘जीवन’ने आता माझ्या पाठी लागायला सुरवात केली होती.मी सरळ मार्गी जायचे योजिले तरी नियतीने बहुदा वेड्या वाकड्या वळणाचा मार्ग माझ्या जीवन पथावर पसरला असावा.जाता येतांना माझ्या वाटेवर, बाकीच्या मोवाली मित्रांच्या साहाय्याने माझी छेडछाड करणे. शिट्टी वाजवून, जवळ येत मुद्धाम काहीतरी निमित्त काढून बोलणे, सुधीर च्या नावाने चिडवून आणि काहीतरी पांचट बोलून जवळीक साधण्याचा तो प्रयत्न करायचा. मी त्याला बराच उलटून लावायचा प्रयत्न केला.पण किशोरी नंतर ह्या ‘व्याधाला’ आता माझे ‘सावज’ करायचे होते.आणि जिवाच्या आकांताने मी त्या मृगयेतून सुटकेची धडपड करीत होते….
बाबांपेक्षा विशुकाका मला जास्त जवळचे, मला ते चांगले समजून घेतील ह्या विश्वासाने मी त्यांना ‘जीवन’ च्या कारवायां बद्धल बोलले,त्यांनी सरपंचांना भेटून त्यावर थोडे नियंत्रण घालण्याचा प्रयत्नही केला. पण तरीही त्याने माझी पाठ सोडली नाही.उलट आमचे ‘कामत फॅमिली’ बरोबरचे चांगले संबंध बिघडविण्याचे उद्योग त्याने गावात सुरू केले.
ह्या सर्वांचा विपरीत परिणाम माझ्या मनावर व्हायचा,अश्यावेळी विषण्ण मनाने सुधीर च्या सहवासाच्या मृगजळापाशी मन धाव घ्यायचे.व्याकुळ झालेली मी मग समुद्र किनारी,नदी किनारी एकटीच जाऊन तासंतास बसत असे,पण नदी किनारी गेले की तेथेही किशोरीच्या आठवणींनी जीव कासावीस होत असे,माझी ही व्यथा सुधीर कडे पोहोचविणेही शक्य नव्हते.आणि हा त्रास सोसण्या पलीकडे गत्यंतरही नव्हते.त्यातल्या त्यात गावातील तळ्या जवळील श्री.दत्तमंदिरात आणि स्वामींच्या तसबिरी पुढे काय तो थोडा फार दिलासा मिळायचा……..
…………(१९)
एकटे पणा खायला उठायचा तेव्हा हल्ली बरेच वेळा मी काकांना भेटायला माईंकडे जाऊन बसायची.झोपाळ्यावर मनीच्या भावनांना हलकासा झोका मिळून बागेत फुललेल्या, बहरलेल्या फुलांनी जीवनावर हलकेच सुवासाची शिंपण व्हायची. विशुकाका पहिल्यापासून माझे लाड करायचे,त्यात कामत फॅमिली बरोबर त्यांचे एकदम जिव्हाळ्याचे संबंध होते. कामतांकडेच त्यांची राहण्याची सोयही होती.सुधीरलाही ते वडीलकीच्या नात्याने जपत असत.माझ्यावर आणि सुधीर वर त्यांचा खूप जीव होता.आमची जोडी जमावी ह्याला ते ही दुजोरा देत असत. बाबा मात्र ह्या कामत फॅमिलीचा द्वेष करायचे.
आम्ही वैश्य समाजाचे त्यात परिस्तिथी फारशी चांगली नव्हती.बाबा फार अहंकारी आणि चिडक्या स्वभावाचे आणि सुधीर ची फॅमिली ही उच्च सारस्वत,सगळे सुसंस्कृत त्यात श्रीमंत.त्यामुळे बाबांचे द्वेषापोटी त्यांच्याकडे कमी येणे जाणे होते. पण विशुकाका मात्र ह्या फॅमिलीला धरून होते.लहानपणापासून माईंचा,सुधीरच्या दादांचा पण माझ्यावर जीव होता त्यात विशुकाकांमुळे भरही पडत होती.
मी बी.एस्सी.चांगल्या तऱ्हेने पास झाले.माईंची इच्छा मीपण मुंबईला राहून ‘पॅथॉलॉजि किव्वा फिजिओथेरपीचा’ कोर्स करावा,राहण्याची सोय आणि लागणारा सर्व खर्च ते करायला तयार होते. “पण पुढे काही शिकायची आवश्यकता नाही.” असा बाबांनी निर्णय घेतला.आकांक्षा वर पाणी पडले.सुधीर बरोबर मला मुंबईला राहण्याचा हसत चालून आलेला योग तसाच वाकुल्या दाखवीत माघारी फिरला.मी हिरमुसले पण बाबांपुढे कोणाचेच काही चालले नाही.
आई नसल्याने घरची कामे, आमच्या किराणा दुकानाचे व्यवहार सांभाळणे सर्व माझ्याच कडे बाबांनी सोपविले होते.सकाळी लवकर उठून अंगण झाडण्यापासून,बागेत फुलझाडांना पाणी घालून, घरी जेवण आटपून, मी थोडा वेळ का होईना माईंना घरकामात मदत करायला,तसेच विशुकाकाना त्यांच्या वाडीच्या कामात,शिंपण्याच्या कामात वैगेरे मदत करायची.माईंना माझं रूप फार आवडायचं, माझं दिसणं,वागणं ह्यावर त्या खूष असायच्या, ह्यामुळे “सुधीर साठी मी योग्य आहे” असं त्यांच्या बोलण्यात येऊन मी मनोमन सुखवायची.
कामतांचे घर खूप प्रशस्थ आणि वाडीही खूप मोठी. आंबा, फणस, गुलाबी जांब, पेरू, चिकू,नारळी, पोफळीची झाडे आणि सर्वात मला आवडायची ती जांभळीच्या झाडाची मोठ्ठी, टपोरी, आणि अवीट गोडीची जांभळं.आकाशाच्या निळसर पार्श्वभूमीवर ह्या गर्द जांभळ्या रंगाच्या झालरीत मी बरेच वेळा स्वतःलाही हरवून बसे.
माईंना माझा आवाज आणि मी म्हटलेली जुनी गाणी फार आवडायची.असेच एकदा आम्ही बागेत फिरतांना,त्यांच्या आग्रहाखातर,मी पाटाच्या पाण्याचे ते खळखळ वाहणे बघून आणि त्यात मला दिसलेले सुधीर चे प्रतिबिंब ह्याने माझ्या मनात उठलेले प्रेमतरंग,आम्ही झोपाळ्यावर बसलेले असतांना मी त्यांना गाऊन दाखवून त्यांची शाब्बासकी सुद्धा मिळविली……..
…………(२०)
माईंना आणि दादांना सुध्दा मी नेहमीच आवडत आली आहे. त्यात विशुकाकांची मी एकुलती एक पुतणी आणि त्यांचा माझ्यावर असलेला जीव,त्यामुळे मी सुधीरची भावी पत्नी होणार ह्यात मला कधीच शंका वाटली नाही तरी पण बाबांचा,आमच्या ह्या होऊ पाहणाऱ्या नात्याला प्रखर विरोध असायचा.सुधीरचा किव्वा कामत फॅमिलीचा विषय निघाला की त्यांचे तोंड वाकडे व्हायचे.वास्तविक ती फॅमिली श्रीमंत, उच्चशिक्षित, आणि आमच्या वैश्य जातीपेक्षा उच्च जातीने असूनही त्यांनी कधीही मला,काकांना अथवा बाबांनाही तसे जाणवू दिले नव्हते तरी पण बाबांचा त्यांच्या वर पिढीजात राग असल्यासारखे ते त्यांच्याशी विचित्र वागायचे. माझं रूप चांगलं होतं आणि आता मी सुद्धा ग्रॅज्युएट झाली होती त्यामुळे सुधीर साठी मी योग्य असल्याचे माईंच्या वागण्या,बोलण्यातून मला जाणवत होते.
माझ्या मनाने निवडलेला हा जोडीदार नुसता दिसायलाच नव्हे तर स्वभावानेही खूप चांगला,त्यात सुशिक्षित आणि सुखवस्तू सुद्धा असल्याने, सुधिरच्या माझ्या ह्या निवडीचे माझे मलाच खूप कौतुक असे.भावी आयुष्याची स्वप्ने पडायलाही आताशा सुरुवात झाली होती.
सुधीर आर्किटेक्ट च्या परीक्षेत खूप चांगल्या तऱ्हेने पास झाला होता. तो कधी गावाला येतो आणि मी त्याला भेटते असे मला झाले होते.पुढे शिक्षण घ्यायची त्याची इच्छा असल्याचेही माईंकडून मला कळले होते.पुढच्या आठवड्यात येऊन तो सुट्टी येथेच घालवणार होता म्हणून मी खूप आनंदात होते.
आताशा अभ्यास वैगेरेचे टेन्शन नसल्याने घरची कामे उरकून, बाबांना दुकानात मदत करून,फावल्या वेळात मी माईंकडे जाऊन गप्पात रंगत असे.
माझा आवाज,माझी जुन्या गाण्यांची आवड माईंना सुद्धा आवडायची, त्यामुळे बऱ्याच वेळा आम्ही गाण्यांच्या भेंड्या लावीत असू.माईंना बरं वाटावं म्हणून बऱ्याचवेळा मला एखादं गाणं येत असूनही मी मुद्धाम हरायची.आणि मग त्या मला शिक्षा म्हणून त्याच अक्षरावरचे संपूर्ण गाणे मी म्हणून दाखवायचा आग्रह धरीत.
एकदा “र” ह्या अक्षरावरून मला गाणं येत असूनही, माईंना बरं वाटावं म्हणून मी हरले, आणि माईंनी मग मला राधेच्या कृष्णा वरील प्रेमाची महती सांगून माझ्या कडून, राधेच्या प्रेमाचे एक गीत म्हणण्याचे सुचविले.
माझ्या मनीं असलेल्या, दिवसरात्र ज्या ‘कान्ह्याचा’ मलाही ध्यास लागला होता,त्या माझ्यातील राधे च्या कान्ह्या वरील प्रेमाची दोन गीते माझ्या जवळ होतीच, राधा गवळण….आणि राधा कृष्णावरी भाळली….माईंचा मान ठेवीत आता मला जिंकण्याची आलेली ही संधी माझ्या कान्ह्या पुढे नम्रतेने हात जोडीत मी स्वीकारली……..
…………(२१)
आम्ही घरचे श्रीमंत नव्हतो पण खाऊन पिऊन सुखी होतो.आता मी थोडी प्रौढ दिसू लागल्याने ‘ड्रेसेस’च्या बदली पातळ नेसावे ह्या माईंच्या आग्रहाखातर साडी आणि त्यावर बंद गळ्याचा,कोपरापुढे लांब हाताचा ब्लाउज सुद्धा शिवून घेतला होता.
अर्थातच ही पहिली नवी साडी आणि ब्लाउज माईंच्या पसंतीनी त्यांनी मला अलिबाग ला त्यांच्या बरोबर नेऊनच खरेदी केले होते.बाबांना हा प्रकार बिलकुल आवडला नाही. “मी आता मोठी झाले आहे आज ना उद्या साड्या नेसाव्या लागणारच” ह्या युक्तिवादाने मी कशीतरी वेळ मारून नेली. माईंनी मात्र त्या दिवशी माझी त्यांच्या घरी दृष्टही काढली. लहानपणी परकर पोलक्यात,झोपाळ्यावर असतांना परकरावरील आराश्याच्या चमकणाऱ्या छोट्या छोट्या षटकोनी टिकल्यात सुधीरची प्रतिमा टिपणारी शालन बघता बघता हृदयाच्या पदरावर सुधीर ची प्रतिमा कोरत मोठी झाली होती….
घरी आल्यावर,मागे माईंच्या घरातून त्यांच्या अल्बम मधून सुधीर चा एक फोटो मी लपवून आणला होता.माझ्या बॅगेतून तो काढून ह्रदयाशी धरून, समोर आरशात आमचा जोडा कसा दिसतो ते सुध्दा आत्ता निरखून पाहिले.आणि मनोमन सुखावले….
आज सुधीर येणार हे मला माहित झाले होते.रात्रभर मला तशी शांत झोप लागलीच नाही.कसा दिसत असेल. माझाशी कसा बोलेल.त्याला मी आवडेंन का ? ह्या विचारातच रात्र सरली.त्याला मी आता आवडणं महत्वाचं होतं.लहानपणापासून तो मला आवडायचा,त्याच्यासाठी मी काहीही करेन,पण तो माझा जोडीदार असावा हाच मनीचा ध्यास होता. त्याच्या माझ्या विषयीच्या भावना मला कधी समजल्या नाहीत पण तो माझा चांगला मित्र होता.खेळताना तो माझीच बाजू घेऊन बाकीच्यांशी भांडायचा देखील त्याला मी आवडायची,आम्हाला एकमेकांच्या नावाने सगळी मुले चिडवायची देखील, त्यामुळे पुढेही तो मला स्वीकारेल असंच सदैव वाटत आलय.
सकाळी लवकर उठले,अजून उजाडायचं बाकी होतं. बाहेर अंगणातून समोर वरती आलेली ‘शुक्राची चांदणी’ बघून मन त्या शीतल प्रकाशात सुधीर च्या आठवणींनि बहरलं, प्राजक्ताच्या फांदीला झालेल्या माझ्या डोक्याच्या हलक्या स्पर्शानेही त्या नाजूक,सुवासिक,कोमल फुलांनी माझ्या मस्तकावर आशिर्वादाची बरसात केली.त्या सुवासात मी पूर्ण न्हाऊन निघाले सर्व अंग मोहरून उठले सुधीर माझ्या समोर प्रत्यक्ष उभा राहून मला न्याहाळतोय अशी क्षणभर जाणीव होऊन मी लाजेने फांदीवरचा हात सोडवत मागे सरले.पहाटेच्या मंद वाऱ्याची झुळूक सुधीर च्या स्पर्शाने मनाला आणि शरीराला शुक्राची महादशा देऊन गेली……..
…………(२२)
प्राजक्ताच्या सड्यात, त्या कोवळ्या नाजूक फुलांच्या प्रत्येक पंचपाकळीत मला आता सुधीरचेच प्रतिबिंब दिसत होते. मी प्रत्येक प्रतिबिंब वेचून माझ्या पदरात पाडून घेत होते. शेंदरी देठाच्या कडांनी धरलेल्या गोल फेऱ्यात आणि सुधिरच्या प्रतिबिंबात मला माझ्या त्या गोड बासुरी वाजवणाऱ्या मोहक कन्हैय्याची झाक स्पष्ट दिसत होती. सभोवताली च्या पाकळ्यात, आता माझेच परकर पोलक्यातले रूप,कन्हैयाच्या बासुरीच्या तालावर गोलाकार फेर धरून त्याचेच गीत गात होते. ह्या नाजूक फुलांच्या दरवळलेल्या मंद सुवासात हरवलेल्या मनाने घरात येतांना, परडीत पूजेसाठी बागेतील मोगरा, गुलाब आणि जास्वंदी ची फुले आणून देवापुढील चांदीच्या थाळीत ठेवली. आज सुधीर ची भेट व्हावी आणि पुढील आयुष्यात तोच जोडीदार मिळावा म्हणून त्या दयाघनापुढे हातही जोडले.
घरातील सर्व कामे पटापट आटपून मी मोकळी झाले.माईंनी दिलेली राणी कलर ची साडी आणि त्यांच्या आवडीचा बंद गळ्याचा, लांब हाताचा ब्लाउज घालूनच मी आज त्यांच्या घरी जाणार होते.
बॅगमधून सुधीर चा तो जपून ठेवलेला फोटो परत परत काढून मी पाहत होते आणि आरशातले माझे देखणे रूपही दरवेळी न्याहाळत होते. कान्ह्याच्या वाटेकडे डोळे लावून बसणाऱ्या राधेच्या,आणि त्याच्या बांसुरीची ओढ लागलेल्या तिच्या मूर्तीची खरी ओळख आज मला झाली.
सुधीर आता कसा दिसत असेल गेल्या काही वर्षात त्याची प्रत्यक्ष अशी भेट झाली नव्हती. फक्त खुशालीच माईंकडून नेहमी कळत होती.मागे आई गेल्यावर तो भेटून गेला होता पण त्यावेळी प्रत्यक्ष भेटण्याच्या, बोलण्याच्या मनःस्तिथीत मीच नव्हते. आज तो दिसणार होता, भेटणार होता.
आज सुधीर आल्यावर माई मला निरोप पाठवून बोलावून घेणार होत्या. मी त्यांच्या घरी कधी जाते आणी सुधीरला बघते अशी माझी अवस्था झाली होती. माझ्या ह्या साडीच्या वेशात मी त्याला आवडेंन का? तो मला स्वीकारेल का? सदैव अभ्यासात गढलेला, स्वतःचे करिअर करण्याच्या नादात असलेला, श्रीमंत आईवडिलांचा, हा लाडका, देखणा लेक, माझ्या सारख्या परिस्तिथीने गरीब, त्याच्या पेक्षा कमी शिकलेल्या, त्यांच्या पेक्षा खालच्या जातीच्या मुलीचा स्वीकार करेल का? असे बरेच प्रश्नः मला पडले. पण आरश्यातल्या माझ्या रूपाने तो मला स्वीकारेल अशी ग्वाही देत मनाला आधार दिला.आतापर्यंत मी पाहिलेली भावी आयुष्याची स्वप्ने खरी ठरावीत ह्या करिता विधात्यापुढे पुन्हा एकदा हात जोडले.
त्याला कसं भेटावं, कसं सामोरं जावं ह्याचा सारखा विचार मनात येत होता. एकदा त्याच्या फोटोकडे आणि एकदा माझ्या चेहेऱ्याला आरश्यात न्याहळत माझ्या मनाला मी धीर देत होते. तो माझा व्हावा, त्याने माझा सर्वस्वी स्वीकार करावा ह्या आशेने ते त्याच्याच विचारात दंग झाले होते……
काय गंमत आहे पहा….. एरव्ही झुलणाऱ्या फुलाभोवती रुंजी घालणाऱ्या भ्रमरा ऐवजी,आज फ़ुलंच भ्रमरा साठी झुरत होते. सारखा एकच प्रश्नः ते त्या पहाटे पाहिलेल्या सुधिरच्या प्राजक्ताच्या फुलातील प्रतिबिंबाला विचारीत होते……..
…………(२३)
आमचे दुपारचे जेवण होऊन गेले पण माईंचा निरोप काही आला नाही. ह्या आधी दोन तीन वेळा मी ओटीवर सुध्दा येऊन गेले होते. पण सुधीर आल्याची चाहूल काही लागली नव्हती. वास्तविक तो सकाळी अकरा पर्यंत येईल असं माई मला म्हणाल्या होत्या. लेट झाला असेल पण तसा तो वेळेचा पक्का आहे,दुपारी जेवायला नक्कीच पोहोचेल, म्हणे पर्यंत आमच्या दारापुढून एक नवीन गाडी गेली. मी अंगणातुनच ओळखलं मित्रांसोबत बहुदा स्वारी आली असावी. पण कोण ते नक्की कळलं नाही. त्यात दोघेही दाढीत असल्यामुळे नक्की सुधीर ओळखता आला नाही. मी पुढे व्हरांड्यात येऊन बघितले तेव्हा त्यांची गाडी गेटमधून आत गेलेली पाहिली, म्हणजे सुधीरचीच गाडी असावी हे नक्की झाले. आता पर्यंत कधी येतो, येतो की नाही वैगेरे विचारांची चक्रे एकदाची थांबली.आता त्यांची जेवणाची वेळ झाल्यामुळे माईंकडे मला संध्याकाळीच जावे लागेल हे निश्चित झाले.
जेवणानंतर आराम करूनच माई बोलावणार म्हटल्यावर मी सुध्दा थोडी विश्रांती घ्यायची ठरवलं.
आता उरलेली सर्व कामे उरकूनच मी बिछान्यावर आडवी झाले.रात्रीचे जागरण आणि पहाटे लवकरच उठल्यामुळे आणि वाट पाहून पाहून जरा थोडासा थकवा जाणवत होता त्यामुळे डोळ्याला डोळा लागला आणि सुधीरच्याच स्वप्नात रंगले.
संध्याकाळी पाच च्या सुमारास माईंचा निरोप आला ज्याची मी अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते. आमचे घर सुध्दा त्यांच्याच प्रमाणे पूर्वाभीमुखी असून चार घरेच फक्त मध्ये आहेत.पण ही चार घरे ओलांडून तिथे जाईपर्यंत माझ्या जिवात जीव नव्हता. हे फक्त चार घरांचे अंतर मला चार कोसाचे जाणवले.ह्या आधी मी बरेच वेळा त्यांच्या घरी गेली आहे.पण आज मात्र माझ्या छातीत धडधडत होते. सुधीर ची कधी नजरानजर होईल सांगता येत नव्हते. बाहेर ओटी वरल्या झोपाळ्यावर माईंनी माझे स्वागत केले आणि माझी गाडी रुळावर आली. माईंच्या आवडीचीच साडी मी नेसल्यामुळे त्यांना बरं वाटलेले दिसले. आत हॉल मध्ये बसलो आणि सुधीर त्याच्या रूम मधून बाहेर आला, त्याच्या नजरेला नजर देण्याचे धाडस मात्र मला झाले नाही. छाती अजूनही धडधडत होती.शरीराचा कंपही जाणवत होता ….
“शालन, अगं किती मोठी झालीस” ह्या त्याच्या उद्गारावर मलाच कसेसे होऊन लाजेने, मी अंग चोरून बसले.तशी माईंनीच “अगं अशी लाजतेस काय ? सुधीर काय पाहुणा थोडाच आहे.” म्हणून मला थोडा धीर दिला.
सुधीरने त्याचा बॅचमेट ‘प्रकाश’ ची ओळख करून दिली. मगाशी गाडी त्यानेच चालवली असावी असे माझ्या लक्षात आले.प्रकाश उद्या परत गाडी घेऊन मुंबईला जाणार असल्याचे कळले.तसेच प्रकाश त्याचा अत्यंत जिवाभावाचा मित्र असल्याने पुढे बहुधा ते दोघेही ‘कॅनडा’ ला पुढच्या शिक्षणा साठी जाण्याचा त्यांचा बेत असल्याचे वैगेरे गप्पां मधून माझ्या लक्षात आले. त्याची शिक्षणातील गती पाहून मलाही खूप अभिमान वाटला.आणि मनाने त्याला अधिकच वरले. फोटोत त्याला पाहिल्या पासून मी त्याचीच झाले होते. आत्ता इच्छा असूनही सुधीरला मी मान वर करून बघण्याचे धाडस होत नव्हते. ओझरते पाहून सुद्धा माझे मन प्रफुल्लीत झाले. हृदयात कोरलेल्या त्याच्या मूर्तीतच मला माझा कान्हा दिसू लागला. त्याच्या यशाच्या मखमली तुऱ्यात आता मला माझीही प्रतिमा दिसू लागली.
कान्ह्याचे ते दिव्य, लोभस रूप पाहून माझे देहभान हरपले.
गोपिकांना वाटणारी त्यांची सात्विक भक्ती, ते आपुलकीचे प्रेम, राधेचे आणि मिरेचे ते अलौकिक प्रेम आठवून माझ्या मनात सुधिर च्या नुसत्या सानिध्याने सुद्धा प्रेमाच्या भावना द्विगुणित झाल्या……..
…………(२४)
“शालन अग कसला इतका विचार करते आहेस?” माईंच्या माझ्या खांद्याला झालेल्या प्रेमळ स्पर्शाने माझ्या स्वप्नातून मी जागे झाले.
“सुधीर तुझ्यासारखीच ही सुद्धा चांगली गाते,आणि कॉफी तर छानच करते” माईंनी असे त्यांना सांगून आता मलाच कॉफी करण्याची गळ घातली. “आपलंच घर असल्यासारखे वाग बिलकुल संकोच करू नको” ह्या माईंच्या उत्तेजनाने माझीही भीड चेपली.माझ्या मनालाही हेच हवे होते. ह्या घरची मी “सून” व्हावी हेच तर माझे स्वप्न आहे. माई, दादांची काहीच हरकत दिसत नाही. प्रश्नः फक्त माझ्या बाबांचा, आणि सुधीरला माझ्या बद्धल काय वाटते, हे जाणण्याचाच होता. सुधीर चे पुढील शिक्षण, आणि तो सेटल होणे तितकेच महत्वाचे होते ह्याची मला जाण होतीच. त्यात मध्ये वर्षेही जातील, आत्ताच लग्नाचा विचार त्यांच्या कडून होणं कठीण आहे. पण सुधीर चे मनोगत मला कळायलाच हवे.तो महिनाभर तरी येथे राहणार होता, त्यामुळे मी निश्चिन्त होते.
“यु हॅव अ व्हेरी ब्युवटिफुल हँड टू” माझ्या हातची कॉफी सुधीर सकट सगळ्यांनाच आवडली. माझ्या दिसण्याची आणि कॉफीची प्रशंसा एकाच वाक्यात करतांना त्याने माझ्याकडे टाकलेला कटाक्ष मलाही घायाळ करून गेला. त्याचे ते वाक्य आणि नजरेतली जवळीक माझ्या मनावर प्रेमाची फुंकर मारून गेली.माझे गालातल्या गालातले हसणे, डाव्या गालावरची खळी आणि कपाळावरची बट बरेच काही बोलून गेली असावी.
माईंना मी आवडायचीच, आता सुधीरला सुध्दा मी आवडेंन असा आत्मविश्वास मनात जागा झाला.
परकर पोलक्यातली त्या वेळची सुधीर बरोबर भातुकली खेळणारी, वाळूत त्याच्या रुतलेल्या पायावरची रेती बाजूला सारून खांद्याचा आधार देऊन त्याला त्यातून मोकळे होण्यास मदत करणारी.समुद्रावर त्याच्यासाठी वाळूचा किल्ला बांधणारी, त्याच्यासाठी निरनिराळ्या आकाराचे, रंगीत शंख, शिंपले ओटीत साठवून त्याला प्रेमाने देणारी, त्यांच्या वाडीत काकांबरोबर सुधीरला फुलझाडे लावायला मदत करणारी, शर्टवर जांभळाचे डाग पडू नये म्हणून काळजी करणारी,आणि बागेतील फुलांचे हार करून त्याला पूजेसाठी देणारी,लहान पणीची त्याची “मालन” आता वयात येऊन यौवनाच्या उंबरठ्यावर प्रेमाची माला हातात घेतलेली शालीन “शालन” त्याची सर्वस्वाने कधी होणार ह्याचीच आता वाट पाहत होती……..
…………(२५)
कॉफी नंतर माईंबरोबर आम्ही सर्व मागच्या वाडीत फेरफटका मारून तेथे बागेमध्ये बसून सुर्यास्त पाहत होतो. झोपाळ्यावर सुधीर आणि प्रकाश आणि लॉन वर दादा,माई आणि मी गप्पात रंगलो.माझ्या शिक्षणा संबंधी, सुधीर च्या पुढील शिक्षणा संबंधी सुध्दा चर्चा झाली.माझ्या आईच्या लवकर जाण्यावर आणि त्यामुळे माझ्या अभ्यासावर झालेल्या परिणामाचा विषय निघाला तसं मला भरून आलं आणि मी हुंदका आवरू शकले नाही.माईंनी मला जवळ ओढत पाठीवरून हात फिरवला, आज आई असती तर कदाचित माझं जीवनच बदलून गेलं असतं.
सुधीर ने माझ्या जवळ येत हळूवार आणि प्रेमळ शब्दात माझे सांत्वन करून मला शांत केले.
त्यांने विषय बदलला आणि मावळतीच्या सूर्याकडे आमचे डोळे लागले. कामतांची ही वाडी पश्चिमेला असल्यामुळे समुद्राच्या पार, क्षितिजावरचे हे सूर्यास्ताचे दर्शन फारच विलोभनीय असते. जस जसा सूर्यास्त होत होता, माझ्या आईच्या कमतरतेचा ,तिच्या दुराव्याचा, तिच्या आठवणींचा अस्तही माईंनी माझ्या पाठीवर फिरवलेल्या मायेच्या हातानेच हळू हळू होत होता.
क्षितीजाच्या त्या पिवळसर बदामी आकाशाच्या पार्श्वभूमीवर सुधीर चे कोरीव दाढीतले ते रूप त्याच्या धारदार नाकामुळे अधिकच खुलून दिसत होते. ‘मराठी साम्राज्याचा स्वामी’ आणि माझ्या मनातील माझ्या आयुष्याचा,माझ्या होणाऱ्या ‘भावी संसाराचा हा स्वामी’ ह्यांची कुठेतरी मनात मी तुलना करीत होते.तीच भारदस्त छाती,तेच धारदार नाक, तीच कोरीव दाढी. ‘महाराजांचे’ ते ‘हिंदवी साम्राज्यातील’ तेजस्वी रूप आठवले आणि आता सुधीर चे हे ‘माझ्या मनोसाम्राज्यवर’ आधिपत्य गाजवणारे रूप दोन्हीही मी माझ्या मनाच्या तराजूत तोलत होते. माझ्या हृदयातील ह्या नाजूक भावनांची कंपने छेडून माझ्या जीवनाचे प्रीतिगीत स्वरबद्ध करायला सुधीर सारख्या संगीतकाराचीच मला गरज आहे. अशी सुरिली व्यक्ती माझा जीवनसाथी म्हणून लाभणार आहे, ह्यासाठी त्या निर्मित्याचे,त्या कर्त्या करवीत्या परमेश्वराचे मी मनोमन आभार मानले आणि हृदयीच्या कोमल भावनांची ओंजळ मी मावळतीच्या सुर्यदेवाला आणि माझे ‘प्रेमपुष्प’ सुधीरच्या चरणी वाहिले. अजून माझे लग्न झालें नसले तरी असे कुटुंब, जे मला त्यांची सून करून घ्यायला उत्सुक आहेत, सुधीर च्या नजरेतले माझ्या साठीचे असलेले स्थान त्याच्या सारखा सुशिक्षित,देखणा, श्रीमंत, आणि तरीही विनयशील असा पुरुष पती म्हणून आणि माई,दादांसारखे सासू सासरे जर मला लाभत असतील तर माझ्यासारखी भाग्यवान मीच म्हणायला काय हरकतः आहे……..
…………(२६)
सुधीरच्या ह्या पुरुषी तरीही मोहक रूपाने मी भारावून गेले.
सुधीर हुशार, मेहनती आणि महत्वाचे म्हणजे आई वडिलांच्या आज्ञेत असलेला त्यांचा लाडका लेक,त्यामुळे अश्या घरात प्रवेश मिळायला काहीही करण्याची माझ्या मनाने तयारी दर्शविली. तें भाग्य मला लाभावे ह्या करिता मनोमनी मी परमेश्वराला साकडे सुद्धा घातले.
सुधीर बध्दल वाटणारे आकर्षण आणि एक अनामिक ओढ, हे माझ्या हृदयाचे, त्याच्या हृदयाशी असलेले जन्मोजन्मींचे नातेच असावे असे मला मनोमन वाटू लागले. सूर्यास्ताच्या वेळी मला आलेल्या आईच्या आठवणी नंतर माझे सांत्वन माईंबरोबर, सुधीर ने माझ्या जवळ येत,ज्या संवेदनशील शब्दात,आपुलकीने आणि प्रेमाने केले तेव्हाच जाणता अजाणता आम्ही एकमेकांकडे आकर्षिले जातोय, आणि त्याच्या नजरेलाही माझ्या नजरेची ओढ असल्याचे कुठेतरी मनाला स्पर्शीले होते….
भावी संसाराच्या स्वप्नात रमत, मी दिवे लागणीच्या समयी घरी आली खरं,… पण मन अजूनही कामतांच्या सानिध्यात रमले होते.देवघरात येऊन देवापुढे निरांजन आणि लामणदिवा दोन्हीही लावले आणि कृतज्ञतेने देवापुढे हात जोडले. शांत, शीतल, उजळलेल्या प्रकाशात आता माझ्या कन्हैयाच्या मोरपिसाचा तुरा आणखीनच खुलला.त्याच्या बासुरीच्या गोड स्वरात आता सनईचे मधुर स्वर मिसळत, माझ्या ह्या माहेरच्या ‘कामेरकरांच्या’ घराचे आणि चार घरे पुढे असलेल्या ‘कामतांच्या’ घरातील अंतर एकदम नाहीसे होऊन मनोमन मी आल्या पाऊलेच, सुधीर च्या पावलांवर एक एक पाऊल टाकीत, सुधिरच्या देवघरात कधी पोहोचले काही कळलंच नाही. त्याच्या सहवासात, त्याच्या बरोबरीनेच दोन्ही हात जोडून मी कामतांच्या कुलदैवत “श्री देवकी कृष्णा” पुढे नतमस्तक झाले. “श्री देवकीच्या” डाव्या कडेवरील माझा गोबऱ्या गालांचा, छोटासा, गोंडस ,लोभस, खेळकर कान्हा माझ्याकडे पाहून स्मितहास्य करीत माझ्याकडे, माझ्या कडेवर येण्यासाठी हात पसरून पुढे येताना कान्ह्याचे ते लोभस रूप पाहून माझे देहभान हरपून गेले……..
