०२ तिच्या आठवणीतील गाणी

Tichya Aathavanitil Gaani

– अनंत नारायण संझगिरी

🙏🏻*मनोगत*🙏🏻

मित्रहो ……

ह्यापूर्वी “आठवणीतील मुकेश ची गाणी” हे सदर पाठवून त्यात कथानायक “यश”च्या त्या त्या वेळच्या मनःस्तिथीत, त्याला आठवलेली आणि त्याच्या नायिकेला आवडणारा गायक “मुकेश”ची काही ‘सोलो गाणी’ पाठविली होती. आणि आता ह्या सदरात, त्याची ‘नायिका’ “स्मिता” त्या वेळी ज्या ज्या मनःस्तिथीत होती, त्यावेळी तिला आठवलेली, तिच्या आठवणीतील गाणी पाठवीत आहे.
(**हिंदी मिक्स गाणी**)
मला शक्यतोवर जुनी गाणी आवडतात. तुम्ही ती ऐकावी म्हणून नुसतीच पाठविण्या पेक्षा एखादी कल्पित कथा रचून त्या भागाला साजेसे एखादे गाणे त्या सोबत पाठविण्याकडे माझा कल असतो. ह्या माझ्या प्रयत्नात बऱ्याच त्रुटी असू शकतील. आपण त्या मला पाठविल्यास मी आपला आभारी असेन.

***********************

…………(०१)

आज अचानक आणि माझ्या आयुष्यात प्रथमच मनाच्या या अशा उर्मी, या इवल्याश्या नाजूक हृदयात का बरं उचंबळून याव्यात? असे हे ‘शब्दातीत’….. एक अनामिक आकर्षण आणि आजपर्यंत जे कधीच कोणाबद्दल वाटले नाही, ते आज एका अनोळखी, आणि अपरिचित असूनही “परिचित” वाटणाऱ्या व्यक्तीबद्दल वाटावे, याचे खरोखरीच नवल वाटतेय. अशी एक ओढ जी शब्दात व्यक्त करणे कठीण, पण तरीही हवीहवीशी वाटणारी, मनाला उभारी देणारी, आणि “आपलं” कोणीतरी या जगात आहे, जे ‘विधात्याने’ फक्त आपल्यासाठीच जन्माला घातलय, अशी स्पष्ट जाणीव करून देणारे मनाचे तरंग सर्व शरीरातून उभारून का यावेत….???

माझ्या सर्वांगावर असे गोड रोमांच उभे राहिले. नजरेत एक जबरदस्त ओढ आणि पहिल्याच नजरेत मला ‘आपलंसं’ करून टाकायची किमया करणारा हा “जादूगर” सर्वांगावर प्रेमाच्या जादूची कांडी फिरवून, मला मोहित करून आपलंसं करून गेला. ‘रातराणी’ फुलून एक मादक सुगंध, ढगाआडून डोकावणाऱ्या द्वितीयेच्या चंद्र कोरीने सर्वांगावर शिंपडला. मी त्याच्या नजरेत नजर मिसळून मोहित मनाने ‘सर्वस्वी’ त्याची झाल्याचा भास झाला.

‘दिवाळीच्या’ या शुभ दिनी नयनांच्या निरांजनात, त्याच्या प्रतिमेच्या प्रकाशाने मनाच्या रांगोळीवरील चमकणाऱ्या कलाबूतीत, असंख्य चांदण्यांनी फेर धरला आणि त्याने “हॅपी दीपावली” च्या शुभेच्छा देण्यासाठी माझा हात हातात घेतला….. त्याच्या त्या अनामिक ओढीने, आणि जबरदस्त आत्मविश्वासाने, माझे नाजूक मन त्याच्या दोन्ही हाताच्या ओंजळीत हळुवार, त्या रातराणीच्या कळ्यांची ओंजळ रिते करून मी त्याच्या नजरेत माझ्याच प्रतिमेची नजर समरस झालेली पाहिली. आणि मी सुद्धा ओठातल्या ओठात पुटपुटले……………….. “सेम टू यू”……..

…………(०२)

‘कल्पनाने’ ओळख करून दिली…..“यश”…तिचा ‘आतेभाऊ’ आणि मग यापूर्वी त्याला आमच्या ‘सारस्वत समाजाच्या ग्रुप’मध्ये ओझरते पाहिल्याचे, आता कल्पनाच्या सांगण्यावरूनच, मलाही आठवले. ‘त्याला’ कधीतरी मला प्रत्यक्ष भेटायचेच होते, म्हणून ती मुद्दाम ‘दिवाळीच्या निमित्ताने’ त्याला भेटायला, आमच्या घरी घेऊन आली. मी तशी समाजाच्या ग्रुपमध्ये ‘विभा’ बरोबर गेली तरी, फारशी कोणामध्ये मिसळत नसे. कल्पना माझी कॉलेजपासूनची जिवलग मैत्रीण, त्यामुळे आमच्या गप्पा चालायच्या. आज पहिल्यांदाच त्याला जवळून नीट पाहिला, आणि ‘प्रथमदर्शनी’ की काय म्हणतात तसे “लव्ह ॲट फर्स्ट साईट” झाल्याची मनाने खूणगाठ बांधली. एकार्थाने मी सुद्धा कुठेतरी मनातून सुखावली. कॉलेजमध्ये असताना तसे आपणहून माझ्या पुढे-पुढे करणारे सुद्धा मी पाहिले होते, पण मला कोणाबद्दल ‘तसं’ काहीच कधी वाटले नाही, म्हणजे त्यावेळी आपण बरं, की आपला अभ्यास बरा. पण आज ‘यश’ ला भेटून मात्र, ज्याची मी वाट पाहत होते ‘तोच’ हा माझ्या ‘स्वप्नातील राजकुमार’ असल्याची खात्री पटली. कल्पनाच्या म्हणण्याप्रमाणे ग्रुपमध्ये तर हा नेहमीच येत होता, तर मग माझी भेट अगोदरच कशी झाली नाही? मला वाटते प्रत्येक घटनेला स्वतःची अशी एक ‘वेळ’ यावी लागत असेल. एकंदरीत ही दिवाळी तरी, आता नक्कीच चांगली जाणार याची खात्री पटली. माझ्या सुखावलेल्या मनाने, माझ्या चेहऱ्यावर ‘कबुलीची’ पावती दिली असावी. बऱ्याच दिवसांनी माझ्या चेहऱ्यावरचे प्रसन्न भाव, आणि माझे “स्मितहास्य” पुन्हा झळकल्याचे, ‘विभाच्या’ आणि ‘कल्पाच्याही’ बहुदा ते लक्षात आले असावे……….

…………(०३)

“यश” शुभेच्छा देऊन निघून गेला खरं, पण माझे मन मात्र अजून त्याच्या नजरेतच रेंगाळले होते. साधारण तासभर तो आणि कल्पना आमच्या घरी होते, पण माझे मन आणि लक्ष, ‘कल्पाच्या’ बोलण्याकडे कमी आणि त्याच्याचकडे, त्याच्या बोलण्याकडे अधिक होते. पाडव्याच्या, नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी ग्रुपचे बरेच जण आमच्या घरी येणार, म्हणून विभाच्या आग्रहाखातर मी मोरपिशी रंगाचा नऊवारी शालू, आणि नाकात नथ, आणि त्यावर आईचे, “तिने” माझ्या लग्नात मला देण्यासाठी ठेवलेले दागिने घालून, पारंपरिक वेशभूषा केली होती. माझे हे रूप पाहून बऱ्याच जणांनी, मला ‘कॉम्प्लिमेंट्स’ दिल्या, पण “साक्षात लक्ष्मी” हीच “कॉमेंट” हृदयात घर करून बसली. त्याच्या नजरेतले भाव, त्याची बोलण्याची पद्धत, ती ओघवती भाषा, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचा “सेन्स ऑफ ह्युमर” मनाला गोड स्पर्श करून गेला. फराळ खाताना, वास्तविक आमच्याकडच्या ‘चकल्या’ या अतिशय तिखट झाल्या असल्याची कबुली, बाकीच्यांनी सहजपणे दिली, पण त्या “मी” केल्या आहेत हे कळल्यावर, “वाह चकली एकदम फर्स्ट क्लास, पण इतकी… ‘गोड’ कशी? हाताचा गोडवा उतरलाय वाटतं? अशी ‘सारकास्टिक, मिश्किल’ कॉमेंट, आणि बेसन लाडू खाताना, “पुढच्या वेळी, नुसत्या हाताने वळले तरी गोडच लागतील… ‘गोड माणसांना’ त्यात साखर घालायची गरजच नाही.” असे माझ्याकडे मिश्किलपणे बघत, माझ्यासकट, माझ्या फराळाची तारीफ त्यांनी दिलखुलासपणे केली. जी ओढ मला वाटत होती, तितकीच ओढ मला त्याच्याही नजरेत जाणवली. ईश्वराने बहुदा आम्हाला एकमेकांसाठीच जन्माला घातले असावे असा ठाम विश्वास त्या क्षणी अंतर्मनाला स्पर्शून गेला. आणि मनाला सुखाचे पंख लागून उंच उंच अवकाशात, दारातील आकाशकंदिलातील आणि, तोरणांच्या लुकलूकत्या रंगीबेरंगी माळीतील एक-एक काजवा, मला चांदण्यात न्हाऊन भविष्याच्या सुरेल, स्वप्नात घेऊन गेले……….

…………(०४)

आजपर्यंत समाजाच्या ग्रुपमध्ये जाण्यात मला तसे फारसे स्वारस्य वाटत नसायचे. विभाच्या आग्रहाखातर, आणि कल्पाही भेटेल, असा विचार करून शक्यतोवर शनिवारी संध्याकाळी आम्ही ‘समाजात’ जात असू. पण आताशा कधी एकदा शनिवार उजाडतो, आणि मी ‘ग्रुप’मध्ये जाते अशी मनाची अवस्था झाली होती. ‘यश’ भेटणारच…. या गोड कल्पनेवर, आणि आशेवर मी होते.

माझी ही अस्वस्थता, आणि अधीरता, विभाच्याही लक्षात आल्याखेरीज राहिली नाही. आमच्या ‘ज्ञातीतीलच’ सगळे तेथे भेटत असत, बरेच नातलगही तेथे असायचे. माझा आतेभाऊ “अतुल” आणि “यश” हे कॉलेजचे ‘जिवलग मित्र’ आहेत, हे मला मात्र या वेळीच समजले. यश परवा आमच्या घरी आलेला, तेही विभाने अतुलच्या कानावर बोलता बोलता घातले. त्या दिवशी महत्त्वाच्या ऑपरेशनमध्ये बिझी असल्या कारणाने तो घरी येऊ शकला नव्हता. आज आम्ही सर्व जण मजेत गप्पागोष्टी, टिंगल टवाळी करत होतो. पण यशचे सर्व लक्ष फक्त माझ्यावरच केंद्रित होते. या आधी सुद्धा त्याने मला ग्रुपमध्ये बऱ्याच वेळा पाहिले असणार, पण आज माझ्याशी प्रत्यक्ष ओळख झाल्यामुळे तो प्रफुल्लित होता. मध्येच तसे कोणाचे फारसे लक्ष नाही हे पाहून मला चटकन, हलकेच, म्हणाला “स्मित, तू जवळ असशील तर, तुझ्यामुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ येईल.”

माझे नाव “स्मिता”, पण “यश” ‘स्मिता’वरून एकदम ‘स्मित’वर आला, आणि मी मोहरून गेले. मनाची कळी आणि गालावरची खळी आणखीनच खुलली. वास्तविक तो जे म्हणाला, ‘तसंच’ आणि ‘तेच’ मलाही त्याला सांगायचे होते, पण अतुल आणि विभा पटकन तेथे आल्यामुळे, माझे शब्द ओठांवर येऊन सुद्धा, जिभेवरच विरघळून सर्वांगात एक गोड लकीर पसरवून गेले. चेहऱ्यावरचे स्मिताचे “स्मित” मात्र लपवणे, मला कठीण गेले. पण “समझने वालों को इशारा काफी”… “यश” काय समजायचे ते समजून गेला असणार, हृदयाला, हृदयाची भाषा नक्कीच अवगत असते.

जीवनात भविष्याच्या काळोख्या भासणाऱ्या रात्रीत, यशच्या आगमनाने आणि आधाराने पहाट होऊन, अंधकार नष्ट होऊन, जीवनाचा मार्ग प्रकाशमय, आणि सुखकर होईल, अशी आशा निर्माण झाली. इतके दिवस, इतके जवळ असूनही आम्ही एकमेकांपासून दूर कसे राहिलो? याचंच मनाला नवल वाटले. आपल्या मनात प्रेमाचा अंकुर असतोच, पण त्याचे मनोवेलित रूपांतर व्हायला, कोणाच्या तरी हृदयातील प्रेमाचे खतपाणी मिळणे आवश्यक असते. मानवी ‘मनाचेही’ असेच असावे, या नाजूक कळ्या तेव्हाच खुलतात, आणि फुलून त्यांचे फुलात रूपांतर होऊन, त्या सुगंध तेव्हाच दरवळतात, जेव्हा त्यांना प्रेमरूपी प्रकाश, रिझवायला, फुलवायला मदत करतो…. “यश”मध्ये मला आशेचा किरण सापडला. “प्रेमात पडणे” म्हणजे काय असते ते उभ्या उभ्या मला, येथे, आता जाणवायला लागलेय……….

…………(०५)

मी कोणाच्या ‘प्रेमात’ कधी पडेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी चोखंदळ वृत्तीची, प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून घेणारी. विभा आणि कल्पाच्या दृष्टीनेही ‘व्हेरी प्रॅक्टिकल’, आणि त्यातून मानी, त्यामुळे “आमची ताई तसं कोणाला मीठ घालायची नाही” या आपल्या मतावर, विभा ठाम असायची. पण कल्पना मात्र बरेच वेळा म्हणायची, “तू ‘प्रॅक्टिकल’ असशीलही, पण फार ‘हळवी’ आहेस, तशीच ‘साधी’ आहेस, तेव्हा एखाद्या वेळी पटकन प्रेमात पडून ‘फसूही’ शकतेस.” माझ्याबद्दल कोणाला काय, तर कोणाला काय, असं वाटत असलं, तरी आज मी स्वतःही यशच्या प्रेमात पडल्याचे मला प्रकर्षाने जाणवू लागले आहे. तसं नसतं तर जे कधीही, कोणाबद्दलही वाटलं नाही, ते नेमकं “यश” बद्दलच का वाटावं? त्याला सारखं बघावं, भेटावं, त्याच्याशी बोलावं, त्याच्या सान्निध्यात सारखं राहावं, असं मला वारंवार का वाटतंय? डोळ्यावर झोप असूनही, अशी मी रात्र-रात्र जागून का काढतेय? डोळा लागायला, आणि त्याची मूर्ती डोळ्यापुढे दिसायला एकच गाठ पडायची, आणि मग त्याच्याच विचारात, पूर्ण रात्र सरून जायची. तो फक्त शनिवारी संध्याकाळीच समाजात भेटायचा. या आठवडाभरात त्याचीही अवस्था माझ्यासारखीच व्हायची, आम्ही एकमेकांना कधी भेटतो असं व्हायचं. रात्री बरेच वेळा ‘अनुराधा’, ‘स्वाती’ या माझ्या आवडत्या नक्षत्रांची रांगोळी, ‘विधात्याने’ आकाशाच्या निळसर पटावर, कुठे काढली आहे का, ते मी शोधायची. माझी झोप पूर्ण होत नव्हती, त्याचा थोडा परिणाम माझ्या प्रकृतीवर मला जाणवू लागला होता. त्याचा विचार, त्याचे नजरेसमोर वारंवार येणारे रूप, याची मला एक प्रकारची गोडीच लागली. त्याच्याशिवाय बाकी काही नसले तरी चालेल, अशी मनाची धारणा होऊ लागली. “जेवणात पण माझे लक्ष नाही”, अशी तक्रार विभाकडून येत होती. हळूहळू माझ्याबद्दलची तिची ‘नाराजी’ ती बोलून दाखवू लागली. मी माझ्या ‘प्रकृतीला’ जपावे, याचा अट्टाहास ती करायची…….

पण मी खूश होती, मन बहरलेले असायचे. मला वाटते मनाची ताकद, शरीराच्या ताकदीपेक्षा कधीही श्रेष्ठ असते…….. माझ्या या अवस्थेलाच, “प्यार में पागल” असं म्हणत असावेत का???……….

…………(०६)

जी ओढ मला यशबद्दल होती, नेमकी तीच ओढ त्याच्या नजरेत पाहून मला खूपच बरं वाटायचं. माझे दिवस आनंदात जाऊ लागले.

आतापर्यंत मी माझे वाढदिवस, तसे कधी साजरे केले नव्हते. वाढदिवसाच्या दिवशी ‘उपास’ करून माझ्या आवडत्या ‘श्री शांतादुर्गेची’, आमच्या कुलदेवतेची, मनोमन पूजा करून, फक्त रात्री एक वेळेचे जेवण करून, मी उपास सोडायची. त्यामुळे बाकीच्यांचा आग्रह असला तरी सर्वांना बोलावून वाढदिवस साजरा, मी कधीही केला नाही. पण या वेळी “यश” ने मला सर्वांसमोर गळ घालून, “काहीही करून तो स्वतः आमच्या घरी येऊन, “सेलिब्रेट” करणार आहे,” असा आग्रह धरल्यामुळे, आणि ‘अतुल’ नेही त्याला पुस्ती जोडल्याने, नाइलाजाने त्याच्या प्रस्तावाला मी होकार दिला. ‘नववर्षाच्या शुभेच्छा’ देण्यासाठी सुद्धा, कल्पनाबरोबर तो घरी येऊन गेला होता, आणि आता लगेच दोन दिवसांनंतर पुन्हा त्याची, या एका आठवड्यातली ही तिसरी भेट होणार होती.

‘खुदा जब देता है तो छप्पर फाड के’ हे काही खोटे नाही. प्रत्येक भेटीनंतर मनाची जवळीक वाढत होती, आणि अधीरता पूर्णत्वाच्या मार्गावर होती.

उद्या वाढदिवस, पण सर्व रात्र मी जागूनच काढली. वास्तविक उठल्या उठल्या देवीचे ‘नाव’ आणि ‘रूप’ डोळ्यांपुढे येताना आज त्याचे ‘यशातही’ रूपांतर झाले. देवीच्या मनात पण तसेच असेल का? मन देवीवर केंद्रित करताना, आज ‘श्री मंगेशाची’ आमच्या गोव्याच्या देवतेची सुद्धा प्रकर्षाने जाणीव झाली. ‘श्री शांतादुर्गा’ हे पार्वतीचेच रूप आणि ‘श्री मंगेश’ हे शंकराचे. आज “जोडीने” दोघे माझ्या डोळ्यासमोर आले. आणि मी नतमस्तक झाले.

यशचे कुलदैवत सुद्धा गोव्याचेच, ‘श्री मंगेश’, काय योगायोग असतात पहा. लहानपणापासून मला ‘गोव्याची’, या कुलदेवतांची ओढ, आणि मी लग्न करेन, जोडीदार निवडीन तर ‘श्री मंगेशाचाच’ महाजन असावा असे मनोमन ठरवले होते, आणि योगायोगाने आणि शांतादुर्गेची ‘कृपा’ म्हणूनच, बहुदा यश माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून येणार, याची खात्री वाटत होती…. तसे संकेतही ‘नियती’ देत असावी….. माझ्या आयुष्यातील, आजचा माझा हा वाढदिवस, यशकडून “विशेस” मिळून, भावी आयुष्यात बहुदा “विशेष” काहीतरी घडवून ‘यशाच्या’ मार्गावर नक्कीच नेणार……….

…………(०७)

आज ३ जानेवारी, माझा ‘वाढदिवस’. लहानपणी आई असेपर्यंतच्या माझ्या झालेल्या वाढदिवसांच्या कोडकौतुकाच्या आठवणी मी हृदयात जपून आहे. आई गेल्यापासून मी तो कधीच तसा साजरा केला नव्हता. वडिलांना खूप वाटायचं, पण आई नसल्याने मी तो ‘तिच्या’ आठवणीत उपास करून, आणि देवीचा दिवस मानून, देवीची पूजाअर्चा करूनच साजरा करायची. कित्येक वर्षानंतर फक्त ‘यश’च्या आग्रहाखातर तो आज साजरा करायचा, असं सर्वांनी ठरवलं होतं. यश भेटणार म्हणून मी खूश होते. सकाळपासून तो कधी येतोय असंच मला झालं होतं. कल्पनाबरोबर संध्याकाळी ५ च्या सुमारास तो आला. अतुल सकट, ग्रुपमधील बाकीचेही होतेच, पण या सर्वात मला फक्त तोच दिसत होता. शुभेच्छा देताना त्याच्या हाताच्या स्पर्शाने, मी मोहरून गेले. त्याच्या हातातील त्याने ‘गिफ्ट’ म्हणून आणलेले छोटेसे “हार्ट शेप” पेंडंट उघडले आणि त्यातील एका बाजूला ‘श्री शांतादुर्गेची’ आणि दुसऱ्या बाजूला ‘श्री मंगेशाच्या’ छोट्या मोहक, कोरीव मूर्तींना बघून मी भारावूनच गेले. सारे अंग शहारले, आज सकाळीच पूजेच्या वेळी झालेल्या “अनुभूती”ची पुन्हा प्रचिती आली. हा ‘योगायोग की दैवयोग’, मी अचंबित नजरेनं यशकडे पाहतच राहिले. मला दैवतांचे असलेले आकर्षण, याला नेमके कसे काय कळले, याचेही आश्चर्य वाटले. “कोई खूब जानता है मेरी पसंद को”. लटक्या मानेने, डाव्या खांद्यावरून माझ्या काळ्याभोर केसांच्या, जाड वेणीने छातीवर उचंबळून येत, आपलीही पसंती दर्शवली. त्याने “ग्रीटिंग”ही स्वतः आपल्या हातानेच तयार केले होते. कार्डबोर्डवर दोन हृदयाकृती आकृत्या एकत्र करून, त्यावर सुवासिक फुलांच्या नाजूक पाकळ्या चिकटवून, त्यामध्ये वळणदार अक्षरात माझे नाव गुंफून, माझ्यावर कविताही लिहिली होती. कधी नाही तो माझा वाढदिवस इतका छान साजरा झाल्याने खुल्या मनाने त्याचे आभार मानून मी ‘पुन्हा’ त्याचा हात हातात घेतला…. “थँक्स”….

हाताच्या मूक स्पंदनातून, आणि मिश्किल नजरेतून, माझ्या हृदयाच्या स्पंदनापर्यंत पोहोचत, त्याने “मला स्वीकारल्याची” पावतीही दिली. विभा आणि कल्पानेही खूप छान तर्हेने माझ्या वाढदिवसाची रंगत वाढवली. बाकीच्या मित्रमैत्रिणींनीही ‘प्रेझेन्ट्स’ आणली होती, पण माझे मन “यशमय” झाल्याने त्याचे मनाला तेवढे अप्रूप वाटले नाही. या सर्वांवर कळस चढला, जेव्हा ‘अतुल’च्या आग्रहावरून, यशने मला जुनी गाणी, आणि त्यात विशेषकरून “मुकेशची” आवडतात, हे कळल्यामुळे, एक सुंदर ‘गैरफिल्मी’ गीत, ज्यामध्ये ‘माझेच’ सुरेख वर्णन असावे असे गीत, आपल्या सुरेल आवाजात म्हणून, माझ्यासकट सर्वांनाच आश्चर्यचकित केले. माझ्या आवडत्या, सुशील, सुंदर, गोड गळ्याचा, आणि हृदयाला भिडणाऱ्या दर्दभरी स्वरांचा, “मुकेश” साक्षात माझ्यासमोर उभा राहून मला क्षणात आपलंसं करून गेला……..

…………(०८)

“यश”मुळे माझा वाढदिवस, माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच छान झाला. बऱ्याच वर्षानंतर तो आमच्या घरी साजरा झाल्याने विभा, कल्पा सर्वांनाच खूप बरं वाटलं. मी तर खूपच आनंदात होते, आई आणि बाबांची खूप आठवण काढली. ‘देवीच्या’ मनात असल्याशिवाय कोणतीच गोष्ट घडत नसते. हेच खरं, तिच्या मर्जीनेच बहुदा यशला तशी बुद्धी झाली असावी. थोड्याच दिवसांनी तारीख ‘१८ जानेवारी’ ला त्याच्या ‘वाढदिवसाच्या’ निमित्ताने त्याने आम्हा सर्वांना ‘प्रीतम हॉटेल’ ला पार्टी देण्याचं कबूल करून, आम्हा सर्वांना आग्रहाने येण्याचे आमंत्रण देऊन, आमच्याकडून तसे ‘प्रॉमिस’ सुद्धा घेऊन तो मोकळा झाला. शनिवारी नेहमीप्रमाणे तो ‘समाजात’ भेटेलच म्हणून मी ही खुशीत होते.

का कळत नाही, पण हल्ली मला मधे मधे उगाच थकवा जाणवू लागला होता. कसलीही दगदग, धांदल नसूनही अचानक ‘विकनेस’ यायचा. विभाचे म्हणणे की हल्ली ‘मला नीट झोप लागत नाही’, त्यामुळे, जागरणामुळे सुद्धा प्रकृतीवर विपरीत परिणाम होत असावा. मला दोन वर्षांपूर्वी झालेला आजार, हेच बहुदा ‘मूळ’ कारण असावे, असं माझे ‘अंतर्मन’ मला सांगत होते. एकीकडे शारीरिक त्रास जाणवत होता, पण यशचा विचार मनात आला, त्याची आठवण आली की मग कसलीच अडचण जाणवत नसे, मनाला उभारी यायची, प्रफुल्लित होऊन, मी पुन्हा भावी आयुष्याची स्वप्ने पाहायला सुरुवात करायची. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आणि आपला, मागील कोणत्या ना कोणत्या तरी जन्माशी संबंध असलाच पाहिजे, एकतर आपण त्यांचे, अर्धवट राहिलेल्या प्रेमाचे आपले काही ऋण फेडण्यासाठी, अथवा ती व्यक्ती तिच्या काही प्रेमाच्या ऋणापोटी, आपल्या आयुष्यात पुन्हा या जन्मात येत असावी.

सुप्रसिद्ध विचारक, आणि लेखक “ब्रायन वेस” च्या या विचारांशी आणि अभ्यासाशी, मी पूर्ण सहमत होते. यशचे नि माझे गेल्या जन्मीचे काहीतरी संबंध जर नसते, तर तो असा इतक्या वर्षानंतर, अचानक येऊन सुद्धा, मला त्याच्याबद्दल इतकी ‘आंतरिक’ ओढ का वाटावी? तो “सोलमेट” असल्याशिवाय?

काही माणसे आपणहून, आपल्याला काही ओळख पाळख नसताना मदत करतात, त्यांचा काही फायदा तोटा न बघता, आपल्यावर प्रेमाची बरसात करतात. या उलट आपण काही माणसांचे, काहीही वाईट न करता सुद्धा, ती आपले उगाचच वाईट चिंततात. दोन व्यक्तींमधला जन्मोजन्मीचा हा संबंध आपण कधी समजूच शकत नाही, आणि ‘पुरुष’ आणि ‘स्त्रीचे’ प्रेम संबंध कळणे, तर त्याहूनही महान कठीण, आणि म्हणूनच परमेश्वराने निर्मिलेल्या विविध नात्यांकडे बघितल्यावर चक्रावूनच जाते.

“एकच” स्त्री, पण ती कोणाची तरी आई, बहीण, मुलगी, मैत्रीण, प्रेयसी, बायको, कितीतरी विविध प्रकारची नाती, आणि किती विविध प्रकारचे प्रेमसंबंध. मानवी मनाची ही विविध रूपे खरोखरच आकलनाच्या बाहेर आहेत. पण “ब्रायन वेस” म्हणतो तेच खरं, आणि मला पटतंय…… “ओन्ली लव्ह रिमेन्स”……..

…………(०९)

“यश” च्या वाढदिवसाला त्याची भेट नक्की होणारच होती, पण त्याला अजून १५ दिवसांचा अवकाश होता. त्यामध्ये अजून दोन शनिवारी, समाजात तो भेटेलच याची खात्री होती. म्हणून मी खूश होते. पण माझ्या वाढदिवसाच्या ४ दिवसांनंतर येणाऱ्या पहिल्या शनिवारी, नेहमीप्रमाणे, कल्पनाबरोबर मी ग्रुपमध्ये जाण्याचे नक्की केले होते, पण ‘आयत्या वेळी’ तिला ऑफिसचे काही महत्त्वाचे काम निघाले, म्हणून ती येणार नसल्याचे तिने कळवले. विभा आणि मी दोघीच समाजात गेलो.

काय झाले कोणास ठाऊक, बहुदा आजचा दिवसच खराब असावा, आज यश सुद्धा आला नाही. माझा साफ हिरमोड झाला, आज भेटला की आपणहून त्याला, त्याच्यावरील माझ्या प्रेमाची कबुली देण्याचे मनाने ठरवलेच होते, पण तोच नाही म्हटल्यावर माझा मूडच साफ गेला. अपेक्षाभंगासारखे दुसरे दुःख नसावे. कदाचित उशिरा सुद्धा का होईना, तो येईलच म्हणून नजर भिरभिरत होती, कशातच लक्ष लागत नव्हते. “हल्ली” माझे असेच झालेय, मन अगदी विचित्र वागतेय. जर एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, की ते बेचैन होते. थोडी चीडचीडही होते, उगाचच नको नको ते विचार मनात येऊन, छातीत धडकीच भरते, गर्भगळीत झाल्यासारखे वाटते आणि एकदम थकवा येतो.

मी मनाला समजावण्याचा प्रयत्न करू लागले, खरंतर ही साधीच गोष्ट, आत्ता नाही भेटला, आज नाही भेटला, तर पुढे भेटेलच की,… पण नाही, ते मानायला तयारच नव्हते, त्याने आत्ताच भेटायला हवं….

या माझ्या मनाला मी आता कसं समजावू….?

माझा उतरलेला चेहरा, आणि माझी झालेली केविलवाणी अवस्था, सर्वांच्याच हास्याचा विषय बनली. विभाला हे बिलकुल आवडले नव्हते, घरी येईपर्यंत ती माझ्याशी एका शब्दानेही बोलली नाही. ग्रुपमध्ये माझे मनच नव्हते, यश असताना वेळ कशी पटकन निघून जायची कळायचेच नाही, आज मनगटावरील घड्याळाचा काटा एक-एक मिनिट सुद्धा पुढे सरकत नव्हता. आपले मन आपलेच वैरी झाल्यासारखे, नको नको ते विचार करत होते. वास्तविक तो यायलाच हवा होता, उगाच मनात पाल चुकचुकली, कल्पना पण नाही, आणि तो पण…… पुन्हा भेटेल ना??? तो आत्ता यावा असं मनाला खूप वाटतेय, ते त्याला सादही घालतेय. पण त्याचा पत्ताच नाही, व्याकुळ नजरेनी मी खिडकीतून रस्त्यावर वेड्यासारखी, एकटक पाहत होती… पुन्हा त्याच्याच विचाराने हैराण झाले.

मला तिथे जास्त वेळ राहवेना, विभाला थांबायचे होते, त्यामुळे माझ्यावर रागावून, वैतागून, तीसुद्धा वेळेपूर्वीच निघाली………

“इंतजार और अभी, और अभी और अभी”…….

…………(१०)

आम्ही घरी आलो, पण मनाला शांती नव्हती. माझी जेवायचीही इच्छा नाही, म्हटल्यावर मात्र विभाचा पारा चढला. यश आमच्या घरी आल्यापासून तिचं तसं बिनसलंच होतं म्हणा. त्यातून त्याने ते “हार्ट शेप” किमती पेंडंट दिल्यामुळे, ती, आणि कल्पना, दोघीही माझ्यावर नाराज होत्या. यशच्यामुळेच मला त्रास होतोय, म्हणून मी त्याचे संबंध तोडावे, म्हणून माझ्या जिव्हारी लागेल, असे बरेच काही ती बोलली. रात्रभर मी रडूनच काढली, आईची सुद्धा फार आठवण येत होती. आज आई असती तर तिलाच माझे मन कळले असते….

त्यानंतरचे दोन-तीन दिवस खूप वाईट गेले. कल्पनाची सुद्धा फोनवर भेट होऊ शकली नाही, त्यामुळे यशचेही काही कळले नाही…. मला त्याच्या विचाराशिवाय काहीच सुचत नव्हते…. ‘कशी केलीस माझी दैना रे, मला तुझ्या बगर करमेना’ ……

शेवटी कल्पनाला फोन लागल्यावर कळले की, यशला ऑफिसच्या कामासाठी त्वरित बेंगलोरला जावे लागल्यामुळेच तो मागच्या शनिवारी, ग्रुपमध्ये येऊ शकला नाही, आणि काम झाल्याशिवाय येत्या शनिवारी तरी येईल की नाही, याची खात्री नसल्याचे तिने सांगितल्यावर मात्र मला रडूच कोसळले.

एका गोष्टीचे मला राहून राहून नवल वाटले की, त्याला माझी ओढ आहे, ते नजरेतही दिसते, त्याने कवितेतून त्याचे प्रेम व्यक्तही केलेय, मला बरं वाटावे म्हणून माझ्या आवडीची महागडी गिफ्ट सुद्धा दिली. वाढदिवसाची पार्टी ॲरेंज केलीय, मग इतके सगळे असताना, मला प्रेमाची भूल देऊन, मला त्याच्या वाटेकडे डोळे लावायला लावून, हा बेंगलोरला जाऊच कसा शकतो? ठीक आहे ऑफिसचे अर्जंट, महत्त्वाचे काम निघालेही असेल, पण या सुज्ञ माणसाने एका शब्दाने तरी कल्पनाबरोबर तसा निरोप का नाही पाठवला? त्याला माझ्या मनाची काहीच कशी पर्वा नाही. आता भेट झाल्यावर मी ही माझी ‘नाराजी’ दर्शवायची, माझ्या मनाने पक्क केले. माझा असा अपेक्षाभंग झालेला मनाला सहन होणे कठीण होते. तरी पण मनात त्याची आठवण आणि नजरेत त्याची प्रतिमा घेऊनच मी गुरुवारपर्यंतचे दिवस कसे बसे काढले.

शनिवारी समाजात जायचे आहे हे कल्पनाने फोन करून कळवले, आणि पुन्हा त्याला भेटण्याच्या ओढीने उचल खाल्ली. डोक्यात राग आणि हृदयात तीच ओढ, या वेळी काहीही करून तो आलाच पाहिजे…. ‘तो आला तर तो खरा माझा’… आणि काहीही कारणास्तव जर तो आला नाही, ‘तर आयुष्यभर त्याला न भेटण्याचा निर्णय हृदयाने घेतला’ आणि मनाने त्याची खूणगाठ बांधली. आणि तसा मी निश्चयच केला, बहुदा देवीचाच तसा “कौल” आहे असे मी मनाशी पक्क ठरवले. तरी सुद्धा देवीने उद्या त्याची आणि माझी भेट घडवावीच अशी मनोमन प्रार्थना करून तिला साकडेही घातले……….

…………(११)

सकाळ उजाडता उजाडता मला झोप लागली, त्यामुळे उठायला बराच उशीर झाला. विभाने सर्व कामे उरकून घेतली होती, माझ्या वाटणीची कामे पण आज तिने मुकाट्याने केली होती. मी गाढ झोपलेली पाहून, भांड्यांचा सुद्धा आवाज होऊ दिला नसावा. एकंदरीत आजचा दिवस चांगला जाण्याचीच ही लक्षणं मला दिसत होती. ‘शांतादुर्गेचं’ नाव घेतंच मी उठले. माझ्या उरलेल्या कामातही माझे लक्ष नव्हतेच, हल्ली वारंवार कोणतेही काम माझ्याकडून धड होत नसे. दूध तापवायला म्हणून घ्यायचे, तर गॅसवर भांड्यात पाणीच घेतलेले असायचे, दुधाचे भांडे तसेच फ्रीजमध्ये. आंघोळीला जाताना टॉवेलच न्यायला विसरायची, एक ना अनेक. विभाकडून नंतर यावर खूप बोलणी खावी लागायची, तिच्या दृष्टीने यशच याचा ‘गुन्हेगार’, त्याच्यावरच सर्व खापर फोडायची. माझे मन त्याच्यात गुंतलेय ह्यात ‘त्या बिचाऱ्याचा’ काय दोष….

आज कधी संध्याकाळ होते आणि आम्ही समाजात जातो असं मला झालं होतं. आज माझी खरी परीक्षा होती. सत्व परीक्षाच जणू, आज माझ्या प्रेमाचा कस लागणार होता. माझे प्रेम खरे असेल तर तो आज काही करून भेटेलच…. पण… पण काही अपरिहार्य कारणास्तव तो आलाच नाही तर……? या जर, तर मध्ये मन ठेचाळणार का?

माझ्या मनाचा कौल, माझ्या बाजूने होणार का? प्रेमाच्या पाकळीची ही देवीच्या पायाशी लावलेल्या कौलाची कळी, माझ्या बाजूने उजवा कौल देत, त्याचे भविष्याच्या सुंदर फुलात रूपांतर करणार आणि माझ्या प्रेमाला जीवदान मिळून मीच जिंकणार का,…………का….??? या दुसऱ्या, ….का??? चा मी विचारच करू शकत नाही. आईची, शांतादुर्गेची कृपा व्हावी हीच मनीषा हृदयी बाळगून ग्रुपमध्ये आम्ही दाखल झालो. आज अतुलही भेटला, मनाला धीर वाटला…. पण जो यावा, भेटावा म्हणून आशेवर आले, त्याचे काय….? पर्स उघडून देवीचा फोटो ओंजळीत घेऊन तिच्या नजरेत मन केंद्रित केले…..

“शांताई”… एकच आर्त हाक,… आणि कल्पनाची… “वेलकम स…..र”ची ओढलेली री….. ने मी किल्ला ‘सर’ केल्याची, एक अतीव आनंदाची लकेर सर्वांगातून उठली… “येस”… नजरेसमोर “यश”…. मीच जिंकले. मनात आईचे आणि देवीचे आभार मानून, नतमस्तक झाले. या क्षणाचा आनंद लपवत, “सरांना” माझी किंमत कळावी म्हणून, मुद्दाम त्याच्याकडे दुर्लक्ष करत, मी अतुलशीच बोलत राहिले.

“काय बाईसाहेब?” जवळ येत कानावर हळुवार फुंकर मारीत, जणू भ्रमराने फुलावर झेपावे तसा गुणगुणत, हात पुढे करून “हॅलो” म्हणताच, माझा हात क्षणात त्याच्या हातात कधी गेला मला कळलेच नाही.

कुठला रुसवा आणि फुगवा, माझ्या ‘लटक्या रागातील’ हवाच त्याने आपल्या अस्तित्वाने आणि पतंगाच्या जीवघेण्या नजरेतील ओढीने काढून टाकून, या “शमे” मध्ये एकजीव होण्यासाठी तो सरसावला. आता या “शमे” ला त्या परवान्याला ‘क्षमा’ करून शमेच्या नजरेत विसावा देऊन शांत करण्याशिवाय गत्यंतरच उरले नाही……….

…………(१२)

देवीच्या कृपेने आज यश भेटल्याने मी खुशीत घरी पोहोचले. यशने बेंगलोरवरून आम्हा सर्वांसाठी स्पेशल ‘मैसूरपाक’ची बॉक्सेस आणली होती. मला आवडणाऱ्या गोष्टी याला बरोब्बर कशा कळतात हे एक कोडेच आहे. गेल्या शनिवारच्या कटू आठवणी त्याने दिलेल्या स्वीट बॉक्सने भरून काढल्या. खरंतर त्याची ऑफिसची कामे पूर्ण झाली नव्हती, पण मला भेटायच्या ओढीने कामं ‘ॲडजस्ट’ करून मुद्दाम तो आज सकाळच्या फ्लाईटने आला. माझ्या मनाची तळमळ, भेटीसाठी लागलेली आस, परमेश्वर कृपेने त्याच्यापर्यंत पोहोचली असावी. आजच्या त्याच्या येण्याने माझ्यावरचे त्याच्यापासून दुरावण्याचे संकट टळले होते. मला न कळवता तो बेंगलोरला गेल्याचा राग, खोटा ठरला होता. त्याने खरंतर कल्पनाकडे तसा ‘मेसेज’ दिला होता, पण तिनेच या बाबत मौन धरल्याने, मी उगाच ‘गैरसमज’ करून घेतला असे मला जाणवले. देवीच्या कृपेने, आज जर तो काम ॲडजस्ट करून आलाच नसता, तर विनाकारण आमच्यात आयुष्यभराचा दुरावा निर्माण झाला असता. त्याने हे आज स्पष्ट केले, आणि मनोमन मी त्याची माफी मागितली.

कल्पना, विभा, आणि समाजातील काही व्यक्तींना, आमच्या संबंधाबद्दल विरोध होता हे मला कळत होते. पण माझा नाइलाज होता. आमचे नाते हे जन्मोजन्मीचे असावे याची मला खात्री पटली होती. एखादी व्यक्ती आपली “सोलमेट” असल्याची खात्री दोन व्यक्तींच्या मध्ये असलेल्या अनामिक ओढीनेच प्रत्ययाला येत असते, या दोन जीवांच्या आंतरिक संबंधाची उकल, दोन आत्म्यांची आपापसातील ओळख, ते दोन जीवच समजू शकतात.

“ये है जनम जनम के फेरे”

आता कोणी कितीही विरोध करो, कितीही अडचणी येवोत, आम्ही दोन जीव परस्परांशीवाय राहूच शकत नाही. जीवनाचा फुलोरा फुलण्यासाठी आम्हाला एकमेकांशिवाय आता कोणाची तशी गरजच नाही. आमच्या सहवासाचा सुगंधच आमच्या भावी जीवनासाठी पुरेसा आहे. यशची साथ मिळाली की माझ्या या हल्लीच्या कंटाळवाण्या, निरस जीवनात पुन्हा बहर येईल ह्यात शंकाच नाही……….

…………(१३)

आज १८ जानेवारी, यशचा वाढदिवस. माझा वाढदिवस बरोब्बर १५ दिवसांपूर्वी होऊन गेला. या पंधरवड्यात प्रत्येक दिवस, मी प्रेमाच्या विश्वात, आणि त्याच्याच आठवणीत न्हाऊन निघाले होते. ध्यानी, मनी, स्वप्नी तोच असायचा. मागे मीच त्याच्यावरील माझ्या प्रेमाची कबुली देण्याचे ठरवून समाजात गेले होते, पण भेट झाली नाही, एकार्थाने ते योग्यच झाले असावे. बहुतांशी पुरुषच पुढाकार घेऊन आपले प्रेम व्यक्त करत असतो. पण माझ्या मनाची अवस्थाच थोडी वेगळी असावी. त्याच्या नजरेत, वागण्यात जर प्रेमाची तितकीच ओढ मला दिसत होती, तर मी पुढाकार घेतला तर त्यात काय बिघडणार आहे, असा साधासुधा विचार करून मीच व्यक्त होण्याचे ठरवले होते. आज जर तशीच वेळ आली तर मी स्वतःहून प्रेम व्यक्त करायला मागेपुढे पाहणार नाही. अखेर… “प्यार किया तो डरना क्या”….

पण माझ्यावर ती वेळ आली नाही, त्याला शुभेच्छा देताना त्याच्या हातात माझा हात असताना “यश, तुला बर्थडे गिफ्ट काय देऊ?” या माझ्या प्रश्नाला, त्यानेच माझ्या नजरेतून हृदयाच्या गाभाऱ्यात प्रवेश करीत, मला जवळ ओढीत सनईच्या सुरात म्हणाला, “स्मित, तूच मला सर्वार्थाने गिफ्ट म्हणून हवी आहेस”…..

बस…. त्याच्या नजरेतले ते शब्दातीत भाव, ती जीवघेणी ओढ, हातातून हृदयापर्यंत पोहोचलेले स्पंदन……

शहारलेल्या मनाची एक उन्मादक गोड लकीर, सर्वांगावरील हजारो रोमांचित कळ्यांनी, क्षणात फुलून दरवळलेल्या सुवासात न्हाऊन निघालेले मनाचे पडसाद, माझ्या थरथरत्या ओठातून सरगम छेडीत गुणगुणले “यश, मी सर्वार्थाने तुझीच आहे.”

काळ थांबला असावा……

आता त्याच्याही नजरेत बदल होत होता, का, कसे कोणास ठाऊक, पण हृदयातील प्रेमाचा झरा त्याच्याही नजरेतून पाझरत आमच्या भावनांचा संगम झाला.

कल्पनाने माझ्या दंडाला धरून मला बाजूला घेऊन “काय झाले?” असे प्रश्नातीत मुद्रेने मला विचारताच मी ‘भानावर’ आले. चेहरा पुसत असताना जाणवले, आनंदाच्या अत्यंत उत्कट क्षणी सुद्धा हृदयाला पाझर फुटून, नयनांच्या द्वारे ते आपली वाट मोकळी करत असावेत……….

…………(१४)

बर्थडे पार्टी दणक्यात झाली. यशच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मी ही सुखावले. माझ्यामुळे एखाद्याच्या आयुष्यात आनंद फुलतोय याचं मलाही खरोखरीच बरं वाटलं. दुसऱ्यांना सुख समाधान देण्याची ताकद हीच माणसाजवळ असलेली खरी संपत्ती. कधी, कधी प्रेमाचे दोन शब्दही आपल्याला पुरेसे असतात.

प्रसन्न मनाने मी घरी आले. बरेच दिवसांनी आज शांत चित्ताने झोप येईल अशी आशा वाटत होती, पण कसचे काय, विद्यार्थी दशेतले दिवस आठवले, परीक्षेच्या दिवसात अभ्यासामुळे आणि पेपरच्या टेन्शनमुळे झोप पुरेशी मिळत नसे, तेव्हा वाटायचं परीक्षा संपली की मस्तपैकी ढाराढूर झोप काढायची, पण शेवटचा पेपर मस्त जाऊन सुद्धा, कितीही शांत झोपायचं म्हटलं तरी सुद्धा त्या रात्री झोपच लागायची नाही. काहीशी तीच अवस्था आज माझी झाली होती. यशचा पेपर एकदम सोपा जाऊन, शंभरपैकी शंभर मार्क मिळण्याची खात्री असून सुद्धा मी रिलॅक्स होत नव्हते. त्याचे ते उमदे रूप डोळ्यांपुढून सरकतच नव्हते. माझ्या ‘स्मितहास्यावर’ त्याचे आणि त्याच्या ‘मिश्किल नजरेवर’ माझे मन फिदा होते. आज पार्टीत कोण काय बोलले, काय जोक्स झाले, डिनरला मेनू काय होता, कशाकशातच माझे लक्ष नव्हते, पार्टी मस्त चालली होती माझ्या मनाला आनंदाची रुपेरी झालर होती, तरीही, का कळले नाही पण कल्पनेच्या नाराजीचे गालबोट त्या पार्टीला लागल्याची एक अस्पष्ट जाणीव मला झाली हे मात्र खरं. माझे सगळे चांगले चाललेले असले की दृष्ट लागण्यासारखी अशी एखादी गोष्ट, नेहमीच माझ्या आयुष्यात घडत आली आहे.

आज तरी असे ‘निगेटिव्ह थिंकिंग’ नको, म्हणून ‘यश’च्या आठवणींची मखमली चादर मनावर ओढत, त्याच्याच स्वप्नात रंगायचे ठरवून बऱ्याच दिवसांनी खिडकीतून समोर दिसणाऱ्या माझ्या आवडत्या ‘अनुराधा’ नक्षत्रातील ताऱ्यांची, ‘स्वाती’ नक्षत्रातील ताऱ्यांशी तुलना करत, यशपर्यंत पोहोचायला किती योजने लागतील, या कल्पनेच्या विचारांचे गणित सोडवत यशच्या गोड स्वप्नात शिरले………

…………(१५)

कालचा दिवस उगवताना मनाच्या आकांक्षा फुलवत उजाडला, आणि मनाच्या क्षितिजावर गुलाबी रंगांची उधळण करीत मावळला. रात्र झाली तसा नयनांच्या पुढे भावी आयुष्याची गोड स्वप्ने रंगवत, हृदयाला रिझवत, निशेच्या अद्भुत महालात वास्तव्याला घेऊन गेला. एकंदरीत दिवस मस्तच गेला आणि रात्रही छानच रंगली.

आजही सकाळी प्रसन्न मनाने जागे झाले. शांतादुर्गेचे नामस्मरण करताना, मनाच्या मैदानावर ‘यश’च्या आठवणींची घोडदौड सुरू झाली….. काय कमाल आहे बघा, करायचे होते देवीचे ध्यान, आणि माझे हे “ध्यान” मात्र त्याच्या पायाशी लोळण घेत होते. प्रेमाचे विचार हे हृदयातून मनाच्या आरशात परावर्तित होत असावेत. आपले सर्व जीवन, आचार, विचार या मनाच्या चक्रव्यूहात अडकलेले असावेत. आपण केलेली सर्व कर्मे, मग ती कायिक, वाचिक अथवा मानसिक असोत, या सगळ्यांना आपले हे मनच कारणीभूत आणि साक्षीदारही असते. आपण सर्व जगाला फसवू शकू, पण आपल्या मनाला फसवता येणे शक्यच नाही.

आपण बोललेलं असत्य, केलेला गुन्हा, बाह्य जगापासून लपवणे एकवेळ जमेल पण मनाच्या आरशात त्याची प्रतिबिंबे उमटतात आणि आपल्याला सदैव बेचैन करतात. ‘कॉन्शन्स ऑलवेज बाईट्स’.

आपल्याला हवी असलेली, मनासारखी गोष्ट घडली, की आपण आनंदी होतो, प्रसन्न होतो, मनाला बरं वाटतं, आणि आपण सुखी होतो. या उलट मनाविरुद्ध काहीही घडलं, अपेक्षाभंग झाला की, मन नाराज होऊन आपण दुःखी होतो. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात हे असंच एक मोहाचे जाळं पसरलेले आहे, ज्यात हा मानवी जीव अडकून, त्यातून बाहेर पडण्यासाठी सदैव धडपडत असतो. सुखात त्याला त्यातून बाहेर पडावे असे वाटतच नाही, पण दुःखाचे काटे त्याला रुतायला लागल्यावर मात्र सुटकेसाठी जीवाचा आकांत सुरू होतो. पण ज्याला ‘सच्चिदानंद’ म्हणतात, ज्यात त्याच्या आनंदाला कधीही ओहोटी लागत नाही, जो तसूभरही कमी न होता ‘चिरकाल’ टिकतो तो फक्त परमेश्वराने त्याच्या नामस्मरणातच जपून ठेवला असावा. सुखदुःखाच्या या जाळ्यातून बाहेर पडावं, असं मलाही सदैव वाटतं.

यशला पाहिल्यापासून, त्याच्या मोहात पडल्यापासून, अपेक्षांच्या या लपंडावात माझे मन देवीच्या आराधनेपासून थोडे दुरावत चालल्याची जाणीव मनाला किंचित टोचत होती. एकीकडे “यश”च्या थोडे जवळ जाण्यात ‘यश’ मिळूनही, देवीपासून थोडे दूर तर जात नाही ना, अशी पुसटशी शंकाही मनात घर करत होती.

हे जीवन जगताना, कर्म करत असताना, मनुष्याने परमेश्वराच्या ध्यानात राहूनच फळाची अपेक्षा न धरिताच ते निरपेक्ष बुद्धीने करावे हेच खरं……

“ताई, अजून झोपलीच आहेस का?”….. विभाच्या आवाजाने मी तंद्रीतून जागी झाले………

…………(१६)

विभाने माझ्या उशिरा उठण्यावरून सुद्धा नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली. तसे पाहता मी सकाळी लवकर उठून नेहमी पूजा करून झाली, की विभाला उठवायची. पण आताशा रात्रभर डोळ्याला डोळा लागत नसायचा, त्यामुळे सकाळी उठायला उशीर व्हायचा. तिचा हा सगळा राग माझी तब्येत बिघडू नये म्हणूनच असायचा. यशशी ओळख झाल्यापासून माझ्या मानसिक, आणि शारीरिक अवस्थेतील बदल तिच्या लक्षात येत होते. आपली मनाने खमकी असलेली ताई, सध्या फार हळवी झाल्याची तिला झालेली जाणीव ती बोलून दाखवायची. तसेच माझ्या प्रकृतीतील चढ-उतार बघून ती सर्व दोष ‘यश’च्या माथीच मारीत होती. आमचे हे जवळ येणे, तिला आणि का कुणास ठाऊक कल्पनाला सुद्धा मान्य नव्हते……

मला मात्र त्याच्याशिवाय काहीच करमत नव्हते. आणि आज तो भेटणार म्हणून मन प्रसन्न आणि अधीर झाले होते.

आज भेटता क्षणीच, मला त्याच्याबद्दल इतकी अनामिक ओढ का वाटते, असा प्रश्न त्याच्यापुढे टाकला……

तर त्यावर नेहमीप्रमाणेच मिश्किल हसत, त्यानेच उलटा ‘तोच’ प्रश्न मला विचारला. वर प्रतिप्रश्न हाच की, “तू इतकी सुंदर, सोज्वळ, सालस, आणि तुझ्या प्रेमासाठी इतके चांगले चांगले पुरुष, तुझ्यावर जीव ओवाळून टाकायला तयार असताना, उलट तू माझीच कशी निवड केलीस?”

आपली प्रशंसा केलेली कोणालाही सहसा आवडतेच, स्त्रियांना तर नक्कीच, आणि पुरुषांना तेही नक्कीच ठाऊक असते. आणि त्यात “त्या” फसण्याचीही शक्यता असते. पण मी स्वतःलाही जाणून होते, म्हणूनच त्याने कधी मला फसवू नये म्हणून मीच त्याला म्हणाले, “यश, स्त्रियांवर फिदा होणारे बरेच पुरुष असतात, पण तुझ्यासारखा एखादाच खरा “मर्द” असतो, जो कधीही स्त्रीचा विश्वासघात करून तिला फसवणार नाही. तुझ्याबद्दलचा ‘हा विश्वासच’ मला तुझ्या प्रेमात पार पागल करून गेलाय.”

त्यालाही, मी त्याच्यावरील दाखवलेल्या विश्वासाची जाण असल्याचे, त्याच्या नजरेतील आत्मविश्वासाने मी सुद्धा जाणले.

‘दो दिल एक जान’………

…………(१७)

तसं पाहता यश शी ओळख होऊन दोन ते तीन महिन्याचाच काळ होऊन गेला होता, पण त्याच्या सहवासात, प्रेमात, आणि स्वप्नात, तो जन्मोजन्मीचा माझा जोडीदार असल्याची भावना निर्माण झाली होती. आपल्या आयुष्यात बरेच जण येत असतात, पण काही जणांबद्धलच आपल्याला ओढ वाटते, आपुलकी वाटून आपण त्यांच्या प्रेमात राहावे, सहवासात असावे असे आपल्या मनाला वाटण्यात काही तरी पूर्वजन्मीचे संस्कार असावेत ह्या पक्क्या मताची मी झाले होते. कदाचित ह्या माझ्या मतात,मला असलेलं गूढ गोष्टींचं आकर्षण, त्यावरील पुस्तकांचं खूप वाचनही कारणीभूत असावे. ब्रायन वेस, ह्रोन्डा बर्न, रेमंड मूडी, डोलॉरेस कॅनॉन, दीपक चोप्रा, विद्याधर ओक, एन. डी. श्रीमाळी, ह्या सुप्रसिद्ध लेखकांची बरीच पुस्तके, आणि गीतेची प्रवचने माझ्या वाचनात होती. आपल्या मागील जन्माचे रहस्य, पुनर्जन्म, ह्या विषयां बद्धल मला बरीच ओढ वाटायची. त्यामुळे, मी त्या विषयाची मिळतील ती पुस्तके वाचून काढली होती, ग्रह, तारे नक्षत्र तसेच भविष्य ह्या बद्धलही मनात कुतूहल असायचे, एमिली ब्रॉंते ची ‘वूदरिंग हाईट्स ‘ ही कादंबरी आणि त्यावरील सिनेमा सुद्धा मला फार आवडला होता.
यश बद्धलची ओढ, आणि आकर्षण ह्यांचा काहीतरी संबंध आमच्या गेल्या काही जन्मांशी असावा असं वाटत आलंय.

यशच्या सहवासात सदैव राहावं,असं मलाच नव्हे तर त्याला सुद्धा वाटत असणार,आणि म्हणूनच काहीतरी कारण काढून एकमेकांना भेटण्यासाठी आम्ही उत्सुक असायचो.आमचं हे प्रेम,आमची संगत सदैव राहावी ह्या साठी परमेश्वराकडे माझी प्रार्थना सुद्धा असायची.आम्ही ह्याच जन्मी नाही, तर पुढील मिळणाऱ्या सर्व जन्मात एकमेकांचेच असावे, असं आताशा आम्हाला वाटू लागलं होतं………….

…………(१८)

यश ने वाढदिवसाची पार्टी ‘प्रीतम’ हॉटेल ला दिली,त्या पार्टीतच ‘अतुलनेही’ त्याच्या थोड्याच दिवसानी येणाऱ्या वाढदिवसाला, आम्हाला त्याच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले होते.

अतुल माझा आतेभाऊ, माझी आते ‘केंकरें’ कडे दिली होती, ते “श्री मंगेशा” चे महाजन आणि उपासक, आमची आई सुद्धा पूर्वाश्रमीची ‘रांगणेकर’ आणि ती सुद्धा मंगेशकरच, शक्यतो शेणवी सारस्वतात, शेणवी उपासकांमध्येच लग्न करण्याची परंपरा कायम असते, त्याचा मुख्य उद्धेश हाच की, गोव्याच्या आमच्या कुलदैवतांच्या देवळात, कवळे येथील ‘श्री शांतादुर्गा’, मंगेशीच्या ‘श्री मंगेश’, आणि बांदीवडे येथिल ‘श्री महालक्ष्मी’, ह्या मुख्य देवळांत स्वतःला गाभाऱ्यात बसून अभिषेक, लघुरुद्र, महारुद्र इत्यादी पूजा विनासायास करता याव्यात हाच आहे. पर जातीत विवाह केल्यास, ह्या देवळांमध्ये, गाभाऱ्यात प्रवेश करून स्वतः ला देवांची यथासांग पूजा करण्यास मिळणे वर्ज असते, आणि पुरोहितांच्या द्वारेच पूजा करावि लागते. त्यामुळे शक्यतोवर परजातीतील विवाह टाळले जातात.माझी पहिल्या पासून, “श्री मंगेशाच्या” उपासकाशीच लग्न करण्याची मनोकामना होती, योगायोगाने यश, हा ‘नाडकर्णी’, आणि त्यांचे कुलदैवतही ‘श्रीमंगेश’ असल्यामुळे मी मनोमन शांतादुर्गेची ऋणीच होते.

शांतादुर्गा पार्वती, आणि मंगेश हा शंकर, त्यामुळे लहानपणापासूनच मला वाटायचं की माझ्या लग्नानंतर मला ह्या दोन्ही देवस्थानात गाभाऱ्यात बसुन आम्हा उभयतांना पूजा करण्याचा ‘हक्क’ मिळावा, देवाच्या कृपेने आता यश जीवनात आलाय तेव्हा माझी ती इच्छा भावी आयुष्यात पूर्ण होणार म्हणून मी मनोमन प्रसन्न असायची,परमेश्वर कृपेने आमची जोडी कायम राहावी,एक ‘उत्तम दाम्पत्य’ म्हणून आम्ही नावाजले जावे,यश ने मला कधीही अंतर देऊ नये म्हणून मी सदैव देवीची करुणा भाकायची. आमच्यात लग्नानंतर लगेच देवाची सेवा करायला, पूजाअर्चा करायला गोव्याला जाण्याची प्रथाच आहे,मी सुद्धा यश ला तशी विनंती करणार आहे,तो माझ्या ह्या विनंतीचा नक्कीच स्वीकार करून माझी मनोकामना पूर्ण करेल ह्यात कोणतीच शंका नाही…………

…………(१९)

आज १४ फेब्रुवारी, अतुल चा वाढदिवस, विभा येणार नव्हती, म्हणून कल्पना आणि मी दोघेच अतुल च्या वाढदिवसाला त्याच्या घरी गेलो. ६ वाजे पर्यंत यश आला नाही, तसं मन बेचैन झालं, पण त्यांनी मध्यंतरी मला दिलेल्या त्याच्या ऑफिस च्या फोन नंबर वर, मी तो आज इथे नक्की येणार हे कन्फर्म केल्यामुळे, तो येईलच यात शंका नव्हती.

आज अतुल च्या आग्रहाखातर, यशने ‘संगम’ सिनेमातील ‘मुकेश’ चेच

ओ मेहेबुबा, तेरे दिलके पास ही, है मेरी ….

हे गाणं अतिशय ‘ सुरेल ‘ आणि सुरेख म्हटलं,पण माझ्यावर रोखलेली त्याची नजर आणि चेहेऱ्यावरचे भाव, अतुलच्याही नजरेतून सुटले नाहीत, आणि अतुल च्या नजरेत ह्या वेळी मला ‘नाराजीचा’ सूर दिसून तो “बेसूर” झाल्या सारखा वाटला.

मला हेच कळत नव्हतं की,पहिल्यांदा विभा, मग कल्पा आणि आता अतुल, एकापाठोपाठ एक, एक व्यक्ती माझ्या आणि यश च्या जुळणाऱ्या संबंधावर नाराजी का व्यक्त करतात. माझ्या मते, देवाच्या कृपेने “यश”, इतका सुंदर, सुशील,देखणा, आणि माझ्यासाठी ‘सुटेबल’ असतांना, ह्यांच्या नजरेत नाराजी कश्यासाठी?

काहिहो असो,काहीही होवो, आम्ही दोघे एकमेकांचे होऊच,ह्यात तिळमात्र शंका नाही.

मला कधी एकदा आम्हा दोघांना एकांत मिळून,खूप मनसोक्त गप्पा मारायला मिळतील असं वाटायला लागलं, आणि नेमकं यश च्या नजरेतही,कधी ह्या सर्वांच्या नजरा चुकवून,त्याला माझ्याकडेच मनसोक्त बघायला, बोलायला मिळतंय,अशी त्याची झालेली अवस्था त्याने मला नजरेतून व्यक्त केली. मनाला मनाची खूणगाठ पटली.

आज अतुल च्या सर्कल मधले त्याचे डॉक्टर्स मित्र, मैत्रिणी, सुद्धा पार्टी ला हजर होते. त्यामुळे त्यांच्या मध्ये सुद्धा तो बिझी होता.

निघायची वेळ आली तेव्हा, यश त्याच्या घरी जाताना, वाटेवर मलाही माझ्या घरी ड्रॉप करणार आहे, असं जेव्हा मला समजलं तेव्हा तर मी खूषच झाले.

आज पहिल्यांदाच आम्ही दोघे थोडा वेळ का होईना, एकत्र असणार ह्या कल्पनेने, आणि नेहमी प्रमाणे ‘कल्पना’ आमच्या मध्ये मध्ये लुडबुड करायला नसणार,म्हणूनही मी सुखावले.