…………(२७)
सुधीरच्या आठवणीत रमलेल्या मनाचा विरस बाबांच्या आवाजाच्या धारदार आणि तिरकस बोलण्याने झाला. माझा माईंच्या कडून घरी यायला झालेला उशीर आणि त्यात आज सुधीर आलेला त्यांना गावकऱ्यांकडून कळल्यामुळे त्यांचा पारा जरा चढलेलाच होता. मुळात माझे,आणि काकांचे कामतांकडे असलेले सख्य त्यांच्या डोळ्यात नेहमीच खुपत आलेले आहे. माझी आणि माझ्या आईची सुध्दा सुधीर बद्धलची ओढ, त्यात आई करीत असलेले सुधीर चे कौतुकही त्यांना खपत नसे. वास्तविक अख्या गावात कामतांना असलेला मान हे सुद्धा त्यांच्या नाराजीचे मुख्य कारण होते, त्यात आपला सख्खा मोठा भाऊ हा सुद्धा त्यांना धार्जिणा, त्याच्या मुळे तो सर्व राग ते माझ्यावर काढीत असत.
त्यांना जेवायला वाढून मी तशी फारशी न जेवताच माझ्या खोलीत गेले.जातांना आईच्या फोटोला नमस्कार करतांना आईच्या डोळ्यातही माझ्या बद्धलची करुणेची झाक मला जाणवली. आज आई असती तर सुधीरला आणि माई, दादांना सुध्दा तिने चहापाण्याचे आमंत्रण दिले असते.
काका अविवाहित राहिले पण माझे मात्र ते सख्या मुली प्रमाणे लाड करायचे.दोन सख्खे भाऊ पण त्यांच्या वागण्यात, विचार सरणीत मात्र खूपचं अंतर होते.
बिछान्यावर पहुडले आणि मस्त गेलेल्या संध्याकाळ बद्धल देवाचे आभारही मानले. सुधीर चे ते देखणे मोहक रूप, माई, दादांचे माझ्यावर असलेले प्रेम, माझ्या अंतर्मनाला, माझ्या सुधीर वरच्या मूक प्रेमाला त्यांच्याकडून मिळणारा दुजोरा, हा सर्व माझ्या भाग्याचाच भाग होय. तरीही मनात कुठे तरी बाबांच्या वागण्याची पाल चुकचुकायची.
मनातले वाईट विचार झटकून सुधीर चा फोटो हातात घेतला आणि भविष्याच्या गोड स्वप्नात रमून पहाट कधी झाली काही कळलेच नाही.
नेहमी प्रमाणेच सकाळी प्राजक्ताची गोड नाजूक फुले गोळा करून आज मंगळवार असल्याने गणपती साठी जास्वंदीच्या झाडाकडे वळली आणि व्हरांड्याच्या जवळून कामतांच्या घराकडे नजर वळवली तसे प्रकाश आणि सुधीर समुद्राकडे जाताना दिसले. कामतांच्या घरातून बाहेर पडल्यावर डावीकडे उत्तरेच्या दिशेला भाटावरून
बाजूलाच समुद्र किनारा असल्याने,ते दोघे बहुदा मॉर्निंग वॉक साठी सकाळी सकाळीच बाहेर पडले असावेत.
जर ते गावात फेरफटका मारायला गेले असते तर आमची नक्कीच दृष्टादृष्ट झाली असती. मला उगाच चुकल्या चुकल्या सारखे झाले. पण तरीही तो सिद्धी विनायक माझ्यासाठी नक्कीच त्याची भेट घडवून आणील ह्यात शंकाच नाही.
देवपूजेनंतर लवकर लवकर सर्व कामे उरकून घेतली. मनात आले, जर आज सुधीरच आमच्या कडे आला तर….
आरशापुढे तयार होताना माझे हे ध्यान बघून माझे मलाच हसू आले. सुधीरही मला न्याहाळतोय ह्या कल्पनेने मी मोहरूंन गेले आणि पदर सावरला. त्याला लवकरात लवकर एकांतात गाठून माझे मनोगत, माझे हे प्रेमाचे गुपित, प्रत्यक्ष भेटीत सांगावे असा माझा मानस होता. पण स्त्री सुलभ लज्जेने आणि भीतीपोटी त्याला चिठ्ठीच लिहावी असेही मनात येऊन माझी द्विधावस्था झाली. लिहायला बसलेही पण काहीच सुचत नव्हते. त्याची मूर्ती डोळ्यापुढे येऊन त्याच्या नजरेत माझी प्रतिमा दिसते का हेच शोधण्यात बराच वेळ निघून गेला असावा….. बाबांच्या मोठ्या आवाजात हाक मारण्यांने माझी तंद्री भंगली……..
…………(२८)
आज प्रकाश गाडी घेऊनच मुंबईला परत जायला निघणार होता असं त्यांच्या बोलण्यातून मला कळले होते. माईंचे बोलावणे येण्याची मी वाट पाहत होते. मन तर त्यांच्याकडे जायला उत्सुक होते. पण बाबांनी मला दुकानात बसायला सांगून ते बाहेर काही कामासाठी निघून गेले. माईंकडून बोलावणे आले तर मी दुकान सोडून कसे जाऊ शकते ह्या विचाराने जीवाची घालमेल झाली….. पिंजरेतल्या मैनेसारखी माझी अवस्था होऊन मनाची अस्वस्थता वाढली. मी त्यांच्याकडे जाईन म्हणूनच बहुदा बाबांनी मला मुद्धाम असे दुकानात अडकवून ठेवले असावे.
दुपारी बाबा जेवणाच्या नंतर पुन्हा मला दुकान सांभाळायला सांगून बाहेर निघून गेले. परत तीच अवस्था,आता काय करायचं ह्या विचारात असतांनाच काका मला बोलवायला आले.
“तू निघ,काळजी करू नकोस मी सांभाळतो.” म्हणाले आणि मी पडत्या फळाच्या आज्ञेने लगभग निघाले.
अश्यावेळी डोक्यावर फणी फिरवायचे भान देखील मला राहिले नाही.
माई माझीच वाट पाहत होत्या.
प्रकाशचे जाणे आणखीन दोन दिवसांनी वाढले असल्याचे माई म्हणाल्या.म्हणजे मला हवा तसा एकांत मिळून सुधीरशी बोलणे होणे कठीण होणार ह्या विचाराने मि थोडी हिरमुसली. माईंच्या नजरेतून ते सुटले नव्हते… ‘कणकेश्वराची’ जत्रा उद्याच असल्याने माईंनी मला सुद्धा त्यांच्या बरोबर येण्याची विनंती केली. मला ते नक्कीच आवडले, पण प्रश्नः बाबांच्या परवानगीचा होता.सकाळी जाऊन संध्याकाळी परत यायचे होते. पण तरीही बाबा पाठवतील की नाही शंकाच होती. माझ्या मनीं कणकेश्वराच्या देवळात सुधीर बरोबर हात जोडण्याचा योग येणार ह्या कल्पनेने मी सुखावले.
पण ‘त्या विश्वेश्वराच्या’ मनात मात्र तसे काही नसावे.दादांनी निरोप देऊन काकांना पाठविले खरे पण बाबांना ते मान्य नव्हते, उलट ते पण सरपंचा बरोबर जत्रेला जाणार होते,म्हणून माझे जाणे त्यांनी नाकारले. पुनः एकदा माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली…
ते सर्व उध्या सकाळीच निघणार होते. रात्रभर मला तशी शांत झोप लागलीच नाही.उगचाच आपण एकटे तर पडणार नाही न अशी शंका आली. आज आई असती तर तिने मला नक्कीच जाऊ दिले असते, एकीकडे भाग्य कामतांच्या रुपात माझ्या भविष्याच्या मार्गावर फुले पसरत असताना, बाबा मात्र कारण नसतांना त्याच मार्गावर काटे पेरीत होते. सरपंचाच्या ‘जीवनने’ सुद्धा ह्या खेळात बहुदा कप्तानाचि भूमीका स्वीकारली असावी असा मला दाट संशय येत होता.
सकाळी सकाळी लवकर उठून मी आत बाहेर येरझाऱ्या घालून जातांना त्यांची भेट होईल ह्या आशेने अंगणातच, जास्त वावरत होते.आज फुलांनीही उमलण्याचे विसरले असावे. रोज उत्साहात टवटवीत फुलून सुगंधाने माझ्या मनाला भारावून टाकणारी फुले आज कोमेजून गेल्या सारखी दिसत होती. मला वाटतं आपल्या मनात चाललेल्या विचारांचा ह्या झाडांवर,फुलांवर,आणि पक्षांवर सुद्धा परिणाम होत असावा.आपल्या सारख्याच भावना आणि प्रेम ते ही जपत असावे.
सुधीरची गाडी गेट मधून बाहेर पडतांना पहिली आणि मी आनंदले,आज सुधीर गाडी चालवत होता त्याच्या मागे माई बसल्या होत्या. ते दोघेही आमच्या घराच्या जवळ आल्यावर सुधीर ने ‘डबल हॉर्न’ दिला, माईंनी खिडकीतून माझा हात हातात घेऊन, मि बरोबर येत नाही ह्याची खंत व्यक्त केली. दादाही माझ्याशी बोलले, प्रकाशनेही मान वळवून माझ्या कडे बघून स्मित हास्य केले. मला सुधीरशी बोलायचे होते.पण का कोणास ठाऊक सुधीर ने काच खाली न घेताच,माझ्याकडे दृष्टिक्षेप न टाकताच, आणि माझ्याशी एकशब्दही न बोलता गाडी चालू करून, माझ्या उत्साहावर पाणी फिरवीत, मागे ‘विरहाचा धुरळा’ माझ्या नयनी उडवत ते सर्व निघून गेले. मी जागच्या जागीच हिरमुसली होऊन थबकले,त्याच्या बरोबर एकत्र जाणे सोडाच पण पदरी त्याचा दुरावा, नाराजी आणि अबोलाही आला. माझ्या डोळ्यात टचकन पाणी तरळले. दोन्ही डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी माझ्या छातीवर ओंघळत केलेला हार मनोमनी मी सुधीर च्या गळ्यात सरकवला….
सुधीर बरोबर पाठवायचा कणकेश्वरासाठी गुंफलेला सफेद चाफ्याचा हार, माझ्या कंप पावलेल्या हातातून निसटून बदामाच्या पानांतून सरकत माझ्याच पायावर पडला…..असं व्हायला नको होतं……
खिन्न, एकाकी मनाने मी घरात आले, एकटे पणा खायला उठला, असं माझ्या हातून काय घडलं?, मी असा कोणता गुन्हा केला की त्याने असा अबोला धरीत माझ्याशी दुरावा करावा?……..
…………(२९)
सबंध दिवस असा एकटे पणाच्या आगीत होरपळत काढला.आजचा हा दिवस सुधीर आणि फॅमिली बरोबर राहून त्या परमेश्वराच्या सानिध्यात त्या ‘कणकेश्वराच्या’ चरणी घालवण्याचे चालत आलेले भाग्य बाबांच्या हेकट पणा मुळे आणि सरपंचांच्या कारवाया मुळे माझ्या मनसुभ्यावर पाणी फिरवून गेले. सुधीरच्या नाराजीला, माझं काहीच चुकले नसतांना मी कारणीभूत ठरले का? असा विचार सारखा सारखा मनाला छळत होता. वास्तविक सुधीरच नव्हे तर सर्व फॅमिली ही सुसंस्कृत आणि समजुतदार असतांना सुधीर ने माझ्याशी असं वागावं ह्याच मलाही नवल वाटलं. प्रत्यक्ष भेटीतच माईंकडून खरं काय ते कळेल. पण त्याची वाट पाहण्याशिवाय गत्यंतरच नव्हते.
आज घरातही फारसे काही काम नव्हते.एकटी साठी जेवण करायची पण इच्छाच नव्हती. दुकान सांभाळत नुसती बसून होते. दुकानातील गुळशेंगदाणे, आणि बिस्किटे खाऊन दिवस ढकलायचा बेत मी केला.
दुपारी गावातील फारसे कोणी गिऱ्हाईक दुकानावर येत नसते.म्हणून मी आतल्या खोलीत थोडी विश्रांती घ्यावी ह्या उद्धेशानी उठून वळायला आणि दुकानाच्या समोर तो ‘काळ सर्प’ दिसायला एकच गाठ पडली. आज बाबा घरात नाहीत त्याच्याच बापाबरोबर जत्रेला गेलेत,अर्धा अधिक गाव जत्रेला गेलाय,शिवाय कामत फॅमिलिही नाही. मी दुकानावर एकटीच असणार, ह्याचा गैरफायदा उचलायचा ह्या हिशोबानेच बहुदा ह्याची वाकडी पाऊले आमच्या घरी वळली असावी. मी त्याची ती जीवघेणी विषारी नजर चुकवीत पटकन आतल्या खोलीत गेले. पण दुकानाचा दिंडी दरवाजा उघडाच होता त्याचा फायदा घेऊन तो ‘काळतोंडा’ पटकन दुकानांतूनच आत शिरल्यावर, मी त्याला ढकलून दुकानातून बाहेर पडले आणि जिवाच्या आकांताने पळत सुटले. आता काका ‘कणकेश्वराच्या रुपात’ त्याचा समाचार घेण्यासाठी दुकानाकडे धावल्याचे पाहून तो नराधम आल्यावाटे माघारी पळत सुटला. नाव ‘जीवन’ पण आज त्याच्या रुपात ‘मृत्यूच’ माझ्या दारी आला होता पण त्या कणकेश्वराने काकांच्या रुपात त्याचा समाचार घेऊन त्याला परत पाठविला.आज मी बरोबर नसूनही बहुदा ‘त्या’ फॅमिलीच्या ‘देवदर्शनानेच, त्यांच्या हाथ जोडण्यानेच’ माझ्यावरचे संकट टळले असावे.
काकांना घडला प्रकार लक्षात येऊन त्यांनी बाबांची कानउघाडणी करण्याचे ठरवून ते परत त्या घरी निघून गेले. माझ्या अंगाची थरथर अजूनही पूर्ण थांबली नव्हती.आज त्या कर्त्या करवीत्याने मला दर्शनाचा योग न दिल्याबद्धल सकाळी जे वाईट वाटले होते, त्याची भरपाई त्याने काकांच्या रुपात अवतार घेऊन माझी अब्रू वाचवण्यात केल्याने, देवघरात जाऊन त्याच्या पुढे साष्टांग दंडवत घालून नतमस्तक झाले.
सकाळी लावलेला लामण दिवा तसाच तेवत होता. संध्याकाळी लावायचे तुपाचे निरांजण आणि मोठी समई सुद्धा आत्ताच लावली. “अधर्म कसे,कधी आणि कोणत्याही रूपात उभे राहीले तरी त्याला शह देण्यासाठी परमेश्वरही कोणाच्या नाय कोणाच्या रुपात प्रकट होतोच” ही आईची शिकवण आज तिच्यापुढे हात जोडताना लक्षात आली……..
…………(३०)
संध्याकाळी पुन्हा परत येतांना आमच्या दरवाज्या समोर सुधीर ने सकाळ सारखाच ‘डबल हॉर्न’ दिला. मी मनोमन सुखावले, पण ह्या वेळी पुढे ओटीवरुन अंगणात येण्याचे धाडस माझ्या मनाने केले नाही. सकाळच्या धक्क्यातून अजून मी सावरले नव्हते. पण सुधीरने आत्ता माझें लक्ष वेधण्यासाठी हॉर्न दिला आणि माझी कळी पुन्हा खुलली….
माईंकडून निरोप आला. मनाला उभारी आली. लगबगीने मी तयार होऊन निघाले. ह्यावेळी झोपाळ्यावर सुधीर एकटाच बसला होता. अधीर होऊन बहुदा माझीच वाट पाहत असावा. पण मी मान वर न करताच त्याच्या नजरेला नजर न देताच, ‘माईंना’ हाक मारत माजघरात प्रवेश केला.
वास्तविक एरव्ही माझ्या मनाने, त्याला नजर देऊन स्मित हास्य केल्या शिवाय मला पुढे जाऊच दिलें नसते. पण मी बरीच हळवी असले तरी मानी सुद्धा आहेच.मनाने अनुराग व्यक्त करायलाच हवा होता. आता जो पर्यंत त्याच्या सकाळच्या वागण्याचे माझ्या मनाला समाधान कारक उत्तर मिळत नाही, तो पर्यंत ते त्याच्या समोर खुलणे कठीण…
माईंनी प्रसाद देण्यासाठी मला बोलावणे धाडले होते. माझा मूड काहीसा ठीक नाही हे त्यांच्याही लक्षात आले. “अग काय बिनसलं आहे का काही?” त्यांच्या प्रश्नावर माझे डोळे भरल्याचे पाहून त्यांनी माझा हात हातात घेतला. मला भरून आले. पण तरीहि त्यांची ट्रिप कशी झाली, देवदर्शन व्यवस्थित झाले का? वैगेरे चौकशी मी पाणावलेल्या नेत्रांनी केली. शेवटी पुन्हा त्याच आईच्या मायेने म्हणाल्या”अगं सकाळचं तुझ्या मनाला लागलेले दिसतंय, त्याने तुझी विचारपूस करायला हवी होती. पण तू सोबत येणार नाहीस हे काल कळल्यापासून त्याचा विरस झाला होता. तो मूड मध्ये नव्हताच, तू येणार नाहीस म्हणून उलट ट्रिप सुद्धा रद्ध करायचे म्हणत होता.प ण प्रकाशलाही आम्ही जत्रेसाठी ठेवुन घेतल्याने, जाणे भाग होते. अगं, मी तो चांगल्या तऱ्हेने पास व्हावा ह्या साठी नवसही बोलले होते. म्हणूनच नाईलाजाने तो तयार झाला. सकाळी मी त्याला त्याच्या वागण्याबद्धल बोलले, तेव्हा त्याच्या लक्षात त्याची चूक आली मला तो “सॉरी” म्हणालाच, पण तुझीही माफी मागण्यासाठीच त्याने ‘माझ्या तर्फे ‘तुला लगेच बोलावणे धाडले.”
आता माझी चुक पण माझ्या लक्षात आली. समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचे आपण आपापल्या परीने मूल्य मापन करीत असतो. ती व्यक्ती अशी का वागली, असे वागायला काय कारण झाले असेल, त्या वेळी त्या व्यक्तीच्या मनाची घडण काय होती,वैगेरे आपण काहीच लक्षात न घेता, त्यांनाच दोष देऊन मोकळे होतो.पण आपल्या मनाला जश्या साध्या साध्या गोष्टी लागतात,आपण दुःखी होतो,तश्या दुसऱ्यांच्या मनालाही लागत असतील हे आपण लक्षात घेत नाही आणि मग गैरसमज होऊन संबंध बिघडतात…..
मी ओशाळले, आत्ता आत येत असताना माझ्या वागण्याचे त्याच्याही मनाला तेव्हढेच लागले असणार ह्यात शंकाच नव्हती, उलटपक्षी मिच खरं तर त्याची माफी मागायला हवी, म्हणून पटकन उठले त्याच वेळी तो ही बहुदा झोपाळ्यावरून उठला असल्याने, उंबरठ्यावर आमची टक्कर होणे फक्त शिल्लक राहिले होते.दोन वाहनांची टक्कर व्हायच्या आधी कचकन ब्रेक लावतात तसे आम्ही एकाच वेळी पायाला खिळलो आणि एकमेकांवर आदळणार म्हणून बाजूच्या भिंतीचा आधार घेऊन तोल सावरला. दोघांनीही एकाचवेळी, एकमेकांना “सॉरी” म्हटले. आणि इतक्यात प्रकाश सुद्धा सुधीर च्या खोलीतून बाहेर आला आणि खो खो हसत सुटला, माईंनाही हसू आवरेना….
हिच वेळ होती उमलत्या अनुरागाच्या कळीचे प्रीतीच्या फुलात फुलून, बहरून,त्याचा सुगंध दरवळण्याचे. हृदयाच्या कंपनातून जाणावणाऱ्या तरंगातून हलकेच स्मित ओठावर फुलून नजरेच्या कवडश्यात सुधीर च्या प्रतिमेत एकजीव होऊन विचारत होते……..
…………(३१)
मगाचच्या त्या गमतीदार प्रसंगाने घरातील वातावरणात बराच उत्साह निर्माण झाला होता. सुधीर ने बोलून दाखविले नसले तरी आज मी त्यांच्या बरोबर येणार नाही, असे काल कळल्यापासून त्याचा गेलेला मूड आज मी त्यांच्या कडे गेल्यामुळे परत आल्याचे सर्वांच्याच नजरेत मला दिसले, माई तसे म्हणाल्या देखील. आपल्याला आवडती व्यक्ती आपल्या सान्निध्यात असल्या नंतर मनाला मिळणारी उभारी ही शब्दात वर्णन करता येत नाही. जी ओढ मला वाटते तीच ओढ त्याला माझ्या साठी वाटत असल्यामुळे माझ्या मनाला खूप दिलासा मिळाला. लहानपणापासूनची त्याची मैत्री, यौवनात पदार्पण केल्यावर जीवाला वाटणारी ओढ, त्याच्या शिक्षणातील हुशारी बद्धल त्याचा वाटणारा आदर, आणि माझ्या बद्धलची त्याची अनामिक ओढ, ह्यामुळे माझे मन अक्षरशः त्याच्या वर आदरयुक्त फिदा झाले होते.
आज माझ्यावर ओढवलेल्या “त्या प्रसंगा” बद्धल माईंकडे बोलावे असं सारखं माझ्या मनात येत होते. पण ही गोष्ट आत्ताच सांगून ह्या आनंदावर पाणी फिरवावे असेही मला वाटत नव्हते. प्रकाश दोन दिवसांचा पाहूणा होता. नंतर माईंना विश्वासात घेऊन सांगू म्हणून मी ते टाळले. त्या आधी काकांना सुद्धा एकदा विचारावे, अथवा काकांनी बाबांच्या कानावर घातल्यावर बाबांचे त्यावर काय म्हणणे आहे हे पाहूनच माई, दादांच्या कानावर घालावे, असाही एक विचार मनात आला.
माईंकडे कॉफी पिऊन आम्ही सर्व गार्डन मध्ये गप्पा मारीत होतो. सुधीर खूप चांगलं गायचा, तसेच माझा आवाजही उत्तम असून मी सुद्धा चांगली गाते हे अगोदरच माईंनी सर्वांना सांगितले असल्याने, आज खास प्रकाश च्या आग्रहास्तव माईंनी मला गायचा आग्रह केला, मी त्वरित म्हणाले, बरेच वर्षात सुधीर चे गाणे ऐकले नाही, त्याने सुरवात करावी, मी त्याला प्रतिसाद देइन. माईंनी माझी बाजू उचलून धरली, दादांनीही त्याला दुजोरा दिला. पण सुधीर म्हणाला “नाही नाही अगोदर शालन म्हणेल आणि नंतर मी”
मी सुधीरच्या नजरेत पाहून त्याला नजरेतूनच त्याने अगोदर म्हणावे, अशी खूण केली. त्यावर त्यानेही मान डोलावली.
“अरे सुधीर, शालन म्हणतेय म्हणून तूच आधी सुरवात कर पाहू ” असे माई म्हणाल्या. त्यावर “माझ्या गाण्याला प्रतिसाद मात्र शालन ने लगेच द्यावा ” ह्या त्याच्या विनंती वजा आर्जवी स्वराला मी सुद्धा नजरेतूनच “हो, नक्कीच ” म्हणत तालात मान डोलावली.
आता सुधीर कोणतं गाणं म्हणेल आणि मी तेच गाणं पुढे कसं म्हणणार ह्याची सर्व वाट पाहत होते……..
…………(३२)
आमचे दोघांचे एकत्रित गाणे सर्वांनाच खूप आवडले .
काकांना सुधीर ने व्यक्त केलेल्या भावनांमुळे त्याला माझ्यात असलेला ‘इंटरेस्ट,’ बघून आपली पुतणी बहुधा ह्याच घरात येणार ह्याची पूर्ण खातरजमा होऊन ते मनोमनी आनंदल्याचे त्यांच्या डोळ्यात मला जाणवले.
सुधीर कधी जास्त बोलायचा नाही पण माझ्या बद्धल त्याच्या मनात दडलेले प्रेम गाण्यातून का होईना तो व्यक्त करू पाहत आहे, हे बघून दादाही सुखावले. सुधीर ने बहुधा अगोदरच प्रकाश ला माझ्या बद्धलच्या भावना सांगितल्या असाव्या,कारण मी गाणे गातांना, प्रकाश माझ्या नजरेतील भाव टिपत असल्याचे मला त्याच्याकडे ओझरते पाहतांना जाणवले होते.एकूण काय तर मी सुधीर च्या भावनांना काय प्रतिसाद देते ह्याची सुधीर सकट सर्वांनाच उत्सुकता असावी. एक गाणे संपते न संपते तोवर लगेच सर्वांनी खूप टाळ्या वाजवून पुन्हा एखादे असेच गीत आम्ही दोघांनी मिळून गावे म्हणून खूप आग्रह केला. पहिल्याच गाण्यात आमचे सूरच नुसते लागले नव्हते तर हृदयाच्या कंपनातून मनाच्या तारा सुद्धा छेडल्या गेल्या होत्या.
आता ह्या पुढील गीतात सुधीर काय व्यक्त होतोय ह्याची माझ्या सकट सर्वांनाच उत्सुकता होती.
सुधीरने पुन्हा मीच सुरवात करावी असा आग्रह धरला, पण ह्या वेळी सुध्दा माईंनी “अरे, ती तुला उत्तम प्रतिसाद देतेय आणि पुढेही देईलच पण तू पुढाकार घेशील तेव्हाच ना” असे म्हणत बाजी सुधीर वर उलटवली. माझ्या मनात सुधीर बद्धल भर भरून प्रेम आणि ओतप्रत भावना आहेतच, स्वतःहून सुद्धा व्यक्त व्हायला माझ्या मनाची काहीच हरकत नाही पण त्याच्या साठी आमच्या दोघांमध्ये एकांत हवा. असे चार चौघात जो पर्यंत पुरुष हात पुढे करीत नाही तो पर्यंत स्त्री नेच पुढाकार घेऊन व्यक्त व्हावें हे मलाही योग्य वाटत नव्हते.
आता सुधीर काय सुचवितो आहे, काय असतील त्याचे माझ्या बद्धल चे विचार ?….
माझ्या भावी आयुष्यात मला सुधीर सारखाच पूर्ण पुरुष जोडीदार म्हणून हवा होता. त्याला जेव्हढे जास्त जाणून घेता येईल तेव्हढे हवेच होते.
“कसल्या विचारात आहेस शालन,जमेल ना तुला सुधीर च्या सुरात सूर मिळवायला?” माईंच्या ह्या प्रश्नाने मी स्मित हास्य करीत सुधीर च्या नजरेत नजर घालून पुन्हा त्याला ‘होकार’ दिला. वास्तविक सुधीर माझाच व्हावा ह्या साठी माझ्या प्राणाचे मोल द्यायला सुद्धा मी कमी करणार नाही अशी माझ्या मनाची भावना आहे.
सर्व वाट पाहत होते आणि सुधीरने हलकेच स्वरात सुरुवात केली……..
…………(३३)
सुधीर चे गाणे संपले तशी मी भारावून गेले. मला आतापर्यंत असे वाटायचे की स्त्रीला जेव्हढे प्रेम पुरुषांच्या विषयी वाटते, जी ओढ वाटून, त्या पुरुषाच्या प्रेमात वेड्या होतात, तेव्हडे प्रेम, ती ओढ पुरुषांना स्त्री बद्धल वाटत नसावी, त्यांना फक्त स्त्री बद्धल शारीरिक आकर्षण वाटत असावे, पण आज सुधीर ज्या आंतरिक ओढीने स्वगत गायला, माझ्यावरील प्रेमाची कबुली दिली आणि त्याच प्रेमाची, त्याच ओढीची त्याने माझ्याकडूनही अपेक्षा केली, ते ऐकून मी सुद्धा त्याच्या साठी किती वेडी झाली आहे, हे गाण्यातून व्यक्त करीत त्याला प्रतिसाद दिला.
सुधीर एक हुशार, अभ्यासू मुलगा. गेली पाच, सात वर्षे तो मन लावून अभ्यास करीत होता, ह्या काळात माझ्या प्रकृतीची, शिक्षणाची वैगेरे चौकशी तो करायचा, आई गेल्यावर सुद्धा आत्मीयतेने प्रत्यक्ष येऊन, भेटून त्याने आमची चौकशी केली,आम्हाला धीर दिला,पण जे नेमके मला सुधीर बद्धल वाटत होते, तेच नेमके त्यालाही माझ्या बद्धल वाटल्याने मला थोडें नवलही वाटले आणि मनोमन देवाचे आभारही मानले. जे मला हवे होते, ज्याची मी अपेक्षा केली ते इतक्या लवकर पदरात पडेल असे वाटले नव्हते. त्याने दिलेल्या प्रेमाच्या कबुलीनी माझ्या मनाला उभारी आली.
अशी आंस एकमेकांबद्धल जेव्हा वाटते,तेव्हा मला वाटतं, त्यात शारीरिक आकर्षणा पेक्षा एका आत्म्याला दुसऱ्या आत्म्याबद्धल असलेली मिलनाची ओढ, एकरूप होण्यासाठीची धडपडच कारणीभूत असावी. गेल्या जन्मात, वा जन्म जन्मांतरीत राहिलेले दोन जीवांचे प्रेम आणि मिलन होऊन ते दोन जीव एकरूप होण्यासाठी. त्या प्रेमाची पूर्ती होण्यासाठी तसेच परत ह्या जन्मी ते त्याच ओढीने एकमेकांकडे आकर्षिले जात असावे.
प्रकाश बहुदा परवा सकाळीच त्यांच्या गाडीने निघेल आणि महिन्याभरात परत येऊन सुधीरला घेऊन मुंबईला जाऊन तेथून कॅनडाला पुढील शिक्षणासाठी जाण्याचा बेत आखला होता.
सुधीर महिन्याभरासाठी तरी आता माझा झाला होता. बाबांची नाही पण माई,दादांची माझ्या इथे येण्याला काहीच हरकत नव्हती उलट “शालन, अगं सुधीर इथे असे पर्यंत वेळ मिळेल तेव्हा, आणि वेळ काढून येत राहा हो” असे माईंनी मला मी घरी निघाले तेव्हा आवर्जून सांगितले.
कामतांच्या घरी वातावरण प्रफुल्लित झाले होते. परमेश्वराच्या कृपेने असे वातावरण कामतांच्या घरी सदैव राहावे ,आणि माझा ही त्यात खारीचा वाटा असावा, अशासाठी मी देवाजवळ प्रार्थनाही केली…. उद्या आम्ही सर्वजण अलिबाग ला जाण्याचा बेत ही झाला कृपेने मलाही जाण्याचा योग यावा ह्या सदीच्छेने मी घरी निघाले……..
…………(३४)
घरी आले खरं, मन मात्र अजूनही सुधीरच्याच भोवती घुटमळत होते.बाबांना जेवण वाढले, पण ते जेवणार नव्हते. आज सरपंचांच्या बरोबरच सकाळ पासून ते होते, येतांना संधकाळी बहुदा बाहेर त्यांच्याबरोबरच ‘प्रोग्रॅम’ करून आले असावे.
त्याच ताटात मी जेऊन घेतले. बाबांना काही विचारण्याच्या मनःस्थितीत ते नव्हते, ते झोपायला गेले तसे मी सुद्धा बाकी कामे उरकून बिछान्यावर पहुडले. संध्याकाळ मस्त गेली होती. स्वप्नात रंगत केव्हा झोप लागली काहीच कळले नाही. पहाटे पहाटे सुधीर मला बागेत प्राजक्ताची फुले वेचण्यासाठी मदत करतोय असे गोड स्वप्न पडून त्याच्या हाताच्या उबदार स्पर्शाने मी जागी झाले.
मी खूप फ्रेश होते.
काल सकाळ आणि आजची सकाळ ह्यात बरेच अंतर असल्याचे मला ही फुले वेचित असतांना जाणवले, आज बरीच फुले फुलली होती, मला पूजेला लागतात त्याच्या दुपट्टीने आज फुले होती ह्यातली काही माईंकडे द्यावी असे मनात आले आणि मी परडी घेऊनच त्यांच्या घरी गेले. बाहेर सुधीर आणि प्रकाश मॉर्निंग वॉक ला निघाले होते. “काय ‘बाईसाहेब’ आज सकाळी सकाळीच?” सुधीर मिश्किल नजर देत म्हणाला.
“हो, ‘ह्या’ नाजूक फुलांचे असे म्हणणे आहे की फुललोय तोवरच आम्हाला “ह्या” देवाच्या चरणी अर्पण करा.” असे म्हणतांना मी सुद्धा मिश्किल नजरेने “ह्या” शब्दावर जोर देत त्याच्याच मिश्किल नजरेत सामावून गेली.
“अस्सं होय, मला वाटलं आज संध्याकाळी आमच्या बरोबर आपली स्वारी येणार, ही गोड वार्ता माँ साहेबांच्या कानावर घालण्यासाठी म्हणून हे कष्ट घेतलेत.”
“आज महाराज काही विशेष मूड मध्ये दिसतायत” म्हणत मी माईंकडे पूजेसाठी फुलं देऊन घरी परतली.