“टू इज कंपनी, थ्री इज क्राऊड”

टॅक्सीत त्याने माझा हात हातात घेतला, माझ्या हृदयाची धडधड त्याला हाताच्या कंपना वरून जाणवली असावी, मला धीर देत म्हणाला “रिलॅक्स स्मित” अग अशी घाबरतेस काय, प्लीज, पुढच्या शनिवारी आपण दोघेच बाहेर कुठे भेटूया का?” …….

त्याच्या त्या विनंती वजा आव्हानातून, आणि माझ्यावर रोखलेल्या नजरेतून, माझ्या नजरेला सुटका करून घेण्याची हिम्मतच झाली नाही…. “हो, चालेल” म्हणण्या शिवाय पर्यायच नव्हता……….

…………(२०)

यश नि घराजवळ सोडलं आणि तीच टॅक्सी घेऊन तो पुढे घरी जाणार होता. मी ‘प्लाझा’ सिनेमा जवळ उतरतांना शनिवारी इथेच तो मला ४ वाजता ‘पिकअप’ करेल असं म्हणून निघाला, माझं मन त्याला सोडायला तयारच नव्हतं, खरं तर घर जवळ येत चाललं तसं,त्याच्या बरोबरचा हा प्रवास कधीही संपूच नये असं मला सारखं वाटू लागलं. माहीम पासून दादरचे आमच्या घराचे अंतर फारसे लांब नाही, तरी सुद्धा त्याच्या बरोबर असल्यामुळे, ते एका क्षणात आल्याचा मला भास झाला.असंच होत असावं, आपल्या आवडत्या माणसांबरोबर काळ क्षणात उडून जातो.आणि यश सारखी व्यक्ती प्रवासाला बरोबर असेल तर काळाने थांबावे, प्रवास कधीही संपूच नये असं वाटलं तर त्यात वावगं असं काहीच नाही, शेवटी “नॉट धी डेस्टिनेशन, बट जर्नी म्याटर्स”……

घरी आल्यावर माझा मूड बघून विभा काय समजायचे ते समजलीच. बिछान्यावर पहुडले, त्याच्या आठवणींच्या मयूराने पिसारा फुलवताच, पिसाऱ्यावरील प्रत्येक पिसात, मला मुकुटावर ‘माझ्याच’ रूपाचे मोरपीस धारण केलेली ‘यशचि’ बांसुरी वाजवणारी आणि गालात गोड मिश्किल हसणारी मूर्ती, चहूकडे दिसु लागली. राधेला आपल्या गोड बांसुरी ने वेड लावणारा श्रीकृष्ण, आणि माझ्या डोळ्यांपुढील यश ची मूर्ती काही केल्या हटता हटेना.

पुढील दोन तीन दिवस रोज सकाळी मी नेहमी पेक्षा बरीच उशिरा उठू लागली. उद्याच्या शनिवारी यश ला भेटण्या बद्धल विभाला सांगावे की न सांगावे ह्याच विचारात होते. पण बहुतेक शनिवारी आम्ही समाजात एकत्र जात असू, माझे न येण्याचे कारण तिला सांगावेच लागणार होते. तशात आज ना उद्धया तिला कळणारच. एकदा खोटं बोलले तर पुढे ते लपवायला दहा वेळा खोटं बोलावे लागेलच, आणि माझं जर त्याच्यावर खरे प्रेम आहे, तर मला कोणाची भीती आणि कशाचीच आडकाठी का? ….

सारासार विचार करून तिला “उद्धया मी यश ला भेटायला जाणार आहे, तेव्हा समाजात येऊ शकणार नाही” असे सांगितले मात्र, तिने बरेंच आकांड तांडव केले,माझ्या ढासळणाऱ्या प्रकृती वर लेक्चरही दिले, शेवटी म्हणाली “आई ची शपथ घे ताई” तू त्याला भेटणार नाहीस…….

मी शपथ घेतली नाही,पण आईच्या आठवणींनी मन भरून आलं आणि रडूच कोसळलं, इतकं की ढसढसा रडले, मला काही करून रडू आवरेचना, तिलाही ते जिव्हारी लागलं असावं, दुपारी मी जेवले नाही,संध्याकाळचा चहा सुद्धा घेण्याची इच्छा नव्हती. रात्री तिनेच पुन्हा आईची शप्पथ घालून, मला जेवायला भाग पाडले. कसेबसे दोन घास खाल्ले.

रात्र खायला उठली, झोप येणे शक्यच नव्हते, उद्धया यश ला भेटायला मिळावे म्हणून देवीची प्रार्थना करून, तिच्या नामःस्मरणात कधी ‘पहाट’ झाली, ते कळलंच नाही……….

…………(२१)

आजचा दिवस उगवलाच मुळी ‘कृष्णाच्या’ गोड आणि मोहक चेहेऱ्यावरील आनंदाच्या किरणांनी माझ्या आयुष्यात सुखाच्या सोनेरी क्षणांची उधळण करीत.

रात्र भराची माझी झालेली ‘जल बिन मछली” ची अवस्था, बहुदा विभाच्या लक्षात आली असावी. तिनेच चहाचा कप पुढे केला, गंगा आज उलटी वाहत होती. “ताई तू सदैव सुखी राहाविस, म्हणूनच मी तुला काल इतके बोलले. तू हुशार आहेस, शहाणी आहेस, जो निर्णय घेशील, तो योग्यच घेशील, आणि तो मला मान्य असेल” इतकं पटकन बोलून,माझ्या हातात चहाचा कप देऊन तोंड लपवून ती किचन मध्ये पळाली. तिचे डोळे सुजल्या सारखे दिसले,ती ही बरीच रडली असावी, आणि झोपही पूर्ण झाली नसावी. कालचा दिवस आणि रात्रही बहुदा अमावास्येची होती.

दुपारी ४ वाजता मी ठरलेल्या जागी, ‘प्लाझाच्या मेन गेट’ कडे यायला आणि यश दिसायला एकच गाठ पडली. तो सुद्धा टाइमाचा पक्का असावा. अगोदरच ठरल्याप्रमाणे आम्ही आज ‘फाईव्ह गार्डन्स’ ला आलो. टॅक्सी तच त्याने माझे आभार मानले. वास्तविक मला सुद्धा त्याचा सहवास हवाच होता, मी सुद्धा तत्परतेने त्याचे मनापासून आभार मानले. ह्याच्या आधी कॉलेज मध्ये असतांना आम्ही मैत्रिणी, गप्पा मारायला इथे येत असू, मला कल्पनाची आठवण आली. तिला जर मी यश बरोबर इथे आल्याचं कळलं तर माझी खैर नाही. यश बरोबर असताना ‘कल्पा’ चा विचार मनात येणे, किव्वा तिचा विषय काढणं योग्य नव्हतं. ती माझी जिवलग मैत्रीण असली, तरी त्याची ‘मामेबहिण’ होती हे मी विसरू शकत नव्हती.

आयुष्यात पहिल्यांदाच मी, ही अशी कोणा पुरुषा बरोबर घरा बाहेर पडली होती. पण यश बरोबर असताना मनाला तशी टोचणी नव्हती. यश चा हात आणि त्याची साथ ह्यामुळे मी निर्धास्त होते. का कुणास ठाऊक पण मला त्याच्या बरोबर कुठेही ‘नवखेपण’ जाणवले नाही. आम्ही एकमेकांना डोळे भरून पाहत होतो. तो किती देखणा आहे, हे मला आज जाणवलं, ह्या आधी मी पाहिलेला यश,आणि आत्ताचा “माझा यश” ह्यात नक्कीच अंतर होते. गम्मत बघा, आपलेपणा आला की माणसं अधिक सुंदर दिसू लागतात.एखादी वस्तू, गोष्ट, स्थळं ही पाहाणाऱ्याच्या नजरेवर आणि त्या, त्या, वेळच्या मनस्थितीवर अवलंबून असावि. ‘ब्युटी लाईज इन धी आईज ऑफ बीहोल्डर ‘यश तसा मितभाषी वाटला, माझीच बडबड चालली होती. तो फक्त एकटक माझ्याकडे पाहत होता. एक दोनदा त्याला मान वळवून दुसरी कडे पहा म्हटलं,तरी त्याचं माझ्याकडे बघणं चालूच होतं. त्याच्या अश्या बघण्यानी माझ्या काळजाचा ठोका चुकण्याची शक्यता होती. मीच मग हलकेच त्याच्या भक्कम खांद्यावर विसावली. त्यालाही त्याच्यावरच्या माझ्या ह्या विश्वासाचे अप्रूप वाटले असावे.

माझ्या माने भोवती आपले हात ठेऊन त्याने आधाराला धीर दिला. काळ थांबला असावा…….. मनाला मनाची ओढ जाणवत होती…………

…………(२२)

त्याच्या खांद्यावर विसावून स्वप्नात रंगलेली मी, तंद्री तुन बाहेर आली तेव्हा यश माझ्या कानात काही गुणगुणत मला काही विचारतोय, ह्या झालेल्या भासानेच. वास्तविक तो काही विचारत नव्हता तर माझ्या डोक्यावर, काना भोवतालच्या केसात, वरून, बाजूच्या आंब्याच्या झाडाच्या फांदीवरून पडलेल्या, आणि केसात अडकलेल्या एका ‘मोहोराच्या’ छोट्या डहाळी ला तो हळुवार बोटांनी बाजूला करीत होता. कानाच्या पाकळीला झालेल्या बोटांच्या त्या मखमली स्पर्शानेच बहुदा माझी तंद्री भंग पावली असावी. त्या ‘अनाहूत स्पर्शाने’ मी सुद्धा मोहोरले.पण हा ‘मोहोर’ सुद्धा असाच कधी गळून पडेल काय, अशी पुसटशी शंकाही मनात येऊन गेली. शंका बाजूला ठेवीत मी म्हणाले,
“यश, अरे तू काहीच बोलत नाहीस” ह्या वर तो हसत म्हणाला “स्मित, तुला काही विचारायचंय, बरेच काही प्रश्न आहेत.

पण,ते सर्व तुला विचारायची काहीच गरज नाही, तू हुशार आहेस, शहाणी आहेस, समंजस आहेस, तुझ्याकडे त्या सर्वांची उत्तरेही नक्कीच असतील ह्यात शंका नाही.तेव्हा तूच ओळख बघू” असे म्हणून मिश्किल नजरेने माझ्याकडे पाहतच राहिला. मी काय उत्तर देणार, ‘पुरुषांना’ बरेच प्रश्न पडत असतात, आणि त्या सर्वांची उत्तरे, त्यांना स्त्रियांनी त्यांचे प्रश्न सोडवून द्यायची असतात, हे मला पक्के ठाऊक आहे.आता तो ‘प्रेमाने’ एकटक माझ्या कडे पाहू लागला .त्याच्या नजरेतील ह्या ‘मोहक प्रश्नानि’, माझ्या काळजाचा ठाव घ्यायला सुरुवात करताच, त्याला अपेक्षित उत्तर न देता, मीच त्याला लाडिक स्वरात म्हणाले, “माझ्या राजा, बरेच प्रश्न असे असतात, त्यांची उत्तरे तुला वेळ आली की मी देईनच.तो पर्यंत तुला थोडं थांबावं लागेल”. आता पर्यंत मितभाषी वाटणारा माझा हा ‘राजा’, त्यानंतर प्रेम म्हणजे काय असतं, वैगेरे मला एखाद्या प्रॉफेसर ने, त्याच्या आवडत्या विद्यार्थीनिचा ‘स्पेशल आणि प्रायव्हेट’ क्लास घेऊन समजवावे तसा समजावत होता. फर्स्ट लव्ह, प्युबर्टी लव्ह, ऍडॉल्हेसंट लव्ह, म्याचुअर्ड लव्ह, प्लेटोनिक लव्ह, आणि पर्व्हरटेड लव्ह ह्या सर्वांवर तो उस्फुर्त पणे बोलत होता, मी ते एखाद्या लहान बाळबोध मुलीसारखं ऐकून घेतलं, त्याची ओघवती भाषा,समजावून सांगण्याची पद्धत,मला आवडली, खरं तर, त्याने प्रोफेसर व्हायला हवं होतं. आज त्याने बहुदा माझी ‘शाळाच’ घेण्याचे ठरविले होते. पण शेवटी मला त्याची गम्मत करीत,त्याच्या सारखंच मिश्किल हसत सांगावं लागलं, “माय लॉर्ड” मी सुद्धा M.A. विथ सायकॉलॉजी, असल्यामुळे ‘सिगमंड फ्रॉइड’ पूर्ण वाचला आहे”. त्यावर तो थोडा ओशाळला…….

खरंतर ‘त्याच्याप्रमाणेच’ मला सुद्धा फक्त थिअरीच माहीत आहे…..

पण “खरी सुख दुःख भोगतांना हवा असतो तो मायेचा उबदार स्पर्श, आणि आतून उचंबळून येणाऱ्या भावनांचा उद्वेग”. पुढे प्रत्यक्ष संसारात आणि त्याच्या सहवासात ते कळेलच म्हणा………

…………(२३)

यश बरोबरचे दिवस मस्त मजेत चालले होते. विभा ला जरी माझे त्याच्या बरोबरीचे संबंध पसंत नव्हते, तरी हल्ली ती मला उलटून काही बोलत नसे,कल्पनाला जेव्हा आमच्या संबंधाची कल्पना आली, तेव्हा पासून तिने माझ्याजवळ चे संबंध कमी करायला सुरुवात केली, नाहीतरी हल्ली मी समाजात पण जाणे कमी केले होते, शनिवारी मी समाजात तिच्याबरोबर जात नाही म्हटल्यावर, तिने विभाशी सख्य वाढवून आमच्यातील संबंधाची माहिती मिळवून,समाजात सुध्दा ती सर्वांपुढे त्यावर चर्चा करू लागली, त्यामुळे बरेच नातेवाईक, आणि मित्रमंडळी, हळूहळू दुरावू लागली.जे ओळखीचे लोक होते, ते उलट सुलट बोलू लागले त्याचा विभालाही त्रास होऊ लागला .

यश चे नि माझे फोनवर ह्या संबंधीत बोलणे व्हायचे,मी ‘नाराज’ आहे म्हटल्यावर तो विषय बदलून, इकडच्या तिकडच्या गप्पा मारून माझी गाडी रुळावर आणायचा. “लोकांकडे आपण जास्त लक्ष देऊ नये, त्याचा आपल्यालाच जास्त त्रास होतो” असं सांगून मला लोकांपासून होणाऱ्या त्रासापासून मुक्त व्हायला मदत करायचा.

ह्या शनिवारी आम्ही पवई आणि ‘विहार लेक’ ला गेलो होतो. हा परिसर एकदम रम्य आहे, सगळीकडे हिरवळच हिरवळ, रंगी बेरंगी फुलांची बाग, नारळाची, ताडाची, आणि गुलमोहोराची सुंदर सुंदर झाडे,लेक मध्ये विहरणारी छोटी छोटी बदके, ‘बोटिंग’ च्या नक्षीकाम केलेल्या छोट्या छोट्या होड्या, हे सर्व मनाला खूप आल्हाददायक असं वातावरण बघून यश ला कंठ फुटायचा, आणि मला आवडतात म्हणून जुनी गाणी, त्यातल्यात्यात ‘मुकेश ‘ ची तो गुणगुणायचा.

मला लेकच्या काठी, आमच्या आवडत्या गुलमोहोराच्या झाडाखाली बसून, यश शी आध्यात्मिक चर्चा करायला खूप आवडायचे, त्याला देव,देवतांची तशी फारशी माहिती नव्हती,ह्या उलट आमच्याकडे वडील असे पर्यंत कुलदेवतेची नेहमी पूजा असायची.आजवर शांतादुर्गेची ‘पंचमी’ तर आम्ही नेहमीच उपास करून, पूजा करून पाळतो.यशची आई पूर्वाश्रमीच्या ‘कुलकर्णी’, त्यांचे माहेरचं दैवतही ‘श्री शांतादुर्गा’ च, पण त्या ‘साईबाबांच्या’ भक्त होत्या, त्यामुळे गोव्याला यशचे कुलदैवत श्री मंगेशासाठी सुद्धा जाण येणं होत नसे.

माझे आध्यत्मिक बोलणे तो अगदी मन लावून ऐकायचा, पण त्याच वेळी माझा उजवा हात, आपल्या डाव्या हातावर ठेऊन, माझ्या हाताच्या तळहातावर ‘माझेच’ नांव त्याच्या अनामिकेने कोरायचा प्रयत्न करायचा. अश्यावेळी वास्तविक त्याने त्याचे नांव, माझ्या तळहातावर कोरून मला “यश” मय करावे, असे मला वाटायचे. त्याचे कान माझ्या बोलण्याकडे, नजरेने एकटक माझा चेहेरा न्याहाळत, आणि त्याचवेळी, अनामिकेने माझे नाव हातावर कोरायचा, अशी ‘तीन्ही’ कामे तो एकाच वेळी करायचा, मला त्याच्या ‘कॉन्सनट्रेशन’ चे कौतुक वाटायचे.यश कानात हळुवार गाणं गुणगुणायला लागला की माझेही देहभान हरपायचे आणि आम्ही भविष्याच्या सुखी स्वप्नात रमायचो……….

…………(२४)

गेले दोन तीन दिवस मला बारीकसा ताप होता, थकवा खूप जाणवत होता,म्हणून विभाच्या आग्रहाखातर आमचे फॅमिली डॉक्टर ‘नाबर’ ना भेटलो. त्यांनी तपासून ‘ब्लड टेस्ट’ साठी चिट्ठीही दिली, दुसऱ्या दिवशी त्याचे रिपोर्ट्स ‘लॅब’ परस्पर त्यांना पाठवून देणार होती. त्यांनी दिलेली औषधें,गोळ्या ह्यांनी ताप गेला पण विकनेस होताच, म्हणून ह्या आठवड्यात यश च्या फोन वर त्याला विभाबरोबर खरेदीला जाण्याचे कारण सांगून, पुढील शनिवारी नक्की भेटण्याचे पक्के केले. त्यालाही मला भेटल्याशिवाय करमत नसायचे. तो कदाचित घरी येईल काय? एक क्षण मनात भीती वाटली, पण विभाला तो घरी आलेला बिलकुल आवडत नसे,हे त्याला ठाऊक असल्यामुळे, आणि तसा तो मानी आहे, कोणी काही बोललेलं त्याला खपत नसल्यानें, शक्यतोवर घरी येणार नसल्यामुळे मी थोडी निश्चिन्त झाले.

मी त्याला आता आठ दिवस तरी भेटणार नाही ह्या विचारांनी मला कसेसेच झाले, कधी एकदा बरी होऊन त्याला भेटते असे झाले होते. मध्ये थोडे बरे वाटल्यावर, न राहवून मीच त्याला ऑफिस मध्ये फोन करून त्याच्याशी गप्पा मारल्या, तेव्हा कल्पनाचे लग्न ठरल्याचे कळले आणि मी चाटच पडले. तिने मला काहीच कसे सांगितले नाही ह्याचं वाईट वाटलं. विभाला विचारल्यावर, तिला थोडीफार कल्पना असल्याचे, पण नक्की काही माहीत नसल्याचे ती म्हणाली. काय कमाल आहे, माझी एवढी जिवलग वाटणारी मैत्रीण, पण एवढी महत्वाची बातमी तिने माझ्या कानावर का नाही घातली, ह्याच राहून राहून वाईट वाटलं.
दुसऱ्याच दिवशी ती घरी आली. मी मध्यंतरी ग्रुप मध्ये जाण्याचे बंद केले, तेव्हा त्यांच्या घरी तिच्या साठी चांगले स्थळ आले होते, पण दोनच दिवसांपूर्वी फिक्स झाल्याने तिने कोणाला सांगितले नव्हते.काहीही कारण असो,पण मला ते खटकलेच. थोड्याच दिवसात होणाऱ्या तिच्या लग्नाला, आम्ही आलच पाहिजे असा आग्रह करुन ती गेली.पण मी बहुदा लग्नाला जाईन, असे काही वाटत नाही. माझं दुखावलेले मन त्या निर्णयाला दुजोरा देत होते.

कल्पनाच्या ह्या अश्या वागण्याने आंतर मनावर जास्त दाबाचा, आणि आता बाहेरच्या वातावरणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, एकाएकीं काहींच्या काही उकडायला लागलं, हल्ली कधी, कोण, आणि कसं काय बदलेल सांगता येणं कठीण झालय….

‘वक्त और मौसम बदलनेमे देर नहीं लगती’……

रात्र काही फारशी चांगली गेली नाही. माझं असंच आहे, मनासारखं झालं नाही की मी ‘डिस्टर्ब’ होते.

काल कल्पना येऊन गेल्यापासून, मन गढूळ झाल्यासारखे झाले होते. यश ला भेटायला अजून दोन दिवस शिल्लक होते, यश च्या आठवणींनी मन भरून येत होतं. ह्या दिवसात पाऊस कधीच पडत नाही,पण हल्ली माणसांप्रमाणे, निसर्गाचेही काही खरं नाही, दुपारपासूनच वातावरण ढगाळलेलं होतं. संध्याकाळ झाली तसं बाहेर आभाळ भरून आलं, आणि रिमझिम पावसाला सुरुवात झाली, आणि मनात यश च्या आठवणींच्या सरींनी, गारवा निर्माण झाला. यश सारखाच मलाही पाऊस खूप आवडतो. आमच्या बऱ्याच आवडी निवडी सारख्या आहेत. पावसाने जोर धरला आणि मी त्याच्या ऑफिस मध्ये फोन लावला. तो आज ऑफिस च्या कामा साठी लवकरच निघून गेल्याच कळलं.पावसाने प्रफुल्लीत झालेले मन थोडं हिरमुसलं. बाहेर चक्क वीजही चमकून गेली आणि अंगावर काटा उभा राहिला. अशा ह्या रिमझिम पावसात यश बरोबर किती मजा येईल…..

शरीरावर रोमांच उभे राहिले. मन यश साठी व्याकुळ होऊन त्याला साद घालू लागले………..

…………(२५)

उद्या संध्याकाळी नेहमीप्रमाणे चार ला ठरलेल्या जागी तो मला ‘पिकअप’ करण्याचे आज फोनवर निश्चित झाले. मधला आठवडा भेट झाली नव्हती, त्यामुळे आम्ही उडकधी भेटतो असं दोघांनाही झालं होतं.

‘ऑन डॉट’ आम्ही भेटलो. आज जुहू बीच च्या ‘सी व्युव ‘ हॉटेल ला गेलो, बीचवरच्या ह्या हॉटेल चे ‘लोकेशन’ खूप छान आहे. तेथे बसून संध्याकाळी समोर चा सूर्यास्त बघण्यात एक निराळीच गम्मत आहे. समोर अथांग पसरलेला सागर, मावळतीच्या वेळचे क्षितिज्यावर दिसणारे पिवळसर, तांबूस रंगाचे आकाश आणि खूप मोठ्ठा भासणारा, पण आपल्या पासून दूर दूर परदेशी जाणारा तो सुर्यमित्र. दूर जाणाऱ्या त्या सूर्याला देखील आपल्या सारखेच विरहाचे दुःख होत असेल काय? असा बाळबोध प्रश्न मला लहान पणापासून पडत आला आहे. मावळतीच्या सूर्याला बघताना तो पण विरहाच्या विचाराने नाराज होत असेल,म्हणूनच त्याचे ते तळपणारे तेज शांत होऊन,आपला निरोप घेत असावे. आता समोर अस्ताला जाणारा सूर्य असला तरी माझ्या साथीला यश चा भरभक्कम आधार होता. त्याच्या विशाल छातीवर विसावून, समोर मावळतीच्या सूर्याचे अथांग सागरा वरील दर्शन मला नेहमीच लुभावीत आले आहे. सूर्यास्तानंतर आम्ही हॉटेल च्या पुढील भागातील छोट्या पायऱ्या उतरून बीचवर येऊन हॉटेलच्याच फेंसिंग वॉल ला टेकून बसलो. भरतीला सुरवात झाल्याने समुद्राची गाज मनाला भुरळ घालीत होती. आता शुक्राची चांदणीही हळू हळू प्रकाशत होती. आम्ही गप्पात रंगलो, यश चे बालपण,त्याचे शिक्षण, त्याची पायाने अधू असूनही, आईच्या पशच्यात स्वतः लग्न न करता त्या दोन लहान भावांचे आईच्याच मायेने तिने केलेले संगोपन, ह्यावर यश भर भरून बोलला.

त्याच्या ‘ताई’ बद्धल चा त्याचा आदर बघून आपणही पुढेमागे तिला कधीही अंतर द्यायचे नाही, हे मी मनाशी पक्के केले. यशने चिकाटीने अभ्यास करून आपले शिक्षण पुरे करून, पुढे धाकट्या भावाचेही शिक्षण पूर्ण केले होते. मला त्याचा खूप आदर वाटू लागला. तो तसा मानीही आहे. पटकन चिडतोही, पण सृजनशीलही आहे. माझी निवड योग्यच आहे,ह्याचा किंचित अभिमान आणि त्याचबरोबर देवीची माझ्यावर कृपा आहे, हे सुद्धा मी मनोमन जाणलं. सभोवताली अंधार दाटू लागला तसे आजूबाजुच्या स्टॉल वरचे, हॉटेल्सचे, आणि लॅम्पपोस्ट चे दिवे हळू हळू लागू लागल्याने, ‘आता निघायला हवं’ ह्या जाणिवेने मनाला घेरायाला सुरवात केली. अंगाला झोंबणारा भरतीचा गार वारा, ‘शुक्राच्या’ चांदणीचे मनावर गाजवणारे आधिपत्य, आणि यशचा मोहक, गोड सहवास बंड पुकारत होता. तरीही “आता निघायला हवं” ह्या माझ्या सुचनेवर त्याने दुर्लक्ष करून “भिण्याचं कारण नाही स्मित, मी आहे ना, अंधाराला काय भियायचं” म्हणत, मला आणखीनच जवळ ओढलं.

“नको, निघुया आता”, मी म्हणाले.

ह्या ‘वेड्या पोराला’ मी कसं समजावणार, “की अरे बाबा, मी अंधाराला नाही रे घाबरत, घाबरते ते फक्त ‘तुलाच’, आणि भावी आयुष्याला” त्याने मला धीर देण्यासाठी प्रेमाच्या भरतीत जवळ ओढले असले,तरी माझा स्वतःच्या मनावर ताबा नसल्याने, मी त्या प्रेमाच्या लाटांमध्ये हेलकावत वाहत जाण्याची शक्यता,आणि त्याच्या आकर्षणात आमच्या हातून नको ते घडून, त्यात मी घुसमटून डुबून जाऊ नये, म्हणूनच पुन्हा त्याला निघण्याचा आग्रह करू लागले. आणि उठून निघाले देखील…………

…………(२६)

आयुष्यात माझ्या हातून काही विपरीत घडू नये,माझ्यावर विभाने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ नये, आणि आई बाबांनीं केलेले संस्कार ह्यांना स्मरत, मनाला आणि शरीराला आवरले. हया रमणीय अश्या मनाला अत्यानंद देऊन लुभावणाऱ्या शुक्राच्या चांदणीच्या साक्षीने, आणि मला आवडीच्या ह्या अथांग सागरी किनाऱ्यावर असताना देखील, मी, माझे शरीर आणि मन यश च्या पौरुषी व्यक्तिमत्वावर झोकून न देता, महत्प्रयासाने त्यावर विजय मिळवीत, आणि यश च्या मनाला दुखावण्याचीही शक्यता असूनदेखील, त्या क्षणी तेथून निघण्याचा निर्णय घेऊन उठले. खरंतर मन पण ‘यश ‘वर अविश्वास दाखवायला तयार होईना, तो ही म्हणाला…. “स्मित, इतकं सुंदर वातावरण आणि त्यात तुझा असा गोड सहवास असताना, तू निघण्याची जी घाई करते आहेस, त्यामुळे मनाला बरं वाटत नाही. अगं, आपण एकमेकांचेच तर आहोत, असं असतांना तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही…. एक क्षण थांबून म्हणाला, “तुझा, माझ्यावर विश्वास नाही का?” त्याचे हे शेवटचे “माझ्यावर विश्वास नाही का” हे वाक्य, हा प्रश्न, त्याने ज्या काकूळतीने आणि ज्या खर्ज्यातल्या स्वरात विचारला ते त्याच्या हृदयातून निघालेले शब्द, माझ्या जिव्हारी लागले. माझा त्याच्या व्यक्तिमत्वावर पूर्ण भरोसा आणि विश्वास होता. पण ह्या मोहाच्या क्षणी मनाला आवर घालणेही तितकेच महत्वाचे होते .त्याला वाईट वाटलेले बघून मीच शेवटी त्याला म्हटले “यश, गैरसमज करून घेऊ नकोस, मी तुझीच, आणि तू सुद्धा माझाच आहेस” थांबते मी आणखीन थोडा वेळ, असे म्हणून मीच त्याचा हात हातात घेऊन, आम्ही बीचवर पुढे चालत निघालो. त्याच्या हातातली स्पंदनं,माझ्या हृदयाला जाणवत होती, यश सारखा उमदा, देखणा पुरुष साथीला असतांना कोणती स्त्री त्याच्यावर जीव ओवाळून टाकणार नाही, आम्ही वेड्यासारखे हातात हात घालून एकमेकांना आधार देत किनाऱ्यावर फिरत होतो, वाळूत रुतणारे पाय, आणि पायाला लाटांचा होणारा गार स्पर्श मनालाही हेलकावत होता. यश च्या मनातही बहुदा भावी आयुष्याच्या सुखद संसाराचे आणि आमच्या प्रेमाच्या अतूट बंधनाचेच विचार असावेत. माझ्या कानाला गार वारा झोंबत होता म्हणून मी डोक्यावरुन पदर घेऊन झाकलेल्या कानात,पदर बाजूला सरकवीत तो मुकेश चेच गीत हलकेच गुणगुणला,त्याला माझ्या मनानेही तोच प्रतिसाद देत, प्रेमाची रंगत आणखीनच वाढवली………….

…………(२७)

त्याच्या सानिध्यात रात्रीचे आठ कधी वाजले कळलंच नाही. नेहमी “सातच्या आत घरात” ही आईची शिकवण हल्ली मोडीत निघाली होती. पण आज मात्र घरी पोहोचायला लेटच होणार होता. मी सारखं घडाळ्याकडे बघत होती आणि घरी पोहोचायला बराच उशीर होईल, ही मनाला लागलेली अपराधाची जाणीव माझ्या चेहऱ्यावर पाहून यश ने बरोब्बर ओळखून, “तसा उशिर झालाच आहे, तेव्हा आपण जेऊनच घरी जाऊ” असे मला सजेस्ट केले. विभाने काळजी करायला नको, म्हणून आम्ही पुन्हा त्याच हॉटेल मध्ये जाऊन मी विभाला लगेच फोन करून “आज मी जेऊनच येईन, तू वाट पाहू नको,जेऊन घे, काळजी करू नकोस, थोडा लेटच होईल” असं सांगितलं. विभासुद्धा परचेसिंग करून आत्ताच घरी आली होती. त्यामुळे आता दोघांचे जेवण बनविण्याचा प्रश्नच नव्हता. हॉटेल मध्ये “ॲलन” ने आमचे पुन्हा स्वागत केले, ह्या आमच्या टेबल मॅनेजर ला यश चांगली टीप द्यायचा, त्यामुळे तो खुशीने आम्हाला चांगली सर्व्हिस द्यायचा.