बाबा अजून झोपूनच होते. उठल्यावर मला कळलं की ते सरपंचांबरोबर त्यांच्या गाडीतून कामासाठी चार दिवस कोल्हापूर ला सरपंचांच्या घरी जाणार होते. ह्या चार दिवसात दुकान सांभाळणे त्यांनी माझ्यावर सोपवून मुद्धाम मला त्यात अडकवले होते. पण एक गोष्ट नक्की झाली की कामतांच्या घरी जाण्यातली त्यांची आडकाठी चार दिवसांसाठी तरी दूर झाली होती. पूजा आटोपल्यावर नाष्टा झाला आणि प्रकाश आणि सुधीर आमच्या घरी आलेले पाहून मी चकितच झाले. बाबांनाही नवल वाटले, बाबा चार दिवस मजा करायला जाणार असल्याने मूड मध्ये होते. बाबांनी चांगल्या प्रकारे त्यांचे स्वागत केले, त्यांची विचार पूस ,इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर कॉफी पिऊन निघतांना त्यांनी बाबांकडून,आज मी त्यांच्या बरोबर अलिबाग ला फिरायला येण्याची परवानगी घेतल्याचे समजले आणि त्यांचे आमच्या घरी येण्याचे खरे प्रयोजन लक्षात आले. बाबांनी “नाही” म्हणू नये म्हणूनच सुधीरने मुद्धाम युक्तीने प्रकाशला बरोबर आणला असावा.
जाताना बाबा प्रकाश ला दुकाना बद्धल काही माहिती देत गुंतल्याचे बघून सुधीर ने त्याचा फायदा घेत, हळूच माझा हात हाती घेऊन किंचित दाबून आपल्या भावना व्यक्त केल्या आणि अंगठ्यानेच त्याने बाबांना जिंकल्याचे सिद्ध केले.
पहाटेचं स्वप्नं खरं ठरलं होतं, तोच उबदार स्पर्श, स्वप्नात घडलेली गोष्ट प्रत्यक्षात, सत्यात उतरली होती.
प्राजक्ताच्या झाडा मागून बाय, बाय करीत जाताना सुधीरने पुन्हा हाती हात घेत मला स्वप्नाच्या दुनियेत नेऊन सोडले……..
…………(३५)
ह्या प्राजक्ताशी आणि ह्या “शिवा” शी सुद्धा माझी ‘जिवा शिवाची’ म्हणतात तशी जानी दोस्ती आहे.जेव्हा जेव्हा मला एकटे पणा जाणवायचा त्यावेळी त्याच्या बुंध्याशी छायेत बसल्यावर हा शिवाही माझ्या पायाशी बसून राहतो. ह्या दोघांच्याही सान्निध्यात मला नेहमीच मनःशांती मिळाली आहे. तसे पाहता हे दोघेही आता निरनिराळया योनीत असूनही कोणा, कुठल्या एका योनीत आमचे घनिष्ठ संबंध नक्कीच असावेत. तसं नसत तर आज मला जेव्हा जेव्हा मनःशांतीची गरज भासली तेव्हा तेव्हा मुके पणानी का होईना त्या दोघांनीही मला आधारच दिला. माझ्या पूजेसाठी सकाळी सकाळीच हा प्राजक्त त्याच्या नाजूक, सुवासिक फुलांची उधळण करून मन प्रसन्न करतो, त्या स्वच्छ सफेद फुलांचा तो शेंदरी छटा असलेला देढ आणी त्या सुदर मोहक पंचपाकळ्या, त्यांचा तो मंद मोहक सुवास मनाला कुठेतरी त्या कर्ता करवीत्या परमेश्वराच्या अगाध लिलेची आणी त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतो. त्याच्या भरलेल्या फुलांची ओंजळ जेव्हा जेव्हा मी कोणाच्या ओंजळीत रिते करायची तेव्हा आपण भरभरून कोणाला तरी सर्वस्व वाहत असल्याची जाणीव ह्या मनाला व्हायची. लहानपणी अश्या ह्या भरलेल्या ओंजळी मी किशोरीच्या, सुधीरच्या ओंजळीत रित्या केल्या मुळेच कदाचित त्यांची आणि माझी खास मैत्री होऊन आम्ही आयुष्यभराचे जिवलग स्नेही झालो असावेत. आज किशोरी असती तर तिलाही माझ्या आणि सुधीर च्या प्रेमसंबंधाचा आनंदच झाला असता, दुर्दैवाने ती अगोदरच मला सोडून गेली, त्या जीवननेच तिला जीवनातून उठविले.त्या काळ सर्पाच्या अभद्र आठवणीच्या विळख्यातून मी स्वतःला सावरले.
संध्याकाळी उन्ह थोडी कमी झाल्यावर निघायचे ठरले होते, त्यामुळे लवकर जेवणं आटोपून थोडं झोपिन म्हटले, पण त्यांच्या बरोबर फिरायला जायचंय ह्या गोड कल्पनेने अधीर मनाने डोळ्याला डोळा लागलाच नाही. मी आज मोतीया कलरची सिल्क साडी आणि बंद गळ्याचा कोपरा पर्यंतचा लांब, काळ्या रंगाचा जाळीची नक्षी असलेला ब्लाउज घालून विशेष रित्या सजले होते. केसात आवडत्या मदन बाणाच्या वेणीने माझे रूपही खुलविले होते….. बाबांना चहा देतांना ते मला आज निरखून पाहत होते. सध्या आई विना पोरकी असलेल्या मुलीला आनंदित असलेले पाहून कुठल्याही बापाला समाधान वाटायला हवे, पण बाबांच्या कपाळी मात्र आठ्याच दिसल्या.
साढेचार च्या सुमाराला गाडी आमच्या दारात आल्यावर सुधीरने ‘डबल हॉर्न’ दिला आणि ‘स्वामींची स्वारी’ आल्याची खूणगाठ मी बांधली. सुधीर ने गाडीतून उतरून बाबांना नमस्कार करून आम्ही निघालो. त्याच्या पाठी मी, बाजूला मध्ये माई, त्या खिडकीत दादा आणि पुढे प्रकाश त्याच्या शेजारी असे आम्ही प्रथम ‘किहीम’ च्या समुद्र किनारी फेर फटका मारायला गेलो. शहाळ्याचे पाणी पिऊन सर्व किनाऱ्यावर वाळूत ओहोटीच्या परत फिरलेल्या लाटा पाहत क्षितिज न्याहाळत गप्पा मारीत बसलो,
अजून वाळू तशी तापलेलीच होती, पण आवडत्या माणसांच्या संगतीत त्याची धग मला फारशी जाणवलीच नाही. प्रकाशनेच सुधीर ला आणि मला किनाऱ्यावर पाण्यात फिरून यावे असे सुचविले, “आम्ही बसतोय, तुम्ही दोघे फिरून या” माई म्हणाल्या, तसे पडत्या फळाच्या आज्ञेचे पालन करीत सुधीर उठला, “अगं तू पण जा ना” म्हणत माईंनी मलाही उठविले. माझी भीड चेपली, मनातून मला हेच हवे होते, सुधीर बरोबरीने फिरायला मला हवेच होते. त्याचा सहवास हवाच होता.
अजून ऊन्ह तशी उतरली नव्हती.पण सुधीरबरोबर असतांना बाराच्या भरतीचे उन्हही मला चंद्राचे शीतल चांदणेंच वाटले असते हे नक्की.
किनाऱ्यावर थोडे पुढे गेल्यावर मी तसे सुधीर ला उन्हा बद्धल विचारले तसे त्याच्याही भावना माझ्याच सारख्या असल्याचे त्याने बोलून दाखविलं. आपलं मन आनंदित असलं की बाहेरची दुःख, शरीराला होणार त्रास वैगेरे फारसा आपल्याला जाणवत नाही. ह्याचा उलट मनःस्वास्थ्य बिघडलं की शारीरिक व्याधी जडायला वेळ लागत नाही.
थोडं पुढे गेल्यावर मागे वळून पाहता बोलत बोलत आम्ही बरेच पुढे कधी, कसे आलो काही कळलेच नाही, सुधीरने माझा उजवा हात आता त्याच्या हातात घेतल्यावर, मनाच्या विणेवर हृदयातील झंकारांनी, सुरील्या भावनांची सरगम छेडली आणि आमच्या ओठावर हास्य फुलवीत प्रीतीच्या पंखांना त्या निळसर आसमंतात वाट मोकळी करून दिली……..
…………(३६)
किहीम च्या किनाऱ्यावरच, सुधीर आणि माईंनी अलिबागला माझ्यासाठी काही प्रेझेंट घेण्याचे नक्की केले होते. सुधीर ‘आर्किटेक्ट’ परीक्षा उत्तम पास झाल्याबद्धल आणि मी ग्रॅज्युएट झाल्याचे बक्षीस म्हणून,त्यांना ते मला द्यायचे होते त्यामुळे मी नको नको म्हणत असतांना देखील अलिबाग च्या नामांकित जवाहिरा कडे माझ्यासाठी त्यांनी सुंदर नेकलेस खरेदी केला. मला आता नाही म्हणणे शक्यच नव्हते पण त्यातील लॉकेट मध्ये पुढे मी सुधीरचाच छोटासा फोटो ठेवणार असल्याचे सांगितल्यावर माईंनी आणि सुधीरनेही तो फोटो देण्याचे प्रॉमिस केले. त्याच बोलीवर मी तो घ्यायला तयार झाले. माझे भाग्य चंद्राच्या कले कले प्रमाणे उजळत चालले होते.
नंतर सात च्या दरम्यान सूर्यास्ताच्या वेळी आम्ही अलिबागच्या किनाऱ्या वर पोहोचलो. सुधीरला पाणीपुरी खायची लहर आली आणिप्रकाशला पण खायचीच होती. मला मात्र हवी असूनही खातांना मोठ्ठा आँ वासायची लाज वाटत होती, माईंचेही तेच झाले, माझी ते खातानाची उडालेली तारांबळ बघून सर्व खो खो हसायला लागले आणि मला एकदम मरणाचा ठसका लागला. माईंनी जोरात पाठीवर हात मारल्याने मला बरे वाटले. पण तो पर्यंत सुधीर चा चेहरा बघण्या सारखा झाला होता. माझा कासावीस झालेला चेहरा बघून तो ही भांबावला होता. नंतरही तो बराच वेळ माझ्या चेहऱ्याकडे पाहत असल्याचे माझ्या लक्षात येऊन, नजरेतूनच मी “ठीक आहे, मला बरं वाटतंय” हे मी त्याला नजरेच्या भाषेतून समजावले. आता पर्यंत आम्ही समुद्र किनाऱ्यावर पोहोचलो होतो.
आज प्रतिपदा, कालच त्रिपुरारी पौणिमेला श्री कणकेश्वराची जत्रा झाली होती.आज रात्री पाऊण ची पूर्ण भरती, त्यामुळे आता भरतीला सुरवात झाली असली तरी पाणी किनाऱ्या पासून आत लांबवर होते. चंद्राचा उदय झाल्यामुळे ढगांच्या मागून चंद्रही डोकावत होता. चौपाटी वर घोडागाडीत बसून आम्ही सर्वांनी एक फेरी मारली. किहीम सारखे ह्या किनारी सुद्धा आम्ही असेच ‘दोघे फिरायला जावे’ असे बाकीच्यांनी सुचविल्यामुळे मनातून मी ही सुखावले. बाहेर समुद्राला भरती आणि अंतरी भावनांच्या भरतीला सुद्धा उधाण येऊ लागले. आजचा दिवसच मुळी गोड स्वप्नांना घेऊनच उजाडला होता, आता तर माझे मनही माझ्या हाती राहिले नव्हते, चालतांना सुधीर चा हलकासा होणारा स्पर्श मला एका नवीन विश्वात घेऊन जात होता. वाऱ्यावर नुसता माझा पदरच नव्हे तर सुधीर च्या मनाला स्पर्शून माझ्या मनालाही प्रीतीच्या पंखाचे बळ मिळून ते ही गगनात विहार करू पाहत होते. आम्ही दोघेही आसमंतात, आणि क्षितीजाच्या पलीकडील विश्वात रममाण झालो होतो. सुधीर ने मला जवळ घेत कोमल स्पर्शाने माझ्या हनुवटीला हलकेच वर करताच, त्या चंद्रप्रकाशाच्या कवडश्यात त्याच्या नजरेतील त्या ‘प्रणय’ भावात मी हरवून गेले. हे प्रणयी विश्व आम्हाला नवखे होते. मी थोडी भांबावून गेले. त्याच्या नजरेतील ओढ आता मला सहन होत नव्हती म्हणून त्याच्या पापण्यांवर माझा उजवा हात ठेवला. स्त्रीसुलभ लज्जेने मी चुर चुर झाले होते. सुधीरही सावरला. “आपण निघुया” असे मी म्हटले. आज च्या ह्या नव्या विश्वात हरवलेल्या आम्हा दोघा प्रणयी जीवांची भावी आयुष्यात नक्कीच एकजीव होण्याची ही नांदीच असावी……..
…………(३७)
किनाऱ्यावरून परततांना ह्या वेळी कधी नाही ते दादांनी मला विचारलं, “शालन, कसा वाटला तुला आमचा सुधीर? बोलला तरी का तो तुझ्याशी नीट”.
“खूपच छान आहे तो. लहानपणापासूनच मी त्याला ओळखतेय दादा. आणि दादा तुमचा आणि माईंचा लेक म्हटल्यावर तो गुणी असायचाच…नाही का हो माई.” म्हणत मी माईंनाही ह्या संभाषणात ओढले.
“तशी तू पण गुणीच आहेस शालन, त्याशिवाय का तू आम्हाला इतकी आवडतेस,
पण मला बघायचं होतं सुधीर काय म्हणतोय ते, प्रत्यक्षात एकमेकांशी बोलल्यावरच थोडीफार कल्पना येते…. काय रे काय म्हणत्येय मी सुधीर? कशी वाटते तुला शालन?” माईंच्या ह्या प्रश्नावर आता सुधीर च्या उत्तराची सर्वानाच उत्सुकता होती.
सुधीरला मी नक्कीच आवडले होते. तसं तो मला म्हणाला देखील होता. पण आपल्याला अश्या वेळी, प्रत्यक्ष त्या माणसाकडून, सर्वांदेखत आपली प्रशंसा ऐकायला आपण उत्सुक असतो…..
“माई हे काय विचारणं झालं….बहुदा गेल्या कित्येक जन्माची माझी पुण्याई असणार म्हणूनच शालन सारखी शालीन, सुशील, सुशिक्षित, शांत आणि सुस्वभावी मैत्रीण मला लहानपणापासून मिळाली आणि आता तर मी तिला माझी सहचारिणीच मानतोय.”
इतकं प्रांजळ मत, ते सुद्धा बिनदिक्कत सुधीर ने आपल्या आई वडीलांपुढे सहजरित्या व्यक्त केलं आणि मी धन्य पावले.
आता मी अशी काय ‘पुण्याई’ गेल्या जन्मात, अथवा जन्मो जन्मात केली होती की मला असा सुशील, शांत, आईवडिलांच्या आज्ञेत असलेला, सुशिक्षित, सुस्वभावी, आणि इतका देखणा असूनही निगर्वी असलेला पुरुष जोडीदार म्हणून लाभतोय. दोन जीवांचे साता जन्माचे संबंध असल्या शिवाय ते शक्यच नसावे. परमेश्वराच्या माझ्यावरील उपकारा बद्धल मी मनोमन त्याच्या चरणी लीन झाले, आई गेल्यानंतर माझ्या बद्धल असे चांगले उद्गार काढणारे कोणीतरी ह्या जगात आहे, आणि तो सुद्धा माझा भविष्यातील होणारा साथीदार आहे, जोडीदार आहे, ज्याच्यासंगे मी संसाराची सुखस्वप्ने पाहून, प्रीतीची कमळे फुलवून त्याच्या कमल चरणी व्हावू शकेन. असा हा ‘पूर्णपुरुष’ पुरुषोत्तम मला सुधीर च्या रुपात लाभतोय ह्या कल्पनेनेच माझे मन भरून आले आणि भावनांचा बांध ओलांडून माझ्या नयनातून घळघळा पाणी वाहू लागले,दोनच दिवसापूर्वी त्याने अबोला धरल्याने दुःखाश्रू माझ्या गालांवरून ओझरून छातीवर तयार झालेला हार मी त्याला अर्पण केला होता. आणि आज, आता सुखाश्रु वाहून हृदयातून गुंफलेला सुवासिक हार ह्यावेळी मात्र मी सुधीर च्या ‘चरणी’ वाहिला. सुधीरचे हे रूप मला कुठेतरी माझ्या ‘कन्हैय्या’ सारखे भासून आज त्यांनी माझ्या बद्धल व्यक्त केलेले ‘ते शब्दसुर’ मला कन्हैयाच्या बासुरीचेच वाटले.ह्या बासुरीच्या सुरांच्या नादावर मी त्या ‘मोहक रुपात’ अक्षरशः विलीन झाले.मध्ये बराच वेळ गेला असावा आणि आता बासुरीचे सूर सनईच्या सुरात कधी मिसळले मला कळलेच नाही.चौघड्यांचा नाद कानात घुमू लागला आणि त्या तालावर माझे मन सुधीर च्या मनाचा आधार घेत, त्याच्या पावलावर पाऊल टाकीत “ह्या” ‘चिरंजीव सौभाग्य कांक्षीणीची’ सप्तपदी पूर्ण करून गेला……..
…………(३८)
अलिबाग ला चांगल्या हॉटेल मध्ये शाकाहारी सहभोजन झाले. आज गुरुवार, सुधीर ला येऊन फक्त चार दिवसच झाले पण स्वामींच्या कृपेने माझ्या ‘ह्या स्वामीच्या’ सहवासात प्रत्येक क्षण मी अत्यानंदाने जगले,
फक्त चारच दिवसांचा हा सहवास मला चार वर्षे त्याच्या बरोबर जगल्याचा अनुभव देऊन गेला. बाबा घरी नसल्यामुळे आणि विशुकाका सुद्धा कामतांकडेच राहात असल्यामुळे आज रात्री पासून बाबा येई पर्यंत मी त्यांच्याच कडे राहण्याचा त्या सर्वांचा आग्रह मी नको नको म्हणतानाही माझ्या पथ्यावरच पडणार होता.
मगाशी समुद्र किनारी मनो राज्यात पूर्ण केलेली सप्तपदी खरोखरीच माझी वरात आता त्यांच्या घरात नेत होती. प्रत्यक्षात लग्न होईलच पण स्वामींच्या कृपेने मी ते काल्पनिक सुख प्रत्यक्ष भोगीत असल्याचे जाणवत होते.
माईंबरोबर बरोबर चालत होते पण मन, आणि डोळे सारखे सुधीर च्या भोवती घुटमळल्यामुळे पावले मात्र अडखळत पडत होती.एकदा स्वतःच्या आणि एकदा माईंच्या पावलात पाऊल अडकून, मी पडता पडता सावरले. माईंच्या लक्षात माझी ही अवस्था येऊन त्यांनीच मला आधार दिला.
निघतांना गाडी प्रकाश ने हातात घेतली आणि आता त्याच्या बाजूला पुढे दादा बसले, त्यामुळे मागे माझ्या एका बाजूला ‘सुधीर’ आणि दुसऱ्या बाजूला, माईंच्या आश्वासनांमुळे, आणि प्रोत्साहनामुळे मिळणारा ‘धीर’ ह्या मुळे अवघे विश्व मला थोडे झाले होते.त्यांच्या घरी आज प्रथमच मी राहणार होते. घरात प्रवेश करताना आईची जबरदस्त आठवण आली…..
लग्न झाल्याशिवाय तिने माझी ह्या घरात अशी पाठवणूक केली नसती. माईंमागे मी, आणि माझ्या मागे सुधीर त्यामुळे मी ‘अधीर’ होऊन त्यांच्या घराचा उंबरठा ओलांडताना, पाऊल अडकून एकाएकी मी उंबऱ्यातच
ठेचाळले, आणि…….
“आई ss ग्ग” म्हणत एका गुडघ्यावर पुढे पडले, मागून येणाऱ्या सुधीर ने पुढे सरसावत माझा हात हातात घेऊन उठविले नसते, तर मी नाकावर आपटून रक्त बोंबाळ झाले असते.
सुधीर ने सावरले खरे पण माझ्या मनातली ‘अपशकुनाची पाल’ पुन्हा एकदा चुकचुकली… वास्तविक, मी लग्न करून उंबरठ्यावरचे माप ओलांडूनच ह्या घरात प्रवेश करायला हवा होता,असे उगाच मनात आले.
“अग सांभाळ सांभाळ” माईंच्या बोलण्याने आणि त्यांनी मला आईच्या मायेने जवळ घेतल्याने खूपच बरे वाटले. ह्या घरातील प्रत्येकाचा मला आधार वाटत होता, ह्या घरात सून म्हणून आल्यावर माझे लाडच लाड होतील ह्यात तिळमात्र शंका नाही. आत्ता मनातून बावरले असली तरी सुधीर ने सावरले होते. आणि माईंनी आधारले होते. त्यामुळे घरात वावरतांना मन पुन्हा एकदा कल्पनेच्या विश्वात रमले……..
…………(३९)
आता रात्रीचे साढे दहा होऊन गेले होते. पौर्णिमेचा चंद्र आता बराच वरती आला होता. उद्या प्रकाश निघणार होता, तेव्हा भरतीचा वारा खात मागच्या वाडीत गार्डन मद्ये गप्पा मारीत बसण्याचा सर्वांचा कल होता. काकांनी लॉनवर नक्षीदार जाजम अंथरले. नेहमी प्रमाणे माईंनी मला कॉफी करायची विनंती केली. आम्ही लॉनवर गप्पा मारीत बसलो होतो. प्रकाशला झोपाळ्यावर गरगरते म्हणून सुधीर एकटाच झोके घेत बसला होता. अश्या या चंद्राच्या प्रकाशात, समुद्राच्या किनारी असलेल्या कामतांच्या ह्या फळा फुलांनी भरगच्च बहरलेल्या वाडीत, नारळी पोफळीच्या थंड सान्निध्यात, बागेतील झोपाळ्यावर बसून समोरचा अथांग सागर आणि आता त्या भरतीच्या फेसाळलेल्या लाटा बघायला मलाही आवडले असते. माई मला त्याच्या बरोबर बसायला सांगतात का ह्याची मी वाट बघत होते. समोरचा समुद्र पाहण्यात माझा जीव हरवून गेला. खडकावर आपटून फुटणाऱ्या त्या लाटांचा घुमणारा आवाज आणि समुद्राची गाज ऐकण्यात मी तल्लीन झाले होते.समोर समुद्राचे उधाण आणि हृदयातील प्रेमाच्या तरंगावरचे उठलेले भावनांचे उधाण ह्यांची शर्यत लावली असती तर माझ्या ह्या हृदयातील सुधीर च्या प्रेमाने ओसंडणाऱ्या भावनांच्या लाटेनीच बाजी मारली असती.त्या लाटांवरची झुलणारी माझ्या भविष्याची नौका, आणि नावेवर समोर बसलेला माझा सारंग दूरवर अस्पष्ट दिसणाऱ्या क्षितीजाच्या पलीकडे माझा हात हातात घेऊन मला हृदयाच्या जवळ घेत दूर दूर एका नवीन विश्वात घेऊन आनंदाच्या सफरी वर निघाला होता. “शालन, तु पण का बसत नाहीस झोपाळ्यावर, तुला आवडतं ना? मग बस की सुधीर जवळ ” माई म्हणाल्या, आणि सुधीरला आणि मला तेच हवे होते.आज सर्व काही मनासारखे घडत होते. सुधीर च्या जवळ बसले आणि सर्व शरीर मोहोरून गेलं. हा स्पर्श मला हवा हवासा वाटत होता.
शब्दांचे जग सुंदर असले, आणि मनाच्या जखमेवर ते गुणकारी औषध असले तरी खरी सुखदुःख उपभोगताना हवा असतो तो मायेचा उबदार स्पर्श आणि आतून उचंबळून येणाऱ्या भावनांचा उद्वेग हे अक्षरशः खरे असल्याचे सुधीर च्या ह्या स्पर्शाने मी जाणले…
हे स्पर्शाचे नवीन जग मला एक आगळी वेगळी संवेदना एक नवीनच शारीरिक प्रचिती देत होते.सुधीर थोडा खेटूनच बसला. प्रियकराच्या स्पर्शाने स्त्रीच्या नाजूक कोमल भावनांची कळी खुलते असे मी कथा कादंबरीत वैगेरे वाचले होते, पण आज त्याचा प्रत्यक्ष अनुभव आणि प्रचिती मला येत होती. हे सर्व मला नवीन होते, हा चंद्रही मला खूपच मोहक वाटत होता.काहीश्या अनामिक आंतरीक ओढीने मी त्याच्याकडे झेपावत होते. चकोरीला चंद्राची ओढ का वाटत असावी ह्याचं वाटणारं कुतूहल आज खऱ्या अर्थाने मला जाणवलं, आणि कळलं. आता सुधीर ने माझा उजवा हात हातात घेतला माझ्या हृदयाची धडधड वाढली माझ्या आंतरिक भावना त्याच्या संवेदनाशील हातातून. त्याच्या हृदयापर्यंत पोहोचून त्याच्या मनीचे हितगुज त्याच्या हातातून आता माझ्या हृदयापर्यंत जाऊन भिडले आणि स्पर्शाचा नाद कानी झंकारला……..
…………(४०)
साढे अकरा होऊन गेले तसे माई दादा आणि प्रकाश झोपायला निघतांना “मी पण येते” म्हणाले.
“अरे, तुम्ही दोघे बसाना की थोडा वेळ, काय ग शालन तुला झोप येतेय का ? ”
“नाही माई, तसे नाही काही, पण उगाच कशाला?”
“आमची काहीही हरकत नाही, बसा गप्पा मारत” म्हणत ते सर्व झोपायला निघून गेले. विशुकाकांनी सगळ्यांचे बिछाने अगोदरच व्यवस्थित घालून ठेवले होते. माजघराच्या बाजूच्या खोलीत माझा बिछाना आज माईंच्याबरोबर घातला होता, एरव्ही दादा आणि माई तेथे झोपायची, देवघरात आज काकांच्या सोबत दादा आणि सुधीर च्या खोलीत ते दोघे. अशी सर्व व्यवस्था झाली होती. मागच्या दाराने ही सर्व मंडळी घरात जाता क्षणीच मी झोपळ्यावरून उठून मगाशी प्रकाश बसला होता त्या ‘रॉकिंग इझी चेयर’ वर बसण्या साठी उठले तसे माझ्या उजव्या मनगटाला घट्ट पकडून सुधीर ने मला त्याच्या डाव्या बाजूला झोपाळ्यावरच बसवून घेतले.
“बायकोने, नेहमी नवऱ्याच्या जवळ असेच वामांगी बसायचे असते.” म्हणत त्याने मोहक स्मित करीत माझा हात हातात घेतला.त्याची ती मोहक नजर चुकवीत म्हणाले,
“सुधीर, आपले अजून लग्न झालेले नाही, कधी करायचे हे देखील ठरलेले नाही. अजून तुझे पुढील शिक्षण सुद्धा बाकी आहे, तुझी अर्धांगिनी झाल्यावर सर्व काही मी तुझ्या म्हणण्यानुसार करणारच आहे.”
“अगं, गप्पा मारत बसायला काय हरकत आहे” आता त्याचा नाराजीचा सुर माझ्या मनाला झोंबला. वास्तविक त्याचा तो स्पर्श, त्याची ती नजर मलाच हवी होती. त्याला वाटत असेल त्याच्या पेक्षा कितीतरी पटीने जास्त तो मला हवा आहे, त्याचेच प्रेम, त्याची जवळीक ह्या साठी तर मी कॉलेच च्या जीवनात झुरत होते. अभ्यासही व्हावा तितका होत नसे. पण भावना उचंबळून येऊन सुद्धा त्यावेळी मी त्यांना मनाचा बांध घालीत होते….
बराच वेळ आम्ही असेच निस्तब्ध बसून त्या भरतीच्या लाटांचा खेळ पाहत होतो. शेवटी मीच माघार घेऊन त्याच्या खांद्यावर विसावले. आपल्या माणसाच्या ह्या अश्या भरभक्कम खांद्यावरच विसावून जीवनाचा अंतिम किनारा गाठावा हीच तर कोणाही सौभाग्य कांक्षिणीची मनोकामना असते.तसेच आपले प्रेमाचे माणूस आपल्या सतत जवळ असावे, त्याच्या सान्निध्यात हे संपूर्ण जीवन आपण त्याच्या सुखासाठीच व्यतीत करावे हीच तर प्रत्येक स्त्रीची मनीषा असते, आपल्या पुरुषासाठी समर्पणाची भावना त्या आयुष्यभर जपत असतात. आपले दुःख बाजूला ठेऊन त्याच्या सुखातच ते स्वतःच सुख मानून येणारा प्रत्येक दिवस त्याच्या साठीच जगतात त्याची अर्धांगिनी होऊन.
सुधीर ने माझ्या गळ्याभोवती हातघालून प्रेमाने जवळ घेतले. माझ्या केसात हळुवार हात फिरवीत म्हणाला
“शालन मी तुझा गैरफायदा घेईन असे तुला वाटते का?” मी डावा हात त्याच्या ओठांवर ठेवीत त्याला मानेनेच नाही म्हटलं. अधीर होऊन न कळत अधिकच जवळ सरकले. सुधीर सारखा असा सद्गुणी मुलगा माझ्याबाबतीत असा विचारच करणार नाही ह्याची मला खात्री होती.
आम्ही एकमेकांच्या सान्निध्यात भावी आयुष्याची स्वप्ने पाहत असेच बसलो होतो, भरतीच्या वाऱ्यावर, झोपाळ्यावर हलके हलके झुलत एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची वचनें देत होतो.हातात हात घालून आम्ही झोपाळ्यावरून उठून संपूर्ण वाडीत चंद्राच्या रुपेरी प्रकाशात फेरफटका मारताना फुललेल्या रातराणीच्या धुंद करणाऱ्या मादक सुवासाने माझे भान हरपून मी सुधीर ला आणखीनच बिलगले, त्या मखमली स्पर्शाने माझे सारे शरीर शहारले, सुधीर ने मला कवेत ओढले, त्याने हाताने माझी हनुवटी वर करताच ढगातून बाहेर येणाऱ्या पूर्ण चंद्राच्या प्रकाशाने, आणि सुधीर च्या प्रणयी नजरेतील भावाने माझे डोळे दिपले. सर्व शरीर मोहरून थरथर वाढली, ओठावर प्रेमगीत आळवीत आम्ही एकमेकांना कधीही अंतर देणार नाही ह्याची खूणगाठ नजरेत साठवत घरात परत आलो……..
…………(४१)
आम्ही रात्री घरात आलो, माई जाग्याचं होत्या.सुधीर त्याच्या खोलीत निघून गेला. बिछान्यावर पहुडले आज झोप चांगलीच लागणार ह्याची खात्री होती. आपल्या मनासारखा दिवस जातो तेव्हा मन तृप्त असते, शांत असते त्यामुळे झोप न येण्याचा संबंधच नसतो. उलटपक्षी शरीर थकलेलं असूनही मन अशांत असेल, विचारांचं डोक्यात काहूर असेल, किव्वा काळजी, खंत असेल तर झोपेची कितीही आराधना केली तरी झोप येणं शक्य होत नाही, आणि अपुऱ्या झोपेने शरीर क्षीण होऊन मन चिडचिडे होऊन सगळा दिवसच फुकट जातो.
झोप पूर्ण होऊन नेहमी प्रमाणेच मी लवकर उठले. पण माझ्यामुळे बाकीच्यांची झोप उडू नये म्हणून तशीच बिछान्यावर पडून होते.
काका उठल्यावर मीही सर्व आटोपून त्यांच्या कामात त्यांना मदतीचा हात पुढे केला पण “तू ह्या घरची पाहुणी आहेस, जरा आराम कर” असे म्हणून त्यानी चहा सुद्धा दिला. मला नंतरच सर्वांबरोबर घ्यायचा होता, पण काकांना उठल्यावर लगेच चहा लागतो म्हणून आग्रहाने त्यांनी मलाही अर्धा कप दिला. आता एक एक जण उठून त्यांचेही चहापाणी झाले. प्रकाश जेवल्यावर मुंबईला गाडीने निघायचा होता. मी स्वयंपाक करण्यात काकांना, माईंना मदत करून दुकान उघडायच्या आत घरातले सर्व उरकायचे होते म्हणून “नंतर दुपारी परत येते” असे सांगून घरी आले.
दुपारी दुकान बंद करून चार दिवस त्यांच्याच कडे राहायचे, जेवायचे ठरल्यामुळे त्यांच्या कडे आली. जेवणं झाल्यावर प्रकाशला निरोप देऊन पुन्हा दुकानात येऊन बसले.
संध्याकाळी मी माईंना जेवणासाठी मदत केली सुधीर ला ज्वारीची भाकरी आवडते म्हणून सगळ्यांसाठी भाकऱ्या भाजल्या.
दोन दिवस असे कामत कुटुंबात कसे गेले कळलेच नाही.
त्या नंतर एक दिवस आम्ही जवळच असलेल्या ‘मांडवा’ गावाच्या “चिमणीच्या डोंगरावर” जाऊन आलो.ह्या डोंगरावर ब्रिटिश कालीन, समुद्रावर जहाजांची टेहळणी करण्यासाठी उभारलेले एक उंचच उंच सफेद दगडी धुरांडे आहे. दादा आणि माई डोंगराच्या पायथ्याशी बसून होते. परत चालतच गावात आलो तेव्हा जवळच्या केतकीच्या वना पुढे असलेल्या एका मोठ्या आकाराच्या खडकावर दोघे बसलो. माई दादा घरी परतले. ह्याच खडकावर आमच्या लहानपणी दादा आणि माई गप्पा मारायला बसत असत, सुधीरनेही तीच जागा निवडून, “आपण सुद्धा इथेच बसण्याची परंपरा कायम ठेऊया” असे मला सांगितले. मलाही ते आवडले.इथून समोरच ‘कुलाब्याची दांडी’ दिसते.संध्याकाळ नंतर ह्या लाईट हाऊस चा प्रकाश इकडील किनाऱ्यावर पाण्यात सुद्धा दिसतो. सूर्यास्त होऊन गेल्याने मुंबईच्या बंदराचे लागलेले दिवे चमकत होते. चंद्राचा उदय होऊन तो ही आपले डोके वर काढीत होता. सुधीर ने माझ्या कपाळावरील बटांशी त्याच्या हाताच्या अनामिकेने खेळण्यास सुरवात केली. त्याच्या ह्या प्रणय राधनेने माझ्या ओठावर स्मित आणि गालावर लाली पसरू लागली. चंद्राच्या शीतल प्रकाशात आमच्या नजरेतील प्रेम व्यक्त झालेले स्पष्ट दिसत होते….
आम्ही गप्पात रमलो, एकमेकांच्या रूपावर कसे, कधी भाळून त्याचे रूपांतर प्रेमात कसे झाले ह्यावर एकमेकांच्या भावनांची कदर केली. एकमेकांना कधीच अंतर न देण्याच्या शपथा घेतल्या.
एकमेकांबद्धल चे प्रेम आम्ही गीतात व्यक्त केलं……..
…………(४२)
बाबा बहुधा उद्या येतील त्याआधी ह्यांच्या घरी राहून सुधीर आणि माई दादांचा जेव्हढा सहवास मिळेल तेव्हढा मी मिळवित होते. तसेच माझ्या कडून त्यांच्या ह्या घरात त्यांना कांमकाजात जेव्हढी म्हणून मदत करता येईल तेव्हडी मदत मी आमचे दुकान सांभाळून करीत होतेच. मी स्वयंपाक उत्तम करते, माझ्या हातच्या केलेल्या कुठल्याही पदार्थाला उत्तम चव असते असे माई, दादा नेहमी म्हणायचे. आमच्या घरी सणासुदीला काही गोड धोड केले की आई असतांना मी माईंकडे जाऊन ते हमखास द्यायची. आज पुरणपोळी आणि उद्या सुधीर च्या आवडीचे सुके मटण आणि वडे करण्याचे आम्ही पक्के केले होते.
संध्याकाळी आम्ही आवास येथील ‘नागेश्वराच्या’ देवळात गेलो.बाजूच्या अण्णा घरत ह्यांनी सुधीर साठी मुद्धाम त्यांच्या अलिबाग तालुक्यात पैजेला पहिला क्रमांक मिळविलेल्या खिल्लारी बैलांच्या सजवलेल्या गाडीची व्यवस्था केली होती. सुधीर ला बैलगाडीत बसायला लहानपणा पासूनच आवडते हे अण्णांना ठाकुक होते. लहानपणी तो अण्णांच्या गाई, बैलांना शेतात चरायला नेत असे. मानेवर काठी ठेऊन त्यावर दोन्ही खांद्यावर आपले दोन्ही हात ठेवून एक पाय दुमडून, कान्ह्या सारखे उभे राहण्याची त्याची ती लकब आजही मला खुणावते. गुरांना चरायला नेताना, त्याच्या मागून मी सुद्धा हातात काठी घेऊन जायची. अशी गाई गुरे चरायला बऱ्याच वेळेला आम्ही सर्व सवंगडी सुद्धा जायचो. आम्ही बरेच वेळा चिमणीच्या डोंगरावरील जांभळे, करवंदे, बोरे, पिकलेला पिवळा मेवा, शिंदीच्या झाडाची तपकिरी कॉफी रंगाची फळे, कैऱ्या काठीने आणि बांबूने पाडून भरपूर खात असू. करवंदे खाताना “कोंबडा की कोंबडी?” असे एकमेकांना विचारून, उत्तर बरोबर दिले की आपले उष्टे करवंद दुसऱ्याला देत असू. करवंद थोडे कमी रंगीत असेल, तर ती कोंबडी, आणि जास्त लालसर असेल तर तो कोंबडा,असे उत्तर देऊन ती एकमेकांची उष्टी झालेली करवंद खाण्यात एक वेगळीच मजा होती. काळी करवंद खातांना आमच्यातील माझ्या जिवलग मैत्रिणीला नाईकांच्या ‘किशोरी’ ला ती रंगाने काळी होती, म्हणून आमच्या बरोबरची काही टारगट मुले तेव्हा “डोंगरची मैना, काळी काळी मैना” असे मुद्धाम चिडवायाची,मग मला खूप राग येत असे, अश्यावेळी सुधीर माझी बाजू घेऊन आणि माझ्या कडची सुद्धा काठी घेऊन त्या मुलांच्या मागे धावून दोन्ही काठ्यांनी त्यांना चांगलेच फटकवायचा… लहानपणा पासूनच आमचा एकमेकांवर जीव होता, प्रेम होते. आज ह्या बैल गाडीत बसल्यावर आमच्या ह्या बाल पणातील स्मृतींना पुन्हा उजाळा मिळाला.
देवळात दर्शनाला जाण्यापूर्वी आम्ही ‘आवासच्या’ ह्या निसर्गरम्य किनाऱ्यावर गेलो. आम्ही दोघेच हातात हात घालून समुद्रावर फेरफटका मारून, किनाऱ्यावरील केवड्याच्या वनात बसलो. सुधीर चा सहवास, त्याचा होणारा ओझरता स्पर्श मला भविष्यातील सुखि स्वप्नांची नांदी देत होता. आम्हाला आता पूर्ण एकांत मिळाला होता. समोर अथांग सागर, त्यावर क्षितिजावर कललेला तो पिवळसर, तांबूस सूर्य, चित्रात काढतात तशी निळ्यासार आकाशातील, ती समुद्रावरून उडत जाणारी ‘इंग्रजी व्ही’ अक्षरात, पद्धतशीर एका रांगेत हलकेच शांत पणे उडत दूर वर जाणारी पक्षांची मालिका, आणि मनात भावनांचे उठणारे तरंग आता मला सुधीरच्या विशाल छातीवर विसावत होते. त्याच्या त्या कोरीव दाढीवर हलकेच मी अनामिकेने स्पर्शीले, आणि त्याच्या मनोविणेवरील भावनांच्या तरंगातून त्यांनी मला जवळ करीत आता माझ्या भावनांची तार झंकारली……..
…………(४३)
सूर्यास्ताचे विलोभनीय दर्शन झाल्याने मन प्रफुल्लित झाले होते. का कुणास ठाऊक सुधीर सारखेच मलाही सुर्योदयापेक्षा सूर्यास्ताचेच दर्शन जास्त मनाला भावते. कदाचित मावळलेल्या सूर्या नंतर काळोखी रात्र आली तरी ह्या काळ रात्रीत उद्याचा उष:काल नक्कीच आहे. ह्या आशेवर समाधान वाटते. पण सूर्योदयानंतर सूर्यास्त होणारच, त्यामुळे ‘अस्ताची’ मनाला भीती वाटत असावी.
आता आम्ही ‘नागेश्वराच्या’ देवळात जोड्याने प्रवेश केला.त्याच्या बरोबर कणकेश्वराच्या देवळात जायची राहिलेली इच्छा निदान ह्या देवळात तरी आम्ही एकत्र जाण्याने पूर्ण झाली.
लहानपणीच ह्या देवळातील “नागेश्वराच्या” दर्शनाने, त्याला मनोमन हात जोडल्याने, आणि गाऱ्हाणें घातल्यावर माझ्या मनातील असलेल्या सर्पाच्या, जीव जिवाणूंच्या भीतीचे संपूर्ण निर्मूलन झाले होते. ‘आवास’ गावातील हे नागोबाचे देऊळ जागृत देवस्थान असून हा देव नवसाला पावतो हे सर्व गावकरी जाणून आहेत, तशी त्यांची श्रद्धा आहे आणि म्हणूनच दिवाळी नंतर येणाऱ्या कार्तिक पौणिमेला आदल्या दिवशी आवासचि नागोबाची, आणि त्रिपुरी पौणिमेला दुसऱ्या दिवशी श्री कणकेश्वराची जत्रा असते. ह्या वर्षी बाबांच्या अट्टहासा पाई मला ह्या दोन्ही जत्रा चुकल्या.
आम्ही दर्शन घेतल्यावर तेथील गुरवाने देवापुढे आशिर्वादाचे गाऱ्हाणे घालतांना आमचा ‘पतिपत्नी’ असल्याचा उल्लेख केला. त्यालाही आम्ही ‘नवविवाहित’ आहोत असेच वाटले असावे.
घरी येईस्तोवर आठ वाजले होते. आज दुपारीच मी पुरणपोळ्या करून ठेवल्या होत्या.जेवतांना सर्वांनी त्या आवडीने खाल्ल्या आणि चांगल्या झाल्याचं सांगून माझं कौतुक केलं. उद्याचं जेवण मीच करणार होते.सुधीर ला चमचमीत आणि स्वादिष्ट भोजन लागतं, त्याची ही जिभेची हौस मी नक्कीच पुरी करू शकेन असं माई नेहमी म्हणतात.
इंग्रजीत सुद्धा अशी म्हण आहे की “पुरुषांच्या हृदया पर्यंत पोहोचण्याचा मार्ग त्यांच्या पोटातून जातो.” तसं पाहता सुधीर सहृदय आहेच, त्याचं शांतपणे बोलणं, विचारांची परिपक्वता, दुसऱ्यांना समजून घेण्याची वृत्ती, त्यात हुशार, सुशिक्षित आणि देखणा, माझ्या सारख्या स्त्रीला आयुष्यात आणखीन काय हवं.
जेवणं झाली तसे आम्ही बाहेर गार्डन मध्ये बसलो.
रात्रीचे साडे दहा वाजायला आले होते.बाबा इथे नव्हते म्हणूनच मला ह्यां सर्वांच्या सानिध्यात मोकळे पणाने राहता आलं, सुधीर च्या सहवासात माझ्या मनीच्या राज हंसाने सुधीर च्या नितळ, स्फटिकाहुन स्वच्छ, सुंदर आणि विशाल हृदयाच्या जलाशयात मनसोक्त विहार केला. बोलत आम्ही दोघे चमेलीच्या, जाई जुईच्या मांडवाखाली एकमेकांच्या सानिध्यात, आम्हा दोघांनाही जुन्या गाण्यांच्या असलेल्या आवडी बद्धल बोलत होतो. जुने संगीतकार, कवी, गायक ह्यावरच चर्चा चालली होती. ह्या प्रतिभावंत व्यक्तींनी एव्हढं प्रचंड योगदान आपल्याला दिलंय कि आपला जन्म ह्या शतकातच झाल्या बद्धल त्या कर्त्या करवीत्याचे आपण मनापासून आभार मानायला हवेत ,ह्या मतावर आमचे दोघांचेही एकमत झाले. संगीतातीलच नव्हे पण कुठलीही आपली आवड आणि आपल्या साथीदाराची आवड जर एकच असेल तर तो ‘दुग्ध शर्करा’ योगच होतो.
आता रातराणीचा मंद सुगंध पसरला होता. समुद्राला ओहोटी होती तरी मंद वाऱ्याच्या लहरीवर एक हलकीशी झुळूक बाजूच्या वेलीवरच्या कळ्यांना, फुलांना झुलवून गेली. एक मादक धुंदी फुलांवरून कळ्यांवरून पसरत आम्हा दोघांना सुखावून आसमंतात पसरली.
झुलणाऱ्या वेलीचा सुधीर च्या गालाला होणारा स्पर्श हलकेच दूर करीत आता मीच माझ्या अनामिकेने त्याच्या गालावर त्या कुरळ्या केसात माझे नांव कोरु लागले. आपल्या साथीदाराच्या शरीराला, मनाला देखील अन्य स्त्रीचा सोडाच, पण ह्या वेलीचा सुद्धा आत्ता झालेला स्पर्श, माझ्या मनात सवती मत्सर निर्माण करायला मला पुरेसा ठरला. ह्या धुंदीची नशा, आणि कैफ आम्ही एकमेकांच्या नजरेतून अनुभवत होतो. थरथरत्या ओठाने मनातील भावनांना हलकेच वाट मोकळी करून दिली……..
…………(४४)
आज बहुदा संध्याकाळ पर्यंत बाबा येतील, त्या आधी घर आवरून दुकानात हजर राहण्याच्या दृष्टीने मला घरी जाणं महत्वाचं होतं.
सकाळी लवकरच उठले, काकाही त्यांची कामे आटपून बाजारात गेले होते. मी ही जेवणाच्या तयारीला लागले.
बाजारातून आल्यावर काका थकल्यासारखे दिसत होते. विहिरीचा पंप बिघडल्याने सुधीर तो दुरुस्त करण्यात गर्क होता. घरात विहिरीचे पाणी आणण्यासाठी काका निघातायत असे पाहिल्यावर मी आणि माईंनी त्यांना अटकाव करून थोडी विश्रांती घ्यायला सांगितले, ते ऐकेचनात तेव्हा सुधीरच म्हणाला मी आडाने ओढून हंड्याने भरून आणून देतो.मी ही त्याला मदत करिन असे सांगून काकांना विश्राती साठी दादांच्या बरोबर बाहेर व्हरांड्यात पाठविले.
विहिरीवर आता आम्ही दोघेच होतो.सुधीर पाणी ओढून देत होता आणी मी ते हंडे डोक्यावर आणि कमरेवर घेऊन घरातील पितळेच्या पिंपात रिते करीत होते.
डोक्यावरील हंड्यातून हेलकावलेल्या पाण्या मुळे माझा ब्लाउज आणि पदरही भिजल्याचे पाहून सुधीर ला चेष्टा मस्करी सुचत होती. वर ओढलेल्या भरलेल्या बादलीतले पाणी आपल्या दोन हाताच्या ओंजळीतून त्याने माझ्या अंगावर उडवीत मला भिजवायला सुरवात केली तसे ओलेती झालेली मी लाजेने चुर होऊन पळत सुटले. माई, दादांनी वैगेरे कोणी पाहिले असते तर ….
माझ्या मागून हातातल्या बादली सकट तो ही पाणी उडवीत येतोय हे पाहुन मी बागेत आंबे, फणसाच्या झाडा मागे लपण्याचा प्रयत्न करीत होते, पाठशिवणीचा खेळच जणू ‘राधा कृष्ण’ खेळतायत असा भास मला क्षणभर झाला. माई बाहेर येतील ह्याची भीती मनात होती. सुधीर ला माझ्या ह्या भीतीची आणखीनच गम्मत वाटत होती. सुधीर चे हे रूप मला नवीन नव्हते. त्याचा हा असा चेष्टा करण्याचा, गम्मत करण्याचा अनुभव मी लहानपणी समुद्रा वर किल्ले बांधतांना, त्यात मी तन्मय झालेली पाहून बाजूला पडलेल्या नारळाच्या कर्टीने समुद्राचे ते पाणी भर भरून आणून मुद्धाम ते माझ्या डोक्यावर ओतून मला ओले चिंब करे पर्यंत थांबत नसे. लहान पणाची त्याची ही खोड मी माईंना दाखवायची तेव्हा माई त्याला रागवत असत. आणि मला नवीन परकर, पोलका देण्याचे आश्वासन देऊन त्या पूर्णही करीत असत. त्या वेळचे मस्करी करून केलेले निरागस हास्य आणि आज चे आमच्या तारुण्यात मला ओलेती करून मला संपूर्ण न्याहळत केलेले मंद, मोहक स्मित ह्यात ‘बालपणातील अजाणता’ आणि ‘तारुण्यातील जाणता’ फरक त्याच्या नजरेत मला जाणवला. थोडक्यातच गोडी म्हणून मी माईंना ‘हलकेच हाक’ घालतेय हे पाहून तोच बाजूला झाला. स्त्री सुलभ लज्जेने त्याला अटकाव केला खरा पण मनोमन मी ही खजील झाले. त्याच्या ह्या आजच्या तारुण्य सुलभ चेष्टेत मनाला हवी हवीशी वाटणारी एक आगळीच गोडी होती हे त्याच्या नजरेत मला आज जाणवले……..
…………(४५)
आज मी केलेले मटण आणि भाजाणीच्या पिठाचे वडे सर्वांनी नावाजून खाल्ले. पीठ मी आमच्याच दुकानुतून आणले होते.कामतांकडे मटणाची पद्धत आमच्यापेक्षा खूपच निराळी असते. आमचे वैश्य पद्धतीचे आणि तिकडे गोव्याच्या सारस्वत पद्धतीचे मटण केले जाते. पण मी केलेले त्यांना फारच आवडले. दुपारी जेवणानंतर मी आमच्या घरी आले आणि सर्व घर व्यवस्थित लावून दुकानातच बसले….
सरपंचांनी गाडीतून बाबांना आमच्या घरीच आणून सोडले. मी आज त्यांना चहा पाण्याचे विचारले. “बेबी, पुन्हा कधीतरी सवडीने येऊच की” म्हणत, तिरक्या नजरेने मला न्याहाळत आणि कुत्सित पणे हसत ते निघून गेले.
खरंतर मला ह्या माणसांची तोंड बघायची पण इच्छा नसते पण बाबांना राग येईल म्हणून मनात राग असूनही तसे दाखविले नाही. माईंकडचे चार दिवस अत्यंत मजेत गेले होते आता ‘येरे माझ्या मागल्या’. पुन्हा तेच रहाटगाडगे, तोच बाबांचा चिडचिडा स्वभाव, तेच ते दुकानात बसून नको त्या गिऱ्हार्ईकांना, नको त्या प्रश्नांना उत्तरे द्यायची. ते हिशोब सांभाळायचे. वस्तूंच्या किमती, किती शिल्लक आहेत, किती संपल्यायत त्यांची यादी, ही सगळी डोकेदुखी मलाच आता सांभाळायला लागत होती. दिवसेंदिवस बाबा ह्यातील लक्ष काढून घेत होते आणि मला मात्र अडकवीत होते….
मी गेले चार दिवस फारशी दुकानात नव्हती आणि कामतांकडेच असायची हे त्यांच्या कानावर आल्या आल्या गेल्यामुळे, लगेच त्यांची चिडचिड आणि भडका भडकी सुरू झाली. माझे त्यांच्याकडील दिवाळीचे आनंदाचे चार दिवस संपून ह्या घरचे शिंमग्याच्या आरडा ओरडीचे दिवस सुरू झाले. ते घर माझे माहेर आणि हे घर सासरचे वाटू लागले.त्यांच्या कडे जायचेच नाही म्हणून त्यांनी मला बजावले. घराचा कैदखाना झाला……
पिंजऱ्यातील मैनेची माझी अवस्था झाली. काकांना अगोदरच ह्याची कल्पना आली होती. कालचा सबंध दिवस मी तिकडे न फिरकल्याने काकांनी बरोबर ते ताडले आणि आज येऊन बाबांना त्यांनी सुनावले. मला काकांचा खूपच आधार वाटला. मी त्यांच्या पुढ्यात रडले सुद्धा, पण बाबांना त्याचे फारसे काही वाटले नव्हते, उलट “आपण सरपंचांच्या घरी जाऊ, तेथे तुला बरं वाटेल, हीच माणसं माझ्या उपयोगाची आहेत” वैगेरे बोलून मला कामतांपासून दुरावू पाहत होते. ह्या तीन चार दिवसांचा सुधीर चा दुरावा मला कित्येक युगांचा वाटत होता. आणि आता मनाला सहन होण्या पलीकडे गेला. बाबा मला त्यांच्याकडे पाठवीत नव्हते, पण सुधीरही मला येऊन भेटत का नाही? ह्याचे मला कोडे पडले. काका येऊन गेले, बाबांना समजावून गेले, सुधीरनेही तसे करायला हवे, आम्ही लग्न करणार हे त्यांनी बाबांच्या कानावर घातले असते तर कदाचित बाबांच्या डोक्यातील सरपंचांच्या त्या ‘नतद्रष्ट कालियाचे’ खूळ तरी कमी झाले असते. कदाचित काकांनी सुधीर ला बाबांना भेटायचे रोखलेही असेल ,उगाच बाबांच्या रागाच्या आगीत सुधीरच्या आमच्या कडे येण्यांनी तेल ओतल्या सारखे झालेही असते.
मला काहीच सुचत नव्हते सुधीर च्या दुराव्याने, त्याचे दर्शनही न झाल्याने माझी दैनावस्था झाली होती, ‘कशी केलीस माझी दैना रे, मला तुझ्या विना करमेना’…. ह्यात त्या बिचाऱ्या सुधीर चा आणि त्या फॅमिलीचा काहीच दोष नव्हता. चार दिवसांचा सुधीर चा सहवास मी अधाश्या सारखा अनुभवला होता. माझ्या भावनदीने त्याच्या मनाच्या विशाल सागरात विलीन होण्यासाठी धडपड केली. संगम होऊन आलेल्या उधाणाच्या भरतीला किनारा दृष्टीक्षेपात असतानाच अचानक बाबांच्या अट्टाहासाने ओहोटी लागली. माझ्या वैभवाला माझीच बहुदा दृष्ट लागली असावी…..
दुराव्याच्या आगीत होरपळत राधेच्या भक्तीचा आधार घेत अधीर मनाने सुधिरचे नामस्मरण करीत रात्रभर देवघरात बसून राहिले. मनोगाभाऱ्यातील समईच्या मंद झालेल्या वातीत माझ्या नयनाश्रुनी ओतलेल्या तेलानी ‘माझ्या कन्हैयाच्या’ उजळलेल्या प्रतिमेत आता मीरेच्या प्रेमाची झाक दिसून माझ्या पापण्या ओलावल्या,
चार दिवसांपुर्वीच्या राधेच्या प्रेमाला आता मिरेच्या प्रेमाची साथ लाभली. माझ्या कन्हैयाचे डोळे देखील पाणावले असावेत, त्यालाही झोप येत नसावी. आता पुढचे सर्व ‘तूच करता आणि करविता’. म्हणत मिरेच्या भजनात रात्र निघून गेली……..
…………(४६)
आजचा दिवस माझ्या साठी काही चांगलं घडवेल ही आशा मी प्राजक्ताची नाजूक फुले देवपूजेसाठी वेचतांना माझ्या मनीं रुजली. ह्या प्राजक्ताने वेळोवेळी मला काही संकेत दिले आहेत. फुले,पाने आणि फळे सुद्धा सांकेतिक भाषेत आपल्याला संदेश देत असतात, पण आपले मन जेव्हा फारच संवेदनशील असते तेव्हाच मनापर्यंत पोहोचून मनाला जागृत करीत आपल्याला ते जाणवत असावे. ही अशी फुले देवपूजेसाठी मी कामतांच्या घरी असतांनाही सकाळी सकाळी उठल्यावर वेचायची. काही फुले माझ्या पूजेसाठी आणि काही त्यांच्याकडे सुध्दा देत असे. आज पूजेत असतांना त्या कान्हाकडे पाहिले माझ्या भावनांचे होत असलेले वस्त्रहरण ह्याला दिसत असूनही अजून हा येत कसा नाही असे विचार मनात यायला आणि “सुधीर आलाय, बाहेर ये”….. ह्या बाबांच्या बोलवण्याने मी ध्यानातून बाहेर आले.पूजा पट्कन आटोपून मी तशीच बाहेर आले. माझे हे असे ध्यान बघून सुधीर ला माझ्या व्यथेची कल्पना नक्कीच आली असावी. तो ही काहीसा रोडावल्या सारखा आणि चेहेरा रडल्या सारखा भासला. म्हणजे आम्ही दोघेही एकाच डुबणाऱ्या नौकेचे प्रवासी होतो तर….
“सुधीर”….. प्रत्यक्षात धांवत जाऊन त्याला कडकडून मिठी मारावी असे वाटत असूनही मी मनाला आणि शरीराला आवरले आणि धावत जाऊन सुधीरचा हात हातात घेतला. मला आता कशाचीच फिकीर नव्हती. बाबांच्या धाकाची सीमा ओलांडून अश्रूंच्या पुरानी मनाचा बांध फोडून सुधीर च्या मनाकडे धाव घेतली होती. झर झर वाहत तेही सुधीर च्या नयनांत मिसळले. सुधीर कडे सहृदयता आहे हे मी जाणून होते, पण पुरुषही रडतात हे मी आज प्रथमच पाहिले होते. माझ्या ह्या ‘स्वामीचे’ नमलेले डोळे मी पाहूच शकत नव्हते. मी स्वतःला सावरले. बाबांना हे सर्व निमूटपणे पाहण्याशिवाय आता गत्यंतरच नव्हते.
शांततेचा भंग करीत बाबांनी त्याला येण्याचे प्रायोजन विचारले. सुधीर ने ही प्रांजळपणे, त्याच्या माझ्यावरील प्रेमाची कबुली देत, घरच्यांचा सुध्दा आमच्या लग्नाला पाठिंबा असल्याचे त्यांना स्पष्ट सांगितले.
“माझ्या कडून, आणि आमच्या घरच्यांकडून असे कोणतेही वर्तन घडणार नाही की ज्यामुळे शालन ची नालस्ती होईल, आणि कामेरकर घराण्याची बदनामी होईल. त्या बाबतीत आपण निश्चिन्त असावे. आणि कृपया तिला आमच्याकडे येण्यास अटकाव करू नये. विशुकाकांना सुद्धा सर्व गोष्टींची महिती आहे. तेव्हा प्लीज….” ह्या शब्दात सुधीर ने त्यांना विनवणी केली. त्यावर, “मी विचार करतो” एव्हढच बाबा त्याला म्हणाले….
चहा न घेताच तो निघाला. मला खरोखरीच त्याची दया आली प्रेमासाठी स्वतःकडे कमी पणा घेत, शांतपणे पण निश्चयी स्वरात बाबांशी बोलला त्यामुळे माझ्या मनातले त्याचे स्थान आणखीनच उंचावले. त्याच्या धीटपणाचा, त्याच्या माझ्यावरील प्रेमाचा मला अभिमानही वाटला.
मी फक्त चार दिवस दिसले नाही, भेटले नाही, बोलले नाही ,तर माझा हा स्वामी, पुरुषोत्तम पुरुष असूनही एव्हढा हळवा होऊन, आपल्याकडे कमी पणा घेऊन तो आला. मी सुखी नाही हे कळल्यावर आमच्या प्रेमापोटी, ते उच्च जातीचे ,सुशिक्षित ,श्रीमंत असूनही, माझ्या बाबांकडे येऊन त्यांनी माझ्या सुखा साठी त्यांची भेट घेऊन त्यांना विनवणी केली, ह्यातच त्यांचा खरा मोठेपणा दिसतो.नुसत्या उच्च शिक्षणाने माणूस मोठा होत नसून विनयशीलता अंगिकारल्यानेच त्याचे मोठे पण सिद्ध होते हे त्याने सिद्ध केले.आज तो खरा उच्च ‘सारस्वत’ असल्याचे मी जाणले.
बाबानी आता, मला त्याला भेटायला मज्जाव केला तरिही, सर्व बंधनं जुगारून मी त्याला भेटणारच ह्याची मनानी खूणगाठ बांधली.
तो आमच्या घरून निघाला तेव्हा प्राजक्ताच्या झाडाखाली मी माझ्या निश्चयी नजरेने त्याला तसे वचनही दिल्याने समाधानाचे त्याचे ते स्मितहास्य स्वतःच्या आणि माझ्याही ओठावर नाचवत तो निघून गेला.
देवघरात आली आणि माझ्या भावनांचे वस्त्रहरण सुधीर च्या रूपाने येऊन थांबविणाऱ्या त्या माझ्या कान्ह्याच्या, त्या डोळे दिपावणाऱ्या तेजस्वी प्रतिमेत, हाती धरलेल्या सुधीर च्या प्रतिमेचा संगम झालेला पाहून मी मंत्रमुग्ध झाले……..
…………(४७)
सुधीर येऊन गेला आणि पुन्हा एकदा मनाला उभारी आली .प्राजक्ताचे संकेत पुन्हा एकदा खरे ठरले. माझ्या हरीच्या कृपेने, त्याच्या दयेने मी पुन्हा सावरले. त्यांच्या घरी जायला मला आता कोणी रोखू शकणार नव्हते, एका पुरुषोत्तमाने जर माझ्या प्रेमासाठी वाघाच्या गुहेत शिरण्याचे धाडस करून मला त्यातून ओढून बाहेर काढायला मदत केली आहे, माझ्या पुढील आयुष्याची हमी माझ्या ह्या निष्ठुर बाबांना दिली आहे, तर त्या बदल्यात माझ्या प्राणाची सुद्धा आहुती देण्याची वेळ आल्यास मी माझ्या स्वामी साठी का देऊ नये. आज इथे येण्यात वास्तविक त्यांनी तसे पाहता थोडी जोखिमच पत्करली होती, माझ्या बाबांनी त्याचा आणि पर्यायाने कामत फॅमिलीचा अवमान करण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
आता त्यांच्याकडे जायला बाबा अटकाव करतीलसे दिसत नाही.तरीपण मुद्धाम मी आजच त्यांच्याकडे जाण्याचे टाळले. सबंध दिवस त्यांच्याकडे चार दिवसात मला मिळालेल्या सुखाचेच चिंतन करण्यात गेला.
सकाळी जाग आली तीच मुळी कान्ह्याच्या गोड बासुरीच्या स्वरांनी, पक्षांची गोड किलबिलही चालू होती. बाहेर आली तशी सूर्यदेव आपल्या रथावर आरूढ होऊन बरेच पुढे आले होते.आज निरनिराळी बरीच फुले फुलल्याची चाहूल लागली. गोड, मधुर सुवास दरवळला होता. आज मला पूजेला लागतील ती फुले ठेऊन, छान छान फुलांनी भरलेली परडी घेऊन त्वरित मी माईंकडे निघाली, बाबा चक्क घोरत पडले होते, त्यांचे लवकर उठण्याचे चिन्हही दिसत नव्हते.
पुन्हा स्वागताला बाहेरच्या झोपाळ्यावर आमचे स्वामी महाराज ….
मला बघून सुधीर चटकन पुढे झाला, माझा उजवा हात आपसुकच त्याच्या हातात विराजमान झाला. विरहाच्या नंतर चे ते गोड मिलन परडीतल्या फुलांच्या घमघमाटाने फुलून गेले. ही सर्व फुले माझ्या ह्या स्वामीच्या चरणावर घालण्याची प्रबळ इच्छा झाली. परडीत हात घालणार इतक्यात माईंना दारात बघून परडी त्यांच्या हातात दिली आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला, मोठया मायेने त्यांनी मला छातीशी धरले आणि आईच्या मायेने पाठीवर हात फिरविताच माझ्या भावनांनी त्यांच्या खांद्यावर अभिषेकाची धार नयनांच्या अभिषेक पात्रातून धरली. आईच्या मायेनी त्यांनी माझ्या गालाची पापी घेतली. माझे सांत्वन करून त्यांनी मला बाजूच्या खुर्चीवर बसवून शांत केले.
काकांच्या हातचा चहा पितांना चार दिवस किती कठीण अवस्थेत आम्ही सर्वांनी काढले ते कळले. “सुधीर हिला घेऊन बाहेर बागेतून फिरून या” माईंच्या ह्या आज्ञेचे पालन करीत आम्ही बागेत आलो. इथेही आज फुलांनी आपल्या सुवासिक गंधाने भरपूर स्वागत केले. त्या फुलांना ,पानांना, वृक्षांना, पक्षांना सुद्धा आमचा विरह जाणवला असावा.वेली डोलू लागल्या, फुले झुलत एकमेकांना आलिंगन देत हाती, पक्षांनी किलबिल सुरू केली. वारा वाहून त्यानेही त्या पक्षाच्या सोबतीने गीत गायला सुरवात केली. लग्नमंडपात असते तशी सर्वांची धावपळ जाणवत होती. सुधीरने हलकेच मला जवळ केले. विरहाने कात टाकली, मिलनोत्सुक वधूच्या माथ्यावर फुलांचा वर्षाव झाला, सुधीर चे बोलके डोळे आणि कोमल स्पर्श सर्वांग मोहरून गेला. दोघांच्या अधरावर एकच गीत उमटले……..
…………(४८)
सुधीरला पुन्हा येईनच असे म्हणून लगबगीने घरी परत आले,हो उगाच उठल्या उठल्या बाबांचा रोष पत्करायला लागू नये.
पूजा उरकून, जेवण करून बाबांना दुकानात मदत करायला बसले. असे ह्या दुकानाची जबाबदारी किती काळ मला वाहावी लागणार आहे कोणास ठाऊक, तसे पाहता जवळच ‘घरत कंपनी’ ने बरेच मोठे दुकान उघडल्या मुळे आणि नवनवीन वस्तू तेथे मिळत असल्यामुळे, त्यात बाबांच्या चिडखोर स्वभावामुळे, आई गेल्यापासून आमचे गिऱ्हाईक पण कमी झाले होते. गिऱ्हार्ईकांबरोबर आईचे वागणे आणि बाबांचे वागणे ह्यात जमीन आस्मानाचा फरक असायचा.आई त्यांना सांभाळून घ्यायची, गोड बोलायची वेळोप्रसंगी गरिबांना कमी किमतीत वा उधारीत सुद्धा वस्तू देत असे, बाबांचे तसे नव्हते, गिऱ्हाहिकांवर जणू काय आपण उपकारच करतो अश्या भावनेने आणि कधी कधी तर त्यांना कस्पटासमान लेखून ते वागत असत, ह्याचा नको तो परिणाम होऊन धंदा बुडण्याच्या मार्गावर होता.