यश ने मेनू कार्ड माझ्या समोर सरकवत “बोला बाईसाहेब, युवर चॉईस” म्हणत नेहमीचे ‘स्माईल’ दिले. खरतर जेवणापेक्षा त्याच्या सहवासानेच माझे पोट भरले होते. आम्ही आमच्या नेहमीच्या टेबल वरच होतो. माझे लक्ष, जेवणाकडे कमी आणि त्याच्याकडे जास्त, आणि समोर चंद्र प्रकाशात मद्धेच चमकणाऱ्या लाटांवरही होते. गार वारा सुटला होता. आता समोर बीच वर तशी वर्दळही कमी झाली होती. शुक्राची चांदणी सुद्धा मावळली होती. यश जवळ असूनही उगाच एक उदासीनतेची लहर मनातून उभारून आली. सगळं चांगलं चाललेलं असतांना हे मध्येच मला असं उदासीन वाटतं, जेवून झालं, पण मी गप्पच होते. यश मिळाला मी भरून पावले होते. त्याचा सहवास कधीच संपू नये, समोरच्या अथांग सागरा पलीकडे दूर दूर, जिथे माझ्यापासून यशला कोणीही हिरावून नेणार नाही, तिथं त्याच्याबरोबर आत्ता जावंसं वाटत होतं. मला असं विचारात हरवलेलं बघून तो ही एकदम गप्प झाला. आता माझ्या खांद्यावर तो विसावला. शांतता खायाला उठली. त्याचा मूड यावा म्हणून मी त्याच्याकडे त्याला आवडणाऱ्या माझ्या ‘स्मित हास्याने’ त्याच्या नजरेत सामावली, “यश प्लीज बोलनारे, असा गप्प नको बसुस”.
“बोलो बोलो कुछ तो बोलो” ………….

…………(२८)

यश घरापर्यंत पोहोचवायला आला. मला सोडून जाण्याचे त्याच्याही जीवावर आले होते. “गुड नाईट”. त्याने ‘विश ‘केल्या प्रमाणे आजची रात्र खरीच चांगली जाणार ह्याची मला खात्री होती. आज त्याला भेटून आली आणि मी एका नवीनच विश्वात रंगले, कधी नव्हते इतका त्याचा सहवास मनाला आणि शरीरालाही लाभला होता. ‘पुरुष’ असूनही तो बराच सभ्यतेने माझ्याशी वागला, त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर मला मोहात पाडून, माझा गैरफायदाही कदाचित घेतला असता.यश च्या आजच्या माझ्याबरोबरच्या वागण्याने माझ्या मनातील त्याचे स्थान आणखीनच उंचावले, माझ्या मनाची तो पुरेपूर काळजी घेतो, मी दुखावली जाऊ नये म्हणून तो आपल्या भावनांना सुद्धा आवर घालत असावा. मला काय आवडते ते त्याला बरोब्बर कळते. असा जोडीदार मला लाभला, हे मी माझे भाग्यच समजते. विभाला मी इतके उशिरा घरी आल्याचे फारसे रुचलेले दिसले नाही “ताई काळजी घे” इतकंच ती मोघमपणे म्हणाली. तिला यश काय चीज आहे हे कसं कळणार म्हणा.त्याच्या बद्धल तिच्या मनात कटुताच जास्त आहे, ह्याची मला पूर्ण खात्री आहे. तो कसा आहे हे तिला समजावण्याच्या फंदात मी कशाला पडू. प्रत्येकाचे स्वतःचे असे मत असते,तिचे त्याच्याबद्धल चे ‘मत परिवर्तन’ करून मी काय मिळवणार होते. मला त्याच्याबद्धल जो विश्वास वाटतो, त्याच्या बद्धल जे प्रेम वाटते,ते थोडंच शब्दात सांगता येण्यासारखे आहे? जाऊं दे, जो तो आपापल्या मताचा .

बिछान्यावर पहुडले,तो सागरी किनारा, ती शुक्राची चांदणी, चंद्राच्या प्रकाशातील त्या भरतीच्या वेळी चमकणाऱ्या लाटा, तो हवेतील अंगाला झोंबणारा वारा, आणि ह्या सर्वांच्या साथीला, यश चा मनाला लुभावणारा गोड सहवास, सुख, सुख म्हणतात ते आणखीन काय असतं. आमच्या ह्या सुखाला कोणाची नजर लागता कामा नये. त्याने मला कधीही अंतर देता कामा नये, तो माझ्यापासून दुरावता कामा नये. आज जे मला त्याच्या बद्धल वाटतंय, नेमकं हेच त्याला माझ्याबद्धलही वाटत असणार ह्यात तिळमात्र शंका नाही. देवीच्या कृपेने मला त्याच्या सहवासाचे ‘यश’ लाभलंय आणि असच ते कायम लाभावे म्हणून मी हात जोडले. आज ‘स्वप्नातही’ तो माझी साथ सोडणार नाही ह्याची मला खात्री आहे. नजरेत त्याचे रूप सामावत मी डोळे मिटले……….

…………(२९)

आज सकाळीच अतुल चा फोन आला होता.मी आंघोळीला गेले होते, विभाशीच तो बोलला ‘डॉक्टर नाबर’ नि त्याला भेटायला बोलावल्याचे त्याने विभाला सांगितल्याचे मला कळल्यावर आणि मी त्याला तसे फोनवर विचारल्यावर तो म्हणाला,तसे काही ‘सीरियस नसावे’, पण गेल्या आठवड्यात केलेल्या माझ्या ‘ब्लडटेस्ट’ च्या संदर्भातच त्यांना अतुलशी काही बोलायचे असेल हे मी ताडले. आता मला जे बरे वाटत आहे, त्याचे खरे श्रेय माझ्या शरीराला नसून, माझ्या यश मध्ये गुंतलेल्या मनालाच द्यावे लागेल.त्याच्या बद्धलच्या विचारांनी, त्याच्या गोड आठवणींनी, आणि सुखद सहवासांनीच सध्या मी मस्त, मजेत, आणि प्रफुल्लित आहे.

कल्पनांचे लग्न पुढील आठवड्यात असल्याने विभाने कालच खरेदी केली होती, माझा लग्नाला जाण्याचा बेत नसल्याचे तिला सांगितल्यावर ती खूपच नाराज झाली, आणि “ताई तुला यावच लागेल,आणि जर तू येणार नसलीस, तर मी सुद्धा नक्कीच लग्नाला जाणार नाही” असं म्हणून तिने मला बुचकळ्यात टाकलं, दुसऱ्या दिवशी यश शी ह्या विषयावर बोलल्यावर तो पण नाराज झाला. त्याची ती मामेबहिण म्हटल्यावर, आणि घरचेच लग्न,तेव्हा त्या सर्वांना जाणं भागच होतं.पण मी आले नाही तर तो सुद्धा जाणार नाही म्हटल्यावर, मला त्याच्या आग्रहाखातर जाणं भाग होतं. मी त्याची विनंती मान्य केली आणि त्याने मनापासून माझे आभार मानले. आणि कल्पना चे लग्न, म्हणजे त्याच्याच बहिणीच्या लग्नाचे, ‘माझ्यासाठी’ परचेसिंग करण्यासाठी त्याच्या बरोबर उद्धया मी यावं अशी गळही घातली. मी बरेच सांगूनही तो ऐकायला तयार नव्हता. माझ्यासाठी त्याला काही ‘विशेष’ खरेदी करायचीच आहे, असा त्याने अठ्ठाहास केला. अखेर मला “ओ के” म्हणणं भाग पडलं. माझ्या होकारावर तो खुशीने म्हणाला “स्मित”आपण दोघे काही आता वेगळे नाहीत, तुझे दुःख ते माझे दुःख,आणि माझे सुख ते तुझे सुख. तुझ्या शिवाय मी अधुराच असेन, तू आहेस म्हणून जीवनात आनंद आहे. जिथे मी तिथे तू असणं महत्वाचं आहे. आणि कल्पनाच्या लग्नात तुझे असणे, सजणे, माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.माझ्या ताईला सुद्धा एकदा तुला भेटायचंच आहे .तुझ्या सारखी सालस, सुशील, सहचारिणी मला लाभली आहे, हे तिला सुद्धा मला दाखवायचे आहे.आणि म्हणूनच उद्या भेटून तुझ्या आणि माझ्या आवडीने काही खरेदी करण्यासाठी नक्की भेटूच…….

त्याला माझ्याबद्धल वाटणारे प्रेम, आणि अभिमान बघून मला भरून आलं, सुदैवाने मला खरा सहचारी, माझा खरा सस्नेही भेटल्याचा, आणि आम्ही “मेड फॉर इच अदर” असल्याचे जाणवलं………

…………(३०)

ठरल्या प्रमाणे मंगळवारी दुपारी थोडे लवकरच, आम्ही माझ्या घराजवळ ‘प्लाझा’ च्या गेट कडेच भेटलो.

आज गणपतीचा दिवस म्हणून खरेदीच्या आधी ‘सिद्धिविनायक’ ला जाऊ या का? विचारताच “हो नक्कीच, जशी आज्ञा बाईसाहेब” म्हणून नेहमीच्या मिश्किल नजरेने, आपल्या काळ्याभोर जाडसर मिशीत हसत, त्याने माझ्या हलक्याश्या ‘स्मित’ वर शिक्कामोर्तब केलं. माझ्या काही लकबी त्याला खूप आवडायच्या, म्हणून मी सुद्धा मुद्धाम, माझ्या काळ्याभोर वेणीला डाव्या खांद्यावरून पुढे छातीवर हलकेच घेत, मुठीत धरून गोल चक्राकार फिरवीत, त्याच्याकडे कुतूहलाने तिरका कटाक्ष टाकीत, उजव्या अनमिकेने “यश तू पक्का लब्बाड आहेस” असं म्हणाली, तेव्हा खळखळत हसून, माझ्या दंडाला धरून त्याने मला टॅक्सीत कोंबली. त्याचा हा खोडकर पणा सुद्धा माझ्या मनाला स्पर्शून गेला.

आम्ही दोघांनी जोडीने सिद्धिविनायकाचे मनःपुर्वक दर्शन घेऊन बाजूच्या साऊथ इंडिअन हॉटेल मध्ये इडली आणि कॉफ़ी घेऊन खरेदी साठी पुन्हा दादरलाच आलो. त्याला मी ‘कल्पनाच्या’ लग्नात मोरपिशी रंगाचा आणि नऊवारीच ‘पिओर सिल्क’ चा शालू नेसावा, अशी जबरदस्त इच्छा होती.आमची पहिली भेट बहुधा त्याच्या मनात घर करून गेली असावी. असे शालू ‘आठवले शहाडे’ ह्यांच्याच कडे मिळतात.हे मला माहिती होतं. गोव्याला शांतादुर्गेला नेसवायला, असेच नऊवारी सिल्क चे शालू माझे बाबा इथूनच खरेदी करायचे. ‘शालू विथ ब्लाउज पीस’ आणि थोडे करचीफस घेऊन, मग मी सुद्धा त्याच्या साठी म्हणून जवळच्याच शॉप मधून ‘सिल्कचाच’ मॅचिंग झब्बा पसंत केला. त्यालाही माझी पसंती आवडल्याची त्याने पावती दिली. त्याला माझ्यासाठी बरेच काही घ्यावयाचे होते, पण मीच थोडी आडकाठी केली.

त्यानंतर वेळ होताच म्हणून आम्ही ‘हँगिंग गार्डन्स’ ला पोहोचलो. ‘म्हातारीचा बूट’ पाहून मला बाबांची प्रकर्षाने आठवण झाली. आणि डोळे पाणावले. लहानपणी मला, विभाला आणि आमच्या बाजूच्या, विभाची मैत्रीण दीपा ला घेऊन बाबा आम्हाला चौपाटी ला भेळ, आणि समोर ‘क्रीम सेन्टर’ ला ‘आईस क्रिम’ खाऊन झाल्यावर हँगिंग गार्डन्स ला वर घेऊन यायचे ‘म्हातारीच्या बुटात आणि बागेत’ आम्ही खूप मजा करायचो. आता आम्ही रेलिंग च्या जवळ बेंचवर बसलो, माझे पाणावलेले डोळे त्याने त्याच्या करचीफ ने पुसले, मी त्याच्या खांद्यावर रिलॅक्स झाले. माझ्या लांबसर वेणीशी आपल्या डाव्या हाताच्या बोटाने त्याने माझ्याच स्टाईल ने चक्राकार फिरवण्याची सुरू केलेली कसरत बघून मला हसूच आले. मी मनमोकळे हसताना बघून त्यालाही खूप बरं वाटल्याचं पाहून मी ही सुखावले. गार्डन वरून समोर खाली चौपाटी वरील रंगी बेरंगी वेषातील माणसे, तो समुद्र, मलबार हिल आणि मरीन ड्राइव्ह च्या दिशेने धावणाऱ्या खेळण्यातल्या वाटणाऱ्या छोट्या छोट्या रंगीत कार्स,आणि येल्लोव ब्लॅक टॅक्सीज, दूरवर दिसणारा नरिमन पॉईंट चा देखावा पाहत, आम्ही आमच्या आयुष्यातील घडलेल्या, मनावर कोरलेल्या गोष्टींच्या आठवणींचा पाढा वाचला .

मी वेणीचा शेपटा सैल करून केस मोकळे केले. हे सर्व करीत असताना यश एकटक माझ्या रूपावर नजर खिळवून होता. माला थोडे अवघडल्यासारखे झाले खरे, पण शेवटी यश माझाच एक हिस्सा बनत चालला होता. “स्मित, यु लुक फंटास्टिक” तो उत्स्फूर्त पणे म्हणाला, माझे लांब केस मोकळे सोडल्यावर, मी आणखीनच खुलून दिसते, ह्याची पावती, विभा, कल्पा ह्यांच्याकडूनही अगोदर मला मिळालेली होतीच. मला खूपच बरं वाटलं. तो लगेच मस्करी करीत म्हणाला “स्मित तुझं हे अलौकिक रूप पाहून असं वाटतंय, आता तू ‘केसांनी’ जरी माझा गळा कापलास तरी मला शिरसावंध्य आहे” असे म्हणून एअर इंडियाच्या महाराजा प्रमाणे, मान तिरकी झुकवत माझ्या कडे पुन्हा त्याच खोडकर नजरेनि पहिले. त्याने मस्करी केली खरं, पण बाजूच्या झाडावर उगाच पाल चुकचुकल्याची जाणीव मला झाली.

“स्मित मी बरोबर आहे म्हणून ठीक, पण अश्या रूपात तू मात्र एकटी कुठे गेलीस, तर कोणीही तुला पळवून नेईल, आणि मग आयुष्यभर मला तुझ्यासाठी रडत बसायला लागेल. अगं ह्या बागेतील कळ्यांना, फुलांना, बहरलेल्या वृक्षांना, ह्या झाडावरील रंगीत पक्षांना आणि ह्या बुलबुल पक्षालाही तुझा हेवा वाटत असेल. आणि म्हणूनच तू मला सोडून, माझ्यापासून कधीही दूर कुठे जाणार तर नाहीस ना?”……..
“तुमसे बिछड़कर चैन कहाँ हम पाएंगे”

त्याचा हात हातात घट्ट धरीत हृदयाच्या स्पंदनांनीच, आणि थरथरत्या ओठांनी, मी माझे ओठ त्याच्या हातावर टेकवून, त्याला “मी तुझीच आहे” ह्याची पूर्ण ग्वाही दिली…………

…………(३१)

कल्पनाचे लग्न दोन दिवसावर आले होते, विभाची तयारी पूर्ण झाली होती. तिने माझ्याही तयारीत हातभार लावला .

आज लग्नाचा मुहूर्त सकाळी अकराचा होता. नंतर जेवण आणि रिसेप्शन. संध्याकाळी चार नंतर आम्ही घरी यायला मोकळे होतो .

यश च्या सांगण्यावरूनच मी नऊवारी शालू नेसले होते. ह्या आधी आमच्या घरी पहिल्यांदाच, तो दिवाळी पाडव्याला आला होता तेव्हा ही, मी अशीच ‘मोरपिशी’ रंगाची साडी नेसली होती.यश ला तो माझा ‘गेटअप’ खूपच आवडला होता आणि त्यावेळी “साक्षात लक्ष्मी” ही मला दिलेली ‘कॉम्प्लिमेंट ‘आजही चांगलीच आठवतेय .आणि आज पुन्हा एकदा लग्नाच्या हॉल मध्ये सर्वांसमक्ष त्याने तेच उदगार काढले. त्याच्या ताईने तर “आज बुधवार आहे, घरी गेल्यावर दृष्ट काढून घे” असा सल्लाही दिला. आज अतुल सकट सगळ्यांच्या नजरा माझ्यावरच होत्या .यशची तर ‘मला कुठे ठेऊ आणि कुठे नको’ अशी अवस्था झाली होती. कल्पना नंतर आता बोहल्यावर चढण्याचा मान बहुतेक माझाच,अशी सर्वांची समजूत झाली होती.

लग्नात यश माझ्याकडे,आणि माझे त्याच्याच कडे लक्ष होते. तो ही बहुदा भावी आयुष्याची स्वप्ने बघत असावा.

कल्पनाच्या ‘सप्तपदीची’जेव्हा वेळ जवळ आली तेव्हा तिने निरोप पाठवून यश ला स्टेजवर बोलावून जवळच्या सोफ्यावर बसवून घेतलं,मला तिने त्याला असं का बोलावून घेतलं, ते कारण समजलं नाही, तो एकटाच तिथे बसून होता, आता यश ने मलाही तेथे बोलावून त्याच्या बाजूला बसण्याची विनंती केली, मला काहीच कळेना, अगोदर कल्पनाने त्याला, आणि आता यश ने मला .

‘लाह्यांहोम’ चालू होता, आम्हाला त्याची धग बरीच जाणवत होती. आज एक मात्र नक्की कळलं, की लाह्यांहोमाची धग, लग्न मंडपात असलो तरी लागते, त्या साठी आपण प्रत्यक्ष लग्न करायलाच पाहिजे असं नाही. आयुष्यात दुसऱ्यांच्या अनुभवावरूनही शहाणं होता येत असावं. कल्पनाची सप्तपदी सुरू झाली, तसं यश माझ्या कानात हलकेच म्हणाला “स्मित, ‘प्रॉमिस मी’ आयुष्यात आपण एकमेकांचे होऊन, एकमेकांसाठीच जगायचे. आणि एकमेकांना कधीही अंतर द्यायचे नाही”.

नेमकं हेच माझ्याही मनात ‘कल्पनेच्या’ सप्तपदीच्याच वेळी आलं. लग्न कल्पनाचे पण यश मात्र ‘बेगानी शादिमे अब्दुल्ला दीवाना’ असल्यासरखा, पण खरंतर माझ्या साठीच ‘दिवाना’ झाला होता .

कल्पना त्यांच्या घरची एकुलती एक, यश तिचा आतेभाऊ, म्हणून कान पिळीचा मान त्याला, आणि मी तिची जिवलग मैत्रीण म्हणून करवलीचा मान मला दिला होता. आम्ही म्याचिंग केल्यामुळे, यश चा आणि माझा जोडा उठून दिसतोय, अशी यश च्या ताईची ‘कॉम्प्लिमेंट ‘सुद्धा माझ्या कानावर आली. कल्पाचा नवरा सुद्धा दिसायला ‘हॅन्डसम’ आहे, हे माझं मत मी कल्पाच्या कानात सांगितलं.

रिसेप्शन नंतर आम्ही घरी जाण्यास निघालो .तेव्हा यश आणि ताई आम्हाला बाहेर सोडण्यासाठी आली होती. विभा टॅक्सी मागवेपर्यंत यशने हातात हात घेऊन “प्लीज डोन्ट लिव्ह मी अलोन” म्हणत, आपल्या भावना, माझ्या मनापर्यंत पोहोचवल्या….

“बाय… सी यु सुन”…. म्हणत मला निरोप घ्यावाच लागला………

…………(३२)

आम्ही दोघी घरी आलो. विभालाही माझे आजचे रूप खूप आवडले होते, “ताई खरोखरीच आज दृष्ट लागण्या इतपत तू झकास दिसत होतीस”. तिचा मूड पण आज मस्त होता. सकाळी लग्नाला जाण्याच्या घाई मुळे देवीचे नामस्मरण आणि पूजा मनासारखी झाली नव्हती, येताना देवीसाठी खास तिरंगी सटावरची वेणी आणली होती. संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी आज मी घरात धूप ही दाखवला. मन प्रसन्न झाले. वातावरणात धूप, अगरबत्तीचा एक छान सुवास दरवळत होता. दिवाळीच्या पाडव्याला यश पहिल्यांदा आमच्या घरी आल्यानंतर जे वातावरण होते, नेमके तेच मी आत्ता अनुभवित होते. दिवाळीचे दिवस नसूनही, आज तो भेटल्यापासूनच मनाचा गाभारा त्याच्याच अस्तित्वाने भरून गेला होता. त्याचे ते देखणं, रुबाबदार रूप, त्याचं अदबशीर आणि सर्वांमध्ये मिळून मिसळून वागणं, मिश्किल हसणं, सर्व मला वेडं करून गेलं होतं. खरोखरीच आजचा दिवस दृष्ट लागण्या सारखाच गेला म्हणायचा. दुपारचे जेवण हेवी झाले होते, त्यामुळे सँडविच आणि कॉफी घेऊनच नंतर मी बिछान्यावर पहुडले.

पहिला पाऊस आणि पहिलं प्रेम दोन्हीही सारखेच मनाला आनंद देतात. तप्त झालेल्या धरतीवर पडलेल्या पहिल्या पावसाने ती शांत, थंड होऊन मातीचा प्रसन्न सुवास दरवळते, तसेच यश ने माझ्या आयुष्यातील त्याच्या प्रथम दर्शनी प्रेमाने, ‘पहिल्या प्रेमाने’ माझ्या मरगळलेल्या, कंटाळवाण्या झालेल्या आयुष्यात पुन्हा एकदा नवीन पालवी फुलवली. त्याचे हे प्रेम मनावर इतकं रुजलय की भावी आयुष्यात त्याचा वटवृक्ष होऊन, त्याची सावली माझ्या उर्वरित आयुष्यावर नक्कीच पसरेल.

“फर्स्ट लव्ह इज धी ओन्ली लव्ह, बाय धी सेकंड, धी हायेस्ट सेन्स ऑफ लव्ह इज ऑलरेडी लॉस्ट”.

प्रेमाचं माणूस जवळ असलं की सर्व काही पावल्या सारखं वाटत. उदासीनता दूर होते. मन सुखाच्या साम्राज्यात स्वैरपणे फेरफटका मारीत असतं, पण तेच आपण एकटे असल्यावर जीवन आपल्यालाच खायला उठतं.एकटेपणा सारखं दुःख कुठलंच नसावं. आपण एकटे पणे केलेला प्रवास आपल्याला किती कंटाळवाणा वाटतो, पण तोच आवडणाऱ्या व्यक्ती बरोबर केला की त्याची रंगत अवर्णनीय होते. असा प्रवास कधी संपूच नये, मग तो जीवन भरचा असेल तर आणखीनच दुधात साखर. आपलं माणूस बरोबर असेल तर स्वर्गसुखच. यश बरोबर असतांना हल्ली, हे सर्व मी अनुभवते आहे. त्यालाही सध्या असेच वाटत असल्याची कबुली त्याने माझ्या खांद्यावर विसावत थोड्याच दिवसापूर्वी मला दिली होती.

“जीना तेरी गलीमें, मरना तेरी गलीमें” ……..

…………(३३)

कालचा दिवस अत्यंत आनंदात गेला……

आज गुरुवार, सकाळी सकाळी अतुल चा फोन आला. डॉक्टर नाबरनी टाटा हॉस्पिटलला ‘डॉक्टर अडवानी’ ह्यांच्या बरोबर उद्या सकाळची अपॉइंटमेंट फिक्स केली होती, त्यामुळे उद्या शुक्रवारी, आम्हाला टाटा हॉस्पिटल ला सकाळी नऊ वाजता जाणं भाग होत. वास्तविक कालच अतुलला हे मला सांगायचे होते. पण लग्नाच्या हॉल मध्ये त्याला मला डिस्टर्ब करायचं नव्हतं. कालचा माझा दिवस त्याने सुखात जाऊ दिला.
माझ्या अंतर्मनाला जे वाटत होतं, बहुदा ‘नियतीने’ त्याचेच संकेत दिले असावे .नाहीतर ‘टाटा हॉस्पिटलमध्ये डाक्टर अडवानिंची अपॉइंटमेंट का?

असु दे, जे काही असेल ते उद्या बघू, म्हणून मी आणि विभाने उद्या सकाळी ‘टाटा’ ला आम्ही परस्पर येतोय, असे अतुल ला सांगितले. त्यावर तो माहीम वरून येऊन, सकाळी आठ वाजता दादरला आम्हाला घरूनच ‘पिकअप’ करतो म्हणाला. आमचे ‘तिघांचे’ जाण्याचे फिक्स झाले…

‘तीन तिगडी काम बिघडी’……

शुक्रवारी ठरल्याप्रमाणे आम्ही डॉक्टरांना भेटलो. हिस्टरी, ब्लड रिपोर्ट्स, आणि संपूर्ण चेकअप नंतर, त्यांनी पुढच्या आठवड्यात “बोन म्यारोव” टेस्ट करून बघूया असा सल्ला दिला.

म्हणजे पुढच्या आठवड्यात पुन्हा ह्या ‘टेस्ट’ करणे मला भाग होते.

संध्याकाळी यश ने पुन्हा फोन केला, बुधवारी लग्नात भेटल्या पासून तो खूपच आनंदात होता, हे कालच्या फोनवरील त्याच्या आवाजावरून मी ताडलेच होते. त्यामुळे काल तशी मी थोडी नर्व्हस असूनही, त्याला ते बिलकुल जाणवू दिले नव्हते. उद्या त्याने सुट्टी घेतली असल्याने, तो सकाळीच भेटून ‘लंच’ त्याच्या अत्यंत आवडत्या अश्या थोड्या महागड्या “हॉटेल खैबर” ला करण्याचा बेत असल्याचे त्याने सांगितले. उद्याचा पूर्ण दिवस आम्ही दोघांनी एकत्र पणे ‘एन्जॉय’ करण्याचा त्याचा इरादा ‘पक्का’ होता. त्याच्या ह्या आनंदावर माझ्या ‘नर्व्हस नेस’ ची छाया मी पडू दिली नाही. मी सुद्धा त्याच्या ‘हो ला हो’ म्हणण्याचे ठरविले. शेवटी ‘आपल्या माणसाचे सुख तेच आपलेही सुख’ असे मानण्याच्या स्त्रियांच्या वृत्तीला मी सुद्धा अपवाद नव्हते.

मंगळवारी टेस्ट करण्याचे फिक्स झाले होते.राहून राहून मला एक प्रश्न सारखा पडत होता. माझे हे असे सर्व काही व्यवस्थित चालू असताना, माझ्या मागे प्रकृतीची ही ब्याद कशासाठी? डॉक्टर ना हिस्टरी मध्ये, माझ्या आईलाही ‘कॅन्सर’ होता, हे कळलेच होते. दोन वर्षांपूर्वी मला थोडा आजार झाला होता पण त्याचे हे कारण नक्कीच नव्हते .

हल्ली मला उगाचच नर्व्हस वाटायचं, विकनेस जाणवायचा, तेव्हा मनात तोच विचार यायचा, पण “ह्रोन्डा बर्न” च्या ‘पॉवर’ आणि ‘सिक्रेट’ ह्या पुस्तकांच्या वाचनानंतर ‘नेगटीव्ह थिंकिंग’ करायचे नाही, असं मी मनाशी पक्के केले होते.आपण जसा विचार करतो तोच विचार ह्या ‘कॉसमॉस’ मध्ये जाऊन, परत आपल्याकडेच पुन्हा येतो. हया ‘लॉ ऑफ ऍटरॅकशन’ मुळे,निगेटिव्ह विचार किव्वा कोणाबद्धलही वाईट विचार करणे,हे सुद्धा आपल्यालाच हानिकारक ठरू शकते, हे कळल्यामुळे “थिंक पॉसिटीव्ह” हेच योग्य. आणि त्याच बरोबर आपल्या नशिबात जे काही आहे,’बरं किव्वा वाईट’ ते आपल्याला भोगावेच लागते.आपले ‘भोग’ किव्वा ‘उपभोग’ हे आपण आपल्या कपाळी घेऊनच येत असतो.ज्याला आपण ‘प्राक्तन’ म्हणतो, ‘विधिलिखित’ म्हणतो, ते आपापल्या कर्माच्या गतीप्रमाणे जन्माला येतानाच घेऊन येतो.ह्या मतांशी मी नेहमीच सहमत होत आले आहे. तेव्हा असे काही भोग भोगणे हे पर्यायाने, माझ्यासाठी सुद्धा चुकणार नव्हते………

…………(३४)

रात्री झोपण्यापूर्वी देवीचे नामस्मरण करतांना लक्षात आले की, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा कोणा नाय कोणाच्या आयुष्याशी संबंध असला पाहिजे. आपले भोग,आणि उपभोग “आपण” भोगत असलो, तरी त्याचा परिणाम आपल्या सख्या संबंधितांवर, आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तींवर होतंच असतो, ह्याचा अर्थ त्यांना सुद्धा थोड्याफार त्याच मानसिक अवस्थांमधून जावे लागत असणार, तेव्हा शक्यतोवर आपल्या मुळे त्यांना त्रास होऊ नये ह्याची काळजी घेणे महत्वाचे ठरते.

सकाळी लवकर उठुनही मला एकदम फ्रेश वाटत होते. मी दुपारी जेवायला घरी नाही, आणि सकाळ पासूनच यश भेटण्याचा, आणि आमच्या आजच्या दिवसाचा कार्यक्रम विभाच्या कानावर घातलाच होता. “ताई, जे काय करशील, ते सांभाळूनच कर” ह्याच्या पलीकडे, ती काही बोलली नाही. आपल्या ताईला, आणखीन मनःस्ताप होणार नाही, ह्याची बहुदा ती काळजी घेत असावी.

सकाळी ब्रेकफास्ट घेऊनच मी निघाले. भेटल्या भेटल्याच, “काय बाईसाहेब? तब्बेत काय म्हणतेय?” असं त्याने विचारलं. आतापर्यंत तब्येती बद्धल, त्याने कधीच काही विचारलं नव्हतं, मग आजच असं त्याच्या तोंडून कसं काय निघावं. कदाचित सहजच त्याने तसं विचारलं असेल, म्हणून मी फक्त “मजेत” असच मोघम उत्तर दिलं. खरतर त्याच्या म्हणण्यानुसार मी त्याची ‘स्वीट लिटिल डॉल’ आणि मला ते आवडायचं, पण मस्करी करायचा मूड असला की मुद्धाम मला आवडत नसूनही, तो मला ‘बाईसाहेब ‘ म्हणायचा. आणि मिश्किल हसायचा.

आम्ही ‘गेट वे ‘ ला ‘लिओपोल्ड कॅफे’ ला आलो. मी नाष्टा करून आले होते, त्याने ब्रेकफास्ट घेतला, मी फक्त माझी आवडती ‘ब्लॅक कॉफी’ घेतली. त्याला मोटर लॉन्च मधून फेरफटका मारायची हौस होती, मलाही समुद्राच्या सानिध्यात नेहमीच उत्साही वाटत आलं आहे. लॉंच मध्ये आम्ही रेलिंग ला धरून वारा खात उभे होतो. बाजूच्या नेव्ही च्या बोटी बघून त्याच्या डोळ्यात एक निराळीच चमक मला दिसली आणि ‘आय.एन.एस. विक्रांत’ जवळ आल्यावर तर त्याने ‘स्यालुटच’ ठोकला, त्याला डॉक्टर आणि मिलिटरी मधील व्यक्तींबद्धल विशेष प्रेम, आणि आदर होता. त्याला खरतर A.F.M.C. ला जायचं होतं, पण ‘इंटर सायन्स’ ला कमी मार्क्स मिळाले म्हणून त्याचा जिवलग मित्र ‘अतुल’ मेडिकल ला गेला, आणि ह्याने B. Sc. नंतर M.Sc. आणि पुढे M.B.A. केले. आज ‘अतुल’ M. S. आहे, ह्याचा यश ला सुद्धा गर्व, आणि अभिमान आहे. आपल्या मिलिटरी बद्धल त्याने मला बरीच काही माहिती दिली. त्याची ‘पर्सन्यालिटी’ सुद्धा, आर्मी ऑफिसर सारखीच वाटते. त्याच्या छातीवर रेलूनच, समुद्रातील हा फेर फटका, आम्ही रिपीट केला. यश च्या सहवासात त्याच्या भरभक्कम विशाल छातीवर विसावण्याचे सुख, शब्दांच्या पलीकडले आहे. कोणत्याही संकटात हा आपले रक्षण करेल, असा आत्मविश्वास दृढावला. लाँच हलत होती म्हणून आधारासाठी मी त्याचा हातही घट्ट पकडला होता, माझा उडणारा पदर सावरण्याची कसरत सुद्धा आपला तोल सांभाळत तो दुसऱ्या हाताने करीत होता. माझ्या अब्रूचे रक्षण करण्याची ताकत त्याच्यात नक्कीच आहे हे मी जाणून होती, त्याचे प्रेम, आणि त्याच्या भावुक नजरेनी मी भारावून गेली.