कधी एकदा माझे लग्न होते आणि ह्या व्यापातून सुटते असे मला झाले होते.कामतांच्या फॅमिली बरोबर सोयरीक जुळली होती,पण बाबांचा त्याला प्रखर विरोध आणि सरपंचाच्या मला नको असलेल्या, त्या नालायक कारट्या च्या हातात माझ्या जीवनाची दोरी देऊन त्या जीवन कडून बहुदा माझ्या जीवनाला मृत्यूच्या सापळ्यात लटकवायचा त्यांनी सरपंच्याकडे विडाच उचलला होता.
सुधीर चांगल्या तऱ्हेने आर्किटेक्ट परीक्षा पास झालाच आहे. आणि पुढील शिक्षणासाठी कॅनडाच्या विद्यापीठाने त्याला आणि प्रकाशला देखील शिष्यवृत्ती देऊ केली आहे. त्याच बरोबर त्याने वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, आणि हस्त सामुद्रिक शास्त्राचा देखील अभ्यास केला आहे. आमच्या दोघात जबरदस्त आकर्षण का आहे हे तो मला ‘अंकशास्त्राच्या’ आधारावर समजावणार असल्याचे देखील तो म्हणाला आहे,वास्तविक ह्या अश्या शास्त्रांवर माझा तितकासा अभ्यासही नाही आणि विश्वासही नाही. मला असे वाटते की आपल्या आयुष्यात आपल्याला प्राप्त झालेले ‘उपभोग’ आणि ‘भोग’ ह्यांचा आपल्या पूर्व जन्मांशी संबंध असावा. आपला जन्म हा आपल्या पूर्वजन्मातील कर्माची जशी गती असेल त्या नुसार प्राप्त होत असावा. रामदास स्वामींनी म्हटल्या प्रमाणे ‘मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले’, आणि म्हणूनच आपली सुखदुःख ही आपलीच करणी असून आपल्याच कर्माची बरी वाईट फळे असावीत.
माझे ह्या जन्मीचे कर्म तसे काही वाईट नसावे. आईंनी दिलेल्या शिकवणी प्रमाणे मी तशी सर्वांशी विनयशील, आणि मर्यादा ठेऊनच वागली आहे, शिक्षणही केले आहे, घरकाम, विणकाम ह्या एकाद्या मुलीला चांगलं स्थळ मिळून तिचा संसार सुखाचा व्हावा ह्या साठी लागणाऱ्या गोष्टी आईंनी माझ्याकडून उत्तम करवून घेतल्या आहेत. माझ्या नशिबाने मला सुधीर सारखा चांगला मित्र लहानपणापासून मिळाला आणि त्याचा आदर्श ठेवत मी त्यांच्यासारखेच शिक्षणात प्राविण्य मिळवले, आमच्या आवडी, निवडी पण बहुदा सारख्याच आहेत त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे आम्हाला असलेली गाण्याची आणि माईंसकट त्या घरात सर्वांना असलेली जुन्या गाण्यांची आवड माझ्या पथ्यावर पडली आहे.प्रत्येक मुलीला लग्नानंतर जसे चांगले सासर आणि घर हवे असते तसे नशिबाने मला मिळणारही आहे. पण तरीही “माझ्या स्वप्नातलं घर”, कसे असावे हे मी सुधीर ला त्या आमच्या नेहमीच्या खडकावर आम्ही गप्पा मारीत बसलो असतांना सांगितल्यावर. त्या सागराला साक्षी ठेवत तो म्हणाला “तुला हवे, अगदी तसेच घर ‘वास्तुशास्त्राचा’ आधार घेऊन मी तुझ्या साठी नक्कीच बांधेन. अगं, मुमताज च्या प्रेमासाठी शहाजहानने ताजमहाल बांधला तसे आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून एक सुंदर घर मी तुझ्यासाठी नक्कीच बांधेन आणि ते ‘सजविण्याचे’ काम तू करशील ह्यात वादच नाही.” सुधीर च्या ह्या वचनात मी आत्ताचे माझे हे घर आणि ते नवीन घर ह्यांच्या तुलनेत रममाण झाले……..
…………(४९)
सुधीर बरोबरचे दिवस मजेत चालले होते ह्या पंधरा वीस दिवसात आम्ही मनाने एकमेकांच्या बरेच जवळ आलो. प्रकाशचाही विषय निघायचा, प्रकाशला सुद्धा सुधीर साठी मी योग्यच आहे असे वाटत असल्याचे त्यांच्याकडून कळले होते. बाबांचा विरोध पत्करूनही मी मधे मधे माईंकडे जाऊन बसत होते.त्यांना मदत करीत होते. मध्ये पुन्हा अलिबाग ला जाऊन आलो. माझ्यासाठी बऱ्याच साड्या, पर्सेस, आणि इतर अनेक वस्तू त्यांनी ‘तीन डिसेंबर’ च्या सुधीरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणून माझ्यासाठी घेतल्या होत्या. वाढदिवसाच्या दिवसाचे अवचित्य साधून त्यां सर्वांना आमच्याकडे चहापाण्यासाठी बोलवायचे होते. बाबांनी मुद्धाम लग्नाची बोलणी करता यावी ह्या हेतूनेच बहुधा मला होकार दिला असावा.कधीतरी हा विषय त्यांना काढायचाच होता.
दोन डिसेंबर ला ते आमच्याकडे चहा साठी म्हणून आले असताना बाबांनी अनेक प्रश्नांची त्यांच्यावर नाराजीच्या सुरात सरबत्ती केली, एकूण काय तर त्यांना मोडता घालायचा होता.उद्या सुधीरचा वाढदिवस म्हणून त्या निमित्ताने त्यांनी बाबांना सुद्धा जेवणाचेच आमंत्रण दिले.
एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून हे कळले की प्रकाश सात तारखेला आल्यावर त्याच्या बरोबर हे तिघेही त्या गाडीतून आठ ला पहाटे मुंबईला जाणार आहेत. प्रकाश आणि सुधीर वीस डिसेंबरला सकाळच्या विमानाने कॅनडाला निघणार होते.पुढे आठ दिवसांनी माई ,दादा परत येणार होते.सुधीर दोन वर्षे राहून कोर्स झाल्यावर येऊन मगच आम्ही लग्न करण्याचे ठरले .बाबांना माझ्या लग्नाची घाई झाली होती, वास्तविक मी अजून काही थोराड झाली नव्हती माझे बाव्वीस, आणि सुधीर दोन वर्षांनी मोठा इतकंच. पण बाबा त्यांची प्रत्येक गोष्ट उगाचच खोडून काढीत होते. उध्या त्याचा वाढदिवस, बाबांनी त्याला जास्त नाराज करायला नको म्हणून मीच विषय थांबविला….
बाबांपुढे सर्व गोष्टींचा अधिकृत रित्या खुलासा झाला होता. आमचे लग्न होणार हे पक्के होऊन त्यावर शिक्कामोर्तब झाले.
माझ्या नजरेसमोर सुधीर संबंधीची एक एक गोष्ट स्पष्ट दिसू लागली.लहानपणची मी त्याच्या साठी भातुकलीच्या खेळात देखील त्याचीच नवरी होण्याची कास धरणारी. प्रत्येक वेळी खेळात त्याच्याच पार्टी मध्ये राहण्या साठी धडपडणारी. त्याच्याच शाळेत नांव घालावं ह्यासाठी आईकडे हट्ट करणारी. घरात काहीही गोड धोड केले की मी स्वतः खाण्या आधी त्याच्याकडे धावणारी .पुस्तकाच्या पानात त्यांनी दिलेले मोरपीस जपणारी .त्याच्या साठी वहीत पिंपळाच्या पानांची जाळी करून त्यावर माझे नाव कोरून त्याला देणारी. कॉलेजच्या दिवसात अभ्यास टाकून त्याच्यासाठी झुरणारी. यौवनात त्याच्याच स्पर्शाची स्वप्न पाहणारी आणि आता त्याच्याच साठी सर्वस्व वाहणारी त्याची शालन कळायला लागल्यापासून स्वतःसाठी अशी जगलीच नव्हती. दैनंदिन सुधीर मध्येच लीन झालेली आणि त्याच्या पूजेसाठी सर्वस्वाचा हार करणारी ही ‘मालन’ सुधीरचीच आहे आणि सुधीरचीच ‘शालन’ म्हणून राहील. राधा… कृष्ण, सीता… राम, उमा… महेश ह्या देवतांची नावं घेताना स्त्रीच नाव प्रथम आणि पुरुषांच नंतर येतं पण माझ्या जीवनी आधी आणि नंतरही सुधीरचंच नांव राहील……..
…………(५०)
आज तीन तारीख मी सकाळी सकाळीच लवकर उठून पूजा आटोपुन त्यांच्या पूजेसाठी सुद्धा फुले घेऊन गेली. बागेतल्या फुलांचा गुच्छ तयार केला होता त्याच बरोबर नेलेल्या प्राजक्ताच्या फुलांची ओंजळ मी सुधीर च्या ओंजळीत रीती केली. सुवासिक फुलांचा तो गुच्छ त्याला दिला. आणि त्याला शुभेच्छा देऊन त्याच्या चरणाला स्पर्शही केला आपल्या दोन्ही हाताने त्याने मला उठवत हृदयाशी धरले. त्याच्या हृदयाच्या संवेदना माझ्या हृदयाला भिडल्या आम्ही दोघे शरीराने भिन्न असलो तरी एकजीवच असल्याची अनुभूती ह्या क्षणी मला आली. असेच त्याच्या त्या प्रेमभऱ्या मिठीत कल्पांतापर्यंत असावे असे वाटले. आयुष्य कधीतरी संपायचेच पण त्याच्या मिठीत असतांना ते संपावे ह्या साठी मनोमन त्या कान्ह्याकडे हात जोडले. आईंनी माझ्यासाठी केलेली कमळाच्या प्रतिकृतीची अंगठी मी माझ्या बोटातून काढून त्याला वाढदिवसाची भेट म्हणून त्याच्या बोटात चढविली.
साखरपुढा होईल तेव्हा होईल पण आज मी त्याला माझा साता जन्मीच्या जीवनाचा जोडीदार असल्याचे सांगून त्याच्या त्या अंगठी घातलेल्या हाताचे दीर्घ चुंबन घेतले. समोर माई दादा असल्याचे देखील भान मला राहिले नव्हते. “असेच एकमेकांबद्धल चे तुमचे प्रेम अखंड राहो” ह्या माई, दादांच्या आशिर्वादाने मी भानावर येऊन त्याचा हात अलगद मोकळा केला.
आम्हा दोघांना देवघरात त्यांनी नेले. तिथे त्यांचे कुलदैवत श्री देवकीच्या मांडीवर बसलेला कान्हा पाहून तृप्त झाले.
असाच नटखट माझ्याही पोटी जन्माला यावा ह्यासाठी सुधीर बरोबरच हात जोडले.
बाहेर आलो माझ्या मनाला, माझ्या आनंदाला बहर आलेला पाहून त्या आंब्याच्या जागो जागी फुललेला मोहोरही बहरला. वसंत ऋतूत होणारे कुहुकुजन आज आत्ता कसे होतेय ह्याचे माझ्या मनालाही कुतूहल वाटले. सुधीर ने मला दिलेले आलिंगन पाहून त्या वेलींनाही राहवले नसावे, त्याही त्या जवळच्या तरुवर झुकलेल्या पाहून, ज्यांना आम्ही निर्जीव समजतो आणि त्यांच्यावर घाव घालतो, त्या वृक्षवल्लीं ना आपल्यासारखेच जीवन आणि भावना असतात ह्याचा प्रत्यय आला.बाजूच्या पाटाच्या खळखळून वाहणाऱ्या पाण्याचा नाद कानात भ्रमराचे गीत गात असावा. सुधीर च्या बोटांतील माझ्या त्या कमलाकृती आंगठित मला सुधीररुपी भ्रमर मकरंद घेण्यात रमल्याचे जाणवत होते. खळखळणाऱ्या पाण्यातील मगाशी दीसलेल्या आमच्या दोन भिन्न प्रतिमा आता वाऱ्याच्या झुळके सरशी एकजीव झाल्या……..
…………(५१)
संध्याकाळी बाबांबरोबर त्यांच्या घरी आलो.सर्वांनी बाबांचे मानाने स्वागत केले. विशुकाकांना सुद्धा बऱ्याच वर्षानंतर आपल्या ह्या धाकट्या भावाने कामतांच्या घरी पाऊल टाकल्याने समाधान वाटले,त्यांनी तसे बोलूनही दाखविले.आमच्या गप्पांमद्धे बाबांना फारसा रस नव्हता.सुधीर आणि सर्वच जण त्यांच्याशी अदबीने बोलत होते. वास्तविक पुढे लग्न करायचे म्हटल्यावर आमची बाजू मुलीकडली असूनही ते बाबांना, त्यांच्या शब्दाला मान देत होते. ही फॅमिली आमच्यापेक्षा उच्च आणि श्रीमंत असूनही त्यांच्या वागण्यातील अदबीने त्यांचा सुसंस्कृतपणा आमच्या तुलनेत बराच उजवा ठरला होता.
आज माईंनी बदामाचा शिरा केला होता. बाबांना चकल्या आवडतात हे विशुकाकांना माहीत होते त्यामळे चहा बरोबर त्यांनी तशी सोय केली होती.
सुधीर ने नंतर बाबांना चरणस्पर्ष केला. मी ही पुढे होत बाबांना वाकून नमस्कार केला. बाबांनी तोंडदेखल आशिर्वाद दिला. वास्तविक ते बऱ्याच वर्षानंतर इथे आले होते, त्यात सुधीर चा वाढदिवस पण येतांना त्यांनी भेटवस्तू सोडाच पण आमच्या दुकानातील एखादी वस्तू वा मिठाई, निदान बिस्किटाचा पुडा अथवा चॉकलेटस तरी आणायला हवी होती. मी त्यांची बाजू सावरत “बाबा बाहेरून जरा उशिराच आले, निघतांना घाई झाल्यामुळे काही घेता आलं नाही” असे म्हणून वेळ सावरून घेण्याचा प्रयत्न केला “इट्स ओ के, ते मोठ्या मनाने आले, ह्यातच सर्व आलं, त्यांच्या आशिर्वादाचीच फक्त गरज होती” म्हणत सुधीर ने मनाचा मोठेपणा सिद्ध केला.
जेवणानंतर बाबा लगेच निघाले तशी “शालन ला आमच्या जेवणानंतर सुधीर आणून सोडेल” म्हणत माई त्यांना सोडायला ओटीपर्यंत आल्या.
जेऊन आम्ही नेहमी प्रमाणे बागेत बसलो. वर आकाशात गुरु ग्रह चमकत होता. ह्या गुरू ग्रहाची महती, त्याचा सुधीरच्या आयुष्यावरचा प्रभाव, तसेच अंकशास्त्राच्या दृष्टीने त्याचा तीन नंबर असतो, वैगेरे सुधीर सांगत होता. बाकीच्या ग्रहांचे नंबर, त्यांचे प्रभाव, ग्रहांची युती, वक्री झाल्यावर मनुष्यावर त्यांचे होणारे परिणाम वैगेरे संबंधी त्याने त्याच्या ‘त्या’ विषयांवरील अभ्यासाच्या आधारावर बरीच माहिती दिली. अंकशास्त्रा प्रमाणे माझ्या शालन ह्या नावाच्या इंग्रजी अध्याक्षरांची येणारी बेरीज ‘नऊ’ येते, ती कशी येते, त्याचा आणि माझी जन्म तारीख सुद्धा ‘नऊ एप्रिल’ असल्याने ‘मी मंगळ ग्रहाच्या’ अधिपत्या खाली कशी येते. माझ्या जीवनात काय काय घडू शकते ह्यावर सुद्धा त्याला बोलायचे होते, पण माईंनी “अरे शालनला निघायला उशीर होईल” म्हणून त्याला तिथेच थांबविले. मंगळ ग्रहाचा माझ्या भावी जीवनावर काय परिणाम होईल ते कळायचं राहून गेलं.
आम्ही घरी जाण्यापुर्वी बाजूच्याच भाटावर समुद्रकिनारी गेलो.त्याच्या समवेत गेला महिनाभर मी खूप काही जाणलं, सहवासाचं सुख उपभोगले ते अवर्णनीय होते. त्याच्या जोडीने जणू काही आम्ही दोघांनी सर्व ऋतू, सर्व सण साजरे केल्याचं समाधान माझ्या मनाला लाभलं होतं आणि आता ह्या चंद्राच्या शीतल प्रकाशात आकाशातील ताऱ्यांच्या साक्षीने मी त्याला तशी ग्वाही देत होते. जे सुख एखाद्याला बऱ्याच वर्षाच्या सहवासात मिळाले नसते ते सर्व मला एकाच महिन्यात लाभले. आता घराच्या जवळ येताच बाबांना बाहेरच उभे पाहून सुधीरने माझ्या हातातला हात सोडवीत त्यांना नमस्कार करीत माझ्या ओठावरील गीताला पूर्णविराम दिला……..
…………(५२)
एकमेकांच्या हातात हात घालून गावातून असे रात्रीच्या वेळी येणे त्यांना काही रुचले नव्हते. पण सुधीर चा वाढदिवस, त्यात तो चार दिवसांनी जाईल त्यानंतर पुन्हा कधी कसा भेटेल कोणास ठाऊक, म्हणून मी जास्तीत जास्त त्याच्या सहवासात होते. त्याच्यात रममाण होत होते…..
बिछान्यावर पडले तसे त्याचे ते देखणे रूप डोळ्यापुढे उभे राहिले, त्याचे व्यक्तिमत्वचं इतके दांडगे आहे की माझे सोडाच, पण कोणतीही स्त्री त्याच्या रूपावर, देखणे पणावर भाळू शकते. मी तर जीवच ओवाळून टाकला आहे. इतके दिवस तो खरोखरीच मला सोडून जाईल असे वाटत नव्हते, पण आता त्याचे जाण्याचे पक्के झाल्यापासून मन खजील झाले आहे, नको नको ते विचार मनात येऊ लागले आहेत. त्यात तो मुंबईत राहणार असता तर एकवेळ ठीक होते, वेळ पडल्यास त्याला भेटायला जाणे फारसे कठीण नाही, पण परदेशी म्हटल्यावर मन खट्टू झाले. तरुण वय त्यात पुन्हा विदेशी संस्कृती, स्त्रियां बरोबर अभ्यासात, कामामुळे एकत्र येण्याची शक्यता होतीच. ह्या सगळ्या विचारात झोप उडाली. कधी कधी वाटतं आपण भविष्याचा उगाच एव्हढा विचार करतो आणि मनःशांती बिघडवून घेतो. जे घडायचे असते ते तसेच घडते. उलट असे वाईट विचार करून, आपण मनाला कमकुवत बनवत असतो.
रात्रीच्या जागरणाने नेहमी पेक्षा उशिराच उठले. आज बाबांचा रोष पत्करायची इच्छा नव्हती काल रात्री त्यांचा मूड आम्हा दोघांना एकत्र बघून बिघडलाच होता, त्यात भर टाकायची नव्हती. म्हणून त्यांच्याकडे आत्ता जाणे टाळले.
सबंध दिवस दुकानात वेळ काढला. संध्याकाळी काकाच मला बोलवायला आले. ते पण बाबांबरोबर दुकानात बसणार म्हटल्यावर मी लगेच निघाले.
माझ्यासाठी सुधीर च्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून खरेदी केलेल्या वस्तू मला काल च्या गोंधळात द्यायच्या राहिल्या होत्या त्या “आज तरी आठवणीने ने हो” म्हणत माईंनी माझ्या हातात सोपविल्या. “जातांना नक्की नेते” म्हणत सुधीर ने मागच्या दारातून मला हाक मारून बोलविल्याने त्याला भेटायला गेली.
सुधीर ने हाताला धरत नेऊन झोपाळ्यावर बसविले. आणि उंच झोका घेऊन तो मला भिववू लागला तशी मी त्याला आणखीनच बिलगून बसले. तसे पाहता सुधीर सारखा राजबिंडा, दणकट पुरुष माझ्या बरोबर असतांना मला कसली भीती वाटायचं कारणच नव्हतं. मी पडेन ह्याची भीती, मला सावरणारा, सांभाळणारा ‘माझा राजा’ जवळ असल्याचे मनात आल्या आल्याचं दूर झाली. समोर अथांग सागर, एक उंच झोका आणि सागरावर मात करून क्षितिजाला स्पर्श केल्याची भावना मनाला उभारी देत असतानाच, दुसऱ्याच क्षणी, तोच झोका खाली आल्यावर आपण भुईसपाट झाल्याची भावना मनाला हेलावून गेली.
जीवनाचं पण असंच असावं ‘कभी धूप कभी छांव’ कधी चांगले दिवस येतात तर कधी वाईट, कधी आनंद तर कधी दुःख, कधी काळ रात्र तर कधी सुखद दिवस, बरं आहे तिथे वाईट आहे, सफेद तेथे काळं, जीवनात सरळ असं काहीच नसत. ‘जीवन सुख दुःखाची जाळी, त्यात अडकले मानव कोळी’ हेच खरं.
सुधीरने समुद्रात दूर वर हेलकावत जाणाऱ्या एका नावे कडे मला बोट दाखविले, माझ्या जीवनाची नौका पण अशीच हेलकावत, वाहत जाईल का? अश्या शंकेने मनात घर केलं. मनातील असे वाईट विचार आले, पण झोपाळ्यावरून उठून मावळत्या सूर्या चे दर्शन घेत किनाऱ्यावर फेरफटका मारायला आलो आणि नाहीसे झाले.
दूरवर मनाला लुभावणारा तो सागरी किनारा, भरगच्च भरलेले केवड्याचे वन, नारळी पोफळीच्या वाड्या, क्षितिजावर पिवळसर तांबूस रंगाची उधळण करीत आपल्या रथातून नुकताच परदेशी गेलेला तो सूर्य, वर आकाशातुन घराकडे झेपावणारी पाखरं, सर्व कसं चित्रात काढतात तसं ,हे रूप डोळ्यात साठवित आम्ही परत वाडीत आलो. आता निसर्गाने काळसर तांबूस शाल अंगावर ओढायला सुरवात केली होती. वर चंद्राने ढगातून हळूच डोके वर काढायला सुरवात केली. रात राणीचा सुगंध सुधीर च्या सहवासात मनाला प्रफुल्लित करीत होता.सुधीर च्या सहवासात देहभान हरपून त्याच्या नजरेतल्या त्या जीवघेणी ओढीने, आमचे हात एकमेकांच्या गळ्यात भावनांची वरमाला घालीत, अनामिक स्पर्शाने, थरथरत्या अधरानं, आम्ही मूक गीताला गोड मूर्त स्वरूप दिले……..
…………(५३)
आज प्रकाश त्यांची गाडी घेऊन आला. ह्याच गाडीतुन उध्या तो माझ्या कान्ह्याला, माझ्या स्वामीला माझ्या पासून दुरावणार होता. अकृराने माधवला नेण्यासारखेच मला ते भासले. उध्या माझा हा सखा माझ्या पासून दूर होऊन विरहाच्या खाईत मी लोटली जाणार ह्या विचाराने संपूर्ण हादरले.
आज बाबांची पर्वा न करिताच मी त्यांच्या घरात ठाण मांडून बसले. सुधीरलाही मला सोडून जायचे जिवावर आले होते हे मी त्याच्या नजरेत टिपत होते. माईंसकट सगळ्यांना माझी अवस्था, आणि व्यथा लक्षात आली असली तरी सुधीरचे उच्च शिक्षणासाठी विदेशी जाणे भाग असल्याने माझ्यासकट सगळ्यांचाच नाईलाज होता. उध्या त्याला हसत मुखे निरोप द्यायला मी हवा हे मी जाणत होते, पण तरीही द्विधावस्था झालीच.
प्रकाशनेही माझी अवस्था पाहून मला धीर दिला .
आज त्यांच्याच कडे जेवायला होते, बाबांना जेवायला वाढून आली खरं पण मला जेवणावर इच्छा नव्हती. माईंच्या आग्रहाखातर दोन घास खाल्ले.
त्यांना पॅकिंग ला मी मदत करीत होते, माझ्या पाणावलेल्या डोळ्यांकडे बघून मला सुधीर धीर देत होता.
“अगं, सुधीर तिथे कायम थोडाच राहणार आहे, शिक्षण संपल्यावर तो येईलच, आणि आम्ही आहोतच की येथे तुझ्या बरोबर, तू आनंदाने त्याला निरोप दे, त्याच शुभेच्छावर त्याचे अभ्यासात लक्ष राहुन तो उत्तम रित्या पासही होईल. तू उगाच मनाला असे वाईट वाटून घेऊ नकोस” माईंनी जवळ घेत म्हटले आणि माईंच्या ह्या धीराने मी सावरले.
संध्याकाळी आम्हाला एकांत मिळावा म्हणून माईंच्या सांगण्यावरून आम्ही दोघेच आमच्या त्या नेहमीच्या खडकावर जाऊन पाण्यात पाय सोडून बरेच वेळ अकमेकांबद्धल वाटणारे प्रेम आमच्या गुंफलेल्या हातातून मूकपणे व्यक्त करीत होतो, जेव्हा शब्द मूक होतात तेव्हा हृदयाला हृदयाची भाषा कळून त्यातून उठणारी कंपने मनाच्या विणेवर स्वरातून व्यक्त होत दोन जीवांच्या आत्म्यापर्यंत पोहचत असावीत.
असे बराच वेळ आम्ही फक्त एकमेकांकडे पाहत नजरेत रूप साठवीत बसलो होतो .
उद्यापासून एकमेकांना प्रत्यक्ष दिसणार नव्हतो, भेटणार नव्हतो, बोलुही शकणार नव्हतो. मला सुधीरला डिस्टर्ब करायचे नव्हते, दुखवायचे तर मुळीच नव्हते, त्याच्यावर विश्वासही होता तरीही दोनच दिवसापूर्वी मनात उठलेल्या शंकांचे निरुपण करावे, त्या शंकांच्या वणव्याला शांत करावे म्हणून शेवटी न राहवून सुधीर ला विचारले, “सुधीर तू रागावणार नसशील, गैरसमज होणार नसेल, तु वाईट वाटून घेणार नसशील, तर एक विचारू का?”
सुधीर ने जवळ घेत, “हो” म्हणताच.
प्रत्येक प्रेम करीत असलेल्या स्त्रीच्या, प्रियेच्या, मनात कधी न कधी डोकावणारी ती शंका बऱ्याच प्रयत्नानंतर,
पाणावलेल्या डोळ्यात त्याची ती देखणी मूर्ती कल्पांतापर्यंत साठवीत, हृदयाचा गाभारा ओलांडीत आर्त स्वरात माझ्या अधरांवर हलकेच उमटली……..
…………(५४)
माझ्या नजरेपासून त्याने कधीही दूर जाऊ नये ह्या माझ्या आंतरिक आर्जवाची पूर्तता करणे त्याला सध्या तरी शक्य नाही ह्याची मला जाणीव आहे. पण त्याच्यावर विश्वास असूनही, तो अन्य स्त्रीच्या प्रेमात मला दुरावेल ह्या माझ्या शंकेवर, त्याने माझा हात आपल्या हातात घेत मला त्यांच्या त्या कुलदेवता ‘श्री देवकीकृष्णाची’ शपथ घेऊन, मला तो कधीही अंतर देणार नाही ह्याची ग्वाही दिली, इतकेच करून तो थांबला नाही, ज्या खडकावर आम्ही बसलो होतो, त्याच्या बाजूच्या नेहमी पाण्याखाली असणाऱ्या खडकावरील, कालवांच्या त्या धारदार शिंपल्यावर त्याने आपल्या डाव्या हाताच्या करंगळी जवळच्या बोटाला धरून चट्कन कापून घेतले, मला काही कळायच्या आतच त्याने त्याच्या उजव्या हाताच्या बोटाने माझ्या कपाळी त्या रक्ताच्या धारेचा ‘टिळा’ लावीत म्हणाला “शालन आत्ता जरी आपले लग्न झाले नसले, रक्ताचे नाते नसले, तरी आज पासून कल्पांतापर्यंत जन्मोजन्मीची तूच माझी सुवासिनी आहेस.” मी पट्कन त्याच्या त्या बोटाला माझ्या साडीच्या पदराची चिंधी काढून त्यावर घट्ट बांधली. रक्त वाहायचे थांबले, ज्या बोटात आज मी अंगठी घालून त्याला मी सर्वस्व वाहिल्याची ग्वाही दिली होती, त्याच बोटाने त्याने ‘रक्ताचे तिलक’ लावून मला ‘सौभाग्य’ दिले होते. त्या बोटाचे मी दीर्घ चुंबन घेतले, मी अजाणता त्याच्यावर घेतलेल्या शंकेने शर्मिनदा झाले, आता त्या जखमी बोटाला चुंबीताना त्यावर घळघळ वाहणाऱ्या माझ्या नयनांची धार लागली होती. सुधीर च्या चरणांना स्पर्श करून त्याची माफी मागितली तसे “हे काय वेड्यासारखे शालन” म्हणत त्याने मला प्रेमाने जवळ घेतले.काळ थांबला असावा, चहूकडे अंधार दाटला होता. सागराची गाज स्पष्टपणे ऐकू येत होती, आणि वरून उडत गेलेल्या टिटविच्या आर्त स्वराने मी भानावर आले.
‘रक्ताची नाती विसरणाऱ्या ह्या जगात, आपल्या रक्ताने मला सौभाग्य देणारा हा सुधीर जन्मोजन्मीचा माझा जोडीदार असण्याचीच ही पावती होती’….
आज पासून मी त्याच्या ‘सौभाग्याचा’ मान राखून लालभडक कुंकुवाचा टिळा लावण्याचे निश्चित केले. नंतर एकमेकांच्या आधाराने जड पावलांनी आम्ही परतलो. आज ज्या खडकावर आम्ही नेहमी बसतो त्या जागी सुधिरच्या रक्तानी आणि माझ्या आसवांनी अभिषेक करून ती जागा कालांतरासाठी स्मृती पटलावर कोरून पूज्य मानली…..
घरी आले देवापुढे निरांजन, समई लावली, आणि आईच्या कपाटातील तिचा चांदीचा कुंकवाचा करंडा घेऊन देवासमोर त्यालाच साक्षी ठेऊन ठसठशीत लाल भडक कुंकवाचा टिळा माझ्या कपाळी लावला……
……आज ते सर्व निघाले, निघतांना मला हवे असलेले, “आपले घर शक्यतो लवकरच मी बांधायचे ठरविले आहे’ असे सुधीरने सर्वांदेखत मला सांगून माझ्या उरल्या सुरल्या शंकांनाही तिलांजली दिली. मी त्याच्या प्रेमात निर्धास्त झाले. उगाच नको त्या शंका मनात आल्या होत्या असे वाटले.
सुधीर च्या खोलित बराच वेळ आम्ही एकमेकांच्या सानिध्यात शांत पणे हातात हात घेऊन, एकमेकांचे रुप नजरेच्या कोंदणातून हृदयाच्या गाभाऱ्यात पुजत बसलो होतो. निघतांना आम्ही सर्व देवघरात असतांना माईंनी मला धीर दिला, त्यामुळे मी ओठावर उसने हसू ठेवीत त्यांना निरोप दिला…
आता देवघरात कन्ह्यापुढे सुधीर च्या शिक्षणासाठी, सर्वतोपरी यशासाठी आणि आमचे प्रेम अखंड राहावे ह्यासाठी पुन्हा पुन्हा हात जोडले. ह्यापुढे “कधी मी पाहीन ती पाऊले” अशी माझी गत होणार ह्याची मनाला जाणीव झाली.
सुधीर ला निरोप देताना राहून राहून माझ्या भावना आणि ओठावर आलेले गीत तो निघताना, त्याला पुन्हा वाईट वाटायला नको म्हणून हुंदक्यातच विरले.
ते सर्व निघून गेले आणि मी जड अंतःकरणांने, एक एक पाऊल टाकीत घराकडे वळले. हुंदका आवरणे आता कठीण होत गेले आणि देवघरात आले मात्र, हातातल्या त्याच्या प्रतिमेने मनात दबलेल्या त्या भावनांना उजाळा दिला……..
…………(५५)
गेले आठ दिवसात असा एकही क्षण गेला नाही की मला त्याच्या आणि पर्यायाने माईंच्या आठवणिनी ग्रासले नाही. सकाळी मी न विसरता ठसठशीत लाल कुंकू लावते ह्याचे गुपित काकांच्या लगेच लक्षात आले, पण ते बघून बाबांच्या अंगाचा तिळपापड व्हायचा, त्यांनी मी कुंकू लावू नये म्हणून मला हटकलेही, गावातही ह्यावरून चर्चा व्हायला लागली, पण हे ठसठशीत कुंकुचं त्या नतद्रष्टयापासून माझे रक्षण करील ह्याची मला खात्री होती, म्हणूनच बाबांना पण मी दाद दिली नाही. काकांना मात्र मी कुंकू लावलेलीच जास्त सुंदर वाटायची, म्हणायचे “शालन तुझ्या गोल चेहेऱ्यावर ते जास्तच खुलून दिसते, आणि ते बघितल्यावर सुधीर इथेच आसपास असावा असाही भास होतो”
ह्रदयातून सुधीर जाऊच शकत नाही आणि त्याचे अस्तित्वही ह्या स्पंदनातून मला जाणवतेच. त्याच्या आठवणींवर तर माझा एक एक दिवस मावळतो आहे. खूपच बेचैन झाले की मी त्यांच्या घरी जाऊन काकांशी बोलत बसे, त्याच्या लहानपणा पासूनच्या सवयी, आवडी निवडी तो करीत असलेल्या खोड्या वैगेरे बद्धल ते बोलायचे तेव्हा आमचे बाळही त्याचीच प्रतिकृती असणार ह्याची मी खूणगाठ बांधत असे. तो आता तेथे कसा असेल, काय करीत असेल ,त्याला माझी आठवण येत असेल का, माझ्या मनाला असलेली हुरहूर त्याच्याही मनाला असेल का, असे सारखे मनात यायचे. दिवसाची सुरुवात त्याच्याच आठवणीत, आणि बिछान्यावर पहुडले की त्याच्याच स्वप्नात दंग व्हायची. पहाटे पहाटे बरेच वेळा तो आल्याची चाहूल लागायची. आणि मी स्वप्नवेडी उगाच दरवाज्याकडे धाव घ्यायची. सकाळी प्राजक्ताची फुले वेचतांना तर त्या फुलात, पाकळ्यात मला त्याचीच प्रतिमा दिसायची आणि त्या गोड, नाजूक, सुवासिक फुलांना ओंजळीत घेऊन त्याच्या रुपाला त्या प्रतिमेला मी अधरी स्थान द्यायची.
माई दादा सुद्धा घरात नसल्याने पटकन घरात शिरावे असे वाटत नव्हते. तो तर इतक्यात येणारच नाही निदान माई दादा आले तरी मनाला तेव्हढेच समाधान वाटेल. कधी त्याच्या विरहात रात्र रात्र झोप येत नसे, पहाट होता होत नसे, मी बेचैन व्हायची, एकटे पणा खायला उठायचा, माझी ही अवस्था शब्दात वर्णन करणेच कठीण होते. ही व्यथा सांगणार तरी कोणाला, आज किशोरी असती तर मनावरचे हे ओझं थोडं कमी तरी झालं असतं. मनाची थरथर वाढायची आणि थरथरत्या ओठावर स्वरांच्या कंपनेतून एक अस्पष्ट गीत आकाराला यायचं……..
…………(५६)
सुधीर बरोबरचे आनंदाचे क्षण, आपण पाळलेल्या पक्षाने आपली नजर चुकताच, हातावर तुरी देऊन भुर्रकन उडून जावे, आणि आपल्या हाती फक्त पिसे राहावी, तसे हे सोनेरी क्षण आठवणींच गाठोडं माझ्या माथी ठेऊन सटकले.
येणाऱ्या प्रत्येक दिवसात ह्या गाठोड्याला उशाशी घेऊन निजण्याशिवाय आता गत्यंतरच नव्हते.
सुधीरच्या त्या राजबिंड्या व्यक्तिमत्वाने मला पूर्ण भारून टाकले, बालपणा पासूनची ओढ होतीच, त्यात यौवनाची भर पडल्यामुळे मी भारावून त्या प्रेमसागरात स्वतःला झोकून दिले,
माझ्यासाठी सुधीर ही शिडाची नौका होती, कधीही न डुबणारी, एक वेळ हे शीडाचे जहाज परीस्थितिच्या लाटांवर उलटेल पण मी त्याच्यावर तरून जाईन हे निश्चित.
मला भाग्ग्याने मिळणारे माई दादांसारखे सासू सासरे, त्यांनी मला दिलेले प्रेम, दाखविलेली सहानभूती आणि आमच्या प्रेमाला दिलेल्या प्रोत्साहनामुळे आज त्यांची अनुपस्थिती मला प्रकर्षाने जाणवतेय.
एकीकडे बाबांचा हेकेखोर, आणि चिडचिडेपणा, ह्या उलट माई, दादांचे ते शान्त, समजूतदार वागणे ह्या मुळे त्यांच्या विरहाची जाणीव मला सतत होत राहिली आहे. बहुदा पुढच्या आठवड्यात सुधीर आणि प्रकाशला निरोप दिल्यावर ते येतील आणि ह्या वीरहिणीला दिलासा मिळेल. तो पर्यंत आठवणींच्या ह्या धुक्यात धडपडत, ठेचाळत ह्या अनोळखी एकल्या मार्गावर चालत राहाणे भाग होते.
रात्र खायला उठली की सुधीर च्या सहवासातल्या जादुई क्षणाच्या आठवणीची कांडी फिरवून निद्रादेवीला मंत्रमुग्ध केल्याशिवाय, उषादेवी प्रसन्नच होत नसे, अशी आणखीन किती सुकलेल्या रात्रीची पाने गोळा करावी लागणार कोणास ठाऊक.
दुकान बंद केल्यावर रात्री स्वयंपाक, जेवणं खाणं झाली की मी नेहमी, देवघरात परमेश्वराच्या नामस्मरणा साठी जपमाळ हाती घ्यायची. पण आताशा ती हाती घेतली की सुधारचीच मूर्ती डोळ्यापुढे उभी राहून, त्याच्या स्मरणाचेच एक एक मणी ओढले जायचे. त्याच्या त्या रूपाचा, त्याने दाखविलेल्या सहानुभूतीचा, त्याच्या औदार्याचा, प्रेमळ नजरेचा, त्याच्या चेष्टेखोर स्वभावाचा,त्याच्या हजरजबाबी पणाचा, त्याच्या शृंगारिक वृत्तीचा,असे बहुदा एकशे आठ मणी माझ्या हृदयाच्या झोळीतून मनाच्या माळीने एक एक ओढले जायचे.परमेश्वराला जसे रोज आपण स्मरतो, त्याचा विसर आपल्याला पडत नाही, तसेच काहीसे सुधीरच्या बाबतीत माझे झाले आहे. एकाग्र बुद्धीने चिंतनात रमलेल्या माझ्या मनाने, हृदयातील आठवणींच्या मंदिरातील त्याच्या नामाची, स्वरूपाची ही जपमाळ ओढीतच मिटल्या डोळ्याने त्या “माझ्या स्वामीला” विचारले “तुला ते आठवेल का सारे”……..
…………(५७)
माई, दादा कधी एकदाचे येतात आणि माझ्या ह्या एकट्या पडलेल्या मनोवेलीला थोडा तरी त्यांच्या भक्कम वृक्षाचा आधार मिळून, कोमेजलेल्या वेलीला पुन्हा नवी पालवी फुटते अशी माझी अवस्था झाली होती. सुधीरच्या विरहात माझे कशातच लक्ष लागत नव्हते, त्यात बाबाही मधे मधे मला फार टोचून बोलायचे, आईचा विरह, आणि जांच्याकडे मन मोकळे करू शकले असते, तेही यायला अजून आठ दिवस तरी जातील. सुधीर नसला तरीही बाबांना माझे त्यांच्याकडे नुसते जाणे देखील सहन होणार नाही, हे त्यांच्या बोलण्यातून मला जाणवत होते….
चार दिवसापूर्वी सरपंच, आपल्या त्या नालायका सोबत आणखीन ग्रामपंचायतीतील दोन माणसे बरोबर घेऊन आला होता, बाबांनी मला माझ्या मनाविरुद्धच त्यांच्या चहापाण्याची व्यवस्था करायला भाग पाडले. बाहेर आमच्या घराच्या जागेचे मोजमापही चालल्याचे माझ्या लक्षात आले. आल्यापासून त्या कालियाची ती लालची नजर सारखा माझा पाठपुरावा करीत होती, चहा टेबल वर ठेवतांना, ते कप मी उचलून पाहुण्यांच्या हातात द्यावे असेही बाबा सुचवीत होते ,पण त्यातील एकाने सहजच “असुद्या असुद्या” म्हटले, आणि मी सुटले. बाबांरोबर बाहेर त्या सर्वांचे काम पुन्हा चालू असतांना त्या कालियांने आतल्या खोलीत येत मला छेडण्याचा प्रयत्न करताच, मी बाबांना मोठ्याने हाक मारली तसा तो स्त्रीलंपट “पुढे बघून घेईन” म्हणत आपली शेपटी वळवळत माघारी फिरला.
दोन दिवस असेच कंटाळवाणे गेले. काकांची पण भेट घडली नव्हती .
आज सबंध दिवस माझा उजवा डोळा लवत होता. आज विपरीत काही कानावर पडतंय की काय ह्या शंकेने ग्रासलं असतांनाच बाबांनी मला दुःखद, धक्कादायक बातमी दिली. आमचे राहते घर, ही सर्व आजूबाजूची जागा आणि आमची खलाटीतील शेतजमिन ह्याचा ते व्यवहार करून आल्याचे आणि त्या बदल्यात कोल्हापूरला छोटेसे घर आणि दुकान खरेदी केल्याचे माझ्या कानावर घातले. “थोड्याच दिवसात आपण इथून निघून कोल्हापूरलाच कायम राहायला जायचंय” ह्या त्यांच्या वाक्यासरशी, माझ्या पायाखालची जमीनच सरकून मी त्यात सामावली जातेय असं वाटून मी जागच्या जागी कोसळल्याची जाणीव झाली.
नंतर बाबांनी चेहेऱ्यावर मारलेल्या पाण्याच्या हबकावरून मी बऱ्याच वेळानंतर त्यातून सावरले असावे.
बाबांचा हा निर्णय त्यांनी जाणून बुजून, माझे कामतांच्या बरोबरीचे संबंध तोडून सरपंचांशी जोडले जावे ह्याकरिताच घेतला असावा. मध्यंतरी त्यांच्याबरोबर चार दिवस कोल्हापूरला जाऊनच सगळे नक्की करून आले असावेत.
सरपंचांनी मला घेरण्यासाठीच बाबांना जाळ्यात अडकवले असावे.
एकीकडे सुधीर चा विरह, त्यात माई, दादा इथे नाहीत,आणि हे सर्व सोडून एका परक्या गावाला जिथे माझं, आपलंसं असे कोणीही नाही तेथे जाऊन राहायला लागणार, ह्या भयानक कल्पनेने माझ्या जीवांचे पाणी पाणी झाले. आता माझं हे ठेचाळलेलं मन, माझी ही व्यथा सांगू तरी कोणाला.प्रेमाच्या तहानेने व्याकुळ झालेल्या मनाला, नशिबाने सुधीरच्या रूपाने गोड झरा दृष्टीक्षेपात दाखविला खरा पण बाबांनी माझ्या ह्या वैभवाला एकाकी पणाच्या वाळवंटात ढकलून त्या झऱ्याचे मृगाजळात रूपांतर केले.
आता दिवेलागणीची वेळ होऊन गेली होती. देवघरात लामंणदिवा तेवत होता पण समई, निरांजन लावावे असे मला मात्र आता वाटत नव्हते, आता डोळ्यांपुढे जेव्हढा अंधार असेल तेव्हढे बरे असे वाटून त्याच प्रकाशात मी पाणावलेल्या नेत्रांनी त्या कर्त्याकरवित्याला मोठ्याने ओरडून माझ्याच बाबतीत असे का घडले? ह्याचा जाब विचारावा असे मनात आले. पण आई म्हणायची, “देवाला आणि दैवाला दोष देण्यात काय अर्थ, जे उपभोग आणि भोग आपल्या पदरी येतात, ती आपल्याच जन्मोजन्मीच्या कर्माची बरी वाईट फळे तर असतात, आपणच त्याला जबाबदार असतो. आपले दुःख फक्त देवाला सांगावे, त्याला जाब विचारायचा अधिकार आपला नाही, आईची जबरदस्त आठवण आली. भरल्या नेत्रांनी माझ्या कान्ह्याकडे फक्त प्रश्नार्थक मुद्रेने पाहत होते……..
…………(५८)
माझी अन्न पाण्यावरची वासनाच उडाली. सुधीर सोडाच पण माई दादांच्या सहवासातले सुख सुद्धा जर नशिबात नसेल तर जगण्यात तरी काय अर्थ. आईला शेवटी दिलेल्या “बाबांचा संभाळ करिंन” ह्या वचनाला जागून कर्तव्य म्हणून बाबांना जेवण करून घालीत होते, त्यांनी एक दोनदा आग्रही केला, रागावले सुद्धा पण मी त्यांना आता भीक घालत नव्हते, माझी जेवणाची इच्छाच नाही, घश्याखाली अन्नच उतरणार नाही तर मी जेविनच कशी. ते पोटभर जेवायचे आणि गावात नाहीतर त्या सरपंचा कडे चालू पडायचे. सुधीरच्या आठवणीत मी बिछाना धरला. अंगात ताप आणि मनात सुधीरच्या प्रेमाचा ध्यास असे कसेबसे दोन दिवस सरले आणि काकांनी येऊन मला संजीवनी दिली. माई, दादा आल्याचे कळवून त्यांनी प्राणाला फुंकर मारून माझ्या जीवनाची ज्योत प्रज्वलित केली.
अंगात ताप असूनही मी माईंकडे गेली आणि त्यांना पाहूनच माझ्या अंगात बळ संचारलं, आपण चार दिवस जेवलो, खाल्ले नव्हते हे विसरून गेले, माईंनी मला जवळ घेतले आणि मी त्यांना कडकडून मिठी मारली आणि ओकसाबोक्शी रडूच लागले. दादांनीही माझ्या पाठीवर हात फिरवला.ते इकडे नसतांना काय घडलं असेल, ह्याची त्यांना पूर्ण कल्पना आली असावी. काकांनीही त्यांना थोडीफार कल्पना दिली असावी. अख्या गावात ह्यांच्या शिवाय दोघा तिघांकडेच टेलिफोन आहे, पण बाजूच्या गावात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तो नादुरुस्त होता त्यामुळे त्यांना अथवा काकांनाही त्यांच्याशी काही बोलता आले नाहते. पण माझी ढासळलेली प्रकृती आणि आत्ता अंगात असलेला ताप ह्या मुळे माईंना फारच वाईट वाटले, त्यात काकांनी त्यांना बाबांनी आमच्या प्रॉपर्टी च्या केलेल्या होळी बद्धलची माहिती दिली असावी, त्यामुळे त्यांची सुद्धा अवस्था ‘सुक्या बरोबर ओले जळल्या’ सारखिच झाली होती. “मी बाबांशी नक्की ह्या विषयावर बोलेन” असे बोलून दादांनीही मला धीर दिला .
माई, दादांच्या येण्यामुळे सुधीर बद्धल ची इत्यंभूत माहिती मिळाल्यामुळे जणू तो आत्ता सुद्धा माझ्या बरोबरच असलेल्या भावनेने मी ठणठणीत बरी झाले…..
काकांचा, दादांचा माझ्या बाबांवर काहीही परिणाम झाला नाही. परोपरीने त्यांनी बाबांना समजावण्याचा प्रयत्न करून बघितला, विनवण्या केल्या पण ते ऐकायलाच तयार नव्हते. शेवटी दादांनी पैश्याची अडचण असल्यास मदतीचा हात पुढे करण्याचे वचनही दिले, त्यावर उलट बाबांनी, “पैशाचे व्यवहार सुद्धा पूर्ण करून बसलो आहोत” असे बोलून त्याना निरुत्तर केले. शेवटचा प्रयत्न म्हणून माईंनी “शालनला आम्ही आमच्या कडे ठेवायला तयार आहोत, लागेल ती मदत आम्ही करू, तसा आम्ही आपल्याला शब्द देतो. पण कृपया तिला आमच्या पासून दूर नेऊ नका” ह्या शब्दात ऐन दिवे लागणीच्या वेळी त्यांना हात जोडून विनंतीही केली. पण बाबा आपल्या स्वतःच्याच मताशी ठाम राहिले. हिरमुसले होऊन, निराशा पदरी घेऊन नाईलाजांनी ते सर्व आपल्या घरी परतले…
बाहेर संधीप्रकाश आणी माझ्या भावी आयुष्यात बाबांमुळे दाट अंधार पसरला गेला, आत्ता सुधीर इथे असता तर परिस्थिती माझ्या मनासारखी झाली असती. त्याच्या नुसत्या जवळ असण्याने मनाला दिलासा मिळाला असता आणि नजरेतील आश्वासनाच्या प्रकाशात मनावरची ही काजळी लगेच दूर झाली असती, बाबांच्या ह्या अश्या वागण्याची मला भयंकर चीड आली. ह्या अश्या कातरवेळी, सुधीरच्या सहवासाची उणीव मला प्रकर्षाने जाणवतेय. तो इथे असता तर सर्व काही जुगारून मी त्याचा हात हातात घेऊन बाबांची पर्वा न करिताच हे घर सोडून त्यांच्याच घरी निघूनही गेले असते. पण नियतीलाच हे मान्य नसावे. शिक्षण सोडून त्याने इथे यावे असेही मला वाटत नव्हते. हे माझ्या नशिबाचे भोग आहेत आणि मुकाट्याने भोगायला हवेत इतकंच मी आता समजू शकले……..
…………(५९)
आई म्हणायची तेच खरं आपला फक्त कर्मावर अधिकार, आपल्या भविष्याच्या ताटात काय वाढायचं, आपण काय उपभोगायचं आणि भोगायचं हे देखील “तोच” ठरवणार, मुखी कधी देणार लोणी, तर कधी अंगार…..
आता गाव सोडून जाण्याशिवाय मला पर्यायच उरला नाही…….
आम्ही जेथे जेथे एकत्र फिरलो त्या सर्व जागी जाऊन मी एकटीच बसून राहायची, जी झाडे, फुले, वेली त्यावेळी माझ्याशी बोलल्या, सजीव झाल्या होत्या, त्या आता मूक झाल्याचे, निर्जीव झाल्याचे अनुभवून त्यांना माझ्या नयनाश्रुनी न्हाऊ घातले. पण त्यांच्या त्या फुलातील गंध केव्हाच हरपला होता. आम्ही नेहमी बसत असू तो खडक, ते केवड्याचे वनही मला भेसूर दिसत होते. तो झोपाळा झुलायचे विसरला असावा. समुद्राला शेवटी भरती केव्हा आली असावी असा प्रश्न मला पडला. प्राजक्ताचा सडा पडायचे आता बंद झाले होते. ज्या देवळात दर गुरुवारी मी न चुकता जायचे त्या देवळातील दत्ताच्या, स्वामींच्या मूर्ती तेजोहिंन भासत होत्या. सूर्यास्ताच्या सोनेरी चादरीवर काळी घोंगडी पसरली होती. किनाऱ्या वरील रंगीत शंख आणि शिंपले आता खरखरीत, तप्त वाळुंच्या थरात गडप झाले. ज्या गावाने माझे बालपण जपले, मला आई, माई, दादा आणि काका दिले,बालपणीचा मित्र आणि तारुण्यातील प्रियकर देऊन ज्याला मी वरले, हृदयाच्या साम्राज्याचा स्वामी मानला त्या “सुधीर” ला सोडून, या भातुकलीच्या खेळातून अर्ध्यावरुन उठून आणि माझे सर्वस्व सोडून मला ह्या गावाला “रामराम” म्हणण्याशिवाय बाबांनी काहीही शिल्लक ठेवले नव्हते….
घरातील एक एक वस्तू त्या ट्रक मध्ये भरतांना त्यांच्या त्या थंडगार स्पर्शात गतकालच्या मूक आठवणींची ऊब मला जाणवत होती, ज्या ‘वास्तू पुरुषाने’ इथे मला पोसले, आईची माया दिली, आईच्या छायेत प्रेमाने,सुखाने, आनंदाने लहानाचे मोठे केले. त्याने आज असे मला अंतर का दिले, ह्याचे माझ्याकडे उत्तर नव्हते…
घर सोडताना, सर्व घर एकदा डोळे भरून पाहून घेतले. येथेच मी शिकली, सवरली, ह्या वास्तूवर जीवापाड प्रेम केलं. ज्या देवघराचा मला सतत आधार वाटला ते रीतं झालेले पाहून, उजाड पाहून मन भरून आलं, बाहेर आली, ‘शिवा’ डोळ्यात प्राण आणून, कारुण्यपूर्ण नजरेने माझ्याकडे एकटक बघत होता, आम्ही त्याला इथेच सोडून जाणार ह्याची त्या मुक्या जीवाला अगोदरच चाहूल लागली असावी का ? माझ्या पदराला त्याने धरूनच ठेवले होते. वाकून त्याच्या गळ्याला मिठी मारली. त्याच्या त्या पाणावलेल्या नजरेत मीच दिसत होती. त्यालाही त्याचीच प्रतिमा माझ्या नजरेत दिसत असावी. किती प्रेम आणि माया असते ह्या मुक्या प्राण्यांना. आज पर्यंत त्याला माझ्या भावना नेहमीच कळत आल्या होत्या. इतकासा छोटा होता, त्याची आई त्याला सोडून गेल्यापासून मीच त्याची आई आणि दोस्त झाली होती, बिचारा माझ्या मागून मागून येत राहिला मी त्याला फसवून निघून जाणार ह्याची त्याला कल्पनाच नसावी. कोणाला फसविणे, प्रेमात प्रतारणा करणे, हे ह्या मुक्या जीवांच्या खिजगणतीतही नसावे. फक्त इमानदारीत जीवलगावर निर्व्याज, निर्मळ आणि निरंतर प्रेम करणेच ह्यांना ठाऊक. आपण माणूस म्हणून जगतो पण खरी माणुसकी ह्या मुक्या प्रण्यातच असते ह्याची जाणीव झाली. आपण त्यांना फसवू पण ते आपल्याला कधीही फसवत नाहीत आपल्या प्रेमाला अंतर देत नाहीत. आता “प्राजक्ताच्या ” जवळ आले, तो ही साफ सुकला होता, फांद्या कधीही गळून पडतील अशी त्याची अवस्था मनाला सहन झाली नाही. त्याच्या खोडावर ओठ टेकले, आणि तप्त अश्रूंनी न्हाऊ घातले. त्यांनी पुन्हा बहारावं म्हणून त्याच्याशी बोलले देखील. बागेतील वेळोवेळी पूजेसाठी सुवासीक फुले देणारी ही झाडे, माझ्याकडे केविलवाण्या नजरेनी पाहत होती. ज्या विहिरीच्या गोड पाण्यावर आम्ही पोसलो, जगलो, जीने आमची तहान भागवली, सर्व बागेला निरंतर पाणी देत हिरवाई राखून, बागेचे आणि आमचे जीवन फुलवले, त्यातील निर्मळ, स्वच्छ झऱ्यांनी वर्षानुवर्षे सतत आमच्या साठी प्रेमाने वाहत राहून आम्हाला उपकृत केले आणि आईने ज्या विहिरीला हळदी कुंकू लावून सवाशींण म्हणून पुजले, तिला असेच सोडून जायला मला जीवावर आले. पण आता नाईलाज होता. आईच्या तीव्र आठवणीत पट्कन माईंना भेटायला गेली,त्या सर्वांना वाकून नमस्कार केला.त्यांच्या देवघरातील, देवकीच्या मांडीवर बसलेल्या गोबऱ्या गालाच्या नंदलालाला पाहून तो माझ्याकडे यायला झेपावतोय असा क्षणभर भास होऊन तेथेच थबकले. साश्रु नयनांनी सर्वांचा निरोप घेतला, बाहेर आमच्या गोड आठवणी जपणाऱ्या त्या आम्रवृक्षा खाली क्षणभर उभी राहिले आज अशी एकटीच… सुधीर शिवाय….. ज्या झाडाच्या टपोऱ्या अवीट गोडीच्या जांभळांनी माझ्या जिभेचे चोचले पुरविले त्या झाडाला, बाजूच्या विहिरीला प्रदक्षिणा घालून नमन केले. पाटाच्या पाण्याच्या हलक्याश्या स्पर्शाने सुधीर च्या आठवणीत डोक्यावर हलकासा शिडकाव करीत तेथे न राहवून झपाट्याने निघाले….
एकदाच मागे वळून पाहताना शिवा आमच्या मोटारीच्या मागे जिवाच्या आकांताने आणि माझ्या प्रेमाच्या ओढीने पळत येतांना पाहून मन हेलावून गेलं. माझे हृदय आक्रंदित होते. त्याची फसवणूक करून, त्याला फसवून मी दूर दूर निघाले होते, अक्षम्य, अपराधी भावनेने, जिथे माझं, माझ्या मायेचं आणि प्रेमाचं “कुत्रं” देखील नसणार……
भविष्याचा सरळ रस्ता सोडून जीवनाच्या गाडीने वाकडा रस्ता अवलंबला, स्वामींचे देऊळही आता मागे मागे पडत चाललं होत……..
…………(६०)
ह्या नवीन शहरात, अनोळख्या वस्तीत मायेचा ओलावा मिळण्याची शक्यता वाटत नाही.
आम्हाला सरपंचाने त्यांच्या गाडीतून पुढे आणले होते, सामान मागे ट्रक मधून आले तसे सर्व घर मी लावून घेतले बाजूच्या शीला वहिनीचा आणि सरपंचाचा घरोबा असावा, तिनेही मदतीचा हात पुढे केला.
आमचे गावातील मायेचा ओलावा असलेले ‘ते माझे घर’ आणि हे शहरांतील त्या सरपंचाने देऊ केलेले ओसाड भासणाऱ्या रंगहीन भिंतींचे भावना हीन घर ह्यात जमीन आस्मानाचा फरक ह्या वास्तूत येताक्षणीच मला जाणवला. सुधीर ने वास्तू शास्त्राचाही अभ्यास केलाय त्याप्रमाणे तो माझ्या प्रेमा पोटी त्यांच्या घरात बदल करीलही,पण काही वास्तूत आपण प्रवेश करताच आपल्याला काही संवेदना जाणवत असतात, त्यात प्रवेश करताच कदाचित त्या घरातील तो ‘वास्तू पुरुष’ आपल्याला सुख समाधान देईल की त्रास देईल ह्याची पुसटशी का होईना कल्पना आपल्याला येत असते. ह्या घरात माझ्यासाठी काय वाढून ठेवले आहे ते तो भगवंतच जाणे.
बाबांना येथे सुद्धा किराणा मालाचे दुकान चालू करायचे होते…घरा जवळच्या आळीत दोन खोल्यांचा गाळाही त्यांनी घेतला होता पुढच्या आठवड्यात माल भरायचे ठरले.
ह्या दोन खोल्यात माझा जीव घुसमटायचा, सुधीरच्या, माईंच्या आठवणीत घरात एकटे असतांना तिन्ही सांजेच्या वेळी जीव घाबरा घुबरा होत असे, मनावर एक वेगळेच दडपण जाणवायचे, त्या घराची, गावाची प्रकर्षाने आठवण येऊन विचाराने डोके जड झाल्यासारखे होई. मनात विरहाच्या अग्नीत आठवणींचे निखारे धगधगायला लागायचे, अश्या कातरवेळी मागच्या आळीतील ओसाड पडलेल्या झाडा झुडपातून रातकिड्याचा किर्र आवाज मनाचा थरकाप उडवीत असे. ओळखीच्या, आपले पणाच्या सगळ्या वाटा आता बंद झाल्या होत्या, सुखाच्या भरतीला ओहोटी लागली होती. रंग महालाचे दिवस संपून सितामाईच्या पदरी जसा वनवास आला तसाच माझ्याही नशिबी आला.भविष्याच्या मार्गावरील फुलांच्या मार्गात बाबांच्या कर्माने काटे पसरले, सीते बरोबर वनवासात प्रभू राम तरी होते, मी एकटी पडल्याने जीवनात रामचं उरला नाही. ह्या निराधार, दिशाहीन अवस्थेत सुधीर शिवाय कोणी मार्ग दाखवील, मला प्रेमाने जवळ करील हे शक्यच नव्हते आणि आता तो ही जवळ नसल्याने जीवनात काही मार्गच दिसत नव्हता. माझी ही अवस्था, व्यथा कोणाला तरी सांगून मनावरचा बोझ हलका करावासा वाटत होता. गावाच्या, आमच्या घराच्या, सुधीरच्या, त्या जीव लावणाऱ्या सगळ्यांच्या आठवणींनी डोकं बधिर झालं, जड झालं. बॅगेतून सुधीर चा फोटो काढून त्याला आर्त स्वरात साद घालण्या शिवाय मी काय करू शकत होते?……..
…………(६१)
इथे येऊन आता महिना लोटला,बाबांनी सुरू केलेले नवीन दुकान ते मलाच जास्तवेळ सांभाळायला लावीत असत. सबंध दिवस नवीन गिऱ्हाईके सांभाळण्यात कसातरी निघून जायचा. पण संध्याकाळ झाली की उदास वाटायचे, काही सुचायचे नाही. मी मानसिक दृष्ट्या खचत चालले…
पण अश्या ह्या दिवसात एक गोष्ट चांगली घडली ती म्हणजे काका येऊन गेले. माईंनी माझी चौकशी करण्याकरता मुद्धाम त्यांना धाडलं होतं, येतांना माझ्यासाठी माईंनी एक छानशी बाजाची पेटी विकत घेऊन ती मला द्यायला सांगितली होती, काकांनी प्रसिद्ध ‘हरिभाऊंच्या’ दुकानातून ती उत्कृष्ट पेटी विकत घेऊन माझ्यासाठी आणली. सुधीर परदेशी गेल्यावर माझे मन रमावे, त्याच बरोबर संगीतात मी प्राधान्य मिळवावे ही सुधीरने मागे व्यक्त केलेली इच्छा लक्षात घेऊन, माईंनी मुद्दाम त्याच्या इच्छेला आकार देण्याचे योजिले होते. काका येऊंन गेल्यामुळे मला त्या सर्वांना भेटल्या सारखेच वाटले. सुधीरचाही फोन त्यांना आल्यामुळे त्याची खुशाली कळली. माईंच्या फोन ची आणि सुधीर च्या तिकडच्या फोनची देखील नोंद आता मी माझ्याकडे वहीत करून घेतली.
माझा आवाज त्यांना आवडायचा, माझी संगीताची आवड पुढे जोपासावी त्यात प्राविण्य मिळवावे, तसेच कोल्हापूरला मला एकटेपणा जाणवू नये मला मानसिक स्वास्थ्य मिळावे, म्हणून माईंनी गावाहून निघताना मला तसे सुचविले देखील होते. काकांकडून आता ही पेटी पाठवून आपणहून प्रोत्साहन दिले होते.
परमेश्वराच्या कृपेने आता ‘गुरुची’ सोय सुद्धा झाली. दुकानावर येणारे जोशी बुवा त्यांना सर्व अण्णाच म्हणायचे, ते संगीतात पारंगत होते. त्यांच्या बद्धल माहिती मला शीला वहिनींकडून कळली. त्यांनीही माझ्या घरी येऊन मला शास्त्रीय संगीताचे धडे द्यायला सुरुवात केली.
दुकान बंद झाले की, तसेच जेव्हा जेव्हा मला फुरसत मिळायची तेव्हा तेव्हा अण्णांनी शिकविलेले संगीताचे धडे मी अत्यंत मन लावून शिकत होते. माझी संगीतातील प्रगती बघून अण्णांनी मला त्यांच्या कडील एक तंबोरा भेट म्हणून दिला. त्यावर सूर कसे लावावे हे सुद्धा त्यांनी शिकविले. अण्णा सर्व वाद्ये वाजवण्यात पारंगत होते, संगीताचे असे सर्वांगीण शिक्षण मला देण्यात त्या विधात्याने गुरूकडून कसलीही कसर ठेवली नाही, व ह्या संगीताच्या साधनेत रममाण झाल्यामुळे मला बरेच मानसिक स्वास्थ्य लाभले… “संगीतात ताकत असते आपण आपले दुःख, आपल्या विवंचना काही वेळा पर्यंत तरी नक्कीच विसरू शकतो” हे सुधीरचे म्हणणे मला आता पटत होते….
मध्यंतरी शीला वहिनींकडे सरपंच आणि तो कालिया आला होता, पर्यायाने आमच्या घरी येणं झालच, ह्या त्यांच्या अश्या तऱ्हेने इथे येण्यात, बाबांचाच हात होता हे मी जाणले. ह्यावेळी तो सरपंच देखील पुन्हा माझ्या कडे वाईट नजरेने पाहत असल्याचे माझ्या ध्यानी आले, म्हणजे हे बापलेक दोघेही एकाच माळेतील मणी निघाले. माझ्या बाबांपेक्षा थोडेच कमी वय त्यांचे असावे, वास्तविक वयाने मी त्यांच्या मुलीसारखीच पण तरीही हा थेरडा शीला वहिनीच्या पाठोपाठ आता माझ्याकडेही वाकड्या नजरेनी पाहत होता. शीला वहिनी माझ्या कडे चांगले संबंध ठेऊन होत्या, ह्या नतदृष्टांचे गोडवे गायच्या तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचकली होती, आता त्याची हळूहळू प्रचिती येऊ लागली. वाईट एकच वाटतं ह्यात माझा बापच माझा वैरी झाला होता. कुठल्या जन्माचे हे वैर आणि भोग मी आता फेडत होते हे तो परमेश्वरच जाणे…. आज आई असती तर मला हे दिवस पाहायला लागले नसते.
मी एकटी शांत बसायची, विचार करायची तेव्हा मात्र आठवणींच्या सरी पुन्हा कोसळायला सुरवात व्हायची. सुधीर ला भेटायची ओढ दिवसें दिवस वाढतच होती. त्याचं हे शक्षण कधी संपतं आणि तो येऊन मला आपल्या हृदयाशी धरतो असे मला झाले होते .माझ्या ह्या वेडाची आता अण्णानाही कल्पना येऊ लागली होती. वडिलांच्या मायेने त्यांनीच शिकवलेली पदं, आणि गीते मी गुणगुणत असे. ह्या प्रेमवेडीला आता सुधीर चा ध्यासच लागला. त्याच्या आठवणी सतावू लागल्या की ओठावर त्याच्या आवडीचे एक एक गीत हळुवार उमटायचे……..