असा हा नयनरम्य निसर्ग, हा सागर, मला दूरवर दिसणारा ‘मांडावा जेट्टी’ जवळचा ‘चिमणिचा डोंगर’ पाहून लहानपणी सुट्टीत आम्ही आई, बाबांबरोबर अलिबाग ला आमच्या मावशी कडे राहायला जायचो, ते दिवसही आठवले. यशचे प्रेम आयुष्यभर लाभावे हेच आता माझे अंतिम ध्येय होय. मनोमन देवीला तसे साकडेही घातले. “गॉड ब्लेस हीम” ………

…………(३५)

लाँच मधून उतरून आम्ही ‘गेटवे ऑफ इंडियाला’ फेरफटका मारून, चालत चालत बाजूलाच असलेल्या ‘ह्रीदम हाउस’ ला आलो. बरेच दिवस त्याला माझ्या आवडीच्या गाण्याच्या कॅसेट्स मला प्रेझेन्ट द्यायच्या होत्या,म्हणूनच ह्या भागातील त्याच्या अत्यंत आवडीचे जेवणाचे “खैबर रेस्टॉरंट”, उत्तम गाणी खरेदी करण्यासाठी ‘ह्रीदम हाउस’ आणि फिरायला “गेट वे” असा “थ्री इन वन” चा बेत त्याने आखला होता. मुकेश च्या आणि लताच्या काही दुर्मिळ गाण्यांच्या माझ्या आवडीच्या काही कॅसेट्स त्याने खरेदी करून मला गिफ्ट म्हणून दिल्या. माझ्या आवडी निवडी जपण्याची तो नेहमीच खबरदारी घेतो .

नंतर एक वाजण्याच्या सुमारास आम्ही लंच साठी रेस्टॉरंटमध्ये गेलो. ‘मेजनीन फ्लोर’ ला त्याच्या आवडीच्या कॉर्नर च्या टेबल जवळचे, दोघांसाठीचे टेबल त्याने निवडले. ऑफिस ग्रुप बरोबर असताना ह्याच बाजूचे मोठे टेबल तो निवडायचा. त्याला कारण असे की समोरच्या भिंतीवरील M.F. हुसेन ने काढलेल्या पेंटिंग मधील हे पेंटिंग त्याला सर्वात जास्ती आवडायचे. तसेच निवांत गप्पा मारण्याच्या दृष्टीने ह्या टेबलाला तशी ‘प्रायव्हसी ‘ सुद्धा बरी आहे.

त्याने मेनू माझ्या समोर धरून नेहमीच्या मूड मध्ये म्हणाला “बोला बाईसाहेब, आपकी पसंद” काय बोलणार ह्या “वेड्याला” हा बरोबर असतांना “ह्याच्या शिवाय” आणखीन निराळी माझी पसंत असूच शकत नाही . “आप ही तो मेरी पहली और आखरी पसंद हो” मी सुद्धा त्याला त्याच्याच मिश्किल नजरेत, थट्टेने उत्तर दिले……

“मतलब आप मुझेही पुरा खा जाओगी??”…..

आम्ही दोघेही खो खो हसलो. मला आज त्याच्याच आवडीचे खायची इच्छा होती.

प्रत्येक वेळी तो माझ्या आवडी जपण्याच्या मागे असतो. आज त्याला आवडेल ते, त्याच्या पसंतीचे,त्याला बरं वाटेल असं वागायचं आणि तो जे ठरवेल त्याच्या ‘हो ला हो’ म्हणण्याचे ठरविले होते…

“यश तुला इकडची माहिती आहे, आणि तू जे काही मागवशील ते मला सुद्धा नक्कीच आवडेल. तश्या तुझ्या आणि माझ्या बऱ्याच आवडी निवडी सारख्याच आहेत.”….. “जैसी आपकी आज्ञा मेमसाब” आज तो बराच फॉर्मात आला होता. इथे आल्यावर तो बहुदा स्वतःला M. F. समजून उर्दू वजा हिंदी बोलण्याचा प्रयत्न करीत असावा….

त्याने त्याच्या आवडीचे, क्रीम सूप, नंतर माखनवाला पनीर कुरमा, व्हेज जाल फ्रेजी, आणि बटर लच्छा पराठा मागवला. मलाही त्याचा चॉईस फार आवडला, इकडची ‘पनीर कुरमा’ ही डिश फेमस आहे,काजूच्या पेस्ट मध्ये आणि प्युवर क्रीम मध्ये ती बनवली जाते. एकंदरीत प्युअर घी मधले आणि बटर भरपूर लावलेले चमचमीत,असे जिभेचे चोचले पुरवणारे खाद्य पदार्थ खाण्याची त्याची हौस असावी हे मी ताडले. डेझर्ट म्हणून त्याने त्यावर ‘रोज फालुदा विथ आईस क्रीम’ सुद्धा मागवले. आम्ही दोघांनी ते सर्व ‘शेअर’ केले. मी अगोदरच “जास्ती काही मागवू नकोस, तुला बघूनच माझे अर्धे पोट भरले आहे” असं त्याला म्हणाली होती. त्यावर तो नेहमी प्रमाणेच माझ्या नजरेत बघत मिश्किल हसला होता. पण खरच आहे ते, त्याच्या सारखा जोडीदार असेल तर कोणतीही स्त्री सुखी, समाधानी, आनंदी नक्कीच राहू शकेल ह्यात शंकाच नाही. त्या बाबतीत मी नशीबवान ठरली होती. आणि त्याच्या सारखा तोच, हे ही मनोमन जाणलं होत.


“तुम्ही तो मेरी पूजा हो”……

…………(३६)

जेवण बरच हेवी झालं होतं, बरेच दिवसानंतर एखादा चांगला सिनेमा बघण्याचा योग आज नशिबात असावा, म्हणून जवळच धोबीतलाव ला ‘मेट्रो’ मध्ये लागलेला सुचित्रा सेन, आणि संजीव कुमारचा “आँधी” बघायचे ठरले. मला संजीव कुमार, आणि त्याला सुचित्रा सेन, नेहमीच आवडत आली आहे. तेव्हा हाच पिक्चर बघण्याचे फिक्स करून दुपारी तीन च्या शो ची बाल्कनीची तिकिटे काढली. सर्व सिनेमा मी त्याच्या खांद्यावर विसावतच पाहिला. एक गोष्ट माझ्या मनाला खटकली, त्यात नायक आणि नायिका शेवटी भेटत नाहीत. मला ते बरोबर वाटले नाही, माझा मूड बघून यश म्हणाला “अगं वेडे तो सिनेमा आहे, एव्हढं मनावर घ्यायचं काही कारण नाही”. मी थोडी नाराज आहे म्हटल्यावर त्याच्या आवडीच्या चर्चगेट च्या ब्रेबौर्न स्टेडियम जवळील “गेलॉर्ड” मध्ये मला आवडणारी “ब्लॅक कॉफी” घेण्यासाठी मुद्धाम तो मला घेऊन गेला. येथील कॉफी बरीच प्रसिद्ध आहे, ह्या त्याच्या मताशी मी ही त्यानंतर सहमत झाले.

आजचा दिवस आयुष्यातील खूपच महत्वाचा ठरणार अशी चिन्हे दिसू लागली. तो लॉन्च मधील मस्त फेरफटका,मनासारखी गिफ्ट्स, उत्तम जेवण, उत्कृष्ट पिक्चर आणि आता माझ्या आवडीची ब्लॅक कॉफी.

आम्ही आता मोकळ्या हवेतल्या ‘बॅकबे रेक्लमेशन’ ला माझ्या आवडत्या समुद्राच्या सानिध्यात, खडकावर बसून समोरचा सूर्यास्त पाहत होतो. हातात हात,आणि त्याच्या खांद्यावर विसावल्याने मला सर्व जगाचा विसर पडला.मनाच्या विणेवर आज सर्व कसं स्वरात जुळलेल्या मैफिलीसारखं जुळून आलं होतं.

सूर्यास्त झाला आणि आम्ही हातात हात घालून, भावी आयुष्याची स्वप्ने बघत चालत चालत, नरिमन पॉईंट ते चौपाटी बिर्ला क्रीडा केंद्र पर्यंत कधी पोहोचलो काहीच कळले नाही. मधे हिंदू जिमखान्या समोर असतांना. त्याने इथे सुद्धा क्रिकेटच्या म्याचेस खेळल्याचे त्याच्या कडून कळले. कल्पना आणि मी ‘रुईय्या’ कॉलेजची, तो आणि अतुल ‘रुपारेल’ चे, मलाही क्रिकेट आवडते हे कळल्यावर, एके काळी आम्हा दोघांच्या कॉलेजच्या क्रिकेट टिम मधील म्याचेस कश्या रंगायच्या ह्यावर बरीच चर्चा झाली. आमचीच टीम कशी नंबर वन होती.अजित वाडेकर,विलास गोडबोले किती श्रेष्ठ होते, ते यश ला पटवून देताना माझ्या बोलण्या पेक्षा माझ्या हावभावांकडेच त्याचे लक्ष अधिक होते. शेवटी एकदा माझ्या वेणीचा शेपटा फिरवीत, उजव्या अनमिकेने माझा मुद्धा कसा बरोबर आहे, हे सिध्द करत असतांना, मला बरं वाटावं म्हणूनच माझ्या साठी म्हणून त्याने हार पत्करली. माझ्या ह्या लकबी वर तो फिदा असायचा, आणि कधी कधी मुद्धाम माझा एखादा पॉईंट खोडून काढून, माझे हावभाव निरखत, माझ्या ह्या लकबी वर खट्याळ पणाने खूष होऊन हसत सुटायचा.

काल आणि आज मध्ये जमीन आस्मानाचा फरक मला जाणवला. माझ्या आयुष्याच्या काटेरी मार्गावर यश प्रेमाच्या फुलांची उधळण करीत होता. मी मनाने बहरावे, सदैव खूष राहावे, आनंदी राहावे हीच त्यांची इच्छा असायची. माझ्या सुखासाठी काय वाट्टेल ते करायची हीम्मत त्याच्यात आहे, हे मी जाणून आहे. माझ्या चेहेऱ्यावरचे “स्मित” हीच त्याची प्रेरणा शक्ती आहे, असं तो नेहमी मला म्हणायचा. आणि ते टिकाव म्हणून तो माझ्या मनासारखं होईल ह्याची खबरदारी घ्यायचा. भावी संसाराची सुखस्वप्ने पाहत, एकमेकांच्या आधाराने प्रेमाची गीतं गात जीवनाचे अंतिम ध्येय गाठण्याकडे आमची वाटचाल चालू होती………..

…………(३७)

ठरल्या प्रमाणे मंगळवारी आम्ही टाटा हॉस्पिटलमध्ये सकाळी अतुल बरोबर गेलो . माझ्या बऱ्याच टेस्ट घेतल्या गेल्या.सरांना, ब्लड C B C व मला येणाऱ्या बारीक तापावरून, वारंवारच्या थकव्या वरून, आणि हल्ली येणाऱ्या बॉडी रॅश मुळे, “ब्लड कॅन्सर” चा असलेला संशय, आजच्या “री टेस्ट” वरून कन्फर्म करायचा होता. त्यांनी आज स्क्रिनिंग टेस्ट सुद्धा घेतली. रिपोर्ट्स नक्की काय म्हणतायत ते आम्हाला नेक्स्ट वीक ला ‘अडवानी’ सरांना भेटल्यावरच कळणार होते.

मी ‘मेंटली स्ट्रॉंग’ असल्यामुळे अतुल कडून आग्रहाने मी एक एक गोष्ट जाणून घेत होती. अतुल वर माझा पूर्ण विश्वास होता, तसेच खोटं बोललेलं मला बिल्कुल आवडत नाही हे त्याला पक्क ठाऊक होतं. त्यात मी हट्टी, आणि जिद्दी आहे, तेव्हा त्यांनी जरी मला माझ्या आजाराची कल्पना देण्याचे टाळलं, तरी मी ही माहिती मिळविणारच,हे सुद्धा तो जाणून होता. मला माझ्या प्रकृती बद्धल जर खरं सांगण्याची त्याने टाळाटाळ केली तर मी ‘टेस्ट्स आणि ट्रीटमेंट’ सुद्धा सोडून देईन इतपत जिद्दी असल्याने, तो वेळो वेळी मला ‘अपडेट’ करीत होता. वास्तविक त्याच्या ‘प्रोफेशनल एथिक्स’ मद्ये हे बसत नव्हते,तरी नाईलाजाने आणि खरतर त्याच्या माझ्यावरील प्रेमापोटीच त्याला हे सांगावं लागत होतं. आज पर्यंत अतुल मला करीत असलेल्या मदती वरून त्याचा माझ्यावर ‘जीव’ आहे, हे मी पक्के ओळखून होते.

टेस्ट संपवून घरी सोडायला येताना अतुल ने त्याची गाडी शिवाजी पार्क जवळील ‘प्रकाश’ हॉटेल जवळ पार्क केली. भूक तर बरीच लागली होती. पण आज मंगळवार, अतुल चा उपवास, त्यामुळे आज आम्ही दोघी मात्र उपवासाचे पदार्थच गोड मानून घेणार होतो.

मागे ‘मंगळवारीच’ मी यश बरोबर ‘सिद्धिविनायक’ ला जाऊन नंतर त्याने माझ्यासाठी परचेसिंग केले होते. यशच्या आठवणींनी मनाचा ताबा घेतला.

आज ‘यश’ च्या जागी, ‘अतुल’ आमच्या बरोबर होता. पण यश ची अनुपस्थिती मला मात्र खूपच जाणवली. आणि तो आत्ता इथे यावा आणि हॉस्पिटल मध्ये माझ्या मनातील आमच्या भविष्या बद्धल च्या भावनांच्या कोमेजलेल्या नाजूक कळ्यांचे त्याने प्रेमाने फुंकर मारून फुलात रूपांतर करावे.असे प्रकर्षाने वाटलं. तो आज,आत्ता इथे माझ्या सोबत मला हवा हवासा वाटतोय.माझे ढगाळलेलं अंतर्मन तर आज मला आमच्या भावी आयुष्यावर पसरणाऱ्या दुराव्याच्या काळोखाची नांदी देऊन गेलं.आत्ता तो जवळ असता तर त्याच्या प्रेमळ सहवासाने माझ्या अंधारलेल्या मनावर आशेचा प्रकाश पडून मी नक्कीच सुखावले असते.

पुढे मागे माझे काहीही होवो, पण यश वरील माझे प्रेम अबाधित राहिलच. प्रकृती मुळे दुरावा आला तरी मन त्याच्याच विश्वात सदैव रमलेले असेल. त्याच्या सहवासाची ओढ हृदयात निरंतर कायम राहील. मनाच्या आरशातील त्याच्या प्रतिमेला माझ्या मनाने तशी ग्वाही सुद्धा आत्ता दिली. नकळत का होईना मनाच्या तराजुतील ‘अतुल’ आणि ‘यश’ च्या तुलनेत ‘यश चे पारडेच’ झुकले. अतुल माझ्यासाठी एव्हढं काही करतोय, मला जीव लावतोय, पण तरीही ‘यश’ त्याच्या प्रेमात नक्कीच ‘यश’स्वी झालाय. आणि माझ्या मनावर फक्त त्याचेच साम्राज्य राहील ह्यात शंकाच नाही. एकाच व्यक्तीवर दोघांचा ‘जीव’ असू शकतो हे मी जाणंले,एकाला त्याची जाणीव आहे, पण दुसरा अनभिज्ञ…..” एक फूल दो माली”……

यश आज, आत्ता, साथीला हवा होता असा ‘सुप्त मनाचा’ कौल असला तरी ‘जागृत मन’ खंबीर पणे तसं कधीही घडू देणार नाही हा विश्वास होता. त्याला माझ्या ह्या आजाराची पुसटशी कल्पना सुद्धा मला द्यायची नव्हती. लोकं कितीही म्हणोत की पुरुष खंबीर असतात, मनाने कणखर असतात, “मर्द को दर्द नही होता”. तरी यश ला मी जवळून बघितला आहे. तो माझ्या सुखा साठी, माझ्या प्रेमा पोटी किती हळवा होतो, हे मी अनुभवलंय.आणि स्त्रियाच पुरुषांपेक्षा मनानेच नव्हे, तर शरीरानेही खंबीर असतात हे माझं मत आहे………

…………(३८)

लोकं मला हळवी आहे असं समजतात, पण आयुष्याच्या निर्णयाच्या बाबतीत, मनाने आणि बुद्धीने सारासार विचार करण्याच्या क्षमतेने मी तशी खूप “स्ट्रॉंग” आहे. कदाचित देवावरील पूर्ण विश्वास, आणि आध्यात्माची जाण, असल्यामुळे मी शारीरिक समस्यांबाबत बिनधास्त असावी. B. A. ला ‘सायकॉलॉजी’ बरोबर ‘इंग्लिश लिटरेचर’ ला केलेला टेनिसन, शेले, वर्डस्वर्थ, बायरन ह्यांच्या कवितेच्या अभ्यासातून आणि ‘शेक्सपीअर’च्या वाचनावरून आणि एकंदर ‘फिलॉसॉफी’ वरून, मृत्यू बद्धल लोकांच्या मनात असलेली भीती, माझ्या मनातून मात्र पार पळून गेली होती.

“डेथ बी नॉट प्राउड” ह्या कवितेतील फिलॉसॉफी प्रमाणे, “व्हेन वुई आर हिअर, डेथ कॅन नॉट बी, अँड व्हेन डेथ इज देअर वुई कॅन नॉट बी” मग ह्या ‘मृत्यूला’ भ्यायचं कारणच काय? आपण जिवंत असतांना मृत्यू जर येऊच शकत नाही, आणि मुत्यु येईल तेव्हा जर आपण जिवंतच असणार नाही, तर त्या मृत्यूचे भय मी का बाळगू? आणि मृत्यूच्या भीतीने ह्या सुंदर जीवनाला का दुर्मुख करू? तसेच आपले ‘उपभोग’ आणि ‘भोग’ हे सुद्धा जर आपल्याच जन्मोजन्मीतल्या कर्माची कमाई आहे, तर ते आपण ‘आनंदाने’ भोगायला मोकळे असले पाहिजे ह्या मताची मी आहे. आयुष्यात जे काही घडते त्याला आपणच जबाबदार असतो.

हे असे माझे परखड विचार हे जागृत मनाचे असले,तरी सुप्त मनात कुठेतरी भीती सुद्धा दडून राहिली असावी. प्रत्यक्ष जीवन जगताना सुखदुःखाचा विचार होतंच असतो. लोकांबद्धल ची कणव, त्यांच्या मनाचा विचार हा होत असतोच. आज यश चे माझ्यावर अतोनात प्रेम आहे, तरी मी त्याच्यापासून आणि तो माझ्यापासून दुरावेल का? ह्या विचाराने बऱ्याच वेळा मी हळवी होते. एक प्रकारची अनामिक भीती मनाला वाटत राहते. आमच्या आयुष्यात एकटे पण येईल का? ह्या विचाराने मन दिवसेंदिवस क्षीण होत चालले आहे. सुखाचे हे दिवस आणि त्याच्या आठवणीतील त्याच्या गोड स्वप्नाच्या रात्री आयुष्यभर कायम राहाव्यात असेच वाटते. प्रेमाच्या ह्या सुखसागरातील भरतीला कुणाचीही नजर लागत कामा नये. मन एकटे पणाच्या ओहोटीत कधीही गटांगळ्या खाता कामा नये. आज पुन्हा हॉटेल च्या “कॅश काउंटर” वर लावलेल्या ह्या ‘सिद्धिविनायका’ च्या फोटोच्या चरणी माझी हीच प्रार्थना करून, मनाच्या अंधारलेल्या अवस्थेत, आम्ही “प्रकाश” हॉटेल मधून बाहेर पडलो…..

“ॐ गं गणपतये नमः”……

…………(३९)

आम्ही घरी आलो. रिपोर्ट्स काय येणार ते मी माझ्या ‘अतींद्रिय’ शक्ती च्या जोरावर अगोदरच ताडले होते.पण दोन वर्षांपूर्वीचा आजार “तो” नव्हता हे डॉक्टर नाबरांचे म्हणणे आणि अतुल ने त्यांच्या ‘ओपिनियन’ वर मागेच केलेले शिक्कामोर्तब ह्या मुळे गेले वर्षभर मी बिनधास्त होते. पण तरीही मधे मधे उगाचच मला एकटे पणा जाणवायचा, आणि नेमका अश्यावेळी ‘यश’ माझ्या जीवनात आला आणि प्रथम दर्शनीच मी त्याच्या, आणि तो माझ्या प्रेमात, अशी अवस्था झाली आणि माझ्या मनोसाम्राज्याला पुन्हा बहर आला. आता तर आम्ही एकमेकांशिवाय राहूच शकत नाही अशी स्थिती आहे. नशिबात पुढे काय वाढून ठेवलंय ते तो कर्ता करविताच जाणे. संध्याकाळी नेमका यश चा फोन आला. मी मजेत आहे, शनिवारचा ‘हँग ओव्हर’ अजून आहे, हे ऐकून त्याला खूप बरं वाटल्याचं पाहून, मलाही बरं वाटलं. ह्या शनिवारी दुपारी नेहमीप्रमाणे भेटायचं आम्ही नक्की केलं.

दोन दिवस मी त्याने ‘गिफ्ट’ दिलेल्या कॅसेट्स ऐकून त्याच्याच आठवणीत रमून गेले होते. काल रात्री का कुणास ठाऊक, मध्येच जाग आली, सर्व शरीर ठुसठुसत होतं. कोपर आणि गुढगे पण दुखल्याची जाणीव होत होती. खरतरं हा आठवडा मी आरामच केला होता, गेल्या दोन दिवसात मनही प्रसन्न होते, पण रात्री झोप डिस्टर्ब झाली. तरी सकाळी लवकरच उठले. आज तो भेटणार म्हणून मन प्रफुल्लित होते.

तो भेटला आणि सर्वांग फुलून निघालं. त्याच्या स्पर्शातली जादू काही औरच आहे. आज आम्ही ‘जुहू गार्डन’ ला आलो. ह्या बागेत लहान मुलांच्या खेळण्यासाठी सुद्धा खूप सोयी आहेत,खेळण्यासाठी एक छोटे विमानही केलेले आहे. मला माझेही बालपण आठवले. यश मस्करी करण्याच्या ‘मूड’ मध्ये होता. “पुन्हा आपण आपल्या छोटयांना घेऊन इथे वारंवार येणारच, तेव्हा आतापासूनच तयारी करायला हवी” असं म्हणत, तो मला आणखीनच खेटून बसला…. नजरेत भविष्याची स्वप्ने रंगत होती, मन थाऱ्यावर आणण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीत होते. तरीही त्याच्या नजरेत फक्त माझी आणि माझीच प्रतिमा दिसत होती. त्यालाही माझ्या नजरेत फक्त तो आणि तोच दिसत असावा…….
“आंखोंमे मस्ती शराबकी”………….

…………(४०)

गार्डन मध्ये आम्ही लहान मुलांसारखा बर्फाचा रंगीत गोळा मी ‘काला खट्टयाचा’, आणि त्याने ‘ऑरेंजचा’ घेतला.

दोघांनी एकमेकांचे उष्टे खाण्याचा हा लागोपाठचा दुसरा शनिवार होता. “खैबर” मध्ये पहिला घास मी त्याला भरविला होता, त्यातलाच अर्धा त्याने मलाही भरवला होता. मस्करी करीत म्हणाला आता केस सोडलेस तर ‘माता महाकाली’ दिसशील, मी सुध्दा माझी निळी जांभळी जीभ आणखीनच बाहेर काढीत त्याला वेडावून दाखवले.बर्फाचा गोळा फिकट दिसायला लागल्यावर, “भैय्या थोडा और रंग डालोना” म्हणत स्वतःहून त्यातील ‘काला खट्टयाची’ बाटली त्याच्या हातात लहान मुलीच्या हट्टाने दिली. यश पण काही मागे नव्हता, आपली नारिंगी गुलाबी जीभ बाहेर काढून मला वेडावत, त्यानेही फुकट ‘डबल रंग’ त्यावर टाकून घेतला. निघतांना भैयाला उदार अंतःकरणाने ‘पन्नास ची नोट’ द्यायला तो विसरला नाही.

आम्ही आता जुहू बीचवर आमच्या ‘सी व्यूव’ हॉटेल ला आलो. गप्पा मस्त रंगल्या, विषय देवादिकांच्या अस्तित्वाचा,कुलदेवाची महती, पुनर्जन्म, कर्माची गती अश्या माझ्या आवडीचा होता. आमच्या इतकी कुलदेवतांची उपासना त्यांच्याकडे नसायची, पण लग्नानंतर आपण दोघे मिळून गोव्याला जाऊ, आणि नेहमी पूजाअर्चा करू असं वचनही त्याने मला दिलं. माझ्या दृष्टीने जेव्हा पासून त्याने मला “श्री मंगेश, शांतादुर्गेचे” ते हृदयाकृती लॉकेट दिले आणि मी ते आदराने आणि दिमाखात माझ्या गळ्यातील लांब लचक सोन्याच्या चेन मध्ये बसवले होते,तेव्हापासूनच यश ला माझ्या ‘मनोमंदिरात’ स्थान दिले होते. तो ही मला सुखी ठेवण्याचा, आनंदी ठेवण्याचा, सतत प्रयत्न करून एक प्रकारे माझी सेवाच करीत होता. त्याच्या दृष्टीने मी त्याची “देवीचं” होती आणि तो माझा ‘प्रेमपुजारी’ होता.

सूर्याला मावळतीचे वेध लागले होते. दूरवर क्षितिजावर ढगात त्याचा लपंडाव सुरू होता. “कभी धूप कभी छाँव” आयुष्याचही असंच असतं.
मला उगावतीच्या सूर्या पेक्षा मावळतीच्या सूर्याचे जास्त आकर्षण आहे. आजचा दिवस त्याने चांगला घालवल्याने,त्याचे मनापासून आभार मानायला मला नेहमीच आवडते. अश्यावेळी ‘यश’ चाही त्यात सहभाग असतोच.उद्या येतांना त्याने असेच सुख आमच्या साठी घेऊन यावे, ही मनोमन प्रार्थना सुद्धा असतेच. यश च्या खांद्यावर मान रेलाऊन सूर्यास्ताच्या आनंदात, सोबत माझ्या आवडत्या ब्लॅक कॉफी ची रंगत वाढवण्यात, यश च्या सहवासाची किम्मत अनमोल आहे. दूर क्षितिजावर सूर्य आमच्या नजरेच्या पलीकडे उभी असलेल्या, आणि ‘त्याचीच’ आतुरतेने वाट बघणाऱ्या त्याच्या ‘प्रेयसिला’ आलिंगन देण्यासाठी आमच्याकडे पाठ फिरवून निघुन जाताना, आमच्या दोघांच्या नजरेतले भाव त्या गुलाबी रंगात विलीन करुन दिसेनासा झाला………(४१)

…………(४१)

सूर्य आपल्या प्रेयसीच्या आलिंगनासाठी ढगांच्या रथातून पुढे गुलाबी, आणि मागे पिवळसर नारिंगी रंगाची उधळण करीत निघून गेला. अश्या ह्या निसर्गाच्या किमयेचे, आणि अप्रतिम सौंदर्याचे मला वेडच आहे. हा नजारा बघण्याची माझी हौस, लहानपणी आमचे बाबा आम्हा सर्वांना शिवाजी पार्क चौपाटीला घेऊन जायचे, तेव्हा पासूनची आहे. पण आई गेल्यानंतर त्यांच्या जीवनातील बहरचं नाहीसा झाला, आणि आमचे ‘सी शोअर’ वर जाणेच बंद झाले .आता यश मुळे पुन्हा माझी हौस पुरवली जाणार म्हणून मी खूष होते,यश च्या गळ्यात हात घालून, त्याच्या खांद्यावर आणि नजरेतहि आरामात विसावले होते, यश सुद्धा खूप खुशीत होता. कसे काय कोण जाणे पण मला एकाएकी भोवळ आल्या सारखं झालं, आणि काहीच सुचेना, एकदम अशक्त पणा जाणवून, थकवा आल्यासारखं झालं. मी त्याच्यावर कोसळण्याच्या भीतीने, त्याच्या गळ्यातील हात काढून सावरून बसले. किती वेळ गेला कळलेच नाही. जेव्हा जाण आली तेव्हा यश माझ्याकडे एकटक पाहत होता. मी बराच वेळ शून्यात नजर लावून होते, असं तो नंतर म्हणाला.

यश च्या मनात माझ्या प्रकृतीच्या संदर्भात काही वेडे वाकडे विचार येऊ नयेत, म्हणून सूर्यास्त पाहताना ‘आई’ च्या आठवणींनि मला कससच झाल्याचं सांगून वेळ मारून नेली.मात्र मनातून मी फार हादरून गेले होते. काळाने आपल्याला एक एक फटका मारायला सुरुवात केल्याचं जाणवायला लागलं.

माझ्या उतरलेल्या चेहेऱ्यावरचे भाव निरखीत यश ही चूप झाला. मी जरी सावरासावर केली होती, तरी माझ्या चेहेऱ्यावरचे भाव त्याला काही निराळेच सांगत असावे. आपण त्याच्यापासून आपल्या शारीरिक व्याधी लपवतो आहोत ह्याची टोचणी मनाला लागत होती. प्रेमात तो पण पागल झाला आहे, तेव्हा माझ्या व्याधीं कडे तो कानाडोळा सुद्धा करेल, आणि प्रेमापोटी मला तसे सुद्धा स्वीकारेल ह्यात मला बिलकुल शंका नव्हती. पण जरी मी त्याच्या पासून माझे दुखणे लपवित असले, तरी त्याच्या भावी आयुष्याची खोटी फसवणूक मला नक्कीच करायची नव्हती.काळाच्या ओघात आम्ही ‘प्रथम दर्शनीच’ एकमेकांचे झालो होतो, आणि आता एकमेकांचा सहवास आम्हाला हवाहवासा वाटत होता. त्याला दुखवायचा विचार मी अजिबात करूच शकत नव्हते .

पुढच्या आठवड्यात ‘गुरुवारी’ माझ्या तब्येतीच्या ‘रिझल्ट’ चा दिवस उगवणार होता. नियतीने अगोदरच माझा पेपर कठीण ‘सेट’केल्याची मला जाण होतीच, तरीही ‘नशीब’ काही ‘ग्रेस मार्क्स’ देऊन,पास करील का? हे पहायचे बाकी होते. एकीकडे जर मी ह्या परीक्षेत ‘नापास’ झाले, तर माझ्या जगण्याला फारसा काही अर्थ राहणार नव्हता.तसं जगणे म्हणजे ज्योतीने तेला शिवाय तेवण्या सारखे, आणि जरी मी जीवनाचे तेल ओतून प्रेमाची ज्योत तेवत ठेवायची म्हटली तरी यश ला त्यामुळे सुखाचा प्रकाश मिळणे कठीण होऊन जाणार हे मला दिसत होते. अश्या प्रेमात मला सोडाच पण यश लाही सुख लाभणे कठीण जाईल.