…………(६२)
गावाला माई, दादा, विशुकाका असायचे आणि आता माझ्या मनाला वडिलांच्या मायेने समजून घेणारे अण्णा ‘श्री’ च्या कृपेने ह्या कोल्हापुरात मला लाभले. संगीता बरोबरच अध्यात्माचे धडे सुद्धा मी त्यांच्या कडून घेत असे. त्यांच्या वेशातच आध्यात्म दडलेले असायचे शुभ्र धोतर, त्यावर लांब हाताचा शुभ्र सदरा आणि डोक्यावर सफेद गांधी टोपी. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात चालण्यात अदब असून विनयशीलता होती. एकीकडे माझे जन्मदाते वैरी ठरत असतांना त्या कान्ह्याने हा आधारवढ माझ्या साठी निर्माण करून माझ्यावर कृपेचे छत्र धरले होते.
मध्यंतरी बाबा गावी गेले असताना, अण्णांबरोबर मी ‘अंबाबाईच्या’ देवळात जाऊन तिला हात जोडले. गाभाऱ्यातील समईच्या शांत प्रकाशात तिच्या त्या विलक्षण तेजाने माझे डोळे दिपले, “सुधीरचा सहवास लवकर मिळावा आणि त्याच्या बरोबर जोडीने मी तुझ्या पायाशी यावे आणि रेशमी नऊवारी शालुने तुझी ओटी भरण्याचा योग यावा.” असा नवस बोलून लोटांगण घातले.
देवीच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा कृपा केली, लगेच सुधीर बरोबर टेलिफोनवर तरी बोलण्याचे सुख मला अण्णांच्या मुळे लाभले. माईंशी देखील बोलणे होऊन मनावरचे ओझे कमी झाले. त्याचे ‘टेलिफोन एक्सचेंज’ चे भरमसाठ बिल अण्णांनी देऊ केले, मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानून बिल चुकते केले. वास्तविक त्यांच्या आशिर्वादानेच मला देवीचे मनसोक्त दर्शन आणि माझ्या स्वामीचा आणि माईंचाही आवाज ऐकण्याचे भाग्य लाभल्यामुळे मी तेथेच सर्वांदेखत वाकून पदस्पर्श केला ,त्यांनीही मायेने मला उठवीत मला आशिर्वाद दिला. मी स्वतःला धन्य मानले…..
वैशाख वणवा संपून आता आकाशातील काळ्याभोर मेघांनी धरतीच्या मिलनाची कास धरली तशी ह्या धरत्रीने हळू हळू हिरवा शालू नेसून त्याच्या स्वागताची तयारी सुरू केली. बाहेर श्रावणाच्या सरीने गारवा निर्माण केला, मंद वाऱ्याच्या झुळकी सरशी आठवणींच्या हळुवार स्पर्शाने माझ्या मनालाही ओलेचिंब केले. कल्पनेच्या पंखांनी भरारी घेतली. एकले पणाच्या तप्त मनावर त्या गोड आठवणींच्या, रेशमी, रिमझिम धारांच्या शिडकाव्याने मखमली हृदयीचा मधुर सुगंध दरवळत, मोहित मनाने मुग्ध होऊन त्याच अवस्थेत मी आमच्या नेहमीच्या केवड्याच्या वनात फेरफटका मारून, त्या आमच्या खडकावर सुधीर ची आंस डोळ्यात घेऊन बसले, राधेला तो श्यामसुंदर भेटला तसा लवकरच सुधीर मला भेटेल असे अभिवचन बहुदा पायाला स्पर्श करून ह्या भरतीच्या लाटा मला देत असाव्यात. हिरव्यागार गर्द केवड्याच्या वनातील मादक सुगंधाने मी गत स्मृतीत लीन झाले. वरून जाणारी शुभ्र बलाक माला, मिलनाचे गीत आळवीत त्यांच्या चोचीतून सुधीर ने माझ्या साठी पाठविलेला हार माझ्या गळ्यात सोडत असल्याचा मला भास झाला. सूर्यास्त होतोय असे वाटत असतानाच पुन्हा सोनेरी किरणांनी ढगाआडून चमकत माझ्या नयनात सुधीर ची प्रतिमा झळकावली. आठवणींच्या मनावर हळुवार फिरणाऱ्या मोरपिसानी माझ्या मनाचा पिसारा फुलवीत माझ्या रंगीत भावनांचे इंद्रधनूत रूपांतर केले आणि कपाळावरील लाल कुंकूत मला गेल्या सात जन्मातील सुधीरच्या सहवासातील आणि माझ्या भावी संसारातील सप्तरंगी दृष्य दिसू लागले .खडकावरच सुधीर च्या विशाल छातीवर विसावत स्वरांच्या दुनियेत विहार करून गोड स्वप्नातून जागे झाली……..
…………(६३)
कालच्या स्वप्नातून जागी झाली तीच मुळी त्या सूर्य नारायणाने आज पृथ्वीवर फेकलेली नाणी गोळा करितच. आज मात्र माझ्या हाती दुःखाचे नाणे न लागता, सुखाचे भले मोठ्ठे नाणे लागून, आजचा दिवस सुखात जाणार ह्या कल्पनेनेच मन प्रफुल्लित झाले.
मध्यंतरी मी देवीला केलेला नवस आणि आता ह्या श्रावणात सुरू केलेले सोमवारचे व्रत फळाला येण्याची दाट शक्यता काकांच्या अचानक येण्याने झाली.
मी सुधीरशी फोनवर बोलले होते तेव्हा, “मध्ये जमल्यास, सुट्टी मिळाल्यास ,मी गावाला येणार तेव्हा आम्ही सर्व तुला भेटूच.” असे तो म्हणाला होता, तेव्हा माझ्या समाधाना साठी तो असे बोलत असावा असे मी गृहीत धरले होते. पण त्यानंतर माईंना फोन केल्यावर त्यांनीही ह्या गोष्टीला दुजोरा देत, “तो येईलच, त्याला ह्या घराचे बांधकाम पूर्ण झालेले सुद्धा पहायचे आहे” असे त्या म्हणाल्या होत्या, पण तो दिवाळी कडे येईल अशी मी कल्पना केली होती.
आज काकांनी आमचे नवीन घर बांधून पूर्ण झाल्याची आणि पुढच्या आठवड्यात पंधरा ऑगस्ट च्या शनिवारी ‘गणेश पूजन’ करणार असल्यामुळे, आम्हाला अगत्य येण्याचे माईं दादांनी आमंत्रण दिल्याचे त्यांनी बाबांना सांगितले. माझा आनंद गगनात मावेना. बाबांच्या कपाळाला मात्र आठ्या पडल्या. “बघू कसे जमते ते” ह्या शब्दात त्यांनी काकांची बोळवण केली. बिचारे कसे बसे दोन घास खाऊन हिरमुसल्या चेहेऱ्याने परत गावाला निघून गेले….
आता नयनांच्या धारा कमी झाल्या आणि श्रावण धारा आपल्या नेहमीच्याच “क्षणात येते सर सर शिरवे, क्षणांत फिरुनी ऊन पडे”. च्या धर्तीवर चालूच होत्या.
हा श्रावण महिना मला फार आवडतो, सगळीकडे दाट हिरवळ, वातावरणात उत्साह, नागपंचमी सारखे बरेचसे सण आणि त्यात श्रावणी सोमवारची भर, तो उपवास, शिवाला वाहण्याच्या धान्याच्या मुठी. ते उपवासाचे संध्याकाळचे गोड जेवण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गोकुळ अष्टमी, माझ्या कान्ह्याचा जन्म. आई असतांना हा श्रावण महिना मला पर्वणीच असायची. ती सगळी व्रत वैकल्ले करायची… आज ती असती तर…
बाबांनी त्यांच्याकडे गणेश पूजनाच्या कार्यक्रमाला जाण्याचे नाकारले. आणि गेले चार दिवस त्याच्या भेटीची जीवाला लागलेली आंस काळजाला घरं पाडून गेली. माझ्या आनंदावर विरजण पडले. आता भेट कशी व्हायची ह्याची मला भ्रांत पडली. जस जशी संध्याकाळ होऊ लागली एक उदासीनता मनाला जाणवू लागली. आता रजनीने सोनेरी शालिवर काळी चादर ओढायला सुरवात केली. बाहेर झिम झिम पावसाला सुरुवात झाली. आणि मनात आठवणीं च्या सरी वर सरी. आज तो बरोबर असायला हवा होता. बाहेरही अंधार आणि मनातही. अशाही अवस्थेत एक हलकासा आशेचा किरण त्या बाहेरच्या लखलखणाऱ्या विजे सोबत मनात लक्ख प्रकाश टाकून गेला. आम्ही त्याला भेटायला गेलो नाही, पण तो मला भेटायला येईलच. मला भेटल्या शिवाय तो जाणारच नाही. त्याने मला भेटावच, एक वेडी आशा, एक आंस, एक विनवणी त्या कर्त्याकरवीत्याला आणि त्या वरून खाली धरती राणीला आलिंगनासाठी भेटायला येणाऱ्या मेघराजाला सुद्धा……..
…………(६४)
शनिवारी आम्ही गेलो नाही. घरात गणपती पूजन त्यामुळे तो आणखीन एक दिवस तरी मला भेटायला येणं शक्य झाले नसावे.
आज शेवटचा श्रावणी सोमवार. ह्या महिन्यात ह्यावर्षी पाच सोमवार आले, मी आनंदाने त्या करूणाकराची यथासांग पूजा केली. आज उपवास असूनही मन तो आज येणारच ह्याची ग्वाही देत होते त्यामुळे प्रफुल्लित होते, मनोमनी त्या शिवाच्या पूजेत असतांना डोळे उघडले असता मला शिवाच्या जागी माझ्याच सुधीरचे ते कोरीव दाढीतले, धारदार नाकाचे रूप येऊन माझ्या “शिव महिमा” स्तोत्र पठणात एक दोनदा व्यत्ययही आला. शिवाला हाक घालतांना चुकून एकदा सुधीर असे ओठावर येऊन मी जीभ देखील चावली…
काय असतं पहा,…. शरीरावर, त्याच्या व्याधी आणि शारीरिक व्यवहार ह्यामुळे आपल्याला बराच वेळा नियंत्रण ठेवता येत नाही आणि ह्या मनालाही देखील आवरणे कधी कधी कठीण होऊन बसते. पूजा शिवाची करतेय, वाचतेय शिव महात्म्य आणि मनात, ओठावर त्याचे नांव. पण माझ्या पूजेमुळे, शिवावरच्या विश्वासामुळे तो आज नक्कीच येईल ह्यात शंकाच नाही.
काका येऊन गेल्यामुळे आता त्यांची सुद्धा भेट होण्याची शक्यता वाढली होती. नवीन घर कसे असेल, कधी माझा गृहप्रवेश होईल ह्याची मी आतुरतेने वाट पहात होती…
मागे काका आले तेव्हा घराचे काम सुरू झाल्याचे त्यांनी माझ्या कानावर घातले होते पण इतक्या लवकर सहा महिन्यात ते पूर्ण झाल्याचे ऐकून मलाही बरे वाटले. घर तर पुरे झाले, माझ्या प्रेमाखातर सुधीर ने त्यांच्या जुन्या घराचे पुनर्निर्माण करून त्याचा शब्द लवकरच पुरा केला. लग्न झाल्यावर ह्या माझ्या स्वप्नीच्या घरात कधी राहायला जाते असे मला झाले…
ज्या दिवशी प्रथम मी त्यांच्या घरीच चार दिवस राहण्याचे मान्य केले होते त्या रात्री अलिबाग वरून आल्यावर त्यांच्या घरी उंबरठ्यावर ठेचाळून पडतांना सुधीर ने मला सावरल्या पासूनच त्या स्पर्शाने मी नववधू असल्यागत त्याला मनाने वरलेच होते, त्यात जायच्या आधी त्याने माझ्या माथी स्वतःच्या बोटाने लावलेल्या त्याच्या रक्ताच्या टीळ्या नंतर तर मी स्वतःला त्याची सौभाग्यवती मानून लाल कुंकवाचा टीळा सुद्धा लावू लागले होते. आरश्यात बघून कुंकू लावताना त्याचा स्पर्श हाताला होऊन तोच त्याच्या बोटाने ते माझ्या भाळी लावल्याचा भास मला बऱ्याच वेळा होत असे. आजही त्या स्पर्शाने मि मोहरले. तो येणार ह्या कल्पनेने सारी गात्रे फुलून आली. त्या भोळ्या शंकराने निदान आजच्या शेवटच्या सोमवारी तरी आमच्या मिलनातली सारी विघ्ने दूर करावी म्हणून हात जोडले. सारखी दारातून आत बाहेर करीत होते. एकदोनदा तो आल्याचा भास होऊन “सुधीर”… असे म्हणून मोहरलेल्या शरीराने त्याला जवळ करायला अधीर होऊन सरसावले देखील.
माझ्याच छायेत दडलेले त्याचे रूप बहुदा मला संभ्रमात टाकीत असावे. वास्तविक त्याने आजच यावे, आजचा शेवटचा श्रावणी सोमवार. हाच खरा शुभदिवस आणि आता उपास सोडायची वेळ होत आली हाच ‘गोरज मुहूर्त’ साधून, त्याने ह्या गोड धोड पदार्थांचे सेवन करून मलाही घास भरवून, माझ्या व्रताची सांगता करावी म्हणून त्याला पुन्हा, पुन्हा साद घातली……..
…………(६५)
शेवटचा श्रावणी सोमवार, नाईलाजाने एकटीनेच उपास तसाच सोडला. वाट पाहून पाहून शिवाचा आणि सुधिरचा जप करून थकले. डोळ्यात प्राण आणून वाट पाहण्यात श्रावणी सोमवार ची रात्र महाशिवरात्रीच्या जागरणात हरवली…..
सोमवार ही निघून गेला तसे माझ्या मनात नको नको ते विचार येऊ लागले. मनात शंकेची पाल चुकचुकत होती. असे काय कारण झाले असेल ज्यामुळे सुधीरने माझी भेट घेतली नाही. सबंध दिवस वाट पाहून थकायला व्हायचं, विचारात रात्र सरता सरत नव्हती. जागरणाने शरीर थकल्या सारखे झाले. अन्नही गोड लागत नव्हते, त्यामुळे कमजोरी वाढून अशक्तपणा जाणवत होता. परमेश्वराने माझी प्रार्थना बहुदा ऐकली नसावी. माझ्या उपवासात, भक्तीत काही कमतरता राहिली, की माझी प्रार्थनाच त्याच्या पर्यंत पोहोचलीच नाही….???
पुढे तीन चार दिवस अशी माझ्या मनाची घालमेल होत होती, विचार करून करून मनही क्षिणले. अण्णांनीही गावाला फोन केला पण तो नुसताच वाजत होता, कळायला काही मार्ग नव्हता…
आज कुठला तरी पेपर घेऊन सकाळी सकाळीच अण्णा घरी आल्याचं पाहून मला आश्चर्य वाटलं आणि मी विचारात पडले. त्यांनी पेपरातली बातमी परस्पर बाबांना दाखविली आणि बाबांनी उत्साहात मला दाखविली….अरे देवा……
…….माझ्या सर्वस्वाची होळी झाल्याचे लक्षात येऊन माझी शुद्ध हरपली..आणि मी कोसळले……
भानावर आले तेव्हा काका आणि अण्णा माझ्या बिछान्या जवळ उभे पाहिले. मला काही कळेच ना. मला काय होतंय, काय झालंय काहीच कळत नव्हतं. काकाही काही सांगत नव्हते.
संध्याकाळी बऱ्याच वेळा विचारल्यावर काकांकडून कळले की गेले दोन आठवडे, मी ह्या सरकारी इस्पितळातच होते. हळू हळू सर्व काही माझ्या ध्यानात येऊ लागले. घडलेल्या दुर्घटनेचा माझ्या मनावर जबरदस्त परिणाम होऊन माझी शुद्ध हरपल्याने मी घरात कोसळताना भिंतीवर आपटून डोक्यालाही जबर जखम झाली होती आणि मला इथे आणलं गेलं होतं. मी उठण्याचा असफल प्रयत्न केला.मानेतून आणि मणक्यातून एक जबरदस्त कळ येऊन मी निपचित पडले. काकांनी मला शांत पडून राहण्याचा इशारा केला.
दैवाने माझ्या सर्व आशा आकांक्षांवर, भविष्यावर, आणि एकूणच माझ्या सर्वस्वावर घाला घातला होता. त्या जीवघेण्या कार अपघातात माई आणि दादा जागच्या जागी गेले होते. सुधीर ला गंभीर इजा होऊनही देवाच्या कृपेने तो वाचला होता. त्या प्रायव्हेट गाडीचा ड्राइवर सुद्धा तत्काळ प्राणास मुकल्याचे कळले आणि मी हळहळले…..
दैवाने पाठ फिरविली होती आणि दुर्दैव मात्र वाकडी मान करून माझ्याकडे बघून फिदीफिदी हसत असावे….
झालेल्या परिस्थितीचा शरीरावर आणि मनावर विपरीत परिणाम होऊन देखील,कालपर्यंत माझ्या शुद्धीवर येण्याची वाट बघत माझ्या उशाशी बसून राहिलेला माझा सुधीर, माझा “स्वामी” माझ्या प्रकृतीत काही बदल होत नाही म्हणून शेवटी नाईलाजाने, काकांना माझ्या सेवेला ठेऊन, आजच्या पहाटेच्या विमानानेच परीक्षा देण्यासाठी म्हणून परत गेला होता…… एका दिवसाच्या फरकाने आमची ताटातूट करीत दुर्दैवाने बाजी मारली.
…काय म्हणावे ह्या दुर्दशेला. आईची सर्व व्रत, वैकल्ये, तिची पुण्याई, माझे उपास तापास सर्व काही बहुधा परिस्थितीच्या रगाड्यात भरडले गेले असावे…..
घडलेल्या दुर्घटनेच्या धक्क्यातून आणि नियतीच्या फटकाऱ्यातून, बाबा सोडल्यास, आम्ही कोणीच सावरलो नव्हतो. चार दिवसांनी माझा अशक्त पणा कमी झाल्यावर, शारीरिक दुखण्यावर आणि माझ्या मानसिकतेवर पुढील काही दिवसांची औषधे देऊन मला घरी पाठविण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनी काकांबरोबर त्यांच्या आधारावर कशीबशी जाऊन मी सुधीरशी कशीतरी टेलिफोनवर बोलले, तो ही नीट बोलू शकला नाही, नियतींनी कोणत्या जन्माचा सूड आमच्यावर उगवला होता देवच जाणे…
पुढे चार दिवस राहून काकाही गावाला परत गेले….
आयुष्यात प्रत्येक वेळी सुखाच्या सागराच्या भरतीने माझ्या जीवन नौकेला किनारी कधी पोहोचवलेच नाही. समोर किनारा दृष्टीक्षेपात असतांनाच दुर्दैवाच्या खडकावर आपटून तिचा चक्काचूर होऊन ती डुबल्याचा अनुभव मी घेत आले आहे….
आताशा, माझे वाली आता इथे कोणीच नाहीत हे बघून बाबांच्या आणि त्या सरपंचांच्या कारवाईला उत आला होता.मधे मधे अण्णांना मदतीला घेऊन सुधीरशी आणि काकांशी फोनवर बोलून मी तात्पुरती आनंदात असायची. सुधीरने अर्धवट शिक्षण सोडून येऊ नये. अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं म्हणून मला बरं वाटल्याचं त्याला सांगून पुन्हा परत मी ‘नैराश्येच्या’ कवेत दिवस ढकलत होते. आठवणी पाठ सोडत नव्हत्या आणि दुर्दैवाने कालियाच्या रुपात माझा छळ मांडला होता.
माई, दादांच्या आठवणीत आणि दुराव्याने, ‘नैराश्य’ पण पाठ सोडत नव्हते आणि भविष्य अंधारलेले होते.सगळे सण, ऋतू एका मागून एक येऊन गेले. पण आता आशा आकांक्षाची होळी कधीही होईल ह्या भीतीने मी धास्तावले होते. आणि आता फक्त सुधीर चे शिक्षण पूर्ण व्हायचीच वाट बघण्याशिवाय गत्यंतर उरले नव्हते. विषण्ण मन त्याला भेटायला अधीर झाले होते. डोळ्यात प्राण आणून त्याच्या सहवासाची मी आतुरतेने वाट पाहत असायची. वारंवार एकच प्रश्न मी त्याच्या प्रतिमेला विचारत होते……..
…………(६६)
मधल्या काळात माई, दादांचे छत्र हरपल्याच्या दुःखात माझे कशातच लक्ष लागायचे नाही. गावाला असताना रोजची पूजा केल्याशिवाय मी जेवतही नसायची, गुरुवारी स्वामींच्या, दत्ताच्या देवळात गेले नाही तर चुकल्या चुकल्या सारखे वाटायचे. उपास, व्रत वैकल्ले, आईंनी पण केली होती, पण आमच्या पदरी काय पडले…. देवाला, दैवाला मी दोष देत नाही, पण मनाने मी पूर्णतः खचले, सुधीरच्या, काकांच्या फोननी तात्पुरतं थोडं बरं वाटायचं, पण पुन्हा डोकेदुखीचा आणि नैराश्येचा त्रास औषध घेऊनही कमी होत नव्हता. आता आयुष्यात चांगलं काही घडू शकेल असं वाटतच नव्हतं, अण्णा अध्यात्माची पुस्तक वाचायला द्यायचे, जुन्या पौराणिक कथा सांगायचे, संगीतावर लक्ष केंद्रित करायला लावायचे, पण आता देवाधिकांवरही विश्वास राहिला नव्हता. येऊन जाऊन सुधीर च्या आठवणी आणि त्याची वाट पाहत बसणे…
माझ्या ह्या नैराशेच्या आजाराचे निदान डॉक्टरांनाही नीटसे होत नसावे. औषधांचे डोस, बदलले किव्वा वाढवले जात. पण ह्या सर्व काळात, आयुष्यात एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली ते म्हणजे, गावाला असतांना माझ्या ‘शिवा’ ने आणि इथे आल्यापासून ‘रामू’ ह्या माझ्या दोन्ही दोस्तांनी माझी संगत कधीही सोडली नव्हती, शिवाला फसवून, मी गाव सोडण्यास मजबूर झाले, पण हा रामू जेव्हा जेव्हा मी एकाकी असते, दुःखी असते तेव्हा माझ्या जवळून हटत नाही, माझ्या पायाला चाटून तो मला एक प्रकारे आधार देऊन पुन्हा आशेचा किरण दाखवितो….
G O D गॉड नंतर त्याच्या उलट D O G…डॉग ,हा योगायोग नसून त्या ईश्वराचीच पुनर्निर्मिती असावी, त्याच्या नंतर हाच खरा आधार. खरं प्रेम, इमानदारी, आपल्या भावनांची दखल, आज्ञाधारकता आणि समजूतदारपणा आपण ह्या मुक्या प्राण्यांकडूनच शिकावा. जग जरी उलटले तरी तुमची संगत ते सोडत नाहीत….
बाबांच्या फूस मुळे आणि शेजारच्याच, ह्या फक्त नावानेच ‘शीला’ असणाऱ्या शीलावहिनीच्या मदतीने, ह्या नतदृष्टांचे खूळ वाढले होते. एकीकडे एकटेपणा आणि माझ्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा त्या दोघांचा आपापल्या परीने वारंवार प्रयत्न, ह्याचे मनावर दडपण येत असे. मी हैराण झाले होते आणि बाबांची त्यात भर…
आतापर्यंत देवाच्या कृपेने आणि रामुच्या सतत माझ्या बरोबर सावली सारखे असण्याने मी त्यातून निभावली. माझे भावी वैवाहिक जीवन सुखी जायचे असेल तर ह्या ‘जीवन’ आणि त्याच्या बापाचा कायमचा काटा काढण्यावर आताशा मनाने भर दिला. त्या मरतुकडया जीवन ने किशोरीच्या घेतलेल्या प्राणाचे मोल त्याला वेचायला लावण्याच्या हेतूने मी त्याला आणि त्याच्या त्या थेरड्या बापाला आता माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून परस्पर काटा काढायचे निश्चित केले.
जीवनलाच आता जीवनातून उठवून किशोरीच्या जीवाचे मोल वेचायला लावण्याचा मी ‘पण’ केला आणि त्याच्या बरोबर प्रेमाचे नाटक सुरू करून त्याला जाळ्यात ओढला. माझ्या रूपावर, देहावर लट्टू झालेले हे ‘पाप्याचे पितर’ माझ्या साठी, माझ्या देहाच्या उपभोगासाठी आपल्या बापाचा त्याच्या मार्गातून काटा काढायलाही तयार झाले. मी “काट्याने काटा” काढण्यासाठी त्याचे कान भरविले, माझ्या शरीराचे नजरेने लचके तोडणाऱ्या ह्या लांडग्यां ने त्याच्या मार्गातून बापाला दूर करण्यासाठी त्याच्यावर मारेकरी घालण्याचे पक्के केल्यावरच, किशोरीच्या मृत्यूच्या दिवशीच त्याच्या बंगल्यावर त्याच्या सोबत रात्र घालवण्याचे त्याला आमिष दाखविले. हा भोगी लांडगा माझ्या शरीराच्या मांसाचे लचके तोडण्यास एका पायावर तयार झाला. आणि जाळ्यात फसला…
माझ्या बाबांबरोबर सरपंचाला जेजुरीच्या खंडोबाच्या जत्रेला पाठवून तिथेच रस्त्यात मारेकरी घालून तो सरपंच्याचा घात करून, आपल्या गाडीने मला आमच्याच गावातील त्यांच्या बंगल्यावर त्या रात्री घेऊन जाण्याचे पक्के ठरले…
किशोरीच्या मैत्रीचे आपण पांग फेडतोय ह्या कल्पनेने माझ्या मनात घर केलेले असले आणि सुधीर आणि माझ्या भावी संसाराच्या मार्गातील ह्या दगड धोंड्यांना कायमचे दूर करण्याच्या माझ्या मनसुभ्यावर मी ठाम असले, तरी मनात मात्र आपण कुठे पाप तर करीत नाही ना, अशी टोचणी लागली होती. त्यात त्या विषारी सापाला ठेचायच्या आधी त्यानेच मला दौंष केला तर?….. अशी भीतीही वाटत होती….
आज बाबा सकाळीच सरपंचांच्या बरोबर जत्रेला निघून गेल्यावर घर बंद करून मी आमच्या गावाला निघाली. आणि रात्री नऊ च्या दरम्यान आवास गावातील नागोबाच्या देवळाजवळ ठरल्या प्रमाणे तो कालिया मला न्यायला त्यांची ती काळी गाडी घेऊन आला. आजच्या ह्या काळरात्रीला साजेशी काळया रंगाची साडी आणि ब्लाउज परिधान करून डोक्यावरून पदर घेतल्याने गावातील कोणी मला ओळखण्याचाही प्रश्नच नव्हता…..
माझ्या अंगी बळ देऊन माझे रक्षण करण्यासाठी मी अगोदरच देवळात जाऊन “त्या” “नागेश्वराला” शरण गेले होते… रात्रीचे अकरा वाजून गेले होते. त्यांच्या वाडीतील बंगल्यावर विहिरी जवळच असलेल्या बागेत रमायला आवडेल हे जाणून त्यानेच ही जागा निवडली. माझा हेतु मला स्पष्ट दिसत होता.
डोळ्यांपुढून किशोरी हटत नव्हती, गाडीत बसल्या क्षणा पासून त्या नराधमाने माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न करून पहिला, मी ते कटाक्षाने टाळून, “सारी रात्र बाकी आहे,जरा धिमाने घ्यावे ” ह्या दिलेल्या उक्तीवर हसत मला आपला समंजस पणा दाखवित तो करंटा दूरही सरला होता, पण आत्ता बागेत त्याने माझ्या गळ्यात हात टाकताच माझ्या सर्वांगावर ‘कालियाच्या’ कातडीच्या त्या थंडगार किळसवाण्या स्पर्शाने काटा उभा राहिला आणि मला शिशारी आली. किशोरीच्या सूडाच्या बळाने मी त्या मरतुकड्याच्या गळ्या भोवती माझ्या आणि किशोरीच्या बळाने विळखा घालून फास आवळला.त्याला माझ्या ह्या अश्या दैवी शक्ती आणि उक्तीची पुसटशी सुध्दा कल्पना नसावी. तो घुसमटून लडबडला आणि मला त्याने डसायच्या आत त्यालाच घायाळ करून बाजूच्या विहिरीत ढकलून दिला…….
सुन्न होऊन,दिगमूढ अवस्थेत विहिरीमधून येणाऱ्या बुडबुड्यांचा आवज बंद झाल्यावर, आत डोकावून त्या ‘कालियाचे मर्दन’ झाल्याची खात्री करूनच तेथून निघाले……..
…………(६७)
रातकिड्यांच्या किर्रर्र आवाजाचा छेद करीत, ह्या अश्या भयाण काळोख्या रात्री सरपंचाच्या वाडीतून बाहेर पडताना किशोरीच्या मैत्रीला जागल्याचे समाधान मनाला वाटत होते.
आजच्याच तारखेला त्या नराधमाच्या तावडीतून मृत्यूला तिने कवटाळले होते. आणि आजच मी त्याला आमच्या मार्गातून तिच्या वाटेला परतून लावले होते. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि शरीर सुखाच्या लालसेपोटी स्वतःच्या बापाचा बळी द्यायला त्याने मागे पुढे पाहिले नव्हते…
त्यां दोघांनाही मी आमच्या दोघांच्या मार्गातून दूर केले खरे,….. पण आता पुढे काय हा प्रश्न आ वासून उभा होता.
विचाराच्या चक्रव्यूहात गुरफटलेली मी डोक्यावर पदर घेऊन, तोंड लपवित त्यांच्या वाडीतून निघून थेट सुधीर च्या घराकडे माझी पाऊले वळविली. आत्ता ह्या क्षणी काकांचा आणि सुधिरचाच काय तो आधार होता…..
गावात सारे सामसूम होते. ह्या अश्या भयाण शांत रात्रीत एरव्ही एकटी घराबाहेर पडण्याचे धाडस मला झाले नसते, पण आज कसलीच फिकीर वाटत नव्हती. मला अश्या अनोळख्या, एकटीला बघून गावातील भटकी कुत्री भुंकत भुंकत माझ्या मागे लागली. आमच्या घराकडून पुढे माईंच्या घरा पर्यंत आली आणि माझा ‘शिवा’ कुठूनसा धावत धावत माझ्या जवळ येऊन अंगावर उड्या मारून मला भेटायला अधीर झालेला पाहून मी भानावर आले. त्याच्या गळ्याभोवती मिठी घालून त्याला कडकडून भेटले. आणि ढसढसा रडले. “शिवा शिवा माझ्या राजा” म्हणून त्याला थोपटले तेव्हा तो कुठे शांत झाला. वर्षा दीड वर्षाने भेटलो, पण त्याने मला बरोब्बर ओळखले होते. आपली रक्ताची माणसे आपापल्या स्वार्था नुसार ओळख दाखवतील पण ही मुकी जनावरे राग लोभ न धरता निरागस प्रेमाने आपल्या सहवासात राहतात. आणि आपण त्यांना दूर लोटले तरी पुन्हा कधीतरी आपण त्यांना भेटू ह्याच आशेवर जगत असावीत…..
आता घडलेला प्रकार काकांच्या कानावर घालून सुधीरलाही कळवायचे होते. गेट सरकवून शिवाबरोबर आत आले, पण दाराला कुलूप…. आता काय करायचं…
दुर्दैवाने पुन्हा एकदा माझी जीवन नौका वादळाच्या तडाख्यात सापडली. सर्व बंगल्याच्या बाहेरुन फेरी मारली, आउट हाऊस ला ही कुलूप होते. नको नको त्या विचारांनी आणि नैराशेने पुन्हा मला ग्रासले……. ‘ते माझे घर’, ती वाडी, ती झाडं, ती विहीर सर्व डोळ्यात साठवीत मी तशीच विहिरीच्या काठावर बराच वेळ बसून राहिली. पण काकांची भेट झाली नाही. माई, दादांची प्रकर्षाने आठवण होत होती. माईंच्या कुशीत शिरून ढसढसा रडावं असं प्रकर्षाने वाटलं, पण तो आधारही आता काळाने हिरावून घेतला होता.
शिवा शेपटी हलवत माझ्याकडे एकटक बघत होता, नियतीने सर्व दरवाजे बंद करून घेतले होते. ह्या क्षणी ह्या “शिवा” शिवाय, माझं असं कोण होतं म्हणा. त्याच्या गळ्यात हात टाकून मी धाय मोकलून रडले. सुधीर शी आत्ता बोलून त्याला माझी बाजू समजावून द्यायची होती. मी गुन्हेगार नाही, परिस्तिथीच तशी होती त्याला मी तरी काय करणार, त्याला हे आताच्या आत्ता कळवायला हवं होतं. उध्या सर्व परिस्तिथी बदलून जाईल ह्या शंकेने मला घेरलं. मी घाबरले. सुधीर माझा स्वीकार करेल का? मला समजून घेईल का? आता आई नाही आणि माई, दादाही नाहीत, मी ही अशी एकटी…. एकटी….. लोकं काय म्हणतील,….