प्रेमाच्या वाटेवर अंधक्कार दिसत होता. आणि मन ती वाट अर्ध्यावरच सोडायलाही तयार नव्हते. नियतिने जर पाठ फिरवाली तर यशचा ह्या पुढचा सहवास हे फक्त एक ‘मृगजळच’ ठरेल, आणि माझ मन प्रेमाच्या तहानेने, व्याकुळ झालेल्या मृगा सारखे विरहाच्या वाळवंटात त्याच्या साठी भरकटेल. आता त्याच्या साठी ज्योति प्रमाणे तेवून त्याच्या भावी आयुष्यात आनंदाचा प्रकाश देण्याची मनीषा बाळगणारी मी हतब्बल होऊन प्रेमाचा संसार मला अर्ध्यावरच सोडावा लागेल असे दिसते. नियती माझ्यातल्या प्रेमिकेला असे प्रेमाच्या अर्ध्या वाटेवर खरोखरिच सर्वस्वी लुबाड़ेल का? ह्या सर्व विचारानी माझं मन बेचैन झालं. बधीर अवस्थेत यश च्या भावुक नजरेतल्या अपार प्रेमाचा आणि त्याच्या भरभक्कम बाहुंचा आधार घेत मी कशीबशी उठले. माझ्या गुढघ्यात जोर नव्हता, मांड्यांची हाडे दुखत होती आणि पोटऱ्यात वेग येत होते. यश ला बीच वर आणखीन थोडा वेळ बसायची इच्छा होती. पण माझा फारसा मूड नाही असे दिसताच, त्यानेही घरीच परत जाण्याचा बेत केला…

आख़िर… जाएं तो जाएं कहाँ।………..

…………(४२)

यश घरापर्यंत सोडायला आला होता. तो बरोबर असतांना मनाला हुरूप असतो, शरीर कमजोर वाटत असलं, तरी मन त्यावर कुरघोडी करीत असतंच. आज त्याने माझ्याबरोबर माझ्या घरी राहावं असं मला फार फार वाटत होतं. पण विभाच्या मनात त्याच्या बद्धलची असलेली अढी, ती त्याचा करीत असलेला द्वेष, ह्या मुळे तो विचारच मी झटकून टाकला .रात्र एकटीने काढायला जीवावर आलं होतं, पण नाईलाज होता……

कसेबसे दोन दिवस ढकलले.

काल पासून माझ्या शरीराच्या काही भागांवर, फिक्कट तांबूस ठिपके ही दिसायला लागले होते. एकंदरीत ही सर्व लक्षणं बघून, माझ्या डोक्यात परीक्षेचा पेपर संपायला फक्त दहा मिनिटे शिल्लक राहिली असतांना वाजणाऱ्या “वॉर्निंग बेल” सारखी छातीत धसका देऊन गेली. अजून “कम्पलसरी प्रश्न” सोडवायचा शिल्लक असतानाच “वॉर्निंग बेल’ मुळे मी गोंधळले, माझा पेपर अर्धवटच राहणार होता, त्यामुळे ‘पासिंग मार्क्स’ मीळण्याची सुद्धा खात्री राहिली नाही.

आज मंगळवार त्याचा ऑफिस मधून फोन आला, काल पण त्याने फोन केला होता, असं तो म्हणाला, बहुदा विभाने तो कट केला असावा. मी उत्साहात त्याच्याशी बोलले” शनिवारी बहुदा भेटायला जमेल असं वाटत नाही” असं म्हटल्याने तो हिरमुसला, “कारण नंतर सांगेनच” असं म्हणून त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न केला .

आज गुरुवार, सकाळीच अतुल ने आम्हाला घरूनच ‘पिकअप’ केलं. दहा वाजता “अडवानी सर” आले. त्यांच्या केबिन मध्ये अतुल आणि डॉ.नाबरांचे ‘डिस्कशन’झाले. आणि नंतर “सरांनी” मलाही केबिन मध्ये बोलावले. माझ्या अपेक्षे प्रमाणेच मी “नापास” झाले होते. जेव्हढे डॉ. नाबरांना आणि अतुल ला ‘वाईट’ वाटल्याचं त्यांच्या चेहेऱ्या वर ‘मला’ दिसलं, तेव्हढं बहुदा माझ्या हसऱ्या चेहेऱ्यावर ‘सरांना’ न दिसल्यामुळे असेल कदाचित…..

“यु ऍप्पीयर टू बी अ व्हेरी ब्रेव्ह गर्ल” असं डॉ अडवानी मला म्हणाले. आता मात्र मला माझ्या नशिबाचं हसू आलं.माझी “इनट्युईशन” खरी ठरली होती. दोन वर्षांपूर्वी चा आजार “तो” नाही, असं ‘ओपिनियन’ देणारे अतुल आणि डॉ नाबर चुकीचे ठरल्याचे “सरांच्या” बोलण्यावरून सिद्ध झाले होते.

“कम व्हॉट मे”…. “आय विल फेस इट”…. “विल ह्याव टू”….

“हे माझ्या कर्माचे भोग आहेत….. आनंदाने भोगीन मी”……उगाच नाही ‘डॉ अडवानी’ मला “ब्रेव्ह” म्हणाले.

आम्ही घरी आलो. विभा हबकली होती. अतुल चे पाऊलही घरातून पुन्हा बाहेर पडायला तयार नव्हते. निघतांना अतुल कडून एक ‘प्रॉमिस’ घ्यायला मी विसरले नाही. त्याने सुद्धा,… “ह्याची वाच्यता, मी कधीही ‘यश’ कडे करणार नाही” असं आश्वासन देऊन मला निर्भय करून तो गेला.

यश च्या प्रेमाच्या मोहसागरात मी वाहून चाललेली बघून आणि अध्यात्माच्या किनाऱ्यापासून दूर भरकटत जाऊन भविष्यात संसारात डूबण्याची शक्यता असल्यामुळे, बहुदा माझ्या कुलदेवतेने कृपा करून ह्या ‘असाध्य रोगाचे’ दान माझ्या पदरी टाकले असावे .

मला आपल्या पाया जवळ स्थान देऊन ‘नामस्मरणाचे’ लाईफ जॅकेट माझ्या गळ्यात घालण्याचा माझ्या “शांताई” चा इरादा माझ्या लक्षात आला.संसाराच्या मोहजालाच्या ह्या भोवऱ्यातून लवकरात लवकर बाहेर काढून “तिच्या मायेच्या” सान्निध्यात घेऊन, उर्वरित जीवन नौका सफलतेने मोक्षाच्या पैलतीरी नेऊन मला माझे खरे “गाव” गाठून देण्याची ‘कृपाच’ माझी ‘शांतादुर्गा’ करत असावी. अशी संधी मिळायला सुद्धा भाग्यच लागते………..”

“प्रभू तेरी माया अपरंपार”……….

…………(४३)

आज शनिवार, मी त्याला भेटले नाही आणि तसे त्याला अगोदरच मी कळविले सुद्धा होते. गुरुवारी लागणाऱ्या माझ्या “निकाला” नंतर मी लगेच त्याला भेटू शकेन की नाही ह्याची मला खात्री नव्हती, कारण मी ‘नापास’ होणार ह्याची मला अगोदरच जाणीव होती. आणि शेवटी त्या प्रमाणे गुरुवारी मी ‘नापास’ ही झाले. गुरुवारीच मनात इच्छा झाली होती, हॉस्पिटल मधून तडक फोन करून त्याला बोलावून घ्यावे, आणि सर्व काही खरं, खरं काय ते सांगावे. पण पुन्हा विचार केला की त्याला माझ्या प्रकृती ची खरी व्यथा कळल्यावर त्याच्या मनाची स्थिती काय होईल, तो हे सर्व सत्य पचवू शकेल काय? त्याने माझा डौल पाहिला होता आणि माझ्या ‘स्मितहास्यावर’ तो फिदा होता, आणि ते सतत माझ्या चेहेऱ्यावर दिसावं म्हणून प्रयत्नशील असायचा. ते हास्य थोड्याच दिवसात मावळणार आहे हे कळल्यावर त्याची अवस्था काय होईल. थोड्याच दिवसांची मी सोबती आहे हे जेव्हा त्याच्या लक्षात येईल, तेव्हा तो कोलमडून पडेल. आपल्या स्वप्नांचा असा चुराडा झालेला त्याला सहन होईल काय?…..

असे बरेच प्रश्न मनात आले म्हणूनच ‘अतुल’ कडूनही मी यशला काहीही कळू न देण्याचं वचनही घेतलं होतं. दुपारी त्याचा फोन येऊन गेल्याच आत्ता कळलं आणि मी हळहळले, दुपारी माझा डोळा लागला होता. विभाला मला ‘डिस्टर्ब’ करायचं नव्हतं, म्हणून तिने तो कट केला होता .जरी माझी झोप मोड झाली असती तरी यश चा फोन आहे म्हटल्यावर मी ‘फ्रेश’ नक्कीच झाले असते. पण त्याच्याशी बोलायला मिळाले नाही म्हणून आत्ता मात्र मी नक्कीच ‘डिस्टर्ब’ झाले. त्याची जबरदस्त आठवण झाली आणि त्याचाच पुन्हा फोन आला.

“शंभर वर्षे आयुष्य आहे” मी म्हटलं. त्यावर, “स्मित तू जर शंभर वर्षे जगणार असशील तरच मला शंभर चालतील, नाहीतर जेवढी वर्षे तू जगशील, तेव्हढीच मला खूप झाली. तुझ्यानंतर एकही दिवस जगायची माझी नक्कीच इच्छा नाही”……….

माझ्या डोळ्यात चटकन पाणी उभं राहिलं. माझ्या प्रकृतीबद्धल मी त्याला काहीही सांगणार नाही, हे एकार्थाने चांगलच आहे. तो मनाने हळवा आहे, हे मी जाणलं होतं. आम्ही बराच वेळ बोलत होतो.”आज का भेटणार नव्हतीस?”… हा प्रश्न त्याच्याकडून नक्कीच अपेक्षित होता.त्यावर “अरे आज मला येता येण्या सारखं नव्हतं,… तुला समजलं का…काय ते?” ….. “ओह, इट्स ओ के” तो म्हणाला आणि मी सुटले. ‘बायकांचा प्रॉब्लेम’ असेल असा गोड गैरसमज बहुदा त्याने करून घेतला असावा…. आणि हेच तो समजला असावा.

“पुढच्या शनिवारी मात्र नक्कीच भेटायचं” ह्या आशेवर तो होता.
आज शुक्रवार, मधे मंगळवारी त्याने पुन्हा फोन केलेला मला विभाने ‘आजच’ सांगितले .

गेले दोन, तीन दिवस मला तसे बरे नव्हते अंगात बारीक ताप होता. “सरांनी” रेकमेंड केलेली ट्रीटमेंट डॉ नाबर देतच होते. विभाच्या म्हणण्याप्रमाणे मी आता यश ला भेटूच नये. पण मला त्याला असा वाऱ्यावर सोडणे योग्य वाटत नव्हतं.

आज त्याचा आलेला फोन, तिने माझ्या पुढ्यातच कट केला, तशी मी नाराज झाले, आणि तिच्यावर रागावून पुन्हा त्याला फोन केला. आणि काहीच घडले नाही असे दाखवीत त्याला भेटायचंच होतं, म्हणून उद्या भेटायचं ‘फिक्स’ केलं….

आज सकाळ पासून मला बरं वाटत होतं, त्याला भेटायचं म्हणून खूष सुद्धा होते. आज ‘विहारलेक’ ला मला निसर्गाच्या समवेत आवडतं म्हणून तो इथे मुद्दाम घेऊन आला होता. ‘नेहमीचा गुलमोहर’, समोरचे विहंगम दृष्य, आणि त्याची साथ, मी माझ सर्व दुःख विसरून त्याच्या नजरेत विरून गेले. त्याच्या भरभक्कम आधारावर मनाची वेल विसावली आणि फुलू लागली. समोरचा तलाव आणि हलक्याश्या वाऱ्याच्या झुळकेने उठणारे ते तरंग, मनाच्या जलतरंगावर हलकेच आपल्या नाजूक बोटांनी सप्तसुरांची सरगम छेडत होते. ते मोठाले वृक्ष आणि त्यामधून दिसणारे आकाशातील ढगांचे विविध आकार, दूरवरचे पहाड आणि मावळतीच्या किरणांची त्यांच्यावर पसरलेली सोनेरी झालर. ही बहरलेली गुलमोहोराची झाडे, हा सुंदर फुलांनी नटलेला बगीचा, हिरवागार मखमली निसर्गाचा गालिचा, आणि यश चा प्रेमळ सहवास. मध्येच गुलमोहोराच्या नारिंगीपिवळसर फुलांचा वाऱ्याबरोबर होणारा आमच्या वरील शिडकाव आम्हाला भर भरून आनंदाने न्हाऊ घालीत होता. शारीरिक व्याधींना हलकेच जमिनीवर सोडून प्रफुल्ल मनाच्या पंखानी अवकाशात झेप घेतली. आत्मसुखाचा हा जाणिवेतून नेणिवेत नेणारा अनुभव, आपल्या व्याधी, आपली दुःख किती क्षुल्लक असतात ह्याची प्रचिती देऊन गेला ……….

…………(४४)

त्याच्या सहवासाचे सुख मी उपभोगत होते. पण मी चुपचाप होते, तेव्हा नानाप्रकारे त्याचे कारण, तो मला विचारत राहिला. सदैव त्याला भेटायला उत्सुक असलेली मी मध्यंतरी न भेटल्याने त्याला टाळतेय, हे बहुदा त्याच्या लक्षात आले असावे. माझा मूड परत यावा म्हणून त्याने विषयाची गाडी अध्यात्मावर नेली. मी शांतच होते, हीच वेळ होती, त्याच्या पासून हळू हळू मला दूर नेण्याची. त्याची प्रतिक्रिया आजमावण्यासाठी मी त्याला विचारले “यश समजा मी तुझ्यापासून दूर गेले. तुला भेटलेच नाही, तर तू काय करशील?”………

थोडा वेळ तो काहीच बोलला नाही, त्याचे डोळे पाणावले ……

“नाही स्मित, तू अस काहीच करणार नाहीस, तुझ्या शिवाय मी, आणि माझ्या शिवाय तू राहूच शकणार नाहीस आणि तुझ्या शिवाय मी जगूच शकणार नाही” असे म्हणून त्याने मला त्याच्या कवेत ओढले, माझाही धीर खचला, मला रडू आवरेच ना.

त्याचं जीवन किती रुक्ष होईल, आणि दुराव्याच्या वाळवंटात माझ्या साठी तो वणवण भटकून माझा शोध घेत, माझ्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत राहील, हे सर्व ऐकून माझा जीव कासावीस झाला. पण असं हे त्याला भेटत राहणं, त्याच्या पासून माझी व्यथा लपवत राहणं आणि नंतर खरोखरीच त्याला विरह सहन झाला नाही तर त्याला वेडं करून सोडणं, ह्या पेक्षा आत्ताच त्याच्या पासून हळू हळू दूर व्हावं, हेच योग्य होतं. माझे दुखणे, माझ्या जीवनाची झालेली परखड, माझी स्वप्ने, आणि त्याच्याही डोळ्यासमोर आमच्या भावी आयुष्याची रंगवलेली स्वप्ने, भंग पावणार ह्या कल्पनेनेच मी ढसढसा रडू लागली, आयुष्यावर पसरलेल्या ह्या संध्या समयी च्या अंधक्काराला आता कोण रोखणार. भावी जीवनातील सुग्रास भोजनात नियतींनी माझ्या आजाराच्या मिठाचा भला मोठा खडा टाकून कर्माच्या सर्व स्वयंपाकावर पाणी फिरवलं. आम्ही पाहिलेली पहाटेची गोड स्वप्ने ह्या संध्यासमयीच्या अंधकारात आमच्या अश्रूं मध्येच विरून गेली………

…………(४५)

आमच्या दोघांच्या भविष्याची बघितलेली स्वप्ने फोल ठरवत ‘नियतीने’ मला त्याच्या पासून दूर जाण्यासाठी प्रवृत्त केले. त्याच्या सानिध्यात पुढे आणखीन काही काळ राहून त्याच्या माझ्याबद्धलच्या आणि आमच्या भावी संसाराच्या अपेक्षा वाढविण्यात काहीच अर्थ नव्हता. तो माझ्या विरहात होरपळला जाईल ह्याची मला जाणीव आहे, पण काळ हेच त्यावर गुणकारी औषध आहे. माझा सहवास कमी झाल्याने हळू हळू तो मला विसरून जाईल. पुढे त्याचं माझ्यापेक्षा चांगल्या मुलीशी लग्न होऊन ‘बिचारा’ सुखी तरी होईल. माझ्या ह्या डगमगणाऱ्या जीवन नौकेत त्याला तोल सावरणे कठीणच आहे. ही नांव कधी डूबेल ह्याची कोणालाच काही कल्पना नाही. त्यात त्याला स्थान देऊन माझ्याबरोबर त्याच्याही जीवनाची हानी करण्यात काय अर्थ? माझी दिवसेंदिवस खालावणारी प्रकृती, निस्तेज होत जाणारा चेहेरा, माझे “स्मितहास्य” ज्यावरच तो फिदा होऊन माझा झाला होता, तेच दिवसेंदिवस लोप पाऊन नाहीसे झाल्यावर त्याने कोणाकडे पाहावे. हळू हळू त्यामुळे त्याच्या आत्ताच्या हसतमुख, खेळकर व्यक्तिमत्वात बदल होऊन तो कदाचित चिडखोर सुद्धा होईल आणि ह्या सर्वांना जबाबदार मीच ठरू शकते. माझ्या ढासळणाऱ्या प्रकृती मुळे त्याच्यातील ‘पुरुषाला’ समाधान ते कितीसे मिळेल. पुरुष्यांनी कितीही नाही म्हटलं तरी जवानीतील त्यांचे प्रेम हे “पॅशनेट लव्ह” मध्येच मोडते. ज्यात शारीरिक आसक्ती असणे नैसर्गिकच आहे. निसर्गाची तशी किमयाच आहे.कालांतराने ते “प्लेटॉनिक लव्ह” होईलही.पण माझ्या ह्या अश्या अवस्थेत, मी त्याला कितपत सुखी करू शकणार आहे. आणि मग असा हा संसार कितपत टिकेल. नर, मादी चे हे नैसर्गिक नातं मला ह्या परिस्थितीत सांभाळता येणं शक्यच नाही…

एक वेळ हीच परिस्तिथी उलट असती, एका “स्त्री” वर अशी वेळ आली असती, तर त्या पुरुषाला, तिने तिच्यातील नैसर्गिक “आईच्या मायेने” सांभाळून घेऊन, त्याच प्रेमाने संसार केलाही असता. पण इथे काळाने माझ्यावरच घाला घातल्याने, यश सारखा इतका सुंदर सुशील माणूस माझ्यामुळे उध्वस्त होईल, ह्या भीतीपोटीच, मी त्याच्यापासून आत्ताच दूर जाण्याचा माझा निर्णय पक्का केलाय.

ह्यात बिचाऱ्या यश चा काहीही दोष नाही, परिस्थितीच अशी नियतीने निर्माण केलीय, त्यात एकमेकांवर प्रेम करून आम्ही दोघेही बरबाद होण्याच्या मार्गावर आहोत. माझं मन त्याच्यावर आलं, आणि प्रेम झालं, प्रेम थोडंच ठरवून कोणावर करता येतं. ह्या प्रेमाच्या आगीत मी तर संपूर्ण होरपळून जाणार आहे निदान यश तरी वाचवा हीच अपेक्षा ………
“खुश रहे तू सदा ये दुआ है मेरी”।……….

…………(४६)

मंगळवारी त्याचा फोन आला, त्याचे दोन दिवस खूप खराब गेले होते हे कळल्यावर वाईट वाटलं. काही करून शनिवारी भेटुयाच असा त्याचा आग्रह होता. “अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय आणि मला एक ‘सरप्राइज’ द्यायचं आहे”… म्हणाला. मी त्याला शुक्रवारी काय ते सांगते असं म्हणाली. खरतर मला सध्या त्याला दूर ठेवायचे होते.

मी वेळ मिळेल तेव्हा देवीची आराधना, अध्यात्मिक वाचन, वैगेरे सुरू केले होते, त्याच्या आठवणींना गुंगारा देऊन त्यांच्या तावडीतून सुटण्याचा तोच एक मार्ग डोळ्यापुढे होता. ह्यापुढे त्याला टाळायचे असेल तर मुंबई सोडून दूर दूर कोठेतरी जावे असे मनात होते.

शुक्रवारी ऑफिस मधून त्याने फोन केला. माझे मन ही त्याच्या ‘विनंतीचा’ अव्हेर करायला तयार झाले नाही.

नेहमी प्रमाणे प्लाझा च्या गेट वर ठरलेल्या वेळीच तो आला आणि आम्ही नेहमीच्या ‘सी व्ह्यु’ मध्येच गेलो.माझ्या आवडीची ब्लॅक कॉफी ची, आणि त्याच्या साठी स्वीट लाईम सोड्याची ऑर्डर ‘ॲलन’ ने घेतली.

माझ्या आवडीचा विषय म्हणून अध्यात्मिक विषयावर चे ‘ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी’ आणि ‘साद देती हिमशिखरे’ ही दोन पुस्तके त्यांनी मी खूष होऊन मूड मध्ये यावी, म्हणून माझ्यासाठी “गिफ्ट” म्हणून दिली. मला ही पुस्तके हवी होतीच. जरा बरं वाटलं. “तुला, महत्वाचे काही सांगायचं होतं ना?”

ह्या माझ्या प्रश्ना वर… “आपण मे महिन्याच्या अखेरीस लग्न करणार आहोत. त्यानंतर घरची पूजा झाल्यावर, लगेच गोव्याला, कुलदेवतेच्या दर्शनासाठी जाण्याचा बेत आहे. तिथून हनिमून साठी केरळ” वैगेरे, वैगेरे तो बरंच काही सांगत होता. मी पुस्तकं चाळतेय असं त्याला भासवीत होते, ते त्याला आवडलं नाही. माझ्या मना विरुद्धच, पण त्याच्याकडे माझं फारसं लक्ष नाही, अस मी मुद्धाम दाखवण्याचा प्रयत्न करीत होते.

तो खूपच ‘नर्व्हस’ झाला. माझे हे असे वागणे त्याला अपेक्षित नव्हते. पण माझा नाईलाज होता, त्याच्या मनातून मी हळू, हळू उतरावे, ह्या कडेच माझा कल होता.माझ्या ‘सुप्त मनाला’ ह्या माझ्या वागण्याची लाज वाटत होती. एखाद्या लहान मुलांनी महत्प्रयासाने वाळूवर पत्त्यांचा बंगला बांधावा आणि अनपेक्षित पणे आलेल्या वाऱ्याने तो जमीनदोस्त करावा, तसं काहीसं माझ चाललं होतं. त्याच्या चेहेऱ्यावरचे ते भाव माझ्या काळजाचा ठाव घेत होते. त्याच्या नजरेला नजर देण्याची हिम्मत माझ्यात नव्हती. त्याची नजर चुकवीत मावळत्या सूर्याला उगाचच साक्षीदार ठेवीत आणि माझ्या मनावर दगड ठेवीत, “यश, व्हेरी सॉरी, पण माझा नाईलाज आहे” असे म्हणून तोंड फिरविले. तो अवाक होऊन पाहतच राहिला आणि अपेक्षा भंगाच्या धक्क्यात आधारासाठी थरथरत्या हाताने माझा हात त्याने हातात घेतला. आता पर्यंत आवरून धरलेल्या आमच्या भावनांना डोळ्यांनी वाट मोकळी करून दिली. आज मी स्वतःहून आमच्या भावविश्वाला तडा घालवला होता.

भविष्याच्या स्वप्नाचा रथ उधळून लावला होता. हृदयातील प्रेमाच्या ज्योतिवर आपणहून फुंकर मारून ती विझवुन, त्या धुरात आता आम्ही दोघेही घुसमटलो होतो.त्याच्या काळवंडलेल्या चेहेऱ्याकडे बघायचे धाडस मी करू शकत नव्हते. एकमेकांना विसरून जावं म्हणून, आमच्या आयुष्याच्या वाटा मीच निराळ्या केल्या खरं,पण आम्ही खरच हे सगळं विसरू शकतो???

मनाच्या अंधारलेल्या अवस्थेत बराच वेळ आम्ही निरव शांततेत होतो . माझ्या चेहेऱ्यावरचे हरवलेले स्मित बहुदा त्याला निशब्द करून गेले असावे. माझ्या घराच्या नाक्यावर, मी माझा हात त्याच्या हातातून कसाबसा सोडवून घेत,भावी आयुष्याकडे आणि यश कडे पाठ फिरवली.तो तसाच निश्चल उभा होता.

आता त्याचे डोळे सदैव माझ्या पाठीवरच असतील, म्हणून त्याला आवडणाऱ्या माझ्या लांब वेणीचा शेपटा माझ्या नेहमीच्या लकबी प्रमाणे मी आज अलगद पुढे छातीवर न घेता, तसाच पाठीवर रुळत ठेवला. मला माहित होतं, आज “माझ्या केसांनी नव्हे तर नियतीनेच” त्याच्या भावविश्वाचा गळा कापला असणार……….

“मुझे मेरे हाल पे छोड दो”………….

…………(४७)

मी त्याच्याकडे पाठ फिरवून घरी आले खरी, पण त्याच्या आठवणी मात्र माझी पाठ सोडायला तयार नाहीत. त्याच्या हातातून माझा हात सोडुवून घेताना, त्याचा रडवेला चेहेरा पाहून माझीही अवस्था केविलवाणी झाली. गेले चार दीवस माझी अशी दयनीय अवस्था असेल, तर त्या बिचाऱ्याचे काय झाले असेल. मी आमच्या सर्व आशा आकांक्षावर वार करीत असताना माझ्या हाती निदान माझ्या दुखण्याची ढाल तरी होती, पण तो तर निशस्त्र लढला आणि त्याला हार खावी लागली. त्याचा फोन आला तर तो कट करायला, आता मीच विभाला सांगितले होते. पुन्हा त्या प्रेमाच्या मोहजालात मला अडकायचे नव्हते.

गेल्या पंधरा दिवसात डॉ नाबरानी माझ्या ट्रेटमेंट मध्ये अडवानी सरांच्या सल्ल्याने थोडे फेरफार ही केले होते.

त्याचे फोन विभा घेतंच नव्हती .पण नेमका आज मीच त्याचा आवाज ऐकून जड अंतकरणाने फोन कट केला. एकेकाळी त्याचा ठरल्यावेळी फोन आला नाही तर कासावीस होऊन हळवी होणारी, त्याच्यावर रुसणारी आणि त्याच्याशी अबोला धरून त्याला छळणारी मी, आज परिस्तिथी पुढे लाचार होऊन त्याच्याशी बेईमांनी करीत होती.

चार दिवसांनी अतुल कडे जाऊन ‘त्याने’, मी त्याला एकदा तरी भेटावे म्हणून केलेल्या विनंती वरून आणि अतुल ने मला गळ घातली म्हणून शेवटचच एकदा भेटावे, ह्या साठी अतुल बरोबर ठरल्याप्रमाणे ‘मी’ त्याला फोन केला. आणि आजच ‘विहार लेक’ ला जायच ठरलं. माझ्या ढासळलेल्या प्रकृती कडे बघून, “काही आजार वैगेरे आहे का?” त्याने विचारले. माझ्या “तसं काही नाही” ह्या उत्तरावरून, तो विचारात पडला असावा. मी लग्नाला का नकार दिला, हे तो खोदून खोदून विचारत होता आणि मी कारण देण्याचे टाळत होते.

शेवटी न राहवून “यश, प्लिज नको असं विचारुस, मी तुला सुखी करू शकणार नाही आणि असं तुला भेटून तू आणखीनच दुःखी होशील, तेव्हा प्लीज,…. ह्या पुढे आपण भेटायचे नाही.” असे जीवावर उदार होत त्याला सांगितले आणि भावनांचा बांध कोसळून मी रडायलाच लागले.आता मला रडू आवरतच नव्हतं हे बघून, त्याने मला जवळ घेतले, आणि मायेने थोपटत मला शांत करण्याचा तो प्रयत्न करू लागला. ह्या विशाल मनाच्या माझ्या यश पुढे माझी मलाच कीव येऊ लागली.तो कोसळल्यातच जमा होता.असा किती वेळ गेला कोणास ठाऊक.

भावी आयुष्यावर अंधाराचे जाळे पसरले आणि त्यातून आमच्या जीवाची सुटका होणे कठीण आहे, ह्या विचारानी भयभीत होऊन, न राहवून, मी त्याला मिठीच मारली.दोघांच्या हृदयाची स्पष्ट धडधड मस्तकात जाऊन भिडली. भानावर येऊन भावनांच्या जाळ्यातून बाहेर पडून निघताना, त्याचा हात माझ्या हातात घेऊन, “यश, आय ऑल्व्हेज वॉन्ट टू सी यु हॅप्पी” म्हणाले.

घरी जाईपर्यंत ताटातूट झालेल्या आमच्या हृदयाची स्पंदने, आमच्या कंप पावत असलेल्या हातातून जाणवत होती. माझ्या आक्रोश करणाऱ्या हृदयाची व्यथा, त्याच्याही हृदयापर्यंत पोहचली आणि माझ्या कंप पावलेल्या हाताचे दीर्घ चुंबन घेत तो अस्पष्ट पुटपुटला.

“टेक केअर”……..

“भूल जा ए दिल, मोहब्बत का फ़साना,… किसीसे दिल लगाना”…….

…………(४८)

आम्ही एकमेकांना विसरून आपापल्या मार्गाने जावे म्हणूनच मनाविरुद्ध मी असा कठोर निर्णय घेऊन त्याला दुखावले. पण मन त्याला सोडायला तयारच नव्हते. ‘बाय, बाय’ करून घरी आले, आणि पोट भरून रडून घेतले .

त्याने दीर्घ चुंबलेल्या हाताचे, मी ही परत परत चुंबन घेतले. त्याचा साधा स्पर्शही ह्या पुढे कधीच होणार नव्हता. नियतीला ते मान्यच नसावे. विभाने माझ्या रूममध्ये येत, गुंतलेल्या मनातून मला भानावर आणले.

त्याच्या पासून मनाने आणि शरीराने सुद्धा दूर दूर जाणेच योग्य म्हणून गोव्याला ‘देवीच्या सानिध्यात’ जाऊन राहण्याच्या माझ्या निश्चयावर विभा आणि अतुल ने ही शिक्कामोर्तब केले. तेथील आमच्या पुरोहितांनी, मागेच कबुल केल्याप्रमाणे देवीच्या देवळा जवळ,आणि आवारा बाहेर असलेल्या त्यांच्या प्रशस्त मोठ्या घरातील एक ‘सेल्फ कंटेंट’ रूम, भाड्याने देण्याचे मान्य केले होते. ही माझी सोय जरी आमचे वाडीलां पासूनचे चांगले संबंध लक्षात घेऊन पुरोहितांनी केली होती, तरी माझ्यावरची ही ‘कृपा’ आणि योजना नक्कीच माझ्या आई “श्री शांतादुर्गेचीच” होती…

आज, सकाळच्या अकरा च्या ‘फ्लाईट’ ने, मी आणि विभा गोव्याला ‘कवळे’ येथे दुपारी ‘एक’ च्या दरम्यान पोहोचलो. पुरोहितांना भेटून, श्रीफळ ठेऊन, देवीची ‘धुळभेट’ घेतली. आमच्या घराण्याच्या ह्या पिढीजात भटजींना आम्ही सर्व महाजन मंडळी “दादा”ह्या नावानेच हाक मारतो, दादांनी “शांताई” ला धुळभेटीच्या वेळी गाह्राणे घातले.

देवीचे ते फुलांनी सजविलले रूप, तिचा तो नऊवारी भर्जरी ‘मोरपिशी’ रंगाचा शालू, तिच्या अंगावर घातलेले सोन्याचे दागिने, ती हिऱ्याची चमकणारी नथ, ती कर्णकुंडले. तिच्या त्या “अलौकिक रूपाने” माझ्या डोळ्याचे पारणे फिटले, आणि माझ्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहू लागले .आरतीच्या वेळी देवळा बाहेरून तिच्या ‘श्रीमुखावर’ आरशाने सुर्यप्रकाश्याचा कवडसा टाकण्याची इथे प्रथा आहे, तिचे ह्या वेळचे ‘अवर्णनीय’रूप पाहून भक्तांचे डोळे दिपले नाहीत तरच नवल .

आज “वैशाख महापंचमी” च्याच दिवशी तिने आम्हाला इथे आणल्याबद्धल, तिचे मनोमन, श्रद्धेने हात जोडून नंतर तिला दंडवतही घातले.

‘दादांच्या’ घरीच नंतर ‘महाप्रसादाचीही’ सोय झाली. अख्या जगात कुठेही इतकं सुग्रास भोजन मिळणार नाही ह्याची मला खात्री आहे.त्यात जेवण वाढताना होणाऱ्या मनापासूनच्या त्यांच्या आग्रहाला तोडच नसते. इथे प्रसादाचे जेवण ही ‘अपूर्वाई’ आहे. देवीचा ह्या आमच्या पुरोहितांच्या सर्व ‘फॅमिली’वर वरदहस्त आहे. म्हणूनच आम्हा सर्व महाजनांना इथंच पूर्ण समाधान मिळते….. “ईट्स अलटीमेट” आम्ही रूमचा ताबा घेतला. महापंचमी निमित्त, संध्याकाळी देवळात ‘वझे बुवांचे’ किर्तनही मिळाले. रात्री संस्थानातर्फे ‘अल्पोपहार’ झाल्यावर, विभा आराम करीत रूम वर थांबली. आणि मी देवळाच्या आवारात येऊन शांतपणे, देवीच्या नामस्मरणात रंगले.

निरभ्र आकाशातील ताऱ्यांच्या रांगोळीतून माझ्या मनावर त्या ‘विधात्याने’ त्याच्या कृपेच्या चांदण्याची बरसात केल्याचा आभास होत होता.सर्वांगावर रोमांच उभे राहिले. शरीर हलके हलके होऊन मनाच्या साम्राज्यावर एका दिव्य, प्रखर पण तरीही अतिशय शीतल भासणाऱ्या प्रकाशानी मी दीपुन गेले. सभोवताली त्याच्या अपरंपार लिलेचा महीमा, त्याच्या अमर्याद शक्तीचा, आणि मानवी मनावरच्या त्याच्या वर्चस्वाची ताकद मी आता अनुभवत होते. अंतःकरणात करुणेचा,मायेचा, प्रेमाचा झराच वाहात असल्याचा अनुभव येत होता. शरीराबाहेर सुद्धा ह्या आसमंतात आपले अस्तित्व असल्याचे मला जाणवत होते. असा हा आभास आज मी प्रथमच अनुभवत होते. हे सगळं विश्व काही अजबच आहे. विधात्याच्या अस्तित्वाची त्याच्या दिव्यत्वाची एक अलौकिक अनुभूती आणि हे सर्व काही आपल्यातच असल्याची प्रचिती येत होती…..

“इशारत” झाली. आणि देवळातील घंटेच्या नादानी मी तंद्रीतून बाहेर आले. आज ‘महापंचमी’ त्यामुळे देवीची ‘सोन्याच्या पालखीतून’ मिरवणूक, सोबत हत्ती अंबारी, वाद्यवाजंत्री अशी ही जंगी मिरवणूक सुद्धा आज आमच्या नशिबाने आणि देवीच्या कृपेने आम्हाला मिळाली.
विभा आणि मी आरती नंतर रूमवर आलो. विभा शांतपणे झोपली पण माझ्या मिटलेल्या डोळ्यांपुढे मगाशी अनुभवलेला “O. B. E.” पुन्हा येऊ लागला……..

“ऐ मालिक तेरे बंदे हम”……..

…………(४९)

मी गोव्यात रुळे पर्यंत ‘विभा’ माझ्याबरोबर थोडे दिवस इथेच राहणार होती. गुरुवारी दादांबरोबर आम्ही ‘साखळी’ येथील ‘श्री नाईक बाबा’ ह्यांच्या कडे जाण्याचे पक्के ठरले होते. माझा हा आजार नाईक बाबा नक्कीच बरा करतील असा दादांना विश्वास होता. त्यात मी येथे देवीच्या सहवासात यावे आणि गोव्यातच उपचार करावे असा देवीचा “कौलप्रसाद” झाल्याचे, तसे त्यांनी मला अगोदर कळविले सुद्धा होते. माझा देवीच्या अश्या कृपा प्रसादावर, कौल घेण्यावर विश्वासही आहे. विभाची ह्याला आडकाठी होती, पण अतुल ने मला दुजोरा दिला ‘ॲलोपथी’ च्या माझ्या चालू ट्रीट्मेंट बरोबर श्री नाईक बाबांचे ‘आयुर्वेदिक आणि दैविक’ उपचार घ्यायला काही हरकत नसल्याचे सांगितले होते. श्री नाईक बाबांना सर्व “बाबाच” म्हणून ओळखतात, साखळी येथील खूप प्रसिद्ध असलेल्या ‘श्री दत्ताच्या’ देवळातील ते प्रमुख पुजारी असून बऱ्याच रोग्यांना आणि ‘बाहेरची बाधा’ असणाऱ्या पीडितांनाही त्यांनी रोगमुक्त आणि व्याधीमुक्त केल्याचे ऐकिवात होते. श्री दत्तगुरूंचा त्यांना वरदहस्त आहे…..

सोमवारी, श्री मंगेशाच्या देवळात जाऊन आमच्या पुरोहितांना “नाना भटजींना” भेटून आम्ही गोव्यात वास्तव्याला आल्याचे आणि ‘कवळे’ येथे ‘दादांच्या’ घरीच रहात असल्याचे, त्यांच्या कानावर घातले .

प्रथेप्रमाणे बाहेरून येणारे महाजन आल्या आल्या प्रथम मंगेशा पुढे श्रीफळ, आणि आतील चौका वरील ग्रामपुरुषा पुढे आणि मागील मुळकेश्वराच्या देवळात दोन छोटी कच्ची केळी ठेऊन ‘धुळभेट’ घेतात.नानांनी देवापुढे गाऱ्हाणे घातले. मूर्तीचे ते अलौकिक सुंदर रूप पाहून मनाला एकदम शांत आणि प्रसन्न वाटले. गोव्याला त्याने इथे सेवेसाठी सुखरूप आणल्याने मी मनापासून त्याचे आभार मानले. गोव्याच्या ह्या कुलदेवतांच्या देवळात पाय ठेवताच एकदम प्रसन्न वाटून मन भारावून जाते. मंगेशा ची ही सोन्याची मूर्ती खुपच रेखीव आणि धीरगंभीर आहे. देवळा मधील ती नक्षीदार छोटी मोठी काचेची झुंबरे, काचेच्या हंडी आणि त्यामधील ग्लासात लावलेले ते तेलातील दिवे. मनाला खूपच आल्हाद दायक वाटतात. देवळा बाहेरचा परिसर सुद्धा खूप सुंदर आहे. ती खूपच मोठी दीपमाळ त्यातील लावलेल्या पणत्या. आणि त्यातील ती मोठाली घंटा, प्रत्येक तासाला त्याचे टोळे देण्याचं काम येथील शिपायांना दिलेलं आहे. बाजूच्या तळ्या जवळील परिसर तर खूपच नयनरम्य आहे. गोव्यात सगळीकडेच नारळी, पोफळीची झाडे आणि हिरवीगार शेते मनाला खूपच आल्हाददायक वाटतात.

दर सोमवारी रात्री दहा वाजता ‘श्री मंगेशा’ ची सोन्याची पालखी असते, आम्ही ‘धूळ भेटी’ नंतर ती ‘अटेंड’ केली. दादानीच ‘मंगेशीला’ जाऊन येण्यासाठी, प्रायव्हेट टॅक्सी ची सोय करून दिली होती. आमचे बाबा असेपर्यंत आमच्या घरी ‘देवीची’ आणि ‘मंगेशाची’ नेहमी पूजा व्हायची. विभालाही देवाचं तसं होतंच. आता सध्या इथे ती आलीच आहे, तेव्हा जेव्हढं जमेल तेव्हढं देवाचं करायची तिचीही इच्छा होतीच. आम्ही परत घरी यायला निघालो.फक्त सात किलोमीटर चे अंतर आता रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. विभा बरोबर असूनही एकटे पणा जाणवला. ते अंतरही सात कोस दूर भासले.

जे मला धुळभेट घेताना आणि भटजींनी गाऱ्हाणे घालतांना शांतादुर्गेच्या देवळात वाटलं, नेमकं तेच आज इथे मंगेशाच्या देवळातही वाटलं.दोन्ही कडे यश ची अनुपस्थिती आणि कमतरता प्रकर्षाने जाणवली.

आम्हा उभयतांनी आमच्या ह्या कुलदेवतांची विशेष पूजाअर्चा करावी अशी जबरदस्त इच्छा होती, लग्नानंतर एकत्र गोव्याला येऊन आम्ही तसे करण्याचे ठरवलेही होते. पण बहुदा परमेश्वराचीच तशी इच्छा नसावी. पण तो मला जवळ असावा असे नक्कीच दोन्ही वेळा वाटले. मी त्याच्या पासून दूर झाल्या पासून एकही रात्र शांत झोपले नव्हते.मध्यरात्री दचकून जागे व्हायला होतं असे आणि मग त्याच्याच विचारात पहाट होण्याची वाट पाहत असे. इथे देवाच्या सान्निध्यात असूनही त्याच्या विचारांचा पगडा मनावर कायम असतो. आत्ता मंगेशाच्या चरणी पाया पडतांना सुद्धा तोच डोळ्यापुढे यावा याचंच नवल वाटत. इथे येऊन सुद्धा जर देवाची सेवा नीट होणार नसेल, मनाला शांती मिळणार नसेल तर काय उपयोग. मनात विचार आला, मी इथे येऊन चूक केली का? माघारी परत फिरावे का? पण दुसरे मन असे विचित्र विचार झटकून इथून परत माघारी फिरणे योग्य नसल्याची ग्वाही देत होते……..

“ मन रे तू काहे ना धीर धरे”…..

…………(५०)

आज गुरुवार, दादांबरोबर नाईक बाबांकडे गेलो. सर्व माहिती विचारून नंतर त्यांनी माझ्या कपाळाला अंगारा लावला. माझं सर्वांग शहारले, आणि एक निराळीच अनुभूती जाणवली. बाबांच्या अंगी दैवी शक्ती नक्कीच असावी त्यांनी त्यांच्या हातात धरलेल्या माझ्या हातातून प्रचंड शक्तीचा ओघ माझ्या सर्वांगात संचारल्याचे मला प्रकर्षाने जाणवले.योगीक सामर्थ्यावर मी पुस्तकातून वाचले होते, आज प्रत्यक्ष त्याचा अनुभव येत होता.झपाट्याने खालावत चाललेल्या माझ्या प्रकृतीत बाबांच्या दैवी शक्तीने आणि उपचाराने नक्कीच फरक पडू शकेल अशी आशा मनात उत्पन्न झाली.माझ्या प्रकृतीत जर बाबांमुळे आणि देवीच्या कृपेने फरक पडणार असेल, तर यश ला मी उगाच अव्हेरलं आणि त्याला दुखावून त्याच्या पासून विनाकरण दूर झाले असा विचारही मनाला शिवला. आणि प्रकर्षाने त्याची जवळीक आत्ता असावी, तो इथे येऊन मला सहवास मिळावा असं वाटलं.

काही मंत्र वैगेरे उच्चारून त्यांनी मला विभूतीची मोठी पुडी दिली. आणि रोज आंघोळीनंतर श्री दत्तात्रेयांचा “दिगम्बरा दिगम्बरा हा १८ अक्षरी जप ‘अकरा’ वेळा करून त्यातील थोडी विभूति कपाळाला लावण्यास सांगितले.त्याजबरोबर काही आयुर्वेदिक पावडर पाण्यातून घेण्यासाठी काही पुड्या सुद्धा दिल्या. नंतर आम्हा सर्वांना ते देवळात घेऊन गेले. आणि गाऱ्हाणे घालून, बाहेरून देवळाच्या आवाराला प्रदक्षिणा घालून, देवाला आणि बाबांना वाकून नमस्कार करून त्यांचा निरोप घेऊन आम्ही कवळ्याला घरी परत आलो.

ह्या उपचाराचे ते कोणाकडूनही पैसे वैगेरे घेत नाहीत. आपापल्या इच्छेने जी सेवा करायची असेल ती दत्तात्रेयाच्या देवळात करा असा त्यांचा संकेत असतो.

विभाला मुंबईला जाणे भागच होते, तिचा जॉबही तसा नवीनच होता, शुक्रवारी ती परत गेली.

इथे आल्या पासून आता मात्र एकटे पडल्याची जाणीव झाली……..

संबंध दिवस देवळात बरं वाटायचं, रोज देवळात महाजनांचे अभिषेक, देवीला सजवून झाले की दुपारची आरती, संध्याकाळी पुराण वाचन, रात्री आरती, ह्यात वेळ कसा तरी निघून जायचा, पण बिछान्यावर पडले की आठवणी जागायच्या, अश्या वेळी मी नामस्मरण करायची पण तरीही यश चा विचार मनातून जात नसे.

“जिन्हे हम भुलना चाहे वोह अक्सर याद आते है”.

मला ह्या मनाचं नवलच वाटतं, सर्व सोडून देवीच्या चरणाची सेवा घडावी आणि हे उर्वरित जीवन सफल व्हावे म्हणून इथे आली खरं, पण आठवणी पाठ सोडत नाहीत आणि मोह काही सुटत नाही. मानस शास्त्राचा अभ्यास करूनही, स्वतःच्या मनाचा अभ्यास कच्चाच राहिला. आणि सायकॉलॉजीचे प्रिन्सिपल “वुई रिमेम्बर ओन्ली, व्हॉट वुई वॉन्ट टू रिमेम्बर” खरे ठरले. आठवणीतील यश अजूनही यशस्वी होत होता. खिडकीच्या चौकटीतून डोकावणाऱ्या चंद्राला बघून, आणि घराच्या बाजूने वाहणाऱ्या नदीच्या ओहळाच्या संथ वाहणाऱ्या पाण्याच्या हलक्याशा सुमधुर आवाजाने, मनाच्या तरंगावर यश च्या आठवणींची कागदी रंगीत नांव डोलू लागली. आज यश इथे हवा होता अस मनोमन वाटत राहिलं……….

“तेरे बिना आग ये चांदनी तू आ….जा….तू… आ…जा ……

…………(५१)

मी देवीच्या सेवेत रमले.

पावसाळ्यात इथला निसर्ग खूपच आल्हाद दायक असतो. हिरव्यागार शालूने नटलेल्या निसर्ग रम्य गोव्याच्या येथील देवळांच्या परिसरात, मनाला मिळणारी शांती, आणि पावित्र्याचे सुख शब्दात वर्णन करणे शक्य होणार नाही.

श्रावणात तर येथे खूपच छान वाटत होते.निरनिराळ्या रंगाची, सुगंधी वासांची फुलं, देवीला वाहण्याचे मोगरा,जाई जुई, अबोली, सोनचाफा आणि ते सुरंगीच्या मोहक वासाचे देवीच्या चरणी वाहिले जाणारे गजरे, आणि वेण्या, ह्यांनी मन भरून जायचे. गोव्याला फुलांची कसलिच कमतरता नाही. येथील प्रत्येक स्त्रीच्या विशेषतः सौभाग्य वतींच्या केसात फुलांचा गजरा किव्वा वेणी दिसणारच. माझे केस काळेभोर आणि लांबसडक आणि मला फुलांची आवड असूनही सध्या परिस्थिती मुळे हौस करता येत नव्हती ह्याच वाईट वाटत होतं.

शरीर कमजोर असले तरी श्रावणात मन प्रसन्न व्हायचे, गोव्यातील प्रत्येक देवळात देवाची ‘जाईची’ पूजा बघण्या सारखी असते. गावातील लोक भक्तीने देवतांना ‘जाईची फुलें’ अर्पण करतात.

प्रत्येक श्रावणी सोमवारी, रात्री मंगेशीला जाऊन मी पालखी घेत असे.दादांची नात अश्या वेळी माझ्या बरोबर यायची, ही छोटी गोबऱ्या गालाची, छान, हुशार आणि गोड ‘उमा’ फार बोलकी आहे. गोव्यातील देवतांची माहिती, सगळ्या चालीरीती, देवी चे सर्व उत्सव ह्याची तिला इत्यंभूत माहिती आहे. अभ्यासात हुशार असूनही नाच, गाण्यात, चित्रकला ह्या मध्येही ती पारंगत आहे. गोव्यातील बरेच जण नाट्य आणि संगीत कलेत प्रवीण आहेत. येथील कलाकारांना परमेश्वराचे वरदानच आहे.अभिषेकी बुआ हे मंगेशीचेच. दीनानाथ मंगेशकरांची फॅमिली सुद्धा इथलीच. इथले माझे वास्तव्य “देवीच्या कृपेने” मजेत होते. तशात “गोकुळ अष्टमी” चा दिवस उजाडला, सर्वांची आठवण येत होती, मुंबईतले ‘गोविंदा’ चे दिवस आठवले, शांतादुर्गा, मंगेशा नंतर “श्री कृष्णाचे” मला खूपच वेड आहे, त्याच्या बालपणीच्या लीला, गोपिकां बरोबरच्या रासक्रीडा, त्याचे राजकारण, नंतर युद्धभूमीवर अर्जुनाची साथ, आणि सांगितलेली ‘गीता’, त्याचे ते मनमोहक स्मित, आणि बांसुरीची जादू, त्याच्या “त्या” मोरपिसा सकट, तो माझ्या हृदयावर विराजमान आहे. मोरपिशी रंग मला आवडण्याचे कारणही माझा हा “गोड कान्हाच” आहे. हाच मोरपिशी रंग “यश” ला सुद्धा आवडतो, हा ‘योगायोगच’ म्हणावा लागेल .

कृष्णाची आठवण झाली, तशी यशोदेच्या मायेची, राधेच्या प्रेमाची, मिरेच्या भक्तीची आणि त्याच बरोबर, माझ्या जिवाभावाच्या ‘सख्याची’ “यश”ची प्रकर्षाने आठवण झालीच…….

“ओ कन्हैया, ओ कन्हैया, आज आना ख़्वाबमे”……….

…………(५२)

माझे हे इथं असं व्यवस्थित चालू होतं. पण मध्ये चार पाच दिवस अडचणी च्या वेळी शिवाशिव होऊ नये, म्हणून घरातच राहून नामस्मरण, वाचन करणे, गाणी ऐकणे व्हायचं. अशावेळी देवळात जाणं तर शक्यच नव्हतं, मग जुन्या आठवणी मनाचा ताबा घ्यायच्या. नामस्मरणातही मन लागायचं नाही. हल्ली कधीतरी नाकातून रक्त व्हायचं. ब्लड लॉस मुळे थकवा खूप जाणवायचा. प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती. मधे, मधे अतुल आणि विभाचे माझ्या खुशाली संबंधी फोन दादांच्या फोनवर येत असत, किव्वा मी देवळाबाहेर जाऊन, खालच्या हॉटेल मधून त्यांना फोन करीत असे. अतुल आणि डॉ नाबर सरांना कन्सल्ट करून औषधे वेळो वेळी पाठवली जात होती.

चार पाच महिने होऊन गेले, ट्रीटमेंट चेंज करून सुद्धा, फारसा फरक पडत नव्हता, बाबांकडे महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी जाऊन येत असे. थोडे दिवस बरं वाटायचं. बरं वाटलं की हे सर्व सोडून मुंबईला माझ्या घरी,माझ्या लोकांमध्ये जावंसं खूप वाटत होतं, तिथे ‘यश’ ला माझी आठवण येत असेल का? माझ्या शिवाय तो दुःखी असेल? का मला तो विसरून सुद्धा गेला असेल, असे विचार सारखे मनात यायचे,झोप सुद्धा यायची नाही,आलीच तर स्वप्नातही तोच दिसायचा, देवीच्या सानिध्यात असूनही, असं मला का होतंय तेच कळत नव्हतं.

आज तशातच ‘अतुल’ ने ‘यश’ सारखी माझी आठवण काढत असतो, सारखे फोन करतो, आणि तो खूपच ‘अन इझी’ असल्याचे फोनवर कळविले, आणि मग हल्ली, वारंवार मी सुद्धा बेचैन का असते, देवीच्या आराधानेतही माझे मन का लागत नाही. त्याची सारखी आठवण का येते, ह्याचे उत्तर सापडले….

आपण ‘एखाद्या’ व्यक्ती बद्धल सारखा विचार करू लागलो, त्याला भेटण्याची मनात प्रबळ इच्छा असेल तर त्याची ही ‘इच्छाशक्ती’, त्या दुसऱ्या व्यक्तीला बेचैन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनाच्या ह्या प्रबळ इच्छाशक्ती बद्धल, ‘टेलिपथी’ वर मी वाचलेलं, माझ्या संबंधात आज ते खरं ठरलं होत. मलाही प्रकर्षाने ‘यश’ ला भेटावस वाटलं.पण आता ते कसं शक्य आहे. आज मनःस्तापाने माझ्या अंगातील ताप ही बहुदा वाढला असावा, आणि नजरेसमोर काकुळतीला येऊन मला साद घालणारा “यश” दिसला…………

…………(५३)

माझे इथले रुटीन सुरू होते. मी सकाळी सहा पर्यंत उठून नामस्मरण करून, आंघोळ वैगेरे आटपून नाश्ता करून देवळात जाऊन बसायची. मधे मधे जमतील तेव्हढ्या, जमतील तश्या ‘प्रदक्षिणा’ घालायची, इथे लहान मुलींना, आणि सौभाग्यवती असणाऱ्या स्त्रियांनाच ‘गाभाऱ्यात’ प्रवेश करून अभिषेकाची सेवा वैगेरे करिता येते. प्रौढ स्त्रियांना देवळातच, गाभाऱ्याच्या बाहेरून प्रदक्षिणा करिता येते. आमचे ‘पुरोहितच’ आमचा ‘अभिषेक ‘करतात. रोज एक वाजता, पंचमीच्या दिवशी दिड वाजता, आणि महापंचमीला दुपारी दोन वाजता आरती असते. रात्री नऊ ला आरती होऊन मग देऊळ बंद करतात. पुढील ‘मेन गेट’ रात्री दहा वाजता, आणि मागच्या आवारातील, आमच्या भटजींकडे जाण्याचे गेट अकरा वाजता बंद करतात. रात्री अकरा नंतर कोणालाही आतून बाहेर जाण्यास, किव्वा बाहेरून आत येण्यास ‘सक्त मनाई’ असते. गोव्याबाहेरून देवीच्या आराधनेस येणाऱ्या ‘महाजनानाच’ फक्त चार दिवसांपर्यंत, इथे येऊन राहण्यास, आवारात चांगली सोयही आहे.

दुपारी आरती नंतर मी दादांकडेच जेवण करून रेस्ट घ्यायची, संध्याकाळी आवारात ‘दिपस्तंभा’ जवळ बाकांवर बसून सनई चौघड्याचे सूर ऐकत ह्या हिरव्यागार, नयनरम्य, शांत आणि पवित्र वातावरणात ‘नामस्मरण’ करण्याचा, मला पुढे ‘छंदच ‘ जडला .रात्री नऊच्या आरती नंतर जेवण झाल्यावर, झोपण्या आधी ‘आध्यत्मिक’ पुस्तकांचे वाचन करून,नामस्मरण करून झोपी जायची.

श्रावण,आणि मग भाद्रपदातले ‘गणपती’ पण येऊन गेले. मुंबईला जेव्हढ्या मोठ्या प्रमाणात ‘दिवाळी’ साजरी करतात, तसे आणि तेव्हढ्या मोठ्या प्रमाणात इथे गणपतीचा सण साजरा होतो. लोकांचे एकमेकांकडे जाणे येणे होते,खूप फटाके वैगेरे लावतात,बहुदा सगळ्यांकडेच गणपती असतो.

आता ‘दिवाळीचा’ सण आला. ‘विभा’ येणार होती, पण अडचणी मुळे येऊ शकली नाही. त्यामुळे मला ‘एकटीला’ हा सण खायला उठला, त्यात दोन दिवसांपासून बारीक ताप येऊन, थकवा फारच वाढला.कोपरा, ढोपराची हाडे दुखत होती. बाजूलाच देऊळ असूनही, आरतीलाच फक्त मी कशीबशी जात होती. बाकी वेळ आठवणींच्या जाळ्यात गुरफटून, पाण्याचून तडफडणाऱ्या माश्यासारखी अवस्था झाली होती…

देवळाच्या आवारातील दिव्यांच्या रोषणाईने सजवलेला ‘दीपस्तंभ’ इथून स्पष्ट दिसत होता, गेल्या वर्षीच्या दिवाळीची प्रकर्षाने आठवण झाली. आणि बाहेर लावलेल्या लुकलूकणाऱ्या दीप माळा, आणि आकाश कंदिलातील दिव्याचा आणि रांगोळी समोरील पणत्यांचा, झगमगणारा प्रकाश बाहेर असूनही मनात मात्र अमावास्येचा काळोख दाटला होता. आणि मी एकटे पणाच्या आगीत होरपळत होते. “यश” ची पहिली भेट दिवाळीतच झाली होती. त्या वेळच्या परिस्थितीत आणि आजच्या परिस्थितीत जमीन आस्मानाचा फरक जाणवला, त्या वेळचे ते माझे रूप, तो साज शृंगार, आणि आजचे माझे खंगलेले शरीर, आणि उर्ध्वस्त झालेले मन, आज एकटे पणाच्या वाळवंटात प्रेमाच्या, आधाराच्या मृगजळाच्या मागे मागे धावणारी मी एक तहानलेली विरहिणी.

आज ह्या माझ्या अवस्थेला मी घेतलेल्या निर्णया बरोबरच “नियती” आणि माझे ‘प्राक्तन’ माझे सखे सोबती म्हणून हजर आहेत…….

…………(५४)

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी विभा,आणि अतुल चा फोन येऊन गेला. यश ला मी आता कुठे आहे, कशी आहे, ह्याची कल्पना अतुलने माझ्या संगण्यावरूनच देण्याचे टाळले होते.

आज तीन तारीख, माझा वाढदिवस.त्या दोघांचे फोन येऊन गेले.”यश” ला मी येथे आहे ते कळले असते, तर तो नक्कीच येथे आला असता. त्याचा सारखा मनात येणारा विचार आणि आठवणी बाजूला सारीत,देवीच्या देवळात लगेच जाऊन बसले, तिचे रूप पाहून मन शांत झाले.

माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने, आजही मी ‘दादांना’ देवीवर अभिषेक करायला सांगितले होते. तसा प्रत्येक ‘पंचमीला’ माझा अभिषेक ते नियमित करायचे. आजचा अभिषेक त्यांच्या कडून चालू झाला. आणि अभिषेक होई पर्यंत मी देवीचे ध्यान, नामस्मरण करीत सभामंडपात बसून होते. आज मी अर्पण केलेला ‘भर्जरी शालू’ देवीला नेसवणार होते. इथे रोज महाजनानी देवीला ‘अर्पण’ केलेले ‘प्युअर सिल्क चे नऊवारी’ शालू, आणि त्यातील ब्लाऊज पीस ची “चोळी” शिवून, देवीला सजवले जाते, आपला शालू नेसवायचा असेल तर कमित कमी, तीन महिने तरी आधी तसा आपला नंबर ‘कमिटीऑफिस’ मध्ये नोंदणी करणे आवश्यक असते, कधी कधी सहा सहा महिने आधीच काही भक्तानि तशी नोंद केलेली असते. तिच्या कृपेने आज मी अर्पण केलेला “माझा” शालू देवीच्या अंगावर असणार म्हणून मी खूष होते. आज रात्रीची “दोन दारी” पुजा सुद्धा मी आधीच ‘बुक’ केली होती. दुपारच्या आरती नंतर, देवीच्या गर्भगृहाचे पहिले,आणि प्रदक्षिणे पर्यंतचे दुसरे द्वार, इथपर्यंत सुवासिक फुलांच्या माळांनी सजवून “दोन दारी’ पूजा केली जाते.

रात्री आरती नंतर प्रसाद वाटला तेव्हा माझ्या सर्वांची मला खूपच आठवण झाली.

माझा गेल्या वर्षीचा वाढदिवस “यश” मुळेच दणक्यात साजरा झाला होता, आज त्याच्या शुभेच्छा देखील तो माझ्या पर्यंत पोहोचवू शकत नव्हता, त्याने माझी आठवण बऱ्याच वेळा नक्कीच काढली असावी, आज वारंवार मला उचक्या लागत होत्या, त्यावरूनच मी ते जाणलं होतं.

रात्री आरती नंतर बाहेर आवारात तसं फारसं कोणी थांबत नाही, मी एकटिच ‘दिपस्तंभा’ जवळच्या बाकड्यावर बसून होते, आता देवीचे ‘ध्यान’ न लागता ‘मन’ चौफेर उधळलेल्या घोड्यांसारखे, यशच्या मागावर धावत होते, माझ्या अंधारलेल्या जीवनाच्या मार्गावरून, माझ्या कोमेजलेल्या प्रीती पुष्पां ना तुडवीत ते पुनः कधी बहर येईल का? ह्या आशेवर यश कडे आकर्षित होत होते. तो जवळ नसल्यामुळे ते नाराज होते, त्यामुळे त्याला जीवकीप्राण असलेले “स्मितहास्य”, आता माझ्या चेहेऱ्यावर फुलणे कसे शक्य आहे. तो जवळ होता तेव्हा त्याच्या गोड सहवासात प्रेमाची उगवलेली कमळे, मी त्याच्याच पायाशी तेव्हा अर्पण केली होती. जीवनाच्या, आणि भावी आयुष्याच्या सर्व फुलांचे निर्माल्य होऊन, मृत्यूच्या तळ्यात त्याचे विसर्जन होण्याचे फक्त बाकी राहिले होते. आज त्याच्याकडे जाण्याची, त्याला भेटण्याची, ‘मरणाची ओढ’ लागून सुद्धा, नियतींनी माझ्या आकांक्षाचे पंखच छाटल्यामुळे भरारी घेणे अशक्य होते. त्याच्या ‘मिलनाची’ सोडाच, पण त्याला भेटण्याच्या अंधुक आशेवर सुद्धा मीच अगोदर पाणी ओतल्याने, आता विरहाची ही आग विझवायची ताकद माझ्या नयनातून झर झर वहाणाऱ्या झऱ्यात देखील नसावी.

दिपस्तंभावरील मोठ्या घंटेचे अकराचे टोळे ‘नाईट वॉचमन’ ने दिले, आवाराचे मागचे गेट बंद होण्याच्या आधीच, मन पुन्हा देवीकडे वळवून, जड पाउलानी मी घराकडे परत फिरली………

…………(५५)

गोव्याला मी देवीच्या सानिध्यात आली खरं,…
“त्याच्या”आठवणींपासून दूर जाण्यासाठी आणि त्याच्यापासून दूर गेल्याने, त्याच्याशी संबंध न ठेवल्याने, तो ही मला ‘विसरून जाईल’. आणि कंटाळून शेवटी कोणाबरोबर तरी लग्न करून मोकळा होईल आणि सुखी तरी होईल ह्या सर्व अपेक्षांनी. पण इथे येऊन सुध्दा आपल्या माणसांचे, विचार थांबत नाहीत. आणि आठवणी तर पाठ सोडतच नाहीत.