मी कोणाला तोंड दाखवायच्या लायकीची राहिली नव्हती.ह्या क्षणी आत्ता आई तरी हवी होती…
…ज्या घरात, जे घर माझ्या साठी सुधीर ने पुन्हा नवीन बांधले, ज्या घराची मी स्वप्न बघितली ‘ते माझे घर’… त्या घराचे दारवाजेच आता नियतींनी बंद केले असल्याची मनाला जाणीव झाली आणि ही खंत उराशी घेऊन, आईच्या ओढीने मी बाजूच्याच आमच्या…. ‘ह्या’ घरी आले…
….पण ह्या घराचे दरवाजे तर बाबांनी मागेच बंद केले होते. माझ्यासाठी आता ‘ते’ घर नाही…., आणि ‘हे’ ही घर नाही. मला आता घरचं उरले नाही.. असे का? लहानपणी पक्षांनी झाडावर बांधलेली घरटी मी सुधीर कडुन काढून घेऊन जमा करायची, त्यां बिचाऱ्या पक्षांना ‘अजाणता’ बेघर केल्याचे ‘पाप’ तर मी आता भोगत नाही ना?
ह्या भयाण रात्री सोबतीला ‘शिवा’ शिवाय आता माझं कोणीच नाही.…. ‘एकटी…. मी एकटी’…
प्राजक्ताच्या प्रासादाला अवकळा आल्याचं पाहून तीळ तीळ तुटले. प्राजक्ताची सुद्धा फक्त लाकडेच शिल्लक होती. ह्या घराचे आता माळरान झाले होते…..
डोळ्यापुढे अंधार आणि अंधारच. आता सुधीर तरी मला जवळ करील का? ह्या शंकेने मी हैराण झाले. मला काय करावं हेच समजत नव्हतं…….. माझ्या ह्या गुन्ह्यापोटी त्याने मला अव्हेरलं तर माझी काय गत होईल…….
त्याच्या पेक्षा मीच त्याच्या आयुष्यातून निघून गेलेलं बरं ह्या भावनेने ग्रासलेली मी, त्याच्या प्रेमासाठी तहानेने व्याकुळ झालेली, थकलेली मी, त्याच्याच विचारात, त्यालाच डोळ्यात साठवीत, आमच्या विहिरी जवळ आले…. आईच्या आठवणींनी मन व्याकुळ झालं. प्राजक्ताचा सुवास आयुष्यातूनच दूर झाल्याची जाणीव होत होती… त्याच्या पासून दूर…. दूर ह्या अंधाऱ्या वाटेवरून, त्याच्या साठी गीत गात क्षितीजाच्या दिशेने झेपावत……. मार्गक्रमण करीत निघाले……..
…………(६८)
“आता बरं वाटतंय का?” काकांच्या हाताचा कपाळाला होणाऱ्या त्या मायेच्या स्पर्शानेच बहुदा मला शुद्ध आली असावी.
स्वप्नातून जागे व्हावे आणि डोळ्यापुढे ते स्वप्न तसेच बराचवेळ तरळत राहावे आणि जाग आल्यावर सुद्धा त्या स्मृतींच्या गुंगीत, तसेच डोळे उघडे ठेवून राहावे, तशी माझी अवस्था बघूनच बहुदा काकांनी मला “आता बरं वाटतंय का ?” हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला असावा.
हळू हळू माझ्या पाठीला काकांनी दिलेल्या आधाराच्या जोरावर तसाच बिछान्यावर उठून बसलो. डोळ्यापुढे शालन च्या जीवनाची नशिबाने केलेली थट्टा, एकाद्या चित्रपटाचा भागच आपण बघितल्या सारखी डोळ्यापुढे सारखी येत राहिली.
काका बहुदा दोन चार दिवस असेच माझ्या सेवेत माझ्या जवळ बसून असावेत. ताप उतरला होता पण गतःकालच्या आठवणींची गुंगी होती. आणि ती लवकर उतरेल असे वाटतही नव्हते.
काकांनी हलकासा नाष्टा करून दिला. रव्याची खीर पोटात जाताच मला जरा तरतरी आली. काका नको म्हणत असूनही मी ओटीवरच्या झोपाळ्यावर बसलोच. लहानपणापासूनच झोपाळ्यावर बसायला मला आवडायचे, शालन बरोबर जास्त उंच झोका कोण घेतं, ह्याची पैज लावायची माझी खुमखुमी, पण तीच मला नेहमी हरवून जिरवायची.
तिच्या ‘नशिबाने’ आशा, आकांक्षाचे, अपेक्षांचे उंच उंच झोके काढायला तिला मदत केली खरी, पण जीवनाच्या पटावरून तिला कोसळवून, आयुष्याच्या नाकावर आपटवून रक्तबोंबाळ करून त्यात तिचा जीवही घेतला.
जायच्या आधी ‘नैराश्ये’ च्या तडाख्यात तिने आमच्या सर्वांवर अविश्वास दाखविला त्याचेच आज वाईट वाटते. आम्ही लग्न करणारच होतो. पण सर्वसामान्य माणसात आणि अश्या भावनांच्या विश्वात वावरणाऱ्या हळव्या मनाच्या माणसातला फरक मला कधी कळला नाही ह्याचेही मला दुःख होते. ‘वास्तूशास्त्र’ आदी विषयांचा अभ्यास करण्या पेक्षा तिच्या मनाचा, ‘मानसशास्त्राचा’ अभ्यास मी करायला हवा होता असे मला आता राहून राहून वाटते.
आमच्या कारच्या दुर्घटनेचा तिच्या मनावर झालेल्या आघातातून ती डॉक्टरांच्या ट्रीटमेंटनी त्यातून सावरेल असेच मी गृहीत धरून होतो. त्यात सरपंचांच्या आणि तिच्या बाबांच्या वागण्याचे, तिने आम्हाला विश्वासात घेऊन सांगायला हवे होते. नक्कीच काहीतरी मार्ग काढून आम्ही त्यातून तिची सुटका केली असती. तसेच भविष्यात काय वाढून ठेवले आहे ह्यावर तिने भर न देता वर्तमानात जगायला हवे होते. फोनवर मी तिला तसे समजवायचा देखील, पण एकले पणाच्या, नैराश्येच्या जाळ्यात ती पूर्ण गुरफटली आणि जे नको ते करून बसली. दैवाने तिला थोडा जास्त वेळ देऊन, थोडी कळ सोसायची शक्ती दिली असती तर त्या “डिप्रेशन” मधून ती बाहेर येऊन आमचा संसार सुखी होऊ शकला असता. आज तिच्या प्रमाणे मी सुद्धा एकटाच पडलोय. सुक्या बरोबर ओलही जळतय….
झोपाळ्यावरील माझ्या मनाच्या, माझ्या विचारांच्या हिंदोळ्यावरून उतरणे, त्यातून बाहेर येणे एकवेळ शक्य आहे. पण ह्या अश्या हेलकावे खाणाऱ्या परिस्तिथीतून मी बाहेर कसा पडणार….
जाता जाता तिने नको ते निर्णय घेतले, विश्वासानी माझी वाट बघायची, स्वतःच्या भविष्यावर, आम्ही भावी संसाराच्या पाहिलेल्या स्वप्नांना, एकमेकांना दिलेल्या वचनांना स्मरून तरी शेवटी असे निर्णय घ्यायला नको होते. काळाचे भान ठेवीत थोडी वाट नक्कीच बघायला हवी होती. “आज ती स्थूल शरीराने जीवनातून मुक्त झाली आहे खरी, पण तिच्या सूक्ष्म शरीरातून, सूक्ष्म मनातून, तिच्या आशा, अपेक्षांमधून तिची सुटका झाली आहे का? तिच्या आत्म्याला शांती मिळाली असेल का? तिला मुक्ती मिळून मृत्यूनंतरच्या मार्गात गती मिळाली असेल का?” असे बरेचसे प्रश्न मला भेडसावत आहेत. तिला विसरणे शक्य नाही. अनादी कालापासून ह्या मायेच्या, प्रेमाच्या पाशात अडकल्यामुळेच तर आपण पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. पण,आज जर खरोखरीच ती मृत्यूनंतर च्या योनीत माझ्या जवळपास कोठे अतृप्त, अदृश्य वावरत असेल तर तिने मला विसरलेच पाहिजे, तरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल……..
…………(६९)
दुपारी लवकर जेवून शांत झोपावे म्हणून बिछान्यावर पहुडलो.रक्ताचे नातेवाईक करणार नाहीत अशी सेवा विशुकाका करीत होते.दोन सख्खे भाऊ पण जमिन आस्मानाचा फरक…
कधी आणि कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा हे ठरविण्याचा अधिकार आपल्याला नसावा, आपापल्या कर्माच्या गतीनं आणि संचित कर्माचा हिशोब चुकविण्यासाठीच हा देह आपल्याला बहुधा धारण करावा लागत असावा. तसे नसते तर शालन ने अंतुकाकांच्या बदली विशुकाकांच्या पोटीच जन्म घेतला असता.आणि तिला दुर्दैवाने ‘भोग’ भोगावे न लागता, सुदैवाने ‘उपभोग’ मिळाले असते. आपल्या चांगल्या कर्माने आपण संचित कर्मात भर टाकून आपले भाग्य ठरवीत असणार. शालन ने गेल्या जन्मी काय पाप केले होते म्हणून ह्या जन्मी तिचे बाबाच तिच्या वाईटावर उठले असावे.
विचारांनी मनाला क्षीण येऊन झोप कधी लागली कळलेच नाही.
मी फ्रेश झालो.अंगांत ताप नव्हता. मला नेहमीप्रमाणेच खाली गार्डन मद्धे जाऊन लाँन वर बसून, अथांग सागराच्या निळसर पार्श्वभूमीवर, क्षितिज्याच्या पलीकडे डोळ्यात प्राण आणून अधीरतेने वाट बघणाऱ्या आपल्या प्रियतमेला भेटण्यासाठी, आपल्या रथातून निघालेल्या सूर्य देवांचे दर्शन घ्यावयाचे होते. सूर्यास्ताचे ते विलोभनीय दर्शन मला अत्यंत प्रिय असायचे.आता चौफेर पिवळसर तांबूस रंगाची मागे उधळण करीत सूर्यदेव निघून गेले.आज मात्र काकांच्या सांगण्यावरून मी माझ्या बेडरूम मधूनच त्याचे दर्शन घेतले.
संध्याकाळी समुद्रावर मी एकट्याने जाऊ नये अशी ताकीद काकांनी दिल्या मुळे पाय मोकळे करण्यासाठी आज वाडीतच फिरण्याचे ठरविले. आता आस्मानी परीने अंगावरील निळसर शाल झटकत काळसर चादर ओढायला सुरवात केली आणि आकाश गंगेच्या पटावर रुपेरी चांदण्याची रांगोळी रेखाटली. त्या मध्येच चमकणाऱ्या कलाबुतीतून मला माझ्या शालन चा तो गोड चेहरा, मलाच न्याहाळत असल्याचा भास झाला. जाई जुईच्या मांडावाखालील नक्षीदार आसनावर बसून मी तिच्या गोड आठवणीत रमलो आणि तिला आता माझ्या शेजारीच बसल्याचे पाहून चकित झालो. ती एकटक मला न्याहाळीत होती. नजरेत तेच पूर्वीचे प्रेमीक भाव, ओठांवर तेच स्मित,चेहेऱ्यावर तीच मिठास. पण आता तिला माझ्या प्रेमपाशातून मुक्त केले पाहिजे असं माझं मन मला सांगत होतं. ही माझ्यापासून दूर झाली नाही, तर मुक्त कशी होणार ह्या विवंचनेत मी होतो. जसा चंद्र वर येत चालला तसा तिचा तो मोहक चेहरा मला गतस्मृतींच्या विश्वात घेऊन निघाला. पण ती आता ह्या विश्वात नाही,…. आहे हा सर्व भास आहे ह्याची जाणीव होऊन मी भानावर आलो. सगळे काही तसेच होते, तिचे ते बोलके डोळे, ते गोड रूप, तीच सर्वस्व अर्पण करायला आतुर झालेली नजर पण आता मात्र ती माझी राहिलेली नाही, माझ्यापासून दुरावली आहे हे सत्य मला नाकारता येत नव्हते. उदास मनाने, उदास नजरेने मी तिला आणि पर्यायाने मला देखील समजावण्याचा प्रयत्न केला……..
…………(७०)
समोर भरतीच्या लाटा किनाऱ्याला आमच्या ह्या आवडत्या खडकावर आदळून फेसळात माघारी वळत होत्या. जातांना माझ्या मनातील गत:कालच्या आठवणींना हिंदकळत होत्या. बराच वेळ आठवणींच्या सागरात भरकटत भरकटत ओहोटीच्या फेऱ्यात खेचली गेलेली माझी जीवन नौका किनाऱ्याला लागण्याची शक्यता दिसेनाशी झाली.
दिवस रात्र डोळ्यांपुढे मला माझी आई, बाबा आणि शालनच दिसू लागली. वेळेचे, काळाचे बंधन वाटेनासे झाले. ज्यांच्या सोबत आयुष्याचे गीत गात जीवनाचा आनंद उपभोगायचा, तेच आज मला सोडून दूर दूर त्या क्षितिजाच्या पलीकडील विश्वात दिसेनासे झाले आहेत. आता हा सूर्य सुद्धा त्या क्षितिजाच्या पलीकडील गावाला जाईल, पण तरीही तो मला उध्या पुन्हा दिसेल, भेटेल ह्याची मला खात्री आहे. पण ज्यांना मी माझी मानली ती सर्व आज माझी म्हणून कुठे राहिली. जे ह्या विश्वातून गेले ते मला न कळलेल्या, माझ्या आकलना बाहेर असणाऱ्या आणि जिथून कोणीही, परत येऊ शकले नाही, परतुच शकत नाहीत, अश्या अनोखी विश्वात रमले. जन्माला येतांना कोणी माझ्या बरोबर नव्हते आणि आता परत जातांना देखील ह्यातले माझे म्हणून जपलेले कोणी नसणार ह्याची मला खात्री आहे पण ह्याची खंत मनाला राहीलच. माझी माझी म्हणून ज्यांचा हात घट्ट पकडून मी विश्वासाने वाटचाल करीत होतो त्यांनी भरगच्च भरलेल्या ह्या दुनियेच्या जत्रेत माझा हात सोडून, माझ्या भांबावलेल्या मनाचा विचार न करता, त्यांच्यासाठी आक्रोश करणाऱ्या माझ्या हृदयाची तमा न बाळगता, मला एकटे पणाच्या वाळवंटात सोडून गेले. हे माझे, ते माझे असे म्हणत सर्वाँना आणि सर्व काही गोळा केले. पण ह्या मोहमायेत आता अडकून पडल्यासारखे झाले आहे. ह्या एकांत वासातून सुटका कशी आणि कधी हे “तोच” जाणे. चांगले जीवन उपभोगता यावे म्हणून चांगले विचार बाळगत, आई बाबांची शिकवण जपत, चांगला अभ्यास केला, शीकलो, सवरलो, नाती जपण्याची पराकाष्टा केली, ती सगळी जिवाभावाची जपलेली माझी माणसं आता ह्या दुनियेत नाहीत ही कल्पनाच मनाला सहन होत नाही. मी जिच्यावर जीवापाड प्रेम केलं जिने आयुष्यभर साथ देण्याच्या शपथा घेतल्या, वचनं दिली ती तरी आज कुठे आहे. तिला हवं तसं घर मी बांधलं, पण त्या घरात माझे आई, बाबा तर नाहीच, पण ती तरी माझ्या बरोबर असेल असे पाहिलेले स्वप्नही भंगले. आपण भले कोणतेही कर्म करू पण त्याचे फळ देणे मात्र त्या विधात्याने आपल्या हाती राखून ठेवले आहे. “तू फक्त तुझे नियत कर्म कर ,फळाची अपेक्षा करू नकोस” असेच त्याला सुचवयाचे असावे. जे काही घडवायचं ते मीच घडवणार ह्या तत्वावर आणि त्याच्या तालावर तो सतत आपल्याला नाचवत आला आहे.घाण्याला बांधलेल्या बैला प्रमाणे नशीबाची पट्टी आयुष्यभर आपल्या कर्मावर बांधून नियतीच्या चाकोरीत तो सदैव आपल्याला भाग्याचे आमिष दाखवून फिरवत ठेवत आहे. सर्वेसर्वा तोच आहे. आपल्या नशिबात “उपभोग” आणि मग भोगायचे ते “भोग”…..
आई वडिलांच्या आज्ञेत राहून त्याना आवडेल ते सर्व करीत आलो, त्यांना सुख लाभावे म्हणून चांगले शिकलो, सर्वांशी प्रेमाने आणि विनयशील वागलो, एव्हढे ऐश्वर्य पदरी पडले, पण ते भोगायला ह्यातलं कोणीही माझ्या बरोबर नाही आणि आज शालन च्या आठवणीत आणि एकले पणाच्या आगीत नियतींनी आता मला ढकलले आहे. समोर सागर तोच आहे, पण प्रेमाला पूर्ण ओहोटी लागून आत आत खेचला जावून मनाने आणि शरीराने खचत आहे. दूर दूरवर आशेचा किनाराच दिसत आणि सापडत नाही आहे. हा चंद्रही तोच आहे, पण त्याचे शीतल चांदणे आता मनाला चटके देत आहे .एकेकाळी तिच्या सहवासात जुळलेले सूर, तिच्या दूर,दूर जाण्याने आज बेसूर होऊन गळ्याशी अडकत आहेत, असंच जर आयुष्य जगायचं असेल, तर त्याच्या पेक्षा मृत्यूला कवटाळलेलं काय वाईट.आणि खरोखरीच तिलाही जर मुक्ती द्यायची असेल तर माझे प्राण अर्पण करायची सुध्दा आता माझ्या मनाची पूर्ण तयारी झाली आहे. आमचे मिलन आता तिच्यासाठी मी माझ्या प्राणाचे बलीदान देण्यानेच साध्य होऊ शकते……..
…………(७१)
आज अश्या ह्या तिन्ही सांजेला मी सुन्न होऊन, आता एकीकडे ह्या उजाड झालेल्या रंगहीन आणि अवकळा पसरलेल्या मनोसाम्राज्याचं ‘भग्नमंदिर’ आणि दुसरीकडे स्मृती पटलावर दिसणारं एके काळच्या शालन बरोबरच्या माझ्या प्रेमाच्या ‘वैभवशाली हृंमंदिराचे’ चित्र पाहण्यात मग्न होतो. एकाएकी थंडगार हवेच्या झुळके सरशी अंगाला झालेल्या त्या थंडगार स्पर्शाने माझ्या संपूर्ण शरीरावर काटा उभा राहिला.
“शालन… शालन” मी साद घातली आणि आमच्या नेहमीच्या खडकावर माझ्या बाजूला, माझ्या सोबत पुन्हा एकदा आयुष्यभर साथ देण्याची वचनं द्यायला आपला हात पुढे करीत, ती हजर झाली होती.
किनाऱ्यावर पसरलेल्या संधिकालाची हीच वेळ मला आयुष्यभर खुलवीत आली आहे. समोर अथांग सागर, त्यावर उठणाऱ्या फेसाळलेल्या लाटा, ती हृदयात घुमणारी गाज, वर घराकडे परतणाऱ्या पक्षांची किलबिल, मध्येच समुद्राकडे प्रियकराला केविलवणे हाक घालत ओरडत जाणारी ती टिटवी आणि मागे नारळीच्या झाडांशी ढगाआडून लपंडाव खेळीत डोकावणारा तो बोलका चंद्र अश्या वेळी वाटतं आता इथून हलूच नये…
पण आईची, काकांची आज्ञा शिरसावंद्य मानीत मी उठलो आणि शालन ला वचना साठी हात पुढे केला, तशी तिने आपल्या लांब कुरळ्या केसांच्या शेपटीचा पट्टा मानेवरुन आपल्या छातीवर नेहमी प्रमाणे घेत, पुढे होत मागे वळून आपला उजवा हात माझ्या कडे देत म्हणाली “मग तू ही दे वचन माझी साथ जन्मोजन्मी न सोडण्याची” मी सुद्धा वचन देण्यासाठी प्रेमाने हात पुढे करीत पुढे सरकलो. ती तशीच पुढे पुढे आणि मी तिला वचन देण्यासाठी, माझा हात तिच्या हातात देण्यासाठी तिच्या मागे मागे, जणू ‘प्रेमाची सप्तपदी’ चालल्या सारखा जात राहिलो, आज ती अत्यंत देखणी आणि मोहक दिसत होती. ओठावरचे हलकेसे स्मित आणि गालावरची ती खळी, आजच ह्या मोहक कळीचे फुलून सुवासिक फुलात रूपांतर झाल्याचे मला सुचवीत होते. मोतीया कलरची साडी, त्यावर बंद गळ्याचा, कोपरा पर्यंतचा लांब हाताचा, जाळीदार काळा ब्लाउज. लांब कुरळ्या केसात तिच्या आवडीची मस्त मदनबाणाची वेणी.
आज ती विशेष खुष दिसत होती….
लहानपणी ह्याच समुद्रकिनारी भातुकलीच्या खेळात ‘लग्नात नवरा म्हणून मी पुढे आणि ती नवरी बनून तिचा हात माझ्या हातात देत, माझ्या मागे मागे फिरुन ‘सप्तपदीचा’ खेळ खेळली होती’, आज खरे लग्न व्हायच्या आधी, बहुधा बाकीच्या मुलींप्रमाणे, मला तिच्या मागे मागे फिरविण्यात ती आनंद घेत असावी.
तिच्या त्या मोहक रुपाला भाळून मी हा नवीन डाव खेळत, ह्या केवड्याच्या वनातून त्या मादक सुगंधाचा आस्वाद घेत, आमच्या बागेतील रातराणीच्या सुगंधित वातावरणात कधी येऊन ‘गुंग’ झालो कळलेच नाही. जाई जुईच्या मांडवाखालून जाताना एका निराळ्याच संवेदनेने मी भारावून गेलो. आम्रवृक्षाला रेलून तिने आलिंगनासाठी दोन्ही बाहू पसरले पण मी पुढे सरसावताच, तिचा तो लपंडावाचा खेळ सुरू झाला. वृक्षाला गोल गोल गिरक्या मारीत, आपल्या सुहास्य वदनाने, गालावरच्या खुललेल्या खळीने तिने मला पार मोहुन टाकले. तिला आवडणारी ती टपोरी जांभळे नुसत्या तिच्या हात वर करण्याने टपा टप आमच्या वर वर्षाव करून गेली. एक जांभूळ आपल्या ओठात ठेऊन, तोंडाचा चंबू करीत वाकून माझ्या तोंडाजवळ येत, मी ते खावं म्हणून नजरेतून खुणावू लागली. मी पुढे होताच मागे सरकून, तिची ती नागिणी सारखी सरसरणारी काळी, जांभळी जीभ बाहेर काढून मला वेडावत, हात पसरत आणि मला जीवघेण्या नजरेतून आव्हान देत मागे मागे सरकत राहिली आणि मी तिला छेडण्यासाठी, तिला बाहुत घेण्यासाठी सरसावत पुढे पुढे विहिरी पर्यंत पोहोचलो, तशी ती त्या बांधावर चढली आणि पुन्हा मला बाहुत घेण्यासाठी हात पसरले. ह्यावेळी, तिचा हा जीवघेणा खेळ थांबविण्यासाठी मी पण बांधावर चढलो… ती मागे मागे सरकली आणि
“शालन पडशील… शालनsssss शालन” हाक मारेपर्यंत आणि माझा हात तिच्या पर्यंत पोहोचायच्या आत ती विहिरीत पडली. मी तिला वाचवण्यासाठी जिवाच्या आकांताने उडी घेतली. मागे काका सुधीर… सुधीर… म्हणून हाका मारीत धावत येत असावेत. बुडणाऱ्या शालन ला मी मिठीत घेतले. तिनेही जिवाच्या आकांताने आणि एका अनामिक ओढीने मला आयुष्यभराची घट्ट मिठी मारली. आता शालन माझी आणि मी शालनचा झालो होतो. आता कोणीच आम्हाला एकमेकांपासून वेगळे करू शकत नव्हते, अगदी काका सुद्धा… शालनच्या गोड आवाजात मी मंत्रमुग्ध झालो. संपूर्ण विहिरीत आता तिच्याच गीताचे स्वर घुमत राहिले……..
…………(७२)
आज सुधीर ला जाऊन पंधरा दिवस झाले. हे पंधरा दिवस मी कसे काढले हे माझे मीच जाणे. त्याला शेवटी शेवटी भावलेले गीत, जो ते ह्या टेप रेकॉर्ड वर सारखं सारखं लावायचा, आज तेच गीत मी सुद्धा ऐकून त्या “दयाघनाला” तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत आहे….
समोरच्या चंद्राची कोर ‘त्या काळया दिवसाच्या’ पौर्णिमे पासून आजच्या काळ्याकुट्ट अमावास्येपर्यंत रोज कले कलेने कमी कमी होऊन समोर त्या सागराच्या काळसर झालरीत विसर्जित झालेली मी रोज पाहत आहे. माझं हे आयुष्यही बहुदा असेच त्या दूर वर दिसणाऱ्या आणि आकलनाच्या बाहेर असलेल्या, त्या ‘अनंतात’ विलीन होण्याची मी सुद्धा आता आतुरतेने वाट पाहत आहे. अजून किती आयुष्य मी जगणार आहे, आणि अजून काय काय म्हणून मला पाहावं लागणार आहे, भोगावं लागणार आहे, हे तोच जाणे.आयुष्यात आपल्या हातात असे काहीच नसते. बरं विधिलिखित वाचताही येत नाही. म्हणे परमेश्वराने ते आपल्या भाली लिहिलेले असते, आणि ते मनुष्याला वाचता येऊ नये म्हणूनच डोळ्यांची ठेवण त्या कर्त्या कर्वित्याने मुद्दामच आपल्या कपाळा खाली करून ठेवली असावी. आपल्या नशीबाची पाने तो करताकरविता, तो ‘दयाघन’च उलटवीत असतो. आणि ‘आलिया भोगासी असावे सादर’ ह्याच तत्वावर आपण आलेला दिवस ढकलायचा, ह्या शिवाय काही करणे आपल्या हाती शिल्लक राहत नाही.
‘हाती नाही येणें, हाती नाही जाणे’…… हेच शेवटी खरं…… पण अश्या ह्या भोगात हसत, हसत जगणे शक्य तरी आहे का? बाजूच्या मानटातले ते योगी ‘बुवा’ आयुष्यभर मला “हसत हसत जगावं” हेच सांगत आले…. आज ते सुध्दा नाहीत, नाहीतर त्या त्रिमूर्ती दत्तात्रेयाच्या देवळात जाऊन बुवांच्या चरणी लिन होत मी त्यांना “ह्या परिस्तिथीत मला असे जगणे शक्य आहे का?” हा प्रश्न नक्कीच विचारला असता….
आपण चांगलं करावं, चांगलं वागावं म्हणजे परमेश्वर आपल्याला आनंदात ठेवतो, सुखी समाधानी ठेवतो ही माझ्याही आईची मला आणि नंतर माईंनी सुद्धा सुधीरलाही दिलेली आयुष्यभरची शिकवण तशी फुकटच गेली. त्या बिचाऱ्याने स्वतः एव्हढं चांगलं वागून त्याच्या पदरी काय पडलं? हेच शालन ने ही भोगलं. चांगली वागून सुध्दा आयुष्यभर पाहिलेली तिची स्वप्ने फोल ठरली. माईंनी, दादांनी एव्हढं चांगलं वागून, गोर गरिबांना मदत करून सुद्धा, ह्या नवीन वास्तूत ‘पूजा केल्यानंतरही’ चार दिवस राहण्याचा योग नशिबाने त्यांना दिला नाही. काय म्हणावे ह्या नियतीला… ह्या दुर्दशेला.
सुधीर ने शालन साठी, त्यांचे दाम्पत्य जीवन सुखी जावे म्हणून वास्तू शास्त्राचा अभ्यास करून, बांधलेले हे नवीन घर त्याला आणि पर्यायाने आम्हा सर्वानाच न लाभण्याचे एक कारण मला असे दिसते की, कदाचित ह्या वास्तूत ही बांधताना, त्या घरतांच्या ‘अजित’ ठेकेदाराने अनावधानाने केलेली चूक वास्तूदोष निर्माण करून गेली असावी. आणि पुढे त्याच्या लक्षात आणून देई पर्यंत ,तो ती चूक सुधारुही शकत नव्हता. त्यामुळेच कदाचित ह्या सर्व दुर्घटना घडल्या असाव्यात, असे मला आज राहून राहून वाटत आलेले आहे. बांधकामाच्या वेळी प्रत्यक्ष सुधीर इथे नव्हता त्यात त्याची परीक्षा असल्यामुळे, प्रत्यक्ष हजर न राहण्यामुळे त्याच्या सूचनांचे तंतोतंत पालन अजित कडून झाले नव्हते.
माझ्या माहिती प्रमाणे, तसेच जुन्या जाणकार लोकांच्या सांगण्याप्रमाणे घराचा भाल, हा असा घराच्या मधोमध आडवा येता कामा नये. सुधीर ने ती काळजी घेऊन सुद्धा ठेकेदारां कडून कुठेतरी चूक होऊन तो तसाच त्यांना घ्यायला लागला होता. सर्वात महत्वाचे म्हणजे ‘वास्तू पुरुषाचे स्थान’ हे आग्नेय कोपऱ्यात असावे, ते सुद्धा ईशान्य कोपऱ्यात केले गेले होते, शिवाय वास्तू पुरुषाला उपडे गाडावे लागते, चुकून जोशी भटजींकडून तो उदारिच ठेवला जाऊन त्यावर लादी सुद्धा बसवून झाली होती. सुधीर फक्त दोन दिवसांसाठीच येणार होता. त्यात वडीलकीच्या नात्याने, ही पूजा दादांनाच करून घ्यायला सांगितली होती .तो हजर असता तर ह्या सर्व गोष्टी त्याने व्यवस्थितच करून घेतल्या असत्या. त्यात पूजे नंतर कोल्हापूर ला जाऊन शालन ची भेट त्या सर्वांनी घायचे ठरले होते. त्या घाई घाई मध्ये ह्या महत्वाच्या सुधारणा करण्याचे राहून गेले. त्यात पुढे माई, दादांच्या अचानक जाण्याने, सुधीर बरोबर सर्वानाच बसलेल्या धक्क्याने आणि पुढे शालन च्या प्रकरणातही ती सर्व कामे राहूनच गेली. मला वाटतं ह्या सर्व दुर्घटना त्या ‘वास्तु पुरुषाच्या’ कोपामुळे घडल्या असाव्यात.
मी शालनला भेटायला म्हणून कोल्हापूरला जातो काय आणि त्याच रात्री ती इथे येऊन त्यांच्याच विहिरीत स्वतःचा आत्मघात करून घेते काय, आता तिच्या अतृप्त राहिलेल्या वासनेचा अंत व्हावा म्हणून सुधीरनेही तिच्या विरहात तिच्या प्रेमाला दिलेली दाद आणि त्याच्यातच त्याचा आमच्या विहिरीत झालेला अंत ही माझ्या आकलनाच्या बाहेर ची गोष्ट आहे. सुधीर पट्टीचा पोहणारा असून सुद्धा ह्या आमच्या विहिरीत तो बुडाला, त्या अर्थी शालन च्या अतृप्त आत्म्यानेच त्याला त्यात ओढून घेतले असावे. आणि आता तो आत्मा शांत झाला असावा. तसे नसते तर कोणालाही कधीही न घाबरणारा मी, नको नको ते भास त्या विहिरीजवळच्या आमच्या खोलीत मला ह्या पूर्वी व्हायचे, आणि मी तेथे झोपायचे टाळत होतो ते आता गेले पंधरा दिवस मी तेथेच झोपुनही बंद कसे झाले.
आपल्या इच्छा, आशा, आकांक्षा जिवंत असताना पूर्ण न झाल्यास आणि आपल्याला अकाली, एकाएकी मृत्यू आल्यास, मृत्युनंतरच्या योनीत मोक्ष न मिळता, त्या पूर्ण होई पर्यंत, आपण, आपला आत्मा त्यात अडकले जात असणार.त्याला गती मिळत नसावि .
सुधीर च्या आयुष्याशी मी जेव्हा माझ्या जीवनाची तुलना करतो तेव्हा कुठेतरी एक समांतर रेषा मला अस्पष्ट जाणवते. त्याला शालन नंतर, शेवटी शेवटी आयुष्यात एकटे पणा जाणवत होता, मला तो शालन च्या आईचे ‘सरिताचे’ माझ्याशी होणारे लग्न ‘अनंताच्या’ दुष्ट कारवायांमुळे त्याच्याशी करणे तिला भाग पडल्यामुळे, ती मला दूरावली आणि मी एकटा पडलो. सख्या धाकट्या भावानेच माझ्यावर सूड उगवला, पण माई, दादांनी मला सावरले होते. प्रामाणिक पणे मी सर्वांशी चांगलं वागून सुद्धा आज एकाकी पडलोय. सुधीर सारखाच मी सुद्धा हुशार होतो, मला वडिलोपार्जित संपत्तीही मिळाली असती पण ती सुद्धा अंतुनेच बळकावली आणि उधळली देखील. शालन नैराश्येची शिकार होऊन एकाकी पडली, अंतूच्या विचित्र आणि हेकट वागण्याने सरिताचेही शेवटी तेच झाले होते. मला आधार देणाऱ्या, माझ्यावर खरे खुरे प्रेम करणाऱ्या माझ्या जीवलगांचा मला आता सहवास मिळणार नसेल तर सुधीर, शालन सारखेच माझेही एकाकी जीवन बहुधा मला संपवावे लागेल…..
अश्या ह्या काळरात्रीला सुधीरला भावलेले ते गीत आत्ता ह्या क्षणी तरी माझ्या कानावर आणि ओठावरही रुंजी घालतय……….
❣️”समाप्त”❣️
***********************