मला एका गोष्टीचं नवल वाटतं.हे “योगी पुरुष” संसाराचा त्याग करून हिमालयात जाऊन इतकी वर्षे ‘तपस्या’ वैगेरे कशी काय करू शकतात? असे काय केले की संसारात वैराग्य येऊन देव भेटतो. खरतर देव म्हणजे तरी काय? तो कसा भेटेल? कोठे भेटेल? देव, देव म्हणतात त्याची ‘प्रचिती’ खरोखरीच येते का?…. बहुदा तशी ती नक्कीच येत असावी, त्याच्याशिवाय का रामदास,तुकाराम, मीरा, कबीर होऊन गेले. त्यांना नाही का देव भेटला. मग मी एवढे सगळे सोडून इथे आले, कुलदेवतांची सेवा करतेय, ‘नामस्मरण’ करतेय, तरी मला देव कसा दिसत नाही? मनाला हवी तशी शांती का नाही? का माझे विचार संपत नाहीत, का आठवणी सतावतात? का माझे लक्ष माझ्या शारीरिक व्याधींवर लागते?????……

असं म्हणतात की, देव भेटायचा असेल तर तो ‘गोर गरिबांच्या’ सेवेत भेटतो, ‘भुकेल्याला अन्न’ दिल्याने मिळतो, वैगेरे ऐकले होते, वाचले होते,त्यामुळे शेवटी सारासार विचार करून माझ्या ‘बाबांनी’ माझ्या लग्नासाठी म्हणून ठेवलेल्या “माझ्या “नावावरील बँकेतील रकमेचा” सदुपयोग करावा ह्या हेतूने, हल्लीच मी येथील लहान मुलांच्या आश्रमात जाऊन त्यांना जेवण, शालोपयोगी वस्तू, आणि कपडे वैगेरे भेट, माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने देऊन आली. तितकच मनाला एक समाधान वाटलं.

मी लग्न करणे आता शक्य नाही, तसेच ह्या ‘असाध्य व्याधी’ मुळे आता जास्त दिवस जगण्याची शाश्वती देखील नाही, म्हणून येथील वृद्धाश्रमालाही काही ‘देणगी’ देऊन, तेथील बिचाऱ्या वयस्कर लोकांना बरं वाटावं म्हणून हल्ली वारंवार तेथे जाऊनही येते. त्यांनाही गप्पा मारल्याने बरं वाटायचं हे बघून, थोडा वेळ मी सुद्धा माझं एकटेपण विसरायची.

पण आज पुन्हा “यश” चा वाढदिवस मला बेचैन करुन गेला. गेल्या वर्षी ह्याच दिवशी खरतर त्याने मला ‘प्रपोज’ केले, आणि मी प्रथम दर्शनी अगोदरच त्याची मनाने झाली होती, त्यामुळे स्वतःला ‘सर्वस्वी’ झोकून देऊन पूर्णतः “त्याचीच” झाले होते. आज मात्र त्याच्या शिवाय, एकटी, एकाकी पडलेय. मी सुखी झाले नाही, आणि तो तरी सुखी आहे की नाही, कोण जाणे. असं कोणतं पाप मी गेल्या जन्मी, वा जन्मांतरात केलं होतं की दुराव्याच्या ह्या आगीत मी शरीराने आणि मनानेही दिवसेंदिवस जळतेय, शारीरिक सुख तर कधी मिळालेच नाही. पुढे मिळणार ही नाही, त्याची ‘अपेक्षाही’ नाही. पण यश च्या सहवासात मिळत होतं ते मानसिक सुख ही काळाने हीरावून घेतले. आता तर असं वाटत हे देव, आध्यात्म वैगेरे सर्व काही सोडून पुन्हा संसारात रमावे, पण माझ्या ह्या व्याधी मुळे शारीरिक मर्यादेची जाणीव होते आणि मन विषण्ण होते…. “यश”तुझ्यापासून मी लांब गेले. शरीराने तुला दूर केले,पण मनानी तुला दूर करण्याची माझ्यात ताकद नाही. मनाने मी पूर्ण हरले आहे. देवळाच्या आवारात माझ्या ‘शांतादुर्गेच्या’ जवळ फक्त ‘शरीरानेच’ आहे, मन अजूनही तुझ्याच मनाच्या सहवासात रमलेले आहे….

काय ही माझी अशी अवस्था, धड संसारही नाही आणि धड संन्यासही नाही…..

“न रहे घरके, ना घाटके.”………

…………(५६)

आज चौदा फेब्रुवारी,

‘व्हॅलंटाईन्स डे’ आणि ‘अतुल’ चा वाढदिवस. मीच सकाळी त्याला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला,पण तो कुठे बाहेर गेल्याचे कळले त्यामुळे मला त्याला ‘विश’ करता आले नाही. उलट त्यानेच मला आज “सरप्राईज” देण्याचे ठरविले असावे. मी नाष्टा करून देवळात जाताना ‘तोच’ देवळाच्या दारात मला भेटला, मी चकितच झाले.मी लगेच त्याला ‘शुभेच्छा’ दिल्या. सकाळच्या ‘सहा’ च्या फ्लाईट ने तो आल्याचे कळले. पणजी ला हॉटेल ला उतरून, तो खास मला भेटायला आला होता. उद्या संध्याकाळी सात च्या फ्लाईट ने परत जाणार होता. 

त्याला भेटून खूप आनंद झाला.

आठ महिन्या नंतर मला “आपलं” असं कोणी प्रत्यक्ष भेटायला आलं होतं.

देवीचं दर्शन घेऊन, नमस्कार करून, त्याला माझ्या रूमवर आणले .

तो, आणि डॉ. नाबर, अडवानी सरांच्या नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये असल्याने माझ्या प्रकृती मधील चढ उताराची त्यांना पूर्ण कल्पना होतीच. त्यामुळे सरांनी ट्रीटमेंट चेंज करून त्याच्या बरोबर काही नवीन औषधे पण पाठविली होती.

आजचा त्याचा वाढदिवस, त्याने माझ्या बरोबर साजरा करायचा ‘प्लॅन’ करून, उद्या आम्ही दोघे नाईक बाबांकडे सुद्धा जाण्याचे ठरले.

संध्याकाळी आम्ही मडगाव येथील ‘कोलवा’ बीच वर गेलो. कितीतरी महिन्यांनी, मी अशी बीच वर ‘सूर्यास्ताच्या’ वेळी गेली होती.आज पर्यंतचे सगळे सूर्यास्त “यश”च्या सानिध्यात, मी ‘एन्जॉय’ केले होते. त्यामुळे यश ची प्रकर्षाने आठवण झाली आणि डोळ्यात पाणी तरळलं. अतुल च्या नजरेतून ते नक्कीच सुटलं नाही.

अतुल माझा आतेभाऊ, आणि अतुल ला मी लहानपणा पासूनच आवडायची,त्याच्या वागण्या वरून आणि काही वेळा नजरेतूनही मला ते जाणवायचं. “केंकरे काकांना” सुद्धा मला सून करून घ्यायची इच्छा होती. विभाच्या दृष्टीने यश च्या तुलनेत अतुल जास्त देखणा, हुशार आणि नावाजलेला ‘सर्जन’ त्यामुळे अतूलच मला योग्य वर आहे असं तिचं मत होतं.आणि केंकरे फॅमिली बरोबर आमचे खूप जवळचे संबंध. त्यामुळेच  “यश” बद्धल तिच्या मनात तेढ होती.आणि म्हणूनच त्याच्या पासून मी दूर व्हावे अशी तिची इच्छा असायची……

माझे आणि यश चे संबंध जुळतायत म्हटल्यावर, अतुलचा माझ्यावर जीव असूनही, पुढे तो माझा एक चांगला “दोस्त” बनला. आणि आता माझ्या ‘ट्रीटमेंट’ साठी त्याने अमेरीकेतील त्याचा खास मित्र ‘अरुण’ च्या साहाय्याने, तिकडे मला नेण्याचे ‘फ़िक्स’ केल्याचे सांगून मला ‘सरप्राईज’ दिले.

आता हा नविनच ‘पेच’ माझ्यापुढे आला. मुळात आता जास्त दिवस मी जगेन की नाही ही शंकाच होती,त्यात ‘अतुल’ बरोबर एकटी मी अमेरीकेत कशी जाणार, आणि आता माझ्या प्रकृतीच्या ह्या ‘स्टेज’ ला तिथे जाऊन, इतका खर्च करून आम्ही काय मिळवणार आहोत, हा सर्वात मोठ्ठा प्रश्न होता.मी नाराजी व्यक्त केल्यामुळे अतुल दुःखी झाला. परोपरीने तो मला समजावत होता. उद्या तो “प्रोसेसिंग पेपर्स” सुद्धा माझ्या कडून साइन करून कलेक्ट करणार असल्याचे त्याने सांगितले.

आम्ही येताना ‘पोंडा’ येथील ‘कॅसा मेनिनो’ हॉटेल मद्ये ‘डिनर’ करून मला कवळे येथील देवीच्या देवळा जवळ सोडून, त्याच टॅक्सी ने तो पुढे ‘पणजी’ हॉटेल ला निघून गेला.

काय पण दैवाचे खेळ, मला ओढ होती यशची, तो यावा त्याला भेटावं आणि त्याची ‘प्रतीक्षा’ माझे मन करीत होते. काहीतरी घडावं आणि तो यावा ही अनिवार ओढ मनाला असतांना, “अतुल” यावा? यश बरोबर सनसेट आणि डिनर च्या माझ्या इच्छे ऐवजी अतुल ला वरच्यांनी पाठवावे?… नियतीच्या मनात काय आहे कोणास ठाऊक. पण यशच्याच आठवणीत आणि त्याच्या वाटेकडे माझें डोळे लागले,मन बेचैन झालं, त्याच्या आठवणींनि जीव घुसमटत होता. इथे एकीकडे माझं मन, आणि माझा जीव ‘यश’ वर होता,आणि दुसरीकडे माझा ‘जीव’ वाचावा ह्या साठी अतुल जीवापाड प्रयत्न करीत होता….

“उपरवाले तेरे खेल निराले”……

…………(५७)

आज महिन्यातील शेवटचा गुरुवार. योगायोगाने अतुल कालच आल्यामुळे, ठरल्याप्रमाणे आम्ही दोघे आणि या वेळी उमा सुद्धा आमच्याबरोबर नाईक बाबांकडे आली. अतुलला सुद्धा उमाच्या एकंदरीत वागण्याचे, हुशारीचे खूप कौतुक वाटले. यशला सुद्धा मुलांपेक्षा लहान मुलींचीच जास्त ओढ होती. लहानपणीचा माझा पर्समधील फोटो बघून एकदा त्याने त्या फोटोचे पटापट मुके घेत, लाडात येत “माझी ‘शोनूली’ पण अशीच तुझ्यासारखी गोड असेल” असे म्हटल्याचे मला आठवून, आता नशिबाने आमच्या केलेल्या थट्टेचे वाईट वाटले.

नाईक बाबांनी नाडी परीक्षा करून सर्व काही व्यवस्थित होईल असे सांगितले. या वेळी त्यांनी मला कुठलासा काढा सुद्धा पिण्यास दिला आणि त्याची पावडर बरोबर देऊन आठवड्यातून एकदा प्रत्येक गुरुवारी सकाळी घेण्यास सांगितले.

आम्ही दोघांनी निघताना त्यांना वाकून नमस्कार केला आणि त्यांनी पटकन “सौभाग्यवती भव” असा आशीर्वाद दिला आणि मी दचकले. चकित होऊन बाबांकडे पाहत असताना माझा उतरलेला चेहरा आणि माझ्या डोळ्यात पाणी बघून म्हणाले “मुली, ही श्रींची इच्छा”…. मला गलबलून आले. “वरच्याला” माझ्या इच्छेची बहुदा जाणच नसावी. आपल्याला बरंच काही हवं असतं पण आपल्या कर्माच्या गतीनुसार आपल्याला काय द्यायचे आणि काय नाही हे सर्व तोच ठरवत आला आहे. आपल्यासाठी चांगलं काय आणि वाईट काय हे आपल्या आकलनाच्या पलीकडे वास्तव्य करणाऱ्या त्या विधात्यालाच ठाऊक. मानवी मन आणि बुद्धीच्या पलीकडे तो “श्री” वसतो याचा बऱ्याच वेळा आपल्याला विसर पडतो हेच खरं.

‘अतुल’ ऐकायलाच तयार नव्हता. आपली शपथ घालूनही मी ऐकत नाही म्हटल्यावर, “यश”ची शपथ घालून, त्याने जबरदस्तीने अमेरिकेच्या ट्रीटमेंटसाठी लागणारे सगळे पेपर्स माझ्याकडून साइन करून घेतले.

आता मनाने फक्त ‘यश’ बरोबरच, आणि त्याच्याच सहवासात रमणारी मी ‘अतुल’ बरोबर ‘एकटीच’ ते ही परदेशात राहायला तयार नव्हते, माझ्या मनाची ‘तसेच त्याच्याबरोबर’ राहण्याची तयारी नव्हती, हे जाणून इतके वर्ष त्याच्या मनात माझ्याबरोबर लग्न करण्याची राहिलेली ‘सुप्त’ इच्छा व्यक्त करून, मला ‘प्रपोज’ करून, आणि अमेरिकेला जाण्याआधी लग्न करायचे असा प्रस्ताव मांडून त्यांनी मला अडचणीत आणले. मी नंतर विचार करून कळविते असं सांगितलं तेव्हा शेवटी… “जशी तुझी मर्जी आणि श्रींची इच्छा” असे म्हणून तो मुंबईला परत गेला….

अतुल विभाला भेटल्यानंतर विभाचे सारखे सारखे मला फोन येऊ लागले. तिच्या मनात होते तसे घडण्याची शक्यता वाढल्याने तिनेही अतुलशी मी लग्न करावे असा अट्टाहास सुरू केला. मी लग्न करून तिथे जावे, तेथील विशेष उपचारांमुळे माझ्या प्रकृतीत सुधारणा होईल. माझे आयुष्य वाढेल आणि त्यामुळे ते दोघेही सुखी होतील. या युक्तिवादाने ‘हो’,… ‘नाही’ करता शेवटी त्या दोघांना दुखवायचे नव्हते म्हणून नाइलाजाने दोन महिन्यांनंतर बऱ्याच विचारांती मी अतुलला, गेल्याच आठवड्यात माझा होकार कळवला….

आज अमावास्या, रात्री बिछान्यावर आडवी झाले, आणि विचारांच्या जाळ्यात गुरफटले. लग्नाला होकार देऊन अमेरिकेत अतुलबरोबर जाण्यात काळाने एक प्रकारे माझ्यावर सूडच उगवला होता. “यश”ला या माझ्या ‘प्रकृतीच्या’ कारणास्तव अंतर देणाऱ्या, त्याच्या सुखाला झिडकारणाऱ्या माझ्या मनाला नियतीने ‘प्रकृतीच्याच’ कारणास्तव “अतुल”शी लग्न करण्याचा घाट घालून ‘जीवनाच्या पटावरील द्युतात’ सर्वस्वी हरवले होते. यशच्या सर्वस्वाची, त्याच्या स्वप्नांची होळी करून मी लगेच अतुलशी लग्न करून आयुष्याच्या रंगपंचमीच्या नवरंगात रंगल्याचे समजल्यावर “यश”चे काय होईल? आणि त्यात अमेरिकेला अतुलबरोबर एकटीच गेल्याचे कळल्यावर त्याच्या मनाची जी बिकट अवस्था होईल त्याला मीच सर्वस्वी जबाबदार ठरेन हा विचार मनाला भेडसावत होता. आता माझ्याही मनाची झालेली ही विचारहीन अवस्था, माझी ससेहोलपट त्याला कशी पटवून देऊ? एकीकडे यशला नाइलाजाने ‘नकार’ देणारी मी दुसरीकडे अतुलला नाइलाजाने ‘होकार’ देऊन जीवनाच्या पटावर नियतीकडून “चेकमेट” झाली होती…..

“जिंदगी देने वाले सुन, तेरी दुनिया से जी भर गया।”…….

…………(५८)

अतुलने मध्यंतरी त्याच्याकडे यश येऊन गेल्याचे आणि मी सध्या गोव्याला आहे, पण “त्याने” मला ‘डिस्टर्ब’ करू नये, असं सांगितल्याचे फोनवर मला कळवले. अमेरिकेत जाण्याची सगळी तयारी पूर्ण झाल्यामुळे मंगळवारी दिनांक २८ जूनला रात्री दोन वाजताच्या फ्लाईटने जाण्याचे ‘कन्फर्म’ झाल्याचे सांगितले. पुढच्या आठवड्यात तो आणि विभा इथे येऊन, आम्ही त्याचे कुलदैवत “श्री मंगेश”, म्हणून मंगेशीला देवळातच साधेपणाने लग्न करण्याचे फिक्स केले. आम्ही तिघे सोडल्यास या लग्नाची बातमी “सिक्रेट” ठेवण्याचे ठरवले होते.

“दादांच्या” कानावर आम्ही लग्न करून ट्रीटमेंटसाठी अमेरिकेत जाणार असल्याचे मी सांगितले. तेच आमचे लग्न ‘मंगेशीला’ देवळात लावून तेथे अभिषेक करून मग श्री शांतादुर्गेची खणाबरोबर शालू आणि पाच नारळाने मी ओटी भरून, नंतर इथे सुद्धा अभिषेक करण्याचे त्यांनी मान्य केले.

दादांनी ‘देवकडे आमच्या लग्नासंबंधी आणि पुढे अमेरिकेत उपचारांसाठी जाण्याचा’ कौल घ्यावा अशी माझी इच्छा असल्याचे मी त्यांना सांगितले.

अतुल आणि विभा आजच सकाळच्या फ्लाईटने आले. संध्याकाळी आम्ही तिघे आणि सोबत उमाला घेऊन पणजी, दोनापाऊला आणि मिरामार बीचला फिरायला गेलो. रात्री तेथेच ‘गार्डन हॉटेल’ला डिनर करून अतुलला काही महत्त्वाचे बोलायचे होते म्हणून बीचवर थोडा वेळ बसलो. उमा आणि विभा किनाऱ्याजवळ वाळूत बसून गप्पात रमल्या होत्या.

“यश”ने अजून लग्न केले नव्हते हे मला आत्ताच कळले. माझ्या भेटीसाठी, मी एकदा तरी त्याला दिसावी, त्याच्याशी बोलावी याच्यासाठी तो तळमळत असल्याचे अतुलने सांगितले. तसेच आजपर्यंत कल्पनाने मला कधीही सांगितले नव्हते, पण मला तिच्या वागण्यावरून आलेला संशय खरा ठरला होता. तिला यशबरोबर लग्न करायचे होते. आणि यशच्या ‘मामांना’ देखील तो जावई म्हणून हवा होता. यश माझ्या प्रेमात असल्याने नाइलाजाने कल्पना लग्न करून मोकळी झाली आणि यशला माझ्याबरोबर लग्न करायचे होते म्हणूनच त्याने मामांना नकार दिल्याचे अतुलने मला सांगितले…..

मला यशच्या दुर्दैवाची कीव आली. माझ्यासाठी त्याने आपल्या मामांना, मामेबहिणीला दुखवले आणि मी त्याला दुखावून वाऱ्यावर सोडले. आणि तो आता माझ्या एका भेटीसाठी एकांताच्या वाळवंटात प्रेमाच्या तहानेने व्याकुळ होऊन, भरकटलेल्या मृगासारखी आपली अवस्था करवून बसलाय. त्याच्यासाठी मी मृगजळच असले तरी प्रत्यक्षात मी फक्त निरस आयुष्याच्या वाळवंटातीलच दुर्दैवाच्या तप्त किरणांनी पोळून निघालेल्या वाळू इतकीच क्षुल्लक आहे हे त्याला कसं समजावणार?

काय हा नियतीचा अजब खेळ. त्याला अंधारात ठेऊन मी लग्नाच्या बोहल्यावर उभी होते, माझे मन मला खात होते, एक प्रकारे काळाने जरी आघात केला होता, तरी माझे सर्व निर्णय चुकत आल्याची एक अपराधी जाणीव हृदयात घर करून गेली. “प्रेम यशशी आणि लग्न मात्र अतुलशी.” माझे मन अशांत झाले.

“अजब है मालिक तेरा जहाँ, चिराग कहाँ रोशनी कहाँ।”…

आज २१ जून, दादांनी मंगेशाच्या देवळात रीतीरिवाजाने सर्व धार्मिक विधी करून लग्न लावून, इथेच खाली तळ्यावर नेऊन चालीरीतीप्रमाणे “गाठवळ” केली. पुन्हा देवळात आलो. आत गाभाऱ्यातील पूजा आटपून, नमस्कार करून, प्रदक्षिणा घालून मग दादांनी देवापुढे गाऱ्हाणे सुद्धा घातले. साष्टांग नमस्कार घालून आम्ही बाहेर सभामंडपात आलो.

त्या “मंगेशाच्या” मनात काय होते… तोच जाणे. अचानक पुढ्यात यश “ब्रह्मचारी यक्षा”च्या रूपात समोर उभा ठाकला. चकित होऊन त्याला पाहतच राहिले, माझा माझ्या नजरेवर विश्वासच बसेना. “लग्नाच्या आणि भावी आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा” म्हणत त्याने आपला हात अतुलच्या हातात देतांनाच, कसा बसा अतुलचा, डावा हात घट्ट पकडतच मी खाली कोसळले….. एक आर्त हाक….
“देवा मंगेशा”……

…………(५९)

दादांनी ‘अंगारा’ लावला, पुन्हा तीर्थ घातले. आता कुठे जरा जरा बरं वाटू लागले. मगाचच्या धक्क्यातून मी आत्ता कुठे सावरत होते. जे काही घडले ते भ्रम नसून सत्य होते. यश इथे खरोखरीच गोव्यात मला शोधत शोधत इथपर्यंत पोहोचला होता. पण आता “स्मितहास्य” करून त्याला खुलावणाऱ्या ‘स्मित’ला काळाने पाठ फिरवून दुर्मुख केले होते. आम्ही ‘मंगेशीहून’ जवळच असलेल्या ‘कवळे’ येथे देवीची सेवा करायला आलो.

हे सात किलोमीटरचे अंतर मला साता जन्माच्या फेऱ्या इतके वाटले, जे सात फेरे “यश” बरोबर घेऊन ‘सप्तपदी’ पूर्ण करायची होती आणि ‘कल्पनाच्या’ लग्नात गेल्या वर्षी तसं आमचं ठरलं सुद्धा होतं. त्या यशच्या ‘वचनांना’ झुगारून, त्याला धोका देऊन तेच ‘सात फेरे’ नियतीच्या हाताचा आधार घेत, माझ्या साताजन्मीच्या सख्याला एकटेपणाच्या आगीत लोटून इथे अतुलबरोबर पूर्ण केले होते. त्याच्याशी व्हायचा ‘गाठवळीचा’ विधी अतुलशी घडवून, दुर्दैवाने माझी पाठ न सोडता, इथेच देवळात त्याची ‘गाठ’ घडवून आणून दुर्विलास घडवला.

आम्ही देवीच्या देवळात आलो. खणा नारळांनी ओटी भरली. दादांनी अभिषेक केला. प्रसाद दिला. यशचे असे अघटित येणे आणि अतुलच्या भावविश्वाचा आजच्या शुभ दिवशी असा हिरमोड होणे माझ्या मनाला रुचले नव्हते. दादांकडे, त्यांनी शांताईकडे ‘कौल प्रसाद’ घेतल्याची चौकशी केली, तेव्हा त्यांच्या घरातील अडचणींमुळे, आणि नंतर माझ्याही गडबडीमुळे ते लक्षात न राहिल्यामुळे, त्यांच्याकडून “कौल” घेणे राहून गेले होते. काही गोष्टी अशा उगाचच घडत नसाव्या……

आपण केलेल्या कर्माची फळे, आणि संचित कर्म, या जन्मी भोगल्याशिवाय बहुदा सुटका नसावी.

‘यश’ माझा नाद सोडून एखाद्या चांगल्या मुलीशी लग्न करेल या अपेक्षेने मी त्याला सोडून इथे आले आणि त्याच्या प्रेमाला मी माझ्या या असाध्य रोगाच्या कारणाने दुरावून, मी सुद्धा किती भोगले हे नंतर त्याला समजावून सांगणार होते. पण आज त्याने अचानक मला येथे मी ‘अतुलची’ झालेली पाहून, त्याच्या मनाची काय स्थिती झाली असेल. संपूर्ण जगावरचा, आणि मुख्यतः स्त्रीजातीवरचा त्याचा विश्वास उडायला मीच कारणीभूत ठरले होते. मला हे सर्व आत्ताच्या आत्ताच त्याला प्रत्यक्ष भेटून सांगायचेच होते. अतुलला मी तसे म्हटलेही. पण शुभेच्छा देऊन, नर्व्हस होऊन, असाहाय्य होऊन यश तसाच आल्या वाटे परत फिरला होता. आम्हाला न सांगताच विषण्ण मनाने तो कुठे गेला ते कळलेच नाही…. या अशा दुखावलेल्या मनःस्थितीत तो जीवाचे काही बरं वाईट तर करणार नाही ना? मी धास्तावले आणि त्याच्या रक्षणार्थ देवीला हातही जोडले…..

अतुल आणि विभाच्या दृष्टींनी उगवलेला हा शुभ दिवस मला अशुभतेच्या क्षितिजावर मावळताना भासला…….

…………(६०)

आमचे लग्न झाले असले तरी ती एक नियतीच्या बरोबर केलेली तडजोडच होती. अतुलच्या प्रेमाचा ‘ताजमहाल’ हा यशच्या प्रेमाच्या ‘भग्न मंदिरावर’ उभारला असल्याची त्यालाही मनःपूर्वक जाणीव होती. आयुष्यभर, निदान मी जिवंत असेपर्यंत तरी यशची आठवण विसरणे मला शक्य होणार नाही याची पुरेपूर कल्पना अतुलला असूनही, फक्त मी बरी व्हावी आणि आणखीन काही वर्षे जगावी याकरिता स्वतःच्या सुखी आणि भावी आयुष्याची सुंदर स्वप्ने माझ्या आयुष्याच्या या अनिश्चित आणि वेड्या वाकड्या काटेरी मार्गावर त्यांनी फुलासारखी पसरली. पुरुषांना भावना कमी असतात, बरेच वेळा ते प्रॅक्टिकल आणि काही प्रसंगी निर्दयी असतात असे मानले जाते, आणि म्हटलेही जाते. पण मला आलेला या दोन्ही पुरुषांचा अनुभव काही वेगळेच सांगत होता. विशाल मन, परोपकार, आणि प्रेमापोटी काय वाटेल ते करण्याची अमर्याद ताकद त्यांच्यात नक्कीच असावी….. उगाचच नाही त्यांना “मर्द” म्हटले जाते.

यशचे काय झाले असेल? मनातून विचार जात नव्हता.

नामस्मरण करा, भक्ती करा, पूजाअर्चा करा तरीही विधात्याच्या मनातले जाणणे या जन्मी तरी शक्य नाही. “तो” गीतेत म्हणतो तेच खरं, आपण फक्त आपले नियत कर्म मनःपूर्वक करून आपला धर्म पाळायचा. त्याच्या फळाची अपेक्षा आणि त्याच्या परिणामाची सांगता त्याच्यावरच सोडलेली बरं.

यशला सुद्धा माझा कान्हा नक्कीच योग्य मार्ग दाखवेल…

आम्ही सर्व शनिवारी पंचमी करून रविवारी निघणार होतो. पण येत्या मंगळवारी निघण्याच्या पूर्वी काही पेपर्सची पूर्ती करण्यासाठी म्हणून ‘अतुल’ला अर्जंट ‘फोन’ आल्याने, आणि प्रॉपर्टी संबंधी काही पेपर्स विभालाही पूर्ण करण्याच्या दृष्टीने ते दोघेही निघाले.

मला इकडचे सर्व आटपायचे होते, त्यांच्याबरोबर आत्ताच निघणे शक्य नव्हते. यशला जे प्रत्यक्ष भेटून आत्ता सांगायचे होते, ते मी एका पत्रात लिहून अतुलकडे दिले. आणि रविवारी मुंबईला आल्यावर यशला प्रत्यक्ष भेटीन असा निरोपही अतुलकडे दिला…

मला सोबत म्हणून येत्या शनिवारी सकाळीच, ‘अतुल’ची ‘रिसेप्शनिस्ट’ आणि माझी जुनी मैत्रीण “सुधा” मला नेण्यासाठी इथे येणार होती.

या दोन दिवसात मी लहान मुलांच्या अनाथाश्रमात आणि वृद्धाश्रमातही उमाबरोबर जाऊन देणगी देऊन आले. तसेच देवस्थानाला सुद्धा देणगी दिली. इकडील शिपाई बंधू, आणि सफाई कामगारांना भेटवस्तू दिल्या. ‘उमा’ला विशेष बक्षीस द्यायलाही मी विसरले नाही.

यश मुंबईत अतुलला भेटल्याचे कळल्यामुळे मी निर्धास्त झाले आणि सुधा शनिवारी सकाळीच इथे आल्यामुळे मी खूश होते. तिलाही ‘पंचमीच्या’ उत्सवात सामील होता आले.

रविवारी सकाळी मी निघताना “उमा” आणि दादांना फार वाईट वाटले. उमा हुमसून, हुमसून रडत होती. वर्षभरात तिचा खूपच लळा लागला होता. मला तिने खूपच आनंद दिला होता. पण तिच्याकडे पाहून माझ्यामुळे लोकांना सुखापेक्षा मी दुःखच जास्त देत आले आहे असे जाणवले. सकाळचे फ्लाईट होते. मी जाणार हे ‘उमा’ला माहीत होते, म्हणून ती बिचारी आज एवढ्या सकाळीच उठली होती. दादांनीच आपल्या गाडीने आम्हाला ‘दाभोळी एअरपोर्ट’वर सोडले. विमानाचा प्रवास फक्त पन्नास मिनिटांचा होता पण मला तो पन्नास युगांचा वाटला. ‘यश’ आज दिसणार होता, वर्षा-सव्वा वर्षानंतर भेटणार होता. धडधडत्या अंतःकरणाने, जाण्यापूर्वी मी त्याची क्षमा मागणार. त्याचा गैरसमज दूर करून, त्याने लवकरात लवकर लग्न करावे म्हणून त्याच्याकडून “प्रॉमिस” घ्यायचेही ठरवले. मला त्याचा सुखी संसार बघायचा आहे. जे सुख मी त्याला कधीच देऊ शकले नाही ते त्याला मिळावे म्हणून देवीला हातही जोडले…. त्याचे ते मंगेश, शांतादुर्गेचे लॉकेट माझ्या हातात असतानाच, “फास्टन युवर सीट बेल्ट्स”ची “अनौन्समेंट” झाली. पाठोपाठ इंजिनमध्ये काही बिघाड झाल्याचे आणि लँडिंगला प्रॉब्लेम असल्याची, इमर्जन्सी “अनौन्समेंट” चालू होती आणि आठवणींच्या सुखद स्वप्नातून जागे होता होताच, विमानाने ‘क्रॅश लँडिंग’ केल्याने, खूप मोठ्या आवाजाने, आणि जबरदस्त धक्क्याने, मी पुढील आसनांवर आपटताना आणि यश पुढे आधाराला दोन्ही हात पसरत असतानाच मी कोसळले………

“गुड बाय माय स्वीट हार्ट”

❣️”समाप्त”❣️

***********************

 
 
For more stories visit कथा आणि गाणी
 
 
 
To explore more songs Hindi Old Classics, visit https://www.youtube.com